सुरापुराण - प्रथम अध्याय..

अनिकेत's picture
अनिकेत in जे न देखे रवी...
6 Mar 2008 - 1:17 pm

ॐ नमो सुरादेवते | क्लेशहारिणी जगन्माते |
जी आम्हा नशेप्रत नेते | अखंड नमन करितो तिज ||१||

जे तुझे परमभक्त | मूढ ज्यांस बेवडे म्हणत |
मद्यपी ते सदोदित | तव स्तुती करती अहर्निशी ||२||

जरी त्यांनी अनेक लिहिली | स्तुतिपर काव्ये तुजप्रती भली |
ना तुझी पोथी लिहिली | म्हणून हा ग्रंथप्रपंच ||३||

जरी हा अनिकेत मूढमती | काव्यात मुळीच नाही गती |
खरीच जी तुजवर भक्ती | ग्रंथ तडीस नेईल हा ||४||

म्हणोन मी ऐसे म्हणतो | तुझे चरणतीर्थ आधी प्राशितो |
त्यावरीच हा ग्रंथ लिहितो | सुरेख होईल नि:संशय ||५||

तेव्हा आता माते | तूच माझिया हस्ते |
लिहावेस ह्या ग्रंथाते | कृपा करावी भक्तांवर ||६||

ह्या ग्रंथाचे करोनि पठण | भक्तांस होईल परमानंद |
आणि जे अज्ञानी जन | तुझी महती जाणतील की ||७||

ह्या प्रथमाध्यायी कथिले | ग्रंथाचे प्रयोजन भले |
पुढील अध्यायांचे खरे | प्रयोजन आता सांगतो ||८||

स्कॉच व्हिस्की व्होडका वाईन | रम ब्रॅंडी आणि जीन |
तव रूपांचे करीन वर्णन | बिअर ऍबसिंथ यांचेही ||९||

ताडी माडी नारंगी मोसंबी | जी तुझी देशी रूपे भली |
अन् काजूची जी फेणी | यांना कसे विसरू बरे ||१०||

भक्त तुझे जे बेवडे | खंब्यानंतरही राहती खडे |
त्यांची लक्षणे त्यापुढे | येतील लोकहो साकल्ये ||११||

माते तुझे जे मंदिर | जन ज्यास म्हणती बार |
भक्तांचे तेथे नाना प्रकार | तेथे काय करती सांगेन ||१२||

साजर्या होती ज्या पार्ट्या | चारचौघात अथवा एकट्या |
त्यातील गोष्टी लहान्-मोठ्या | त्याही कथेन मी ||१३||

कळस चढवीन त्यावरी | तुझी कृपा होते ज्यावरी |
त्याच्या काया-मनाची स्थिती खरी | काय होते वर्णीन ||१४||

तुझी कृपा ओसरल्यावर | येतो जो हँगओव्हर |
भयानक जो प्रकार | कैसा तो सांगेन ||१५||

अनिकेत हा जोडोनि कर | विनंती करितो एकवार |
टाळण्या हा हँगओव्हर | नशेत सदा रहावे ||१६||

प्रथमाध्याय हा येथे | संपवितसे दारूमाते |
जवळ घेई बालकाते | अव्हेर त्याचा करू नको ||१७||

-इति प्रथमोध्यायः

प्रतिक्रिया

नंदन's picture

6 Mar 2008 - 1:58 pm | नंदन

सुरुवात झालीय. पुढील अध्यायांची वाट पाहतो आहे. ह्या अध्यायात साधलेला लयीचा 'तोल' [सुरेबद्दल काव्य असले तरी :)] पाहता पुढील भागही 'सुरेख होतील नि:संशय'याची खात्री वाटते :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

6 Mar 2008 - 2:16 pm | विसोबा खेचर

वा अनिकेता!

भन्नाटच लिहिले आहेस... क्या बात है, क्या केहेने....!

तुझ्या सुरापुराणाचे सर्व अध्याय लिहून झाले की पोथी छापून प्रसिद्ध करायची जबाबदारी आपण घेतली बॉस!

