नव्वदोत्तरीतले संग्राह्य, वाचनीय साहित्य

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in काथ्याकूट
25 Feb 2010 - 3:51 pm
गाभा: 

भारतातून काही पुस्तकं घ्यायची आहेत. त्यासाठी संग्राह्य, वाचनीय पुस्तकांबाबत मिपाकरांकडून सूचना हव्या आहेत. विशेषत: नव्वद सालनंतरची, कारण तशी माझ्याकडे खूप थोडी आहेत. पण ती अगदी काटेकोर अट नाही. तेव्हा कृपया आपल्याला आवडलेल्या, गेल्या काही वर्षात वाचलेल्या कथा, कविता, कादंबरी, नाटक याविषयी कळवा.
जर अशी चर्चा आधीच झालेली असेल तर दुवा द्या.

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

25 Feb 2010 - 4:20 pm | चतुरंग

'महानायक' जरुर घ्या (सुभाषचंद्र बोसांच्या जीवनावरची कादंबरी आहे. सध्या वाचतोय. आत्तापर्यंत तरी अतिशय आवडली आहे.)

चतुरंग

II विकास II's picture

25 Feb 2010 - 4:46 pm | II विकास II

मार्चमध्ये पुण्यात साहीत्य संमेलन आहे. जमले तर या संमेलनाला. खुप पुस्तके मिळतील पहायला.

----
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

नंदन's picture

25 Feb 2010 - 6:00 pm | नंदन

नव्वदीनंतर गाजलेले लेखक म्हणजे मेघना पेठे/अनिल अवचट/मिलिंद बोकील/प्रकाश नारायण संत/कविता महाजन हे नेहमीचे यशस्वी साहित्यकार; परंतु त्यांची पुस्तकं तुम्ही वाचली असावीत असा कयास आहे. स्टुडिओ (सुभाष अवचट), मौनराग (महेश एलकुंचवार), अर्धी मुंबई (युनिक फीचर्स), नर्मदे हर (जगन्नाथ कुंटे), एका रानवेड्याची शोधयात्रा (कृष्णमेघ कुंटे), गिरीश कुबेरांची तिन्ही पुस्तकं, प्रकाशवाटा ही थोडी वेगळी पण उत्तम पुस्तकं. हसरी किडनी/माझा साक्षात्कारी हृदयरोग/जगायचंय प्रत्येक सेकंद/हृदयस्थ ही न वाचलेली मात्र ज्यांच्याबद्दल बरंचसं चांगलं वाचनात आलं अशी 'शतायुषी' पुस्तकं. कवितासंग्रहांत तूर्तास (दासू वैद्य) आणि बरेच काही उगवून आलेले (द. भा. धामणस्कर) हे दोन वैशिष्ट्यपूर्ण संग्रह.

मटामध्ये प्रसिद्ध झालेली २००५ सालातल्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांची यादी सापडली ती देतो. बाकी इतरांच्या सुचवण्या वाचायला आवडतील. (इतर भारतीय भाषांतलं अनुवादित साहित्य अलीकडे मोठ्या प्रमाणावर मराठीत येऊ लागलं आहे - त्यातल्या भैरप्पांच्या कादंबर्‍या, आत्मचरित्र वाचनीय)

माणसं जोडावी कशी? - शिवराज गोर्ले
ताठ कणा - डॉ. पी. एस. रामाणी
ही आपलीच माणसं - मंगला खाडिलकर
इजिप्तायन - मीना प्रभू
बाकी शून्य - कमलेश वालावलकर
बापलेकी - संपादित (मौज प्रकाशन)
हिंदुत्व - नीलकंठ खाडिलकर
नातिचरामि - मेघना पेठे
खटलं आणि खटला - शिरीष कणेकर
देशोदेशीचे - शिवाजीराव भोसले
महामानव आईनस्टाईन - डॉ. विद्यासागर पंडित
अवनत होई माथा - डॉ. संजय ओक
चित्रायन - साधना बहुळकर
एका खेळीयाने - दिलीप प्रभावळकर
गाणी बजावणी - अभिजीत देसाई
चकवाचांदणं - मारूती चितमपल्ली
बिनचेहऱ्याची माणसं - अशोक बेंडखळे
एक होता गोल्डी - अनिता पाध्ये
ही श्रींची इच्छा - श्रीनिवास ठाणेदार
सुंदर ते मन - कमलिनी फडके
साहित्यिकांचे अंतरंग - रत्नप्रभा जोशी
ओमेता - अनिल काळे
प्रज्ञावंतांची दैनंदिनी - संपादित (निहार प्रकाशन)
पैठणी - विजया वाड
गोष्टी माणसांच्या - सुधा मूर्ती
धनंजय - राजेंद्र चेर
फॅमिली डॉक्टर - डॉ. बालाजी तांबे
शाळा - मिलिंद बोकील
भयंकर सुंदर मराठी - डॉ. द.दि.पुंडे
द अल्केमिस्ट - (अनुवाद) नितीन कोतापल्ले
बॅरिस्टरचं कार्ट - हिंमतराव बाविसकर
मजेत जगावं कसं - शिवराज गोर्ले
जगण्यातील काही - अनिल अवचट
दिसलं ते - अनिल अवचट
संभाजी - विश्वास पाटील
ब्र - कविता महाजन
मौनाची भाषांतरे - (कवितासंग्रह) संदीप खरे

