मराठी माणूस (शिळ्या कढीला ऊत!)

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
17 Mar 2008 - 11:26 am

मराठी माणूस
`मराठी माणूस', `मराठीची अस्मिता' असे शब्द आजकाल हरेक मराठी माणसाच्या तोंडावर आहेत. मराठीच्या भवितव्याची चिंता तर राज्यकर्त्यांपासून सामान्य मराठी माणसाला छळते आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेत मराठी जपण्यासाठी ५० लाखांचे (अनु)दानही दिले. मराठी जपण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा हव्यात, इ़ग्रजीचे आक्रमण थोपवावे, वगैरे चिंताग्रस्त विचारही उमटत असतात. पण मराठी माणसाचं पहिलं लक्षण कोणतं?

घरात एक मूल जन्माला आलं की थोरामोठ्यांच्या गर्दीनं भरलेलं घर खऱ्या अर्थानं भरून जातं.. प्रत्येक घरात मुलाच्या आगमनाचा आनंद अवर्णनीयच असतो... वाढतावाढता मूल आपल्या घराचे संस्कार उचलत असतं.

... घरातलं मूल खाणाखुणा ओळखून प्रतिसाद द्यायला लागतं, तेव्हा अवघ्या घराला आनंदाचं भरतं येतं. बाळाच्या प्रत्येक `पहिल्या कृती'चं कौतुक कसं करू, अन काय, असं प्रत्येकाला होऊन जातं... बाळ पहिल्यांदा हासलं, बाळानं खेळणं उचललं, बाळ टाळ्या वाजवायला लागलं... सगळ्याचा एक आगळा आनंद घराच्या भिंती ओलांडून ओसंडत असतो... बाळ टाळ्या वाजवायला लागलं, की घरातल्या आजी-आजोबांपासून, ते बाळाच्या मोठ्या भावंडापर्यंत सगळेच नकळत विठूनामाचा गजर सुरू करतात.... ज्या घरात हे अजूनही सहजपणे होतं, ते मराठी माणसाचं घर... तिथली माणसं इंग्लिश मिडीयममधून शिकलेली असली तरी...

खूप वर्षं झाली... आमच्या कोकणातल्या गावात आमच्या वर्गात मुंबईच्या इंग्लिश शाळेत शिकलेला एक मुलगा दाखल झाला. तेव्हा आम्हाला इंग्लिशची भीती वाटायची. लहानश्या त्या गावात, इंग्लिश जाणणारा एखाददुसराच कुणीतरी असायचा. अशा गावात, मुंबईच्या शाळेत, इंग्लिश शिकलेला मुलगा वर्गात आल्यामुळे आम्हा मुलांमध्ये त्याचा भाव एकदम वधारलेला होत. त्याच्याशी दोस्ती करण्यासाठी आमची स्पर्धा असायची... तोही, मुंबैच्या शाळेतल्या गमती सांगायचा, तेव्हा आम्ही भारावल्यासारखे कान देत असू...

आमचे गणिताचे सर त्यांच्या तासाला फळ्यावर एक गणित लिहीत, आणि वर्गातल्या एखाद्या मुलाला बोलावून ते सोडवायला सांगत. बकासुराच्या भोजनासाठी जाण्याची पाळी असलेल्या माणसासारखी आम्हा प्रत्येकाची अवस्था असायची त्या तासाला... तर, एका दिवशी सरांनी फळ्यावर गणित लिहिलं आणि या मुंबईकराला खूण केली... तो दिमाखात उठलाही... पण जागेवरून हलला नाही. सरांनी खुणेनच ‘काय’ म्हणून विचारलं, तेव्हा तो म्हणाला, ‘सर, मला हे गणित सोडवता येणार नाही. माझं इंग्लिश मीडियम होतं...’

सरांनी गणित पुसलं, आणि तो विजयी मुद्रेनं खाली बसला... आम्ही सगळेजण त्याच्याकडे पाहात होतो. सरांकडे आमचं लक्षच नव्हतं. काही वेळानं सरांनी त्याला पुन्हा उभं केलं, तेव्हा आम्ही भानावर आलो... फळ्यावर मघाच्याच गणिताचे आकडे आणि अक्शरं होती... फक्त रोमन लिपीत!... आता तो घामाघूम झाला होता. ‘नाही येत’... एवढच काहीतरी बोलून तो मटकन खाली बसला. आम्ही पुन्हा त्याच्याकडे पाहात होतो.. पण तोपर्यंत आम्हाला वाटणारी मराठीची लाज पळाली होती.

