मंगेश पाडगांवकरांची गीते

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
10 Mar 2008 - 12:24 pm

माझ्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची एक दृष्टी दिली. त्यांच्या या कवितांनी दिलेला संदेश पहा.

माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे !
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमीर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे !
----------------------------
या ओठांनी चुंबुनि घेइन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
----------------------------

कधी कधी ते जीवन जगण्याची स्पष्ट दिशा दाखवतात.

झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इषारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप आसून उशाशी
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी
----------------------------
वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी
सौदा इथे सुखाचा पटवून चोख घ्यावा
व्यवहार सांगती हा, ही माणसे शहाणी
कळणार हाय नाही दुनिया तुला मला ही
मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी
---------------------------

मनातला आनंद कसा व्यक्त करावा हे या शब्दात पहा.

अर्थ नवा गीतास मिळाला
छंद नवा अन्‌ ताल निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले ?
शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले
---------------------------
क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे
विरघळून चंद्र आज रक्तातुन वाहे
आज फुले प्राणातुन केशरी दिवा
रोजचाच चंद्र आज भासतो नवा
----------------------------
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेशा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
----------------------------
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
----------------------

तर वेदना कशी सहन करावी हे या शब्दात दिले आहे.

निःशब्द आसवांनी समजाविले मनाला
की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला
माझ्याच मी मनाशी हे गीत गायिले
मी बोलले न काही नुसतेच पाहिले
हृदयात दाटलेले हृदयात राहिले
-------------------
जन्ममृत्युचे लंघुनि कुंपण
स्थलकालाच्या अतीत उमलुन
प्रवासिनी मी चिरकालाची
अनाघ्रात ही उरले
मी चंचल हो‍उन आले
भरतीच्या लाटांपरि उधळित
जीवन स्वैर निघाले
-------------------
दुःखाने खचून न जाता जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोण ते देतात.

काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी ?
भान राधिके नुरे ऐकताच बासरी
बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा
सर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा
येथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा
------------------------
दुःख नको तुटताना
अश्रु नको वळताना
मी मिटता लोचन हे उमलशील तू उरी
शब्द शब्द जपून ठेव बकुळिच्या फुलापरी
------------------------

कांही गीतात ते बोलता बोलता जीवनातली कांही सत्ये सहजपणे सांगतात.

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ?
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे !
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
-------------------------
कधी बहर, कधी शिशिर, परंतू दोन्ही एक बहाणे
डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे
--------------------------

त्यांनी दिलेल्या कांही प्रतिमा मनाला भिडतात.

तुला ते आठवेल का सारे ?
दवात भिजल्या जुईपरी हे मन हळवे झाले रे
----------------------------
वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
ताऱ्यांत वाचतो अन्‌ या प्रीतिची कहाणी
पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची
----------------------------
मोर केशरांचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहु दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे
-----------------------

त्यांची ही ओळ माझ्या डोळ्यात पाणी आणते.

हात एक तो हळु थरथरला
पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी अजून जळती वाती
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
--------------------------

आज ऐंशी वर्षाच्या वयातला त्यांचा उत्साह पाहून म्हणावेसे वाटते.

दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
मोजावी नभाची खोली
घालावी शपथ ओली
श्वासात चांदणे भरायचे

थरारे कोवळी तार
सोसेना सुरांचा भार
फुलांनी जखमी करायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
-------------------------

ही अगदी थोडी उदाहरणे झाली. पाडगांवकरांच्या गीतांचा खजिना अपार आहे.

प्रतिक्रिया

सृष्टीलावण्या's picture

10 Mar 2008 - 2:26 pm | सृष्टीलावण्या

आजच सकाळी एफएम वर ऐकले.

ही अजून काही त्यांची गाणी. मराठीवर्ल्ड वर संपूर्ण वाचता येतील.

