मी अठरा वर्षे पूर्ण केली तरी साधे मिसरुडही फुटले नव्हते. त्यामुळे रूढ अर्थाने मी अज्ञानीच वाटायचो. त्या वयातही कुठले कुठले अन् किती किती अगाध ज्ञान मला प्राप्त झाले होते, ते कुणा सज्ञानाच्या गावीही नसावे, इतके सखोल व मुद्देसुद होते.(अशी त्यावेळची सद्भावना होती.)
गावच्या स्टँडवर एकुलता एक बुक स्टॉल होता. वर्तमानपत्रांपासून ते निळ्या-पिवळ्या पुस्तकांपर्यँतचे सर्व वाङ्मय तिथे उपलब्ध असायचे. सुट्टीच्या कालावधीत मी स्टॉलमध्ये बसायचो. मालक आमच्याच गल्लीतील असल्याने ओळखीचा होता. मी आलो की तो जेवायला घरी जायचा. त्या तासाभराच्या काळात मला अनाकलनीय असलेल्या 'विषयां'नी ओतप्रोत भरलेली पुस्तके नजरेखालून घालता आली. पण म्हणून काही मी सयाना झालो नव्हतो किँवा गणलाही जात नव्हतो. एक मात्र खरे की माझ्यापेक्षा अज्ञानी असणाऱ्यांपुढे मी माझे ते 'वाचना'नुभवी ज्ञान पाजळण्यात मोठे पांडित्य मिरवून घेई. ऐकणारे देखील मोठ्ठा आ करुन, डोळे विस्फारुन, कानात प्राण आणून वगैरे प्रकारच्या चविष्टपणे ती माहिती साठवून ठेवीत असत. अशाप्रकारे मी 'त्या'बाबतीत इतरांपेक्षा जास्त पुस्तकी किडा असलो तरी दिसण्यात तसा नव्हतो. म्हणजे मूर्ति लहान कीर्ति महान असला प्रकार होता.
सालाबादप्रमाणे येणारे वाढदिवस साजरे करता करता मी अठरावी कधी पार केली ते कुणालाच (मलासुद्धा!) कळले नव्हते. मतदार यादीत नाव प्रविष्ट करण्याविषयी (जन्मतारखेच्या पुराव्यानिशी) अर्ज भरला अन् लगेच मला मतदानाचा अधिकार विनाचौकशी प्राप्त झाला.
निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदाराला ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम राबविला होता. माझी फोटो काढण्याची वेळ आली तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना शंका आली. त्याने जन्मतारखेचा दाखला मागितला. मला माहितीच होतं हे चिठोरं लागणार ते, खिशातून काढून तो दाखला पुढ्यात ठेवल्यानंतरच फोटो काढण्यात आला. एकंदर काय तर मी अठरावं गाठलंय यावर पुराव्याशिवाय कोणाचा विश्वास बसत नसे. त्यामुळे ते शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स कायम जवळ बाळगणे एक नित्याचे कामच होऊन बसले होते.
एकदा मित्रांनी मॉर्निँगशोची तिकिटे आरक्षित केली होती. बरोब्बर दहा वाजता आम्ही थिएटर गाठले. पोस्टर पाहून काहीतरी हॉरर अन् 'रंगीन' दृश्ये पहायला, ऐकायला मिळतील अशा 'सहेतूक' नजरांनी एकमेकांकडे पाहत होतो, फिदीफिदी करत होतो. थोड्यावेळाने प्रेक्षकांना आत सोडू लागले. प्रत्येकाचे तिकीट पाहून अर्धे फाडून परत हातात कोंबीत डोअरकिपर आपले काम उरकत होता. त्याला मदतनीस म्हणून आणखी एकजण दारात उभा होता. एकएक करीत माझे सर्व मित्र आत जात होते. माझा नंबर आल्यावर मी तिकीट त्याच्या हातात दिले. तो मला आपाद मस्तक न्याहाळू लागला. 'अबे, रुक जरा. साइडमें खडा रेह.' त्यानं मला बाजूला काढीत सुनावलं. 'का म्हणून थांबू? हे काय याच शोचं माझ्याकडे तिकीट आहे.' 'ते मोठ्या माणसांचं तिकीट आहे बाळ.' दुसरा समजावण्याच्या सुरातही का हसत होता ते कळेना. 'अहो पण मी कुठे म्हणतो हे हाफ तिकीट आहे म्हणून?' 'ठैरो ठैरो, मैँ अभ्भी मँनेजर को बुलाता हूँ ' तातडीनं मँनेजर आले. 'काय रे कितवीत आहेस तू?' आल्या आल्या माझी उंची जोखीत त्यांनी विचारलं. 'माझ्या खुजेपणावर नका जाऊ. मी सेकंड इयरला आहे. का बरं?' 'हे बघ बाळा, तुला काही हा पिक्चर पाहता येणार नाही.' त्यांनीही मला बाळ संबोधल्यामुळे मी चिडलो. 'हे पहा मँनेजरसाहेब तुम्ही समजता तसा मी अंडरएज नाहीये.' 'साब, बच्चा बहुत पहुँचेला दिखता है' 'काय रे कशावरून तू सज्ञान आहेस?' मला माझ्याखिशातील पुरावा आठवला. मी ते चिठोरं मँनेजरपुढे धरलं. 'छ्या.. ही कॉपी अटेस्टेड नाहीये. पळ .. आलाय पिक्चर बघायला.' त्यांनी माझं तिकीट ताब्यात घेऊन मला अक्षरशः हाकलून दिलं. अशाप्रकारे मी माझी सज्ञानता त्या अडल्ट पिक्चरच्या वेळी गमावून बसलो होतो. तिथे माझा पुरावा काही कामाचा नव्हता. वयाने जरी मी सज्ञान झालो होतो तरी शरीराने मात्र अज्ञानीच होतो...
आज दिवसाढवळ्या टीव्हीवर उत्तान चित्रपट मुले पाहतांना दिसतात. तेव्हा त्यावेळी खरेच मी तो अडल्ट पिक्चर पाहण्यालायक होतो का? हा खरा प्रश्न आहे.
माझी सज्ञानता...
गाभा:
प्रतिक्रिया
30 May 2010 - 10:09 am | भडकमकर मास्तर
मस्त आठवण....
(बारावीत असताना सर्व इन्ग्रजी प्रौढांसाठी चित्रपट पाहायला जाताना रांगेच्या बाहेर उभे राहणारा)
मास्तर
30 May 2010 - 2:37 pm | llपुण्याचे पेशवेll
हा हा हा. छान लेख.
बाकी हे वाचल्यावर डॉ साहेब प्रत्यक्ष वर्णन करतायत की काय असे वाटले.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
30 May 2010 - 4:17 pm | टारझन
=)) =)) =)) =))
प्रॅक्टिस सुरु केल्यावर पेशंट्स च्या काय प्रतिक्रीया होत्या ते देखील जाणुन घ्यायला आवडेल.
- बघेश अॅडल्टमुवी
5 Jun 2010 - 3:14 am | धनंजय
गमतीदार अनुभव
5 Jun 2010 - 3:19 am | मेघवेडा
हाहाहा! छान लेख!! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!