आमची प्रेरणा.. सुरेश भटांची गझल देखावे बघण्याचे वय निघून गेले
आमची शिफारस.. विडंबन वाचण्यापूर्वी मूळ गझल अवश्य वाचावी.
जे खावे पचण्याचे वय निघून गेले
पैजेवर चरण्याचे वय निघून गेले
तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता
हात पुढे करण्याचे वय निघून गेले
बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे
तास तास बसण्याचे वय निघून गेले
खातांना रोज मिसळ, ओतुन कट लालजाळ
नेत्रनाक पुसण्याचे वय निघून गेले
आम्लेटे, पाव नि बन, पीत चहा रातंदिन
इराण्यास भजण्याचे वय निघून गेले
उडप्याच्या इडल्या अन्, खरपूस ते डोसे पण
एकसाथ हाणण्याचे वय निघून गेले
दुरुनी ये वास जरी, गरम भजी कोण करी
शोध घेत फिरण्याचे वय निघून गेले
खुणाविले `पिझ्झा'ने,`चायनीज' दे आव्हाने
हाय, पुरे पडण्याचे वय निघून गेले
प्रतिक्रिया
16 Mar 2008 - 9:28 pm | धनाधीश
दुरुनी ये वास जरी, गरम भजी कोण करी
शोध घेत फिरण्याचे वय निघून गेले
खुणाविले `पिझ्झा'ने,`चायनीज' दे आव्हाने
हाय, पुरे पडण्याचे वय निघून गेले
छान !!
मस्त आहे विडंबन !! मूळ गझलही छान आहे.
16 Mar 2008 - 9:53 pm | प्रा सुरेश खेडकर
आवडली ही खमंग कविता.
16 Mar 2008 - 10:29 pm | इसम
अविनाशजी,
जे खावे पचण्याचे वय निघून गेले
पैजेवर चरण्याचे वय निघून गेले
जे वाचले ते उमजण्याचे वय खुणावते आहे
ज्ञानोबा सार्त्र पचवणे, अजूनी बाकी आहे
तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता
हात पुढे करण्याचे वय निघून गेले
काम कवडीचे न करण्याचे वय खुणावते आहे
निवांत पेन्शन घेणे, अजूनी बाकी आहे
बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे
तास तास बसण्याचे वय निघून गेले
अनुभवी नजरेने घेणे, कट्ट्यावर मित्रांसवे
पुन्हा 'निर्मळ' नेत्रसुख, अजूनी बाकी आहे
-एक इसम
16 Mar 2008 - 10:58 pm | नन्दु
तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता
हात पुढे करण्याचे वय निघून गेले
दुरुनी ये वास जरी, गरम भजी कोण करी
शोध घेत फिरण्याचे वय निघून गेले
वा !!! सुरेख आणि सफायि दार विडंबन
मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु
16 Mar 2008 - 11:25 pm | प्राजु
बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे
तास तास बसण्याचे वय निघून गेले
खातांना रोज मिसळ, ओतुन कट लालजाळ
नेत्रनाक पुसण्याचे वय निघून गेले
हे मस्तच...
- (सर्वव्यापी)प्राजु
17 Mar 2008 - 5:43 am | पिवळा डांबिस
तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता
हात पुढे करण्याचे वय निघून गेले
क्या बात है! आम्ही स्वतः तंबाखू खात नाही, पण भावना जाणू शकतो.:))
आम्ही म्हणू,
नेहेमीच्या वेटरने, "काय पिणार?" पुसता,
त्याच्यावर चिडायचे वय निघून गेले...
-डांबिसकाका
17 Mar 2008 - 8:33 am | सृष्टीलावण्या
पूर्वी एका ठिकाणी लिहिले होते "अविनाश ओगले - मद्य = शून्य भोपळा". पण माझे हे शब्द (बिनशर्त) सपशेल पाठी.
