निरोप

फटू's picture
फटू in जनातलं, मनातलं
8 Mar 2008 - 5:41 pm

त्या दिवशी मी आणि माझा मित्र निखील, सेकंड शिफ्ट्मध्ये कामावर आलो होतो. रात्रीचे आठ साडे आठ वाजले होते. अगदी निवांतपणे संगणकाची आज्ञावली बनवण्यासाठी नक्कल करणं आणि चिकटवनं (कॉपी आणि पेस्ट हो...) चालू होतं. इतक्यात पुण्याहून वैशालीचा म्हणजेच आमच्या प्रोजेक्ट मॅनेजरचा फोन आला. तिला आमच्या अमेरिकेतील मॅनेजरला निरोप द्यायचा होता. निरोप असा होता की, अमर नाइट शिफ्ट्मध्ये कामावर येण्यासाठी निघाला असताना वाटेत महापेच्या पुलाखाली त्याची मोटारसायकल घसरली आणि तो खाली पडला. त्याच्या रुममेट्ने त्याला दवाखान्यात नेलं आहे पण आज काय तो कामावर येऊ शकणार नाही. (अमर खूप कामाचा माणूस आहे... लेकाचा अमेरिकन लोकांच्या संगणक प्रणालीला आधार देतो. तो नसेल तर आधार कोण देणार ?)

आम्ही सारं ऐकून घेतलं आणि फोन ठेवून दिला. पण फोन ठेवता क्षणी आमच्या डोक्यात उजेड पडला... आमच्या भारतातल्या मॅनेजरचा निरोप आमच्या अमेरिकेतल्या मॅनेजर पर्यंत पोहचवण्यात एक तांत्रीक अडचण होती...

वैशाली, आमची भारतातली मॅनेजर मराठी आणि आम्हीही मराठी. त्यामुळे आमचं फोनवरचं बोलणं मराठीतूनच झालं होतं. निरोप अमेरिकेत पोहोचवायचा म्हणजे तो ई पत्रामार्फत इंग्रजीतून पोहचवावा लागणार होता. आमचं तांत्रीक इंग्रजीचं ज्ञान तसं बरं आहे. पण कुणी व्यवहारिक इंग्रजीत बोलू लागलं की आमची पाचावर धारण बसते. वैशालीचा निरोप इंग्रजीत कसा लिहायचा हा गहन प्रश्न आम्हास तेव्हा पडला.

जो सन्कटात मदत करतो तोच खरा मित्र या वचनाची आठवण ठेवून आम्ही आमची अडचण निखिलला सांगितली. आणि पुढच्याच क्षणाला त्याचं इंग्रजी माझ्या इंग्रजी पेक्षाही दिव्य आहे अस सांगून त्याने हात वर केले. आता काय करायचं.. ? आम्ही मोठ्या विचारात पडलो होतो. इतक्यात आम्हास कननची आठवण झाली. कनन आमचा प्रोजेक्ट्वरचा जुनियर. लेकाचा नुकताच जी आर ई, अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी द्यावी लागणारी इंग्रजी भाषेची परिक्षा अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता.

आम्हाला अंधारात आशेचा अख्खाच्या अख्खा सूर्य दिसला होता. आम्ही मोठ्या हुरूपाने कननला फोन करण्यासाठी आकडे दाबु लागलो... आणि इतक्यात पुन्हा एक विचार चमकून गेला... कनन आमचा प्रोजेक्ट्वरचा जुनियर. गेले वर्षभर आम्ही त्याला संगणकाच्या दुनियेतल्या कितीतरी गोष्टी शिकवल्या होत्या. त्याला विचारायचं की हे अस अस इंग्रजीत कसं लिहायचं म्हणून ?... मग त्याच्या मनातल्या आपल्या प्रतिमेचं काय होईल... तो काय म्हणेल... याला एव्हढहि इंग्रजी येत नाही....

हे सगळं विचारमंथन आमच्या मनात चालू असतानाच पलीकडे कननने फोन उचलला होता... ' बोल सतीश ' त्याचा ओळखीचा धिरगंभीर आवाज कानावर पडला आणि क्षणभर काय बोलावे हे आम्हाला कळलेच नाही. पण पुढच्याच क्षणी आम्ही स्वत:ला सावरलं. कननला अमर मोटरसायकल वरुन पडला हे सांगितलं. वेळ मारुन नेण्यासाठी कमलचा, अमरच्या रूममेटचा फोन नंबर मागण्यासाठी फोन केला होता अशी चक्क थाप मारली. हुश्श्स...

पण तरीही आमची मूळ समस्या कायम होती. निरोप इंग्रजीत कसा लिहायचा...

