मृत्यूछायेतले ६९ दिवस...

मोदक's picture
मोदक in दिवाळी अंक
11 Nov 2012 - 2:38 pm

१२१ वर्षे जुनी सोन्याची आणि तांब्याची खाण.
दुर्घटनेची आणि मृत्यूची काळीकुट्ट पार्श्वभूमी..
जमिनीपासून २३०० फूट खोल सुरू असलेले खोदकाम...
खोल भूगर्भात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करणारे कामगार....

एक अपघात.

५ ऑगस्ट २०१०, चिलीमधील अ‍टाकामा वाळवंटातील एका खाणीमध्ये भूस्खलन झाल्यामुळे ७ लाख टनी महाकाय खडक प्रस्तरापासून विलग होऊन कोसळला, आणि... एका दंतकथेला सुरुवात झाली.

चिली या देशाला खाण व्यवसायाची मोठी परंपरा लाभली आहे. विपुल साधनसामग्रीमुळे तांब्याच्या मोठमोठ्या खाणी अ‍टाकामा वाळवंटात खोदल्या जात होत्या. याच खाणींच्या जोरावर चिलीने जागतिक उत्पादनामध्ये दिमाखात मजल मारली होती. परंतु कित्येक दशके सुरू असलेल्या अव्याहत खोदकामामुळे भूगर्भामध्ये हालचाली सुरू झाल्या होत्या. नैसर्गिक बदल, जुनीपुराणी यंत्रे आणि मानवी हलगर्जीपणा यांमुळे दुर्घटनांचे प्रमाणही वाढले होते. २००० सालापासून खाणींमधल्या अपघातांमध्ये ३० ते ३५ लोक दर वर्षी मरण पावत होते. २००८मध्ये हा आकडा ४३पर्यंत गेला, सरकार खडबडून जागे झाले व बरेच नियम, कायदे कडक केले गेले.. पण बदलाचे हे वारे फार दिवस टिकले नाहीत. खाणींमधली धोकादायक परिस्थिती हळूहळू पुन्हा पूर्वपदावर आली. जीव धोक्यात घालून कामगार काम करतच होते..

परंतु या अपघाताने सर्व काही बदलून गेले.

अपघातानंतर खाणीमध्ये कामासाठी खोलवर उतरलेल्या सगळ्या कामगारांनी जमिनीवर येण्यासाठी जिवाच्या आकांताने धाव घेतली. खडकाच्या वरच्या बाजूला असलेले सर्वच्या सर्व कामगार खाणीबाहेर सुखरूप पोहोचले. खडकाच्या खालच्या बाजूला असलेले ३३ कामगार मात्र बेपत्ता होते.

मोबाईल व इंटरनेट या अधुनिक संपर्कसाधनांमुळे अपघाताची माहिती काही क्षणात जगभर पोहोचली. या ३३ जणांच्या कुटुंबीयांनी, चिली सरकारच्या वेगवेगळ्या प्रतिनिधींनी, पोलीस, रेस्क्यू, फायरब्रिगेड, सिक्यूरिटी, न्यूज चॅनेल्स या सर्वांनी खाणीकडे धाव घेतली. परिस्थितीचा आढावा घेतला गेला आणि सर्व जण हादरून गेले.
40

वरील फोटोमध्ये वरपासून खालीपर्यंत दिसणारा वळणावळणाचा मार्ग हा खाणीतला ये-जा करण्याचा एकमेव मार्ग आहे. उभ्या तुटक रेषा व्हेंटिलेशन शाफ्ट दर्शवितात. पहिला अपघात ५ ऑगस्टला, तर दुसरा ७ ऑगस्टला झाला, त्या जागाही दिसत आहेत.

खाणीतल्या प्रचंड रस्त्याला मधोमध विभागून तो महाकाय खडक कोसळला असल्याने खाणीतला वळणावळणाचा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता आणि खाणीमध्ये ३३ जण बेपत्ता होते.

