ऊंधियु
साहित्य :
भाज्या : लहान वांगी, लहान कांदा व बटाटा, कंद, सुरण, राजळी केळी, घेवडा, तुरीच्या शेंगा,
ओल्या वालाच्या शेंगा, मटार, मेथी आणि सुरती पापडी ( ही नसेल तर ऊंधियु होणार नाही.)
मसाला : ओलं खोबरं, कोथिंबीर, जीरा पावडर, हळद, तिखट, ओली लसूण, मीठ, लिंबाचा रस, साखर, दाण्याचं कूट. कच्चा मसाला ( धने,जीरं,लवंग,दालचिनी थोडं भाजून त्याची पूड.चवीपुरतं मीठ)
इतर : तेल, पाणी, जीरं, मोहरी, बेसन, खायचा सोडा
कृती : प्रथम मसाला करून घेणे : ओली लसूण बारीक वाटून घ्या.
सर्व साहित्य एकत्र करून (लसणीसह) बाजूला ठेवा.हा मसाला ऊंधियुची चव ठरवतो त्यामुळे तिखटाचे प्रमाण यामधे कमी जास्त अर्थात प्रत्येकाच्या चवीप्रमाणे ठेवणे सोपे जाते.
मेथीचे गोळे : ( अर्थात मुठिया ) :
मेथी स्वच्छ निवडून व धुवून बारीक चिरून थोडे मीठ लावून ठेवावी आणि १० मिनीटानी हाताने गच्च पिळून घ्यावी जेणेकरून कडवटपणा कमी होईल.
मग त्यात बेसन,खायचा सोडा,चवीप्रमाणे मीठ,तिखट घालून घट्ट मळून घ्यावे व त्याचे लहान गोळे करून तेलात तळून घ्यावे.
लहान वांगी थोडं देठ ठेवून मागील भागावर आडवी उभी चीर मारून घ्यावी.कांदा व बटाटा सुद्धा सोलून अशाच प्रकारे कापावा.
राजळी केळी सालासकट कापावी. एका केळ्याचे ५ तुकडॆ करावे.
कंद , सुरण सोलून चौकोनी तुकडे करून घ्यावे व तेलात तळून काढावे आणि त्यावर थोडॆ मीठ व तिखट शिंपडावे.
घेवडा व सुरती पापडी निवडून घ्यावी , तूर, वाल व मटार शेंगा सोलून दाणे काढावे. हा सर्व शेंगांचा माल शिजवून घ्यावा.
वांगी,कांदा,बटाटा व केळी कच्चीच ठेवावी.
एका कढईत तेल व एका पातेल्यात पाणी गरम करण्यास ठेवावे.
एका जाड बुडाच्या पातेल्यात थोडॆ तेल गरम करून त्यात मोहरी , जीरं घालून फ़ोडणी तयार करावी. त्यात फ़क्त रंगापुरते हळद व तिखट घालावे.
मग त्यात सर्व कच्च्या भाज्या वांगी,कांदा,बटाटा घालावा २ मिनीटे ढवळून मग थोडा मसाला व मुठिया घालावे.
आता ढवळू नये.
मग या मधल्या थरात केळी , कंद , सुरण व सर्व शेंगा व दाणे ( शिजवलेले ) घालून वरून सर्व मसाला व उरलेले मेथीचे गोळे घालावे.
आता त्यात गरम केलेल्यापैकी आधी तेल साधारणपणे ३ स्टील च्या डावा भरून घालावे व नंतर गरम पाणी घालावे.
साधारणपणे सर्वात वरच्या थराला जेमतेम दिसेल इतपतच पाणी घालावे.
मग घट्ट झाकण लावून मंद आचेवर पूर्णपणे १ तास ऊंधियु शिजू द्यावा. १ तासाने झाकण काढून लांब दांड्याच्या कालथ्याने खालपासून एकदा थोडं हलवून वाफ़ आली का ते तपासावे. परत झाकण ठेवून १५ मिनीटे शिजू द्यावे.
मग झाकण काढून नीट ढवळून वांगं , कांदा , बटाटा शिजला का ते बघून गरम गरम फ़ुलका आणि थंड ताकाबरोबर सर्व्ह करावे.
प्रतिक्रिया
10 Jan 2010 - 5:07 pm | अविनाशकुलकर्णी
आपल्या कडे भोगीला लेकुरवाली भाजि अस्ते तशिच हि दिसत आहे...
10 Jan 2010 - 5:33 pm | स्वाती२
यम्म! माझ्या नवर्याचा आवडता पदार्थ.
10 Jan 2010 - 8:47 pm | चित्रा
माझाही! एकेकाळी अजिबात बघायचे नाही मी, आईला हा पदार्थ एवढा का आवडतो तेही कळायचे नाही. पण मोठी झाल्यावर आवडायला लागला.
10 Jan 2010 - 5:37 pm | jaypal
सर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्स छे


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात
10 Jan 2010 - 7:07 pm | प्रियाली
काल रात्री उद्या करावा का काय असा विचार मनात डोकावला पण भाज्या आणण्यापासून तयारी असल्याने टाळण्याचे निश्चित केले आणि आज सकाळी सकाळी उंधियो नजरेस पडावा.
अतिशय आवडती डिश.
11 Jan 2010 - 6:52 am | सहज
लै भारी!
धन्यु !
11 Jan 2010 - 10:56 pm | खान्देशी
..छान रेसिपी !
12 Jan 2010 - 11:26 am | श्रीयुत संतोष जोशी
धन्यवाद.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
12 Jan 2010 - 12:21 pm | समंजस
छान पाककृती!!!
बर्याच दिवसांपासून विचार करत होतो ऊंधियु खाण्याचा(विकत आणून)
आता मात्र करून बघायचा विचार आहे :)
12 Jan 2010 - 1:24 pm | गणपा
सही रे संतोष.. मस्त पाकृ.
एकदा ट्राय मारायला हवा.
12 Jan 2010 - 1:40 pm | गणपा
प्रकाटाआ