थिंक महाराष्ट्र डॉट कॉम ह्या मराठी संकेतस्थळाच्या उदघाटनाचा (लॉचिंग) कार्यक्रम ५ मार्च २०१०, शुक्रवार, रोजी सायंकाळी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रांत साजरा झाला. श्री. दिनकर गांगल यांनी या संकेतस्थळाची थोडक्यात पण चांगली ओळख करून दिली. श्री.गांगल आणि ग्रंथाली यांच्याबद्दल मनात जे आदराचे स्थान आहे त्याला साजेसे असेच हे संकेतस्थळ असावे असे त्यावरून दिसले.
ह्या कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणून मराठी ब्लॉग्ज व संकेतस्थळांशी संबंधित मान्यवरांचे एक चर्चासत्र झाले. 'ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी' हा त्याचा विषय होता. त्यात वेगळ्या प्रकारे उद्बोधक अशी माहिती मिळाली. "इंग्रजी, चिनी, जर्मन वगैरे भाषांमध्ये कोटीच्या कोटी ब्लॉग्ज आहेत, त्यामानाने मराठीतली दीड दोन हजार ही संख्या अगदी नगण्य आहे. जे आहेत ते देखील अनियमित आहेत, त्यात ओरिजिनल कंटेंट नसतोच, असल्याच तर कविता असतात, मिसळपाववरून उद्या हकालपट्टी झाली तर जालावर कुठे तरी आपले लिखाण असावे म्हणून लोक ब्लॉग या नांवाचे गोडाऊन उघडून ठेवतात" वगैरे मनोरंजक माहिती व्यासपीठावरून दिली गेली. "परदेशातले (आणि अमिताभ बच्चनसारखे भारतीय) सेलिब्रिटीज ब्लॉग्ज लिहितात आणि लक्षावधी लोक ते वाचतात. त्यामुळे ते एक महत्वाचे सामाजिक संपर्कमाध्यम बनले आहे. मराठीभाषिक नेतेमंडळी किंवा सुप्रसिध्द नट, गायक, खेळाडू वगैरे प्रसिध्द लोक ब्लॉग लिहीत नाहीत कारण त्यांना त्यासाठी मोकळा वेळच उपलब्ध नसतो, पण लेखन हाच ज्यांचा व्यवसाय आहे असे कितीसे साहित्यिक ब्लॉग लिहितात? उद्याचा नागरिक म्हणजे आजचा युवावर्ग तर मराठी ब्लॉगबद्दल पूर्णपणे उदासीन आहे" वगैरे सांगितले गेले. "कांही ठिकाणी चांगले साहित्यही लिहिले जात आहे, विशेषेकरून पाककृतीसंबंधी छान माहिती दिली जात आहे" असा एकच हलकासा विसंवादी सूर ऐकायला मिळाला.
पुढची पायरी म्हणजे " संगणक आणि त्याचा कीबोर्ड हेच उद्या लुप्त होणार असून सगळे कम्यूनिकेशन सेलफोनवरून दृकश्राव्य माध्यमातून होणार आहे, अक्षर ही संकल्पनाच बाद होऊन गेल्यानंतर लिपीला अर्थ उरणार नाही आणि उद्याचे ब्लॉग्जसुध्दा व्हीडिओवर असणार आहेत." असे भवितव्य एका महान द्रष्ट्याने दाखवले. थोडक्यात सांगायचे तर मराठी ब्लॉग्जना फारसा भूतकाळ नाहीच, त्याचा वर्तमानकाळ विशेष स्पृहणीय नाही आणि भविष्यकाळ अंधःकारमय आहे असा नैराश्य उत्पन्न करणारा मतितार्थ या चर्चेत दिसून आला.
चर्चेत सांगितले गेले त्याप्रमाणे मराठी ब्लॉग्ज, अनुदिन्या किंवा जालनिशा वगैरे अजून बाल्यावस्थेत आहेत. कदाचित त्याही पलीकडे शैशवावस्थेत असतील. पण तान्हे बाळसुध्दा हातापायाच्या हालचाली करून आणि किंचाळून मोठ्या लोकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत असते आणि अनेक वेळा आसपास असलेली मोठी मंडळी त्याच्याकडे लक्ष देतात, त्याला अंजारून गोंजारून मायेचा स्पर्श देतात. त्यामुळे ते बाळ तर सुखावतेच, पण मोठ्या माणसालासुध्दा एक प्रकारचा आनंद मिळतो. मराठी ब्लॉगविश्वातली आम्ही अजाण बालकेसुध्दा अशी थोडीशी हालचाल करत आहोत. आजूबाजूची मोठी माणसे आमच्याकडे लक्ष देतील अशी वेडी आशा अजूनही बाळगून आहोत.
