तीन महिन्यांपूर्वी यनावाला यांनी (अन्यत्र) चालू केलेल्या विषयावर पुढे विचार येथे देत आहे.
गेल्या तीन महिन्यात लोकमित्र प्रतिष्ठान नावाची एक विश्वस्त संस्था मी फोंडा, गोवा, येथे पंजीकृत केली आहे. या संस्थेची कागदपत्रे विश्वस्तांच्या हातात रजिस्ट्रार कडून आता प्राप्त झालेली आहेत (विश्वस्त तसेच संस्थेसाठी मी दिलेल्या पैशांचा करण्यास समर्थ म्हणून माझे काही नातेवाईक योजले आहेत. मंडळ कार्यरत झाल्यावर यांच्या हातून जबाबदारी आणि सूत्रे काढून टाकावीत अशी माझी इच्छा आहे.)
काम एक कार्यकारी मंडळ करेल. आजानुकर्ण आणि प्राडॉ बिरुटे हे सध्या या विषयी मला मदत करत आहेत.
विश्वस्त संस्थेच्या स्थापनापत्रकातील मुख्य कलम येणेप्रमाणे :
या प्रतिष्ठानाची उद्दिष्टे येणेप्रमाणे आहेत
(अ) व्हर्न्याक्युलर भाषेतील लोकशिक्षणात्मक लेखांच्या विनिमयाचे एक आगार स्थापन करणे, आणि अशा लेखांचे नियतकालिकांत प्रकाशन होण्याचा पुरस्कार करणे. या लेखांचे संभाव्य विषय विज्ञान, कला, अर्थशास्त्र, तंत्रज्ञान, आरोग्य, हे असू शकतील, पण याच विषयांपुरते क्षेत्र मर्यादित नाही. या लेखांत निव्वळ कल्पित साहित्याचा किंवा व्यापारी मालाच्या जाहिरातीचे साहित्याचा, की ज्याच्यात लोकशिक्षणाचा हेतू नाही, अशा साहित्याचा अंतर्भाव होऊ नये.
(ब) प्रतिष्ठानाच्या उद्दिष्टांना पाठिंबा देणार्या दात्यांच्या सदस्यमंडळाची स्थापना करणे.
(क) विज्ञान, साहित्य, संगीत, नाट्य, कला, पुरातत्त्वसंरक्षण, संशोधन यांना वाहिलेल्या, किंवा असाच सार्वजनिक हेतू असलेल्या संस्थांना भारतात स्थापणे, त्यांचे साहाय्य करणे, त्यांना तगवणे, आर्थिक मदत करणे.
याबाबत प्राडॉ बिरुटे/अजानुकर्ण आणि माझ्यामध्ये पुढीलप्रमाणे पत्रव्यवहार झाला :
प्रस्तावना :
या घटकेला माझ्या मनासमोर जी चौकट आहे ती आहे थोडीफार "रॉयटर" किंवा "असोसिएटेड प्रेस ऑफ इंडिया" या संस्थांसारखी. म्हणजे आपण मासिक/नियतकालिक काढणार नाही, पण नियतकालिकांना मजकूर पुरवू. पण "रॉयटर"चे स्वतःचे वार्ताहार असतात. आपले लेखक मात्र स्वतंत्र असतील, आपले पगारी नोकर नव्हेत. रॉयटर नफा तत्त्वावर चालते. आपले मंडळ विना-नफा तत्त्वावर चालेल. अगदी नेमकी चौकट आहे "सिंडिकेशन"ची. उदाहरणार्थ "टाइम्स ऑफ इंडिया", "इंडियन एक्स्प्रेस", वगैरे, अनेक वर्तमानपत्रांत तीच-ती व्यंगचित्रे छापून येतात, जशी "बीटल बेली", "हागार द हॉरिबल" इ.इ. प्रत अधिकार लेखकाकडे राहातो, आणि मर्यादित अधिकार एका मध्यवर्ती संस्थेकडे जातो. ती संस्था या मर्यादेसकट ती व्यंगचित्रे वर्तमानपत्रांना पुरवतात. ही मध्यवर्ती संस्था नफा तत्त्वावर चालते. तेच काम आपल्या मंडळाला विनानफा तत्त्वावर करायचे आहे. असे मध्यस्थ असू तर या नव्या उदयाच्या काळात छपाई आणि वितरण व्यवस्था तयार करायची जोखिमेची जबाबदारी आपल्याला उचलावी लागणार नाही.
