साहित्य :- तांदुळ पिठी,जाड भरडलेले ओले मटार १ मोठी वाटी आणि १ लहान वाटी स्वीट कॉर्न, तेलावर लालसर भाजलेला कांदा १ वाटी,बारीक चिरलेला कांदां १ वाटी , खोवलेले खोबरे २ मोठ्या वाट्या , ४ लवंगा,४ मिरे, दालचिनीचा १ छोटा तुकडा, ८/१० काजु, लसुण पाकळ्या ६/७, आले १ इंच, भाजलेले तीळ अर्धी वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर १ वाटी, मीठ चवीप्रमाणे, तिखट २ चमचे, आले लसुण मिरची पेस्ट १ चमचा, १ वाटी चिरलेला टोमॅटो, तेल आणि फ़ोडणीचे साहित्य.
From Recipee
कृती :- प्रथम तेलावर कच्चा कांदा परतुन त्यात आले लसुण मिरचीची पेस्ट घालुन चांगले परतुन घ्यावे. त्यावर मटार आणि स्वीटकॉर्न घालुन वाफ़वुन घेउन त्यात चवीनुसार मीठ घालावे खाली उतरवुन थोडे खोबरे मिक्स करावे. हे सारण तयार झाले.
आता आपण तांदुळाच्या पिठाची उकड काढुन घ्यावी. ते पीठ चांगले मळुन त्यात वरील सारण भरुन मोदक तयार करावेत. ते वाफ़वुन घ्यावेत.
From Recipee
तीळ, काजु,लवंग,मिरे,दालचिनी,लसुण,आले,भाजलेला कांदा, टोमॅटो, खोबरे हे सर्व मिक्सरमधुन बारीक वाटुन त्याची पेस्ट तयार करावी. आता जाड बुडाच्या कढईत तेलावर ही पेस्ट चांगली परतुन घ्यावी. त्यात तिखट मीठ चवीप्रमाणे घालावे आणि आपल्याला जसे हवे त्याप्रमाणे घट्ट/पातळ ठेवावे. हे चांगले उकळले की त्यात मोदक घालुन परत एकदा चांगली उकळी आणावी आणि एका डीशमधे घेउन त्यावर खोबरे कोथिंबीर घालुन सर्व्ह करावे.
From Recipee
प्रतिक्रिया
17 Aug 2010 - 3:23 pm | सूड
गणपती बाप्पा ........
17 Aug 2010 - 3:31 pm | परिकथेतील राजकुमार
वा र लो !!
17 Aug 2010 - 3:32 pm | सुनील
आता आपण तांदुळाच्या पिठाची उकड काढुन घ्यावी
ही कृती अशी एका वाक्यात उडवता येते होय?
तसा हा तिखट्-मिठाच्या मोदकांचा प्रकार जरा वेगळाच. चव छान असणारच पण (ह्या जन्मात) करायला जमेलसे वाटत नाही!
17 Aug 2010 - 4:36 pm | सहज
वाह! दिसतोय छान प्रकार. पण करायला तितका उत्साह नाही :-)
यावरुन एका छान डिम सम स्पेशल रेस्टॉरंटमधे जायची इच्छा झाली आहे.
17 Aug 2010 - 8:44 pm | शाहरुख
सहमत ! उकड काढणे फारच अवघड काम बुवा :-(
कोकणात मोदकाची खीर करतात तिची चुलत बहीण दिसतीय ही करी !
घरी सांगतो करायला :D
17 Aug 2010 - 3:48 pm | अनाम
चला यावेळी बाप्पाला चेंज मिळणार तर :)
आयडियेची कल्पना भन्नाट आहे पण.
आयत करुन दिलतर खरी मजा, जमेलस वाटत नाही :(
17 Aug 2010 - 4:08 pm | सुत्रधार
आई शप्पत, कोलान्टी उडीच.............
आज पर्यन्तची १ नन्बर पाक क्रुती.....
17 Aug 2010 - 4:35 pm | मदनबाण
च्यामारी आता तिखट मसालावाले मोदक पण मंडळी बनवायला लागले !!! ;)
अ फ ला तु न... :)
17 Aug 2010 - 6:07 pm | मीनल
अल्टीमेट दिसतो आहे पदार्थ.
सगळ्या पाककृतींची छुट्टी!!
17 Aug 2010 - 6:45 pm | रेवती
मस्त पदार्थ!
जरा वेळ लागत असेल रांधायला पण चव भारी असणार यात शंका नाही.
17 Aug 2010 - 6:49 pm | विंजिनेर
आयला! काय दिसतोय. ज ह ब ह र्या.
17 Aug 2010 - 7:04 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
मस्त आहे...करुन पाहुन कशी होते ते सांगेन. :)
खुप दिवसांपासुन शोधात होते रेसिपीच्या....!
17 Aug 2010 - 8:28 pm | स्वाती२
मस्त! तळलेल्या कोफ्त्या पेक्षा हा वाफवलेला प्रकार छान!
17 Aug 2010 - 8:41 pm | चित्रा
पाककृती वेगळीच दिसते आहे, लागतही चांगली असावी. जरा दाटसर कढीत गोळे/कोफ्ते सोडतो तसे हे मोदक सोडले तरी बरे लागतील का असा विचार करते आहे. (याचा अर्थ मला भूक लागली आहे, त्यामुळे वाटेल ते सुचते आहे!) :)
नेहमीपेक्षा वेगळ्याच पाककृतींचे बक्षीस द्यायचे असले तर ते तुम्हालाच मिळावे. आगळीवेगळी पाककृती.
17 Aug 2010 - 8:45 pm | स्वाती दिनेश
अनवट पाकृ आवडली,
मी असे मटारचे मोदक स्टार्टर म्हणून केले आहेत, पण मटार+ मके घालून पाहिले नव्हते आणि करी नव्हती केली. एकदा वेळ आणि पेशन्स ठेवून करुन पाहिली पाहिजे.
स्वाती