लेखन आणि प्रकाशन - किती सोपे, किती अवघड?

मनिष's picture
मनिष in काथ्याकूट
19 May 2010 - 11:26 am
गाभा: 

सकाळ (मुक्तपीठ) मधे हा लेख वाचला, आणि आश्चर्य वाटले.
http://72.78.249.107/esakal/20100517/5127259570058392107.htm

आमच्या मित्राला काय करावे हे कळेना. अक्षरजुळणी करणारे तसेच मुद्रकाचा पैशांसाठी तगादा सुरूच होता. शेवटी वैतागून त्यांनी दहा, पंधरा, वीस टक्‍क्‍यांनी पुस्तके विकून रिकामे झाले. दहा व वीस टक्के म्हणणाऱ्या दुकानदारांनी रोख पैसे दिले. पंधरा टक्के म्हणणारा सातवा दुकानदार व त्याची पत्नी दोघेही द्विपदवीधर आहेत. त्यांची अ. ब. चौकात दोन मोठी दुकाने आहेत. त्या दुकानदाराने आमच्या लेखक मित्राला हैराण करून टाकले. तीन महिन्यांचे सहा महिने झाले तरी ते दाद देईनात. त्यांच्याकडे गेल्यावर तिऱ्हाईतासारखे विचारायचे, ""काय पाहिजे?'' कधी ओळखही दाखवायचे नाहीत. आमच्या मित्रांनी कायदेशीर कारवाई करण्याची रजिस्टर पत्राद्वारे दोनदा धमकी दिली, तरीही त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. अनेक चकरांनंतर त्यांनी शेवटी धनादेश (चेक) दिला, तोही पुढच्या दोन महिन्यांनंतरच्या तारखेचा. नंतर त्यांना कळले, की सदर दुकानदाराने अनेक लेखक, लेखिकांचे पैसे बुडवले आहेत.

ह्यात लिहिल्याप्रमाणे त्या लेखकाचे अनुभव फारच भयानक होता. विक्रेते ह्यांचा नफ्यात मोठा हिस्सा असतो, हे माहित होते, पण ते ८५% मागू शकतात हे वाचून थक्क झालो. इथे कोणाला मित्रांचे अथवा स्वतःचे असे अनुभव आहेत का? स्वतःचे पुस्तक प्रकाशित करणे इतके अवघड असते? प्राजु, त्या निमित्ताने तू तुझे अनुभव लिहिल्यास वाचायला आवडेल!

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

19 May 2010 - 2:47 pm | भडकमकर मास्तर

या बाबतचे माझे वैयक्तिक मत...

१. आपण लिहिलेले खरंच इतके उत्तम असेल तर प्रकाशक योग्य ते पैसे देऊन स्वतः छापतील अन्यथा त्या लेखनाची ( किंवा त्या प्रकाशकाची)पात्रता बहुधा तितकी नसावी, असे समजावे...

( म्हणजे लेखन तरी बदलावे, किंवा प्रकाशकतरी ;))

२. आणि इतकीच प्रचंड इच्छा असेल तर मग या धंद्याच्या सार्‍या गणितातून जाणे भाग आहे...
( विक्रेत्यांचे ४० ते ५० % कमिशन असते असे ऐकले होते.. या गोष्टीत तर फारच आहे.. )
तुम्ही स्वतः इतके डेस्परेट असाल तर प्रकाशक आणि विक्रेते कोपराने खणणारच....

आपण एवढे हिंडूनही आपली पुस्तके प्रकाशक लोक छापत नाहीत, विक्रेते ( पैसे देत नाहीत , दिलेच तर १५- २० % पैसे देऊनच तेही उशीरा) विक्रीला ठेवत नाहीत, याचे कारण शोधण्यासाठी काही प्रयत्न करावेत, आत्मपरीक्षण करावे असे या लेखकांना का वाटू नये?

"आपलं पुस्तक छापून आलं पाहिजे, त्या मुखपृष्ठावर लेखक म्हणून आपलं नाव दिसलं पाहिजे" ही हौस भागवायची असते खूप जणांना...पण काही दिवसांतच घरात आपल्याच पुस्तकाच्या प्रतींच्या थप्प्या लावून ठेवून येणार्‍या जाणार्‍याला फुकट वाटूनही त्या प्रती संपत नाहीत , अशी वेळ कित्येकांवर येते हे ठाऊक आहे....
त्यापेक्षा आपले लेखन अधिक चांगले आणि वाचनीय करावे यावर या प्रकारचे लेखक किती मेहनत घेतात?