1. Ghan barasat aale भुमानंद बोगम मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
2. Aaj antaryaamee उषा मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
3. Jenvhaa tujhyaa bataannaa सुरेश वाडकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
4. Jaahalyaa kaahee chukaa लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
5. Kaan Hari, saang उषा मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
6. Bhaavanancaa too लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
7. Japoon chaal pori अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
8. Saavar re, saavar re लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर हृदयनाथ मंगेशकर
9. Maan velaavunee अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
10. Paanyaahoon saanj उषा मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
11. Pahileech bhet अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
12. Akherache yetil अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
13. Jari yaa pusoon शोभा जोशी मंगेश पाडगांवकर यशवंत देव
14. Dhuke daatalele अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
15. Vaatate sarva saangaave माहित नाही मंगेश पाडगांवकर माहित नाही
16. Asaa bebhaan haa लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर हृदयनाथ मंगेशकर
17. Maajhe jeevan gaane जितेंद्र अभिषेकी मंगेश पाडगांवकर पु ल. देशपांडे
18. Dharilaa vrithaa chhand सुरेश वाडकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
19. Ootha re Raaghavaa उषा मंगेशकर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे
20. Tujhe geet gaanyaasaathee सुधीर फडके मंगेश पाडगांवकर यशवंत देव
21. Shukrataaraa manda vaaraa अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
22. Kadhi bahar, kadhi shishir सुधीर फडके मंगेश पाडगांवकर यशवंत देव
23. Neej maajhyaa nandalaalaa लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
24. Door aarta saang kunee मधुबाला जवेरी मंगेश पाडगांवकर यशवंत देव
25. Shraavanaat ghan nilaa लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
26. Tulaa te aathavel सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे
27. Haat tujhaa haataatun अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
28. Ashee paakhare yetee सुधीर फडके मंगेश पाडगांवकर यशवंत देव
29. Sarva sarva visaroo de अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
30. Tyaa anaam veeraa माहित नाही मंगेश पाडगांवकर माहित नाही
31. Divas tujhe he अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
32. Shabda shabda japun सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे
33. Tee raatra kusumbee अरुण दाते मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
34. Bhet tujhee maajhee अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
35. Laajoon haasane हृदयनाथ मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
36. Dilyaa ghetalyaa अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
37. Yaa janmaavar, yaa अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
38. Shabdaavaachun kalale जितेंद्र अभिषेकी मंगेश पाडगांवकर पु ल. देशपांडे
39. Kuthe shodhishee raameshwar सुधीर फडके मंगेश पाडगांवकर यशवंत देव
40. Sobateelaa chandra dete लता मंगेशकर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
41. Bhaatukaleechyaa khelaamadhalee अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
42. He haat ase सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे
43. Jhaalee phule kalyaanchee अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
44. Pausat tu bhijun aalis अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
45. Jeevanachya sohlyala jayache aahe अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
46. Aasvat hasanari prit kunachi अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
47. Hi har kunachi ? अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
48. Kale kale chanchal dole अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
49. Tu fule maluni अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
50. Budnar chandra aata सुरेश वाडकर मंगेश पाडगांवकर प्रभाकर पंडित
51. Radatach aalo yetana, pan अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव
52. Mi chachal houni aale सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर श्रीनिवास खळे
53. Mi bolale n kahi सुमन कल्याणपुर मंगेश पाडगांवकर विश्वनाथ मोरे
54. Pranam ha pranam ha मंगेश पाडगांवकर माहित नाही
55. Dukha jyane janile गजानन वाटवे मंगेश पाडगांवकर गजानन वाटवे
56. Lal fulani zulnari tu अरुण दाते मंगेश पाडगांवकर यशवंत देव

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विवेकवि's picture

10 Mar 2008 - 2:32 pm | विवेकवि

खुप छान वाटले
वाचून आन॑द झाला .......

विवेक वि.

तात्या विन्चू's picture

10 Mar 2008 - 2:38 pm | तात्या विन्चू

राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा
"उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गावचा वारा"
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

फक्त चार ओळी....पण खुप काही सान्गुन जातात...!

आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू

सांगा कसे जगायचे
क्ण्हत कुण्हत की गाणे म्हणत
तुम्हीच ठरवा

नंदन's picture

10 Mar 2008 - 5:13 pm | नंदन

पाडगावकरांच्या गाण्यांतल्या वेचक ओळी फार सुरेख निवडल्या आहेत. तुम्ही उल्लेख केलेल्या ओळींबरोबरच 'जाहल्या काही चुका'मधलं शेवटचं कडवंही अतिशय आवडतं.

संपता पूजा स्वरांची हात तू देशील का
दाटुनि काळोख येता, तू घरी नेशील का
पूर्णतेसाठीच या मी, सर्व काही साहिले

शिवाय 'आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना' या वर्णनाला काय म्हणावे!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आनंद घारे's picture

10 Mar 2008 - 10:29 pm | आनंद घारे

'जाहल्या काही चुका'मधलं शेवटचं कडवं मलाही अतिशय आवडतं. मी ते आधी शॉर्टलिस्ट केले होते. 'तीन्ही लोक आनंदाने भरुन राहूदेरे' यासारखी कांही गाणी संपूर्णपणे अक्षर अन अक्षर 'आउट ऑफ धिस वर्ल्ड' आहेत. पण आपण एका लेखात त्यातली किती घेणार?

