पुणेरी मिसळ

जानकी's picture
जानकी in पाककृती
1 Dec 2009 - 6:56 pm

साहित्यः

१ वाटी वाटाणे तासभर भिजत घालून कुकरमध्ये ३ शिटया देणे
१ वाटी मोड आलेली मटकी घेऊन कुकरमध्ये ३ शिटया देणे
२ कांदे बारीक चिरून घेणे
१ टोमॅटो बारीक चिरून घेणे
छोटी अर्धी वाटी दाणे भाजून ठेवणे
१ वाटी कोथिंबीर बारीक चिरून ठेवणे
मध्यम आकाराचे २ बटाटे उकडून, सोलून, मध्यम आकाराच्या फोडी करणे
१ वाटी नायलॉन चे पोहे
१ वाटी तिखट जाड शेव
१ वाटी फरसाण
१ डावभर तुरीची शिजवलेली डाळ

कृती:

पोह्यांचा चिवडा: कढईत १ छोटा टीस्पून तेल गरम करून त्यात १ टीस्पून मोहोरीच्या फोडणीत २ सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, १ टीस्पून डाळं, चिमुटभर हिंग, २ टेबल्स्पून दाणे, २ काड्या कढीपत्ता घालून फोडणी करावी. बर्नर बंद करून कढई खाली उतरवावी, त्यात थोडी हळद, चवीनुसार, वाटीभर नायलॉन चे पोहे, नखभर तिखट घालून कालवून घ्यावी. यात १ टीस्पून MTR ची चटणीपूडी पावडर कालवणे.

तेलावर मोहोरी, हिंग व काळ्या मसाल्याची फोडणी देऊन, १ टीस्पून लाल तिखट व चवीप्रमाणे मीठ घालून, त्यावर शिजवलेली डाळ घालून २ वाट्या पाणी घालून उकळवून घ्यावी, व बाजूस काढून ठेवावी.

१ टेबल्स्पून तेलावर चिमुटभर हिंग, १ टीस्पून तिखट, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेला अर्धी वाटी कांदा घालून परतणे. नंतर १ वाटी शिजलेले वाटाणे, अर्धी वाटी चिरलेला टोमॅटो, अर्धा टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद घालून एक उकळी आणून बाजूस काढून ठेवावे.

उसळः तेलावर मोहोरीची फोडणी घालून मटकी, १ टीस्पून कच्चे जिरे, चिमुटभर हिंग, अर्धा टीस्पून तिखट, १ टीस्पून काळा मसाला, लहान सुपारीइतका गूळ, १ आमसुल आणि १ टेबल्स्पून भाजलेले दाणे घालून नेहेमीप्रमाणे उसळ शिजवावी.

शिजवलेल्या डाळीचे पाणी वेगळे काढून ठेवून डाळ वाटाण्यात मिसळावी.

तर्री: वेगळे काढून ठेवलेले पाणी १ टीस्पून तेलात (आवडत असल्यास २ लसणाच्या पाकळ्या घालून) पाव टी स्पून तिखट व अर्धी वाटी टोमॅटो घालून उकळत ठेवावे.

एका प्लेट मध्ये १ डाव कढत वाटाणे-डाळ घालावी. त्यावर उकडलेल्या बटाट्याच्या ४-५ फोडी घालून, वर एक डाव कढत उसळ घालणे, त्यावर एक डाव नायलॉनच्या पोह्यांचा चिवडा घालून, एक डाव जाडी शेव भुरभुरणे, १ टेबल्स्पून कच्चा कांदा व आवडीप्रमाणे कोथिंबीर घालावी. सर्व्ह करतांना पळीभर तर्री घालावी. चतकोर लिंबाची फोड बाजूस नक्की ठेवावी.

अर्धी मिसळ खाल्ल्यावर दही कालवल्यास चव आधिक वाढते! दह्यावर पुन्हा एकदा कढत तर्री घातल्यास आनंद द्विगुणित!

या वीकेंड ला जमल्यास घरी पुणेरी मिसळ करून छायाचित्र अपलोड करीन. तोपर्यंत जमल्यास स्वतः करून (आवडल्यास!) छायाचित्र पाठवा.

प्रतिक्रिया

माधुरी दिक्षित's picture

1 Dec 2009 - 7:26 pm | माधुरी दिक्षित

विसोबा खेचर's picture

1 Dec 2009 - 7:43 pm | विसोबा खेचर

लै भारी..

गणपा's picture

1 Dec 2009 - 7:48 pm | गणपा

थोडी वेगळी पद्धत दिसतेय (पोहे टाकणे) पण वाचुनच लाळ गळली.
त्यात नेने ने कसला खत्तर्णाक फोटो टाकलाय =P~

-माझी खादाडी.

सूहास's picture

1 Dec 2009 - 7:52 pm | सूहास (not verified)

शाब्बास !!

