तेलंगणकांड भाग एक-- भाषावार प्रांतरचनेचा इतिहास

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
13 Dec 2009 - 4:38 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

गेल्या आठवडयात तेलंगण राष्ट्रसमितीचे अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनी स्वतंत्र तेलंगण राज्यासाठी उपोषण केले आणि त्यांचा उपोषणात मृत्यू झाला तर हिंसाचाराचा आगडोंब उसळेल अशी भिती केंद्र सरकारला वाटली आणि रातोरात नव्या तेलंगण राज्याच्या निर्मितीची घोषणा केंद्र सरकारने केली. या निर्णयाच्या इतर पैलूंचा विचार करण्यापूर्वी भारतातील प्रांत रचना कशी बदलत गेली याचा थोडक्यात परामर्श घेऊ.

ब्रिटिश काळात राज्यकारभाराची सोय हा एक मोठा मुद्दा राज्यांची रचना करताना होता. भारतीयांच्या वेगवेगळ्या भाषा आणि त्याप्रमाणे बदलणाऱ्या अस्मिता या आधारावर राज्यांची रचना करावी असे ब्रिटिशांना वाटायचे काही कारण नव्हते. पण तरीही भारतासारख्या बहुभाषिक देशात राज्यांची रचना भाषेच्या आधारावर व्हावी अशी अपेक्षा भारतीयांची असणे स्वाभाविक होते.

स्वातंत्रपूर्व काळात कॉंग्रेसनेही स्वातंत्र्योत्तर भारतात राज्यांची रचना करताना भाषा हाच एक निकष असावा असे म्हटले होते. पण १९४६-४७ दरम्यान फाळणी आणि दंगलींमध्ये लाखो लोकांचे बळी पडले. अशा परिस्थितीत देशात एक स्थिर केंद्र सरकार असावे आणि भारतीयांनी आपण अमुक एक भाषिक आहोत असा विचार न करता भारतीय आहोत असेच समजावे असे पंडित नेहरूंना वाटले. अशावेळी भाषावार प्रांतरचना करणे म्हणजे भाषिक आणि स्थानिक अस्मितांना खतपाणी घालण्यासारखे होईल आणि भविष्याचा विचार करता ते घातक ठरेल या विचाराने स्वातंत्रोत्तर काळात पंडित नेहरूंनी भाषावार प्रांतरचना करावी ही मागणी जाणीवपूर्वक नाकारली. त्या काळातील भारताचा राजकिय नकाशा बघितला आपण आज जो नकाशा बघतो त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. खरे म्हणजे तो नकाशा पहिल्यांदा बघितल्यावर मला हा भारताचाच राजकिय नकाशा आहे यावर क्षणभर विश्वास ठेवणे कठिण गेले होते.

वरील नकाशा हा १९५६ सालचा आहे. १९५३ ते १९५६ दरम्यान अजून काही बदल झाले होते त्याविषयी पुढे लिहिणारच आहे.
या नकाशात आपल्याला उत्तर प्रदेश,राजस्थान,बिहार,पश्चिम बंगाल आणि ओरिसा ही राज्ये वगळता इतर सर्व राज्यांची पूर्णपणे उलटपालट झालेली दिसत आहे.सद्यकालीन महाराष्ट्रापैकी केवळ कोकण आणि उत्तर महाराष्ट्र तत्कालीन मुंबई प्रांतात होते. त्याचप्रमाणे सद्यकालीन गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र वगळता इतर सर्व भाग मुंबई प्रांतात होता. तसेच सद्यकालीन उत्तर कर्नाटकातील काही भागही मुंबई प्रांतात होता.मराठवाडा हैद्राबाद राज्यात तर विदर्भ मध्य प्रदेशात होता. कच्छ आणि सौराष्ट्र ही दोन स्वतंत्र राज्ये होती. तसेच दक्षिणेत कोचीन हे स्वतंत्र राज्य होते.

१९५२ पर्यंत सद्यकालीन आंध्र प्रदेशातील तेलंगण हा भाग हैद्राबाद राज्यात होता तर उरलेला भाग दक्षिणेतील मद्रास राज्यात होता. म्हणजेच तेलुगू भाषिक भाग हैद्राबाद आणि मद्रास या राज्यांमध्ये विभागलेला होता. १९५२ मध्ये गांधीवादी नेते पोट्टी श्रीरामलू यांनी तेलुगुभाषिक प्रदेशाला एकत्र करून त्याचे एक ’आंध्र प्रदेश’ राज्य निर्माण करावे या मागणीसाठी प्राणांतिक उपोषण केले. सुमारे ५८ दिवसांच्या उपोषणानंतर त्यांचा मृत्यू झाला. श्रीरामलूंच्या उपोषणाला जवळपास दोन महिने होत असतानाही पंडित नेहरू अजिबात नमले नाहीत यातच नेहरूंचा भाषावार प्रांतरचनेला सुरवातीच्या काळात असलेला विरोध दिसून येतो. पण श्रीरामलूंच्या मृत्यूनंतर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियेनंतर केंद्र सरकारला नमावे लागले. १९५३ मध्ये मद्रास प्रांतातील तेलुगु भाषिक भाग काढून घेऊन ’आंध्र राज्याची’ निर्मिती करण्यात आली. या राज्याची राजधानी कर्नूल येथे होती.

