गाभा:
एक सुभाषित वाचनात आले ते असे :
एषा घर्मपरिक्लिष्टा नववारिपरिप्लुता ।
सीतेव शोकसंतप्ता महीं बाष्पं विमुञ्चति ॥
तर उपरोक्त सुभाषितातील "नववारिपरिप्लुता" शब्दातील परिप्लुता शब्दाचा मूळ धातू कोणता ? कृपया कोणाला माहित असल्यास सांगणे.
संस्कृतचे ज्ञान असलेल्या व्यक्तींकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
(अर्धवटराव म्हणतात तसे धाग्याचे काश्मीर होऊ नये ही अपेक्षा. :))
प्रतिक्रिया
23 Aug 2010 - 3:39 pm | नंदन
प्लु-प्लव ह्या मूळ धातुचे धातुसाधित प्लुत असावे. (हा एक अंदाज. धनंजय/मेघवेडा अधिक माहिती देऊ शकतील), पण 'परिप्लुत'चा अर्थ व्याप्त असा घेता येईल. उदा. विचारपरिप्लुत निबंध. (अवांतर - पुलंची विचारपरिलुप्त ही कोटी आठवली)
23 Aug 2010 - 4:03 pm | मेघवेडा
नंदन, माझ्याकडून ही अपेक्षा? मारतोस का मला आता?
धातु मला खरंच माहिती नाही. प्लु-प्लव धातु असावा असे मलाही वाटले. प्लवति (प्लव - तृपुएव) चा अर्थ 'वाहतो' असा होतो. पण श्लोकात नववारिपरिप्लुता याचा अर्थ 'नव्या पाण्याचा शिडकाव झालेली' (अर्थात पहिल्या पावसात न्हालेली (पृथ्वी)) असा अर्थ अभिप्रेत असावा. त्यामुळे 'परि+प्लु' (अर्थात शिडकाव करणे - शुद्ध मराठीत 'स्प्रिंकल करणे') असा धातु असावा अशी एक शंका येऊन गेली. गण-पद खरंच ठाऊक नाही. नाना अधिक प्रकाश टाकू शकेल. :)
23 Aug 2010 - 4:48 pm | प्रमोद्_पुणे
ने म्हटल्याप्रमाणे प्लु-प्लव असावा. प्रथम गण प. प.??
23 Aug 2010 - 7:15 pm | धनंजय
शब्दकोषाचा दुवा :
http://www.sanskrit-lexicon.uni-koeln.de/monier/
परि- √ प्लु (√ म्हणजे धातु)
A1. (आत्मनेपद, पहिला गण)
-प्लवते (ind.p. -प्लुत्य MBh. ; -प्लूय Pa1n2. 6-4 , 58 येथे काही प्रमुख रूपे, आणि संदर्भ) ,
to swim or float or hover about or through Br. &c ;
to revolve , move in a circle S3Br. ;
to move restlessly , go astray Br. ;
to hasten forward or near MBh. : Caus. -प्लावयति (ind.p. -प्लाव्य) , to bathe , water MBh.
(अर्थ आणि संदर्भ, संदर्भग्रंथांच्या चिह्नांची यादी मूळ दुव्यावर बघावी. =उदाहरणार्थ : S3Br. = शतपथ-ब्राह्मण )
- - -
एक शंका :
येथे अनुस्वार चुकून पडला आहे काय? "मही" असे आहे काय?
सुट्या सुभाषितापेक्षा एखाद्या काव्यामधल्या पंक्ती अहेत, असे वाटते.
23 Aug 2010 - 7:18 pm | मेघवेडा
मस्त! तुमच्याच प्रतिसादाची वाट पाहत होतो. :)
बाकी ते 'मही'च असावं. रामायणातील श्लोक असावा असे वाटते.
23 Aug 2010 - 11:49 pm | धनंजय
शोकसंतप्त होऊन रडणार्या सीतेचा संदर्भ रामायणातला असू शकतो खरा. किंवा "सीता"चा अर्थ "नांगरलेली" असा घेऊ शकतो. म्हणून श्लेषही आहे.
इथे आदले "घर्मपरिक्लिष्ट" भगभगणेसुद्धा क्लेशकारक आणि त्यावर "शोकाने पोळलेलीचे अश्रू" असे पाणीही दु:खी... अशी पुरती करुण भावना कवीने चितारलेली आहे. साधारणपणे भगभगत्या भूमीवर पाणी पडले, तर त्याचा आनंददायी उल्लेख आपण करतो. आपल्या सामान्य आयुष्यातल्या अनुभवांतून मला रसग्रहण करता येत नाही.
म्हणून वाटले, आदल्या-मागल्या श्लोकांत काही कथानक असेल. दु:खदायक कोरड्या दुष्काळानंतर दु:खदायक महापूर, कदाचित असा काही संदर्भ असेल.
24 Aug 2010 - 1:49 pm | सूड
हवे असल्यास संपूर्ण काव्य डकवू का ?? छान आहे..
24 Aug 2010 - 1:57 pm | मेघवेडा
काल अधिक शोध घेता असे कळले की हा श्लोक वाल्मीकि रामायणातील 'किष्किन्धाकाण्डा'तील २७व्या सर्गातला आहे.