तुमचे विडंबन मूळ काव्यापेक्षा जास्ती छान. म्हणून तुमच्या काव्यप्रतिभेला कुनिर्सात.
>
>
आत आपुल्या झरा झुळझुळे, निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...
17 Mar 2008 - 9:13 pm | अविनाश ओगले
पूर्वी एका ठिकाणी लिहिले होते "अविनाश ओगले - मद्य = शून्य भोपळा". पण माझे हे शब्द (बिनशर्त) सपशेल पाठी.
तुमचे विडंबन मूळ काव्यापेक्षा जास्ती छान. म्हणून तुमच्या काव्यप्रतिभेला कुनिर्सात.
मद्य या विषयावर जास्त लिहितो हे मान्य.. पण अन्य विषय वर्ज्य आहेत, असे नाही. माझी मि.पा. वरची अन्य विडंबने व कविता अवश्य वाचाव्यात ही विनंती. विषेशतः
चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी
संथ चालते मालिका ही
18 Mar 2008 - 12:44 pm | चित्तरंजन भट
'देखावे बघण्याचे' ही कविता आहे. गझल नाही. एकंदर विडंबन फार सुमार आहे. पहिली ओळ आवडली.
सृष्टीलावण्य ह्यांनी "तुमचे विडंबन मूळ काव्यापेक्षा जास्ती छान" हे लिहिलेले वाचून अतिशय हसू आले. आपल्या मातृभाषेतलेच चांगले काव्य कुठले हे कुणाला कळत नसेल तर त्याला संस्कृतकाव्यातले काही कळत असेलसे वाटत नाही, असे मी म्हणणार नाही. एका प्रतिसादावरून कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. असो. एखाद्याला गुळाची चव नसली म्हणून काय झाले! अखेर पंसद अपनी अपनी, खयाल अपना अपना!
18 Mar 2008 - 12:47 pm | विसोबा खेचर
आपल्या मातृभाषेतलेच चांगले काव्य कुठले हे कुणाला कळत नसेल तर त्याला संस्कृतकाव्यातले काही कळत असेलसे वाटत नाही, असे मी म्हणणार नाही.
हा हा हा! हे बाकी लै भारी! :)
तात्या.
18 Mar 2008 - 6:11 am | सुधीर कांदळकर
अशीच विडंबने येऊ द्यात.
बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे
तास तास बसण्याचे वय निघून गेले
चणे खाणे झकास.
मजा आली. धन्यवाद.
18 Mar 2008 - 10:03 am | बेसनलाडू
मागे कुणी विद्वानांनी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पसायदानाचे विडंबन, झालंच तर जन गण मन चे विडंबन यांचीच आता मिपावर प्रतीक्षा आहे :)
माझे या रचनेवरचे प्रामाणिक मत -
१. तुमच्या इतर रचनांच्या तुलनेत तितकी उजवी रचना वाटली नाही; मात्र विषय मजेशीर आणि सुसह्य आहे.
२. विडंबनासाठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान या ठिकाणी जरा सुटले, असे वाटते.
असो.
पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा.
प्रामाणिक मत; राग नसावा.
(प्रामाणिक)बेसनलाडू
18 Mar 2008 - 12:20 pm | विसोबा खेचर
खातांना रोज मिसळ, ओतुन कट लालजाळ
नेत्रनाक पुसण्याचे वय निघून गेले
वा, क्या बात है!
आपला,
(वयस्कर) तात्या.
18 Mar 2008 - 7:58 pm | अविनाश ओगले
या विडंबनावर बर्यावाईट प्रतिक्रिया देणार्या सर्वांचे आभार!
काही प्रश्न.
१.'देखावे बघण्याचे' ही कविता आहे. गझल नाही. (चित्तर)
ही गझल कशी नाही हे जरा स्पष्ट कराल काय? मी ती गझल आहे या समजूतीत आहे.
२. विडंबनासाठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान या ठिकाणी जरा सुटले, असे वाटते.
