अ‍ॅनिमल फार्म (मला कळलेले)

खालिद's picture
खालिद in काथ्याकूट
8 Aug 2010 - 11:42 am
गाभा: 

पाच वर्षांपूर्वी कॉलेजला असताना आमच्या ग्रूप ने एक टी शर्ट डिझाइन केला होता. त्यावरचे वाक्य होते (COEP-All Men are Equal but Some are more equal). त्यावेळी माझी इंग्लिश साहित्याची वाचन कुवत फार नसल्याने त्या वाक्याबद्दल फार जास्त काही कळत नव्हते. फक्त ते वाक्य बोलताना फार भारी वाटायचे. नंतर पुढे कधीतरी मित्रांशी झालेल्या चर्चेत हे वाक्य जॉर्ज ऑर्वेल या लेखकाच्या "अ‍ॅनिमल फार्म " या पुस्तकातील "All animals are equal but some are more equal than others" या वाक्यावर बेतलेले आहे असे कळले. त्यावेळी हे पुस्तक कधीतरी वाचेन असे ठरवले होते आणि ते, आपण बरेच संकल्प करुन सोडून देतो, तसे अर्धवट राहिले.

काल लायब्ररी मधे एक पुस्तक शोधताना Relevant Search मधे अ‍ॅनिमल फार्म दिसले. लगेच बैठक मारली आणि ३-४ तासात इनमिन १५० पानांचे पुस्तक संपवून टाकले. पुस्तक संपवले खरे, पण ऑर्वेल ने मनात जी बैठक मारली ती मारलीच वर लिहायलाही उद्युक्त केलय. बर्‍याच जणानी हे पुस्तक वाचले असेल, तरीही माझे हे दिन पैसे या पुस्तकाबद्दल.

जॉर्ज ऑर्वेल ने १९३७ साली लिहायला घेतलेले, पण १९४३ पर्यंत प्रकाशित न झालेले १५० पानांचे हे "अ‍ॅनिमल फार्म - अ फेअरी स्टोरी " नावाचे पुस्तक. सरळपणे बघायला गेल्यास, एखादी इसापनीती, हितोपदेश सारखी गोष्ट. पण एका छोट्या शेतावर राहणार्‍या प्राण्यांच्या जीवनात घडणारी ही गोष्ट वाचून संपल्यावर इतिहास, समाजजीवन, संस्कृती, मानव स्वभाव या इतर अनेक पैलूंवर प्रकाश टाकून आपल्याला स्वतःबद्दल आणि परिस्थितीबद्दल विचार करायला भाग पाडते.

मूळ कथा अगदी साधीसरळ. जोन्स नावाच्या एका शेतकर्‍याच्या शेतावर बैल, गायी, घोडे, डुकरे, कुत्रे, गाढव, कोंबड्या, मेंढ्या असे बरेच प्राणी राहत असतात. आपापले काम प्रामाणिक पणे करत असतात. पण मेजर म्हणून एक सर्वात वयस्कर डुक्कर ज्याला सर्व प्राणी फार मान देत असतात, त्याला सारखे वाटत असते की 'अरे, आपल्याला यातून काय मिळते? जेमतेम जगण्यापुरते खायला आणि राहायला. बाकी सर्व फायदा या मनुष्यांना. तर नाही, आपण यांची गुलामी आता नाही करायची.' तो सर्व प्राण्याना एकत्र करुन त्यांच्या मनात या पारतंत्र्या विरुद्ध लढायची प्रेरणा निर्माण करतो. तो मेल्यावर त्या कळपातील दोन हुशार डुकरे, नेपोलिअन आणि स्नोबॉल, त्याचा वारसा पुढे चालवताना जोडीने सर्व प्राण्याना लिहावाचायला शिकवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरुन सुशिक्षित झालेले प्राणी नीट विचार करुन जागरुक होतील. काही प्राणी , जे चलाख असतात ते शिकतात , काहीजण नाहीत. पुढे एकदा जोन्स च्या चुकीने उपाशी राहायला लागते आणि तिथेच क्रांतीची ठिणगी पडते. सर्व प्राणी माणसांवर हल्ला करून त्यांना हाकलून लावतात आणि शेताचा ताबा घेतात. सर्व जणाना गुण्यागोविंदाने राहता यावे म्हणून कामे वाटून घेतली जातात. स्नोबॉल आणि नेपोलिअन सर्वात जास्त ज्ञानी असल्याने सर्व मॅनेजमेंट चे काम बघतात. घोडे शेतीकाम आणि ओझी वाहणे तर बाकी सर्व प्राणी आपापल्यानुसार ताकदीची कामे वाटून धेतात. सर्वांचे चांगले व्हावे, शांततेत सर्व कामे पार पडावी म्हणून सात नियमांची घटना लिहीली जाते.ती अशी