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मुक्तसुनीत's picture

25 Feb 2010 - 6:12 pm | मुक्तसुनीत

काम तमाम ! ;-)

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Feb 2010 - 6:48 pm | बिपिन कार्यकर्ते

अगदी हेच लिहिणार होतो... नंदन अगदी भरवशाचा (टोणगा) आहे. ;)

बिपिन कार्यकर्ते

Nile's picture

25 Feb 2010 - 9:02 pm | Nile

अगदी!
आमचं पण काम तमाम, च्यामारी!

धनंजय's picture

25 Feb 2010 - 10:35 pm | धनंजय

वाचनखूण साठवतो आहे.

विकास's picture

26 Feb 2010 - 1:36 am | विकास

नंदनची यादी खासच आहे. त्याची विभागणी विषयवार करून पायचार्ट काढला पाहीजे ;)

अजून काही वाचनातून आठवणारी पुस्तके: (तात्काळ आठवत आहेत. मी नव्वदीच्या दशकानंतर वाचलेली असल्याने तसे गृहीत धरत आहे. अजून आठवल्यास नंतर लिहीन)

  1. माझा साक्षात्कारी हृदयरोग - डॉ. अभय बंग
  2. कॉलनी - सिद्धार्थ पारधे
  3. कपटनीती - दाजीशास्त्री पणशीकर
  4. इडली, ऑर्कीड आणि मी - विठ्ठल कामत
  5. पुलंचे "उरलंसुरलं"

नक्की ९०च्या नंतर का ते आठवत नाही पण त्याच काळातील असलेली:

  1. गोविंद तळवळकरांचे "नवरोजी ते नेहरू "
  2. दुर्गा भागवतांचे "खमंग"
  3. प्रतिभा रानड्यांचे "ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी"

बाकी राजकारण्यांमधे मी (नव्वदी/दोनहजार नंतरचे) अडवाणींचे पुस्तक वाचलेले नाही, पण वाजपेयींचे "मेरी इक्यावन्न कविताए" (हिंदी) तसेच नरेंद्र मोदींचे "ज्योतीपुंज" (मराठी) ही दोन पुस्तके वाचली/चाळली आहेत...

बाकी जीएंच्या पुस्तकाच्या नव्वदीत आवृत्त्या निघाल्या असल्यातरी ती सर्व १९८७च्या पुर्वीची आहेत. ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्रदीप's picture

26 Feb 2010 - 11:05 am | प्रदीप

प्रस्तुत चर्चालेखकाने म्हटले आहे: 'कृपया आपल्याला आवडलेल्या, गेल्या काही वर्षात वाचलेल्या कथा, कविता, कादंबरी, नाटक याविषयी कळवा'.(अधोरेखन माझे).

तेव्हा ह्या यादीतील बरेच काही उणे करावे लागणार! आणि म्हणून मला माहिती असलेल्या काही पुस्तकांची नावे मी दिलेली नाहीत.

दिपक's picture

26 Feb 2010 - 2:38 pm | दिपक

=P~

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Feb 2010 - 6:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आई समजून घेतांना [आत्मकथन]- उत्तम कांबळे
अक्षर भाकिते- केशव मेश्राम
'तहान' आणि 'बारोमास' (कादंबर्‍या) - सदानंद देशमुख
'मराठी वाड्मयाचा अभिनव इतिहास- संपादन: डॉ.गं.ना.जोगळेकर
मराठी ग्रामीण कवितेचा इतिहास - कैलास सार्वेकर
'वाङ्मयीन प्रवृत्ती: तत्त्वशोध' - संपादन: केशव मेश्राम
वि.भा.देशपांडे यांचे नाटकावर तीन खंड आहेत. [शिर्षक विसरलो]
कोण म्हणतं टक्का दिला [नाटक] - संजय पवार
जागतिकीकरणातील माझी कविता- उत्तम कांबळे

आणि या धाग्यावरील काही पुस्तके पाहा.

-दिलीप बिरुटे

अक्षय पुर्णपात्रे's picture

25 Feb 2010 - 9:22 pm | अक्षय पुर्णपात्रे

मध्ये एकदा दिनानाथ मनोहरांचे 'मन्वंतर' आवडले होते. ते नव्वदोत्तरी आहे की नाही माहीत नाही. शाम मनोहर, रंगनाथ पाठारे यांची काही पुस्तके आवडली होती. पुन्हा नव्वदोत्तरीविषयी माहीत नाही.