(बेसनलाडू)
एखाद्या कवितेचे विडंबन म्हणजे त्या कविचा अथवा कवितेचा अनादर किंवा चेष्टा नसते अशी माझी समजूत आहे. असे मानल्यास विडंबन लिहिता येणे अशक्य होईल. वरील विडंबनात असे काही झाले आहे का? कृपया `विडंबनासाठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान' ही कल्पना अधिक स्पष्ट करावी.
सर्व सदस्यांनी मोकळेपणाने या चर्चेत मते मांडावीत. एक चांगली चर्चा घडेल. मला टिकेचे वावडे नाही.
18 Mar 2008 - 3:39 pm | बेसनलाडू
नुसते दात काढून हसायला लावणारे असे नाही, तर त्याहीपेक्षा काहीतरी जास्त असे शाब्दिक, मार्मिक व्यंगचित्र अशी माझी भाबडी समजूत आहे. मूळ कवितेचा त्यात अनादर नसावाच, चेष्टा नसावीच. तुमच्या इतर विडंबनांमध्ये किंवा येथेही ती झाली आहे, असे मी म्हटलेले नाही, म्हणणारही नाही. पण मूळ रचनेतली ताकद विडंबनातही असेल, तर विडंबन खुलते, असे मला वाटते. वानगीदाखल देखावे बघण्याचे वय निघून गेले आणि भातुकलीच्या खेळामधली पाहू. दोन भिन्न रचना, भिन्न ताकदीच्या रचना. पाडगावकरांची समजण्यास अधिक सोपी, त्यामुळे तिच्यातले भाव, ताकद सहज समजण्याजोगी. त्यामुळे 'चाळीमधल्या खोलीमधली' हे तुमचे विडंबनही साजेसे झाले, खुलले. मात्र देखावे बघण्याचे ची केस वेगळी आहे. पहिल्या वाचनात किंवा दोन वाचनांत कळेल, पूर्ण समजेल, अशी ती रचना नाही. ओळीओळींमधून अर्थाचे अनेक पदर, भावांचे हजार कंगोरे ही दादांच्या जवळपास सगळ्याच रचनांची वैशिष्ट्ये आहेत. ती येथेही आहेत. साहजिकच विडंबनातील सामान्यताही जाणवते आहे (जरी विडंबनाचा विषय वेगळा असला तरी). विडंबनासठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान, यातून मला हेच सुचवायचे आहे की आधी अशा रचनेची ताकद अजमावणे आवश्यक आणि त्यामुळे पर्यायाने ती रचना कोणी लिहिली आहे, हे पाहणेही ओघाओघाने येतेच. म्हणूनच मनोगत, मिसळपाव किंवा इतर संकेतस्थळांवरील हौशी किंवा सराईत गझलकारांच्या, कवींच्या रचना घेऊन लेंड्यांगत विडंबने पाडणे/पडणे वेगळे आणि सुरेश भट, पाडगावकर प्रभृतींच्या रचनांची विडंबने करणे वेगळे, असे मला वाटते. मूळ रचनेइतक्या ताकदीचे विडंबन झाले आहे का, हे पाहण्याची जबाबदारी विडंबनकाराने स्वतः उचलावी. कदाचित प्रस्तुत विडंबनात आपण ही जबाबदारी पेललेली नाही (असे निदान मला तरी वाटते) मूळ रचनेतून मूळ रचनाकर्त्याला जे सुचवायचे आहे, त्याच्याशी कितपत न्याय झाला आहे; आणि विडंबनातून आपण ज्या विषयातील व्यंगाकडे बोट दाखवतो आहोत, त्या उद्दिष्टाशी आपले शब्द, ओळी कितपत न्याय करीत आहेत, यांच्या तुल्यबळतेची विडंबनकाराकडून पडताळणी व्हायला हवी. आणि म्हणूनच विडंबन हे 'धोरण' नसावे .दुर्दैवाने सगळ्याच मराठी संकेतस्थळांवर अशा धोरणी विडंबनकारांची भूछत्रे उगवल्याचे आज आपण सगळेच पाहत आहोत.तुमचे ते 'धोरण' नाही, हे मी जाणतो, पण तुमचे हे विडंबन माझ्या मूळ रचनेची ताकद, विषय व उद्दिष्टांशी केलेला न्याय या मुद्द्यांच्या मोजपट्टीवर कमी पडते आहे, असे माझे मत. आणि यासाठीच मूळ रचना - भाव नि ताकद, मूळ कवी, रचनेचा विषय यांचा सारासार विचार, यांचे भान असणे अत्यावश्यक आहे, असे मला वाटते.
