साहित्य :
बासमती तांदूळ - १ कप (मी नेहमीचा साधा तांदूळ वापरून केला)
बटाटे - २
पुदिना पाने - २५
खोवलेला नारळ - ३ टेबलस्पून
हिरव्या मिरच्या - ६ ते ७ (मी त्या ऐवजी १० मिरीचे दाणे वापरले)
आले - अर्धा इंच
हळद - पाव चमचा
लिंबू - १
मीठ - चवीप्रमाणे
लवंगा - २ ते ३
वेलदोडे - २
तमालपत्र - १
तूप/ तेल - ४ ते ५ टेबलस्पून
कृती :
तांदूळ भिजवून त्यातील जास्तीचे पाणी काढून किमान अर्धा तास तरी निथळत ठेवावा. त्यात दुप्पट पाणी घालून प्रेशरकुकरमध्ये शिजवून घ्यावा. त्याच जोडीला बटाटेही उकडून घ्यावेत.
शिजलेला भात थंड झाल्यावर एका ताटात/ परातीत मोकळा करावा. मोकळा करताना त्यात चमचाभर तूप घालावे.
बटाटे सोलून त्यांचे चौकोनी तुकडे करावेत.
कांदा उभट चिरून घ्यावा.
तेलात पुदिन्याची पाने परतून घ्यावीत. चांगली तडतडली पाहिजेत.
परतलेली पुदिना पाने, आले, हिरव्या मिरच्या (किंवा मिरी), हळद मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
कढई/ पॅनमध्ये उरलेले तूप गरम करून त्यात लवंग, वेलदोडे, तमालपत्र परतावे. त्यात चिरलेला कांदाही परतावा. कांदा पारदर्शक झाल्यावर त्यात वाटलेली पेस्ट व उकडलेले बटाटे घालावेत. कच्चेपणा जाईपर्यंत मध्यम आंचेवर सतत हे मिश्रण हालवत रहावे. त्यात मीठ व थंड केलेला भात घालून व्यवस्थित मिसळावे. आता गॅस हाय फ्लेमवर ठेवून भात गरम होईपर्यंत मिश्रण हालवत रहावे. चांगली वाफ आली पाहिजे. लिंबाचा रस पिळावा. हलक्या हाताने मिसळावा आणि आंचेवरून पॅन उतरवावे.
गरमागरम पुदिना पुलाव टोमॅटो-कांद्याच्या रायत्याबरोबर वाढावा.
वाढणी :
२ माणसांसाठी
अधिक टिपा:
ह्या पुलावात जोडीला मटारचे दाणेही वापरता येतात.
प्रतिक्रिया
23 May 2010 - 10:51 pm | चिरोटा
मस्त रेसिपी.
चिकन्/मटन घालूनही हा बरा लागेल का?
P = NP
24 May 2010 - 2:00 am | अरुंधती
काही सांगता येत नाही! तुम्ही प्रयोग करून बघा व सांगा! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
24 May 2010 - 9:50 pm | अम्रुताविश्वेश
खूपच छान आहे. नक्की करून पाहिन.
:)
24 May 2010 - 11:46 pm | कवितानागेश
मि मागे असाच पुलाव पुदिन्याचा रस वापरुन, आणी बटाटा + सोयाबीन वडी (नॉन्व्हेज्ला पर्याय!) केला होता!
थोडा पुदिन्याचा रस , चाट मसाला, लिंबू वगरे घालून स्टार्टर पेय....
थोडक्यात, 'पुदीना फेस्टिवल'!
============
माउ