काही प्रश्नंची उत्तरे अशी :
> १) लोकशिक्षणात्मक लेख लिहिणारे लेखकांनी आपल्या कडे लेख का द्यावेत ?
ज्या लोकांना लिहायचे आहे, पण प्रकाशकांशी संपर्क नाही, तो साधायचा खटाटोप करायचा नाही, अशा लेखकांना मंडळाच्या कामात रस असेल. आजही हे लोक अनुदिन्यांवर, संकेतस्थळांवर आणि सकाळच्या "पैलतीर" वगैरे सदरांवर लिहू शकतात. पण जे लोक आज त्यांचे लिखाण वाचतील ते फार थोडे आहेत (आकडा बहुधा शेकड्यांमध्ये). मुख्य म्हणजे जे त्यांचे आज आंतर्जालावरचे वाचक आहेत, ते बहुतेक आंतर्जालात तरबेज आहेत, बहुतेक थोडीतरी इंग्रजी विद्या शिकलेले/समजू शकणारे आहेत. त्या वाचकांना ती माहिती गूगलून सहज मिळू शकेल. छापील वर्तमानपत्रांच्या वाचकांची संख्या हजारोंनी आहे. पैकी लहान मराठी वर्तमानपत्रांचे वाचक असेही असतात की जे इंग्रजी वाचत नाहीत. या वाचकांकडे लोकशिक्षणात्मक लेख पोचवण्यात काही नवे कार्य मंडळ करू शकते. ज्या लेखकांना या वाचकवर्गापर्यंत पोचायचे आहे, पण जिल्ह्या-जिल्ह्याच्या वर्तमानपत्राच्या संपादकांशी कसा संपर्क साधावा हे माहीत नाही, त्या लेखकांना मंडळाच्या कामात रस असेल. अर्थात मंडळ कोणाला आर्थिक नफा करून देण्यासाठी आपला वेळ खर्ची घालणार नाही. ज्या लेखकांना विना नफा तत्त्वावर, स्वान्तसुखाय, आपले लेखन या वाचकांपर्यंत पोचवायचे आहे, त्यांनाच मंडळ मदत करेल. (मंडळा-व्यतिरिक्त लेखकांनी नफ्यासाठी जरूर लेखन करावे, पण नफ्यासाठी मंडळाचा वापर करू नये.) एकदा लेखन छापून आले, आणि ते संपादकांना/वाचकांना आवडले, तर या लेखकांना पुढे थेट त्या संपादकांपाशी आपले लेखन नेता येईल. यासाठी त्यांनी नफा-विनानफा काही तत्त्व वापरले, तर मंडळाशी त्याचे कर्तव्य नाही. मंडळात सुरुवात केल्यानंतर, पुढे कोणाची स्वतंत्र प्रगती झाली, तर मंडळाला आनंदच आहे.
> २) आपले मंडळ मासिक काढत असेल तर त्यात लोकांना लिहिण्यासाठी प्रवृत्त करायचे तर
> त्याचे स्वरुप कसे असावे ?
या घटकेला मंडळाला मासिक काढायचे नाही. आपल्याला अस्तित्वात असलेल्या नियतकालिकांशी स्पर्धा (आतातरी) करायची नाही. मासिकासाठी छापखाना, वितरणसंस्था, प्रकाशक लागतील. ते मोठे प्रस्थ या क्षणी आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. उलट हल्ली अस्तित्वात असलेल्या नियतकालिकांना लेख पुरवून, त्यांच्या वितरण-जालाचा आपण फायदा करून घेऊ (म्हणजे आपल्या विना नफा लेखकांना त्या वितरणाचा फायदा मिळवून देऊ.)
> ३)मिपावरील किंवा अन्य संकेतस्थळांवरील वरील लेखनाचे संकलन करुन छापण्यास हरकत नसावी का ?
लेखकाची अनुमती असल्यास हरकत तर काहीच नाही. पण छापलेल्या लेखाचे खेडोपाडी साक्षर वाचकापर्यंत वितरण कसे करावे, हा मोठा प्रश्न उभा राहातो. हेच लेख आपण छापून, मर्यादित प्रत-अधिकारासकट, एखाद्या नियतकालिकाला पुरवले, तर त्यांच्या छापलेल्या गठ्ठ्यांबरोबर हे लेख खेडेगावात पोचतील.
> ४) मासिक काढण्याअगोदर संकेतस्थळावर त्या लेखाबाबत चर्चा करावी का ?