चित्तंनी वर म्हटल्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा खयाल अपना पसंद अपनी या निसर्गनियमानुसार मी मांडलेली मते पटतीलच, पटावीतच असा हट्ट/अपेक्षा नाही. या प्रतिसादाच्या अनुषंगाने माझे प्रामाणिक मत मांडण्याची संधी मिळाली, याचे समाधान आहे. जे पटेल ते घ्यावे, नाहीतर सोडून द्यावे, इतके सगळे सोपे आहे/असते.
(समाधानी)बेसनलाडू
19 Mar 2008 - 8:08 pm | उदय सप्रे
अविनाश जी,
एक अतिशय सुन्दर विडम्बन ! अभिनन्दन !
"देखावे बघण्याचे" ही मूळ गझलच आहे, कविता नव्हे , तुमचा समज अगदी बरोबर आहे, जमल्यास तुम्ही सुरेश भट यान्चे "एल्गार" हे पुस्तक वाचा त्यात आहे ही गझल.
मूळ कवितेचि जरि खिल्लि उडवली गेली असेल तरी पण त्यात मूळ कवीचा अपमान करण्याची कुणाची इच्छा असेल असे मल तरी वाटत नाही, तुमच्या हातऊन तर असे काही मुळीच झलेले नाहिये !
जमल्यास माझ्या "काहि लेख आणि एक कविता"ह्या लिन्क्स वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा ही "सप्रे"म विनन्ती.
उदय सप्रे
19 Mar 2008 - 9:20 pm | चतुरंग
बे.ला. ने त्याचे म्हणणे विस्तृतपणे मांडलेच आहे. त्यातले सर्व मुद्दे पटण्यासारखे आहेत.
मी फार विडंबने केलेली नाहीत. पण जी काही आहेत त्याच्या अनुषंगाने बोलतोय.
मुळात हा प्रकार अवघड आहे आणि तो नीट करायला धाडस लागते असे माझे मत. कारण मूळ रचना तुमच्यासमोर असते त्याबद्दल तुमचे आणि वाचकांचे एक मत बनलेले असते आणि त्यावर हा दुसरा ठसा उमटवणे कठिण काम असते. मुळात काव्य सशक्त आहे की नाही ह्याची चांगली जाण, त्यानंतर शब्दसंपत्ती, भाषेवरची पकड ह्या अत्यावश्यक गोष्टी आहेत. त्याखेरीज लय, ताल, मात्रा, ठेका ह्यांची जाण असेल तर विडंबन हास्यास्पद न होता जमून येते. वाचकांना भावते.
आता ह्या गोष्टी जमाव्यात कशा? कुठेतरी सुरुवात करणे भाग आहे. तेव्हा विडंबनकाराने हा विचार करुन एखादे साधे नवख्या कवीचे काव्य 'गिनीपिग' म्हणून वापरुन बघावे त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. आणि त्यावेळी काही 'लेंड्या पडल्या' तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही.;)
(अर्थात उठसूट कोणतेही काव्य घेऊन लेंड्या टाकत हिंडणेही फारसे प्रशस्त नाहीच;). हा शेवटी तारतम्याचा भाग आहे. तो अनुभवानेच येतो, शिकवून नाही!