शेवटी 'जगात ज्या संगणक अभियंत्याचं कुणी नाही त्यास गुगल हे संकेतस्थळ आहे' या संत वचनास अनुसरून आम्ही गूगलवर धाव घेतली. वैशालीने मोटरसायकल घसरली हे सांगण्यासाठी 'स्लीप झाली' अस म्हटलं होतं. आम्ही हा स्लीप शब्दच गूगलला टाकला... आणि पुढच्या क्षणाला गूगलने His bicycle slipped off the road हे वाक्य आमच्यासमोर हजर केलं... आणि आमची एका मोठ्या धर्म संकटातून सुटका झाली... निरोपातल्या बाकीच्या वाक्यांची जमवाजमव आम्ही आमच्या अल्पमतीप्रमाणे करून एकदाचा तो निरोप आम्ही अमेरिकेस धाडला.

(आजच्या घडीला निखील आणि मी दोघेही अमेरिकेत असून खूप मोठ्या संगणक प्रणाल्याना आधार देत आहोत. निखील शिक्षणाने उपकरण शास्त्र अभियंता तर आम्ही अनुवीद्युत आणि दूर संचार अभियांत्रिकीचे पदवीधर. वर वर्णन केलेली घटना मागच्या सहा महिन्यातली असून आम्ही भारतात असताना घडलेली आहे... खूप शिव्या घातल्या आम्ही तेव्हा आताच्या शिक्षण व्यवस्थेला... संगणक अभियंता म्हणून काम करना~या अभियांत्रिकीच्या पदवीधराना व्यवहाराच्या चार ओळी इंग्रजीत लिहिता येऊ नयेत म्हणजे काय... असो, त्यानंतरचे सहा महिने आम्ही आमचं इंग्रजी सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली... कुठेतरी चुक आमचीहि होती नाही का ?)

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Mar 2008 - 9:11 pm | llपुण्याचे पेशवेll

आवं सतिशराव त्या विंग्रजीचे मोठे काय कवतिक न्हाई वो. आम्हाला पूर्वी लई शमस्या व्हती की 'तू ते करशील का रे?' हे विंग्रजीत कशे बलावे. पन आवो आमच्या हापिसातली काही रत्ने(विशेषतः पोरी) अशी पाहीली की त्या हा प्रश्न असा विचारत 'are you doing that क्या?'.
आम्ही तर चाटच पडलो. वाटले त्या तर्खडकरचे दिवस घालायची(मयती नंतरचे १०वा,१३वा असे) येळ आली हाये. आवो आनी आमच्या हीते एकदम येका पेक्षा येक नग हायेत विंग्रजीमधले. आवो या अमेरीकेतल्या गोर्‍याना कामाला मानूस मिळाल्याशी कारन हाये. बाकी तो ब्वालतो त्याचा निस्ता अर्थ कळला तरी चालते वो त्याला. येवढे स्वस्तात काम व्हत असेल तर त्ये पन करत्यात ४-२ सबुद 'compromise'

पुण्याचे पेशवे

सुधीर कांदळकर's picture

9 Mar 2008 - 7:37 am | सुधीर कांदळकर

कामात आपले प्राविण्य आहे हीच गोष्ट सगळे सांगून जाते. फिरंग्याच्या भाषेची ऐशी तैशी. मस्त वाटले. फिरंग्याच्या या भाषेची हवी तशी वाट लावा. संदेश पोचवणे हेच भाषेचे काम आहे. व्याकरणाचे व शुद्धतेचे उगाच अवडंबर नको. फक्त या भाषेतील सौंदर्याला मुकाल.

आणि मिराशीसाहेब, तर्खडकारांना नांव ठेवायचे काम नाही. मी त्यांच्याच चार पुस्तकावर शिकलो. पण कोणत्याहि पातळीवर प्रश्न येत नाही. भरीला व्रेन (रेन) अँड मार्टिन आणि नेस्फील्ड होतेच. पहिल्यांदा जेम्स हॅडली चेस वगैरे रहस्यकथा/थ्रिलर वाचायला घेतले. ते आपण खाली ठेवू शकत नाही. वाचत जातो व इंग्रजी सुधारते. मुख्य म्हणजे शिव्याहि येतात. फक्त क्रिकेट, हॉकी, टेनिस आणि फुटबॉल (सॉकर) च्या आणि इंग्रजी बातम्यांच्या चॅनलवरील उच्चार अभ्यासले की झाले. आता मी फिरंग्याच्या भषेत बोलतांना ऐकल्यावर मी मराठीतून शिकलो म्हटले तर कोणाला खरेच वाटत नाही.

विसोबा खेचर's picture

9 Mar 2008 - 8:14 am | विसोबा खेचर

संदेश पोचवणे हेच भाषेचे काम आहे. व्याकरणाचे व शुद्धतेचे उगाच अवडंबर नको.

