हा पाव करण्यास सोपा आणि आरामशीर आहे. कणीक तिंबायचेही कष्ट घ्यावे लागत नाहीत. पण पीठ फुगायला खूप वेळ लागतो. इडली वगैरे करताना पीठ फुगायला आपण रात्रभराचा वेळ देतो, तशा प्रकारे विचार करायचा...
गव्हाचे पीठ १००% घ्यायचे आहे. अमेरिका-वगैरे देशांत शक्यतोवर "हार्ड रेड व्हीट" घेतल्यास त्यात तार अधिक येते. (तार येण्यासाठी "ग्लूटेन"चे प्रमाण अधिक असावे लागते.) पुणे-सोलापूर भागात "खपली" गहू मिळतो, तो चांगला. पुरणपोळीसाठी ज्या गव्हाची कणीक वापरता येईल, तो गहू (१००% कोंड्यासकट) बारीक दळून घ्यावा. (पुरणपोळीची किंवा मांड्यांची कणीक मळताना गोळा ओढून बघतात - त्याला लांबच लांब चार-पाच फुटांची तार येते. त्यात भरपूर ग्लूटेन असल्यामुळे असे होते.)
साहित्य :
- १००% गव्हाचे पीठ : ३ आणि १/२ कप (१ कप = आदमासे २५० मि.लि.)
- + कुठलेही पीठ : भुरभुरण्यासाठी/हात कोरडे करण्यासाठी थोडेसे
- पाणी (कळे-न-कळे कोमट, "थंड नाही" म्हणण्याइतपत) : १ आणि २/३ कप
- मीठ : ३ छोटे चमचे
- यीस्टची कोरडी भुकटी : ०.२५ छोटा चमचा (होय! पीठ १२-१४ तास आंबवायचे आहे, यीस्ट खूपच थोडे घेतलेले पुरते.)
१. येथे दाखवलेल्या यीस्टच्या पाकिटात चार-पाच वेळा पाव करून झाले आहेत. यीस्ट मिसळायला सोपे जावे म्हणून थोड्या पाण्यात कालवले/विरघळवले आहे. यीस्ट जिवंत आहे/नाही अशी शंका असल्यास, त्या पाण्यात थोडीशी साखर घालायची, आणि पाणीसुद्धा कोमट घ्यायचे. दहा मिनिटांमध्ये मिश्रण फसफसले पाहिजे. यीस्ट हल्लीच वापरले होते, खात्री होती, म्हणून मी चाचणी घेऊन बघितली नाही.
२. वरील सर्व मिसळून घ्यावे. लोळागोळा चिकट लगदा होईल. त्यापेक्षा घट्ट झाले, तर चमचा-दोन चमचे पाणी घालून सैल करा.
३. प्लाल्टिकच्या कागदाने झाकून ८-१८ तास ठेवून द्या. उष्मा असेल तर ८ तास, थंडी असेल तर १८ तास. मी ओव्हन गरम करून बंद केले, आणि त्यात गोळा आंबवायला ठेवला ८-१२ तासांत तयार झाला. फुगून पिठावरती बुडबुडे दिसले, म्हणजे पीठ तयार आहे. थोडे २-६ तास जास्त आंबले, म्हणून काही बिघडत नाही.
४. गोळा थोडा पसरवून त्याची एक-दोन वेळा घडी घाला. गोळा तसाच लेवाडा-शेवाडा चिकट असणार आहे. तसाच प्लास्टिक वर घालून १५ मिनिटे ठेवा. पावाच्या गोळ्याला श्वटचा आकार देण्यापूर्वी ही १५ मिनिटांची "विश्रांती" फार महत्त्वाची असते, असे पुस्तकांत वाचले आहे.
५. एका दमट सुती कापडावर पीठ भुरभुरून घ्या हातावरही थोडेसे पीठ भुरभुरून घ्या आणि मग कणकेच्या लगद्याचा गोळा बनवा. गोळा अलगद अशा प्रकारे बनवायचा असतो - दर्शनी भागावरचा कातडीसारखा पापुद्रा ताणला तरी फाटता कामा नये. ताणून घेतलेला गोळ्याचा भाग गोळ्याच्या खालच्या बाजूला चिमटून दाबून टाकायचा आहे. असा हा गोळा पीठ भुरभुरलेल्या कापडावर ठेवा, आणि कापडाने गोळा झाका.