जर खाणकामगार जिवंत असतील तर त्यांनी खाणीमधल्या एकमेव सुरक्षित ठिकाणी, एका शेल्टरचा आश्रय घेतला असण्याची शक्यता होती. परंतु त्या शेल्टरमध्ये केवळ ४८ तास पुरेल इतकाच अन्नाचा आणि पाण्याचा साठा होता. अपघातामुळे बचावलेले कामगार तहान-भुकेने तडफडून मरण्याचा धोका कैक पटीने वाढला होता. कामगारांचा ठावठिकाणा शोधणे आणि जर ते जिवंत असले तर दुसरा रस्ता तयार करून त्यांना बाहेर काढणे, याशिवाय अन्य कोणताही मार्ग शिल्लक नव्हता.
सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. राष्ट्रपती व खाणमंत्री घटनास्थळी हजर झाले, या नाजूक क्षणी नक्की कशाची गरज आहे याचा आढावा घेतला; रेस्क्यू पार्टीज त्यांचे काम करत होत्याच. त्यांना सरकारकडून हवी ती मदत मिळत होती, मिळवली जात होती. वेगवेगळे तज्ज्ञ हळूहळू दुर्घटनेच्या जागी जमा झाले. खाणमंत्री गॉलबॉर्न हे खरे तर एक सिव्हिल इंजीनीयर, अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीची MBA ची पदवी घेतलेले एक कॉर्पोरेट. अगदी केवळ काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर खाणमंत्रिपदाची जबाबदारी आली होती. खाणीच्या कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही ज्ञानाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी या सर्व कामाची जबाबदारी उचलली. "तांत्रिक ज्ञान नसल्याने जर मला योग्य निर्णय घेता येणार नसेल, तर योग्य निर्णय घेता येईल अशी परिस्थिती मी नक्की तयार करू शकतो" हा सरळ साधा विचार करून गॉलबॉर्न प्रत्येक मीटिंगमध्ये सहभागी झाले, रेस्क्युअर्सना लागणार्याा वेगवेगळ्या सामग्रीची, यंत्रांची उपलब्धता लगेच होऊ लागली. एखादा तज्ज्ञ, एखादे यंत्र, एखादी माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नसली तर ती कोठून मिळवली जाईल याची माहिती काढली जात असे व ती तातडीने मिळवली जात होती. रेस्क्युअर्सचे काम सुरू असतानाच बेपत्ता ३३ जणांच्या कुटुंबीयांची गर्दी जमली. सुटकेचे प्रयत्न म्हणजे नक्की काय सुरू आहे आणि कामगारांची अवस्था कशी आहे हे कळायला त्यांना काहीच मार्ग नव्हता. आप्तांच्या काळजीने सैरभैर झालेल्या त्या लोकांकडे कुणीतरी लक्ष देण्याची गरज होती. इथेही गॉलबॉर्न उभे राहिले.
बेपत्ता असलेल्या प्रत्येक कामगाराच्या कुटुंबीयांसाठी एक, असे ३३ तंबू उभारून दिले, त्यांच्यासाठी एक सामुदायिक स्वयंपाकघर, प्रसाधनगृहे, मोबाईल फोनसाठी चार्जर, नोटीसबोर्ड अशा सोयी तत्काळ उभारून दिल्या. संरक्षणासाठी पोलीस गस्त घालू लागले. त्या उजाड वाळवंटात जणू एक वेगळे शहर वसवले गेले.
कुटुंबीयांनी या कँपचे नामकरण केले "esperanza" म्हणजेच "आशा" (Hope). या नातेवाइकांनी तिथे ३३ खाणकामगारांचे प्रातिनिधिक असे ३३ राष्ट्रध्वज उभारले. ३३पैकी १ कामगार बोलिव्हियाचा होता तर ३२ चिलीचे.

41

बेपत्ता कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल कुटुंबीयांना असलेली चिंता लक्षात घेऊन स्वतः खाणमंत्री आणि सरकारमधील उच्चपदस्थ दर दोन तासांनी कुटुंबीयांना भेटत होते, आधार देत होते. रेस्क्यू टीम करत असलेली प्रयत्नांची पराकाष्ठा कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम हे लोक करत होते. रोज संध्याकाळी "आज काय घडले?", "उद्या काय प्रयत्न केले जातील?" अशी माहिती नि:संकोचपणे मीडियाला आणि कुटुंबीयांना दिली जात होती. इथेही गॉलबॉर्न यांनी एक धाडसी पाऊल उचलले. कुटुंबीयांची काळजी लक्षात घेऊन सर्वप्रथम कुटुंबीयांसोबत या रोजच्या मीटिंग घेतल्या जात होत्या व नंतर मीडियासोबत. हा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या मीटिंगमध्ये हजर असलेल्या सर्व मीडिया प्रतिनीधींना शांतपणे तंबूबाहेर काढले गेले व फक्त कुटुंबीयांशी संवाद साधला. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे कुटुंबीयांचा विश्वास संपादन करण्यात चिली सरकारला यश मिळाले व त्यांच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळाले. या दुर्घटनेबद्दल वर्तमानपत्रामधून सरकारची निर्भत्सना झाली, काही कुटुंबीयांनीही शाब्दिक हल्ले चढवले पण सरकारने अशा अप्रिय घटनांचा एकंदर प्रयत्नांवर परिणाम होऊ दिला नाही.

मीडियाशी व कुटुंबीयांशी बोलताना राष्ट्रपती पायनेरा व बाजूला खाणमंत्री गॉलबॉर्न

42

रेस्क्यू टीम, सरकार, कुटुंबीय सर्व जण प्रार्थना करू लागले, सुरक्षिततेची.. सुखरूपतेची..

कामगारांचा ठावठिकाणा शोधणे हे प्रमुख लक्ष्य होते. तब्बल १५ वेगवेगळ्या ठिकाणाहून शेल्टरच्या दिशेने ड्रिलिंग सुरू झाले होते. या ड्रिलिंगमध्ये अचूकता ही एक अत्यंत महत्त्वाची बाब होती आणि कामगारांच्या सुखरूपतेबाबत काहीच माहिती न मिळाल्याने सर्व प्रयत्न घाईगडबडीत सुरू होते. ड्रिलिंग करणार्‍यांना परिस्थितीची जाणीव होती. मात्र गडबड करून भलत्याच दिशेला ड्रिल केले, तर ३३ कामगारांच्या जिवावर बेतेल याची त्यांना जाणीव होतीच.

43

तीन... चार... पाच... दिवस पार पडले. कोणत्याही योजनेला यश आले नव्हते. परिस्थिती जैसे थे होती. सातव्या दिवशी खाणीच्या तोंडाशी थोडी पडझड झाली व तो रस्ताही बंद झाला. काम मंदावले, अव्याहतपणे धडधडणार्‍या क्रेन्स आणि रोऽऽ रोऽऽ करणारे काही ड्रिल ठप्प झाल्यामुळे खाणकामगारांच्या कुटुंबीयांमध्ये चलबिचल झाली व गैरसमजामुळे त्या सर्वांनी तिथेच धरणे धरले, स्वतः आत जाऊन कामगारांना शोधण्याची तयारी दाखवली. सरकारने ही मागणी तत्काळ नाकारली.

