समाज, धर्म आणि संशोधन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in दिवाळी अंक
10 Nov 2012 - 11:09 pm

मानवी प्रगतीचा इतिहास बघताना, इतिहासलेखन सुरू झाल्यानंतर युरोपातला सर्वात भयंकर काळ असं ज्याला म्हणता येईल ते मध्ययुग, अंधारयुग पाचवं ते पंधरावं शतक या हजार वर्षांचं होतं. याला अंधारयुग समजतात, कारण या काळात प्रचंड प्रमाणात युद्ध झाली, अनेकविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणात लोक मेले. शांतता, सुबत्ता यांचा हा काळ नव्हता. शांतता नव्हती म्हणून कला, विज्ञान, (सामाजिक) शास्त्र, अशा अनेक बाजूंनी युरोप मागे पडला. तिथल्या समाजावर ख्रिश्चन धर्माचा अतिशय गाढ पगडा बसला आणि त्यातून जगाचं दीर्घकालीन नुकसानच झालं. त्या आधी असणार्‍या प्राचीन ग्रीको-रोमन संस्कृतींमधे कला, संगीत, विज्ञान, शास्त्र यांचा अभ्यास होत होता. असंही म्हणतात की चौथ्या शतकात अलेक्झांड्रियाच्या हायपेशियाला पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे लक्षात आलं होतं. ख्रिश्चन धर्म, त्यातल्या तेव्हाच्या (आता वेडगळ/अडगळ ठरलेल्या) समजुती आणि समाजावर ख्रिश्चॅनिटीचा असणारा पगडा विद्वानांना वेळेत न उमगणे, यातून तत्कालीन युरोपीय समाजाची अधोगती झाली. ही अधोगती एवढी वाईट समजली जाते की युरोपीय भाषा आणि त्यांच्यातून आपल्याकडेही कालबाह्य मूल्यांना ‘मध्ययुगीन’ म्हणण्याची प्रथा आलेली आहे. चौदाव्या शतकाच्या आसपास युरोपात सांस्कृतिक पुनरुत्थान सुरू झालं, ज्याला आता renaissance असं नाव पडलेलं आहे. या रेनेसाँनंतर कला, विज्ञान, सामाजिक शास्त्र या सर्व शाखांमध्ये युरोपची प्रगती पुन्हा सुरू झाली. मध्ययुग अथवा रेनेसाँचा धांडोळा घेणं हा या लेखाचा आवाका नाही. समाजाच्या धारणा, धर्म, संशोधन आणि संशोधनातून होणारी मानवी प्रगती यांचा आपसातला संबंध मोजक्या उदाहरणांवरून थोडक्यात पाहणं हा या लेखाचा उद्देश आहे.

पृथ्वी सूर्याभोवती फिरते याचा हायपेशियाला चौथ्या शतकात अंदाज आला होता तर निकोलस कोपर्निकस १५व्या शतकात येईपर्यंत काय झालं? महत्त्वाचं असं काहीही नाही. विश्व पृथ्वीकेंद्री आहे हे दाखवण्यासाठी विश्वरचनाशास्त्र प्रचंड किचकट बनवलं गेलं. पृथ्वीभोवती अन्य ग्रह, सूर्य आणि इतर तारे फिरतात, असा त्या काळात समज होता. तत्कालिन युरोपीय समाज बहुतांशी ख्रिश्चन होता, आणि ख्रिश्चॅनिटीमधे विश्वाची कल्पना पृथ्वीकेंद्री असण्याची होती. पण या सिद्धान्तामधे ग्रह वक्री* का होतात याचं स्पष्टीकरण अतिशय क्लिष्ट होतं. एका मुख्य कक्षेत ग्रह पृथ्वीभोवती फिरतात. ग्रह वक्री का होतात यासाठी epicycles आणली गेली. पेनाची स्प्रिंग ताणून वर्तुळाकार बनवली तर कसा आकार दिसेल, ग्रह तशा प्रकारच्या कक्षेत फिरतात असा सिद्धात मांडून ग्रहांच्या वक्री गतीचं स्पष्टीकरण देण्यात आलं. मंगळ आणि शनी या दोन ग्रहांची निरीक्षणं करून कोपर्निकसला पृथ्वी सूर्याभोवती फिरते याचा अंदाज आला. एवढंच नाही तर पृथ्वीची सूर्याभोवती असणारी कक्षा वर्तुळाकार नाही, दीर्घवर्तुळाकार आहे, असा त्याचा निष्कर्ष होता. अतिशय क्लिष्ट स्पष्टीकरण देण्यापेक्षा ‘सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात’ असं मानल्यास या वक्री गतीचं स्पष्टीकरण देणं अगदीच सोपं होतं. (पुढे न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमानंतर epicycles पूर्णतः मोडीत निघाली.) कोपर्निकसच्या निधनानंतर त्याच्या या सिद्धान्तावर धार्मिक तत्त्ववेत्त्यांकडून बरीच टीका झाली. अगदी कोपर्निकसला त्याच्या पूर्वसुरींनी काय म्हटलेलं आहे हे समजलं नाही, ते त्याच्या विचारात शास्त्रीय पद्धत नाही, इथपर्यंत.