६. साधारण १-२ तास फुगू द्या. हेसुद्धा हवामानावर अवलंबून आहे. पूर्ण फुगलेला गोळा आकारमानाने दुप्पट होतो, आणि बोटाने दाबल्यास बोटाचा ठसा पटकन वरती येत नाही. जितका वेळ गोळा फुगणार असेल, त्याच्या १/२ तास आधी ओव्हन तापवायला ठेवा (४५० फॅरेनहाइट = २३० सेल्सियस). ज्या भांड्यात ब्रेड भाजायचा आहे, ते भांडे ओव्हनमध्ये रिकामेच तापवायला ठेवा. बिडाचे किंवा भाजक्या मातीचे, किंवा ओव्ह्न-प्रूफ काचेचे जड भांडे असले तर बरे.
७. (पूर्ण फुगलेला गोळा आकारमानाने दुप्पट होतो, आणि बोटाने दाबल्यास बोटाचा ठसा पटकन वरती येत नाही.) गोळा अलगद उचलून तापलेल्या भांड्यात घाला. फूग जायला नको. आणि हाताला चटकाही बसायला नको. गोळा तसा मऊ असतो. थोडा वेडावाकडाच पडेल. हरकत नाही.
८. भांडे झाका! झाकण घुमटाकार हवे, म्हणजे ब्रेड भाजता-भाजता फुगू शकेल. झाकलेल्या स्थितीत पाव २०-३० मिनिटे ओव्हनमध्ये भाजा. मग झाकण काढून २० मिनिटे ओव्हनमध्ये भाजा. पावाचा रंग खरपूस तांबूस झाला पाहिजे. पाव बाहेर काढा आणि जाळीवरती ठेवा. भांड्यात किंवा कट्ट्यावर पाव थंड करायला ठेवला, तर तो घामेजतो. खलचा भाग लिबलिबीत होते. तसे व्हायला नको.
९. पाव अर्धा-एक तास तरी कापायला घेऊ नये. कारण आतमध्ये तो अजून शिजतच असतो. एकदा का निवला, की पाव खायला तयार आहे.
टीपा :
१. हा चविष्ट पाव "मोठ्या माणसांकरिता" आहे. लहानपणी मला मऊमऊ पांढरेफटक पाव आवडत. पावाच्या भाजक्या कडा "कडक" म्हणून आवडत नसत. भाजलेल्या कडांची गंमत असते, पाव चावताना मऊ नव्हे तर मांसल लागला पाहिजे, अशा आवडी मला मोठेपणी आल्या.
२. गव्हाच्या कोंड्यामध्ये उत्कृष्ट पौष्टिक तेल असते. म्हणून या पावामध्ये वेगळे तेल-लोणी घालायची काहीएक गरज नाही. परंतु याच तेलामुळे हे पीठ मैद्यापेक्षा लवकर खवट होते. महिने-महिने साठवायचे असेल, तर १००% गव्हाचे पीठ हवाबंद डब्यात घालून फ्रीझरमध्ये ठेवावे (फ्रीझमध्ये नव्हे).
प्रतिक्रिया
26 Mar 2010 - 3:09 am | राजेश घासकडवी
क्रस्ट देखणी आहे. लवकरच करून बघेन. अमेरिकेत पोळ्या करण्यासाठी कणीक तयार मिळते. ती या पावासाठी चालेल का? (चालत नसावी असं वाटतंय...) भारतातसुद्धा जो गहू आपण घरी पोळ्या करण्यासाठी वापरतो त्यात ग्लुटेन कमी असतं का? (व्हाईट व्हीट म्हणतात तो हाच गहू का?)
छोटा चमचा म्हणजे टीस्पून (सुमारे ५ मिली) असं गृहित धरतो.
राजेश
26 Mar 2010 - 3:25 am | अक्षय पुर्णपात्रे
छानच दिसत आहे. वाचनखूण साठवली आहे. कधी करण्याची इच्छा होईल ते मात्र माहीत नाही.
26 Mar 2010 - 4:53 am | चित्रा
मी करते तो गव्हाचा ब्रेडही बरा होतो, पण घरचे कोणी खात नाहीत :(
पण हा वरचा ब्रेड छान दिसतो आहे. असा करून बघीन.
26 Mar 2010 - 8:22 am | विसोबा खेचर
जबराच दिसतो आहे पाव! :)
26 Mar 2010 - 9:40 am | आशिष सुर्वे
डोळे भरून 'पाव'ले!!
======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
26 Mar 2010 - 10:07 am | नितिन थत्ते
छान फोटो आणि पाककृती.
आधी १००% गव्हा.....भाव असे वाचले होते.
नितिन थत्ते
(प्रूफरीडर संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)
26 Mar 2010 - 10:42 am | समंजस
छान दिसतोय पाव!!!
(केव्हा जमणार हे सगळं आपल्याला :? )
26 Mar 2010 - 10:50 am | नील_गंधार
व्वा सुंदर आहे पाककृती.