माझ्या मते मासिक काढण्याची महत्त्वाकांक्षा चांगली असली तरी तो पूर्णवेळ श्रमाची गरज असलेला तो धंदा सुरू करण्यासाठीचे मनुष्यबळ आपल्यापाशी आज नाही. पुढे कधी आपण मासिक काढण्यास समर्थ होऊ, तेव्हा त्याची चर्चा झाली पाहिजे हे पटते.
५) लेखन योग्य- अयोग्य ठरवायचे कोणी ?
कार्यकारी मंडळाने योग्य-अयोग्य ठरवायचे. शक्यतोवर हे लेखन "मिसळपाव"वर (किंवा कार्यकारी मंडळाला चर्चा दिसेल अशा अन्य संकेतस्थळावर) आधी प्रकाशित व्हावे. तिथे लोक आपल्याला सल्ला, टीका देतील. पण या निनावी लोकांपाशी मताधिकार किंवा नकाराधिकार नसावा. त्यांच्या सल्ल्यानुसार लेखकाने लेखात फेरफार केल्यास करावा. शिवाय त्या प्रतिसादांवरून त्या लेखाच्या दर्जाविषयी, विषयाच्या योग्यतेबद्दल कार्यकारी मंडळाला कल्पना येईल. पण कार्यकारी मंडळ स्वतःच अंतिम निर्णय घेईल. कार्यकारी मंडळात एकमेकांशी मिळून घेण्याचा, अतिरेकी आग्रह न करण्याचा गुण असावा (म्हणून कार्यकारी मंडळ लहान असावे.). कार्यकारी मंडळाने योग्य-अयोग्य ठरवल्यानंतरही छापील माध्यमाचे संपादक तो लेख निवडून छापतील की नाही, तो निर्णय त्या-त्या वर्तमानपत्राच्या संपादकाचा!
> ६) समजा प्रा.डॉ.बिरुटे यांनी औरंगाबादचे काही वैचारिक लेखन, काही नामांकित
> लेखकांचे लेखन जमा केले, तर करतांना कोणत्याही मानधनाशिवाय ते लेखन
> देतील काय ? एकदा देतील पण,दुस-यांदा मात्र शे-दोनशे द्यायचेत का ?
हा उत्तम विचार आहे, पण यातही गोम आहे. शे-दोनशे रुपये काही आपल्याला जड नाहीत. पण ज्यांना धन मिळण्याइतपत नाव आहे, त्यांना आपली गरज का भासावी, हा प्रश्न पडतो. कारण आपल्या मदतीशिवायही ते आपले लेखन वर्तमानपत्रांना पाठवू शकतात. खरे म्हणजे इथे सेवाभावाची कोणाला भावना असली, पण सेवा करायला लेखकाला वाट माहिती नसली तर तशा सेवेस मार्ग मोकळा करणे, हे आपल्या मंडळाचे उद्दिष्ट आहे. तरी हे म्हणणे चांगले, विचार करण्यासारखे वाटते, कारण आज मंडळ नवोदित आहे. कुणा नामांकित लेखकाने आपल्याला लेख पुरवलेत, तर मानधन म्हणून नाही, तरी "पोस्टाचा, कागदाचा खर्च" म्हणून शे-दोनशे रुपये देण्याचा विचार आपण करू शकतो.
> मंडळाचे स्वरुप लेखक व प्रकाशक यांच्यामधील मध्यस्थ स्वरुपाचेच राहील
> किंवा कसे याबाबत अधिक विचार करणे गरजेचे आहे. काही कारणास्तव
> एखाद्या लेखकाला आपले नाव प्रसिद्ध करणे/जाहीर करणे योग्य वाटत
> नसल्यास लोकमित्र मंडळाने हा लेख मंडळाच्या नावावर प्रसिद्ध करणे शक्य
> होईल का? आज मिसळपाववरील काही टोपणनावे घेऊन
> लिहिणारे अनेक लेखक अतिशय चांगले लिहितात मात्र गुप्त राहण्याची
> त्यांची इच्छा असेल तर केवळ त्यासाठी त्यांच्या लेखनापासून वाचक
> वंचित राहू नयेत असे वाटते.
हा चांगला विचार आहे. पण कोणी जाहीररीत्या टोपणनाव वापरत असले तरी मंडळाशी व्यवहारात खरी व्यक्ती म्हणूनच सामोरे यावे. त्यांनी वाङ्मय चोरले तर मंडळास कायदेशीर धोका नको. शिवाय अशा बाबतीत मंडळ एजंट म्हणून त्या लेखकाचे मर्यादित वकालतपत्रच घेत असते. म्हणजे त्यांच्या नावाची पत्रे पोचती करणे, वगैरे आलेच. कार्यकारी मंडळापाशी कितपत वेळ आहे, त्याचा आवाका जाणून हे काम आपण पत्करावे, असा विचार करूया.