25 Aug 2010 - 8:09 pm | सूड
मेवेंनी म्ह्टल्याप्रमाणे सुभाषिते डकवत आहे, रसग्रहण कितपत जमतंय माहित नाही तरी प्रयत्न करतो
अयं स कालः सम्प्राप्तः समयोऽद्य जलागमः ।
सम्पश्य त्वं नभो मेघै: सवृतं गिरिसंनिभै: ॥
हाच तो वर्षाकाळ आला आहे, पहा ते आभाळ पर्वताकार मेघांनी व्यापून टाकलंय.
शक्यमम्बरमारुह्य मेघसोपानपंक्तिभि:।
कुटजार्जुनमालाभिरलङ्कर्तुं दिवाकरः॥
मेघांच्या पायदंड्यांवरुन आभाळात चढून (जाऊन) कुटज, अर्जुन आदिंचे हार घालून सूर्याला अलंकृत करणे सहज शक्य आहे.
एषा घर्मपरिक्लिष्टा नववारिपरिप्लुता ।
सीतेव शोकसंतप्ता महीं बाष्पं विमुञ्चति ॥
ही उन्हाच्या झळांनी भगभगलेली, सीतेप्रमाणे शोकाकूल व संतप्त झालेली धरणी आता नव्या (पहिल्या पावसाच्या) पाण्याचा शिडकावा झाल्याने (हवेत) बाष्प सोडत आहे.
कशाभिरिव हैमीभिर्विद्युद्भिरभिताडितम्।
अंतःस्तनितनिर्घोषसवेदनमिवाम्बरम्॥
कशाभिरिव हैमीभि: म्हणजे सोनेरी चाबकांनी, फटकारले जाणारे आभाळ जणू गडगडून आपल्या वेदना प्रकट करत आहे.
रजः प्रशान्तं सहिमोद्य वायुर्निदाघदोषप्रसरा: प्रशान्ता:।
स्थिता हि यात्रा वसुधाधिपानाम् प्रवासिनो यान्ति नरा: स्वदेशान्॥
धूळ आता शांत झाली आहे, सहिम म्हणजे आता वारा बर्फासह अर्थात् शीतल सुखावणारा वाटत आहे.
वसुधाधिपांच्या, राजेरजवाड्यांच्या यात्रा आता स्थगित आहेत, आणि घराबाहेर असलेले प्रवासीसुद्धा मायदेशी परतत आहेत.
विद्युत्पताका: सबलाकमाला: शैलेंद्रकूटाकृतिसंनिकाशा:।
गर्जन्ति मेघा: समुदीर्णनादा: मत्ता गजेन्द्रा इव संयुगस्था:॥
विजांचे झेंडे (पताका) घेऊन, बगळ्यांच्या माळांसह शैलेंद्रकूटाकृति म्हणजेच शैलेंद्र पर्वताच्या आकाराचे मेघ जणू युद्धासाठी आलेल्या मत्त हत्तींप्रमाणे गर्जत आहेत.
वहन्ति वर्षन्ति नदन्ति भान्ति ध्यायन्ति नृत्यन्ति समाश्वसन्ति।
नद्यो घना मत्तगजा वनान्ता: प्रियाविहीनः शिखिनः प्लवङ्गा:॥
ह्या सुभाषिताची गंमत म्हणजे आधीच्या ओळीत क्रियापद आणि नंतरच्या ओळीत संबंधित कर्ता आहे.
उदा. वर्षन्ति घना:, नदन्ति मत्तगजा:
नद्या वाहत आहेत, ढग बरसत आहेत, अरण्यांचे रुप खुलून आले आहे, प्रियजनांपासून दूर झालेले (त्यांच्या ) स्मरण करत आहेत, मोर नृत्य करीत आहेत आणि माकडे (मात्र) शांत झाली आहेत.
मेघवेडा, धनंजय यथामति अर्थ दिला आहे, आपल्याकडून आणखी काही स्पष्टीकरण आल्यास स्वागतच आहे.
25 Aug 2010 - 1:43 am | धनंजय
पूर्ण रामायण नको, पण संदर्भासह रसग्रहण दिलेत तर मजा येईल.
किष्किंधाकांडात वाली-वधनंतरचा प्रसंग आहे. राम-लक्ष्मण माल्यवंत पर्वतावर गप्पा मरत आहेत. "वर्षावामुळे चराचर निसर्ग अनंदित झाला आहे", असे राम म्हणतो.
श्लोक २-३६ मध्ये बहुतेक वर्णने सुखावह आहेत. त्याचा सारांश तो "इमा: वर्षाः सदारश्च राज्ये महति च स्थितः सुग्रीवः सुखमश्नुते" ।
इथे सर्व सुखवर्णन असल्यामुळेच पुढील श्लोकातले रामाचे दु:ख टोकदार होते : "अहं तु हृतदारः"
पण श्लोक ७ मध्ये सुखी वर्णनाच्या मध्ये "शोकसंतप्ता... बाष्पम्" आहे. याचे रसग्रहण जमल्यास आवडेल.
23 Aug 2010 - 8:27 pm | सूड
धनंजय साहेब चूकच झाली बरं का !!
अनुस्वार चुकून पडलाय......
आणि दुवा व स्पष्टीकरणासाठी धन्यवाद ....!!!