एक शंका : मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये हा पाव बनविता येतो का?
नील.
26 Mar 2010 - 12:15 pm | स्वाती दिनेश
धनंजय,
मस्त आहे पाकृ. नक्की करुन बघेन आणि सांगेन कसा झाला ते.
१ शंका: ओव्हन मध्ये भाजायला ठेवताना झाकण ठेवायलाच हवे का ? आणि काचेच्या अवनप्रूफ भांड्याऐवजी बेकिंग ट्रे मध्ये किवा केक मोल्ड मध्ये ठेवला तर कसे?
स्वाती
26 Mar 2010 - 1:28 pm | दिपाली पाटिल
क्रस्ट खरंच देखणी आहे. लवकरच करून बघेन. हा ब्रेड च्युइ आणि हार्ड क्रस्ट होतो कां?
दिपाली :)
26 Mar 2010 - 7:49 pm | रेवती
दिपालीसारखेच म्हणते आणि विचारते!
वेगळीच रेशिपी!
रेवती
26 Mar 2010 - 10:28 pm | प्रभो
लै भारी
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
27 Mar 2010 - 2:02 am | धनंजय
@राजेश घासकडवी - पोळ्यांची कणीक चालेल (पण धावणार नाही) असे वाटते. पोळ्यांच्या कणकेतून थोडा कोंडा काढून घेतात असे वाटते. लालच्या ऐवजी पांढरे गहू वापरले तरी चालेल. पांढरा गहू सुद्धा "हार्ड" असला तर ग्लूटेन जास्त असते.
अमेरिकन गहू साधारणपणे लाल असतो, आणि पांढरे पीठ ब्लीच केलेले असते. मुळात सोनेरी-पांढरा गहू मिळतो, तो ब्लीच करावा लागत नाही :
येथे भारतीय गव्हांबद्दल अधिक माहिती येथे (पीडीएफ) मिळेल.
वरच्या दुव्यावर असे दिसते की पाव बनवण्यासाठी हार्ड-ब्रेड-व्हीट भारतात वापरतात. माझ्या मते खपली गव्हाचासुद्धा चांगला पाव बनेल. पण माहीत नाही.
@नील-गांधार : सामान्यपणे मिळणार्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पाव बनवता येत नाही. बनवलेला पाव गरमही करता येत नाही (त्यापेक्षा तव्यावर भाजावा.) परंतु "कन्व्हेक्शन/मायक्रोवेव्ह ओव्हन" मध्ये ब्रेड भाजता येतो असे ऐकले आहे (दुवा).
@स्वाती दिनेश : झाकण ठेवल्यामुळे वाफ दाबून राहाते. भाजण्याच्या काळाच्या सुरुवातीला दमटपणा खूप असला, तर छान क्रस्ट येतो. काही पारंपरिक बेकर मळलेला गोळा ठेवता-ठेवता ओव्हनमध्ये पाणी ओतून वाफेचा भपकारा तयार करतात (त्यासाठी ओव्हनमध्ये रिकामे भांडे आधीच ठेवलेले असते). काही लोक ब्रेड भाजायला ठेवल्यानंतर पाच मिनिटांनी त्यावर कुंचल्याने पाणी लावतात. ही झाकण ठेवण्याची युक्ती मला त्यापेक्षा सोपी वाटली.
बेकिंग ट्रे किंवा तत्सम भांड्यात ठेवायला काही हरकत नाही. केक मोल्ड हा बहुतेक वेळा फार पातळ असतो. गरम जड भांड्यात फुगलेला गोळा घातल्यामुळे त्याला वरतून-खालतून सगळीकडे क्रस्ट उत्पन्न झाला. शिवाय ब्रेड भांड्याला मुळीच चिकटला नाही. मागे एकदा असा ब्रेड मी अॅल्युमिनमच्या चौकोनी ब्रेड-मोल्ड मध्ये घातला होता. कडांना चिकटला, आणि खालच्या बाजूच्या क्रस्टमध्ये मजा नव्हती. (म्हणून आणखी एकदा ब्रेड-टिनमध्ये केळीचे पान घालून मग फुगवलेले पीठ घातले. केळीच्या पानाचा वास ब्रेडला लागलेला मला आवडतो. नसेल आवडत त्यांनी पार्चमेंट पेपर वापरावा.)
@दिपाली व रेवती
हार्ड क्रस्ट आणि च्युई होतो!
27 Mar 2010 - 5:43 pm | स्वाती दिनेश
झाकणाचे कारण कळले, केक मोल्ड न वापरता बेकिंग ट्रे किवा काचेचे अवनप्रूफ जड भांडे वापरेन आणि कसा झाला ते कळवेन.
धन्यवाद,
स्वाती