खाणमंत्री गॉलबॉर्न यांची खाणीजवळची उपस्थिती आणि प्रत्येक निर्णयातला सहभाग सरकारमधील काही उच्चपदस्थांना मान्य नव्हती. अशा रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सरकारने पडद्याआडून काम केले पाहिजे, हा त्यांचा अनुभव होता. रेस्क्यू ऑपरेशन अयशस्वी झाले तर संपूर्ण मंत्रीमंडळाला देश चालवणे अशक्य होणार होते. या दरम्यान एका मुलाखतीमध्ये गॉलबॉर्न यांनी खाणकामगारांच्या बचावण्याची शक्यता ‘खूप कमी’ असल्याचे सांगितले व एकच गदारोळ झाला. सरकारमधील एका जबाबदार मंत्र्याने असे अप्रिय विधान करणे कोणालाच रुचले नाही. पण रेस्क्यू ऑपरेशनमधून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा तयार होऊ नयेत आणि झाल्याच तर उंचावू नयेत, यासाठी हे धाडसी विधान केले.

ड्रिलिंगचे काम पूर्ण वेगाने चालूच होते. घाईगडबडीत ड्रिल आपली जागा आणि ठरवलेला मार्ग सोडून भरकटत होते. टणक खडकामुळे ड्रिलचे दर्शनी भाग मोडत होते, नादुरुस्त होत होते. ड्रिल मशीन्सची गती मंदावत होती आणि सर्वांच्या काळजीत भर पडत होती. रेस्क्युअर्सचा धीर सुटू लागला होता. नातेवाईक, सरकार, बचावलेले खाण कामगार सर्व जण हळूहळू नि:शब्दपणे हार मानत होते. त्या ३३ जणांच्या सुरक्षिततेबद्दल आता नकारार्थी मतप्रवाह पसरत होते, उत्साहाने सुरू झालेले ड्रिलिंगचे काम यंत्रवत सुरू होते, सर्वांच्या भावभावना जणू थिजून गेल्या होत्या.

रेस्क्युअर्सना आणखी एक धक्का बसला. कामगार नक्की सापडतील अशी अपेक्षा असलेल्या एका ड्रिलला काहीच मिळाले नाही. या अनपेक्षित धक्क्याने सर्व जण कोलमडून गेले. कामगारांनी भूगर्भातील शेल्टरमध्ये आश्रय घेतला असला तरी तिथे असणारा अन्न-पाण्याचा साठा फक्त ४८ तास पुरेल इतकाच होता. इथे तर १५ दिवस उलटून गेले होते. खाणीमध्ये पिण्याच्या पाण्याचा साठा कामगारांनी शोधून काढला असता. पण.. हवा..?? इतके दिवस पुरेल असा हवेचा काहीही स्रोत खाणीमध्ये नव्हता. त्यातही अपघातामुळे धुळीचा अतिप्रचंड लोट उठला असण्याची शक्यता होती. उपलब्ध असणारी हवा त्यामुळे दूषित झाली असण्याची दाट शक्यता होती. परिस्थितीसमोर रेस्क्युअर्स हतबल झाले होते. कितीही उंचावलेले मनोबल आणि नीतिधैर्य असले तरी वास्तवाची जाणीव वाईट प्रकारे प्रत्येकावर आपला प्रभाव दाखवत होती.

धक्क्यावर धक्के देणार्‍या नियतीने आणखी एक धक्का दिला. खोदकाम सुरू असणार्‍या १५ ड्रिल्समुळे अक्षरशः चाळण झालेल्या त्या परिसरात अंतर्गत पडझड सुरू झाली. भूगर्भीय हालचालींमुळे त्या परिसरात काम करणे अत्यंत धोकादायक झाले. ३३ कामगारांसाठी - जे जिवंत आहेत की नाही हेही माहीत नाही, अशा ३३ जणांसाठी - शेकडो लोकांचा जीव धोक्यात घालणे कितपत शहाणपणाचे आहे? हा प्रश्न उभा राहिला. काही ड्रिल बंद केली गेली, काही सुरू होती. बेपत्ता ३३ कामगारांचे नातेवाईक अजूनही आशा लावून बसले होते. रोजच्या मीटिंग्ज सुरू झाल्यापासून बहुधा पहिल्यांदाच सरकारचे प्रवक्ते आणि कुटुंबीय यांमध्ये जबरदस्त मतभेद झाले. कुटुंबीयांनी स्वत: आत जाऊन शोधकार्य करण्याची पुन्हा एकदा मागणी केली. सरकारने ही मागणीही विनाविलंब नाकारली.