प्रथितयश कवी/कवयित्रींचे काव्य घेताना मात्र फारच जागरुक रहावे लागते. कारण मूळ काव्यातला विचार, त्यातल्या प्रतिमा, शब्दांचे नेमके अर्थ, कंगोरे, छटा, नादमयता, गेयता, वृत्त, ताल, मात्रा हे सगळे समजून घ्यायचा प्रयत्न व्हायलाच हवा.
त्याशिवाय, विडंबन का करणार आहात त्याचा स्पष्ट उद्देश डोळ्यांसमोर पाहिजे. त्यातून काय द्यायचे आहे हे नक्की नसेल तर ते करु नये. त्यात तुम्ही वापरणार आहात त्या प्रतिमा, उपमा मूळ काव्याला बाध आणणार्या नसाव्यात. मूळ काव्य अनेक वेळा वाचावे, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला वाचावे त्यातले अर्थ उमगत जातात तसे आपल्याला त्याला न्याय देणे सोपे जाते.
विडंबन करुन झाले की ते तसेच मुरवत ठेवावे (लोणच्यासारखे;). मग पुन्हा काही काळाने वाचून बघावे त्यातल्या त्रुटी बर्याच वेळा ध्यानात येतात. काही वेळा उगीच केले असे वाटते त्यावेळी सरळ पुसून टाकावे. आणि जर मनासारखे झाले आहे ह्याची खात्री पटली तरच प्रसिध्द करावे.
त्यावर येणार्या प्रतिक्रियाही मोकळेपणाने घेता आल्या पाहिजेत. असे झाले तर खर्या अर्थाने विडंबन समृध्द होण्यास हातभार (कि काव्यभार?) लागेल असे वाटते.
चतुरंग
19 Mar 2008 - 11:15 am | जितेंद्र शिंदे
जे खावे पचण्याचे वय निघून गेले
पैजेवर चरण्याचे वय निघून गेले...
बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे
तास तास बसण्याचे वय निघून गेले
अविनाशकाका विडंबन खुप छान जमलयं
पण, चुइंगम, चने असे काही पदार्थ असते तर अजुन मजा आला असता.
19 Mar 2008 - 3:07 pm | प्रा सुरेश खेडकर
(विडंबना सकट) सर्व काव्यांत तीन प्रकारचे सौंदर्य अपेक्षित असते. (१) भाव सौंदर्य / कल्पनेचे सौंदर्य (२) शब्द सौंदर्य (३) लय/ रिदम/मात्रा यांचे सौंदर्य . आपण सामान्य कवी तर जाऊ द्या पण जेष्ठ /श्रेष्ठ कवींच्या प्रत्येक रचने च्या बाबतीत परिपूर्णता
(परफेक्शन) अपेक्षिणे बरोबर आहे कां ? आपण साहित्य निर्माण करतांना त्याचा जास्त विचार केल्यास ते निर्माणच होणार नाही.एक विडंबनकार म्हणून माझा अनुभव सांगतो. एखादि शिळा पाहिली की जसे मुर्तीकाराला त्यातून होऊ शकणारी मुर्ती दिसते तसे एखादे चांगले गीत ऐकले की त्याच्या शब्द व चालीतून विडंबनाचा मुखडा तायार होतो. बाकिच्या ओळी मग मूळ शब्दावरून सुचत जातात. आचार्य अत्रेंच्या झेंडूची फुले पुस्तकातील प्रस्तावना आपण पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे.
19 Mar 2008 - 8:43 pm | अविनाश ओगले
बेसनलाडूजी, मी आपला अत्यंत आभारी आहे. तुम्ही तुमचे म्हणणे अत्यंत नेमक्या शब्दात मांडलेत. या निमित्ताने विडंबनाकडेही किती गांभीर्याने पाहता येते हे समजले. ही चर्चा तुम्ही समृद्ध केलीत. अशाच आशयसंपन्न चर्चा मि.पा.वर घडत रहाव्यात. अन्य सहभागी सदस्यांचेही आभार.