आधीच लंबर लावून ठेवतो, न जाणे उद्या तुझ्या दारात प्रकाशकांच्या रांगा लागायच्या इतकी तुझी वाणी रसाळ आणि ओघवती आहे! मला तर नेवाश्यात बसून ज्ञानेश्वरी ऐकतो आहे की काय किंवा शिरडीत बसून साईसत् चरिताची पोथी वाचतोय की काय असेच क्षणभर वाटले इतकी तुझी भाषा सात्विक आणि फुल्टू(!) पोथी ष्टाईल आहे! मानलं बॉस! :)

आणि संत तात्याबा महाराजांनी म्हटलेलंच आहे की,

"शेवटी ओवी म्हणजे तरी काय हो? जी कानाला गोड लागते ती ओवी!"
"आणि जी थेट हृदयाला जाऊन भिडते आणि माणसामाणसातला ओलावा वाढवते ती शिवी!" :)

तुझ्या सुरापुराणातल्या ओळींतही अगदी ओवीचेच सात्विक भाव आहेत बरं!

जियो!! :)

बाय द वे, मी काय बोलतो, तुझी पोथी पूर्ण झाली की मुखपृष्ठावर सिंगल माल्टच्या बाटलीचं एखादं चित्र टाकूया का? :)

जरी त्यांनी अनेक लिहिली | स्तुतिपर काव्ये तुजप्रती भली |
ना तुझी पोथी लिहिली | म्हणून हा ग्रंथप्रपंच ||३||

क्या बात है, क्या बात है!

भले शाब्बास रे अनिकेता! जियो...!!

आपला,
(बाईबाटलीतला) तात्या.

अनिकेत's picture

6 Mar 2008 - 2:36 pm | अनिकेत

आपल्या प्रतिसादाने आला हुरूप | जरूर लिहू ओव्या खूप |
सिंगल माल्टचे गोजिरे रूप | अवश्य टाकू मुखपृष्ठी ||

या ग्रंथाचे खरे कारण | "कांगारू" ही कविता जाण |
वाटले लिहाव्या ओव्या आपण | जशा लिहिल्या चतुरंगे ||

आणि एका प्रतिक्रियेवरला | "सुरापुराण" हा शब्द वाचला |
भलताच तो आवडला | "युरेका युरेका" ओरडलो ||

चतुरंग's picture

6 Mar 2008 - 9:34 pm | चतुरंग

वाचता पुराण | आली मज जाण |
अभ्यासू कवन | 'अनिकेते' ||

हवा निज ध्यास | करिता अभ्यास |
घेता मदिरेस | कवळुनी ||

कारण ग्रंथाचे | 'कांगारु' ते साचे |
श्रेय मज तुझे | नको देवा ||

तरि तुझे मन | नम्र तेही जाण |
झाले समाधान | चतुरंगा ||

चतुरंग

ओल्डमंक's picture

6 Mar 2008 - 8:48 pm | ओल्डमंक

पहिला अध्याय लैच भारी...
आता एकामागोमाग अध्याय येऊ देत... इनाकारनी ग्याप नको..

अनिकेत हा जोडोनि कर | विनंती करितो एकवार |
टाळण्या हा हँगओव्हर | नशेत सदा रहावे ||१६||

सदा नशेत ठेवा... ह्यांगोवर नको..

सुधीर कांदळकर's picture

6 Mar 2008 - 10:28 pm | सुधीर कांदळकर

वाचूनच नशा आली.

अनिकेत, तात्या आणि चतुरंग या सर्व संतांस धन्यवाद. पण शुद्धीवर राहून वाचू नये अशी कांही अट आहे का? अट घालण्याएवढी शुद्ध आहे का? असल्यास घालवा.

वाचवून (सेव्ह करून) ठेवली आहे. शुद्ध गेल्यावर पुन्हा वाचीन.

इनोबा म्हणे's picture

6 Mar 2008 - 11:57 pm | इनोबा म्हणे

अनिकेतबाबा आत्ता वाईच जास झाल्यामुळे तुमचे चरणकमल निट दिसत नाहीत.उतरल्यावर बियरने धुऊन काढीन.

