फ्रांकफुर्टर ग्रुनसॉसं

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
8 Aug 2010 - 8:45 pm

फ्रांकफुर्टची खासियत म्हणजे सात हिरव्या हर्ब पासून बनवलेलं हे हिरवं सॉस. ग्यॉथेची ही आवडती डिश! इस्टरच्या आधीच्या दिवशी म्हणजे ग्रुन डोनर्सटागला म्हणजेच होली/माँडी थर्स्टडे ला हे खाण्याची प्रथा आहे. अर्थात त्यानंतर मे ते सप्टेंबर हे ग्रुनसॉस फ्रांकफुर्ट आणि परिसरातल्या मॉल्स मध्ये,रेस्तराँमध्ये हमखास मिळतंच मिळतं. अगदी फ्राफुच्या विमानतळावरच्या जर्मन रेस्तरॉ मध्येही ग्रुनसॉस असतंच." हेसनं " मध्ये हमखास मिळणारी ही फ्रांकफुर्टची खासियत!
हल्ली ग्रीन हाउस मध्ये यात असणारी हर्ब्ज जवळजवळ वर्षभर तयार करतात आणि विक्रीलाही असतात पण ते म्हणजे हल्ली वर्षभर मिळणार्‍या बिनमौसमी कैर्‍यांना कशी खास चव नसते ना, तसे लागते. खरी चव बघायची असेल तर वसंतात आणि उन्हाळ्यातच. पानगळ सुरू होऊन थंडीचे वारे वहायला लागले की ग्रुनसॉसची मजा गेलीच. जशी पावसाला सुरूवात झाल्यावर आंबे उतरतात आणि चव बिघडते ना, अगदी तसंच काहीसं होतं. इथे आंबे आणि ग्रुन सॉस ह्या दोन उत्तरदक्षिण ध्रुवाइतक्या भिन्न पदार्थांची तुलना अर्थातच करायची नाहीये फक्त पदार्थाची चव वातावरण कसे घालवते तेवढेच सांगण्यासाठी आंब्याचे उदाहरण समर्पक वाटले.

मे महिन्यात फ्रांकफुर्ट मध्ये ग्रुनसॉसंफेस्ट अर्थात ह्या हरितसॉसचा उत्सव असतो. एवढेच नव्हे तर ह्या पारंपारिक खासियतीची आणि त्यात वापरत असणार्‍या हर्ब्जना मानवंदना म्हणून फ्रांकफुर्टमध्ये त्याचे चक्क स्मारक केले आहे. ह्या हिरव्या हर्बजच्याही अनेक छटा आहेत. ही हर्ब्ज ज्या ठिकाणी उगवतात तेथे सात वेगवेगळ्या खुराड्यांमध्ये त्यात्या छटेचे प्रकाशदिवे लावतात. संधीप्रकाशात ते सुंदर दिसतात.

आजीआजोबांची आणि आमची ओळख नवीन होती तेव्हा त्यांनी एकदा आम्हाला जेवायला बोलावले होते आणि ग्रुनसॉस केले होते. आता ह्या सॉसवर आपलं जेवण कसं होणार? हा प्रश्न पडून आम्ही आपली सेफर साइड म्हणून घरी भोजनाची कच्ची तयारी करून ठेवून त्यांच्याकडे गेलो. तेथे गेल्यावर आणि ग्रुनसॉस खाल्ल्यानंतर लगेचच हा प्रकार कसा करतात ते ही समजून घेतलं.

तर ही रेसिपी मिपाकरांसाठी :

हे सॉस करण्यासाठी सात प्रकारचे हर्ब्ज लागतात ते या प्रमाणे-
7 krauter- Petersilie, Sauerampfer, Borretsch, Kerbel, Krese, Schnittlauch,Piminelle
म्हणजेच -parsley,sorrel,borago officinalis / borage, chervil, kress/cress/gardencress,chieves, pimpenella/salad burnet

हे सात हर्ब्ज पारंपरिक पाककृतीत वापरले जातात. याखेरीज lemonbalm,lovage,tarragon,dill हे सुध्दा काहीजण त्यात वापरतात.
आमच्या पारंपरिक रेसिपीमध्ये मात्र वरील सात हर्ब्जच वापरले आहेत.
हे प्रमाण दोन माणसांच्या भरपेट जेवणासाठी पुरेसे आहे.
तर हे सात हर्ब्ज असलेली २०० ग्रामची जुडी येथे मिळते तीच घेतली आहे. तसे मिळाले नाही तर ही सात प्रकारची हर्ब्ज साधारण २०० ते २५० ग्राम होतील एवढी घेणे. सगळ्यात आधी ही हर्ब्ज स्वच्छ धुवून,चिरून,मिक्सरमधूनकाढणे.
त्यात ४ मोठे चमचे घट्ट दही किवा क्वार्कचीज अधिक २ मोठे चमचे सोअर क्रिम घालून परत मिक्सरमधून काढणे. चमचाभर लिंबाचा रस, १ चमचा साखर, १ मोठा चमचा मस्टर्डसॉस, २ चमचे मेयॉनिज,१ मोठा चमचाभर ऑलिव्ह ऑइल चवीनुसार मीठ घालून परत एकदा मिक्सर मधून काढणे. मिश्रण गंधासारखे होते.
हे मिश्रण म्हणजेच ग्रुन सॉस ! एका वाडग्यात काढून घेऊन फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ८ ते १० तास ठेवणे .
थोडक्यात- दुपारी खायचे असेल तर रात्रीच वाटून ठेवणे आणि रात्री खायचे असेल तर सक्काळीच वाटून ग्रुनसॉस फ्रिजमध्ये जाऊ देत.
खायच्या वेळी- उकडलेली अंडी आणि उकडलेले बटाटे यांच्याबरोबर ताव मारणे. बरोबर बागेतचा एखादा स्लाइस, सलामी,स्पेक इ. असले तर उत्तमच! पण पारंपरिक पध्दतीत फक्त उकडलेली अंडी आणि बटाटे यांच्याबरोबर ग्रुन सॉस खातात.