कामगारांचा शोध घेण्याचा १७वा दिवस सुरू झाला. कामगार जिवंत असण्याच्या शक्यता जवळजवळ संपुष्टात आल्या होत्या, आता आपण फक्त प्रेतांसाठी खोदकाम करतोय ही भावना रेस्क्यू पार्टीमध्ये बळावू लागली. सर्वत्र एक अनामिक ताण भरून राहिला होता.
अचानक एका ड्रिलला चिकटून काहीतरी वर आले. एक लाल कापडाचा तुकडा.. एक चिकटपट्टीच्या वेष्टणात गुंडाळालेले काहीतरी.. ड्रिलपासून ते काळजीपूर्वक वेगळे केले गेले आणि एकच जल्लोष उडाला. सर्वच्या सर्व ३३ कामगार सुरक्षित असल्याचा संदेश त्या चिठ्ठ्यांवर लिहिला होता. त्या संदेशासोबत कामगारांची परिस्थिती विशद करणारी विस्तृत माहिती दिली होती. ही तारीख होती २२ ऑगस्ट २०१०. रेस्क्यू करणार्यां मध्ये, राष्ट्रपती व मंत्रीमंडळामध्ये, कुटुंबीयांमध्ये आणि संपूर्ण चिलीमध्ये आनंदाची एक लाट उसळली. ड्रिल करणारे कित्येक जण ते ऐकून ढसाढसा रडू लागले, आनंदाश्रू.
१७ दिवस हे सर्व कामगार अमानवीय परिस्थितीमध्ये जिवंत होते, ३६ अंश तापमानामुळे निर्माण झालेली उष्णता, ९०%पेक्षा जास्त आर्द्रता, अपुरी हवा, अपुरे अन्न आणि दूषित पाणी आणि अनिश्चित भवितव्य पचवून हे सर्व जण मानसिक व शारीरिकदृष्ट्या धडधाकट होते.

44

हाच तो संदेश, "We are well in the shelter, the 33". चिलीचे राष्ट्रपती तो संदेश पत्रकारांना दाखवताना.

अपघात झाल्यानंतर कामगारांनी तातडीने घेतलेल्या निर्णयांमुळे सर्वांचे जीव बचावले होते.
अपघातानंतर सर्वप्रथम आत अडकलेले कामगार एकत्र आले, सर्वांच्या शारीरिक अवस्थेची तपासणी केली, सुदैवाने कुणीही जखमी झाले नव्हते. सर्वांनी ‘शेल्टर’चा आश्रय घेतला, जे या खाणीमधले एकमेव आश्रयस्थान होते. कामगारांनी सुटकेचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. काही अनुभवी कामगार परिस्थितीचा आढावा घेऊन आले. जिथे खडक कोसळला होता त्या ठिकाणी आढावा घेणार्याल कामगारांनी तशा परिस्थितीतही स्प्रे पेंटने मार्किंग केले, वेगवेगळ्या नोंदी घेतल्या. या दुर्घटनेचे गांभीर्य ओळखून व सुटकेसाठी कितीही वेळ लागू शकतो हे समजून कामगारांनी महत्त्वाचे एक काम केले, ते म्हणजे आपल्यातूनच सर्वात अनुभवी आणि सर्वात वयस्कर अशा 'लुई उर्झ्वा' याला लीडर बनवले आणि त्याचे आदेश मानण्याचे मान्य केले. लीडरच्या आदेशांनुसार पिण्याच्या पाण्याचा शोध घेतला, एक कामगार धर्मगुरूचे काम करू लागला, औषधांची माहिती असणारा एक कामगार मेडिकल लीडर झाला. वेगवेगळ्या रेस्क्यू पार्टीज तयार केल्या. कामगारांच्या रेस्क्यू पार्टीने हवा खेळती राहण्यासाठी असलेल्या व्हेंटिलेशन शाफ्टमधून निसटण्याचा प्रयत्न केला, पण तिथल्या शिड्या गायब होत्या, भूगर्भीय हालचालींमुळे हे व्हेंटिलेशन शाफ्टही तिसर्‍याच दिवशी बंद झाले. रेस्क्यू पार्टीने स्प्रे पेंटने मार्किंग केलेल्या खडकाचे निरीक्षण केले असता त्यांच्या हेही लक्षात आले की, खडक आणखी काही फूट खाली सरकला होता. अशा अस्थिर परिस्थितीमध्ये आणखी कोणतेही साहस न करता त्यांनी शेल्टरमध्ये राहणे पसंत केले.

शेल्टरचे ठिकाण कळताच मदतकार्य जोमाने सुरू झाले.

हे ‘शेल्टर’ म्हणजे ५५० स्क्वेअर फुटाची एक मोठी खोली होती, त्या खोलीबरोबरच दोन किलोमीटरचा एक रस्ताही मोकळा होता. रेस्क्यू पार्टीने जलदगतीने हालचाली करून या परिसरात अनेक ड्रिल्स पोहोचवली.

एका ठिकाणाहून सप्लाय लाईन सुरू केली गेली. रेफ्रीजरेटेड ऑक्सीजनचा पुरवठा सुरू झाला. त्यामुळे आतले तापमान थोडे उतरवून कामगारांचे तिथले आयुष्य सुसह्य होण्यास मदत झाली. आणखी एका लाईनमधून अन्न, पाणी, संदेश देवाणघेवाण सुरू झाली. एक ऑप्टिकल केबलही खाली सोडली. फोन कनेक्शन जोडले, खाणमंत्री लॉरेन्स गॉलबोर्न आणि बाकी लोक आतुरतेने वाट बघत होते.. रिंग वाजली आणि एक कामगार फोनवर बोलू लागला. त्याने सर्व परिस्थिती विशद केली. सर्व जण ठीक आहेत, याची खातरी पटली. सगळीकडे एकच जल्लोष झाला. १७ दिवसांनंतरच्या झालेल्या पहिल्यावाहिल्या संभाषणाचा शेवट सर्व खाणकामगारांनी मिळून चिलीचे राष्ट्रगीत गाऊन केला. कामगारांच्या या उत्स्फूर्त कृतीमुळे सर्व जण हेलावून गेले. वरती अनेकांना भावना अनावर झाल्या.