पुढे खरा त्रास मात्र गॅलिलेओने भोगला. कोपर्निकसचा विश्वरचनेचा** सिद्धान्त आणि त्याबद्दल असणारे वाद इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलेओपर्यंत पोहोचले होते. गॅलिलेओने कोपर्निकसच्या सिद्धान्ताला पाठिंबा दिला; आणि चर्च आणि धर्माच्या विरोधात ही कृती असल्याचं समजलं गेलं. पृथ्वी हलत नाही असं बायबलमधील संदर्भांमधे लिहिलेलं आहे आणि गॅलिलेओने ते नाकारलं होतं. इथे सरळसरळ धर्माने विज्ञानात (किंवा विज्ञानाने धर्मात!) ढवळाढवळ केलेली होती. या धर्मबुडवेपणाबद्दल गॅलिलेओला तुरूंगात डांबलं गेलं. एवढंच नाही, तर गॅलिलेओच्या पूर्वप्रकाशित लिखाणावर बंदी आणली गेली आणि त्याला पुढे लिहायलाही बंदी केली गेली. पुढे रोमन कॅथलिक चर्चमधल्या प्रभावी व्यक्तींशी मैत्रिपूर्ण संबंध राखण्यामुळे त्याच्यावरची बरीच बंधनं शिथिल झाली. त्याने पुढे काही वर्ष आधुनिक भौतिकशास्त्राचा पाया रचणारं कामही केलं. पण मरणानंतरही गॅलिलेओच्या नशिबात उपेक्षाच होती. त्याच्या वाडवडलांच्या आजूबाजूच्या जागेत त्याचं दफन करू देण्यास कॅथलिक चर्चने नकार दिला. धर्मातल्या अशास्त्रीय समजुतींपायी, धर्म बुडवला म्हणून गॅलिलेओला 'मरणान्तानि वैराणि'चा फायदा मिळाला नाही.

कोपर्निकसच्या आणि गॅलिलेओच्या या इतिहासाचं आजही महत्त्व आहे का?

धर्माचा आणि पूर्वापार चालत आलेल्या समजुतींचा पगडा एवढा जबरदस्त होता की आईनस्टाईनसारखा थोर शास्त्रज्ञही त्याला बळी पडला. गणिताच्या माध्यमातून विश्वरचनेचं कोडं सोडवताना तो त्याचा भौतिक अर्थही लावत होता. त्या समीकरणांमधून त्याला स्पष्ट दिसत होतं की विश्व प्रसरण पावत आहे. पूर्वीच्या समजुतींचा पगडा एवढा जबरदस्त, की त्याने विश्वाचं प्रसरण गणितातून काढून टाकण्यासाठी एक स्थिरांक मध्ये घुसवला. थोडक्यात, समीकरणांमधलं विश्वाचं प्रसरण त्याने काढून टाकलं.*** दु:खात सुखाची गोष्ट अशी की या समजुतीपायी विज्ञानाची प्रगती फार वर्ष अडकली नाही. विश्वाचं प्रसरण होतंय हे एडविन हबलने निरीक्षणांमधून काही वर्षांतच शोधून काढलं. त्यातून पुढे विश्वनिर्मितीचा प्रसिद्ध सिद्धान्त 'बिग बँग' अथवा 'महास्फोट' याचा पाया रचला गेला.

प्राचीन काळात काही चिनी राजज्योतिषांना (फलज्योतिषी नव्हेत, ज्योतिषी) जीव गमवावा लागला होता, त्याची अलीकडेच आठवण झाली. कारण, तर त्यांना ग्रहण वर्तवता आलं नाही. ग्रहणाचा पृथ्वीवर, मनुष्यावर काय परिणाम होतो, याची तेव्हा कल्पनाही नव्हती. तरीही त्यांना जीव गमवावा लागला. लाक्वियामधला भूकंप वर्तवू शकले नाहीत किंवा या भागात भूकंप होऊ शकतो याचा अंदाज देऊ शकले नाहीत म्हणून इटालियन न्यायालयाने काही संशोधकांना अगदी गेल्याच महिन्यात दोषी ठरवलं आणि सहा वर्षांसाठी गजाआड केलं. भूकंपाचा अगदी अ‍ॅक्युरेट (मराठी?) अंदाज कोणीही वर्तवू शकत नाही. हे सांगताना सुलभीकरण करून सांगितलं जात असलं तरीही सामान्यांपर्यंत काय संदेश गेला आहे? शास्त्रज्ञ भविष्यातल्या दु:खद घटनांचा अचूक अंदाज घेऊ शकले नाहीत तर त्यांच्यावर दावा गुदरता येतो. संशोधनाच्या भविष्याच्या, विज्ञानाच्या आणि त्यामुळे प्रगतीच्या दृष्टीने ही घटना खचितच आनंददायक नाही१.

एका मराठी दिवाळी अंकाच्या लेखासाठी हा विषय अगत्याचा का वाटला?

अलीकडेच फेसबुकाच्या एका मराठी ग्रूपमधे चर्चा करताना प्राचीन भारतीय शिल्प, भारतीय संस्कृती, कला आणि नग्नता असा विषय निघाला. सहाजिकच त्या चर्चेत लज्जागौरीचा उल्लेख झाला. घटस्थापनेला या मातृकेचा उल्लेख "या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता" अशा प्रकारे झाला. धागाकर्त्याच्या अपेक्षेच्या विपरीत हे मातृरूप नसून स्त्रीदेहाची विटंबना असण्याचे आक्षेप आले. मातृरूप एका विशिष्ट रूपातच पाहावे असा आग्रह धरणे अनावश्यक आहे. एकेकाळी आपले पूर्वज या रूपात मातृकेची पूजा करत, याबद्दल रा.चिं.ढेरे यांनी संशोधन केलेलं आहे. त्या संशोधनाकडे, संदर्भांकडे दुर्लक्ष करून स्वत:च्याच, मर्यादित मोजपट्ट्या लावून ते शिल्प हिडीसच आहे म्हणून भावना दुखावून घेणं प्रकर्षाने दिसलं. विशेषतः दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या चर्चेत ढेर्‍यांच्या संशोधनाची संभावना पिवळ्या पुस्तकात झाली आणि पुस्तकं निरुपयोगी असण्याचं मत हे पुन्हा पुन्हा कोपर्निकस-गॅलिलेओची आठवण करून देणारं वाटलं.