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Mar 2008 - 11:45 pm | llपुण्याचे पेशवेll

कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या प्रतिभेला सलाम.
त्यांची सलाम कविता फार आवडली. :)
तसेच त्यांची एक 'गवताचे फूल' नावाची कविता माझ्या फार पूर्वी वाचनात आली होती.
'भिऊन तुझ्या शक्तिला
लवून करतील सारे मुजरे,
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे'
अशा आशयाचे एक कडवे आहे त्यात. कोणाला ही कविता पूर्ण माहीत असेल तर कळवावे. 'गवताचे फूल' असे नाव आहे कवितेचे.
पुण्याचे पेशवे

टिउ's picture

10 Mar 2008 - 10:32 pm | टिउ

कोंबडीच्या अंड्यामधुन बाहेर आले पिल्लु,
अगदी होते छोटे आणि उंचीलाही टिल्लु!

कोंबडी म्हणाली पिल्लुबाय,
सांग तुला हवे काय?
किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे;
आणुन देइन तुला हवे असेल ते खाणे!

पिल्लु म्हणाले, 'आई,
दुसरे नको काही,
छोट्याश्या कपामधे चहा भरुन दे,
मला एका अंड्याचे ऑम्लेट करुन दे!'

पिवळा डांबिस's picture

10 Mar 2008 - 11:01 pm | पिवळा डांबिस

मला विलक्षण भावणार्‍या काव्यपंक्ति,

पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबांचे, फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला,
गगनाचा गाभारा...

क्या बात है! याला बीईंग लार्जर दॅन लाईफ म्हणतात...

अवांतरः तुम्हाला माहिती आहे का की पाडगांवकर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते. तिथे दोन वर्षे करून झाल्यानंतर रक्तातील काव्य स्वस्थ बसू देईना म्हणून सोडून आर्ट्स ला गेले. मुळची कुशाग्र बुद्धी असल्याने त्यांची प्रतिभाही निराळीच झाली...
-डांबिसकाका

पिवळा डांबिस's picture

10 Mar 2008 - 10:52 pm | पिवळा डांबिस

मला विलक्षण भावणार्‍या काव्यपंक्ति,

पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबांचे, फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला,
गगनाचा गाभारा...

क्या बात है! याला बीईंग लार्जर दॅन लाईफ म्हणतात...

अवांतरः तुम्हाला माहिती आहे का की पाडगांवकर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते. तिथे दोन वर्षे करून झाल्यानंतर रक्तातील काव्य स्वस्थ बसू देईना म्हणून सोडून आर्ट्स ला गेले. तरी मुळची कुशाग्र बुद्धी असल्याने त्यांची प्रतिभाही निराळीच झाली...
-डांबिसकाका

पिवळा डांबिस's picture

10 Mar 2008 - 10:59 pm | पिवळा डांबिस

प्रतिक्रिया डबल आली.
आमचा संगणक झोपला असे वाटून दोनदा टिचकी मारली...
क्षमस्व.
-डांबिसकाका

काही काळ थबकवून टाकण्यात यशस्वी झाल्याचा परिणाम असावा..:)
ह्या 'मंगेशाला' माझा साष्टांग दंडवत!!

चतुरंग

सुवर्णमयी's picture

10 Mar 2008 - 10:54 pm | सुवर्णमयी

हे माझे आवडते काव्यसंग्रह आहेत.
छोरी मधली त्यान्ची एक कविता
तुला पाहिले मी हसतांना

ढ्गाळलेल्या उदास दिवशी
तुला पाहिले मी हसतांना
तशीच हट्टी करुन जिवण
जीव कुणाचासा घेतांना

आठवणीतिल निळे चांदणे
तीक्ष्ण बर्फ झाले गोठुनी
आणि हरवल्या क्षितिजावरची
जखमही आली पुन्हा दाटुनी

मला वाटले पुन्हा करावी
जखम तुझ्या हृदयातिल जागी
उकरुनि वरचे निळे चांदणे
अहेर द्यावी रात्र अभागी

डोळ्यातिल पण तुझ्या चांदण्या
दिसल्या थकलेल्या कोमुजुन
डोळ्याखाली डोहच काळे
ज्यात बुडाली नजर विस्कटुन

न बोलताही मला म्हणालीसः
स्मिते रंगवुन अशीच घ्यावी
जमेल त्याने ठिकर्‍यांवरती
रंगाची ठिगळे पसरावी

आणि भासले मला म्हणालिस
तशी च त्या अगतिक वाटेवर
'थकले रे..' शब्दांचे झाले
काळोखाचे खोल सरोवर

आणि कळले उरला केवळ
काळोखच दोघांना बुडवुन
डोळ्याखाली डोहच काळे
तिथे उभे एकटे सुनेपण

-मंगेश पाडगावकर

सुवर्णमयी's picture

11 Mar 2008 - 12:15 am | सुवर्णमयी

काळ्यानिळ्या वेदनेचा
झाला काळोखाला डंख
तेव्हा शपथ घालून
तोडलेस माझे पंख

ओ़ळखीच्या अंधारात
अनोळखी झालीस तू
..खोटे खोटे हासतांना
खोल किंचाळले हेतू

सारेच का खोटे होते?
काय सारी भूल होती?
पांगार्‍याला काट्यांआधी
लाल फुले आली होती?

