दुसऱ्या महायुद्धाची आपत्ति जगावर लोटनारा हिटलर , याचे व्यक्तिमत्व होते तरी कसे ? या विषयी आजवर खुप लिहिले गेले व पुढेही लिहिले जाईल. काही ना तो देशभक्त वाटतो तर काहीना माथेफिरू . युद्धानंतर जन्मलेल्या नव्या पिढीला मात्र हिटलर प्रिय नाही. जर्मनीवर संकटे आणणारा व एक जर्मन पिढी नष्ट करणारा मनुष्य म्हणुनच जर्मन तरुण त्याच्याकडे पाहतात. ज्याला नवनाझीवाद म्हणतात अशी काही माणसे जर्मनीत आहेत, पण ती फारच अल्पसंख्य आहेत. १९३० पर्यंत हिटलर जर्मनी मध्ये फारसा कुणाला माहित नव्हता त्याचा उदय व त्याला मिळालेली सत्ता ही उदारमतवादी जर्मनीच्या इतिहासातील एक अपघात आहे.
हिटलर चे विचार फार एकांगी व टोकाला जाणारे होते . व आपल्या कृतीच्या परिणामांचा विचार तो करीत नसे. असे एकारालेल्या विचारांचे व टोकाला जाण्याची मनःस्तिथी असलेले लोक सर्व देशात सर्वकाली आढ़लतात . पण त्यांच्या हातात सत्ता येत नसते. हिटलर च्या हाती सत्ता पराकोटीची एकवटली आणि त्याने सर्व जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाइत ढकलले . चर्चिल सारखे नेते नंतर ही म्हनत होते की, "दुसरे महायुद्ध कोणत्याही परिस्थितीत टालायला हवे होते." जर्मनीतील सत्तर टक्के पुरुष - प्रजा या महायुद्धात नष्ट झाली. इतके बलिदान देउनही हिटलर ला युरोपच्या नकाशात थोडाही बदल करता आला नाही. म्हणुनच जगाच्या इतिहासात हिटलर एक क्रूरकर्मा म्हणुनच सदैव नोंदलेला राहील.
मिपाकराना हिटलरबद्दल काय वाटत..........???
प्रतिक्रिया
24 Feb 2010 - 2:06 pm | क्लिंटन
मागे मिपावर नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकावर एक चांगली चर्चा झाली होती. त्या चर्चेत मी लिहिलेली प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे होती (माझे हिटलरविषयीचे मत आजही तेच आहे).
>>हिटलरसारख्यांची भलामण मला तरी खेदजनक वाटते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक म्हणून उत्तम असले तरी बर्याचदा एकांगी वाटते. हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ उरत नाहि.
१००% मान्य. हिटलरने व्हर्सायच्या तहाच्या नामुष्कीतून जर्मनीला वर आणले आणि १९३८ पर्यंत जर्मनी युरोपातील सर्वात बलिष्ठ देश झाला.त्याचे श्रेय हिटलरला द्यायलाच हवे.१९३६ मध्ये हिटलरने पहिल्यांदा र्हाईनलँड वर ताबा मिळवला. र्हाईनलँड हा एकेकाळचा जर्मनीचा प्रांत व्हर्सायच्या तहाने फ्रान्सला देण्यात आला होता.तेव्हा र्हाईनलँडवरील ताबा पूर्णपणे समर्थनीय होता.पण इतर देशांवरील केलेले आक्रमण खचितच नाही.