देवदेवतांची नग्न चित्रं काढणार्‍या मकबूल फिदा हुसेन, ऊर्फ एम.एफ. हुसेन यांच्या निधनानंतर अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा निषेध झाला. काही मर्यादेपर्यंत सुसंस्कृत प्रकारचाही हा निषेध होता. पण अनेक ठिकाणी 'मरणान्तानि वैराणि' हे तत्त्व पुन्हा एकदा विसरलं गेलं. अखेरच्या दिवसात हुसेनवर आपल्या जन्मदेशातूनच परागंदा होण्याची वेळ आली. गॅलिलेओला आपल्या वाडवडलांसोबत पुरण्याचा हक्क मिळाला नाही, चारशे वर्षांनंतर हुसेनची अवस्थाही काही फार निराळी झाली नाही. गॅलिलेओने म्हणे एक धर्म बुडवला होता विज्ञानाच्या नावाखाली, हुसेनने म्हणे दुसरा धर्म बुडवण्याचा प्रयत्न केला, कलेच्या आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली. पण हुसेनच का, संशोधकांबद्दलही अतिशय अनुदार उद्गार आजही काढले जातात.

इतर सर्व संस्कृतींप्रमाणेच, आपल्याकडेही जननाला आणि पर्यायाने जननीला फार महत्त्व आहे. खरं तर यात संस्कृती, धर्म यांचा फार भाग नाही; ही भावना उत्क्रांतीमधून आलेली आहे२. वंशसातत्य, आपली गुणसूत्र टिकवून ठेवण्याची आणि एक सजीववर्ग म्हणून संपूर्ण समूहाचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची धडपड हे इतर सर्व प्राण्यांप्रमाणेच माणसांमध्येही आलेलं आहेच. 'शिर सलामत तो पगडी पचास' अशा प्रकारच्या सामान्य वापरातल्या म्हणींमधूनही तगून, टिकून राहण्याचं महत्त्व वारंवार दिसतं. त्यामुळे नवीन जिवाच्या जन्माला आणि तो जन्माला घालणार्‍या जननीला सर्वच संस्कृतींमधे अनन्यसाधारण महत्त्व आहे, अगदी गर्भ कसा तयार होतो हे समजण्याच्या आधीपासूनच३. अर्थातच त्या काळात औषधं, सुबत्ता फार नव्हती, यंत्रं फारच कमी कामं करत असत. त्यामुळे अधिक मुलांना जन्म देणारी स्त्री (किंवा इतर प्राण्यांमधली मादी) ही अधिक महत्त्वाची समजली जात असे, किंवा मनुष्यांमध्ये पूजनीय होती. उत्क्रांतीच्या या प्रवासामुळे 'लज्जागौरी' ही माता आपल्याकडे पूजनीय होती. नग्नतेकडे बघण्याची आपली दृष्टी आज मात्र एवढी स्पष्ट आणि स्वच्छ नाही.

लज्जागौरीवर संशोधन करणार्‍या ढेरेंनी इतर देवतांवरही संशोधन केलं. पंढरपूरचा विठोबा मूळचा कर्नाटकातला, या त्यांच्या संशोधनावर समाजातून टीका झाली. ग.वा. बेहेरे 'सोबत' नावाचं नियतकालिक प्रकाशित करत. त्यात राजा राजवाडे यांनी ढेर्‍यांच्या संशोधनावर टीका करणारा लेख लिहिला. बेहेरे यांनी हा लेख छापला आणि शेजारी एक टिपण लिहून राजवाडे यांना सज्जड समज दिली, "शेवटी तुम्ही काय आणि मी काय, दीडदमडीचे पत्रकार आहोत. ढेरे यांच्यासारखे व्यासंगी लोक चार भिंतीत बसून जी ज्ञानसाधना / संशोधन करत असतात, त्यातून निष्पन्न झालेली गोष्ट भले जनसामान्यांच्या भावनांना न झेपणारी असो, आपण ती कशी पचवता येईल ते पाहायला हवं. त्या विरोधात लोकांना भडकावणे ही अक्षम्य चूक आहे."४

भावना, धर्म या गोष्टीही उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर महत्त्वाच्या आहेत. एक समाज म्हणून टिकून राहण्याच्या दृष्टीने माणसात असणार्‍या भावनांचं आणि धर्माचं महत्त्व आहे. पण मनुष्याचं अस्तित्व फक्त टिकून राहणं इथवरच मर्यादित नाही. टिकून राहणं तर मेंदूचा फार विकास न झालेल्या प्राण्यानांही जमतं. माणसाची खरी शक्ती आणि वेगळेपण त्याच्या मेंदूत आहे. या मेंदूत आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याची शक्ती आहे. ज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करून अस्तित्वाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात. कोणी उत्क्रांतीचा अभ्यास करतं, कोणी खगोलशास्त्राचा; तर कोणी मानवी मनात डोकावून बघतं. कलाकारांच्या अभिव्यक्तीमधून समाज किती प्रगत आहे याचा अंदाज येतो; म्हणून पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यासही अस्तित्वाचा अर्थ लावण्यात महत्त्वाचं ठरतं. या अभ्यासात, संशोधनात, नवीन विचार मांडण्यात वस्तुनिष्ठता आणि तर्कशुद्ध विचार जेव्हा भावनेपेक्षा वरचढ असतो, तेव्हा समाजाची प्रगती होते. पूर्वग्रह, मर्यादित आकलनावर अवलंबून असणारे धर्माधिष्ठित समज समाजाच्या प्रगतीच्या कोणत्याही टप्प्यावर मारकच ठरतात. संशोधनाच्या इतिहासात हे वेळोवेळी दिसलेलं आहे. या इतिहासातून बोध घेणं आपल्या हातात आहे.