१. जे कोणी दोन पायांवर चालतील ते शत्रू
२. जे कोणी चार पायांवर चालतील किंवा ज्याना पंख आहेत ते मित्र.
३. कोणताही प्राणी माणसासारखे कपडे घालणार नाही.
४. कोणताही प्राणी माणसासारखा बिछान्यात झोपणार नाही.
५. कोणताही प्राणी दारु पिणार नाही.
६. कोणताही प्राणी दुसर्‍या प्राण्याची हत्या करणार नाही.
७. सर्व प्राणी समान आहेत. (All animals are equal.)

अशाप्रकारे काही दिवस आनंदात जातात. पण जसा जसा काळ जायला लागतो तसतशी प्राण्यांमधे धुसफुशी सुरु होतात. आपणच शेताचे सर्वेसर्वा व्हावे असे काही प्राण्यांना वाटू लागते. राजकारण खेळले जाउ लागते. एकाएका जातीला हाताशी धरून दुसर्‍याचा काटा काढणे, इतर प्राण्यांची मने कलुषित करुन भांडणे लावून आपला स्वार्थ साधणे, सर्वांचे हित साधण्याचा देखावा करुन फक्त आपले आणि आपल्या बगल्बच्चांचे हित साधणे असे प्रकार होउ लागतात. आपल्या अकलेच्या जोरावर आणि फोडा आणि झोडा या तत्वाने डुकरे स्वतःला श्रेष्ठ घोषित करतात. त्यानंतर ते जपण्यासाठी नियमांमधे सोयीस्कर बदल करणे, इतराना तुच्छतेने वागवणे, सत्ता टिकवायला शेवटी माणसांबरोबरही हातमिळवणी करणे, विरोध करणार्‍याचा काटा काढणे अशा सर्व थरांना गोष्टी नेल्या जातात. मात्र एवढे करुनही सामान्य प्राण्याना 'तुमच्या भल्यासाठीच आम्ही हे करतोय' अशी भ्रामक समजूत करुन दिली जाते. सर्व आपल्या मनासारखे करण्यासाठी हे मूठ्भर प्राणी सर्व नियमांवर बोळा फिरवून शेवटी एकच नियम बनवतात की "all animal ara equal but some are more qual than others" . आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने आणि भाषणांनी सर्व सामान्य प्राण्यांच्या मनावर हा नियम कोरला जातो. मग त्यांच्या कष्टावर हे मोजके प्राणी गब्बर होतात आणि बाहेरच्या जगाला 'आम्ही किती प्रगती केलीय' याचा देखावा निर्माण करतात. हा सर्व सुखाचा देखावा तयार झाला म्हणजे "ऑल इज वेल अ‍ॅण्ड वी लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर" याचाच अर्थ परीकथा संपली.

दुसर्‍या महायुद्धाच्या कालखंडात बेतलेली आणि मुख्यत्वे साम्यवाद (मार्क्सवाद) आणि त्याच्या तत्वावर टीका करुन त्यातला फोलपणा दाखवणारी ही कथा काल, आज आणि उद्याच्या देखील परिस्थितीवर प्रभावीपणे भाष्य करते. कारण ऑर्वेल ची माणसाचा स्वभाब अचूक टिपण्याची हातोटी. आतापर्यंतच्या माझ्या वाचनात आलेले सर्वात प्रभावी असे हे व्यक्तिचित्रण. साम्यवाद, कॅपिटॅलिझम, क्रांतीवाद, गांधीवाद, कोणताही वाद घ्या, किंवा कोणतेही तत्वज्ञान्/संस्कृती घ्या, तिच्या उदयाची, भरभराटीची कारणे आणि त्याछ बरोबर अस्ताचीही कारणे या छोट्याश्या गोष्टीच्या आधारे स्पष्ट करता येतात कारण सर्वांच्या मागे असलेली एकच मानवी स्वभावाची जडणघडण. सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी ही या सर्वांची मूलभूत प्रेरणा. मानवसमूहावर संकट आले की, ते कोणतेही असो, धर्माचा र्‍हास, परकीय आक्रमण असो, सर्व समूह आपल्या रक्षणासाठी एकत्र येतो. एखादा महान आत्मा त्या समाजाला नेतृत्व देतो, चांगल्या जगण्यासाठी तयार करतो. पण एकदा समाजात शांतता नांदू लागली की पुन्हा ती सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी डोके वर काढते. महात्म्यांच्या विचारांच पराभव त्यांचेच अनुयायी म्हणून घेणार्‍यांकडूनच केला जातो. पुन्हा संघर्ष, नवी संस्कृती, नवे विचार. प्रवृत्ती तीच.

