पुण्या-मुंबईतील (आणि खरं तर भारतातील सर्वच मोठ्या शहरांतील) वाहतूक व्यवस्थेवर पडणार्या ताणाबद्दल बरीच साधक-बाधक चर्चा माध्यमांतून वाचायला, ऐकायला आणि पहायला मिळते. या समस्यांवर BRT, Metro आणि Mono-rail सारखे उपाय सुचवले गेले आहेत, दिल्ली-कलकत्ता सारख्या शहरांमध्ये Metro यशस्वीही ठरली आहे. पुण्या-मुंबईत काय फायदे तोटे होतील याचं घोडा-मैदान लांब नाही.
अशातच चीन मध्ये होऊ घातलेल्या एका वाहन-क्रांतीची ही झलकः मोठ्या शहरांमधील वाहतूक ताणावरील उपाय म्हणून -विशेषतः ट्रॅफिक जॅम मुळे होणार्या अडचणींवर मात म्हणून- एक पर्यावरण-सुलभ उपाय सुचवलाय शेन्झ्हेन हुआझी फ्युचर पार्किंग या कंपनीने: थ्री डी एक्स्प्रेस
वाहनांच्या गर्दीचा निचरा करण्यासाठी रस्त्यांचं अनिर्बंध रुंदीकरण करत राहण्यापेक्षा आहे त्या रस्त्यावरील वाहनांच्या वरून प्रवास करणार्या महाकाय बसेस ही कंपनी तयार करणार आहे. सहा फूटांहून ( २ मीटर्स) कमी उंचीची वाहनं जिच्या खालून सहजपणे जाऊ शकतील अशी ही वरचा मजला बारा फूटांपेक्षा (4 meters) आधिक उंच असलेली प्रत्येक थ्री डी एक्स्प्रेस बस तिच्या वरच्या स्तरावरून १२००-१४०० प्रवासी घेऊन जाईल असं वाचण्यात आलं. रस्त्याच्या कडेला असलेल्या 'रूळां'वरून या त्रिमिती बस ची चाकं चालत राहतील [straddling bus]. खालील वाहने एकमेकांना overtake करतांना ट्रॅफिक जॅम झाला तरी त्यांच्या 'बाहेरून' चालणारी त्रिमिती बस चालतच राहील आणि त्यातील प्रवासी न अडकता इच्छित स्थळी पोहोचू शकतील, अशी कल्पना आहे. दिवसा छपरावरील सौर-पॅनेल्स चा वापर करून सौरशक्ती वर, आणि रात्रीच्या वेळी विद्युत शक्तीवर ही बस चालेल.
ठराविक अंतरावर असलेल्या स्थानकांमधील वरच्या मजल्यावर प्रवासी चढ-उतार करतील. ही त्रिमिती बस स्थानकावर थांबेल तेंव्हा त्या बसच्या खालील वाहनांची वाहतूक सुखेनैव चालू राहील. एका त्रिमिती बस आणि तिच्यासाठी लागणारा ३०-४० किलोमीटर्स लांबीचा लोहमार्ग यांच्या बांधणीसाठी ५०० मिलियन युआन लागतील, आणि हा खर्च मेट्रोच्या खर्चाच्या १०% इतका कमी आहे असं कंपनी म्हणते. ट्रॅफिक जॅम चं प्रमाण या त्रिमिती बस मुळे २० ते ३० टक्क्यांवर खाली येईल असा कंपनीचा दावा अहे. या कल्पनेला सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असून पहिला prototype मार्ग लवकरच बांधायला सुरूवात होईल.
या प्रकल्पाविषयीचा कंपनीच्या सादरीकरणाचा व्हिडिओ खाली देतो आहे, त्यानुसार ही त्रिमिती बस वळणावरून सहज जातांना दाखवली आहे, ते कितपत शक्य आहे, आणि बसचं एकंदरीत आकारमान पहाता (खाली साधारण ६-७ गाड्या एकावेळी मावू शकतील इतकीच लांबी असलेल्या या बसमध्ये) १४०० प्रवासी कसे बसतील, यांविषयी मी जरा साशंक आहे -
आता असा प्रयोग भारतात करावा का या विषयी यथावकाश चर्चा होईलच, पण मला पडलेला मुलभूत प्रश्न हा की पोटाखालून वेगवेगळी (म्हणजे बदलत राहणारी) ६-८ वाहनं घेऊन जाणार्या या बसला अखेर रस्त्याचे ट्रॅफिक लाईट सारखे नियम पाळावेच लागणार, म्हणजे तिचा वेग "एक ट्रॅफिक लाईट ते दुसरा ट्रॅफिक लाईट" किंवा "एक स्थानक ते पुढचा ट्रॅफिक लाईट" यांतल्या अंतरामुळे नियंत्रित होणार, हे दोन stops जितके जवळ-जवळ (आणि शहरात, इतर cross trafficच्या सोयीसाठी ते जवळ असणं भाग असणार) तितका या त्रिमिती बसचा वेग कमी होणार, मग खरा वेळ कितपत वाचेल?