---

* अनेक महिने ग्रहांची गती पाहिल्यास ग्रह हे तार्‍यांच्या पार्श्वभूमीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकताना दिसतात. काही काळाकरता ग्रहांचे पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकणे म्हणजे वक्री.
** आधुनिक विज्ञानात याला ग्रहगणित समजलं जातं. आज ज्याला विश्वरचनाशास्त्र समजलं जातं, ते त्या काळात अस्तित्वात नव्हतं.
*** आता या स्थिरांकाची किंमत शून्य समजली जात नाही, शून्य आणि एकच्या अध्येमध्ये याची किंमत असावी, असा अंदाज आहे. सध्या विश्वरचनाशास्त्रातला हा एक 'हॉट टॉपिक' आहे.

---

१. http://www.guardian.co.uk/science/brain-flapping/2012/oct/24/most-danger...
२. कहाणी मानवप्राण्याची - नंदा खरे आणि इतर
३. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास - वि. का. राजवाडे
४. सतीश तांबे, अंशत: खासगी संवादातून.

footer

प्रतिक्रिया

अगदी मुद्देसूद आणि चांगला लेख.
हुसेन प्रकरणाची मला पूर्ण माहिती नाही तरी (जी माहिती आहे त्या आधारे) त्या मुद्द्याशी थोडी असहमत.
एकूणच लेखन फार आवडले.

क्रान्ति's picture

12 Nov 2012 - 2:32 pm | क्रान्ति

खूप अभ्यासपूर्ण लेख आहे.

तिमा's picture

12 Nov 2012 - 7:42 pm | तिमा

लेख मुद्देसूद आहे. सध्याच्या विज्ञानविरोधी गटांवरचे अप्रत्यक्ष उल्लेख आवडले.
अ‍ॅक्युरेट ला मराठी शब्द 'अचूक' हा शब्द वापरता येईल.

अप्पा जोगळेकर's picture

12 Nov 2012 - 10:35 pm | अप्पा जोगळेकर

नेहमीप्रमाणेच एकांगी लिखाण. हुसेनचा मुद्दा उगाचच ओढून ताणून घुसडल्यासारखा वाटला.
गॅलिलिओची आणि हुसेनची तुलना तर अक्षरशः हास्यास्पद.
दिवाळी अंकाचा डामडौल कमी झाला. असो. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा.

अर्धवटराव's picture

14 Nov 2012 - 12:29 am | अर्धवटराव

दिवाळीच्या निमित्ताला अगदी साजेसा लेख... तमसो मा ज्योतिर्गमय.

>>या अभ्यासात, संशोधनात, नवीन विचार मांडण्यात वस्तुनिष्ठता आणि तर्कशुद्ध विचार जेव्हा भावनेपेक्षा वरचढ असतो, तेव्हा समाजाची प्रगती होते. पूर्वग्रह, मर्यादित आकलनावर अवलंबून असणारे धर्माधिष्ठित समज समाजाच्या प्रगतीच्या कोणत्याही टप्प्यावर मारकच ठरतात. संशोधनाच्या इतिहासात हे वेळोवेळी दिसलेलं आहे. या इतिहासातून बोध घेणं आपल्या हातात आहे.
-- भावनेचे तर्कशुद्धतेवर मात करणे हे देखील मानववंशशास्त्राच्या दृष्टीने सहाजीक मानल्या गेलय. म्ह्णजे काय, तर भावना प्रधान आणि तर्क दुय्यम असणे अशी रचना माणसाच्या शरीरात निसर्गानेच केली आहे... याला उत्क्रांतीचा एक टप्पा म्हणा हवं तर. मध्यंतरी लोकसत्ता मध्ये या विषयी एक आर्टीकल वाचलं होतं. अमेरीकेत आत्ता ज्या निवडणुका झाल्या त्या संदर्भात हा अभ्यास करण्यात आला होता.

अर्धवटराव

दादा कोंडके's picture

14 Nov 2012 - 1:11 am | दादा कोंडके

दिवाळीच्या निमित्ताला अगदी साजेसा लेख... तमसो मा ज्योतिर्गमय.

असेच म्हणतो.

नगरीनिरंजन's picture

14 Nov 2012 - 7:56 am | नगरीनिरंजन

काही बाबतीत मतभेद असले तरी एकंदरीत मुद्देसूद लेख आवडला. हुसेन यांचे उदाहरण 'धर्म आणि संशोधन' या संदर्भात अस्थानी वाटले.
सुदैवाने वैज्ञानिक संशोधनाला धर्मसंस्थांकडून होणारा विरोध आता बराच निरुपद्रवी झाला आहे पण त्याची जागा मोठमोठ्या कंपन्यांच्या मायावी प्रचाराने घेतलेली आहे असे चित्र दिसते.
वैज्ञानिक दृष्टीकोन असलेल्या आणि तर्कसुष्टतेला प्राधान्य देणार्‍या लोकांचाही या प्रचाराला बळी पडून बुद्धिभेद झालेला दिसतो.