आपण लिहिल्याइतक्या दर्जाचे पुस्तक आपण स्वतः तरी विकत घेऊ का? हा प्रश्न लेखक स्वतःला का विचारत नाहीत?
वीसटक्क्यांनी रोख देणारा विक्रेता असताना पंधरा टक्क्यांनी उधार विक्रेत्याला कशाला द्यायची पुस्तके?...

अवांतर : मुक्तपीठ !! मध्ये गेल्या वर्षी "पुरस्कार" मिळवू इच्छिणार्‍या एका कवीचाही लेख वाचल्याचे आठवते...

मनिष's picture

19 May 2010 - 3:04 pm | मनिष

हेच आणि असेच विचार मनात आले होते. त्यात लेखकाचे नाव नसल्यामुळे नेमके पुस्तकाचा दर्जा वगैरे कळू शकत नाही. पण हा लेखक एवढा "डेस्परेट" का, असे मलाही वाटून गेले.

तरीही द. भा. धामणस्करांच्या "बरेच काही उगवून आलेले" ह्यालही कित्येक दिवस प्रकाशक मिळत नव्हता असे ऐकले होते, त्यांच्या कविता मला आवडल्या. तसेच, जॉर्ज ऑरवेल कित्येक दिवस प्रकाशक शोधत होता असे वाचले होते. अजून १-२ (आता प्रसिध्द) लेखकांबाबत असे ऐकले होते, पण आता नाव आठवत नाही. :( अशा वेळेस मग कोंबडी-अंडे असे नाही का होत? म्हणजे पुस्तक प्रकाशित झाले नाही म्हणून प्रसिध्दी नाही आणि प्रसिध्दी नाही म्हणून पुस्तकाला प्रकाशक नाही.

लेखकाचे "डेस्पेरेशन" हा एक मुद्दा असला तरी, इथे मला हा विक्रेत्यांचा आणि प्रकाशकांची मनमानी असेही दिसते आहे. शिवाय ४०% ते ५०% कमिशन असतांनाही पुस्तक प्रदर्शन सोडले, तर (बहुतेक) मराठी पुस्तक विक्रेते काहीही डिस्काऊंट देत नाही. हा सगळाच बाजार इतर बर्‍याच गोष्टींप्रमाणे 'मधल्या' लोकांच्या हातात का, असाही प्रश्न पडलाय.

नील_गंधार's picture

19 May 2010 - 3:25 pm | नील_गंधार

आपण लिहिलेले लोकांनी वाचावे त्याची वाहवा व्हावी असे प्रत्येक लेखकाला वाटतेच.त्याला डेस्परेट पणा म्हणणे योग्य नाही.
अहो,
संकेतस्थळावर आपल्या सुरुवातीच्या लेखांना प्रतिसाद कमी मिळत म्हणून का कोणी लिहायचे थोडेच बंद करतो?
कालांतराने लोकांनाही लेखनाचा दर्जा कळतोच. आपोआप प्रतिसाद मिळतात.इथे ही असेच आहे. सुरुवातीला असा त्रास होणारच.एकदा का बाजारात नाव झाले की प्रकाशक लोक घरी रांग लावतात अन वाचक दुकानात.उदाहरणच द्यायचे झाले तर "हॅरी पॉटर" च्या लेखिका.

नील.

भडकमकर मास्तर's picture

19 May 2010 - 3:46 pm | भडकमकर मास्तर

आपण लिहिलेले लोकांनी वाचावे त्याची वाहवा व्हावी असे प्रत्येक लेखकाला वाटतेच.त्याला डेस्परेट पणा म्हणणे योग्य नाही.

मग काय म्हणावे?
हौस???

वरच्या मुक्तपीठातल्या लेखामध्ये एका माणसाने स्वतःचे पुस्तक निवृत्तीनंतरच्या पैशांवर आणि फायनान्स कंपनीकडून (अर्थातच प्रचंड व्याजाने कर्ज काढून) छापून घेतले... मग ते कोणी विकेना.. मग विक्रेत्यांनाच खर्चाच्या १५ ते २० % किंमतीत विकून टाकले....याला डेस्परेटपणा म्हणायचे नाही तर काय?

