अवेळीच केव्हा दाटला अंधार....

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जनातलं, मनातलं
7 Mar 2008 - 10:05 am

(हा माझा कवितानुभव पूर्वी तरुण भारत, मनोगत, ३६० इ. वर प्रसिद्ध केला होता. बर्‍याच जणांनी तो तिथे वाचला असेल पण मिपाच्या नव्या सभासदांसाठी इथे देत आहे.)

कवी ना. धो. महानोर हे खरेतर निसर्गकवी पण त्यांच्या कविता केवळ प्रणयरम्य व शृंगाररस युक्त असतात म्हणून वाचणारे व ऐकणारे अनेकजण असतील. हा खरे तर त्यांच्यातील कवित्वाचा अपमान आहे. त्यांच्या कवितेतील शृंगाररसाला नाके मुरडणे जितके चूक तितकेच त्यांच्या कवितेतील केवळ शृंगाररसाचा आस्वाद घेणे अयोग्य होय.

श्रीधर फडक्यांची 'काही बोलायाचे आहे ही ध्वनिफित जेव्हा ऐकली तेव्हा मला ही कविता विशेष भावली. किंबहूना पुढे कित्येक दिवस ती माझ्या मनांत रेंगाळत राहिली. विशेषत: त्यातील दुसरे कडवे. त्यातील करुण रस, विरह यातना मनाला चटका लावून जातात. महानोरांच्या कवितांना ग्रामीण मराठीचा सुगंध आहे. अगदी थोड्या पण अचूक शब्दात ते कवितेचा आशय व्यक्त करतात आणि कविता वाचताना डोळ्यापुढे जणू शब्दचित्रच उभे राहते.

गावाबाहेरील एखादे निर्जन स्थळ, घरच्यांची करडी नजर चुकवून आपल्या प्रियकराला भेटायला जाणारी आपली नायिका - अभिसारिका*, त्या नायिकेची वाट पाहत संकेतस्थळी एकाकी उभा असलेला तो प्रियकर आणि उशीरा का होईना पण दिलासादायक असे तिचे ते येणे.

एकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले,
हासतांना नभ कलून गेलेले

अनेक दिवसांनंतर असा एकान्त मिळाल्याने मोहरून गेलेले ते प्रेमी युगुल एकमेकांकडे भावूकतेने निशब्दपणे पाहात राहतात. हृदयांत, मनांत आनंदाचे कारंजे फुलले आहे आणि यामध्येच बरांच काळ निघून जातो व दिवस कलतो.

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर,
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर

दिवस कलून रात्रीचा पहिला प्रहर चालू होतो. तो आणि ती दोघेही भानावर येतात.

तो तिच्याकडे पुन्हा एकदा निरखून पाहतो आणि त्याला वाटते जणू आकाशातील चांदण्याच तिच्या तनुलतेला सजवित आहेत.

आणि माझा मला पडला विसर,
मिठीत थरके भरातील ज्वार

हे पाहून तो बेभान होतो आणि त्याचे विषयासक्त मन स्वत:ला आवर घालू शकत नाही आणि ते उत्कट प्रणयाच्या लाटेत वाहून जातात.

ते दोघे संपूर्ण रात्र तिथेच घालवितात. ती त्याला नंतर बरेच दिवस भेटत नाही. त्याला वाटते कि, तिच्या घरच्यांना झाल्या प्रकाराची कुणकुण लागल्याने तिला कोणा नातेवाईकाकडे पाठविले असावे.

कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली,
तिच्या पोटी कुण्या राव्याची सावली

आणि एक दिवस अचानक ती त्याला भेटते. मात्र यावेळी ती एकटी नसते तर तिच्या पोटी कुणाचा तरी वंश वाढत असतो.

तिच्या डोळीयांत जरा मी पाहिले,
काजळात चंद्र बुडून गेलेले

त्याची जरी तिच्यांत केवळ शारीरिक गुंतवणूक असली तरी तिचे स्त्रीमन त्याच्यात भावनिकदृष्ट्या पूर्णपणे गुंतलेले असते. यावेळी जेव्हा तो तिच्या डोळ्यात पाहतो तेव्हा त्याला खोल कुठेतरी जाणवते की तिच्या डोळ्यातला तो मोद, ते हास्य घनतमांत बुडून गेलेले आहे. ती त्या विरहाग्नीत होरपळून निघालेली आहे.

अवेळीच केव्हा दाटला अंधार,
तिला गळा जड झाले काळेसर....

मनाविरुद्ध झालेल्या अनपेक्षित लग्नामुळे तिच्या जीवनांत जो असमयी अघटित काळोख निर्माण झाला आहे तो शब्दात व्यक्त करणे खरोखरच कठिण होय. यमक्या कवी आणि महानोर यांच्यातील फरक इथे जाणवतो. तिच्या संपूर्ण आयुष्याची तडफड त्यांनी अवघ्या २- ४ ओळीत अचूक मांडली आहे. फक्त कोमल, भावूक, तरल मनाच्याच व्यक्तीच ही कविता अनुभवू शकतात.

खरोखरच ना. धों. च्या अवघ्या १२ ओळी आणि श्रीधरजींचा आवाज कुठल्याही संवेदनशील, हळव्या मनाला अस्वस्थ करून सोडतांत.