यथावकाश व्हिडिओ कॅमेरा खाली सोडला गेला. सर्व जण आतुरतेने पहिल्या दृश्याची वाट बघत होते. अचानक एक कृश, गबाळा, दाढी वाढलेला पण तरतरीत डोळ्याचा असा एक हसतमुख चेहरा समोर आला. पुन्हा जल्लोश झाला. उपासमारीने कृश झालेले, दाढी वाढलेले, घामेजलेले, उघडेवाघडे आणि तरीही आशा टिकवून असलेले असे कामगार संपूर्ण जगाने पाहिले. १७ दिवस कोणत्याही भवितव्याशिवाय जगूनही त्यांनी हार मानली नव्हती, कामगार अत्यंत धीरोदात्तपणे कॅमेर्‍याला - जगाला सामोरे आले.

जग या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते.

45

खाणीमधील दृश्ये.

46

47

48

वरून शोधकार्य चालू असताना सुरू असलेले खोदकाम कामगार ऐकत होते. आज ना उद्या ड्रिल आपल्यापर्यंत पोहोचणार याची जाणीव झाल्यावर त्यांनी मदतीसाठी संदेश लिहिले, महत्त्वाची माहिती लिहून काढली आणि हे सर्व वरती पोहोचविण्यासाठी चिकटपट्टीपासून सगळ्याची जय्यत तयारी केली. ड्रिल त्यांच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर चपळाईने ड्रिल शाफ्टला हा सगळा जामानिमा चिकटवला. त्या परिस्थितीतही कामगारांनी केलेले विचार, कृती आणि दाखवलेले धैर्य वाखाणण्याजोगे होते.

कामगारांचा ठावठिकाणा कळल्यानंतर आता सुटकेचे प्रयत्न सुरू झाले. कामगारांची झालेली उपासमार लक्षात घेता सप्लाय लाईनमधून फक्त द्रवरूप आहार पाठवण्यास सुरुवात झाली.

सुटकेचा अंतिम आराखडा तयार झाला आणि सर्व जण पुन्हा चिंतेत पडले. या सुटकेसाठी तब्बल ४ महिने लागणार होते. अस्तित्वात असलेली ड्रिल मोठी करून व त्यातून एक माणूस मावू शकेल इतकी मोठी कॅप्सूल जाईल इतका मोठा आरपार बोगदा तयार करावा लागणार होता, दरम्यान होणार्याण भूगर्भीय हालचालींचा सामना करण्यासाठी या संपूर्ण उभ्या बोगद्याला आतून एक तितक्याच मोठ्या स्टील पाईपचा थर द्यावा लागणार होता. या सर्व कामासाठी साधारणपणे चार महिने लागणार होते.

सुटकेचा अंतिम आराखडा

49

सुटकेसाठी लागणार्या वेळाची कामगारांना माहिती द्यावी की नाही, त्यांची प्रतिक्रिया काय असेल यावरही विचार केला गेला आणि तिसर्‍या दिवशी स्वतः खाणमंत्र्यांनी कामगारांना या परिस्थितीची जाणीव करून दिली. हे सगळे आधीच माहिती असल्याप्रमाणे कामगारांनी याही बातमीचे आश्चर्यकारकरीत्या हसतमुखाने स्वागत केले.

कामगारांना सप्लाय लाईनमधून अन्न आणि पाण्याबरोबर आता नातेवाइकांची पत्रेही मिळू लागली. पत्रामध्ये कामगारांचे मनोधैर्य टिकून राहण्यासाठी मजकूर कशा प्रकारे लिहावा, मनोबल आणि विजिगीषू वृत्तीला धक्का पोहोचणार नाही याची काळजी कशी घ्यावी, याचे धडे तज्ज्ञ सायकॉलॉजिस्टकडून नातेवाइकांना मिळू लागले. चिली सरकारने ‘नासा’कडून एका लाँग टर्म आयसोलेशन स्पेशालिस्ट टीमला बोलावून घेतले. पाणबुड्या, अवकाशयान वगैरे ठिकाणी असणारी परिस्थिती दुर्दैवाने या खाणीमध्ये तयार झाली होती. कामगारांना बरेच महिने एकत्र काढावे लागणार होते आणि या दरम्यान होणार्‍या सुटकेच्या सर्व प्रयत्नांच्या यशासाठी कामगारांच्या सहकार्याची नितांत गरज होती.

रात्रंदिवस अव्याहतपणे सुरू असलेले मदतकार्य.

50

खाणीमध्ये अडकलेल्या कामगारांनीही सैनिकांप्रमाणे शिस्तीचा दिनक्रम आखून घेतला होता. सुरुवातीचे १७ दिवस संपर्क होईपर्यंत, मर्यादित खाद्यपदार्थांचा साठा असताना सर्व कामगार अक्षरश: उपासमार सहन करत होते. प्रत्येक कामगार एक चमचा ट्युना मासा, दुधाचा एक घोट आणि बिस्किटाचा एक तुकडा दर दोन दिवसांनी खात होता. कामगारांची झालेली ही उपासमार लक्षात घेता, सतराव्या दिवशी संपर्क प्रस्थापित झाल्यानंतर सप्लाय लाईनमधून सुरूवातीला फक्त द्रवरूप आहार पाठवण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला ५०० कॅलरी असणारा आहार हळूहळू १००० व नंतर २००० कॅलरीच्या पुढे नेला. १७ दिवसांच्या उपासामुळे कामगारांची पचनसंस्था नाजूक झाली होती व घन अन्नपदार्थ स्वीकारण्याची क्षमता कमी झाली होती. प्रचंड उपासामारीनंतर, अचानक जड अन्न खाल्ल्यामुळे आजारी पडण्याची / मृत्यू होण्याची शक्यता गृहीत धरून सर्व प्रकारे काळजी घेतली जात होती.

