सदर लेखन संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे.
-शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक.
काही भारतीय शब्दांची मला लक्षात आलेली व्युत्पत्ती वर येथे चर्चा करण्याचा मानस आहे, मला जे वाटते आहे ते कदाचित चूक असू शकेल तरी यावर जर कोणी जास्त प्रकाश टाकू शकले तर हवे आहे.
१. जपान ला गेल्यावर सुरवातीला जे शब्द शिकलो त्यात पान (Pan) हा शब्द होता, त्याचा अर्थ पांव! (Bread). एकतर मी शाकाहारी असल्याने पांवावर जास्तच भर होता आणि शब्द आपल्या पांव च्या जवळ असल्याने लवकर लक्षात राहिला. थोडा विचार केल्यावर लक्षात आले की मराठी पांव (पा वर अनुस्वार आहे. ) चे रोमन लिपीत Panv किंवा Paanv होऊ शकेल, आणि मराठी पांव आणि जपानी पान यांची व्युत्पत्ती कोणतातरी एकच शब्द असू शकेल. पुढे असे कळाले की ब्रेड जपान मध्ये पोर्तुगीज लोकांनी आणला. आणि "पांव" आणि पान हे शब्द एकाच म्हणजे "pa~o" या शब्दावरून आले आहेत. आहे की नही गंमत एकमेकांपासून हजारो मैलावर असलेल्या दोन पूर्णपणे भिन्न भाषा बोलणार्या देशात असे सारखे उधार शब्द आहेत.
२. इंडोनेशियात आल्या आल्या एक पाटी सारखी समोर येत होती, "सलामत नाताल डॅन ताहून बारू! " (मेरी ख्रिसमस अँड न्यू इयर! ) सलामत नाताल लगेच समजले कारण नाताळ शब्द. पण त्यामुळे विचारांना चालना मिळाली, ह्या नाताल आणि नाताळ शब्दांची व्युत्पत्ती शोधून काढायची! इतक्या दूरच्या देशात, जो धर्म मूळचा त्या त्या देशातील नाही त्यासाठी इतके साधर्म्य असलेले शब्द कसे काय निर्माण झाले असावेत? आता इंटरनेट मुळे यावेळी शोध सोपा गेला! दोन्ही शब्द खरेतर खुद्द युरोप मध्ये ख्रिसमस साठी जो शब्द आधी वापरला जात होता त्या "Nativity" या शब्दावरून आला आहे! "church of the Nativity -bethelhem " येसू ख्रिस्ता चा जन्म बेथेलहेम येथे झाला होता. nativity म्हणजे Birth. जन्माचा सोहळा म्हणून नाताळ!
३. गिरजाघर - चर्च साठी हिंदी शब्द, गेरीजा (Gerija) चर्च साठी बहासा शब्द! या शब्दाची व्युत्पत्ती मात्र मला अजून सापडली नाही. कोणीतरी मदत करा!
प्रतिक्रिया
26 Mar 2010 - 2:43 am | अरुण मनोहर
आणखी एक-
मराठी- वाफ (Vap)
मलेशियन- वाप
ईंडोनेशियन- उआप
पोर्तुगीज- Vapor (शेवटचे न उच्चारल्यास व्हाप)
**
मराठी- साखर
रशियन - CAXAP
(रशियन Cचा उच्चार 'स', Xचा ख सारखा, Pचा र)
पोर्तुगीज- ACUCAR
26 Mar 2010 - 8:16 am | नितिन थत्ते
पूर्वी मला मराठीत येशू का म्हणतात हा प्रश्न पडत असे.
पण नंतर Jesus मधील शेवटच्या स चा उच्चार न केल्यास Jesu होते आणि जगातल्या बहुतेक भाषांमधल्या ज आणि य मधल्या गोंधळामुळे जेसू/येशू होते हे समजले.
त्यानंतर जोशुआ, जेव्होवा हे संबंधित शब्दही कळले.
अरबी भाषेत अंड्याला बैजा (जवळमधला ज- नुक्तावाला) म्हणतात.
नितिन थत्ते
(प्रूफरीडर संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये.)
26 Mar 2010 - 9:58 am | हुप्प्या
कँडी म्हणजे इंग्रजीत गोड गोळ्या, चॉकलेटांना म्हणतात.
खंड म्हणजे श्रीखंडातले वा आम्रखंडातले हे गोड ह्या अर्थी असावे.
कलाकंद, गुलकंद, काजूकंद हे फारसीतून आले. त्यातल्या कंदाचाही अर्थ गोड पदार्थ असा आहे. हे सगळे शब्द निगडित असावेत.
तुफान आणि टायफून हे अजून एक जोडपे. ह्यातले कुठले मूळ आणि कुठली नक्कल ते माहित नाही.
आफत आणि आपत्ती असेच एक जोडपे.
केंद्र, सेंटर, केर्न (जर्मन) हे शब्दही जवळपासचे.
नारिंग (संस्कृत) नारांज (स्पॅनिश) आणि ऑरेंज (इंग्रजी) ह्यातले नारिंग हे मूळ आणि बाकी अपभ्रंश.
26 Mar 2010 - 10:07 am | निखिलचं शाईपेन
ब्रेडः
लाटिन - पानिस
स्पॅनिश - पान
बरेचसे शब्द लाटिन वा संस्कृत पासून आलेले वाटतात.
26 Mar 2010 - 3:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
र्न्जक लेखन आनी प्रतीसाद.
अदिती
अवांतरः सदर लेखन संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे.
शुद्धलेखन कसं काय ब्वॉ सुधारणार?
26 Mar 2010 - 4:10 pm | सुनील
मराठी आणि जर्मन ह्या दोन्ही भाषांत अननस हाच शब्द आहे (त्याच अर्थाने!).
अवांतर - अननसाचे शात्रीय नाव आहे Ananas comosus
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Mar 2010 - 11:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुनीलराव, तुमच्या 'शात्रीय'ला नाही वाट्टं पॉलिश झालं! ;)
अदिती
26 Mar 2010 - 7:18 pm | धनंजय
पोर्तुगीज शब्द igreja - इग्रेज (शेवटचा 'अ' पूर्ण उच्चारायचा) किंवा इग्रेजा
त्यावरून "गिरिजा" "गेरिजा" हे उधार-शब्द
पोर्तुगीज दर्यावर्दी हे अन्य युरोपियनांच्या आधी हिंद-महासागरात पोचले, आणि व्यापार त्यांनी सुरू केला. ख्रिस्ती धर्माशी आणि सामान्य युरोपियन वस्तूंसाठी बहुतेक शब्द पोर्तुगीजमधून रुळलेले आहेत.
26 Mar 2010 - 7:26 pm | हुप्प्या
कित्येक देशांची नावे -इ-स्तान ने संपतात. पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, बलुचिस्तान (अजून देश नाही बनला!), खालिस्तान (बहुधा बनणार नाही!)
तर इ-स्तान आणि संस्कृतमधले स्थान हे खूप सारखे आहे.
27 Mar 2010 - 10:54 am | इन्द्र्राज पवार
जपानी माणूस पावाला पान म्हणतो हे वाचून गम्मत वाटली आणि त्याचबरोबर पु.ल. नी याच पद्धतीने फ्रेंच भाषेतील विलक्षण उच्चाराबाबत केलेली टिपणी आठवली. त्यांनी लिहिले होते की, "फ्रेंच ही मोठी फसवी भाषा आहे. लिहायचे जोगळेकर आणि वाचायचे मात्र सहस्त्रबुद्धे !"