खमंग खिचडी

जानकी's picture
जानकी in पाककृती
13 Dec 2009 - 10:46 pm

साहित्यः
चार माणसांसाठी:

२ वाटया शिजवलेला पांढरा भात (आदल्या रात्रीचा अथवा सकाळी शिजवून उरलेला असला तरी चालेल)
१ वाटी तुरीची शिजवलेली साधी फिकी डाळ (सकाळची उरलेली आमटी वा वरण असल्यास आधिक बरे)
२ काडया कढीपत्ता
१ पळी नारळाचा चव
१ मूठ कच्चे शेंगदाणे
सकाळच्या जेवणातील उरलेली (पातळ भाजी सोडून) कोणतीही फळभाजी (ऐच्छिक)
२ टे. स्पून जिरं
लांब चिरलेला १ मध्यम कांदा (ऐच्छिक)
पाव वाटी निवडलेली कोथिंबीर
अर्धी वाटी तेल
१ टी स्पून मोहोरी
प्रमाणात हिंग, हळद, लाल तिखट व मीठ
१ टे. स्पून सांबार मसाला

कृती:

१ पळी तेल कढईत तेल तापवून घ्यावे. त्यात १ टी स्पून मोहोरी घालून, ती तडतडू लागल्यावर १ टे. स्पून जिरं, पाठोपाठ चिमूटभर हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता आणि दाणे घालावेत. थोडेसे परतावे.

कांदा अथवा उरलेली भाजी असल्यास घालून एकदाच परतावे. वरून १ टी स्पून सांबार मसाला पावडर घालावी. परतून यात सकाळची आमटी अथवा ताजे वरण (जे available असेल ते) घालून १ वाटी पाणी घालावे. आता भात हाताने मोकळा करून यात सोडावा. १ टी स्पून कच्चे जिरे, २ टी स्पून नारळाचा चव (ऐच्छिक, सुका कीस चालेल), थोडी हळद, तिखट व मीठ घालून ही खिचडी चांगली खदखदू द्यावी. नंतर, १ टी स्पून सांबार मसाला पावडर भुरभुरून वर कोथिंबीर घालावी. १ पळी तेल कडेने खिचडीत सोडावे. खिचडी सैलसर होण्यासाठी गरजेनुसार पाणी घालावे. (ही खिचडी फडफडीत/मोकळी चांगली लागत नाही, ती पातळ, सैलसरच छान लागते.)

फोडणीत हवी असल्यास १ टी स्पून धणा-जिरा पावडर घालायला हरकत नाही.

सर्व्ह करतांना वरून साजूक तूप (व ऐच्छिक ओल्या नारळाचा चव) घालण्यास विसरू नये.

करून झाल्यावर खिचडी आवडली का ते कळवा.

टीपः कोणताही इतर मसाला घालून केलेली भाजी अथवा आमटी असली तरी खिचडीच्या basic चवीत फरक पडत नाही, फक्त त्यानुसार सांबार पावडर वाढवावी.

प्रतिक्रिया

jaypal's picture

13 Dec 2009 - 10:59 pm | jaypal

मी पण उरलेला भात,आमटी, किंवा वरण याच पध्दतिने हाणतो. चवीत बदल म्हणुन कधी कधी शिजताना आंब्याच्या/लिंबाच्य लोणच्याच्या फोडी व खार टाकतो. मस्त पैकी ३/४ पापड भाजतो आणि मग दे दनादन, दे दनादन

आशिष सुर्वे's picture

14 Dec 2009 - 10:00 am | आशिष सुर्वे

झक्कास!!
खल्लास!!
-
कोकणी फणस

मदनबाण's picture

14 Dec 2009 - 10:16 am | मदनबाण

मस्त...

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

अविनाशकुलकर्णी's picture

14 Dec 2009 - 8:57 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त पदार्थ...खिचडीस खमंग हे विषेशण योग्य वाट्ते का?साधारण तळलेल्या /भाजलेल्या पदार्थास आपण खमंग म्हणतो..चु.भु.दे.घे..

पर्नल नेने मराठे's picture

15 Dec 2009 - 1:42 pm | पर्नल नेने मराठे

मग 'खमंग काकडी' तळतात का :-?नाहि ना...मग खिचडीस खमंग हे विषेशण योग्य वाटतेय.
चुचु

शक्तिमान's picture

15 Dec 2009 - 12:18 am | शक्तिमान

अहाहा.. काय वास दरवळत आहे.. +१ फॉर द खिचडी, जानकीजी!

साक्षी's picture

17 Dec 2009 - 5:28 pm | साक्षी

मस्त पाककृती. धन्यवाद.

~साक्षी.

बहुगुणी's picture

20 Mar 2011 - 7:43 am | बहुगुणी

मसाला खिचडीची पाककृती इथे वाचल्याची आठवण होती म्हणून गूगलमध्ये शोध घेतला तर healandhealth.com या संस्थळावरचा दुवाही मिळाला, तिथे 'शाही खिचडी' या unrelated पाककृतीसोबत वरील जानकी यांनी केलेल्या मसाला खिचडीचं प्रकाशचित्र ढापलेलं मिळालं, अर्थातच, मूळ पाककृतीचा श्रेय्/उल्लेख नाहीच!

उलट वरती "Protected by CopyScape. Do not copy" [Mouse-over मध्ये "Do not copy content from the page, plagiarism will be detected by CopyScape."] असा इशारा द्यायला हे संस्थळचालक विसरले नाहीत!!

[मूळ प्रकाशचित्र इथे आहे असं दिसतं, जानकी यांनी वर्णन केलेल्या ओल्या नारळासह :-).]

निदान पाककृतीसाठी तरी, मिसळपाव हिंदी भाषिक मंडळी वाचतात असं दिसतं :-)

शिल्पा ब's picture

20 Mar 2011 - 7:57 am | शिल्पा ब

ह्म्म...पण तुम्ही दिलेल्या हिंदी लिंक मधे वेगळीच पाकृ आहे....पद्धत वेगळी आहे. पण फोटो तोच आहे.