सन्जोप राव's picture

25 Feb 2010 - 9:39 pm | सन्जोप राव

वरील यादी बघून भयंकर धास्ती घेतली आहे... पेठे, गोर्ले, प्रभू.... साक्षात अवचटही? बोकिलांचे फक्त वाचू नये ते 'शाळा'? बालाजी तांबे? वालावलकर? (त्यापेक्षा सरळ पोर्नोग्राफी का विकत घेत नाही?) भयानक फसलेले 'गोल्डी'?
असो, हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है...
सन्जोप राव
कुछ और जमाना कहता है, कुछ और है जिद मेरे दिलकी
मैं बात जामाने की मानूं, या बात सुनूं अपने दिलकी

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Feb 2010 - 9:55 pm | बिपिन कार्यकर्ते

'त्या'तही नव्वदोत्तरी वगैरे लफडं असतं काय? ;)

ह. घ्या.

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

25 Feb 2010 - 10:08 pm | टारझन

तो कसलासा क्रायसिस असतो म्हणे मिडलाईफ का काय ते =)) =))

बाकी भारतातून न्यायचं असेल तर विनायक पाचलगांचे "युनिकोडातून परिवर्तलेले" आणि "बाईच्या कुशीतले" नक्की वाचा ! अफलातुन लेखन ! नाही त्यानंतर आपली वाचनाची इच्छा झाली तर आम्ही अंतरजालिय समाधी घेऊ

मुक्तसुनीत's picture

25 Feb 2010 - 11:42 pm | मुक्तसुनीत

नंदनने जी यादी दिली आहे ती नव्वदनंतर प्रसिद्ध झालेली त्याला माहिती असलेली किंवा त्याला सहज आठवलेली पुस्तके असावीत असा माझा कयास आहे. ही त्याची शिफारस असे वाटत नाही. याचा खुलासा तो करेलच.

बाकी, राजेशला कुठली पुस्तके "वाचून धास्ती भरेल /पोर्नोग्राफिक वाटतील/भयानक फसलेली आहेत" याच्याच जोडीला "तुम्हाला यापैकी (कुठली आवडली असतीलच तर) कुठली पुस्तके आवडली आहेत" याची माहिती दिली तर बरे वाटेल असाही एक उपकयास आहे :-)

नंदन's picture

26 Feb 2010 - 12:56 am | नंदन

कयास आणि उपकयासाशी सहमत आहे. प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे यादी आहे ती म.टा.मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'बेस्ट सेलर्स' पुस्तकांची. हे नमूद केल्यामुळे वेगळा 'प्रतिसादलेखक या यादीशी सहमत असेलच असे नाही' असा श्रेयअव्हेर / डिस्क्लेमर टाकला नाही.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चिंतातुर जंतू's picture

25 Feb 2010 - 11:37 pm | चिंतातुर जंतू

'नव्वदोत्तरी साहित्य' म्हणजे काही वेगळ्या संवेदना व्यक्त करणारे किंवा वेगळी अभिव्यक्ती असलेले असे अपेक्षित असल्यास त्यात मकरंद साठे यांच्या 'अच्युत आठवले आणि आठवण' किंवा 'ऑपरेशन यमू' या कादंबर्‍यांचा समावेश मी नक्की करेन. मनस्विनी लता रवींद्र यांचे 'सिगरेट्स' हे नाटक किंवा सचिन कुंडलकर यांचे 'छोट्याशा सुट्टीत' हे नाटक यांचा समावेश तरुण पिढीची अभिव्यक्ती म्हणून करता येईल.

एका वेगळ्या साहित्यप्रकाराचा गेल्या काही वर्षांत मराठीत वावर चालू झाला आहे - अतिशय उत्तम निर्मितीमूल्य असणारी दृश्यकलांशी संबंधित पुस्तके आता मराठीत येतात. छायाचित्रकार संदेश भंडारे यांचे 'तमाशा - एक रांगडी गंमत' हे अशा प्रकारच्या पुस्तकांचे उत्तम आणि प्रातिनिधिक उदाहरण आहे. तमाशाशी संबंधित छायाचित्रे आणि तमाशाविषयी व छायाचित्रांशी संलग्न माहिती असे पुस्तकाचे स्वरूप आहे. याच पध्द्तीचे 'वारी - एक आनंदयात्रा' हेही संदेश भंडारे यांचेच पुस्तक आहे. दृश्यकलांविषयी आणखी एक महत्त्वाचे पुस्तक येऊ घातले आहे: अरुण खोपकर यांनी 'चौकटीआत, चौकटीबाहेर' या नावाचे चित्रपटविषयक सदर काही वर्षांपूर्वी लिहिले होते. ते आता पुस्तकरूपाने लवकरच प्रसिध्द होईल. चित्रपट या दृश्यमाध्यमाविषयी मराठीत इतके चांगले लिहिले गेल्याचे ऐकिवात किंवा वाचनात नाही. त्यामुळे हे पुस्तक क्रांतिकारीच म्हणावे लागेल. (प्रकाशकः लोकवाङ्मय गृह) अशा पुस्तकांना साहित्यमूल्य असते, असे मानण्याची सवय मात्र अजून मराठी माणसांना फारशी लागलेली दिसत नाही, म्हणून त्यांचा मुद्दाम उल्लेख केला.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

मुक्तसुनीत's picture

1 Mar 2010 - 6:42 pm | मुक्तसुनीत

प्रशु's picture

26 Feb 2010 - 12:03 am | प्रशु

मुंबईत रहात असाल तर शिवाजी मंदिर, दादर येथे मेजेस्टीक प्रकाशनाचे मस्त दालन आहे. जरुर भेट द्या. पुस्तके हाताळता पण येतात आणी १०% सुट पण मिळते.....

