थोडसं अवांतर ह्या पाककृतीबद्दल.. ही पाककृती एका वर्तमानपत्रात आली होती.. नक्की कुठंल वर्तमानपत्र होतं ते काही आठवत नाही.. पण पाककृती मात्र हमखास आठवते... काय करणार..शेवटी मी पडलो एक खादाड मिपाकर.. ;-)
आता पाककृतीकडे वळूया..
साहित्यः गव्हाचं पीठ आणि मैदा, तेल.
सारणाचं साहित्यः पाव किलो फरसाण, सुके खोबरे अर्धी वाटी, १०० ग्राम तीळ, चिंचगुळाची चटणी..
कृती:
चला प्रथम सारण बनवून ठेवुन द्या. सारणासाठी फरसाण मिक्सरमधून भरड वाटून घ्या. सुके खोबरे किसून भाजून घ्या. तसेच तीळसुद्धा भाजून घ्या. वाटून घेतलेले फरसाण, खोबरे आणि तीळ एकत्र करा.
चिंचगुळाची चटणी करताना चिंच आणि गूळ थोड्या पाण्यात भिजत ठेवा. थोड्या वेळाने मिक्सरमधून फिरवून घ्या आणि वरील मिश्रणात ओतून सारण बनवून घ्या. सारण बनवताना त्यात वेगळं पाणी अथवा तेल घालण्याची गरज नाही.
आता पीठ मळून घ्या आणि त्याचे लिंबाएवढे गोळे बनवा. प्रत्येक गोळ्याची एक पारी बनवा आणि त्यात सारण भरुन चांगला गोळा बनवून लाटून घ्या. लाटून झालेले पराठे तव्यावर भाजून घ्या..
सर्व्ह करताना दह्यासोबत सर्व्ह करा.
लेखात चित्र चढवून दिले आहे. - संपादक मंडळ
प्रतिक्रिया
17 Aug 2010 - 8:57 am | बहुगुणी
...करून पहायला हवेत असे पराठे.
मैदा कशासाठी आहे ते कळलं नाही, कणिक आणि मैदा दोन्ही कशासाठी? आणि किती प्रमाणात एकत्र करायचे?
आणि फोटो? फोटोशिवाय लोक इथे विश्वास ठेवत नाहीत हो:-)
17 Aug 2010 - 10:13 am | सहज
कृपया फोटो कसा चढवावा याकरता हा, माननीय सदस्य गणपा यांचा धागा अवश्य वाचा.
17 Aug 2010 - 11:27 am | अविनाशकुलकर्णी
फरसाण चितळ्यांचे कि काका हलवायाचे घ्यायचे.?
17 Aug 2010 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार
छानच आहे हो पराठा.
हा घ्या तुमचा फोटु :-
17 Aug 2010 - 6:42 pm | रेवती
पहिल्यांदाच ऐकतीये हा पदार्थ!
सारण हे बाखरवडीच्या जवळ जाणारे वाटते आहे.
17 Aug 2010 - 9:07 pm | अश्विनीका
छान रेसिपी .
मी असा बारि़क शेवेचा पराठा केला होता. छान लागला होता चवीला.
सारण - बारिक शेव, अगदी बारिक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर , मीठ , तिखट, किंचित चाट मसाला.
हे पदार्थ एकत्र करून सारण बनवले आणि कणकेच्या पारीत भरून, गोल लाटून पराठा केला होता.
17 Aug 2010 - 10:21 pm | पिंगू
चित्र चढवून दिल्याबद्दल संपादक मंडळाचे आभार.
@ बहुगुणी
मैदा आणि गव्हाचे पीठ समप्रमाणात घेतले तर उत्तम. पाककृती घाईत लिहल्याने काही चुका झाल्या असल्यास माफी असावी.
प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार...
- (मिपावरचा नवोदित स्वयंपाकी) पिंगू
17 Aug 2010 - 10:25 pm | शिल्पा ब
हम्म...फरसाण अन पराठा वेगवेगळे पदार्थ आहेत...मला काही पटला नाही हा प्रकार. असो.
18 Aug 2010 - 12:48 am | मदनबाण
मस्त... :)
18 Aug 2010 - 6:14 am | पिंगू
@ शिल्पा ब
माझ्या घरीपण तुझी प्रतिक्रिया उमटली होती.. पण बनवून झाल्यावर सर्वांनी चाखून पाहिली आणि गंमत म्हणजे विरोधकांनी प्रथम हादडली...
- पिंगू