बॅटमॅन's picture

14 Nov 2012 - 2:03 pm | बॅटमॅन

तंतोतंत!!!!! गॅलिलिओ आणि हुसेनची तुलना "श्वानं युवानं मघवानमाह" सारखी अस्थानी वाटली. बाकी मुद्देसूदपणाबद्दल बाडीस.

इन्दुसुता's picture

14 Nov 2012 - 7:29 pm | इन्दुसुता

नगरीनिरंजन यांच्याशी पूर्ण सहमत. हुसेन यांचे उदाहरण वगळता बर्‍यापैकी मुद्देसूद लेख.
अवांतरः लेखिकेचे इतर लेखन वाचतांना तर्कशुध्द्तेपेक्षा भावनेकडेच जास्त भर दिसला आहे. आजवर झालेला लेखनप्रवास ही एक उत्क्रांतीच म्हणावी काय? ( कुणाच्याही भावना दुखविण्याचा हेतु नाही, परंतु तसे होत असल्यास अथवा हा प्रतिसाद अस्थायी वाटल्यास संपादक मंडळास तो उडविण्याची विनंती येथेच करते).

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Nov 2012 - 1:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

भावनेचे तर्कशुद्धतेवर मात करणे हे देखील मानववंशशास्त्राच्या दृष्टीने सहाजीक मानल्या गेलय

एखादी गोष्ट सहाजिक असणं, नैसर्गिक वाटणं आणि समाजाची प्रगती या दोन गोष्टी निराळ्या आहेत. बहुतांश लोकांच्या दृष्टीने कोणीतरी भरवत असेल तर गिळणं नैसर्गिक असतं. मोजक्या लोकांचा स्वभाव बंडखोरीचा असतो, ते लोकं काहीतरी वेगळं करतात. या वेगळं करण्यातूनच प्रगतीची शक्यता निर्माण होते. गुणसूत्रांमधला बदल (mutation) होतो तेव्हाच प्राण्यांमधे काही चांगला-वाईट बदल होतो, आणि असा काही बदल झालाच नाही तर प्रगती, उत्क्रांती होत नाही.

... त्याची जागा मोठमोठ्या कंपन्यांच्या मायावी प्रचाराने घेतलेली आहे असे चित्र दिसते.

हा मुद्दा मला समजला नाही.

विशेषतः तंत्रज्ञानातलं संशोधन कधीकधी ग्राहकाभिमुख असण्याजागी संशोधनाभिमुख असतं. इतर विषयाच्या संशोधकांच्या मागणीनुसार तंत्रज्ञानाचं संशोधन पुढे जातं आणि त्याचा फायदा पुढे सामान्य लोकांना कोणत्या-ना-कोणत्या स्वरूपात होतो. सीसीडीचा शोध लावणार्‍याला आपला शोध अतिशय कुचकामी आहे असं वाटलं होतं. त्या संबंधात आज एवढं ग्राहकाभिमुख तंत्रज्ञान आहे की आपल्यापैकी बहुतेक सर्वांच्या खिशात्/पर्समधे एक सीसीडी/सीमॉस चिप असते, मोबाईलचा कॅमेरा.
अनेक विषयांतल्या संशोधनाचा सामान्य माणसाच्या आयुष्याशी सरळ संबंध जोडताही येत नाही. अशा संशोधनात मोठमोठ्या कंपन्यांना काहीही रस नसतो. इलेक्ट्रॉनच्या शोधाचं एक फक्त प्रातिनिधिक उदाहरण देता येईल.

लेखिकेचे इतर लेखन वाचतांना तर्कशुध्द्तेपेक्षा भावनेकडेच जास्त भर दिसला आहे. आजवर झालेला लेखनप्रवास ही एक उत्क्रांतीच म्हणावी काय?

लेखनाबद्दल सामान्य (generic या अर्थाने) प्रतिक्रिया म्हणून मला हे वाक्य "रोचक" वाटलं. माझ्याकडून कदाचित विषयाचं आवश्यकतेपेक्षा अधिक सुलभीकरणही होत असेल. तरीही 'मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?', 'गुरूत्वाकर्षण नव्हे, कर्मविपाकातून अधःपतन' किंवा 'डॉ. स्ट्रेंजलव्ह ... आणि माझं स्फोटांवर प्रेम जडलं' अशासारख्या लिखाणात तर्कावर भावना मात करत होती असं सुचवत असाल तर माझी असहमती आहे.

सरतेशेवटी गॅलिलेओ आणि हुसेनबाबतः
गॅलिलेओ आणि हुसेन यांच्यात मला अनेक साधर्म्य दिसतात. दोघांनीही समाजातल्या, सामान्यांच्या प्रचलित कल्पनांना धक्का दिला; या कल्पना धर्माधिष्ठित अनुक्रमे होत्या किंवा आहेत. दोघांनीही आपापल्या विषयाच्या आधारे समाजाला प्रागतिक वाटेवर नेण्याचा प्रयत्न केला, गॅलिलेओने विज्ञानातून, हुसेनने स्थानिक, भारतीय चित्रपद्धतीचं पुनरूज्जीवन करण्यातून. दोघांच्याही धर्मकल्पनांमधे मृत्युनंतर पुरणं महत्त्वाचं, दोघांनाही वाडवडलांच्या जमिनीत मिसळण्याचा हक्क नाकारला गेला.
हुसेनने आजच्या प्रचलित सोज्ज्वळपणाच्या कल्पनांना धक्का दिला (आणि नव्वदीच्या दशकात राजकीय स्वार्थासाठी हा मुद्दा फारच सवंगपणे ग्लोरीफाय केला गेला) म्हणून आज कदाचित अनेकांना त्याची तुलना गॅलिलेओशी केलेली खटकत असावी.