(जर सात मिळाली नाहीत तर जास्तीत जास्त जितकी मिळतील तितकी घेणे.पण जर ही हर्बज मिळाली नाहीत तर त्यांची रिप्लेसमेंट मला माहित नाही. त्यांचे उन्हाळ्यात आमच्याकडे स्वागत आहे, एवढे नक्की म्हणू शकते. :-) )

लोकहो, मिपावर अर्धशतकी पाकृ देताना काहीतरी 'हटके' पाकृ द्यावी असा विचार होता म्हणून हा गुर्नसॉस प्रपंच!

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

8 Aug 2010 - 8:50 pm | विंजिनेर

छान. थंडगार पाकृ.
बायदवे. अंड्याचे बलक केशरी दिसतायेत. तुमच्या कडच्या कोंबड्यांना झेंडू खायला घालतात का? फ्रेंचांना ते वेड असते. :)

वेगळीच पाकृ!
प्रत्येक भाजी, फळ यांचे त्या त्या मोसमातले चवीचे महत्व सांगण्यासाठी आंब्याचे दिलेले उदाहरण आवडले.
सर्व छायाचित्रे आवडली. त्यात दाखवलेल्या जवळ्जवळ सर्व हर्ब्ज इथे बघितलेल्या आहेत असे वाटते.
(अश्या मांडलेल्या हर्ब्ज बघून श्रावणातल्या पुजेच्या फुले आणि पत्री ची आठवण झाली.)
अर्धशतकी पाकृ खरच 'हटके' आहे. अभिनंदन!
अश्या पदार्थांची चव घेण्यासाठी आमंत्रण देउन तू आम्हास इनो घेण्यास प्रवृत्त करीत आहेस.;)

स्वाती ताई हाफ सेंचुरीबद्दल अभिनंदन.
पाककृती खरच हटके आहे. हे साती हर्ब्स इथे मिळायचे नाहीत त्यामुळे तुम्ही तुर्तास दिलेल्या फोटुवर समाधान. जर चुकुन माकुन कधी तुमच्या देशात विमान उतरल तर येउच पाहुणाचार घायला :)

ही वाटचाल अशीच चालु राहुन सचिनच्या द्विशतकाचाच काय तर सेहवागचा त्रिशतकाचा ही विक्रम मोडुन काढण्यासाठी शुभेच्छा!!!!
:)

संजय अभ्यंकर's picture

8 Aug 2010 - 10:45 pm | संजय अभ्यंकर

अभिनंदन!

आणी एका उत्कृष्ट पा.कृ. बद्दल आभार!

मीनल's picture

8 Aug 2010 - 10:48 pm | मीनल

ग्रुन सॉस अवाकाडो पासून बनवलेल्या guacamole सारखे दिसते आहे. पण चव नक्कीच वेगळी असेल.

चित्रा's picture

9 Aug 2010 - 5:08 am | चित्रा

वेगळीच पाककृती, काही वनस्पती कुठे मिळतील त्या शोधायलाच लागेल, पण लगेच करून बघावी अशी वाटणारी आहे ही पाककृती.

प्रभो's picture

9 Aug 2010 - 7:55 am | प्रभो

एक नंबर!!!

प्रभ्या लेका, लवकर काढ रे व्हिसा... :)

सहज's picture

9 Aug 2010 - 8:08 am | सहज

पेस्टो, ग्वाकामोले आठवले.

बाकी हा डीप व बटाटे, उकडलेले अंडे बेस्टच!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Aug 2010 - 10:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वातीताई, तुझ्याकडे चारच दिवस का राहिले याचं आता खूपच दु:ख होत आहे.
अर्धशतकाबद्दल अभिनंदन!

पण परदेशी पेक्षा देशीच पाकृ छान!!!!!!!!!

कुक's picture

10 Aug 2010 - 12:20 pm | कुक

मि आज नविन सभासद झालोय. मला वरिल साहित्याचि मराथि नावे सागेल का कुनि?