--------------------------------------------------------------------------
संस्कृत साहित्यानुसार अभिसारिका म्हणजे प्रियकराच्या भेटीच्या आशेने त्याच्या पाठोपाठ संकेतस्थळी येऊन पोहोचणारी... अभि+सृ-सर् = अभिसर्

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Mar 2008 - 12:51 am | llपुण्याचे पेशवेll

'एक वेस ओलांडली ' ही पण छान आहे कविता. त्यात शेवटी 'वेस एक ओलांडता गाव नवे दिसू लागले' हे एक कडवे फार छान वाटले.
मला तर फार आवडले. मला श्रीधर फडक्यांची ती संपूर्ण ध्वनिफीतच फार आवडते. त्यात सुधा 'तिला पाहीले मी नदीच्या किनारी' ही 'ग्रेस' यांची गूढ कविता तर मला फार आवडते.
'सृ.ला.'ताई आपण हा विषय इथे मांडून जुन्या आठवणी जागवल्या बद्दल आपले आभार.
पुण्याचे पेशवे

मुक्तसुनीत's picture

8 Mar 2008 - 1:52 am | मुक्तसुनीत

सृष्टिलावण्य,
एक उत्कृष्ट दर्जाचे रसग्रहण. या कवितेतील सौंदर्याचा, कारुण्याचा प्रत्यय आमच्यापर्यंत पोचविण्याबद्द्ल तुमचे अनेक धन्यवाद. असे म्हणतात की, प्रत्येक चांगली कविता रसिकाच्या मनात पुन्हा जन्म घेते. ही कविता कुठेतरी खोलवर तुम्हाला उमजली आहे. आज जेव्हा आम्ही हा लेख वाचतो तेव्हा ही कविता आम्हाला नव्याने भेटते. तिच्या रूपागुणाना तुमच्या रसिकतेचा सुगंध आता मिळाला आहे.

नंदन's picture

8 Mar 2008 - 2:07 pm | नंदन

रसग्रहण. मुक्तसुनीतांच्या प्रतिक्रियेशी सहमत आहे. महानोरांच्या इतर कवितांबद्दलही तुम्ही लिहिलेत, तर वाचायला आवडेल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सृष्टीलावण्या's picture

8 Mar 2008 - 8:21 am | सृष्टीलावण्या

आपल्या प्रतिक्रिया वाचून छान वाटले. मनाला गोड गुदगुल्याच झाल्या म्हणा ना..

लेखिकेला प्रत्येक लेख आपल्या नवजात बाळाप्रमाणेच असतो. त्या बाळाचे कोणी कौतुक केले की अगदी झालेल्या लेखन-प्रसववेदना पण विसरायला होतात. असो.

खरे आभार प्रतिक्रिया न लिहिणार्‍यांचे कारण दाद द्यायलाच विसरणे ह्याहून सुंदर दाद ती कुठली?

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

मुक्तसुनीत's picture

8 Mar 2008 - 8:46 am | मुक्तसुनीत

सृष्टिलावण्य,
बाकी लोकांच्या प्रतिक्रिया नाही आल्या तर हिरमुसू नका. मी माझ्या अनुभवावरून सांगतो ; बर्‍याचदा मी उत्तमोत्तम गोष्टीना वेळेअभावी प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. मिसळपाव वात्रट, खट्याळ (आणि तात्यांभाषेत"खास" भाषेतल्या काही इरसाल शब्दांनी वर्णन करता येईल असेसुद्धा ) आहे ; पण कद्रू नाही. इफ् यू सिंग लाँग इनफ्, ऍड्मिरेशन विल फॉलो :-)

सृष्टीलावण्या's picture

8 Mar 2008 - 10:11 am | सृष्टीलावण्या

हिरमुसले वैगरे काही नाही. अशीच जरा मजा.

>
>

परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर's picture

8 Mar 2008 - 9:47 am | विसोबा खेचर

हम्म! रसग्रहण ठीक वाटले..

परंतु खरे पाहता माझ्या मते वरील लेखनाला रसग्रहण म्हणण्यापेक्षा विवेचन म्हणणे अधिक योग्य ठरेल!

भाषा अगदीच शालेय पुस्तकातली औपचारिक अशी वाटते आहे. वर्गात केवळ शिकवायलाच पाहिजे, टर्म किंवा सिलॅबस पुरे करायला हवे, या भावनेतून मास्तरीण बाई जसं शिकवतात तसं वाटलं!

असो,

पुढील लेखनास शुभेच्छा!

तात्या.

सृष्टीलावण्या's picture

8 Mar 2008 - 10:13 am | सृष्टीलावण्या

निंदकाचे घर असावे शेजारी...

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Mar 2008 - 9:16 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो आमच्या जन्मदात्याच्या म्हणण्यानुसार आम्ही फक्त शरीराने वाढलो आहोत पण बुध्दीने अजून शाळेत जाण्याच्याच लायकीचे आहोत. :) त्यामुळे ते माझ्यासारख्या शाळेतल्या मुलाना लगेच कळले.(ह.घ्या. :))

-शाळकरी(डॅनी)
पुण्याचे पेशवे

सागर's picture

13 Sep 2011 - 5:20 pm | सागर

महानोरांच्या कविता खूप हळव्या करणार्‍या असतात यात शंकाच नाही.

उत्तम कवितानुभव. मनापासून आवडला.