कामगारांची तब्येत हळूहळू सुधारत होती. या दरम्यान एक मजेशीर घटना घडली. कामगारांना लिक्विड डाएटवरून सॉलिड डाएटवर आणून बरेच दिवस झाले होते व सप्लाय लाईनमधून नेहमीचे जेवण पुरवले जात होते. जेवणातले एक ‘डेझर्ट’ अचानक परत आले, कारण त्या कामगाराला ‘ते डेझर्ट आवडले नाही’. हे कळताच वरती असलेले अधिकारी सक्रीय झाले व तेच डेझर्ट पुन्हा त्याच कामगाराला परत पाठवले व सोबत एक निरोपही पाठवला, "आहे हे असे आहे आणि इथे राहून आम्ही शक्य ते सर्व करीत आहोत".
(रोज पुरवल्या जाणार्‍या जेवणावरही नंतर नंतर मर्यादा आणली गेली; कारण काही धष्टपुष्ट कामगारांचे वजन वाढले तर ते कॅप्सूलमध्ये शिरू शकणार नाहीत, अशी काही अधिकार्‍यांना भीती वाटू लागली.)

कामगारांनी त्यांचा शिस्तीचा दिनक्रम आणखी शिस्तबध्द केला. शेल्टरमध्ये आणि बोगद्यामध्ये एक वेगळा डायनिंग एरिया तयार केला, वेगळा मेडिकल एरिया तयार केला, प्रसाधनासाठी जागा तयार केली. कामगारांनी आपल्यातून ११ जणांचा एक असे तीन गट तयार केले. प्रत्येक गट सकाळ, दुपार आणि रात्र अशा ‘शिफ्ट्स’ करू लागला. प्रत्येक गट वेगवेगळ्या ठिकाणी झोपत होता, विश्रांती घेत होता आणि काम करत होता. प्रत्येक शिफ्टकडे महत्त्वाचे काम होते, ते म्हणजे सप्लाय लाईन सांभाळणे. या सप्लाय लाईनमधून कामगारांसाठी स्लीपिंग बॅग्ज, प्रोजेक्टर पाठवले. वेगवेगळ्या मूव्हीज, टीव्ही शो वगैरेंनी कामगार आपली करमणूक करू लागले. कामगारांकडूनच आजारी कामगारांची व्यवस्थित काळजी घेतली जात होती व बंदिस्त जागेत संसर्ग पसरला जाणार नाही याचीही खबरदारी घेतली गेली. प्रत्येक कामगाराच्या अंगावर इलेक्ट्रॉनिक मॉनिटर्स चिकटवले होते, ज्याद्वारे भूपृष्ठावरून डॉक्टरांची एक टीम कामगारांच्या तब्येतीकडे बारकाईने लक्ष ठेवून होती. वेळोवेळी औषधे, प्रतिजैविके, लसी खाली पाठवल्या जात होत्या. तशा परिस्थितीतही सर्व जण स्वत: तयार केलेले सर्व नियम न चुकता पाळत होते.

चिलीयन खाणकामगारांची सुटका हा आता संपूर्ण जगाच्या जिव्हाळ्याचा मुद्दा झाला होता. या ३३ जणांच्या आत्तापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासाला सलाम करत संपूर्ण जगभरातून खाण क्षेत्रातील तज्ज्ञ, ड्रिलिंगचे तज्ज्ञ, महाकाय ड्रील मशीन वापरणार्याल कंपन्या, वेगवेगळे डॉक्टर्स, धर्मगुरू, मानसोपचार तज्ज्ञ... सर्वांनी आपापल्या क्षेत्रातील मदत देऊ केली. चिली सरकारने कोणताही अनमान न बाळगता ही मदत स्वीकारली आणि या सर्व तज्ज्ञांना संपूर्णपणे सहकार्य केले. ऑस्ट्रिया, कॅनडा, कोरिया, जपान, सिंगापूर, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी संपूर्ण घटनाक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली.

चिली सरकारने संपूर्ण परिस्थितीची अत्यंत बारीकसारीक माहिती जमवली होती आणि ती अत्यंत सुटसुटीतपणे साठवून ठेवली होती. कोणत्याही क्षेत्रातल्या तज्ज्ञाला सर्वप्रथम आवश्यक ती माहिती देऊन नंतर प्रत्यक्ष काम सुरू केले गेले. या प्रत्येक तज्ज्ञाबरोबर चिलीचे प्रतिनिधी कायम उपलब्ध होते. या घटनेमधला अत्यंत महत्त्वाचा घटक होता ‘वेळ’. तो वाया जाऊ नये, म्हणून प्रत्येक जण धडपडत होता.

भूपृष्ठापासून शेल्टरपर्यंत मोठे ड्रिल करण्यासाठी एकूण तीन प्लॅन बनवले गेले. प्लॅन A, प्लॅन B व प्लॅन C. खाणीचे १२१ वर्षांचे आयुर्मान पाहता आणखी खडक कोसळून एखादा प्लॅन बारगळला तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायला लागू नये, म्हणून तीन प्लॅन बनवले गेले व टप्प्या टप्प्याने सुरू केले.

-----प्लॅन A-----

Strata 950 - जमिनीमध्ये सरळ ९० अंशामध्ये ड्रिल करणे

51

Strata 950 हे ड्रील वापरून रेस्क्यू प्लॅनची सुरूवात झाली. Murray & Roberts या साऊथ अफ्रिकन कंपनीच्या मालकीचे हे ड्रील, सुरुवातीला एक पायलट होल करून नंतर त्याच्या आजूबाजूच्या खडकामध्ये ड्रिल करून हवा असणारा उभा बोगदा करण्यासाठी उपयोगी पडणारे होते.