मुक्तसुनीत's picture

26 Feb 2010 - 12:26 am | मुक्तसुनीत

नव्वदोत्तरी साहित्यिक घडामोडींमधली एक ठळक घटना म्हणजे "अभिधानंतर" हे अनियतकालिक. सुदैवाने त्यांच्या अलिकडच्या काळातले काही अंक ऑनलाईन उपलब्ध आहेत. नव्वदोत्तरी साहित्याची मीमांसा करणारे अनेक लेख , कविता अशा अनेक गोष्टी तिथे पहायला मिळतील. संपादक : हेमंत दिवटे.

साईट : http://abhidhanantar.com/

अक्षय पुर्णपात्रे's picture

26 Feb 2010 - 1:31 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री सुनीत, 'अभिधानानंतर'चे जुणे दिवाळी अंक चाळले. (नवा अंक उघडत नाही.) सगळे अंक वाचनीय वाटले. दुव्याबद्दल धन्यवाद.

उपास's picture

26 Feb 2010 - 12:53 am | उपास

घासकडवी साहेब, मंगला गोडबोलेंची खूप छान आणि हलकी फुलकी पुस्तकं आहेत... अजब रसायन आहे हे.. पर्स हरवलेली बाई, सह'वास' हा सुखाचा तर एकदमच खास.. झुळूक सुद्धा मस्त..
आमच्या खटाव वाडीत परचुरे किंवा गिरगावतल्या मॅजेस्टीक तसेच इतर प्रकाशकांकडे डायरेक्ट गेलात तर स्वस्तात आणि मस्त मिळतील पुस्तक.. त्यांच्या प्रकाशित पुस्त्कांची यादीही मिळेल तिथे.
'वाचू आनंदे!' :)
माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार

शुचि's picture

26 Feb 2010 - 12:56 am | शुचि

झुळूक मी वाचलय. छान आहे. छोटे विनोदी लेख आहेत.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

उपास's picture

26 Feb 2010 - 1:05 am | उपास

शुचिताई, त्यांचं पुन्हा झुळूक वाचलत क? हलक फुलकं आहे..
बरं अजून थोडंसं..
पु लं चं नर्म विनोदी साहित्य आपल्याला अपिल करतं कारण म्हैस मधलं कोकण, तिथली माणसं किंवा नारायण, लग्नातले प्रसंग तसेच हरितात्या, सखाराम गट्णे, असामी असामीतलं सगळं वर्णन, बटाट्याची चाळं सगळे सगळे आपण रीलेट करु शकतो, त्यातले प्रसंग, माणसं ह्यांची आपल्या अनुभवाशी सांगड घालू शकतो.. एक दोन पिढ्या पुढे सरकल्या की त्यांना आपल्या इतकं हे साहित्य उपभोगता येईल असं वाटत नाही..
तर 'नव्वदोत्तरी' साहित्य म्हणताय तर, नवीन जागतिकरणाचे आणि आपल्या आजच्या आयुष्यातले संबंध असलेले विषय असल्याने मंगला गोडबोलेंचं लिखाण अपिल करत राहतं आणि मुख्य म्हणजे अत्ताची नुकतच वाचू लागलेली पिढी असेल तर ती त्यातले विनोद छान रिलेट करु शकल्याने वाचनाची आवड वाढण्यासही मदत होऊ शकेल. असो!
माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार

नव्वददोत्तरी अट नसेल तर - अनिल अवचटांच्या "धार्मीक" आणि "गर्द" या २ पुस्तकांनी माझ्या अंगावर सर्सरून काटा आणला होता ..... अ‍ॅज फार अ‍ॅज आय रिमेंबर.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मुक्तसुनीत's picture

26 Feb 2010 - 9:23 am | मुक्तसुनीत

नव्वदी पासून प्रसिद्ध झालेल्यापैकी मला काही आवडलेले किंवा न आवडूनही उल्लेखनीय वाटते असे काही नमूद करेन म्हणतो. यामधे कालानुक्रम किंवा जास्त-कमी प्रिय असा क्रम वगैरे नाही. ( कुणाला हे वाचून धास्ती भरल्यास /काही पुस्तके पोर्नोग्राफिक वाटल्यास /काही भयानक फसलेली आहेत असे वाटल्यास इलाज नाही... ;-) )

यातल्या प्रत्येक निवडीबद्दल एक छोटेखानी लेख होऊ शकेल परंतु त्यात पुस्तकांबद्दल लिहायच्या ऐवजी आत्मचरित्र जास्त यायचे ! ते कुणाला लेकाला हवे आहे !? ;-)