१६४२ साली मेलेल्या गॅलिलेओच्या बाबतीत 'मरणान्तानि वैराणि'चा सुसंस्कृतपणा १९९२ साली कॅथलिक चर्चप्रमुखाने खंत व्यक्त करून दाखवला. विज्ञान, वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांनी गॅलिलेओला काही शतकं आधीच त्याला आपलासा केला होता. हुसेन मरून आता कुठे एक वर्ष झालंय.

अर्धवटराव's picture

15 Nov 2012 - 11:10 am | अर्धवटराव

"एखादी गोष्ट सहाजिक असणं, नैसर्गिक वाटणं आणि समाजाची प्रगती या दोन गोष्टी निराळ्या आहेत....गुणसूत्रांमधला बदल (mutation) होतो तेव्हाच प्राण्यांमधे काही चांगला-वाईट बदल होतो, आणि असा काही बदल झालाच नाही तर प्रगती, उत्क्रांती होत नाही."
--> प्रवाहाबाहेर/विरुद्ध विचार करणार्‍यांमुळे बदल घडतात हे निर्विवाद. पण असा विचार न करण्याचं मुख्य कारण, जे भावनेने तर्कावर मात करणं, त्याला जबाबदार मनुष्यप्राण्याची हार्मोन सिस्टीम आहे हाच काय तो मुद्दा. जगण्यासाठी-स्वसंरक्षणासाठी आवश्यक प्रेरणा हि भावनेला जास्त जवळ असते. उत्क्रांती प्रोसेसमध्ये तर्क फार उशीराने आला. तत्पुर्वी मानव हा इतर प्राण्यांप्रमाणे इन्स्टीक्टवरच जगायचा (अजुनही जगतोय). या इन्स्टीक्ट्स सहसा भावनाप्रेरक असतात, त्यांची तर्कप्रेरणा फार क्षीण असते. भविष्यात कधितरी उलट प्रकार होईलही, कोण जाणे.

थोडं हुसेन विषयी...
हुसेनवर मुख्य आक्षेप त्याने श्रद्धास्थानांचे नग्न चित्र काढले हा नव्हता... कुठल्या व्यक्तीला/संकल्पनेला हीन लेखताना तो तिचे नग्न स्वरुप चित्रीत करायचा व त्याची आदरार्थी अभिव्यक्ती केवळ सवस्त्र नाहि तर वेल ड्रेस्ड वगैरे असायची. त्याच्या चित्रांनी लोकभावना दुखावल्या गेल्याचं हे कारण होतं. (मी जे काहि थोडंफार वाचलं त्यावरुन हा निश्कर्श काढला. असल बात याच्या विपरीत देखील असावी...)

राहिला मुद्दा बाजरपेठेने विज्ञानात ढवळाढवळ करण्याचा... तर हि बाब केवळ एका बिननफ्याच्या संशोधनाकडे दुर्लक्ष्य व दुसर्‍या नफा मिळवुन देणार्‍या संशोधनाला उत्तेजन इतका मर्यादीत नाहि. ग्लोबल वॉर्मींग सारख्या एकुणच मानवजातीचा घास घेणार्‍या घटनांचा अभ्यास असो, आरोग्याला दूरगामी घातक ठरणार्‍या रासायनीक-जेनेटीक अन्नप्रक्रिया असो, वा टाईमबॉम्ब प्रमाणे टीकटीकणारे अणुऊर्जा प्रकल्प असो.. या सर्वांचा प्रवास तर्काच्या/विज्ञानाच्या प्रकाशात होताना दिसत असला तरी तो बाजारपेठेच्या रुळावरुन होतो असं मानायला बरीच जागा आहे. आणि हे जर खरं असेल तर धार्मीक वा इतर भावनीक कोलाहलापेक्षा हा बाजारपेठीय दाब विज्ञानाला फार जास्त घातक आहे.

जाता जाता -
बदल (त्यातल्या त्यात सकारात्मक) घडवुन आणणं हे नेहमीच कठीण असतं... नाहितर घरोघरी विश प्राशन करणारे शिव तयार झाले असते.

अर्धवटराव

इंस्टिंक्ट्स हे भावना आणि तर्का पेक्षा वेगळे असतात,
काही बाबतित ते भावनेच्या जवळचे वाटतात तर काही बाबतित तर्काच्या जवळचे...
इंस्टिंक्ट्स भावनी आणि तर्काच्या बरेच आधिचे आहेत...

मात्र भावना ही उत्क्रांती च्या दृष्टीने तर्काच्या आधीची आहे, असं ठाम विधान करता येत नाही.

बाकी धर्म संस्थांची विज्ञानात ढवळाढवळ कमी झालिये याच्याशी सहमत

अर्धवटराव's picture

15 Nov 2012 - 10:51 pm | अर्धवटराव

>>इंस्टिंक्ट्स हे भावना आणि तर्का पेक्षा वेगळे असतात,
- निश्चितच. इन्स्टिक्ट्स भावनेला, उद्दिपीत करतात, ट्रिगर करतात.

