शनिवार..आरामात उशिरा उठावे, चहा कॉफी आटपली की काटाकिर्र ला धडकावे असे गेले ५-६ आठवडे सुरू होते. म्हटलं या वेळी जरा वेगळं काहीतरी करू.
नव-याचा आवडता पदार्थ. कॉर्न सॅन्डविच. होतो पण १५-२० मिनिटात.
तर साहित्य खालीलप्रमाणे: (३-४ माणसांकरता)
३-४ वाट्या कॉर्न/स्वीट कॉर्न
२-३ कांदे
२-३ टोमॅटो
थोडी कोथिंबीर
पावभाजी मसाला, गरम मसाला किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेला कुठलाही मसाला.. (पावभाजी मसाल्याने चव खूप छान होते असा माझा अनुभव आहे)
एक व्हाईट ब्रेड ( हेल्दी बनवण्याकरता मी होल व्हीट ब्रेड वापरून बघितला होता एकदा..पण चव नाही मला आवडली!)
एक चमचा तेल
जीरे, हळद, तिखट , हिंग
साखर, मीठ चवीप्रमाणे
कॄती:
कॉर्न दहा बारा मिनिटे उकडून पाणी काधून टाकणे व भरड मिक्सर किंवा फूड प्रोसेसर मधून फिरवून घेणे
कांदे, टोमॅटो , कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी
गॅसवर कढईत तेल गरम करणे. तेल गरम झाले की जीरे टाकावे.
जीरे थोडे तडतडले की त्यात कांदा टाकावा. कांदा थोडा परतला की त्यात हिंग, हळद, तिखट टाकून परतावे.
दोन चमचे पावभाजी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला टाकून अजून दोन मिनिटे परतावे
मग टोमॅटो, मीठ, साखर टाकून परतावे
टोमॅटो शिजून तेल वेगळे होईपर्यंत परतावे
मग त्यात कॉर्न व कोथिंबीर टाकून ३-४ मिनिटे परतावे.
झाले तुमचे सॅन्डविच चे सारण तय्यार!
ब्रेड च्या दोन स्लाईस घेऊन एका भागावर सढळ हाताने सारण पसरावे
अरे हो...साहीत्यामध्ये लिहायचा राहिलं.... फक्त एक-दिड चमचा तेल, ग्रिल करताना बटर नाही..तेव्हा हे सॅन्डविच जरा जरूरीपेक्षा जास्त हेल्दी होते असे वाटल्याने नव-यावे ब्रेडबरोबर चीझ क्युब्स आणले होते.
माझे आकारमान वाढतेय आणि कॉलेस्ट्रॉल पण असा अंदाज असल्यामुळे फक्त नव-याच्या सॅन्डविचवर चिझ पसरले.
वरती दुसरी स्लाईस ठेवून सॅन्डविच गरम ग्रिलर वर ठेवावे...
साधारण ४-५ मिनिटात मस्त ग्रिल झाले की सॅन्डविच तयार.
गरमगरम सॅन्डविच सॉसबरोबर सर्व्ह करावे
अनहेल्दीनेस व चव सम प्रमाणात वाढत असल्याने अर्थात चीझ घातलेले सॅन्डविच जास्त छान लागते! :)
नवरा अजूबाच्या ग्रिल्ड सॅन्डविच चा जबरदस्त फ़ॅन आहे...आणि मी पण.. आणि हे कॉर्न सॅन्डविच त्याच्या तोडीचे बनतात असे त्याचे मत आहे.
एकूण काय... मी खूष..नवरा खूष...शनिवार मस्त जाणार आहे!
अरे हो..सांगायचंच राहिले...मी तर एक IT Wife आहे. शिवाय नव-याला चांगला स्वयंपाक येतो. श्या... फायदा घ्यायचा राहून गेला!!! परत कधीतरी!!!
प्रतिक्रिया
7 Aug 2010 - 1:24 pm | अवलिया
कॅमेरा नवा घेतला का?
7 Aug 2010 - 1:26 pm | सविता
मोबाईल च्या कॅमेराने काढलेत फोटो!