आजचे जगातले कोणतेही प्रश्न उदाहरणार्थ जातीवाद, वंशवाद, भूभागावरील संघर्ष हे सर्व आपण या कथेशी सहज जोडू शकतो. ते आपल्यावर आहे की कोणता प्रश्न आपल्या जीवनाशी जास्त निगडीत आहे. मग तो भ्रष्टाचार असेल, दैनंदिन गरजांची उणीव असेल अथवा देशभक्ती असेल. पूर्ण कथा वाचताना क्षणभर असे जाणवेल की अरे याचे कारण हेच आहे आणि उत्तर हे असेल. पुढच्याच क्षणी असे वाटेल की ते निसटून गेले. पुस्तक संपले की ते अस्वस्थ करतेच पण आपल्याला कारणे कळून पण बर्‍याच वेळा आपण काही करू शकत नाही याची चुटपूट ही लावते.

हे माझे दोन पैसे. ही सर्व माझी मते कुणालाही मूर्खपणाची , विचारजंती वाटू शकतात पण त्याला इलाज नाही. तो कथेचा दोष. कारण शेवटी "All men are equal, but nobdy is same" हेच खरे.

प्रतिक्रिया

बबलु's picture

8 Aug 2010 - 1:58 pm | बबलु

खालीद साहेब.... छान परिचय करून दिलात.
माझेही ते अत्यंत आवडते पुस्तक.

>>ही कथा काल, आज आणि उद्याच्या देखील परिस्थितीवर प्रभावीपणे भाष्य करते.
अगदी बरोबर.

>>एकदा समाजात शांतता नांदू लागली की पुन्हा ती सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी डोके वर काढते.
सो टके की बात.

असो....
अजून विस्ताराने लिहा की. वाचायला आवडेल.

अर्धवट's picture

8 Aug 2010 - 2:01 pm | अर्धवट

+१

आपल्या अकलेच्या जोरावर आणि फोडा आणि झोडा या तत्वाने डुकरे स्वतःला श्रेष्ठ घोषित करतात. त्यानंतर ते जपण्यासाठी नियमांमधे सोयीस्कर बदल करणे, इतराना तुच्छतेने वागवणे, सत्ता टिकवायला शेवटी माणसांबरोबरही हातमिळवणी करणे, विरोध करणार्‍याचा काटा काढणे

स्वसंपादित (संपादकीय आदेशानुसार)

नितिन थत्ते's picture

8 Aug 2010 - 5:45 pm | नितिन थत्ते

शूऽऽऽऽऽऽ.
इथे परिस्थिती काय आहे आणि तुम्ही आपलंच रेटताय पुढे !!!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Aug 2010 - 5:57 pm | बिपिन कार्यकर्ते

@ अवलिया: ओसीडी?

@ नितिन थत्ते: या अनुषंगाने काही आले की तिथे लिहिलेच पाहिजे का? हा विषय (ज्याला इतर सगळ्याच विषयांप्रमाणे दोन बाजू आहेत) सतत जागृत रहावा असे काही आहे का?

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Aug 2010 - 5:52 pm | बिपिन कार्यकर्ते

अजून हे पुस्तक वाचले नाहीये पण या पुस्तकाबद्दल खूप वाचले आहे. तुम्ही पण अतिशय सुंदर आणि चपखल लिहिले आहे. मजा आली वाचायला. शेवट तर फारच आवडला.

बेसनलाडू's picture

11 Aug 2010 - 5:50 am | बेसनलाडू

बिकांशी सहमत आहे.
(सहमत)बेसनलाडू

मुक्तसुनीत's picture

8 Aug 2010 - 6:30 pm | मुक्तसुनीत

पुस्तकाची ओळख आणि त्यावरचे विवेचन आवडले.