पोट्टी श्रीरामलूंच्या उपोषणाविषयी एक गंमत लक्षात घ्यायला हवी.त्यांनी उपोषण केले मद्रास (सद्याकालीन चेन्नई) शहरात. तसेच प्रस्तावित तेलुगु भाषिक राज्यात मद्रास शहराचा समावेश करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. मद्रासशिवाय आंध्र म्हणजे डोक्याशिवाय शरीर असेही ते म्हणाले होते. आजही चेन्नई शहर हे तामिळनाडू राज्याच्या उत्तर टोकाला आहे. कदाचित त्याकाळी शहरात तेलुगु लोकांचे वर्चस्व असेलही आणि त्यामुळे श्रीरामलूंनी शहराचा समावेश प्रस्तावित आंध्र प्रदेशात करावा अशी मागणी केली असेल. आजही चेन्नई शहरात तेलुगु भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत की नाही याची कल्पना नाही. पण उपोषणात जीव गमावावा लागून श्रीरामलूंना अपेक्षित आंध्र राज्य झाले पण मद्रास शहर त्यात सामील करावे ही मागणी काही आजही मान्य केली गेलेली नाही आणि ती केली जाईल असे वाटतही नाही.

पुढे केंद्र सरकारला भाषावार प्रांतरचनेसाठी फाजल अली आयोगाची स्थापना करावी लागली.या आयोगाने भाषावार प्रांतरचना व्हावी अशी शिफारस केली. त्यानुसार राज्यांची पुनर्रचना झाली. हैद्राबाद राज्यातील तेलंगण भाग आंध्र राज्याला जोडून ’आंध्र प्रदेश’ या राज्याची निर्मिती करण्यात आली. हैद्राबाद राज्यामधील मराठवाडा मुंबई प्रांताला जोडण्यात आला. तत्कालीन म्हैसूर राज्यात कूर्ग आणि हैद्राबाद राज्यातील कन्नडभाषिक प्रदेश जोडण्यात आला आणि हैद्राबाद राज्याचे अस्तित्व मिटविण्यात आले. तसेच म्हैसूर राज्यात मुंबई राज्यातील दक्षिणेकडील कन्नड भाषिक भाग जोडला गेला आणि त्यातच बेळगाव म्हैसूरला मिळाले. त्याचप्रमाणे मध्य भारत, विंध्य भारत आणि भोपाळ ही राज्ये एकत्र करून ’मध्य प्रदेश’ हे नवे राज्य तयार करण्यात आले. मध्य भारतातील विदर्भ भाग मुंबई प्रांताला जोडण्यात आला. तसेच कच्छ आणि सौराष्ट्रपण मुंबई प्रांताला जोडले गेले. अशाप्रकारे मराठी आणि गुजराती भाषिकांचे एक द्विभाषिक राज्य तयार करण्यात आले. मद्रास प्रांतातील मलबार भाग, त्रावणकोरमधून कन्याकुमारी वगळून इतर भाग आणि कोचीन राज्य एकत्र करून केरळ हे मल्याळमभाषिक राज्य स्थापन केले गेले. कन्याकुमारीचा समावेश,मलबारचा केरळात समावेश आणि मद्रास राज्यातील कन्नडभाषिक प्रदेश म्हैसूर राज्यात गेल्यामुळे उरलेले मद्रास राज्य हे तामिळ भाषिक प्रदेशाचे राज्य झाले.

फाजल अली आयोगाने अशाप्रकारे इतर सर्व भाषिक राज्य मान्य केली पण मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य काही दिले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोमात वाढली. पंडित नेहरूंना परत जनमतापुढे झुकावे लागले आणि १९६० मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची स्थापना करण्यात आली.पुढे इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर १९६६ मध्ये तत्कालीन पंजाब राज्यातून पंजाब आणि हरियाणा ही स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली. पुढे १९७५ मध्ये सिक्कीमचे भारतात विलीनीकरण झाले.तसेच २००० साली छत्तिसगड, उत्तराखंड आणि झारखंड ही नवी राज्ये अस्तित्वात आली आणि भारताच्या राजकिय नकाशाला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.

राज्यांच्या निर्मितीचा इतिहास बघितल्यानंतर चंद्रशेखर राव यांचे उपोषण आणि तेलंगणप्रश्न आणि त्यातून निर्माण होणाऱ्या इतर प्रश्नांविषयी पुढच्या भागात.