नव्वदीच्या दशकात सुरू होऊन सरलेल्या दशकात संपलेली "लंपन"ची मालिका :
वनवास शारदा संगीत, झुंबर, पंखा : लेखक प्रकाश नारायण संत. पौगंडावस्थेतल्या इनोसंट पोराच्या आयुष्यातल्या घटना. 'एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा मॅडसारख्या वाचल्या' तरी त्या ताज्याच वाटतील - इति पुलं. या कथांमधे आयुष्याचा अंतिम अर्थ वगैरे शोधू नये हे खरे ; पण म्हणून हे निव्वळ बालसाहित्यही नव्हे. मात्र थोडा निबरपणा बाजूला ठेवून वाचावे असे काहीतरी.

जीएंची पत्रे १९९३ पासून प्रसिद्ध होऊ लागली. शेवटचा चौथा खंड प्रसिद्ध होऊन पाच वर्षे झाली असावीत. ज्यांना जीए आवडतात त्यांच्याकरताचा खजिना. पहिला खंड प्रसिद्ध झाला म्हणून का काय माहिती नाही पण सुनीताबाई देशपांड्याना लिहिलेल्या पत्रांच्या पहिल्या खंडाबद्दल जितके ममत्व वाटते तितके अन्य खंडांबद्दल वाटत नाही. (वैयक्तिक निवड.)

अंबरीष मिश्र या पत्रकाराने काही संगीतकार, गायक, नट यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा संग्रह : "शुभ्र काही जीवघेणें". पुस्तकाच्या नावापासूनच मला त्याने खिशांत टाकलेले. शोभा गुर्टु, ओपी नय्यर , सआदत हसन मंटो, पार्श्वनाथ आळतेकर, बेगम अख्तर यांसारख्या कलावंतांवर लिहिलेला एकेक लेख म्हणजे सोन्याचा तुकडा आहे. खरे तर कलावंत, चित्रपट, संगीत , नाटके यावा कितीतरी पुस्तके आहेत. परंतु या लेखांमधे कुणाकरता निव्वळ तारीफ के पूल नाहीत. त्या त्या माणसाचा काळ , त्यातले ताणेबाणे, त्या व्यक्तीच्या आयुष्याचे कंगोरे, कलेचे पैलू, मोजलेल्या किमती, यशाबरोबर आलेले भोग , एकटेपण ...पुस्तक जीवघेणे खरे.

असो. हा घोट इतकाच. फिर कभी लिखेंगे.

विकास's picture

26 Feb 2010 - 10:06 am | विकास

अंबरीष मिश्र यांचे "गंगे मधे गगन निवळले" हे गांधीजींवरील पुस्तकपण वाचनीय आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मुक्तसुनीत's picture

26 Feb 2010 - 10:15 am | मुक्तसुनीत

त्यांचे १९४५पूर्वीच्या हिंदी चित्रपटसृष्टीबद्दलचे नव्यानेच आलेले पुस्तक म्हणजे : "सुंदर ती दुसरी दुनिया".

सन्जोप राव's picture

26 Feb 2010 - 5:51 pm | सन्जोप राव

प्र ना संतांचे लिखाण हे बालगंधर्वांच्या गाण्यासारखे अतिशय आवडते किंवा अजिबात आवडत नाही. आम्ही न आवडणारे कमनशिबी. याचे कारण शोधण्याचा अद्याप प्रयत्न केला नाही, पण 'निबरपणा' ही एक शक्यता वाटते. कमलाकर वालावलकर या मेघना पेठ्यांच्या पुरुषावताराला आणि तत्सम (म्हणजे फक्त पोर्नोग्राफीसारख्या नव्हे!) लेखकांना काही बुडबुडेप्रसिद्धी मिळाली, पण ते काही टिकाऊ नव्हे. ('वासूनाका' किती लोकांच्या स्मरणात आहे? द.स.काकडे या लेखकाचे नाव किती लोकांना आठवते? ) अंबरीश मिश्र या नावाच्या उल्लेखाने फार बरे वाटले. सुनीताबाई देशपांड्यांचे 'आहे मनोहर तरी' फार प्रकाशात आले (लोकांना प्रसिद्ध व्यक्तिमत्वांच्या खाजगी आयुष्याबद्दल असलेल्या (विकृत?) कुतुहलामुळे), पण त्यांचे 'सोयरे सकळ' अधिक वाचनीय आहे. बाकी त्यांनी जी.एंना लिहिलेल्या पत्रांच्या संग्रहाचे 'प्रिय जी.ए.' हे पुस्तक, जी.एंच्या निवडक पत्रांचे खंड, सुभाष अवचटांचे 'जी.ए. एक पोर्ट्रेट' हे पुस्तक, पुरुषोत्तम धाक्रसांनी लिहिलेले 'जी ए नावाचे स्वप्न', जयवंत दळवींची प्रस्तावना असलेले आणि नंदा पैठणकरांनी संपादित केलेले 'प्रिय जी.ए., स.न.वि.वि' या पुस्तकांविषयी काही लिहीत नाही.
सन्जोप राव
कुछ और जमाना कहता है, कुछ और है जिद मेरे दिल की
मैं बात जमानी की मानूं, या बात सुनूं अपने दिलकी

मुक्तसुनीत's picture

26 Feb 2010 - 6:02 pm | मुक्तसुनीत

जीए नावाचे स्वप्न : लेखक आप्पा परचुरे.
कमलाकर वालावलकर नव्हे तर कमलेश वालावलकर.