हिटलरने १९३८ मध्ये ऑस्ट्रीयावर रक्ताचा एक थेंब न सांडता थेंब मिळवला.ऑस्ट्रीयाचे चॅन्सेलर शुशेनीग यांच्यावर दमदाटी करून आणि स्थानिक सूर्याजी पिसाळ सेयस इन्कार्ट याच्या मदतीने हिटलरने ऑस्ट्रीयावर ताबा मिळवला. त्यामागचे हिटलरचे कारण ऑस्ट्रीयन जनता जर्मन भाषा बोलते हे होते. त्यासाठी ऑस्ट्रीयन जनतेमधून कोणतीही चळवळ उभी राहिली नव्हती हे ध्यानात घ्यायला हवे. तशीच गोष्ट सुडेटनलँडची. झेकोस्लाव्हाकियाचा सुडेटनलँड हा प्रांत जर्मन भाषिकांचा आहे म्हणून तो जर्मनीचा भाग व्हायला हवा असा हिटलरचा दावा होता.त्यावेळी इंग्लंड, फ्रान्स या महासत्तांनी झेकोस्लाव्हाकियाला न विचारताच हिटलरपुढे लोटांगण घालत सुडेटनलँड परस्पर जर्मनीला देऊन टाकले. त्यानंतर काही महिन्यातच हिटलरने उर्वरीत झेकोस्लाव्हाकियावर आक्रमण करत तो देश गिळंकृत केला.त्याचे समर्थन कसे होऊ शकेल? त्यानंतर हिटलरने जेव्हा पोलंडमधील डँन्झिग बंदरावर हक्क सांगितल्यानंतरच जगाचे डोळे उघडले.पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि जगाला दुसर्या महायुध्दाच्या कठिण काळातून जावे लागले.
हिटलरने इंग्लंड आणि रशियाचा मोठा भाग वगळता इतर सर्व युरोप पादाक्रांत केला होता. त्या भागातील जनतेला किती हालअपेष्टांना सामोरे जावे लागले याचे यथार्थ चित्रण नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकात अजिबात नाही.त्या पुस्तकात होलोकॉस्ट वर केवळ एक प्रकरण आहे. मला वाटते त्या हालअपेष्टांचे चित्रण कोणत्याही पुस्तकात होऊ शकणार नाही. युध्दस्य कथा रम्या या न्यायाने सामरीक डावपेच वाचायला खरोखरच मजा येते.पण जर आपल्याला क्षणभर १९४० च्या दशकातील नाझी अंमलाखालील युरोपात कल्पनेने जाता आले तर हिटलरला क्रूरकर्मा हे एकच विशेषण देता येऊ शकते हे ध्यानात येईल.
माझा स्वतःचा फ्रँक कॅप्रा यांच्या why we fight--Battle for Russia आणि तत्सम अनेक माहितीपटांचा संग्रह आहे.आणि त्या काळात बनवलेल्या माहितीपटांमधील दृष्ये बघताना अंगावर खरोखर शहारा येतो. हिटलरच्या समर्थकांनी खालील गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकते ते सांगावे--
१) पोलंडमध्ये ५० लाखांहूनही अधिक नागरीकांच्या कत्तली. त्याचप्रमाणे इतर देशांमध्येही काही हजार पासून काही लाख लोकांच्या कत्तली.
२) त्याचप्रमाणे युक्रेन, क्रायमिया यासारख्या रशियाच्या भागांमध्ये जनतेवर जरब बसावी म्हणून जागोजागी लोकांना जाहिरपणे फाशी देणे, लेनिनग्राडचा वेढा आणि त्या शहरातील लोकांच्या त्यामुळे झालेल्या हालअपेष्टा
३) नाझी वैदूंनी केलेले अमानवीय प्रयोग
४) नाझींनी जिंकलेल्या भागातून विशेषतः रशियातून गुलाम म्हणून जर्मनीत आणलेल्या हजारो रशियन स्त्रिया. त्यांना कोणत्या प्रकारची वागणूक दिली हे सांगायलाच हवे का?
इथे दिलेली यादी खूपच थोडी आहे.त्यात इतर अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. पण या गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकेल? आपण इंग्रजांनी जालियनवाला बागेत काही शे नि:शस्त्र भारतीयांना ठार मारले म्हणून इंग्रजांच्या नावाने खडे फोडतो. अर्थात ते योग्यही आहे पण त्याचवेळी लाखो लोकांच्या कत्तली करणार्या हिटलरचे समर्थन कसे करू शकतो?