मराठी ब्लॉग या प्रकाराबद्दल मिपाकरांची काय मते आहेत आणि त्याच्या भविष्याबद्दल काय वाटते?
(हा चर्चाविषय कोणत्या लेखनविषयात बसेल ते न समजल्यामुळे 'मौजमजा' या नावाखाली टाकला आहे. प्रत्यक्षात हा गंभीर मामला आहे. 'इतर' असा एक पर्याय ठेवला तर त्यात टाकता आला असता. याबद्दलही मार्गदर्शन व्हावे)
प्रतिक्रिया
6 Mar 2010 - 11:19 am | विसोबा खेचर
सहमत आहे...
आनंदराव, कालच्या कार्यक्रमाचा आपण छोटेखानी परंतु उत्तम आढवा घेतला आहे..
हे बाकी मस्त! :)
तात्या.
6 Mar 2010 - 12:09 pm | Nile
हा हा हा! मस्त लेख आवडला! तुर्तास तरी मौज कमी होउ नये म्हणुन आम्हाला काय वाटते ते लिहित नाही. :)
6 Mar 2010 - 12:53 pm | प्रमोद देव
मराठीतून,त्यातून देवनागरीतून लिहिण्याची इच्छा एकूणच हल्ली कमी दिसतेय आणि जे कोणी असे मराठीतून लिहीत आहेत त्याबद्दल इतरांच्या प्रतिक्रिया ह्या आश्चर्य,नवल ह्या सदरातल्या असतात. मराठीत कसे काय लिहिता येते...इतपतच ते आश्चर्य असते. आपणही तसे शिकून लिहावे असे वाटणारे नगण्य असतात. सर्वसाधारण लोकांचा कल हा एक तर इंग्रजीकडे किंवा फार फार तर रोमनमधून मराठी लिहिण्याकडे असतो. त्यामुळे ज्या प्रमाणात मराठी जालनिश्यांची संख्या असायला हवी होती त्या तुलनेत ती भलतीच तोकडी आहे. इंग्लिशमधून लिहिले की कसं लगेच आंतर्राष्टीय वाटायला लागते, उगाच मराठीतून..तेही क्लिष्ट देवनागरी टंकलेखनातून कशाला लिहा असा विचार भलेभले मराठीप्रेमी(?) करत असतात.
त्यामुळे सभेतील वक्त्यांचे भविष्याबद्दलचे विचार जरी आवडले नसले तरी ते नक्कीच वास्तववादी आहेत असे खेदाने नमूद करावेसे वाटते. इंग्लीश माध्यमाचा अतिरेक आणि एकूणच मराठीबद्दलचा कोरडा अभिमान पाहता मराठी जालनिश्यांची संख्या हळूहळू कमी झाल्यास मला तरी मुळीच आश्चर्य वाटणार नाही.
त्यामुळे मराठी जालनिश्यांना फारसे भविष्य नाही असे कुणी म्हटले तर ते दूर्दैवाने खरे आहे असे म्हणावे लागेल.
6 Mar 2010 - 1:31 pm | प्रकाश घाटपांडे
बरेचसे ब्लॉग स्वांत सुखाय लिहिले जात. सरळ भाषेत आपली खाज भागवायल. त्यात काही गैर नाही. आमच्या मते जास्तीत जास्त मजकुर नेटवर मराठीत येणे याला महत्व आहे. माझ्या ब्लॉग वर मी राजा अशी भुमिका असते. पण ब्लॉग्जवर लिहिणे व मराठी संकेतस्थळावर लिहिणे यात फरक प्रतिसाद व प्रतिवादांचा आहे. प्रदर्शनात आपला स्टॉल लावणे व आपले आपले दुकान असणे यात जो फरक आहे तोच इथे आहे. काही लोक आपल्या ब्लॉग्ज वर लिहितात तेच मराठी संकेतस्थळावर लिहितात. संकेतस्थळावर प्रतिसाद जास्त येतात. विषय चर्चिला जातो. अनेक उत्तमोत्तम ब्लॉग्ज दुर्लक्षित आहेत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
6 Mar 2010 - 5:02 pm | आनंद घारे
बरेचसे ब्लॉग स्वांत सुखाय ..... अशी भुमिका असते
अगदी नेमके बोललात.