>>काही बाबतित ते भावनेच्या जवळचे वाटतात तर काही बाबतित तर्काच्या जवळचे..
-- भावनेनी ओके सिग्नल दिल्याशिवाय तर्कापर्यंत ट्रिगर पोचत नाहि. जबरदस्ती केली तर मानसीक संतुलन बिघडलेच म्हणुन समजा.

>>मात्र भावना ही उत्क्रांती च्या दृष्टीने तर्काच्या आधीची आहे, असं ठाम विधान करता येत नाही.
-- या ठाम विधानाचा पाया म्हणजे माणसाचे प्राणिपण. तहान-भूक, झोप, काम, स्वसंरक्षण इत्यादींची प्रायोरिटी सर्वात जास्त. तदनुषंगाने राग-भय-बेभामपणा इ. भावना अगोदर ट्रिगर होतात. कुतुहल हि देखील भावनाच. या सर्व प्रेरणा शांत झाल्या कि मग तर्काच्या कसरती.

अर्धवटराव

आबा's picture

16 Nov 2012 - 12:16 am | आबा

निश्चितच. इन्स्टिक्ट्स भावनेला, उद्दिपीत करतात, ट्रिगर करतात.
हाच मुद्दा आहे, मला वरच्या प्रतिसादाचा अर्थ वेगळा वाटला होता म्हणून !
..
बाकी बेसिक इन्स्टिंक्ट्स तर्कावर आधरित कसे असतात याची पण उदाहरणे देता येतील. बरेच एथिकल डायलेमा त्यादृष्टीने वाच्ण्याजोगे आहेत.

तर्काधारीत बेसीक इन्स्टीक्ट्सपासुनच तत्वज्ञानाला सुरुवात होते. आणि एथिकल डायलमांची फोड हळु हळु धर्माकडे (रिलीजन या अर्थाने) होत जाते.

अर्धवटराव

बोर वगेरे नाही, कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी मला पण आवड्ते
धर्म इत्यादींचा उगम तसा झाला हे मला मान्यच आहे
मला एवढंच म्हणायचंय की,
"भावना या कमी उत्क्रांती झालेल्या मेंदूच्या जवळ असतात, आणि तर्क हे जास्त उत्क्रांती झालेल्या मेंदूच्या जवळ असतात"... हे विधान फारसं बरोबर नाही, (तुम्हाला असंच म्हणायचंय, असं गृहीत धरून)

बर्‍याच बाबतीत तर ऊलटी परिस्थिती दिसते

अर्धवटराव's picture

16 Nov 2012 - 5:19 am | अर्धवटराव

थोडा फरक करुन असंही म्हणता येईल कि उत्क्रांतीच्या टप्प्यात भावना अगोदर आल्या व तर्क उशीरा.

अर्धवटराव

आबा's picture

16 Nov 2012 - 5:59 pm | आबा

ओके,
पण हे सध्याच्या मतांच्या विरुद्ध आहे
(मी पेपर्स शोधून पाठवतो)

उदा.
सिम्पथी, एम्पथी वगेरे सारख्या भावना उत्क्रांतीच्या फार उशिराच्या टप्प्यात आल्या, (त्या फक्त माणसामध्येच आहेत असं मानायला जागा आहे), तर एथिकल डायलेमाच्या प्रयोगांमध्ये कमी उक्रांत असलेले प्राणी तर्कशुद्ध बाजु घेतात.

अर्धवटराव's picture

16 Nov 2012 - 8:03 pm | अर्धवटराव

मी मध्यंतरी लोकसत्त्तामध्ये याविषयी जे आर्टीकल वाचले आणि तदनुशंगाने थोडंफार इतरत्र वाचन केलं त्यावरुन निष्कर्ष काढलेत.

अर्धवटराव

इन्दुसुता's picture

15 Nov 2012 - 8:47 am | इन्दुसुता

गॅलिलिओ आणि हुसेन यांच्यात कुठलेच साधर्म्य आहे असे मला वाटत नाही. ( त्यांना हव्या त्या जागी न पुरले जाणे .. हे काही फारसे जगावेगळे नाही, ते ज्या समाजात वाढले त्या समाजाने त्यांना नाकारले हेही काही विशेष नाही).
हुसेन यांच्याबद्दल चर्चा करावयाची ही जागा नाही याचे मला भान आहे, तशी चर्चा मला लेखिकेशी करावयाची नाहीच. मी केवळ लेखिकेच्या विधानांशी माझी असहमती नोंदवते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2012 - 4:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद आबा आणि अर्धवटराव. एकेक वाक्य उचलून त्यावर चर्चा करण्यापेक्षा संपूर्ण अर्थ लावत चर्चा करणं सोपं वाटतंय, त्यामुळे विशिष्ट वाक्य अधोरेखित करत नाही.