दुसरा किस्साहि असाच आठवणीत आहे. आमच्या गावात नव्यानच कॊलेज सुरु झालं होतं. कोकणात तेव्हा शिवाजी विद्यापीठ म्हणजे, `मराठमोळं’ विद्यापीठ होतं. आम्ही कॊलेज एन्जॊय करत होतो, अन अचानक सरकारी फतवा आला. आमचं कॊलेज मुबई विद्यापीठाला संलग्न झालं होतं. पुन्हा इंग्लिश मीडियमच्या भीतीनं आम्ही धास्तावलो. काही शिक्षकांचीही तीच अवस्था होती. पण आम्हाला चॊईस होता. ते एक बरं होतं. एका शिक्षकानं आम्हाला निवडीचा सल्ला दिला... ते म्हणाले, `मी मराठी मीडियम घेऊन एम. कॊम झालोय. माझा एक मित्र इंग्लिश मीडियम घेऊन एम. कॊम झालाय. मी आज एका चांगल्या कॊलेजमध्ये लेक्चरर आहे, आणि तोही कुठेतरी लेक्चररच आहे.’... आम्हाला खूप बरं वाटलं, आणि सहाजिकच, आम्ही मराठी मीडियमचा पर्याय निवडला...

आता वाटतं, आमचा तेव्हाचा तो निर्णय खरच मराठी `जगवण्या'साठी होता? का ती आमच्या पराभवच्या भीतीची प्रतिक्रिया होती? मराठी माणूस म्हणून मराठीच्या भविष्याची चिंता करताना, अशाच एखाद्या भीतीचं अनामिक ओझं तर आपण वागवत नसू ना? ते झुगारून देता येईल, असा विश्वास मराठी घरात रुजला, तर मराठमोळ्या घरांवरचं मोठ्ठं दडपण कमी होईल.

टाळ्या वाजवायला लागलेल्या बाळाच्या प्रत्येक टाळीसोबत विठूनामाचा गजर घुमायाला काय हरकत आहे?

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

18 Mar 2008 - 2:42 am | विसोबा खेचर

टाळ्या वाजवायला लागलेल्या बाळाच्या प्रत्येक टाळीसोबत विठूनामाचा गजर घुमायाला काय हरकत आहे?

वा! हे वाक्य फार आवडलं!

बाकी लेखही चांगला आहे...

आपला,
(मराठी) तात्या.

सुधीर कांदळकर's picture

18 Mar 2008 - 5:00 am | सुधीर कांदळकर

बाळ टाळ्या वाजवायला लागलं, की घरातल्या आजी-आजोबांपासून, ते बाळाच्या मोठ्या भावंडापर्यंत सगळेच नकळत विठूनामाचा गजर सुरू करतात

खरेच हे मराठमोळे वैशिष्ट्य आहे.

अकृत्रिम भाषेमुळे वाचायला मजा आली.

अभिनंदन. धन्यवाद.

अवलिया's picture

18 Mar 2008 - 2:47 pm | अवलिया

आता वाटतं, आमचा तेव्हाचा तो निर्णय खरच मराठी `जगवण्या'साठी होता? का ती आमच्या पराभवच्या भीतीची प्रतिक्रिया होती? मराठी माणूस म्हणून मराठीच्या भविष्याची चिंता करताना, अशाच एखाद्या भीतीचं अनामिक ओझं तर आपण वागवत नसू ना? ते झुगारून देता येईल, असा विश्वास मराठी घरात रुजला, तर मराठमोळ्या घरांवरचं मोठ्ठं दडपण कमी होईल.

अमेरीकेत नोकरी करायची ... हे साधारणतः १०० टक्के सदाशिव पेठी... ६०-७० इतर शहरातील ... व साधारणतः १०-१५ टक्के उर्वरीत मराठी माणसांचे ध्येय वा इच्छा असते
अर्थात सगळेच ते पुर्ण करतात असे नाही

अमेरीकेत जावुन गो-यांचे अंतर्वस्त्रे धुणारी मंडळी इकडे येवुन जो तमाशा करतात त्यामुळे आमचा येथील मराठी बांधव न्युनगंडाने स्वतःला कमी लेखुन आपल्याला शक्य असलेल्या गोष्टी करायच्या सोडुन पळत्याच्या मागे लागतो

त्यातच भर म्हणजे संगणकाधारीत सेवा पुरवठादारांनी जो नंगा नाच ( अक्षरशः नंगानाचच पटत नसेल तर गुगल वर पुना बीपीओ न्युड गर्ल असा शोध घ्या) चालवला व फक्त इंग्रजी फाड फाड बोला अक्कल नसली तरी चालेल हाजारो रुपये पगार ... त्यामुळे पुन्हा न्युनगंड...

पण निराश होवु नका

अमेरीकेची वाट लागत आहे

समाज रचनेत होणारा बदल नीट बघा

१० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या)
व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या)

(ज्योतिषी) नाना

मनस्वी's picture

18 Mar 2008 - 3:02 pm | मनस्वी

१० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या)
व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या)

असे खरोखर झाले तर मजाच आहे.. प्रचंड टाळ्या..