समजा मी ९० प्रकाशकांकडे गेलो आणि त्यातले ८५ प्रकाशक मला म्हणाले की इतके इतके पैसे द्या मग मी छापतो, याचा अर्थ त्यांना विक्रीची खात्री नाही म्हणून ते त्यांचा तोटा कमी करत आहेत ...

मग या लेखनाबद्दल त्यांना विक्रीची खात्री का नाही? कारण माझा कंटेंट वाईट असायची शक्यता आहे, हे मी ध्यानात घ्यायला नको का?

कंटेंट चांगला असेल तर नवीन लेखकाची पहिली पुस्तके विकली जातात असे मला वाटते..... प्रकाशक आणि विक्रेत्यांनाही धंदा करायचा आहेच की...

अवांतर : इथे कोणी पुस्तक छापायच्या विचारात असेल आणि माझे विचार त्यांना उद्देशून वाटले असतील तर माफ करा, कोणाचाही अवमान करायचा हेतू नाही..

संदीप चित्रे's picture

19 May 2010 - 7:24 pm | संदीप चित्रे

>> मग या लेखनाबद्दल त्यांना विक्रीची खात्री का नाही? कारण माझा कंटेंट वाईट असायची शक्यता आहे, हे मी ध्यानात घ्यायला नको का?

बर्‍याच सुप्रसिद्ध लेखक, कवी आणि त्यांची पुस्तकं ह्याचा आढावा घेतलात (किंवा काही नामांकित कलाकार - मग ते अभिनेते, गायक, संगीतकार इ. इ. कुणीही असू शकेल), तर एक कॉमन प्रकार आढळेल तो म्हणजे बहुसंख्य प्रकाशक, एजंट ह्या लोकांना त्या त्या कलाकाराच्या कलेची किंमत कळलीच नाही आणि मग दुसर्‍या कुणीतरी पुस्तक वगैरे प्रकाशित करून ते लोकप्रिय झालं की मग हे रांग लावायला तयार. च्यायला, तुम्ही जर स्वत:ला मार्केटमधले अनुभवी म्हणवता तर तुम्ही अस्सल कलाकृतींनाही दारोदार का भटकायला लावता?

मगाशी कुणीतरी हॅरी पॉटरच्या लेखिकेचे उदाहरण दिले ते इथेही वापरता येईल.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

भडकमकर मास्तर's picture

19 May 2010 - 4:07 pm | भडकमकर मास्तर

आपोआप प्रतिसाद मिळतात.इथे ही असेच आहे.

संकेतस्थळावरच्या लेखनाची आणि पुस्तक लेखन प्रकाशनामध्ये मला समानता वाटत नाही...
असहमत...

एकदा का बाजारात नाव झाले की प्रकाशक लोक घरी रांग लावतात अन वाचक दुकानात.उदाहरणच द्यायचे झाले तर "हॅरी पॉटर" च्या लेखिका.
:)
उदाहरण बरोबर असले तरी "असे किती ?" हा प्रश्न लेखकाने स्वतःला विचारावा की नाही?..

आयुष्यात एक तरी पुस्तक लिहायचेच, या महत्त्वाकांक्षेपायी स्वतःचे निवृत्ती फंड वगैरे पैसा उडवणे मला थोर वाटते, या हौसेला माझा दंडवत... __/\__

मनिष's picture

19 May 2010 - 5:21 pm | मनिष

ह्या केस मधे "हौस" आहेच (सावकारी कर्ज काढून पुस्तक वगैरे) , पण प्रकाशकाकांनी लिहिल्याप्रमाणे इतर प्रकाशनातील मनोविकार हेही आहेतच!