अनेक उत्तमोत्तम ब्लॉग्ज दुर्लक्षित आहेत.
परदेशांमध्ये सोशल नेटवर्कावरील हायपरलिंकद्वारे ब्लॉगसंबंधी माहितीचा जलद प्रसार होतो, असे सांगितले गेले. आपल्याकडे त्याचे फारसे लोण आलेले नाही. मराठी ब्लॉगविश्व या स्थळावर सर्व ब्लॉगांची नोंद होते, पण त्या स्थळावर जाऊन शोध घेणे ही गोष्ट तितकीशी सुलभ वाटत नाही. त्यामुळे ब्लॉगविश्वात कोठे काय चांगले आले आहे ते कोणाला समजतच नाही आणि त्या कारणामुळे ते वाचले जात नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
6 Mar 2010 - 2:30 pm | देवदत्त
मौजमजा सदरात आहे म्हणून मौजमजेतच पाहत आहे. :)
खरं तर चर्चेत आलेले विचार काही कळले नाहीत. मराठी संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या वेळी मराठी ब्लॉग विषयी नकारात्मक मुद्देच होते की चांगलेही मुद्दे होते?
"जे आहेत ते देखील अनियमित आहेत, त्यात ओरिजिनल कंटेंट नसतोच, असल्याच तर कविता असतात, मिसळपाववरून उद्या हकालपट्टी झाली तर जालावर कुठे तरी आपले लिखाण असावे म्हणून लोक ब्लॉग या नांवाचे गोडाऊन उघडून ठेवतात" वगैरे मनोरंजक माहिती व्यासपीठावरून दिली गेली. "
ह्या मागचा संदर्भ आणि स्त्रोत कळला नाही. त्यापेक्षा वर घाटपांडे साहेबांनी लिहिलेली प्रतिक्रिया योग्य वाटते. कितीतरी ब्लॉग आहेत जे ओरिजिनल आहेत आणि मिपा, मनोगत, उपक्रम सारख्या संकेतस्थळावर त्यांचे सभासदत्व नाही.
असो. :)
6 Mar 2010 - 4:01 pm | विसोबा खेचर
कालच्या चर्चेत हाच मुद्दा मीही मांडला होता..
तात्या.
6 Mar 2010 - 4:42 pm | आनंद घारे
जे आहेत ते देखील अनियमित आहेत, त्यात ओरिजिनल कंटेंट नसतोच, असल्याच तर कविता असतात, मिसळपाववरून उद्या हकालपट्टी झाली तर जालावर कुठे तरी आपले लिखाण असावे म्हणून लोक ब्लॉग या नांवाचे गोडाऊन उघडून ठेवतात"
वेळेच्या मर्यादेमुळे संयोजकाने एक प्रश्न विचारायचा आणि मंचावरील इतर चार व्यक्तींनी थोडक्यात उत्तर द्यायचे असे या चर्चासत्राचे स्वरूप होते. त्यात साधक बाधक चर्चा किंवा वादाला स्थान नव्हते. मराठी ब्लोगबद्दल काय वाटते? या पहिल्याच प्रश्नाला एका सदस्याने वरील उत्तर दिले.
कितीतरी ब्लॉग आहेत जे ओरिजिनल आहेत आणि मिपा, मनोगत, उपक्रम सारख्या संकेतस्थळावर त्यांचे सभासदत्व नाही.
बहुधा सन्माननीय सदस्यांच्या नजरेला ते पडले नसावेत.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
6 Mar 2010 - 7:12 pm | मीनल
लेखक का लिहितो /लिहिते याचे अनेक कारणांपैकी एक कारण वाचकापर्यंत आपले विचार पोहोचवणे हे आहे. मराठी वाचनाबद्दल अनेक लोक उदासिन असतात असे दिसते.