अ‍ॅनिमल फार्म हे कोपरखळ्या देत लिहिलेले पुस्तक आहे. "१९८४" या पुस्तकाचा आशय , त्यातली वर्णने ही अत्यंत विमनस्क करणारी. "बिग ब्रदर" चे , "न्यूस्पीक" चे भूत आपल्याला झपाटून टाकते. त्यामानाने प्रस्तुत पुस्तक खूपच हलकेफुलके.

साम्यवादावर पन्नासेक (?) वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकांमधले भाष्य कुठल्याही व्यवस्थेला लागू होते. नोआम चॉम्स्की यांसारख्यांचे विचार पाहिले तर ऑर्वेल किती द्रष्टा होता हे समजते.

विंजिनेर's picture

8 Aug 2010 - 8:32 pm | विंजिनेर

मुसु, तुम्ही अ‍ॅनिमल फार्मच्या संदर्भात १९८४चा उल्लेख करावा हे मजेदार आहे. अ‍ॅनिमल फार्म जसं साम्यवादाला हाताळते तसे १९८४ म्हणजे भांडवलशाहीच्या अतिरेकावर जळजळीत भाष्य करणारी कादंबरी आहे.
मूळात १९८४च्या लेखनावेळी ऑरवेलची प्रकृती क्षयाने (चूभुद्याघ्या)खालावली होती. त्या मानसिकतेचा परिणाम म्हणून कादंबरीतलं वातावरण विषण्ण चित्रित झालेले आहे.
जरा अवांतरः १९८४च्या शीर्षकावरून काही लोकांनी कादंबरी प्रकाशनाच्या वेळी (१९५०चं दशक) डूम्सडे भाष्य वर्तविलं होतं की बिग ब्रदर १९८४साली येणार आहे. पण खरं म्हणजे ऑरवेलचा तसा काही उद्देश नव्हता. त्याने कादंबरी लेखनाच्या सालातल्या आकड्यांची केवळ अदलाबदल केली होती (४८ <-> ८४)

नितिन थत्ते's picture

9 Aug 2010 - 7:54 am | नितिन थत्ते

१९८४ सुद्धा साम्यवादाच्याच अतिरेकाचे वर्णन आहे. 'पार्टी'ची सर्वंकश सत्ता, सर्वदूर पसरलेली हेरगिरी, बुद्धीभेद हेच कथासूत्र आहे.

फक्त अ‍ॅनिमल फार्म सारखा थेट रेफरन्स नाही.

अर्थात दोन्ही कादंबर्‍या साम्यवादाखेरीज बहुतेक सर्व परिस्थितीत लागू होतात.

तिमा's picture

8 Aug 2010 - 7:34 pm | तिमा

खालिदसाहेब,
उत्तम परिचय करुन दिला आहे पुस्तकाचा. जोपर्यंत मानवी स्वभावातला स्वार्थ नाहीसा होत नाही तोपर्यंत कुठलीही व्यवस्था आदर्श होऊ शकणार नाही. साम्यवाद, भांडवलशाही, खरी लोकशाही, तथाकथित (भारतासारखी) लोकशाही यातले कुठलेच १०० टक्के यशस्वी होऊ शकत नाही.
भारतापुरते बोलायचे तर स्वातंत्र्यानंतर काही वर्षे तरी, आतून काही चालत असले तरी, बाहेर साधनशुचितेचा आव आणला जात होता. नंतर सामान्य जनतेला सगळेच समजुन चुकले आहे हे कळल्यावर आता तर सर्व निलाजरे झाले आहेत.