अवांतरः या त्रिमिती एक्स्प्रेस ची माहिती शोधतांना चीनमधील एका सध्याच्या बसचा हा खालील व्हिडिओ सापडला -
या त्रिमिती बस च्या पोटाखालून जाणार्या गाड्या जर अशा एकमेकांवर आणि भोवतालच्या बसच्या भिंतीच्या आतल्या भागावर आदळल्या तर....केला तुका, अन् झाला माका!
प्रतिक्रिया
18 Aug 2010 - 1:53 am | मदनबाण
चीनी मंडळींचे अभिनंदन !!! हो मग निदान त्यांच्या इथे असणार्या समस्यांचा ते विचार तरी करतात !!!
आपल्या मंडळीं बद्धल खाली सविस्तर...
ह्म्म्म... मुंबईकर रेल्वे प्रवासी अक्षरशः कुत्र्यासारखे प्रवास करतात !!! त्यांच्या आयुष्यात घर आणि ऑफिस या मधला प्रवास हा अत्यंत हालाखीचा आहे. त्याची काळजी ना महाराष्ट्रातल्या सरकारला आहे ना रेल्वे मंत्रालयाला.
रेल्वेच्या वाघीणीं मधुन प्रवास करणारी गुर-ढोर देखील आरामात प्रवास करतात पण मुंबईकरांची अवस्था त्या गुरांपेक्षा बेक्कार आहे.
उदा. :---
अनेकांना तर दरवाजात लटकत लटकत प्रवास करावा लागतो आणि त्याचा परिणाम म्हणजे मॄत्युशी थेट भेट !!!
http://www.youtube.com/watch?v=oxR6ddOsneA
कॄपया वरील लिंक वर टिचकी मारण्यापूर्वी तुमचे मन खंबीर आहे याची खात्री करा मगच लिंक उघडण्याची चेष्टा करा कारण जे दिसेल ते आहे मुंबईतील ट्रेन प्रवासाचे भिषण वास्तव !!! :(
18 Aug 2010 - 3:28 am | मधुशाला
"लिंक उघडण्याची चेष्टा करा"
म्हणजे काय????
18 Aug 2010 - 6:21 am | नगरीनिरंजन
ही मराठी भाषेची चेष्टा आहे. असंलं काही वाचलं की मी निश्चेष्ट होतो काही वेळ.
18 Aug 2010 - 6:46 am | हुप्प्या
हिंदीतले भलत्याच अर्थाने वापरले जाणारे शब्द तसेच्या तसे मराठीत आणायचे आणि असे विचित्र वाक्यप्रयोग होतात.
18 Aug 2010 - 12:24 pm | मदनबाण
चुकीचा शब्द प्रयोग केल्या बद्धल क्षमस्व...
18 Aug 2010 - 1:46 am | राजेश घासकडवी
सध्या अस्तित्वात असलेली व्यवस्था (रस्ते) वापरून वाहतुक कोंडीच्या प्रश्नावर काढलेला हा अभिनव उपाय आहे.
मला दिसणारे फायदे
- रेल्वे स्थानकांच्या प्रचंड बांधकामाची, जागेची गरज नाही. बस हेच स्थानकाचं काम करते.
- स्टॉप्सवर थांबणे हे बससाठी कष्टाचं असतं. वाहतुक खोळंब्यामुळे बसला थांबायला वेळ लागतो. बस वारंवार थांबल्यामुळे वाहतुक खोळंबाही (किमान वाहतुकीचा वेग मर्यादित) होतो.
- वाहतुक कितीही अनियमित असली तरी ही बस ठरलेल्या वेळी पोचू शकेल. ऑफिसला जाणारे अनेक ड्राईव्ह करण्यापेक्षा अशा बसने जातील.
- प्रचंड आकारामुळे सौर ऊर्जा खरोखरच परिणामकारकरीत्या वापरता येईल.
तोटे असतीलच, पण त्यावर उपायही असतील. चीनमध्ये ही योजना कशी राबवली जाते हे पाहाण्याची उत्सुकता आहे.
