संगीत सम्राट तानसेनाची गणेशभक्ति

संजीव नाईक's picture
संजीव नाईक in काथ्याकूट
19 Jan 2010 - 5:30 pm
गाभा: 

संगीत सम्राट तानसेनाची गणेशभक्ति

जीवनात साहित्याप्रमाणे संगीतकलेला असाधारण स्थान आहे. संस्कृत सुभाषितकाराने "साहित्यसंगीत कलाविहिन; साक्षात् पशु: पुच्छविषाणहीनः" असे म्हणून गायनी कलेचे महत्त्व मान्य केलेले आहे. ललित कलांत तर संगीताचे साधन असलेला स्वर हा सूक्ष्म असल्यामुळे या कलेची साधना श्रेष्ठ मानली जाते. या कलेचा प्रभाव चराचर सृष्टीवर पडतो व म्हणूनच या कलेच्या खर्‍या आराधकांवर जातीची, देशाची व काळाची बंधणे घालणे अन्यायाचे आहे. हे सर्वमान्य आहे.

सूक्ष्म अशा संगीतकलेला साधना ही तितकीच प्रखर व एकाग्र असावी लागते. किंबहुना सम्पूर्ण जीवन या कलेच्या नि:सीम आराधनेवर ओवाळून टाकणार्‍या खां, रहिमत खां, नत्थूखां, भास्करबुवा बखले, यांसारख्या व्यक्तिंनाच खरा सूर सापडतो व प्रतिष्ठा मिळते अशी इतिहासाची साक्ष आहे. या एकान्त साधनेला उपासनेची जोड असली तर सोन्याहून पिवळे, उपासनेमुळे साधनेच्या गौरीशंकरावर आरुढ व्हावयाला मदत होते; त्यामुळेच विख्यात गायक इष्टदेवतेला आळवताना जी आलापी करतात त्याला 'परत्त्वाचा स्पर्श' होतो व त्यामुळे त्याच्या गायनी कलेला अभिनव रुप प्राप्त होत असते. संगीतकलेचा मुकुटमणी तानसेन याच्या बाबतीतही त्याची गणेशभक्ति उपकारक ठरली असे अनुमान करायला हरकत नाही.

मुसलमान गायक तानसेन हा गणेशभक्त कसा ह प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु वस्तुतः तानसेन हा वेदशास्त्रपारंगत ब्राम्हण घराण्यातला हे लक्षात ठेवले पाहिजे, त्याचे वडील ग्वाल्हेर भागातल्या केरट गावचे मकरन्द पाण्डे. भगवान शंकराची आराधना करुन त्यांनी पुत्रप्राप्ति करुन घेतली व हा पुत्र म्हणजेच विख्यात गायक तानसेन. सुरवातीला पाच वर्षापर्यंत मुका असणार्‍या तानसेनाला तत्कालीन विख्यात गायक स्वामी हरिदासांचे मार्गदर्शन लाभले व त्यांच पट्टशिष्य व त्यांच्या पठडीतला अप्रतिम गायक म्हणून तो प्रसिध्द झाला. त्याची कीर्ती सम्राट अकबराच्या कानी गेली व दरबारी गायक म्हणून त्याची नियुक्तिही झाली.

यातूनच पुढे बैजूबावराशी तानसेनाचा संघर्ष निर्माण होऊन त्यात तानसेनाला पराजय पत्करावा लागल्याची दंतकथा प्रसिध्द आहे. या पराजयामुळे तानसेनाला जी उपरती झाली त्यातच त्याच्या गणेशभक्तिचे व नंतरच्या भक्तिपरक गायकीचे मूळ सापडते. सुदैवाने तानसेनाने लिहिलेली काही भक्तिपूर्ण पदे आता उपलब्ध झालेली आहेत. या काळात तानसेनाचा संबध हरिभक्त व विख्यात कवी सूरदासांशी आला व त्यामुळे तानसेनाची भक्ति दृढ झाली असावी असे म्हणण्यास हरकत नाही.

मंगलमूर्ती गणेशाचे नामस्मरण का करावे याचे उत्तर देताना तानसेन एका पदात म्हणतो 'प्रथम नाम गणेश को लेहूँ, आ सुमिरे सर्व सिध्दि काज' कारण तोअ 'विघन-विनाशक' आणि 'मंगल-नायक' आहे. या भावनेनेच तानसेनाला 'लम्बोदर नाम जपत सकल सृष्टी' चा भास होतो व 'सब देवन सिरताज' व 'सुर नर मुनि शेष राज' या शब्दांत हा कवी त्याचा गौरव करताना दिसतो. गणेशाच्या प्रचलित पूजेत त्याची बारा नांवे गोवलेली आहेत व रोज त्यांचे पठण करणार्‍या व्यक्तिच्या बाबतीत विघ्नांचे निवारण होते व इष्टफलप्राप्ति होते असे म्हटलेले आहे याच धर्तीवर तानसेनाने एके ठिकाणी 'एकदंत गजबदन विनायक // विघन विनाशक हे सुखदायी // लम्बोदर गजानन जगवन्दन // शिवसुत धुंडीराज सब वरदायी // गौरीसुत गणेश // मूषकवाहन फरसिधर स्कंद सुक्त रिध्द सिध्द //' असे म्हणून 'तानसेन तेरी स्तुति करत // कटो क्लेश, प्रथम वन्दन करत' या शब्दात गणेशाला वन्दन केलेले आहे. तुम हो गणपति देव बुध्दिदाता // सीस धरै गज सुण्ड // जेहि जेहि घ्यावै तेहि फल पावै ' असे म्हणणारा तानसेन, 'नमो नमो ऋध्दि सिध्दि के स्वामी' या शब्दांत गणेशाला वन्दना करणारा तानसेन व विद्याधर गुणनिधान' असलेल्या गणेशाचेच ध्यान ब्रह्मा विष्णू आणि शंकर करीत असतात अशी प्रार्थना तानसेन प्रभु तुम ही को ध्यावै ब्रह्मा विष्णू महेश' या शब्दांत करणारा तानसेन खर्‍या अर्थाने गणेशाचा हिन्दू भक्त वाटला तर नवल नाही. अशा भक्तिपरक काव्यरचनेमुळे तानसेनाला उत्तरायुष्यात शान्ती व समाधान लाभले असावे. तानसेनाची ग्णेशभक्ति कोणाही गणेशभक्ताला प्रेरक व मंगलकारक ठरेल.

गणेशभक्त
संजीव
http:\\vastuclass.blogspot.com
श्री डॉ. मो. दि. पराडकर यांनी वरील विषयाचा शोधनिबंध लिहीलेला आहे.

प्रतिक्रिया

प्रशांत उदय मनोहर's picture

19 Jan 2010 - 5:51 pm | प्रशांत उदय मनोहर

आकर्षक माहितीबद्दल धन्यवाद.

गणपती बाप्पा मोरया.

आपला,
(गणेशभक्त) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

क्रान्ति's picture

19 Jan 2010 - 9:19 pm | क्रान्ति

खूप चांगली माहिती दिलीय. :)

क्रान्ति
अग्निसखा

अमोल केळकर's picture

20 Jan 2010 - 10:44 am | अमोल केळकर

खुप छान आणि वेगळ्या विषयावर माहिती मिळाली
धन्यवाद

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

पक्या's picture

20 Jan 2010 - 1:29 pm | पक्या

मंगळवारी (ता. जाने. १९) गणेश जन्म दिवस होता. त्यानिमित्ताने लेख टाकून छान माहिती पुरविली. धन्यवाद.

गणपती बाप्पा मोरया.

जय महाराष्ट्र , जय मराठी !