मनस्वी

बेसनलाडू's picture

19 Mar 2008 - 10:14 am | बेसनलाडू

१.सर्विस प्रोवायडर्स = बीपीओ हे समीकरण नाही; त्यात इतरही बरेच काही अंतर्भूत आहे, याचा विचारही करून पहा, ही नम्र प्रार्थना.
२. हे वाचा.
(प्रार्थनार्थी)बेसनलाडू

प्रभाकर पेठकर's picture

19 Mar 2008 - 12:35 pm | प्रभाकर पेठकर

श्री. दिनेश५७,
खरोखर 'मराठी माणूस' ह्या विषयावर पुन्हा पुन्हा लिहीणे म्हणजे शिळ्या कढीला उत आणणेच म्हणावे लागेल. पण तोही एक अस्सल मराठी पणाच आहे. ढिगभर चर्चा करायची ....कृती शून्य.
राजकिय पक्षांनी (मुळात शिवसेनेने) मराठी माणसाच्या मनांत 'तू भूमीपुत्र आहेस' हे सारखे सारखे सांगून त्याच्या तथाकथित 'हक्कांची' जाणीव त्याला करुन दिली. काही प्रमाणात त्याला शेफारुन ठेवलं. हक्कांसाठी भांडायला शिकवलं. तो भांडायला (लगेच) शिकला आणि भांडखोर म्हणून बदनामही झाला. परंतु, मराठी माणसाला घरच्यांनी, शिक्षकांनी, मित्रांनी, साहित्यिकांनी, राजकारण्यांनी स्वउन्नतीसाठी काय करावे, स्वतःमध्ये काय काय बदल करणे आवश्यक आहे, रोजच्या व्यवहारातील स्पर्धेत टिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी कुठली मुल्ये जोपासावीत, कुठली कौशल्ये आत्मसात करावीत, आपल्या उन्नतीच्या आड येणारे कुठल्या रुढींचे, विचारांचे जोखड फेकून द्यावे हे नाही शिकवले. कोणी शिकवले नाही म्हणून मराठी माणूसही ते शिकला नाही.

कौशल्याचा, आत्मविश्वासाचा अभाव, संकुचित क्षेत्रात वावरण्याची सवय, अल्पसंतुष्ट स्वभाव, पारंपारिक संस्कारांत न झालेले बदल ह्या सर्व गोष्टी मराठी माणसाच्या 'मागे' राहण्यात आहेत.

वाहत्या जगात प्रवाहा बरोबर राहण्यासाठी स्वतःमध्ये आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषा जरूर आवश्यक आहे पण ते हुशारीचे द्योतक नाही. अमेरिकेत नोकरी मिळविणे चांगलेच आहे पण ते 'स्वउन्नतीचे' परिमाण नाही.

वृत्तीतील सकारात्मक बदल, कुठल्याही न्यूनगंडाचा परित्याग, मनःचक्षू उघडे ठेवून सामाजिक बदलांचे आकलन आणि स्पर्धेला न भिता तोंड देण्याची सवयच मराठी माणसाला पुढे नेईल.

१० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या)
व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या)

असे खरोखर झाले तर मजाच आहे.. प्रचंड टाळ्या..

हा विचार स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखा आहे.
अमेरिकन क्लायंट च्या कामावर चालण्यार्‍या कंपनीत काम करणारा...
आणे त्यातून देशाला परकिय चलन मिळवुन देणारा प्रामाणीक आय टी हमाल
.............................................................विजुभाऊ

फार चांगली बाब नाही. कारण आता जगाची अशी एक अर्थव्यवस्था होऊ पहाते आहे. एकीकडचे पडसाद दुसरीकडे तितक्याच तीव्रतेने उमटतात हे आपण सर्वच स्टॉकमार्केटच्या माकडउड्यांवरुन जाणतो. त्यामुळे अमेरिका डुबली तर छान, यूरोप डबघाईला आला तर त्याहून वा वा! म्हणणे कोतेपणाचे ठरेल. आज तिथे असलेला जाळ उद्या इथे येऊ शकतो हे विसरु नये. तेव्हा 'एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ' हेच शेवटी खरे!

चतुरंग

फार महत्त्वाचे आहे.

भारतीय सॉफ्टवेअर तज्ञ फक्त कारागिरी करताहेत. मूलभूत संशोधनाची आपल्याकडे वानवा आहे. आयुकामधील संशोधनाच्या ६ पैकी ४ जागा गेल्या वर्षी रिक्त होत्या. हे खरे असेल तर आपण पाहातो ती सूज आहे. सौष्ठव नव्हे.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.