बाकी काकडे आणि पाध्ये यांना एकाच दमात मोजणे : रोचक :-) माझ्यामते वासूनाका हा एक शब्द उच्चारल्यावर पाध्यानी चित्रित केलेला कालखंड, माणसे, त्यांची भाषा हे सगळे वाचकाना एकदम आठवते. या लिखाणाच्या आवडीनिवडीबद्दल अर्थातच दुमत असणार परंतु हे काम निश्चितच विस्मरणात गेलेले नाही अजूनतरी.

"आहे मनोहर तरी" हे पुस्तक "फार" प्रकाशात येणे म्हणजे नक्की काय ? कुठलेही पुस्तक हे प्रकाशित होतच असते. आणि हे पुस्तक केवळ विकृत कुतुहलामुळेच "प्रकाशात" आलेले आहे असे वाटणे हे "निबरपणा"च्या कलमाखाली घालणे योग्य आहे किंवा कसे या विचारात मी सध्या आहे.

सन्जोप राव's picture

27 Feb 2010 - 5:42 am | सन्जोप राव

कमलाकर वालावलकर नव्हे तर कमलेश वालावलकर.
बरोबर.
जीए नावाचे स्वप्न : लेखक आप्पा परचुरे.
शब्दांकनः पुरुषोत्तम धाक्रस - म्हणजे माझ्यापुरते लेखक तेच.
प्रकाशित आणि प्रकाशात यातला फरक जाणकारांना सांगायला नको. 'आमत' ची लोकप्रियता ही त्यातल्या पु.लंमुळे आहे हे जगजाहीर आहे. त्यातले पुलं काढून टाकले तर ते पुस्तक तेवढे ग्रेट आहे का?
सन्जोप राव
कुछ और जमाना कहता है, कुछ और है जिद मेरे दिल की
मैं बात जमानी की मानूं, या बात सुनूं अपने दिलकी

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2010 - 6:06 am | राजेश घासकडवी

'आमत' ची लोकप्रियता ही त्यातल्या पु.लंमुळे आहे हे जगजाहीर आहे. त्यातले पुलं काढून टाकले तर ते पुस्तक तेवढे ग्रेट आहे का?

पहिलं विधान मान्य. दुसऱ्याबाबतीत माझं पूर्ण विरुद्ध मत आहे. त्यातला पुलं यायच्या आधीचा भाग वाचनीय आहे. पुलंनंतर बाई फार आत्मसमर्थक, तक्रारी होतात - आणि पुलंच्याच गोष्टी सांगतात. त्याचा कंटाळा येतो. तो पहिला भाग सुद्धा दुसऱ्यांदा वाचताना तितका आवडत नाही - म्हणजे ग्रेट नाही.

शुचि's picture

27 Feb 2010 - 7:22 pm | शुचि

लोकांना प्रसिद्ध व्यक्तिमत्वांच्या खाजगी आयुष्याबद्दल असलेल्या (विकृत?) कुतुहलामुळे

विकृत ....... नाही ! आपल्याला जी व्यक्ती आवडते तिच्याबद्दल जाणून घ्यावसं वाटतं. केवळ वरवरचे कुतूहल नव्हे तर एक सखोल आदरमिश्रीत उत्सुकता असते. या व्यक्तीचा माईंड्स्केप जाणून घ्यावासा वाटतो. एक तिच्या आयुष्याचा अभ्यास करावासा वाटतो. .... निकोपतेने, चिंतनातून.

बाकी साधारण आयुष्य अनेक असतात हो. जी ना तुम्हाला स्टर करतात ना इच्छा होते त्यांच्यात डोकावण्याची.

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

शैलेन्द्र's picture

1 Mar 2010 - 8:47 pm | शैलेन्द्र

"आपल्याला जी व्यक्ती आवडते तिच्याबद्दल जाणून घ्यावसं वाटतं. केवळ वरवरचे कुतूहल नव्हे तर एक सखोल आदरमिश्रीत उत्सुकता असते."

ह्म्म्म्म, पण बर्‍याचदा जितके खोल जावे तितका आदर कमी होत जातो आणि मग दिसतो एक निखळ माणुस,... आपल्याइतकाच मातिचा, आपल्याइतकाच गढुळ...(हे खासकरुन कलाकारांबद्दल खरं आहे)

म्हणुन आदरणीय कलाकारांच्या कलेबद्दल खोल जावे, पण आयुष्याबद्दल नको असं वाटत.

