(प्रथमच हे स्पष्ट करतो की, लेखाच्या शीर्षकावरून कुणी हा अर्थ काढू नये की याचे प्रयोजन "गांधीहत्या आणि गोडसे" असा काही आहे. बिलकुल नाही.)
बडोदा येथे काही कामानिमित्त आलो असताना मिसळपाव वरील एक सदस्यासामावेत इ-मेलिंग चालू होते, त्यावेळी त्यानी "आता बडोद्यात आला आहात तर तेथील प्रसिद्ध खारे शेंगदाणे जरूर खाणे जे नारळाच्या पाण्यात भिजवून करतात..." अद्याप शहरात गेलेलो नाही त्यामुळे हे खारे शेंगदाणे अजून लांबच आहेत. तरीही मेल मधील या उल्लेखाने ३० जानेवारी १९४८ हा दिवस आठवला आणि आठवली दिल्ली रेल्वे स्टेशनच्या परिसरात श्री. नथुराम गोडसे यांच्यासाठी "खारे शेंगदाणे" मिळविण्याची श्री. विष्णूपंत करकरे व श्री माधव आपटे यांची धडपड (किंवा धावपळ...!)
याचे वर्णन इंग्लिश साहित्यात खास आपल्या अशा शैलीमुळे सुविख्यात झालेले लेखक श्री. मनोहर माळगावकर यांनी त्यांच्या "गांधी हत्या" या विषयावर लिहिलेल्या "The Men Who Killed Gandhi" (The Lotus Collection, Roli Books, Pvt.Ltd., New Delhi, Edition 2008, Price Rs.395/-) या अतिशय गाजलेल्या पुस्तकात केले आहे. त्यातील दिनांक ३० जानेवारी १९४८ च्या घडामोडीवरील हे एक प्रकरण, ज्याचा मी शब्दश अनुवाद न करता स्वैर अनुवाद करीत आहे जो या लेखाचा विषय आहे.
गांधी हत्येच्या निर्णयाला अंतिम स्वरूप दिल्यानंतर यात प्रत्यक्ष सामील असलेल्या वरील तिघांनी २९ जानेवारी १९४८ रोजी अमृतसर एक्स्प्रेसने जुनी दिल्ली स्टेशन गाठले. तथापि त्या अगोदर बिर्ला भवन परिसरात झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची व गुप्तचर विभागाची दिल्लीतील सर्व प्रकारच्या यात्री निवासस्थानावर करडी नजर असल्याने या तिघांनी रात्र दिल्ली स्टेशनच्या गेस्ट रूममध्ये व ३० तारखेची सकाळ त्या नंतर रीटायरिंग रूम मध्ये तसेच प्लेटफॉर्मवरच पाकिस्तानातून "निर्वासित" बनून आलेल्या व तिथे गर्दी करून राहिलेल्या शेकडो प्रवाशांच्या समवेतच काढण्याचे निश्चित केले होते. बिर्ला भवन येथे गांधीजींची सायंकाळची प्रार्थना ठीक ५ वाजता सुरु होत असल्याने नथुराम यांनी ४ वाजेपर्यंतचा वेळ त्या प्लेटफॉर्मलगतच्या सेकंड क्लासच्या जनरल वेटिंग रूम मध्ये घालविण्याचा निर्णय घेतला होता व करकरे आणि आपटे हे दोघे अस्वस्थपणे इकडे तिकडे भटकत राहिले होते, तसेच अधून मधून शांतपणे विश्रांती घेत असलेल्या नथुराम यांच्याकडे येऊन त्यांना पहात होते. पुढे काय होणार आहे याची पक्की खात्री असल्यामुळे (नथुराम यांनी निर्णय घेतला होता की, गांधी हत्येनंतर आपण तिथून पळून न जाता तिथेच बेरेटा (पिस्तुल) समवेत पोलिसांच्या स्वाधीन होणार आहे...) जणू काही आता नथुराम बरोबरची आपली शेवटचीच हे भेट आहे. बोलण्यासाठी काही तरी विषय काढावा म्हणून त्यांनी नथुराम यांना विचारले, "या क्षणी तुला काही प्यावेसे अथवा खावे असे वाटते काय?" विशेष म्हणजे त्यावेळी नथुराम John Fergusson या लेखकाचे Night in Glenzyle हे पुस्तक वाचत बसले होते, ते म्हणाले, "होय, मला आता खारे शेंगदाणे खावेसे वाटतात."
दोघानाही (करकरे आणि आपटे) खूप बरे वाटले आणि "घेऊनच येतो" असे सांगत झटकन विश्रांती गृहातून बाहेर पडले. पण त्यांच्या दुर्दैवाने स्टेशनच्या परिसरात असे एकही दुकान नव्हते की जेथे खारे शेंगदाणे मिळू शकले असते. इकडे तिकडे शोधाशोध केल्यानंतर निराश मनाने दोघेही परत फिरले. त्यांचे पडेल चेहरे पाहून नथुराम किंचित हसले आणि त्यांना बरे वाटावे म्हणून उदगारले, "मला माहित होतेच की तुम्हाला खारे शेंगदाणे इथे मिळणार नाही. कारण मागच्या फेरीत मी हा अनुभव घेतला आहे." थोडा वेळ गेला आणि जणू काही मृत्यू शय्येवर पडलेल्या नातेवाइकाशेजारी बसल्याची जाणीव आपटे यांना झाल्यामुळे त्यांनी करकरे यांना मानेने खूण केली आणि "आम्ही थोड्याच वेळेत परत येतो" असे नथुराम यांना सांगून ते विश्रांती गृहाच्या बाहेर पडले. त्या दोघानाही आता बिर्ला हाउसच्या परिसरात असलेली त्यावेळेची हालचाल पहायची होती म्हणून बाहेर आल्यावर लगेच एका टॅक्सीला हात केला. त्या गाडीने अकबर रोड बाजूने बिर्ला हाउसकडे गेले, हालचालींची पाहणी केली आणि इंडिया गेटकडून परत स्टेशनकडे गाडी घेण्यास चालकास सांगितले. त्या नुसार गाडी वळण घेत असतानाच करकरे यांनी अधीर आवाजात टॅक्सिवाल्याला गाडी थांबवण्यास सांगितले.