-----प्लॅन B----- जमिनीमध्ये सरळ ८२ अंशामध्ये ड्रिल करणे

52

Schramm Inc. T130XD हे ड्रिल एका चिलीयन कंपनीच्या मालकीचे होते, पण दुर्घटनेदरम्यान ते अमेरिकेत होते. अत्यंत तातडीने UPS कुरीयरच्या एका अजस्र विमानातून ते खाणीपाशी आणले गेले. या ड्रिलचे मुख्य काम होते, आधी पाडलेले एखादे होल कामगारांना वर आणण्यासाठी तयार केलेली कॅप्सूल जाईल इतके मोठे करणे.
या ड्रिलमुळे खडक कापताना त्याचे बारीक बारीक तुकडे खाली पडणार होते. खाली असलेल्या कामगारांना ते तुकडे वेळोवेळी हलवण्याच्या विशेष सूचना दिल्या गेल्या.या ड्रिलमुळे तासाला ५०० किलो या गतीने एकूण ७०० मेट्रीक टन खडक कामगारांनी रात्रंदिवस काम करून हलवला.

ड्रिलचा दर्शनी भाग मोडल्यामुळे व ड्रिल केलेल्या होलमध्येच अडकल्याने सर्व काम ठप्प झाले. वेगवेगळे उपाय वापरून हे ड्रिल काढले गेले, परंतु त्यादरम्यान अमूल्य असे पाच दिवस वाया गेले. प्लॅन A पेक्षा हे ड्रिल जलदगतीने खोदकाम करू शकत होते.

सरतेशेवटी याच ड्रिलमुळे कामगारांची सुटका झाली.

-----प्लॅन C----- जमिनीमध्ये सरळ ८५ अंशामध्ये ड्रिल करणे

53

RIG-421 हे कॅनडामधील एका कंपनीने तयार केलेले अत्यंत शक्तिशाली ड्रील होते, परंतु याच्या डिझाईनमध्ये बर्‍याच गुंतागुंतीच्या गोष्टी होत्या व त्यामुळे हे ड्रील शक्तिशाली व वेगवान असूनही कूर्मगतीने खोदकाम करत होते.

७ ऑ़टोबर २०१० - प्लॅन A, B व C ची प्रगती - दुर्घटनेचा ६३ वा दिवस.

.

सरतेशेवटी प्लॅन B यश मिळाले व शेल्टरपर्यंत कॅप्सूल जाईल इतके मोठे ड्रील करण्यात आले, तारीख होती ९ ऑक्टोबर २०१०.

भूपृष्ठाकडे येणार्‍या कामगारांच्या प्रवासासाठी एका कॅप्सूलच्या डिझाईनमध्ये नासामधील बरेच तज्ज्ञ व्यस्त होते. सर्व शक्यतांचा आणि परिस्थितीचा विचार करून कॅप्सूलमध्ये असाव्यात अशा तब्बल ७५पेक्षा जास्त गोष्टीची १२ पानी यादी चिली सरकारकडे पाठवली. चिलीयन नौदलाने तातडीने एकसारख्या तीन कॅप्सूल तयार केल्या व त्यांचे नामकरण केले ‘फिनिक्स’.
२७०० फूट भूगर्भातून जमिनीवर येताना शरीरावर होणारे गुरुत्वाकर्षणाचे परिणाम, आजूबाजूच्या अस्थिर खडकाचे कॅप्सूलवर होणारे परिणाम वगैरे अनेक बारीकसारीक घटक लक्षात घेऊन हे कॅप्सूल तयार झाले. या कॅप्सूलला शक्तिशाली शॉक अ‍ॅब्सॉर्बरसह ८ चाके जोडली गेली, कामगारांना कॅप्सूलमध्येच ऑक्सीजन, व्हिडीओ कॅमेरा, फोन, सुरक्षिततेसाठी पट्टे, डोक्यासह डोळ्यांचे रक्षण करणारे हेल्मेट, पायांना खास आवरण यांमुळे कॅप्सूलमधून वर येताना कामगारांना कोणताही शारीरिक त्रास होणार नव्हता. कामगारांना खास गॉगलही दिले जाणार होते, ज्यामुळे प्रखर सूर्यप्रकाशाच्या अचानक सान्निध्यात येऊनही डोळ्यांवर दुष्परिणाम होणार नव्हता.

‘फिनिक्स’ कॅप्सूल.

54

९ ऑक्टोबरला ड्रिल पूर्ण झाल्यानंतर खडकाची व कॅप्सूलची चाचणी घेण्यात आणखी ३ दिवस गेले व १३ ऑक्टोबरला पहिला रेस्क्युअर फिनिक्समधून ‘शेल्टर’मध्ये उतरला. तत्पूर्वी लीडरने ३३ कामगारांना ३ गटांमध्ये विभागले होते. स्किल्ड, वीक आणि स्ट्राँग. वर येणारे पहिले चार कामगार स्किल्ड गटातले होते. कॅप्सूल परत येताना होणारा त्रास झाला तर तो सहन करण्याची त्यांच्यात शारीरिक, मानसिक क्षमता होती व त्यानुसार कॅप्सूलच्या रचनेत, प्रवासात आयत्या वेळी बदल केले जाणार होते. नंतर वीक गटातले कामगार वर येणार होते. सर्वात शेवटी स्ट्राँग कामगार. हे कामगार शारीरिकदृष्ट्या धडधाकट होतेच, मात्र हे मानसिक दृष्ट्याही धडधाकट होते. आपल्या सहकार्यांच्या सुटकेदरम्यान त्यांनी कोणताही उतावळेपणा करून चालणार नव्हता. एखादी चूक, घाईगडबड, छोटासा अपघात ६९ दिवसांच्या अथक परिश्रमावर पाणी फेरण्यास पुरेसा होता.
नासाच्या आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सुटकेआधी ६ तास प्रत्येक कामगार संपूर्णपणे लिक्विड डाएटवर होता. साखर, पोटॅशिअम आणि मिनिरल्सचा अतिरिक्त डोस प्रत्येकाला दिला गेला. रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून अ‍ॅस्पिरिन दिल्या गेल्या व प्रवासादरम्यान रक्तदाब स्थिर राहावा, याचीही काळजी घेतली गेली.