पुढच्या अध्यायांच्या प्रतिक्षेत.
आपलाच,
संत सुरादास

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा(मिसळबोध)

चित्तरंजन भट's picture

9 Mar 2008 - 11:39 pm | चित्तरंजन भट

अनिकेत, सुरापुराण सुरेख आणि रसाळ होते आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा!

लिखाळ's picture

9 Mar 2008 - 11:51 pm | लिखाळ

अरे वा !
रसपुर्ण सुरापुराण वाचून आनंद झाला. फार कल्पक !
फारच छान झाले आहे. पुढचे अध्याय वाचायला उत्सूक.
--(सुरापान करणारा :) लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

पिवळा डांबिस's picture

10 Mar 2008 - 2:31 am | पिवळा डांबिस

आम्हाला काव्य करता येत नाही हे (एव्हाना) सर्वज्ञात आहे.
परंतू चांगले काव्य व भंगार यातील फरक मात्र कळतो. वरील काव्य निसंशय उत्तम!!

जरी हा अनिकेत मूढमती | काव्यात मुळीच नाही गती |
खरीच जी तुजवर भक्ती | ग्रंथ तडीस नेईल हा ||४||

ती काळजी नको. तुम्ही सुंदर लिहिता आहांत. आणि विषय इतका उत्तम आहे!
शिवाय, मूकं करोति वाचालं, पंगुं लंघयते गिरिम असं म्हटलंच आहे!:))
पुढील अध्यायांच्या प्रतिक्षेत!

एकच नम्र सूचना, सुरापुराण याऐवजी "मदिरासप्तशती" नांव कसे वाटते?
"या देवी सर्वभूतेषु, मदिरारूपेण संस्थिता|
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो: नमः||

शाक्तपंथीय,
पिवळा डांबिस

धमाल मुलगा's picture

10 Mar 2008 - 5:14 pm | धमाल मुलगा

केवळ अप्रतीम.

म्हणोन मी ऐसे म्हणतो | तुझे चरणतीर्थ आधी प्राशितो |
त्यावरीच हा ग्रंथ लिहितो | सुरेख होईल नि:संशय ||५||

तेव्हा आता माते | तूच माझिया हस्ते |
लिहावेस ह्या ग्रंथाते | कृपा करावी भक्तांवर ||६||

ह्या ग्रंथाचे करोनि पठण | भक्तांस होईल परमानंद |
आणि जे अज्ञानी जन | तुझी महती जाणतील की ||७|

क्या बात है!

बाकी डा॑बिसकाका॑च्या सुचनेवर जरूर विचार करावा अशी णम्र इन॑ती.

"या देवी सर्वभूतेषु, मदिरारूपेण संस्थिता|
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो: नमः||

प्रभो, भरुन पावलो हो!!!

शाक्तपंथीय,पिवळा डांबिस
हा हा हा....लय लय भारी.

सुरापूरवासिनीच्या टाचेखालचा राक्षस
-ध मा ल.

पिवळा डांबिस's picture

10 Mar 2008 - 10:18 pm | पिवळा डांबिस

सुरापूरवासिनीच्या टाचेखालचा राक्षस
-ध मा ल.

वा, वा धमाल्या! तू तर वरकडी केलीस!!!

नंदन's picture

19 Mar 2008 - 12:43 pm | नंदन

येऊद्यात की, अनिकेतराव.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अनिकेत's picture

19 Mar 2008 - 10:25 pm | अनिकेत

सध्या परीक्षा चालू आहेत :(
वेळच मिळत नाहिये....

एप्रिलमध्ये परीक्षा संपवून उन्हाळी चाकरी करायला दिल्लीस जाऊ.
तेव्हा २ महिन्यात संपवून टाकू.

अनिकेत

सचिन's picture

19 Mar 2008 - 11:57 pm | सचिन

अनिकेता,
पहिलाच एकदम पतियाळा रे !!
बाकीचेही ओत लवकर....आमच्या ग्लासात !!
तुझ्यासवे भक्तिरसात डुंबल्यावर नास्तिकही (..आहेत का कोणी ?) आस्तिक होतील !!

...एक बारकरी .. आय मीन वारकरी !!