साअरडो पावासाठी विरजण

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in पाककृती
20 Feb 2010 - 12:54 pm

काहींचा हा प्रयोग फसला असल्याचे वाचले, म्हणून मला अनेकदा हमखास जमलेली पाककॄती देत आहे. साअरडो पावासाठी विरजण लावणं भारतात खूप सोपं आहे, पण हवाबंद पाश्चिमात्य घरांत थोडी काळजी घ्यावी लागते.
पूर्वसूचना: ही कॄती काही दिवसांची आहे. भारतात २-३ दिवसांत होते. हिवाळ्यात, थंड हवेच्या प्रदेशात हमखास फसणार. कॅलिफोर्निआत जमेल.

  1. कणकेचा लिंबाएवढा गोळा भिजवून घेणे. टीपः मीठ अजिबात न वापरणे. त्याने कवके मरतात. नळाच्या पाण्यात क्लोरिन अधिक असू शकते. त्यामुळेही कवके मरतात. ते टाळण्यासाठी पाणी न झाकता २४ तास ठेवावे, व मगच वापरावे. पाणी नंतर उडून जाते, त्यामुळे भिजवताना थोडे जास्त वापरावे. गोळा पोळ्यांच्या कणकेहून सैलसर असावा.
  2. आता गोळा किमान २४ तास (पण लागल्यास अधिक काळ) ठेवावा. गोळ्याला हवा लागली पाहिजे, उब मिळाली पाहिजे, पण उन लागता कामा नये (कारण पुन्हा तेचः उन्हाने कवके मरतात.) हवाबंद घरात राहात असाल, तर गच्ची, अंगण अशा उघड्या जागी ठेवावा. काचेच्या भांड्यात ठेवणे सोयीचे जाते, कारण आजूबाजूचा अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश शोषून उब मिळते. गोळ्याचा हवेशी संपर्क राहील, पण त्यास पक्षी वगैरे खाऊ शकणार नाहीत, असे झाकण वर लावावे. सैल विणीचे सुती फडके (मलमल वगैरे) उत्तम.
  3. आता निव्वळ प्रतीक्षा करा. गोळा वरून सुकू लागेल. थोडा सुकल्याने काही बिघडत नाही, पण वाटल्यास गोळ्यावर किंचित पाणी शिंपडून तो पुन्हा झाकावा. गोळ्याचा आकार किंचित वाढेल. त्याशिवाय प्रयोग यशस्वी होत असल्याची महत्त्वाची खूण म्हणजे गोळ्याला आंबूस वास येऊ लागतो. २४ तासांत यापैकी काहीच झाले नाही, तर अधिक काळ प्रतीक्षा करा. दर १२ किंवा २४ तासांनी तपासत जावे. गोळा अधिक आंबला, तर पुष्कळ फुगून तो पुन्हा सपाट होतो. असे झाल्यास प्रयोग चांगलाच यशस्वी झाला आहे, असे मानून पुढच्या पायरीस जावे. तसे झाले नाही तरीही पुष्कळ आंबूस वास येऊ लागला, की पुढे जावे. वेळप्रसंगी हातभट्टीसारखा वास मारू शकतो. घाबरू नये. अनरशांचे पीठ भिजवताना काय होत असे, ते घरच्या वयस्कर स्त्रीस विचारावे; धीर येईल. ;-)
  4. असा चांगला आंबलेला गोळा सीलबंद केल्यास फ्रीजमध्ये कित्येक दिवस टिकतो. पुढच्या पायरीमध्ये आधीचा गोळा वापरून त्यात थोडे अधिक पीठ व पाणी घालून पुन्हा आंबण्यास ठेवावा. हा गोळा भिजवताना धिप्पाड पुरुषाच्या मुठीएवढा असावा. पहिला गोळा चांगला तयार झाला असेल, आणि हवामान उबदार असेल, तर हा गोळा काही तासांत आंबू शकतो, पण २४ तास ठेवल्याने काहीच बिघडत नाही. फार तर पुन्हा पुष्कळ फुगून सपाट होईल.

पुरेसा आंबलेला हा गोळा साअरडोसाठी पाया म्हणून वापरता येतो. सीलबंद करून फ्रीजमध्ये कित्येक दिवस टिकतो. पुढची कृती सर्वसाधारण पावासारखीच आहे. या गोळ्यातील लिंबाएवढा भाग पाव किलो पिठास सहज पुरतो.

टीपः असा गोळा वापरून केलेला पाव जितका मंद गतीने आंबतो, तितका अधिक चविष्ट होतो. आपल्या इच्छेनुसार आणि सोयीनुसार पायाचे प्रमाण कमीजास्त करू शकता. त्यानुसार पाव मंद/जलद गतीने तयार होईल.

फसवणुकीची टीप अर्थात निर्वाणीचा उपायः हा प्रयोग फसल्यास पहिला लिंबाएवढा गोळा भिजवताना यीस्टचे ५-१० दाणे टाकावे. बाकी कृती वरीलप्रमाणेच. शुभेच्छा!

- चिंतातुर जंतू :S

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

20 Feb 2010 - 2:00 pm | राजेश घासकडवी

मी ज्या कृती वाचल्या होत्या त्यात द्राक्षाच्या सालीवरनं कवकं घेण्याच्या होत्या. हे मी नक्की करून बघेन.

राजेश

सुनील's picture

20 Feb 2010 - 5:00 pm | सुनील

भारतात आंबट पाव मिळत नाही (निदान माझ्या माहितीत तरी). तेव्हा करून पहायला हरकत नाही.

धन्यवाद.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिंतातुर जंतू's picture

22 Feb 2010 - 10:47 am | चिंतातुर जंतू

भारतात इतके उपद्व्याप करावे लागत नाहीत. स्वयंपाकघरात थोड्या उबदार ठिकाणी ठेवल्यास उत्तम विरजण जमते.
- चिंतातुर जंतू :S

रेवती's picture

20 Feb 2010 - 7:05 pm | रेवती

वा!! छान प्रयोग!
मला वाटायचे कि त्यात आंबट दही वगैरे वापरून चव आणत असतील.

रेवती

प्रकाश घाटपांडे's picture

20 Feb 2010 - 7:50 pm | प्रकाश घाटपांडे

मिभोच्या दुकानात
हेच विरजण वापरतात का?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मिसळभोक्ता's picture

23 Feb 2010 - 12:07 am | मिसळभोक्ता

विरजणाचे असेही काही उपयोग असू शकतात तर.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

शुचि's picture

23 Feb 2010 - 6:10 am | शुचि

>>वेळप्रसंगी हातभट्टीसारखा वास मारू शकतो. घाबरू नये>> =))
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

राजेश घासकडवी's picture

23 Feb 2010 - 6:39 am | राजेश घासकडवी

>>घरच्या वयस्कर स्त्रीस विचारावे; धीर येईल.
हे तर फारच गडबडा लोळायला लावणारं... =)) =))

(अनरशाच्या पिठाचा उल्लेख मी खुबीने टाळलेला आहे हे सूज्ञांच्या लक्षात आले असेलच... पण युद्ध व विनोदनिर्मितीत काही क्षम्य असतं. काय म्हणता, प्रेमात? - ते केव्हाच सोडलं हो....)

जंतूसाहेब चिंतातुर होऊ नका, हलक्यानेच घ्या. तुमची कृती नक्की करून बघणार आहे.