विंजिनेर's picture

8 Aug 2010 - 8:33 pm | विंजिनेर

जेमतेम १०० पानी - साध्या भाषेतले पण अत्यंत असं प्रभावी पुस्तक. माझं आवडत्या पुस्तकांपैकी वरच्या नंबरावर असणारं

खोडसाळ प्रतिक्रिया द्यायचीच झाली तर:
पूर्वीच्या 'मनुष्य' मालकाला पळवून लावण्यात आलेले आहे. तांत्रिक सल्लागार मन लावून काम करता आहेत. पुर्वी केवळ संपादनात धन्यता मांडणारे संपादक मंडळ आता सदस्यांच्या प्रवेशप्रक्रियेत सुद्धा भाग घेऊ लागलंय. ऑरवेलच्या गोष्टीत साम्य नजरेत भरल्याशिवाय राहत नाही ;)

राजेश घासकडवी's picture

9 Aug 2010 - 12:18 am | राजेश घासकडवी

एका अतिशय सुरेख तत्त्वज्ञानापासून प्रेरित होऊन, त्यावर व ते पुढे करणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवून जनता क्रांती करते. आधीच्या सत्तांध राजांना हाकलून लावते. पण राज्य ताब्यात आल्यावर हेच नेते तसाच सत्तांधपणा करतात. जनतेला जी स्वप्न दाखवली होती त्यांचा आधीच्या राजांसारखाच चुराडा करतात. तितक्याच बेमुर्वतखोरपणे त्यांची दडपशाही करतात. आणि हे सगळं मूळ तत्त्वज्ञानाशी एकनिष्ठ असल्याचा बहाणा करत. मूळ वचनांमध्ये थोडा थोडा बदल करून त्यांच्यातली सत्वच काढून घेणं किती सहजपणे होतं हे अॅनिमल फार्ममध्ये दाखवलं आहे.

रशियाच्या समाजवादी क्रांतीनंतरच्या घटना आराखडा म्हणून घेतलेल्या आहेत. लेनिन, ट्रॉट्स्की, तिथला कामकरी वर्ग, राज्यकर्त्यांनी पाळलेली दडपशाहीची यंत्रणा, समाजवादातून समर्थ व्यवस्था उभारण्याचं स्वप्न यांना एकास एक प्रतीकं येतात. मात्र तयार झालेला ढाचा अधिक व्यापक आहे यात प्रश्नच नाही.

पारायणं करण्यासारखं पुस्तक.

चतुरंग's picture

9 Aug 2010 - 1:42 am | चतुरंग

मी फार पूर्वी हे पुस्तक थोडेफार वाचले होते त्यावेळी बराचसा भाग डोक्यावरुन गेला होता आणि कंटाळवाणा झाला होता त्यामुळे पूर्ण केले नाही.
परंतु आता हा परिचय वाचून नव्या दमाने हे पुस्तक वाचावे असे वाटते आहे. अतिशय संयत भाषेत परिचय दिल्याबद्दल धन्यवाद! शेवटचे वाक्य फारच आवडले :)

(संवादी)चतुरंग

शहराजाद's picture

9 Aug 2010 - 7:48 am | शहराजाद

अतिशय सुरेख रसग्रहण.

> एकच मानवी स्वभावाची जडणघडण. सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी ही या सर्वांची मूलभूत प्रेरणा. मानवसमूहावर >संकट आले की, ते कोणतेही असो, धर्माचा र्‍हास, परकीय आक्रमण असो, सर्व समूह आपल्या रक्षणासाठी एकत्र येतो.
>एखादा महान आत्मा त्या समाजाला नेतृत्व देतो, चांगल्या जगण्यासाठी तयार करतो. पण एकदा समाजात शांतता नांदू
>लागली की पुन्हा ती सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी डोके वर काढते. महात्म्यांच्या विचारांच पराभव त्यांचेच अनुयायी >म्हणून घेणार्‍यांकडूनच केला जातो. पुन्हा संघर्ष, नवी संस्कृती, नवे विचार. प्रवृत्ती तीच.

सहमत.

माझ्या एका आवडत्या पुस्तकावर लिहिल्याबद्दल धन्यवाद. १९८४ वरही येऊद्या.

समंजस's picture

9 Aug 2010 - 10:48 am | समंजस

एका छान पुस्तकाची ओळख करून दिली आहे.
पुस्तकातील विचारांशी आणि खालिदसाहेबांच्या विवेचनाशी पुर्णपणे सहमत.

मानवी प्रवृत्ती ही सदासर्वकाळ अशीच आहे. त्यामुळेच ईतिहासाची पुनरावृत्ती होताना आढळून येते.