संदर्भ
१. India After Gandhi हे रामचंद्र गुहा यांचे पुस्तक
२. इंग्रजी विकिपीडिया
३. स्वातंत्रोत्तर माझा भारत हे राजा मंगळवेढेकर यांचे पुस्तक
४. वेळोवेळी वाचलेले वर्तमानपत्रांमधील लेख.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

13 Dec 2009 - 4:49 pm | मदनबाण

लयं भारी !!!
उत्तम माहिती आणि झकास लेख... :)
क्लिंटनराव असाच वेळात वेळ काढुन तुम्ही लिहीत रहा...

(हिंदूस्थानी)
मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

निखिलराव's picture

14 Dec 2009 - 11:42 am | निखिलराव

१००% सहमत...
मस्त, १ नंबर, छान आणि लईचं भारी...........

नंदन's picture

13 Dec 2009 - 5:04 pm | नंदन

सुरूवात छान झाली आहे. 'इंडिया आफ्टर गांधी'मध्ये रामचंद्र गुहांनी म्हटल्याप्रमाणे जरी भाषेवर आधारित राज्यांमुळे काही तंटे निर्माण झाले असले तरी एकाच वेळी आपला भाषाभिमान आणि देशाभिमान जोपासण्याची सोय झाली आणि प्रादेशिक साहित्य आणि कलांना राजमान्यता (प्रतिष्ठा आणि अर्थसहाय्य) मिळाली, हे त्याचे मोठे फलित मान्य करायला हवे. पुढील भागांची वाट पाहतो आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Dec 2009 - 5:13 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम आणि समयोचित विषय. माहिती पण अगदी नेमकी आणि व्यवस्थित संकलित केली आहे. वाचतोय.

माझे दोन पैसे :

जसे मुंबई हे एक मेल्टिंग पॉट शहर आहे तसेच मद्रासही. विशेषेकरून तेलगू (मद्रास प्रॉव्हिन्सचा तेलगू भाषिक भाग ज्याला आता 'आंध्रा' असे म्हणतात), तमिळ (पूर्ण तमिळनाडू), कन्नड (मैसूर संस्थान, मद्रास प्रॉव्हिन्सचा कन्नड भाषिक भाग) आणि मलयाळम (केरळ, त्रावणकोर, कोचिन, त्रिवेंद्रम वगैरे) या चार भाषिक जनतेने फुलवलेले असे या शहराचे ऐतिहासिक दृष्टीने वर्णन करता येईल. भौगोलिक दृष्ट्या हे शहर आंध्र भाषिक भागाला जवळही आहेच. पूर्वापार, इथे तेलुगू भाषिकांची खूप मोठी वस्ती होती आणि अजूनही आहे. (स्थानिक भाषेत त्यांना गुल्टी म्हणतात.) त्यांनी तमिळ ही संपर्क भाषा म्हणून स्वीकारली आहे तरीही तेलुगू भाषा अजूनही तिथे सुस्थितीत आहे. आंध्रप्रदेशच्या आंदोलनात मद्रासवरून खूपच तणातणी झाली पण तो अस्मितेचा प्रश्न बनला नाही त्यामुळे पुढे शांत झाला. सध्या कोणताही तेलुगू भाषिक मद्रास आमचेच असे म्हणताना आढळत नाही.

कर्नाटकातला उत्तर भाग, बीदर विजापूर वगैरे, त्याला निझाम कर्नाटक म्हणतात (आणि धारवाड वगैरे भागाला बॉम्बे कर्नाटक म्हणतात...) तिथेही अगदी थोड्याफार प्रमाणात कर्नाटकातून फुटायची भावना आहेच. पण भाषिक अभिमान वरचढ असल्याने अजून तरी तो प्रश्न म्हणावा तसा ऐरणीवर आल्यासारखा दिसत नाही.

थोडा अजून विचार करता, तेलंगण मराठवाडा उत्तर कर्नाटक वगैरे भाग हे पूर्वी निझाम स्टेट मधले भाग, एका मोठ्या आणि महत्वाच्या कालखंडामधे बाकी भागात झालेल्या आर्थिक / राजकिय आणि सामाजिक विकासापासून वंचित राहिल्याने मागे पडले आणि अजूनही मागेच राहिले. (दे कुड नॉट कॅच अप कंप्लिटली). त्यामुळे आम्हाला स्वतंत्र करा, आमचा विकास आम्हीच करून घेऊ असा काहीसा स्वप्नाळू आशावाद या सगळ्या वेगळ्या राज्यांच्या निर्मितीच्या मुळाशी आहे असे दिसते. (या प्रकाराचे अगदी चांगलेच साम्य आता जर्मनीतही दिसत आहे. पूर्वीचा पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी यांच्यातील असमतोल साक्षत जर्मनांसारख्या दुर्दम्य आशावादी, कामसू आणि जिद्दीच्या लोकांचीही दमछाक करत आहे.)

