महाराष्ट्रातलं मौल्यवान रत्न

Bhushan11's picture
Bhushan11 in काथ्याकूट
1 Aug 2010 - 1:12 am
गाभा: 

परमेश्वर पाट्या टाकतो. होय. परमेश्वर माणसं बनवताना चक्क पाट्या टाकतो. फरक जाणवतो जेव्हा तो काही माणसांना बनवताना ओव्हर टाईम घेतो. मन लावून काम करतो आणि त्याच्या हातातून असामान्य माणसं घडतात.

प्राध्यापक शिवाजीराव भोसले गेल्याच वाचलं आणि मन विषण्ण झालं. लोकसत्तेत "महाराष्ट्र शारदेच्या दरबारातील रत्न निखळल" अशा मजकुराची बातमी आली होती. महाराष्ट्र शारदेचा दरबार दिवसेंदिवस रिकामी पडायला लागलाय. महाराष्ट्रात रत्नांची व्याख्याच बदलायला लागली आहे. या निखळ रत्नांची पारख करणारे रात्नपारखीही कमी व्हायला लागले आहेत. या अस्सल रत्नान ऐवजी इतर रत्नांना भाव आला आहे. अश्या इतर रत्नांची पारख करताना श्री कुमार केतकरांचा लिहून लिहून हात कसा दुखत नाही हे कळत नाही. निर्भीड आणि खंदा पत्रकार असावा तर असा.

कै. शिवाजीरावानचं पाहिलं भाषण मी ऐकलं ते लहानपणी गणपती उत्सवात. बरचसं भाषण डोक्यावरून गेलं पण भर थंडीत बंबातल्या गरम गरम पाण्यानी आंघोळ करावी तसं वाटलं. जणू काही ते कानात भराभर निर्मळ शब्द ओतत आहेत आणि बरेचसे शब्द खाली सांडून जात आहेत पण ऐकायला खूप बर वाटतंय.

स्वामी विवेकानन्द, समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज अशा थोर व्यक्तींवर ते तासनतास बोलत. ते बोलाव आणि आपण ऐकावं.

आयुष्यभर त्यांनी प्राध्यापकाची नोकरी केली आणि ज्ञानाचा झरा वर्गात आणि वर्गाबाहेर चालू ठेवला. वाचन, लिखाण, मनन आणि आचरण या चतुः सूत्राने त्यांनी तपश्चर्या केली. सध्या धार्मिक भाषणातून भक्तगण जमवून त्यांच्या मानसिक दुर्बलतेचा फायदा उठवून आपला भरपूर आर्थिक फायदा करून घेणारे "गुरु" गावोगावी दिसतात. प्रा. शिवाजीरावाना आपल्या भाषणातून धार्मिक वाट घेता आली असती. पण या माणसाची वाट सरळ होती. स्पष्ट होती. पवित्र होती. पुण्या मुंबईत इतर साहित्यिकांच्या बरोबर राहून सहज नाव, प्रसिद्धीही मिळवता आली असती. पण कुठे थांबायचं हे माहित होतं. संमेलनं, विश्व संमेलनं यापासून कोसभर दूर राहून हा फलटणवासी माणूस आपल्या परीने लोकशिक्षण करत होता.

आज समाज ढवळून निघत आहे. समाजाची मूल्य, आदर्श दररोज बदलत आहेत. बॉलीवूड च्या तार्याचा एक पिक्चर हिट झाला कि तो आदर्श होतो. एक सेन्चुरी मारली कि खेळाडू क्रिकेटवीर होतो. राजकारणात एक स्टंट केला कि पुढारी मिनिस्टर व्हायची स्वप्न बघतो.
आजचा समाज गटा गटाने रहात आहे. आजी आजोबाना सिरिअल्स, टीन एजर्स ना कोम्पूटर आणि इन्टरनेट, मम्मी डाडीना पार्टी, बाहेर जेवणं, शॉपिंग, ट्राव्हलिंग. या सर्वांना एकत्र आणणारा धागाच उरला नाही. प्रत्येकाची रहाणी वेगळी, प्रत्येकाचा विचार वेगळा, प्रत्येकाचा आचार वेगळा. अशा वेळी सर्वांना एकत्र आणण्यासाठी प्रा. शिवाजीरावान्सारख्या एक कणखर धाग्याची आज नितांत गरज आहे.

समाजाचे आदर्श दररोज बदलायला लागले तर समाजाचे संतुलन बिघडणारच. अशा समाजाचा ऱ्हास होण्यास वेळ लागणार नाही.

प्रा. शिवाजीरावांनी या सर्व प्रलोभनातून स्वतःला लांब ठेवलं. माझी खात्री आहे कि त्यांना कित्येक लोकांकडून सभांना आणि टीव्ही वर बोलावणं आला असणार. पण त्यांनी ते नम्रपणे नाकारलं असणार. आजकाल तर आदरणीय लोकांना बोलवून त्यांचा सन्मान, सत्कार करण्याची टूम निघाली आहे. आदरणीय व्यक्तीना मोठ्या सभागृहात बोलवायचं, त्यांच्याकडून दीप प्रज्वलन करून घ्यायचं, त्याना पुणेरी पगडी घालायची, त्यांना शाल जोडी घालायची. त्यांच्या बरोबर दहा-बारा फोटो काढायचे. दुसर्या दिवशी वर्तमान पत्रातून सर्व छापून आणायचं. आणि मग रात्री मोठी पार्टी करायची. आपल्याला प्रसिध्हीही मिळते, शिकलेल्या लोकां मध्ये उठबस केल्याचं समाजात दिसत. पुढच्या इलेक्शनची तयारीही अनायासे होवून जाते. एका दगडात किती तरी पक्षी मारता येतात!