इन्द्र्राज पवार's picture

19 May 2010 - 5:12 pm | इन्द्र्राज पवार

मराठी प्रकाशन व्यवसाय हा निव्वळ चोर आणि रक्तपिपासू व्यक्तींनी भरलेला आहे याची जाणीव प्रत्येक नवीन लेखकाला येत होती, येत आहे, येत राहील. या प्रकाशक जमातीला माहित असते की आपल्या मराठीत लिहायची "खाज" असणारे पोत्याने आहेत (पुरुष आणि स्त्रियाही...) आणि स्वत: हे लोक आपले साहित्य प्रकाशित करू शकत नाहीत... अन् केले तर खपवायचे कसे? बाजारपेठ म्हणजे काय? विक्रेता नावाचा ठोम्ब्या कुठे असतो, तो पुस्तक विक्रीला ठेवतो म्हणजे काय करतो, छापखानावाले, बाईंडर, कागदवाले, इतकेच काय वाहतुकवाले देखील या प्रकाशकांचे गुलामच कारण या गटातील लोकांना माहित असते की "बातमीत" उल्लेख केलेला लेखक असा एखाद दुसराच असतो जो कर्ज काढून का होईना आपले पुस्तक बाजारात आणण्याचा कासावीस होईपर्यंत प्रयत्न करणार, अन्य नाही.... थोडाफार प्रयत्न करतील आणि "जाऊ दे त्येच्या मायला, मराठी साहित्य खड्ड्यात...!" म्हणतील आणि आपआपल्या पोटापाण्याच्या उद्योगाला लागतील... म्हणजेच शेवटी आपला तारणहार (किंवा "मालक") हा प्रकाशकाच.

बाकीचा चिल्लरखुर्दा सोडा.... प्रकाशकाचा असाच वाईट अनुभव खुद्द "महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व" श्री. पु. ल. देशपांडे आणि सुनिता देशपांडे यांना आला होता.... आणि प्रकाशक रा. ज. देशमुख यांना नकार देऊन स्वत: पुस्तक छापण्याचा आग्रह (कि अट्टाहास..?) धरला व दोघांनीही त्यात हात पोळून घेतले व निमुटपणे पुढच्या पुस्तकाच्यावेळी देशमुखांना शरण गेले. आता पु. ल. सारख्या "भरभक्कम" लेखकाची ही अवस्था तर बाकीच्या शेंगदाण्यांची काय कथा?

"बिढार" मध्ये श्री. भालचंद्र नेमाडे यांनीही त्यांना "कोसला" च्या वेळी आलेला अनुभव त्यांच्या टिपिकल भाषेत वर्णन केला आहे.... तीच गोष्ट किरण नगरकर यांच्या "सात सक्कं त्रेचाळीस" ची. कथा कादंबरीकाराना हे प्रकाशक निदान "आत या" असे म्हणून थोडा तर मान देतात, पण "कविता"च्या चोपडीकडे त्यांच्या दारातील कुत्रे देखील मान वर करून बघत नाही. माझा एक "क्रांतिवीर" कवी मित्र (जो आपल्या कवितेतून निव्वळ आगीचे लोळ फेकत असे....) मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे उपाशीपोटी वणवण हिंडला, आपल्या "तिसर्‍या क्रांती"ची पुस्तकरुपी पिलावळ घेऊन... पण प्रकाशक मायाचे साले एक नंबरचे हुशार ! त्यांनी सांगतले थेट : "कुठली क्रांती घेऊन बसला.... काय एमपीएससी आणि तशाच स्पर्धा परीक्षेसाठी काय लिहित असाल तर सांगा..! बास झाली मराठी भाषेला आता क्रांती... जावा !" अक्षरश: हाकलून लावले त्याला असे म्हटले तरी वावगे होणार नाही. डोंबलाचे क्रांतीची भाषा करणारे हे कवी... सगळे च्यामायला भिकार जमात आहे महाराष्ट्रातील या जातीच्या कवी लोकांची. पैशाला महाग आहेत स्वत: आणि प्रकाशकाच्या दारात उभे राहून थेट बिर्ला अंबानी यांना कवितेतून आयमाय वरून शिव्या घालतात...! कुठला प्रकाशक यांना जवळ उभा करून घेईल. आता तर ढसाळ, ढाले, दया, बागुल, हे देखील इतिहासजमा झाले.

सगळे प्रकाशक या समस्त लेखक जमातीच्या बापाचे बारसे जेवले आहेत. त्यामुळे लेखातील व्यक्तीस आलेला कटू अनुभव हा काय नवा नाही..... त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे त्यांनी जिद्द न सोडता पदरमोड होऊन का होईना शेवटी ते पुस्तक प्रकाशित केले... त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजेच.

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"