खाली माझ्या आवडीची काही नावे देत आहे. सर्वच पुस्तके सुन्दर आहेत. पण त्यातही मला जी विशेष आवडतात ती नावे बोल्ड केलेली आहेत.

वैचारीक लेखसन्ग्रह
बखर राजधानीची - दत्तप्रसाद दाभोळकर
प्रकाशवाटा - दत्तप्रसाद दाभोळकर
गद्धेपन्चविशी - आनन्द नाडकर्णी
पैस - दुर्गा भागवत

कादम्बरी
रारन्ग ढान्ग प्रभाकर पेन्ढारकर
पाषाण - शर्मिला गाडगीळ (Ten Little Niggers - Agatha Christie चा अनुवाद)
शाळा - मिलिन्द बोकील

ऐतिहासिक चरित्रात्मक कादम्बरी -
सम्भाजी - विश्वास पाटील
दुर्दम्य (लोकमान्य टिळक यान्च्या जीवनावर)
महानायक (सुभाषचन्द्र बोस) - विश्वास पाटील
मराठी माणसाची गीता - राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरन्दरे

काव्यसन्ग्रह
ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
एल्गार - सुरेश भट

जी. ए. कुळकर्णी -
रमलखुणा
सान्जशकुन
पिन्गळावेळ
माणसे - अरभाट आणि चिल्लर

नील_गंधार's picture

26 Feb 2010 - 12:06 pm | नील_गंधार

वालावलकरांच्या बाकी शुन्य बद्दल काय बोलावे.
संजोपरावांची प्रतिक्रिया बोलकी आहे.तद्दन भंपक पुस्तक.

गिरिश कुबेर ह्यांची सर्वच पुस्तके वाचनीय आहेतच.
तसेच प्रकाश आमटेंचे "प्रकाशवाटा",अच्युत गोडबोलेंचे किमयागार,अर्थात हि देखील वाचनीय पुस्तके.

नील.

अभिरत भिरभि-या's picture

26 Feb 2010 - 12:49 pm | अभिरत भिरभि-या

येथे हे वाचलंत का? या शीर्षकाखालच्या पुस्तकांची यादी चांगली आहे. अर्थात सर्व पुस्तके नव्वदोत्तरी नाहीत.

प्रचेतस's picture

26 Feb 2010 - 1:42 pm | प्रचेतस

वरील प्रतिक्रियांमध्ये बर्‍याच पुस्तकांची माहिती मिळाली पण त्यात वाचकांची बदललेली आवड प्रतिबिंबित होते. एकुणच यादीत कादंबर्‍या फारश्या आढळल्या नाहीत. चरीत्रे, वैचारीक लेख, आरोग्य, पाककला, नवकथा, धार्मिक पुस्तके यांनीच वाचकांच्या मनाचा कब्जा घेतला आहे असे वाटते. याला कारण म्हंजे श्री. ना. पेंडसे, गोनीदा, जयवंत दळवी, खांडेकर, आपटे, मधु मंगेश कर्णिक ई. प्रतिभावान कादंबरीकारांची नव्वदोत्तरीतील वानवा की नविन लेखकांचा कादंबर्‍यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन. अर्थातच सध्याही काही चांगले कादंबरीकार आहेतच पण ते अपवादात्मकच.
---
(कादंबरीप्रेमी) वल्ली

मेघना भुस्कुटे's picture

26 Feb 2010 - 2:07 pm | मेघना भुस्कुटे

राज्य राणीचं होतं - सतीश तांबे (कथा)
मी पुतनामावशी - सतीश तांबे (नावाबद्दल खात्री नाही. चू.भू.दे.घे. पण नावात 'पूतना' आहे इतकं नक्की.) (कथा)
मास्तरांची सावली - कृष्णाबाई सुर्वे (आत्म.)
छोट्याश्या सुट्टीत - सचिन कुंडलकर (नाटक)
सिगारेट्स - मनस्विनी लता रवींद्र (नाटक)
आणि तरीही मी - सौमित्र (कविता)
धुळीचा आवाज - कविता महाजन (कविता)
अंत ना आरंभही - अंबिका सरकार (कादंबरी)
त्या वर्षी - शांता गोखले (कादंबरी)
सत ना गत - राजन खान (कादंबरी)
जातवान आणि विनशन - राजन खान (लघुकादंबरी)
ओमियागे - सानिया (कथासंग्रह)
भूमी - आशा बगे (कादंबरी)
तेंडुलकरांचे ललित लेखन (तेंच्या दिवाळी अंकातल्या ललित लिखाणाचे संग्रह १, २)
कादंबरी १ - तेंडुलकर (झेपली नाही)
कादंबरी २ - तेंडुलकर (फारशी भिडली नाही)

वर बरचंसं लोकांनी लिहिलंच आहे. अजून आठवेल तशी लिहीन.