माझ्या मनी काळोखात
भिनलेला डंख उरे-
वेदनेच्या पांगार्‍याचे
मला काटे, तुला फुले

(मंगेश पाडगावकर, छोरी)

सुवर्णमयी's picture

11 Mar 2008 - 12:22 am | सुवर्णमयी

तू असतिस तर
तू असतिस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातुन
एक दिवाणे नवथर गाणे

बकुळीच्या पुष्पापरि नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
ही जिप्सी मधली माझी एक आवडती कविता आहे.

प्राजु's picture

11 Mar 2008 - 12:26 am | प्राजु

सोनाली,
अप्रतिम कविता...सार्‍याच कविता इथे दिल्याबद्दल धन्यवद.

सारेच का खोटे होते?
काय सारी भूल होती?
पांगार्‍याला काट्यांआधी
लाल फुले आली होती?

पाडगांकरांच्या प्रतिभेला सलाम.
- (सर्वव्यापी)प्राजु

मैत्र's picture

21 Jan 2015 - 5:19 pm | मैत्र

अचानक हा धागा सापडला आणि वर आणावासा वाटला..
एक कविता - ६६ साली म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेली तरी आजही तितकीच लागू होते

पोपट

प्रवासात आगगाडीतून येताना
शेताच्या लाल लाल बांधावर
दिसला एक हिरवाहिरवागार पोपट.

मग पोपट हिरवेगार उडाला.
पोपट माझ्या मनात शिरला.
पोपट माझ्या मनात फिरला
मन हिरवेगार करीत,
विचार हिरवेगार करीत,
स्वप्ने हिरवीगार करीत.
पोपट बसला खांद्यावर
आणि क्षणभर मी झालो एक हिरवेगार झाड...

मी म्हटले, "मिस्टर पोपट, कसे काय?"
तो म्हणाला, "मिस्टर कवी, कसे काय?"
भलताच मिस्कील होता पोपट.
हिरवाहिरवागार पोपट.

प्रवासभर पोपट बोलत होता खूप.
प्रवासभर मीही बोलत होतो खूप.
पोपट म्हणाला, "मिस्टर कवी, करता काय?"
मी म्हटले, "नोकरी करतो."
पोपट म्हणाला, "नोकरीमध्ये करता काय?"
मी म्हणालो, " नोकरीमध्ये खोटे हसतो.
खोटे बोलतो. बंद गळ्याच्या मठठांना
शहाणे म्हणतो. लाचारांना शूर म्हणतो.
हलकटांना सज्जन म्हणतो.
समर्थाच्या श्वानांना सलाम करतो.
झकास करतो मूल्यांची पोपटपंची.
पहिलीला पगार घेतो :
रहाणीची मान जरा उंच करतो. "

पोपटाने माझ्या डोळ्यांत पाहिले :
मला भलतीच भीती वाटली.
वाटले, हा भूल घालून नेईल मला
हिरव्या हिरव्या पंखांवरून
लाल लाल बांधावर.
माझे एक प्रमोशन ड्यू होते :
पोपटाची मला खूप भीती वाटली.
पोपटाने पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांत पाहिले :
डोळे भरून माझ्या डोळ्यांत पाहिले
आणि तो उडून गेला.
हिरव्या हिरव्या पंखांवर
निळे निळे आभाळ झेलीत
लाल लाल बांधाकडे
पोपट एकटा उडून गेला.
--
मंगेश पाडगावकर
९-१०-१९६६
(साहित्य अकादमी विजेता काव्यसंग्रह -- सलाम)

मैत्र, हा धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद !
पाडगावकरांची गीते माझ्याही आवडीची.
पण 'सलाम' साठी मात्र माझा पास ! अशा कविता लिहिल्याशिवाय साहित्य अकादमी मिळालेच नसते का ? ती सलाम ही कविता तर खरोखर डोक्यात जाते. विदुषक पण तशीच. या कविता वाचताना गीतकार, प्रेमकवी पाडगांकरांमध्ये कोणा जिल्ब्यापाडू नवकवी संचारला की काय असं वाटून दचकुन जातो आपण.
अर्थात हे माझे वैयक्तिक मत, आवड वगेरे वगेरे... :)