बिपिन कार्यकर्ते

कानडाऊ योगेशु's picture

14 Dec 2009 - 6:54 pm | कानडाऊ योगेशु

आंध्रप्रदेशच्या आंदोलनात मद्रासवरून खूपच तणातणी झाली पण तो अस्मितेचा प्रश्न बनला नाही त्यामुळे पुढे शांत झाला. सध्या कोणताही तेलुगू भाषिक मद्रास आमचेच असे म्हणताना आढळत नाही.

ह्याबाबत तेलुगुभाषिक मित्रांकडुन असेही ऐकले आहे कि आंध्रप्रदेशला तिरुपती अथवा मद्रास ह्या दोहोंपैकी एकाचीच निवड करायची अट घातली गेली होती.आंध्रप्रदेशने तिरुपती निवडले.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

सुनील's picture

15 Dec 2009 - 8:55 pm | सुनील

आंध्रप्रदेशला तिरुपती अथवा मद्रास ह्या दोहोंपैकी एकाचीच निवड करायची अट घातली गेली होती.आंध्रप्रदेशने तिरुपती निवडले.
हे बहुधा खरे नसावे. अशी माहिती कुठे आढळली नाही. असल्यास दुवा द्यावा.

अर्थात, चेन्नईत (एकंदरीत तामिळनाडूच्या उत्तरेकडील भागात) तेलुगु भाषक बरेच आहेत. आपले माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हेही चेन्नईची तेलुगु भाषक. तंजावूरच्या महालात अनेक तेलुगु लिपीतील मराठी ग्रंथ आहेत. आणि त्याचबरोबर, तिरुपतीत अक्षरशः असंख्य तामिळ भाषक राहतात.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती२'s picture

13 Dec 2009 - 5:27 pm | स्वाती२

उत्तम लेख. बिपिनदांचा प्रतिसादही वाचनिय.

राज ठाकरें सारख्या लोकांस थंड पाडण्याकरिता.

आमचे एक मित्र एका आंग्लभाषी वृत्तवाहिनीचे मालक आहेत. त्यांना ह्यावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांचे म्हणणे असे पडले: मनमोहनसिंगांनी हा आततायी निर्णय घेण्याचे कारण एकच, ते म्हणजे राज ठाकरे आणि त्यांच्यासारख्या भाषिक अस्मितेच्या राजकारणाने शक्तिवर्धन करू शकणार्‍या छोट्या राजकारण्यांचे पंख कापणे.

तेलङ्गाणा काय किंवा इतर राज्ये काय, स्वतंत्र छोटी राज्ये मागण्यामागे बिल्डर लाबी असल्याचे माझे स्वत:चे मत आहे. भाषावार प्रांतरचनेच्या काळात बिल्डर लाबी आजएवढी जोरावर नव्हती. असो. त्यावर विस्तारानेच लिहावे लागेल.

हैयो हैयैयो!

सोत्रि's picture

14 Dec 2009 - 11:31 am | सोत्रि

>> राज ठाकरें सारख्या लोकांस थंड पाडण्याकरिता
हे कसे काय बुवा? ही बातमी वाचा.

धमाल मुलगा's picture

14 Dec 2009 - 7:01 pm | धमाल मुलगा

श्री.हयो हैयैयो,

आपले सदर मित्र ह्यांचे "भाषिक अस्मितेच्या आधारे राजकारण (होय, मी शक्तीवर्धनापेक्षा राजकारण हा शब्द वापरणे पसंत करेन.) करण्याला सुरुंग लावण्याच्या" मताबद्दल अधिक जाणुन घ्यावेसे वाटते. कदाचित हा उच्चपदस्थांचा एक दृष्टीकोन सर्वसामान्यांच्या नजरेस पडला तर उत्तमच, नाही का?

बाकी, बिल्डर लॉबीसंबंधी आपल्याशी सहमत. हैदराबादसारखे आय.टी.मध्ये पुढारलेले शहर आणि तिथली वाढ पदरात पाडुन घेण्यासाठी सवलती मिळवणे इत्यादींबाबत हे होऊ शकते असा माझा कयास.
ह्याशिवाय, स्वतंत्र मंत्रीमंडळ, त्यायोगे मिळणारा स्वतंत्र निधी आणि त्यापुढे त्या निधीची लावावयाची वासलात.... बरेच पैलु असावेत ह्या विषयाला.
तुर्त तरी काहीच कळत नाही.

फ्रॅक्चर बंड्या's picture

14 Dec 2009 - 11:51 am | फ्रॅक्चर बंड्या

मस्तच महिती...
अजुन वाचायला आवडेल

binarybandya™