नंदन's picture

26 Feb 2010 - 2:30 pm | नंदन

'नाटक - एक पडदा आणि तीन घंटा' : नाटकातील काल आणि अवकाश यांचा अभ्यास - राजीव नाईक, अक्षर प्रकाशन

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मेघना भुस्कुटे's picture

26 Feb 2010 - 3:04 pm | मेघना भुस्कुटे

हे पुस्तक म्हणजे माझं खाजगी प्रकाशन असल्यासारखा लोकांना आग्रह केला, शिफारस केली, कटकट केली; पण कुणी काही फीडब्याक काही द्यायला तयार नाही.
कुणीतरी आहे का हो हे पुस्तक खूप आवडणारं? माझा एकटेपणा संपवा...

आनंदयात्री's picture

27 Feb 2010 - 10:12 pm | आनंदयात्री

>>तेंडुलकरांचे ललित लेखन (तेंच्या दिवाळी अंकातल्या ललित लिखाणाचे संग्रह १, २)

'हे सारे कोठुन येते' असे नाव आहे का ? का ही पुस्तके अजुन वेगळी ?

मुक्तसुनीत's picture

28 Feb 2010 - 12:48 am | मुक्तसुनीत

हे निराळे.
बहुदा तेंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले.

मुक्तसुनीत's picture

27 Feb 2010 - 1:23 am | मुक्तसुनीत

काही पुस्तकांबद्दल आंतरजालावर चर्चा झाल्यात त्यांचे दुवे देतो :

बाकी शून्य : http://www.misalpav.com/node/1906
भिन्न : http://www.misalpav.com/node/6202
शाळा : http://www.misalpav.com/node/659

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Feb 2010 - 2:59 am | अक्षय पुर्णपात्रे

यांचे नाव वाचूनच गार पडलो. यांच्याविषयी काही माहिती उपलब्ध आहे का?

वरील प्रतिसाद बाद समजावा. ते पुणे विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. असे नाव असलेल्या माणसाने नावासमोर डॉ लावण्याची गरज नसावी. (डॉ. विद्यासागर पंडित यांचे संकेतस्थळ )

सन्जोप राव's picture

27 Feb 2010 - 6:03 am | सन्जोप राव

असे नाव असलेल्या माणसाने नावासमोर डॉ लावण्याची गरज नसावी.
असे कसे म्हणता? हल्ली कुणीही नावासमोर डॉ. लावतो....
सन्जोप राव
कुछ और जमाना कहता है, कुछ और है जिद मेरे दिल की
मैं बात जमानी की मानूं, या बात सुनूं अपने दिलकी

राजेश घासकडवी's picture

28 Feb 2010 - 2:15 am | राजेश घासकडवी

असे नाव असलेल्या माणसाने नावासमोर डॉ लावण्याची गरज नसावी.
असे कसे म्हणता? हल्ली कुणीही नावासमोर डॉ. लावतो...

मीही असेच म्हणतो. आणि त्यांचं नाव प्रा. डॉ. विद्यासागर पंडित आहे!
पण त्यांची मुंज झालेली आहे का ते सांगा आधी! नसल्यास या सर्वाला काडीचाही अर्थ नाही.

डॉ. राजेश घासकडवी

अजुन कच्चाच आहे's picture

27 Feb 2010 - 12:36 pm | अजुन कच्चाच आहे

स्वातंत्र्यसंग्रामातील एका स्थित्यंतराच्या कालावधीतील राजकारणावरील
"लोकमान्य ते महात्मा" - प्रा. सदानंद मोरे.
.................
अजून कच्चाच आहे.
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?

अजुन कच्चाच आहे's picture

27 Feb 2010 - 12:51 pm | अजुन कच्चाच आहे

पुनःप्रकाशीत, अनुवादीत पण संग्राह्य
"मानवजातीची कथा" - मुळ ले. डॉ. हेन्री थॉमस, - अनु. साने गुरूजी....
जगभरातील इतिहासकालीन नेत्यांच्या, व्यक्तीमत्वांच्या गुणा अवगुणांचा वेगळ्या दृष्टीकोनातून केलेला विचार.
.................
अजून कच्चाच आहे.
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?

भोचक's picture

1 Mar 2010 - 9:48 am | भोचक

भारत सासणे, राजन गवस, आशा बगे हेही वाचनीय लेखक आहेत. राजन गवस यांचं कळप छान आहे.
सुभाष अवचट- स्टुडिओ
भानू काळे- बदलता भारत
संपादीत - बापलेकी
मीना प्रभूंची प्रवासवर्णने (आवड असल्यास)
विजय पाडळकरांची चित्रपट विषयक पुस्तके- नाव चाललेली आहे आणि आता नवीन आलेले गंगा आये कहां से.
प्रतिभा रानडेंची पाकिस्तानवरची नवी ताजी पुस्तके आली आहेत. १९४७ ते ७१ आणि बहुधा अशांत पाकिस्तान. याच विषयावर माधव गोडबोलेंचे फाळणीचे हत्याकांड.

बाकी आठवेल तशी सुचवेन.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

शुचि's picture

1 Mar 2010 - 9:40 pm | शुचि

मला तर "शोभा डे" चं "स्टारी नाइट्स" च भाषांतर मला वाटतं .... भयंकर आवडलं होतं.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)