खालिद,
तुमचे पुस्तकाचे विवेचन खुप आवडले अन सध्या वाचनखुण साठवून ठेवण्याची सोय नसल्या कारणाने प्रिंटआउट घेऊन वाचले.
वाचताना शेवटी , लहानपणी वाचलेली अन अजूनही काहीशी स्मरणात राहीलेली एक कविता आठवली कोणाची आहे ते नक्की असे आठवत नाही कदाचित कवी 'बी' यांची असावी - डंका हे कवितेचे शिर्षक असावे (चूक- भूल घेणे-देणे)

तेजाचे तारे तुटले,
मग मळेची सगळे पिकले |
लागती दुहीच्या आगी,
राष्ट्राच्या संसाराला ..
अति महामूर पूर येते,
ढोग्यांच्या पावित्र्याला |

कोंडिले स्वार्थकोंड्यात,
जल सडले ते निभ्रांत ,
तरी धूर्त त्यांस तीर्थत्व ,
देऊनी नाडती भोले ,
तेजाचे तारे तुटले ||

कर्तव्य आणि श्रेयाची
हो दिशाभूल जेव्हां ती,
आंधळा त्याग उपजोनी
डोहळे भिकेचे पडती;
अतिरेक पूज्यभावाचे
फुंकिती विवेकेज्योती;
मग जुन्या अप्तावाक्याते
भलतिशीच महती येते,
राणीची दासी होते,
बुद्धीचे फुटती डोळे ,
तेजाचे तारे तुटले ||

घन तिमिरी घोर अघोरी,
विक्राळ मसण जागवती,
ती ' परंपरा ' आर्यांची, 'संस्कृती' 'शिष्टरूढी' ती,
'धर्मांदी' प्रेत झाल्याची बेफाम भुते नाचवती;
सत्तेचे फक्त पुजारी उरले,
तेजाचे तारे तुटले ||

अर्धवट's picture

9 Aug 2010 - 1:36 pm | अर्धवट

उत्तम कविता.

वा वाहीदा,
तुझी निवड आणि स्मरणशक्तीचे कौतुक करावे तितके थोडेच! Keep it up!
काका

विकास's picture

10 Aug 2010 - 9:58 pm | विकास

सर्वप्रथम उत्तम पुस्तक परीचय. चतुरंगने म्हणल्याप्रमाणेच माझे देखील झाले: ज्या वयात इंग्रजी वाचनाची सवय नव्हती तेंव्हा वाचायचा प्रयत्न केला आणि सोडून दिले... आता परत वाचायचा हुरूप आला आहे! त्या बद्दल धन्यवाद.

वाहीदांनी वर उर्धृत केलेली ही कविता बीं चीच आहे. खूप सुंदर कविता आहे, फक्त त्या कवितेत त्या नंतरची जी कडवी आहेत ती निराशाजनक नसून प्रेरणादायी आहेत (विशेष करून शेवटचे) म्हणून येथे लिहीण्याचा मोह टाळत नाही: (आठवणीतून, चु.भू.द्या.घ्या.)

...'धर्मांदी' प्रेत झाल्याची बेफाम भुते नाचवती;सत्तेचे फक्त पुजारी उरले, तेजाचे तारे तुटले ||
हि दंगल जेंव्हा होते ना कळेची
कोठूनकी ते येतात बंडवाले ते
जग हाले स्वागत बोले
तेजाचे तारे तुटले

या बड्याबंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहीला
मोठ्यांच्या सिद्धांताचा घेतला पुरा पडताळा
डांगोरा फोलकटांचा पिटवीला अलम दुनीयेला
झुंजोनी देवादैत्या, अमृतामधे न्हाली जनता
उजळला मराठी माथा, सत्तेचे प्रत्यय आले, तेजाचे तारे तुटले

हिमतीने आपुल्या प्रांती उत्क्रांती शांतीमय केली
प्रेमाच्या पायावरती समतेची इमारत रचली
अंगची करामत ज्यांनी खल्विदा समर्पण केली
आम्ही त्या दिल्जानांचे, साथी ना मेलेल्यांचे
हे डंके झडती त्यांचे, ऐकोत कान असलेले..
.

मी खरेच कविता कोणाची आहे या बाबतित साशंक होते. आता कवि 'बी' शिक्का मनावर ठसला .
पुनश्च धन्यवाद !

क्रेमर's picture

9 Aug 2010 - 6:10 pm | क्रेमर

पुस्तकाची, त्यातील आशयाची ओळख आवडली.

खालिद's picture

10 Aug 2010 - 5:31 am | खालिद

प्रतिसाद देणार्‍या सर्व सभासदांचे मनापासून धन्यवाद!!