ब्लॉग म्हटला की कंप्युटर पाहिजे, तो वापरता आला पाहिजे. ह्या आणि अश्या अनेक कारणांनी मराठी ब्लॉगच्या वाचकांची संख्या मर्यादित आहे.
(अर्थात आताच्या जगात असे येत असलेले मराठी काही कमी नाहित. )
पण हेच लेखन जर कागदावर वर्तमान पत्राप्रमाणे उपलब्ध असते तर त्यांच्या वाचकांची (मराठी) संख्या किती तरी पटीन वाढेल यात शंका नाही.
मराठी वाचक कमी त्यामुळे मराठी लेखन कमी हे थोड्याप्रमाणात तरी खरे असावे.
दुसरे म्हणजे ``मनोरंजनाची सहज/ सोपी अनेक माध्यमे आहेत. पाठीला/ डोळ्याला त्रास देत वाचण्याची कुणाला पडली आहे इथे? ते ही मराठी? छ्या!!`` असा दॄष्टिकोन असतो.
ऐकू येण्याचे ब्लॉग असतील तर ते उत्तम होईल असे वाटते.
मराठी लोक मराठी लेखन नक्की ऐकतील अशी खात्री वाटते.
त्यावेळी मराठी लेखनाला बहर येइल कदाचित.
माझ्या लेखानाविषयी लिहायचे तर ---आधी आधी मी मित्र मैत्रिणींना माझे लेखन जरून पाठवायची. त्यांच्याकडून प्रतिक्रियांची अपेक्षा नव्हती असे म्हणणे केवळ खोट बोलणे होईल. पण माझेच नाही कुणाचेच लेखन वाचण्या विषयी उदासिनता दिसली.
शिवाय जे प्रसिध्द आहेत त्यांचे कुठलेही लेखन वाचण्यात कुणालाही रस वाटेल. माझे कोण वाचणार?
उदा: एखाद उत्तम गायक / नर्तक टीव्ही वर दिसला की त्याची अनेक कला पहायला/ ऐकायला उत्सुक असणा-यांची संख्या नक्की वाढते यात शंका नसावी.
मीनल.
7 Mar 2010 - 12:38 am | मिसळभोक्ता
एका संकेतस्थळाचे विदागार बंद पडले, तेव्हा मराठी अनुदिन्यांचा सुळसुळाट झाला. जोतो/जीती आपले लिखाण सुखरूप रहावे, म्हणून अनुदिन्या काढू लागला, आणि कापचिकट करू लागला/ली.
केंद्रीकरणापेक्षा विकेंद्रीकरण जास्त टिकाऊ असते.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
7 Mar 2010 - 6:53 am | राजेश घासकडवी
इतर भाषांत इतके आहेत आणि मराठीत का नाही याचं सोपं उत्तर आहे - वाचकसंख्या. मिपालाच चाळक, वाचक, लेखक, वगैरेची संख्या हजाराच्या आसपास असेल. इंग्लिशमध्ये अशा स्थळांची काही दशसहस्रात, लाखात जाऊ शकते - कारण आंतर्जाल सुविधा असणारे, इंग्लिश मातृभाषा असणारे किमान शंभरपट लोक आहेत. वीस वर्षांनी जेव्हा पाच कोटी मराठींना ती सुविधा असेल तेव्हा मराठी ब्लॉग्जदेखील फुलतील. चांगल्या लेखकाच्या ब्लॉगला हजारांमध्ये वाचकसंख्या अतर्क्य नाही.
ब्लॉग्ज निर्माण झाले तेव्हापासून त्यांची सरासरी वाचकसंख्या किती वाढली, किती घटली याविषयी कोणी बोललं का? निदान हे आकडे काय आहेत याचा अंदाज तरी बांधला का? सध्या वाईट अवस्था आहे याचा अर्थ ती तशीच चालू राहाणार किंवा आणखीन बिघडणार अशी विधानं विदाअभावी कशी होतात कोण जाणे.
7 Mar 2010 - 5:12 pm | आनंद घारे
या चर्चासत्राचा लोकसत्तामधील वृत्तांत इथे वाचावा.
ब्लॉग्जच्या बाबतीत तोही फारसा उत्साहवर्धक नाही
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/