मिसळपाव आणि अन्य संकेतस्थळावरील लेखकांना माझी पुढील विनंती :
१. या संस्थेत लेखक म्हणून रुजू व्हावे. तसे सुरुवातीने ई-विरोपाने, पुढे कागदोपत्री आम्हाला कळवावे.
२. आपले काही लेख उपक्रमावर (किंवा आम्हाला बघता येतील अशा दुसर्या संकेतस्थळावर) प्रसिद्ध करावेत : मर्यादा ५०० शब्द जास्तीत जास्त एक कृष्णधवल चित्र. (चित्राचा प्रत अधिकार लेखकाकडे असावा, किंवा मुक्त असावा.)
३. विषय शिक्षणात्मक/माहितीपर असावा. शैली ललित असली तरी चालेल. पण मूळ आणि स्पष्ट उद्देश शिक्षणात्मक असावा.
४. लेखांचा पूर्ण अधिकार लेखकांकडे राहील - पण मंडळाकडे वृत्तपत्रांच्या संपादकांना एकदा-छपाईची अनुमती देण्याचा मर्यादित अधिकार राहील.
५. मंडळ अजून नवीन आहे - सुरुवातीचे लेख शक्यतोवर राजकीय दृष्ट्या स्फोटक नसावेत. (पुढे "वाक्स्वात्रंत्र्य" वगैरे वादांना मंडळाला सामोरे जावे लागले - तितका काळ मंडळ तगले - तर ते संकट भाग्य म्हणून मानून घेईन!) लोककला, अभिजात कला, अर्थकारण, पर्यावरण, वाणिज्य, विज्ञान, वैद्यक यातील बहुतेक विषय स्फोटक नसावेत असे वाटते.
६. पाच लेखक आणि २५ लेख हातात आल्यावर ही पुंजी आम्ही वेगवेगळ्या संपादकांना दाखवू. यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मी येथे आह्वान म्हणून सभासदांना देत आहे.
या प्रकल्पाला प्रतिसाद द्यावा.
प्रतिक्रिया
24 Mar 2008 - 8:23 am | विसोबा खेचर
शाब्बास रे धन्या! तीन महिन्यांपूर्वी जे बोलला होतास ते करून दाखवलंस!
'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले'! असं म्हटलेलंच आहे..
तुझे, बिरुटेशेठचे आणि आजानुकर्णाचे मन:पूर्वक अभिनंदन व लोकमित्र प्रतिष्ठानला माझ्या व्यक्तिगत व मिसळपाव परिवारातर्फे अनेकोत्तम शुभेच्छा!
ही मूळ कल्पना ज्यांनी मांडली त्या आमच्या वालवलकरशेठचेही अभिनंदन!
(अवांतर - एक कोकणी या नात्याने मला त्यांचा अभिमान वाटतो!)
धन्याशेठ, मात्र आता थांबू नका. लोकमित्र प्रतिष्ठानचे हे जे रोपटे तू लावले आहेस, त्याचा वेलू आता गगनावेरी नेण्याची जबाबदरी तुम्हा मंडळींवर आहे. नाहीतर उत्साहाच्या भरात अशी अनेक प्रतिष्ठानं, संस्था स्थापन होतात व लवकरच बंद पडतात, तसं होता कामा नये, असं वाटतं!
व्यक्तिश: माझ्याकडून काही मदत होण्यासारखी असेल तर अवश्य सांग, मी ती यथाशक्ति, यथामती करण्याचा जरूर प्रयत्न करीन, नव्हे ते मला आवडेल!
आत्ता जरा गडबडीत आहे, सवडीने विस्तृत प्रतिसाद पाठवतो...
प्रतिष्ठानला पुन्हा एकदा शुभेच्छा व सुयश चिंतितो!
तात्या.
27 Mar 2008 - 10:09 pm | सुवर्णमयी
धनंजय,
एक उत्तम आणि नवीन उपक्रम हाती घेतल्याबद्दल तुमचे आभार आणि मंडळाला शुभेच्छा.
सोनाली
28 Mar 2008 - 8:48 am | प्राजु
अतिशय सुंदर उप्क्रम सुरू केला आहे. तुमचे सगळ्यांचे आभार आणि शुभेच्छा. माझ्याकडूनही जमेल तितकी मदत मी करेन...
- (सर्वव्यापी)प्राजु