कांदळकरसाहेब, तुमचे हात कुठे आहेत? जी चाहता है की उन्हे चूम लू! :)

अगदी माझ्या मनातलं बोल्लात बघा साहेब! अहो मी तरी कानीकपाळी ओरडून सर्व लोकांना हेच सांगत आलो आहे की व्याकरणाचे आणि शुद्धतेचे फुक्कटचे अवडंबर नको!

भाषा हे साधन आहे, साध्य नव्हे हेच या मूर्ख व्याकरणतज्ञांना आणि शुद्धलेखनतज्ञांना समजत नाही! आणि म्हणूनच मिसळपाववर 'शुद्धीचिकित्सक' हा आचरटपणा नाही!! काय शुद्ध नी काय अशुद्ध हे ठरवण्याचा कुणालाही अधिकार नाही. भाषा ही सगळ्यांची आहे!!

चार सोकॉल्ड शुद्धलेखनतज्ञांची आणि व्याकरणतज्ञांची पोळी शेकली जावी म्हणून आमच्यासारखी आम जनता आता यापुढे त्यांच्या दावणीला बांधली जाणार नाही आणि अत्याचाराला बळी पडणार नाही!

सतीशराव,

अनुभवकथम छानच आहे. आम्हाला आवडले. अजूनही लिवा!

आपला,
(व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या शृंखलांतून भाषेला स्वतंत्र करण्यास सज्ज)
स्वातंत्र्यसेनानी तात्या अभ्यंकर.

कोलबेर's picture

9 Mar 2008 - 8:27 am | कोलबेर

संदेश पोचवणे हेच भाषेचे काम आहे. व्याकरणाचे व शुद्धतेचे उगाच अवडंबर नको.

कांदळकर साहेब,
ह्या वाक्यामध्ये अवडंबर नको तसेच फाट्यावर मारणे*ही नको ..समतोल असावा..हे आपल्याला अभिप्रेत आहे असे गृहीत धरतो.
-कोलबेर
---
*हा मिसळपावरच ऐकलेला/ शिकलेला शब्द आहे.. चुकीचा असल्यास जनरल डायर समर्थ आहेच!

प्राजु's picture

9 Mar 2008 - 10:06 am | प्राजु

तुम्ही फाड फाड कोकाटे क्लासेस ला नाही का गेलात?? मस्त इंग्रजी शिकवतात तिथे म्हणे.

वॉकिंग ताड ताड स्ट्र्क टू भिंताड....

- (सर्वव्यापी)प्राजु

सृष्टीलावण्या's picture

9 Mar 2008 - 10:07 am | सृष्टीलावण्या

मी परदेशी लोकांना (समाजसेवा नव्हे, पैसे घेऊन) हिंदी शिकवते. एकाने विचारले हिंदी का
शिकायचे.. मी सांगितले, भारत उद्याची महाशक्ती आहे, बाकीचे गोरे उद्या हिंदी शिकणारच आहेत, तुम्ही आज शिकून त्यांच्या पुढे जाणार.. द्या टाळी.

उगाच इंग्रजीचे अवडंबर का माजवायचे?

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

टिउ's picture

10 Mar 2008 - 10:44 pm | टिउ

तात्यांचा प्रतिसाद वाचुन पाडगावकरांची एक कविता आठवली...

भाषेच्या ज्ञानाने तर
तुम्ही महा मंडित असता,
व्याकरणाचे बारकावे
त्याचे तुम्ही पंडित असता!

ती ओठ जवळ आणते,
व्याकरणात तुम्ही शिरता;
ओठ हे सर्वनाम?
त्याचा तुम्ही विचार करता!!

तर काय
तर काय?
खाली डोकं, वर पाय!!

आपल्याला एखादी गोष्ट येत नाही/नव्हती हे उघडपणे सांगायला धाडस लागते. ते तुमच्यात आहे.
रहाता राहिली गोष्ट इंग्लिशची. अहो तुम्ही आहात त्या अमेरिकेत इतक्या वेगवेगळ्या देशातून लोक येतात त्यांना इंग्लिश अजिबात येत नसते किंवा मोडके-तोडके येत असते खच्चून बोलत जातात, लिहीत जातात, कशाचे शुध्द्लेखन अन कशाचे काय! काय म्हणायचे आहे ते समजले की झाले! (कित्येकवेळा आम्हाला चीन, जपान आणि कोरियाहून येणार्‍या इ-मेल्स चा नेमका अर्थ लावता-लावता मेंदूला घाम येतो!) थोड्या प्रयत्नांती हळूहळू सुधारणा होत जाते आणि ती ही आवश्यकच पण सुरुवातीलाच न बिचकणे जास्त गरजेचे!

चतुरंग