7 Aug 2010 - 1:28 pm | अवलिया
अच्छा! मोबाईल नवा आहे तर.
असो.
खुलाशाबद्दल धन्यवाद.
7 Aug 2010 - 1:34 pm | सविता
त्याला पण वर्ष झालं :)
माहितीये, फोटो ची "कोलिती" फारशी चांगली नाही...
पण स्वयंपाक करता करता सगळ्या पायरीचे फोटो काढणे पहिल्यांदाच ट्राय केले. त्यामुळे मोबाईल कॅमेरा सोईस्कर वाटला.
7 Aug 2010 - 1:30 pm | परिकथेतील राजकुमार
अरे काय लावलय हे दुपारच्याला ? आता कोण बनवुन देणार हे असले सगळे ? तुमच्या घरीच आमंत्रण द्या बरे आता.
7 Aug 2010 - 1:35 pm | सविता
आम्ही ते हादडले... :) :)
मगच इकडे लिहायला शक्ती आली!!!
7 Aug 2010 - 1:39 pm | अवलिया
मस्त उत्तर दिले त्या फुकट्या पराला... जियो ! सविता वैनींचा विजय असो.
7 Aug 2010 - 1:41 pm | सविता
मिपा वर आहे की नाही माहित नाही पण काल मिम वरचा सविताभाभी लेख मी वाचलाय!!!
तेव्हा सविता ताई/बाई म्हणा. अगदी काकू पण चालवून घेईन नाइलाजाने!!!
7 Aug 2010 - 1:44 pm | अवलिया
भाभीपेक्षा वैनी चांगले. मराठमोळे !!
7 Aug 2010 - 1:45 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त उत्तर दिले त्या हिणकस नानाला... जियो ! सविता काकुंचा विजय असो.
7 Aug 2010 - 1:49 pm | सविता
लेख कशाबद्दल ते राहिलं कुणीकडे... अवांतर च जास्त.
असो एक वाचक म्हणून मला लेखाइतक्याच संबंधित्/अवांतर प्रतिक्रिया वाचायला आवडतात मिपावर!
त्यामुळे चालू दे!!!!
7 Aug 2010 - 4:32 pm | गणपा
हा हा हा
याला म्हणतात जिंदादीली सवितातै.
आज परा आणि नाना अकदम मस्तीच्या मुड मध्ये दिसतायत :)
बाकी कॉर्नसँडवीच फक्कड बर का :)
नवरोबाला (किचन मध्ये) कामाला लावा आणि त्याच्या हातच्या डिश पण इथे टाका.
आयटीतली बायको असुन नुसता बसुन खातो म्हणजे काय ;)
7 Aug 2010 - 2:07 pm | llपुण्याचे पेशवेll
नाना आणि पर्याने सविताकाकुंना टीआरपी मिळवून द्यायची जबाबदारी घेतली काय?
अवांतरः काकू, सँडविच मस्तं दिसत आहे. हे ग्रील कोणत्या कंपनीचे आहे. कितीला मिळते. या ग्रिलवर बनवलेली सँडविचेस मस्तं होतात.
7 Aug 2010 - 2:13 pm | मेघवेडा
ग्रिलही नवीन घेतलेय काय? ;)
बाकी सॅण्डविच मस्तच हो काकू!
7 Aug 2010 - 2:28 pm | सविता
ग्रिल मॉर्फी रिचर्ड्स चे आहे. किंमत नक्की माहीत नाही. लग्णात ३-४ मैत्रिणींनी मिळून गिफ्ट दिले होते. :) तरी दोन हजार तरी असेल किंमत!!
अवांतर : टीआरपी बद्दल परा आणि णाणा यांच्याशी काहीच सेटिंग झाले नाहीये. करायच्या आधीच ते दोघे गायब झाले!!तुम्ही घेता का जवाबदारी? १०० च्या वर प्रतिसाद पडल्यास पुढच्यावेळी केल्यावर तुम्हाला खाण्यासाठी बोलावले जाईल!!! :p
7 Aug 2010 - 5:38 pm | सुप्रिया
मस्त! आता उद्याला हाच बेत करीन म्हणते.