18 Aug 2010 - 1:49 am | विकास
कल्पना म्हणून मस्तच आहे. कसे आणि कितपत खरे होईल ते काळ ठरवेल, ... पण विचार करण्याजोगा प्रकार आहे.
अवांतरः
बाकी एक मजेशीर प्रकार त्या कंपनीच्या संकेतस्थळावर झाला. :-) माझ्या ब्राउजरवर हे संकेतस्थळ उघडताक्षणी गुगलबाबांच्या लगेच चीनी-इंग्रजी भाषांतर करायला हवे लक्षात आले आणि बहुगुणींनी वर वापरलेल्या "थ्री डी एक्स्प्रेस" शब्दाचे चायनीज पानाचे भाषांतर मला असे दिसले! : "..."three-dimensional Pakistan", have reported that "three-dimensional fast bus," the future of urban transport innovation and technology. " ;)
18 Aug 2010 - 3:26 am | मधुशाला
एकदम अभिनव कल्पना. यातल्या अडचणी कशा दूर करतात याचे कुतुहल आहे.
उदा. उंच वाहनांसाठीचे रस्ते, एखाद्या उंच वाहनाने त्यात घुसायचा प्रयत्न केला तर काय? (मुंबईत छोट्या पुलांखाली अशी अडकलेली वाहने पाहिली आहेत :) ), खालून जाणार्या वाहनांना वाहतूक दिवे कसे दिसणार? इत्यादी.
18 Aug 2010 - 5:05 am | चित्रा
कल्पना भारी आहे. सिम्युलेशन उत्तमच आहे, बघायला आवडले.
यात खाली ट्रॅफिक जाम झाला, की काय होईल त्याची कल्पना करता येत नाही. बहुतेक पुढील गाड्यांना जागरूक राहावे लागेल, एकाच लेनमधून जाण्यासाठी, म्हणजे भारतात ही कल्पना प्रत्यक्षात येणे अवघडच आहे! ;) पण सिम्युलेशन करता येईल असे वाटते.
18 Aug 2010 - 6:42 am | हुप्प्या
आयडिया भन्नाट आहे. पण सौर उर्जेवर इतकी महाकाय बस चालेल असे वाटत नाही. फारतर बसमधले दिवे, पंखे अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालतील.
रुंद रस्त्यावरच हा प्रयोग करून बघण्याजोगा आहे. खाजगी वाहतूकीला अडथळा न आणता बशीची वाहतूक करण्याच्या कल्पनेला तरी दाद दिली पाहिजे.
18 Aug 2010 - 10:19 am | गांधीवादी
चीन म्हणजे बंदुकीतून सुसाट वेगानी सुटलेली एक गोळी आहे. कुठे जाऊन धडकेल पत्ता नाही.
हे वाचा
Japan Economy Is Overtaken by China as Growth Weakens
हे असला काही झाला कि मग मिपा , मिमी , उपक्रम वगेरे वगेरे सगळं एक दमात बंद.
सध्या चीन बद्दल लिहिण्यासारखा बरचसे आहे.
जर वाचक उत्सुक असतील तर जरूर लिहीन.
18 Aug 2010 - 10:29 am | नितिन थत्ते
महाबसची कल्पना छान आहे. म्हणजे मोठाले स्ट्रक्चर उभारून पूल बनवायच्या ऐवजी बस हाच एक पूल आहे.
याचा ब्रेक इव्हन पॉईण्ट बघायला हवा. किती अंतरात किती बस असल्या तर पूल बांधणेच स्वस्त पडेल.
एकसमान रूंदीचे रस्ते हवे.
बस वळताना दाखवली आहे तेथे ट्रामसारखे रस्त्याच्या पातळीत रूळ आहेत. त्या रुळांवरून दुसर्या गाड्या जात असतील तर बसला थांबावे लागेल. ट्राम बंद होण्याचे हे एक मुख्य कारण होते. कलकत्त्यात ट्राम आहेत त्यांना हाच प्रश्न भेडसावतो.
बस वळणार आहे का सरळ जानार आहे हे पाहून खालच्या गाड्यांना आत शिरावे लागेल.
चित्रात वळणार्या बसच्या खाली सरळ जाणार्या गाड्या असतील तर काय होईल.
पण जेथे बीआरटी साठी डेडिकेटेड लेन बनवल्या जात आहेत तेथे हे करता येईल. बसच्या रुंदीमधून गाड्यांची एक रांग नक्कीच जाऊ शकेल.
इनोव्हेटिव्ह कल्पना म्हणून उत्तम आहे.
18 Aug 2010 - 5:10 pm | स्वाती२
चांगली कल्पना.