बास.....आजपासुन पाकृ उघडायच्या नाहीत

सू हा स...

शब्देय's picture

1 Dec 2009 - 9:03 pm | शब्देय

बास.....आजपासुन पाकृ उघडायच्या नाहीत .. किमान लंच ब्रेकच्या आधीतरी नाहीच नाही!

प्रभो's picture

1 Dec 2009 - 8:40 pm | प्रभो

मस्त..
पण फोटो पण टाकत जावा की..

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

मेघवेडा's picture

1 Dec 2009 - 8:41 pm | मेघवेडा

लै भारी!! खल्लास!! जीव गेला!!

त्यात फोटोने तर डायरेक्ट काळजावरच वार केलाय!!

--

'मिसळपावा'वर मनापासून प्रेम करणारा.

उमराणी सरकार's picture

1 Dec 2009 - 9:13 pm | उमराणी सरकार

वाटाणे आणि मोड आलेल्या मटकीला एकत्र शिट्ट्या दिल्या तर चालतील का?
उमराणी सरकार

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

गणपा's picture

1 Dec 2009 - 9:26 pm | गणपा

पॉइंट टु बी नोटेड माय लॉर्ड......
मला वाटत की चालु शकेल.. मोड आलेल कडधान्य शिजायला वेळ लगतो त्यामुळे २, फार फार तर ३ शिट्यांत काम भागेलस वाटतय..
बाकी जानकी ताई सांगतीलच..

-माझी खादाडी.

स्वाती२'s picture

1 Dec 2009 - 9:39 pm | स्वाती२

च्च! मिसळ वगैरे पाकृ उघडायच्या नाहित असं ठरवलं होतं पण राहावलं नाही. पाकृ थोडी वेगळी आहे पण फोटो मात्र खतरा!!

वरदा's picture

1 Dec 2009 - 9:46 pm | वरदा

चिवडा तयारच आहे घरी लवकरच करुन पाहीन.
आज उपास आहे माझा आणि इथे सॉलीड पाक्रु. दिसतायत एकानंतर एक्..जातेच कशी आता नाहीतर भूक सहन नाही होणार
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

पाषाणभेद's picture

2 Dec 2009 - 3:47 am | पाषाणभेद

बाकी पुणेरी मिसळ नाव वाचूनच हसू आले. खरे सांगतो आहे.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही.

पासानभेद बिहारी

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Dec 2009 - 8:30 am | llपुण्याचे पेशवेll

+१
आम्हालापण पाषाणभेद नाव वाचूनच हसायला येतं खरे सांगतो आहे.

पाकृ एकदम छान.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

पाषाणभेद's picture

2 Dec 2009 - 9:57 am | पाषाणभेद

इरसाल पुणेरीपणा दिसतो यातून. म्हंजी कसं मिसळ बी आन बटाट्याची भाजी बी.

एक शेन्का हाय, "तेलावर मोहोरी, हिंग व काळ्या मसाल्याची फोडणी देऊन, "

मिसळ काळी का दिसनां? का काळा मसाल्यालाबी लाल रंग देत्यात पुन्यामधी?

आन शेंगदानं कुटून घालू र्‍यायलेय. आव त्येचं त्याल बी सुटलं ना मिसळीला.
आन पोहे काय, शेव फरसान काय, बटाटे काय, दही काय, लई मिळमीळीत लागत आसलं बगा ही मिसळ.
आन माला तर ह्यो फोटू दुसर्‍याच मिसळीचा वाटतोय. केल्येल्याच
मिसळीचा फोटू टाका की. काळ्या मसाल्यामुळं मिसळ काळीच पाहीजे.

बाकी मिसळ पाहून तोंडाला पानी सुटलया.

------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही.

पासानभेद बिहारी

आगदी बरोबर. कारण तो कुणी टाकला आहे ते पहा.
मुळ लेखिका आणि फोटो टाकणा-या नावात तफावत आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Dec 2009 - 10:05 am | llपुण्याचे पेशवेll

फार पूर्वीच बोर्डावर मालकांनी चपलांची सोय केली आहे.
असो. आपण फार विचारपूर्वक प्रतिसाद दिलात हे पुणेरी मिसळीचे परिणाम पाहून बरे वाटले.

अवसानभेद
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

माधुरी दिक्षित's picture

2 Dec 2009 - 11:07 am | माधुरी दिक्षित

फोटो आंतरजालावरुन घेतला आहे.

शाहरुख's picture

2 Dec 2009 - 12:13 pm | शाहरुख

http://www.hotelsinkolhapur.com/misal_pav.jpg
फोटो इथून घेतलाय..

जय कोल्हापूर :-D

सुमीत भातखंडे's picture

2 Dec 2009 - 1:27 pm | सुमीत भातखंडे

पाकृ आणि जीवघेणा फोटो.