7 Aug 2010 - 6:24 pm | रेवती
एकदम भारी!
छान पाकृ आणि (मोबाइच्या कॅमेर्याने काढलेले) छान फोटो.
आज शनिवार म्हणजे शीतकपाटात काय काय नि किती शिल्लक आहे याचा अंदाज घेउन आज हे सँडविच करता येते का पाहते.
7 Aug 2010 - 6:28 pm | वेताळ
पण असले टिकावु ग्रिल इकडे मिळते का ते पाहिले पाहिजे.
बाकी सन्डविच झक्कास दिसत आहे.
पण उद्या रविवार आनि त्यात श्रावणा अगोदरचा शेवटचा रविवार असल्यामुळे ब्रेड आनि मक्का खाण्यात टाईम वेस्ट करणार नाही. उद्या मस्त चिकन आणि मटण बेत आहे.
7 Aug 2010 - 7:40 pm | आमोद शिंदे
गणपाला लाडावून ठेवायचे आणि नवोदितांना असे नाउमेद करायचे हे काही बरे नाही हा!! कार्ट्याचा बाब्या कसा व्हावा ह्यावर अजून एक लेख येईल आता. ;)
(सगळेच ह.घ्या)
7 Aug 2010 - 8:04 pm | गणपा
जयभिम शिंदे साहेब,
तिकडे अजुन एक नवी पाकृ आली आहे.
तिकडे गरळ ओकायच राहुन जाईल हां. ;)
7 Aug 2010 - 8:08 pm | आमोद शिंदे
'ओकलेली गरळ' ही नवी पाककृती बनेल की. ड्रायफूटची खीर ह्या नावाखाली फोटोही टाकता येइल. प्रतिसाद शतक नक्की :)
(तुम्ही हलकेच घेत आहात असे समजून प्रतिसाद देत आहे. नसल्यास मी थांबतो)
7 Aug 2010 - 9:44 pm | रेवती
हे हे हे!
नसल्यास मी थांबतो
मग थांबाच जरा. उसंत घ्या थोडी. :)
7 Aug 2010 - 9:15 pm | स्वाती दिनेश
सविता, सँडविच मस्त !!!
स्वाती
8 Aug 2010 - 2:17 am | प्रभो
मस्त!!
8 Aug 2010 - 5:26 am | मदनबाण
मी पहाटे पहाटे असले धागे का उघडतो ?
जाम वाईट्ट अवस्था होते ना... :(
भूक लागली !!! :(
-
-
-
मस्त पाकृ सविता काकू... :)
8 Aug 2010 - 5:42 am | सहज
स्टेप बाय स्टेप फोटो काढत पाकृ दिल्याबद्दल फुल मार्क्स!
8 Aug 2010 - 7:18 pm | अरुंधती
ह्या पाकृ मध्ये हिरव्या मिरच्यांनीही झणझणीत बहार येते! फोटोही छान! ग्रिल्ड सँडविच करायचे नसल्यास ओपन सँडविच करून ब्रेडची खालची बाजू तव्यावर भाजून घेतली तरी मस्त लागतात! (माझ्याकडे ग्रिल नसल्यामुळे शोधलेला पर्याय!!) पनीरप्रेमी जनता ह्यात पनीर कुस्करून घालू शकते. फक्त उष्मांक मोजायचे नाहीत अजिब्बात ही अट! :-)
8 Aug 2010 - 7:25 pm | रेवती
काल करून बघितली ही पाकृ!
'टेस्टी आहे' असे म्हणायला हवे.
क्यॅलरीजचे बंबाळे वाजले.
अरूंधती म्हणते त्याप्रमाणे मी पण ओपन फेस सँडवीच बनवत असे.
यात थोडी ढब्बू मिरची घालत असे.
सोनेरी रंगावर भाजलेले चिज छान दिसत असे व क्यालरीज अंगोपांगी दिसत असत.
नंतर बंद केले. चविष्ट आहेत याबद्दल शंका नाही.