19 Mar 2008 - 8:46 pm | सुधीर कांदळकर
त्या कविचा अथवा कवितेचा अनादर किंवा चेष्टा नसते अशी माझी समजूत आहे.
अविनाशरावांच्या यामताशी मी सहमत आहे.
बे.ला. च्या पण मूळ रचनेतली ताकद विडंबनातही असेल, तर विडंबन खुलते
आधी अशा रचनेची ताकद अजमावणे आवश्यक हे तर खरेच. उत्कृष्ट तेच सादर करावे. गाळ फेकावाच. उत्कृष्टतेच्या ध्यासाला अंत नसावाच.
बेलाची फूटपट्टी प्रत्येकानेच जरूर वापरावी.
प्रा. सुरेश खेडकरांचे मतहि आवडले.
यावर खरे म्हणजे खुद्द विडंबनकारांचे मत जाणून घेण्यास आवडेल. मी तर फक्त आस्वादक आहे.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
20 Mar 2008 - 2:24 am | प्रा सुरेश खेडकर
(खुलासा: खालील उतारा इतर एका ठिकाणी अनेक दिवसा पूर्वी लिहिला होता व तो प्रस्तुत चर्चेशी संयुक्तिक वाटला म्हणून इथे उध्रूत केला आहे. कुणाचाहि अपमान करण्याचा मानस नाही, क्षमस्व.)
अनेक समीक्षक स्वतः एकही ओळ न लिहिता साहित्यिकांना व त्यातल्या त्यात लोकप्रिय साहित्यिकांना व त्यांच्या साहित्याला तुच्छ लेखतात.परंतु कै.म.वा.धोंड(जे नुकतेच वयाच्या ९३व्या वर्षी वारले)याला अपवाद होते.ते लेखकाच्या कलाकृतीला आपल्या समीक्षेपेक्षा मोठे समजत.आपली समीक्षा परिपूर्ण नाही ह्याचे भान ठेवतांना त्यांनी आपल्या समीक्षा पुस्तकाला नाव ठेवले "जाळ्यातील चंद्र". या नावाचे स्पष्टीकरण देतांना त्यांनी ज्ञानेश्वरीतील पुढील ओवी दिली आहे.
"जे जालं जली पांगिले|तेथ प्रतिबिंब दिसे कीरू आतुडले|
मग थडिये काढूनि झाडिले|तेव्हलि बिंब के सांघै ||"
(अर्थात,कोणतेही व्यक्तिमत्त्व किंवा काव्य स्वतःच्या शब्दात पकडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समुद्रात जाळे पांगून त्यात आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब पकडण्याचा प्रयास करणे.जाळे पांगलेले असेपर्यंत त्यात प्रतिबिंब अडकल्याचा भास होतो.परंतु किना~यावर आणून ते झटकले की त्यातून ते निसटल्याचे आढळून येते.
20 Mar 2008 - 2:48 am | चतुरंग
बर्याचवेळा आढळणारी समीक्षेतली अकलेची दिवाळखोरी अत्यंत समर्पक शब्दात तुम्ही दाखवून दिलीत त्याबद्दल तुमचे आभार.
कै.म.वा.धोंड ह्यांच्याबद्दलही नवीन माहिती मिळाली.
'जाळ्यातला चंद्र' नावामागचा दृष्टांत केवढा मौलिक आहे, म्हणूनच ते ज्ञानेश्वर होते!
चतुरंग
20 Mar 2008 - 2:56 pm | प्रा सुरेश खेडकर
सुधीरजी व चतुरंगजी , तसेच इतरांचेहि आभार.
खुलासा : मी नागपूरच्या एका कॉलेजात इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग शिकवितो, म्हणजेच मी मराठीच काय कोणत्याहि भाषेचा प्राध्यापक नाही. म्हटलं पितळ(की तांबं?) उघडं पडायच्या आधीच सांगून टाकालेलं बरं. नाही कां?