आपण भारतीय सुदैवाने दुसरे महायुध्द या भयंकर प्रकारापासून दूर होतो.त्यामुळे हिटलरचे समर्थन करणे आपल्यासाठी खूपच सोपे आहे. पण हिटलरच्या छळछावण्यांमध्ये मरण पावलेल्या लाखो निरपराध लोकांच्या आत्म्यांना सामोरे जाऊन हिटलरचे समर्थन कोणी करू शकेल का?
भारतीयांना पटेल अशी तुलना करायची झाली तर हिटलरची तुलना केवळ गझनीच्या महंमदाबरोबर करता येईल.दोघेही क्रूरकर्मे, दोघांनीही लाखो लोकांच्या कत्तली केल्या, दोघांनीही अपरिमित लूटमार केली ! जर हिटलरचे समर्थन आपण करत असाल तर गझनीच्या महंमदाचे पण आपण समर्थन करणार का?का परदु:ख शीतलम असे म्हणत हिटलरच्या कृत्यांकडे कानाडोळा करणार?
हिटलरच्या मते जगात केवळ जर्मन आर्यवंश श्रेष्ठ होता.वंशात आणि रक्त्तात सरमिसळ झाली तर कमी दर्जाच्या वंशाचे लोक जन्माला येतात हे हिटलरचे तत्वज्ञान होते.आणि अशा कमी वंशाच्या लोकांना जगायचा अधिकार नाही (किंवा त्यांना गुलाम बनविणे हा जर्मन आर्यवंशीयांचा अधिकार आहे) असे हिटलरचे म्हणणे होते. तेव्हा हिटलरच्या मते भारतीय पण कमी दर्जाचेच होते असे म्हटले तर त्यात काय चुकले?सुदैवाने हिटलरचे भारतावर आक्रमण झाले नाही. पण जर का ते झाले असते तर भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या प्रदेशात हिटलरला आपली रक्ताची तहान भागविणे सहज शक्य होते.जर मूठभर इंग्रज (जे हिटलरपेक्षा बरेच जास्त सुसंस्कृत होते) ते भारतावर १५० वर्षे राज्य करू शकले तर सशस्त्र क्रूरकर्म्या नाझींनी भारताचे काय केले असते?इंग्रज राजवटीत जालियनवाला बाग सारख्या काही घटना घडल्या. नाझी राजवटीत तर गावोगावी जालियनवाला बाग झाले असते. आणि तरीही आपण हिटलरचे समर्थन केले असते का?
कानिटकरांचे पुस्तक हे एक पुस्तक म्हणून चांगले असले तरी केवळ तेच पुस्तक वाचले तर हिटलर हा एक चांगला राज्यकर्ता होता पण रणांगणावर केलेल्या काही चुकांमुळे त्याचा पराभव झाला असे मत बनू शकेल.आणि ते धोकादायक आहे.
आणखी थोडे:
हिटलरने दुसरे महायुध्द सुरू करून इंग्रजांचे पेकाट मोडले आणि त्यामुळे भारताचे स्वातंत्र्य अनेक वर्षे जवळ आले यात शंका नाही. पण भारताला स्वातंत्र्य मिळावे या कारणाने हिटलरने युद्ध चालू केलेले नव्हते.त्यामुळे त्याचे श्रेय हिटलरला द्यायची काही गरज नाही. आणि मूळ प्रतिसादात उल्लेख केल्याप्रमाणे हिटलरचा हल्ला भारतावर झाला असता तर मात्र भारतात रक्ताचे पाट वाहिले असते हे मात्र नक्कीच.तेव्हा हिटलर हा भारतासाठी चांगला की वाईट याविषयी मतमतांतरे असू शकतात. माझ्या मते तरी तो भारतासाठी वाईटच ठरला असता.
---------
विल्यम जेफरसन क्लिंटन
वसतीगृह क्रमांक १९ खोली क्रमांक ८
भारतीय प्रबंध संस्थान
वस्त्रापूर
अहमदाबाद-३८००१५
गुजरात
---------
24 Feb 2010 - 2:11 pm | नितिन थत्ते
गुपचुप राव, थोडं मागंपुढं शोधा की राव, मिपावर. मिपाकरांना काय वाटते ते सापडेल.
काय परत परत तेच तेच?
नितिन थत्ते