आज जे लोक चांगले विचार लोकापुढे मांडतात त्या विचाराना अनुसरून वागतातच असं दिसत नाही. विचार आणि आचार यांची तफावत दिसते.. आज माणसाची कसोटी इथेच लागते. आणि या कसोटीतच माणूस नापास होतो. पण प्रा. शिवाजीराव विचार आणि आचार यांचा मेळ घालत राहिले. आचाराशी तडजोड केली नाही. त्यांच्या मानसिक बळाची महती इथे पटते.

त्यांच्या मुद्रेवर कधीही सभा जिंकल्याचं दिसलं नाही. मला वाटतं कि ते सभा उरकल्यावर जसा एखादा सामान्य माणूस काम करून घरी जातो तसं घरी जात असतील. आपल्या पत्नीला सांगत असतील, "अगं, भूक लागलीय. जेवायला वाढ. त्यांची पत्नीही "आज कोशिंबीर करायची राहून गेली" असं म्हणत असेल. आणि दोघे शांतपणे जेवत असतील. त्यांच्या पत्नीनेही "आमच्या ह्यांनी आज सभा गाजवली बर का ! " असं शेजारच्या बायकांना कधी सांगितलं नसेल.

प्रा. शिवाजीरावाच्या आयुष्यात त्यांच्या यशात पत्नीचा वाटा मोठा असेल असं वाटतं. त्यांना मी एकदाच पाहिलं होतं. आपला नवरा कुलगुरू, दीर मुख्यमंत्री अशा तोर्यात दिसल्या नाहीत. कदाचित थोर पुरुषांच्या वलयमध्ये राहून त्याही थोर, खरं तर अधिक थोर होत असतील. स्वार्थ आणि त्याग या दोन्ही शब्दाचा अर्थ त्यांना पूर्ण पणे कळला असेल. पतीच्या कार्य क्षेत्रात संपूर्णपणे झोकून पतीच्या आचार विचाराशी एकरूप राहून पडद्या मागे राहून केलेली भूमिका आजच्या महिला स्वातंत्र्यासाठी झगडणार्या आधुनिक महिलापुढे यायला पाहिजे. डॉक्टर मंदाकिनी आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे च्या पत्नी हे आजचं जिवंत उदाहरण आहे. "तेव्हाचा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा" असा वाद घालण्यात अर्थ नाही.

कै शिवाजीरावासाराखी मौल्यवान रत्न या महाराष्ट्राला लाभो अशी परमेश्वराला कळकळीची विनंती.

भूषण

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

1 Aug 2010 - 1:22 am | मस्त कलंदर

लेख उत्तम..
काथ्याकूटात का टाकलात???

मी चुकून माझा लेख काथ्या कूट वर टाकला. (मी आजच सदस्य झालो).
तो आता "जनातलं मनातलं" वर टाकला आहे.
आताच मी सरपंचाना तो काथ्या कूट वरून काढून टाकण्याची विनंती केली आहे.

क्षमस्व
भूषण

राजेश घासकडवी's picture

1 Aug 2010 - 6:09 am | राजेश घासकडवी

स्वयंसंपादनाचा फायदा उदाहरण २

मेघवेडा's picture

1 Aug 2010 - 7:02 pm | मेघवेडा

उत्तम लिखाण! :)

मग काढुन का टाकता राव.खुपच छान लिखाण करता तुम्ही.

स्पंदना's picture

1 Aug 2010 - 8:46 am | स्पंदना

अतिशय ओघवत लिखाण.
तुम्हाला वाटणारी काळजी अनाठायी नाही आहे. अस वाटत असतानाच, अस तुम्ही लिहिलात अस, तळमळीच लिखाण वाचायला मिळत, अन सारा संशय दुर होतो.
एकच सांगेन 'घेता घेता घेणार्‍याने , देणार्‍याचे हात घ्यावे.'
अमर कोणीच नाही पण आपण त्यांना पाहिल , त्यांच मार्गदर्शन आपल्याला लाभल , आता ही धुरा आपणच आपल्या आपल्या कुवती नुसार पुढे चालवायची, या अश्या प्रय्त्नातुन मग एखाद झळाळणार रत्न पैदा होइल.

अर्धवट's picture

2 Aug 2010 - 4:39 am | अर्धवट

भूषणजी.. चांगला लेख.. खरच हिराच निखळला..

प्राचार्य गेल्यावर एक स्मृतीलेख लिहिला होता.. इथे मिळेल तो

नाटक्या's picture

2 Aug 2010 - 11:19 am | नाटक्या

ई-मेलने लेख पाठवलास तेव्हाही दाद दिली होती. आता पण रहावलं नाही म्हणून परत एकदा... सुंदर लिहीले आहेस.

- नाटक्या

अर्चि's picture

2 Aug 2010 - 3:38 pm | अर्चि

लेख फारच छान , आवडला.
प्रा. शिवाजी राव भोसले माझे आवडते लेखक.
त्याच्या सगळि पुस्तके मी वाचलि आहेत.