फिनिक्स - भूपृष्ठावरून खाणीत उतरण्याच्या तयारीत.
.

फिनिक्स - शेल्टरमध्ये.
.

६९ दिवसांनंतरच्या प्रतिक्षेनंतर बाहेर येणार्‍या प्रत्येक कामगाराच्या स्वागतासाठी स्वतः राष्ट्रपती आणि खाणमंत्री गॉलबॉर्न हजर होते. एकमेव बोलिव्हियन कामगार फिनिक्समधून बाहेर आल्यानंतर आपल्या गणवेशावरील चिलीच्या राष्ट्रध्वजाकडे बोट दाखवून म्हणाला "Thank you, Chile!"

पहिला रेस्क्युअर खाली उतरल्यापासून २४ तासांच्या आत सर्व खाणकामगार बाहेर आले. एका खर्‍याखुर्‍या लीडरप्रमाणे खाणकामगारांचा लीडर 'लुई उर्झ्वा' शेवटी बाहेर पडला. एकूण ३३ कामगार व ६ रेस्क्युअर्सना घेऊन फिनिक्सने ३९ फेर्‍या मारल्या.

संपूर्ण चिलीमध्ये, जगभरामध्ये जल्लोष झाला.

सर्व कामगारांनी काही वेळ आपापल्या कुटुंबियांसोबत घालवला व नंतर त्यांना हेलिकॉप्टरमधून एका सुसज्ज इस्पितळात हलवले. सर्वजण तब्बेतीने ठीक होते, किरकोळ उपचारांसाठी व निरीक्षणाखाली त्यांनी पुढचे ४८ तास इस्पितळात व्यतीत केले.

मिशन अ‍ॅकंप्लीश चिली. (मिशन पूर्ण झाल्यानंतर खाणीमधल्या शेल्टरमध्ये फडकवला गेलेला झेंडा)

55

या घटनेच्या शेवटी ३३ जणांच्या नेत्याने चिलीच्या नेत्याशी (राष्ट्रपतींशी) साधलेला संवाद मन हेलावून टाकतो.

(Leader) Luis Urzúa : "I've delivered to you this shift of workers, as we agreed I would".

(The President) Sebastián Piñera : "I gladly receive your shift, because you completed your duty, leaving last like a good captain. You are not the same after this, and Chile won't be the same either!"

३३ कामगारांच्या सुटकेबरोबर हा अध्याय संपला नाही, संपणारही नाहीये. भूगर्भात असताना या सगळ्यांच्यात दिसून आलेली एकीची भावना नंतरही टिकून राहिली. या घटनेचे पडसाद नंतरही उमटत राहिले. या ३३ जणांना जगभरात अचानक, अनपेक्षित प्रसिद्धी मिळाली. प्रसिद्धीला सामोरे जातानाही या कामगारांनी विलक्षण प्रगल्भता दाखवली. स्वतःच्या सुटकेपुरता आनंद न मानता, खाणव्यवसायात असलेल्या धोकादायक स्थितींमध्ये सुधारणा घडवण्यासाठी या अनुभवाचा उपयोग करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.

एक होऊन निधड्या छातीने या दुर्घटनेला सामोरे जाणारे हे सगळे आज दंतकथा बनले आहेत.

फक्त चिलीच्या नव्हे, तर जगाच्या इतिहासात ही घटना माणसाच्या अढळ विश्वासाचं आणि जगण्याच्या मूलभूत, चिरंतन प्रेरणेचं प्रतीक बनून राहील - कायमस्वरूपी.

footer

प्रतिक्रिया

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद.

नीलकांत / प्रशांत - सहज जमणार असेल तर एक सूचना. वरती मेन हेडरमध्ये "दिवाळी अंक" यावर क्लिक केले असता जुन्या दिवाळी अंकाचे ऑप्शन्स दिसू लागतील व जुने दिवाळी अंक पाहता येतील असे काहीतरी करता येईल का?

छोटा चेतन-२०१५'s picture

30 Dec 2015 - 12:09 am | छोटा चेतन-२०१५

अप्रतिम लेख

हेमंत लाटकर's picture

24 Jun 2016 - 1:44 pm | हेमंत लाटकर

मस्त लेख

सुचिकांत's picture

24 Jun 2016 - 2:50 pm | सुचिकांत

काय सुंदर पद्धतीने शब्दबद्ध केलं आहे! मानलं तुम्हाला मोदक साहेब ...
वाचताना, दडपण आलं होतं, अंगावर शहारे येत होते, आणि डोळ्यात हलकं पाणी तरळत होतं..

जिज्ञासु आनन्द's picture

24 Jun 2016 - 3:13 pm | जिज्ञासु आनन्द

अप्रतिम लेखन आणि माहिती...