आपटे यांनी काळजीयुक्त स्वरात विचारले.... "का, काय झाले?"
"ते पहा" करकरे यांनी आपटे यांचे लक्ष इंडिया गेट जवळील एका जागेकडे वळविले. त्या ठिकाणी एक फिरता विक्रेता "खारे शेंगदाणे" विकत होता. उत्साहाने लागलीच शेंगदाण्याची खरेदी झाली आणि ३ वाजता दोघेही दिल्ली स्टेशनच्या त्या जागेकडे आले. खा-या शेंगदाण्याची पुडी करकरे यांनी नथुराम यांना देताच त्यांचे डोळे विस्मयाने चमकले, "म्हणजे? तुम्ही हे खारे शेंगदाणे आणण्याकरिता पुण्याला गेला होता कि काय?" एवढे बोलून नथुराम यांनी समाधानाने ते खारे शेंगदाणे खाण्यास सुरुवात केली. "ती" ऐतिहासिक घटना घडण्यापूर्वी त्यांची काही तरी खास खाण्याची ईच्छा त्यांच्या मित्रांनी अखेर पुरी केली होती.
आता इथे मनात एक प्रश्न येतो, तो असा की, खरेच जीवनाच्या अशा "मृत्युदायक" निर्णयाच्या वेळी संबधित माणसाची काहीतरी विशेष खाण्याची जी इच्छा होते तिचे रहस्य काय असावे? माझ्या एका मित्राच्या आजीने तिच्या मृत्युच्या अगोदर एक रात्र, "तुला काय देऊ का?" असे विचारल्यानंतर खुणेने म्हणा किंवा पुटपुटत "सोलकढी" मागितली होती. घरातील लोकांना थोडे आश्चर्यच वाटले होते कारण ती आजारी पडण्यापूर्वी गेली कित्येक वर्षे त्या घरात सोलकढी कधी केली नव्हती, मग आजींना अचानक तिचीच आठवण का यावी? अर्थात याला तार्किक उत्तर असे काही लागलीच मिळत नाही. पण इच्छा पूर्ण करण्यासाठी संबधित नातेवाईकांची तसेच मित्र परिवाराची जी धावपळ होते तिला काय नाव द्यायचे किंवा त्याची काय तर्कसंगती असेल ?
आपल्यातील काही सदस्यांना असले काही अनुभव आले असल्यास ते चर्चेत यावेत ही अपेक्षा !
प्रतिक्रिया
28 Apr 2010 - 7:55 pm | रामदास
कादंबरी आहे नाईन अवर्स टू राम अशा काहीशा नावाची. या कादंबरीत असेच काहीसे वर्णन आहे.शेंगदाण्यांचे नव्हे पण इतर बरेच काही.कुठे मिळाली तर वाचून बघा.मी रुपांतर करायला घेतली होती पण आधीच भाराभारा चिंध्या झाल्यात म्हणून थांबलो.
एकदा तरी वाचावे असे पुस्तक आहे.
28 Apr 2010 - 8:30 pm | इन्द्र्राज पवार
जरूर..... सूचनेबद्दल मन:पूर्वक आभार. आपणही कर्नल मनोहर माळगावकर यांचे हे शोध पुस्तक "The Men Who Killed Gandhi" वाचावे. नक्कीच आवडेल आपणाला. अशासाठी सांगत आहे कि यात ज्या फोटोंचा आणि सरकारी कागदपत्रांचा पुरावा सादर केला आहे (झेरोक्स मिळवून ...) ती पाहता लेखकाने "त्या" घटनेचा किती गाढ अभ्यास केला आहे याचा अंदाज येतो. जणू काय एखादी कादंबरीच वाचत आहे असा भास होतो. मात्र "Hard Bound" प्रत घ्या ..... ( फोटो साठी).
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
28 Apr 2010 - 8:00 pm | रामदास
http://www.mouthshut.com/review/Mee_Nathuram_Godse_Boltoy-117468-1.html
बाकी शेवटची इच्छा या विषयावर फारशी काही माहीती नाही.पण सावधान असावे म्हणून झोपण्यापूर्वी रोज चिक्की खातो.दर गुरुवारी साबुदाण्याची खिचडी खातो.मिसळपाववर एखादी तरी प्रतिक्रीया लिहीतो. यादी मोठी आहे.
29 Apr 2010 - 8:57 am | II विकास II
.पण सावधान असावे म्हणून झोपण्यापूर्वी रोज चिक्की खातो.दर गुरुवारी साबुदाण्याची खिचडी खातो.
== ))
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
29 Apr 2010 - 8:50 am | प्रकाश घाटपांडे
चकना खाताना या लेखाची आठवण येईल प्रत्येकाला. ;)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
29 Apr 2010 - 9:06 am | इन्द्र्राज पवार
सॉरी प्रकाश जी, बट व्हॉट इज धिस "चकना"? सम काईंड ऑफ नॉन व्हेज आयटेम?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"