---

मूलभूत भावना या टिकून रहाण्याच्या प्रेरणेतून आलेल्या आहेत. तिथे भावना, प्रेम, राग-लोभ इत्यादींना स्थान नाही. पाण्यात बुडणारी माकडीण पिल्लाला पायाखाली घालते तेव्हा पिल्लाविषयीच्या मातृत्वभावना भावना विसरते. टिकून रहाण्याची प्रेरणा अतिशय मूलभूत आहे. उत्क्रांतीमधे जे काही आहे ते सर्व टिकून रहाण्यातून आणि आपले गुणधर्म गुणसूत्ररूपात पुढच्या पिढीकडे देण्यातून आलेलं आहे. तिथे संपूर्ण निष्ठूरता आहे. अगदी आजही कलहारी वगैरे वाळवंटी भागात जे लोक भटक्यांचं आयुष्य जगतात, त्या माता अशक्त मुलाचीही फार काळजी करत नाहीत. स्थलांतर करणं आवश्यक असताना ते सर्वात महत्त्वाचं, यात नवजात मूल दगावलं तरीही कोणीही त्याबद्दल फार चिंता करत नाही. त्यातून जी मुलं मोठी होतात ती तिथे जगण्यासाठी 'लायक' ठरतात. यापेक्षा थोड्या कमी क्रूर परिस्थितीत माता (आणि पिताही) आपल्या स्वतःची मुलाची काळजी घेतात; आदीम प्रेरणा असते ती आपली गुणसूत्रं पुढे जाण्याची. परिस्थिती अधिक अनुकूल झाल्यानंतर इतरांच्या मुलांचीही काळजी घेतली जाते.

मूलभूत प्रेरणा (instincts) भावना आणि तर्कापेक्षा निराळ्या आहेत हे मलाही मान्य आहे. तर्क माहितीवर आधारित असतो. आत्ता आकाशात काळे ढग आहेत तर पाऊस पडेल, हा माहितीवर आधारित केलेला तर्क आहे. भावनेला असं काही रॅशनेल (rationale) नसण्याची शक्यता अधिक. माझ्या भागात दुष्काळ आहे तर पाऊस पडावा असं वाटतंय, ही भावना झाली. पुरेसं पाणी साठलेलं नाही तर मी आंघोळ करत नाही हा तर्काधारित निर्णय झाला. मी आंघोळ केल्याने पाऊस पडेल असं वाटतं म्हणून आंघोळ करणे हा भावनाधिष्ठित निर्णय.

---

संशोधन करताना विशिष्ट विषयाला अधिक फंडींग आणि नफ्याची शक्यता न दिसणार्‍या विषयाला कमी फंडींग असा आपपरभाव खासगी क्षेत्राकडून होतोच. (का होऊ नये?) पण संशोधनातून काय निष्कर्ष निघणार आहेत हे फंडींग एजन्सीज ठरवू शकत नाहीत. ज्या उत्पादनाला बाजारपेठ नाही किंवा पुढच्या दहा वर्षात मिळण्याची शक्यता नाही तिथे संशोधन होत नाही. आजही सौरऊर्जेला फार मोठी बाजारपेठ नाही. पण आजपासून दहा-पंधरा वर्षांनी बाजारपेठ असेल, कदाचित खूप मोठी बाजारपेठ असेल. त्याचा विचार करून आजही अनेक खासगी कंपन्या सौरऊर्जा संशोधनात पैसा टाकत आहेत. जागतिक तापमानवाढ होत असेल तरी त्यात माणसाचा काही हात नाही हे सिद्ध झाल्यास अर्थातच पेट्रोलियम, कोळसा क्षेत्राचा नफा आहे. संशोधनातून असेच निष्कर्ष निघण्याची शक्ती या कंपन्यांच्या हातात नाही. शिवाय या कंपन्या म्हणजे धर्म नव्हे, की एकच एक पोप किंवा खलिफा, तो काय योग्यायोग्य ते ठरवणार आणि बाकीचे त्यावर आक्षेप घेऊच शकत नाहीत. एका कंपनीचं नुकसान हे दुसर्‍या कंपनीसाठी संधी असू शकते. धर्म आणि धर्मगुरूंची मोनॉपोली खासगी क्षेत्राकडे नाही.

---

हुसेन-गॅलिलेओबाबत:
हुसेनने काय हेतूने अशी चित्रं काढली हे तपासणे हा या लेखनाचा (आणि बर्‍याच अंशी माझाही) आवाका नाही. त्याच्या बाबतीत दोन गोष्टी: १. त्याने ही चित्रं काढली ७०च्या दशकात. ही चित्रं नव्वदीच्या दशकापर्यंत लोकांनी अनेक प्रदर्शनांमधे पाहिली, वाखाणली. नव्वदच्या दशकात राजकीय पक्षांनी त्याविरोधात आरडाओरडा सुरू केला. आजही कलाक्षेत्रातले जाणकार हुसेनबद्दल, त्याच्या चित्रांबद्दल गौरवोद्गारच काढतात. २. नग्नता हा विषय डॉक्टर आणि कलाकारांच्या अभ्यासाचा विषय आहे. किंबहुना कोणताही विषय हा अभ्यासाचा विषय असू शकतो; अमक्या विषयामुळे अवमान होतो किंवा हीन लेखलं जातं ही गोष्ट अतार्किक आहे. धर्माचा अभ्यास केल्यामुळे नास्तिकांच्या भावना दुखावल्या जातात अशी तक्रार करण्यासारखं हे आहे. अभ्यासविषयाच्या मांडणीबाबत शंका असू शकतात. पण कलेच्या अभ्यासकांनी हुसेनला आधीच दाद दिलेली आहे.

मला, किंवा कोणत्याही एका व्यक्तीला आणि व्यक्तीसमूहाला, नग्नतेबाबत काय वाटतं हे संपूर्णपणे बाजूला ठेवलं आणि वरच्या घटनांची संगती लावली तर कदाचित गॅलिलेओच्या बाबतीत काय झालं यातलं साधर्म्य दिसेल. गॅलिलेओ चंद्रावरचे डाग टेलिस्कोपमधून लोकांना दाखवत असे तेव्हा लोकांना त्यावर आक्षेप होताच. पृथ्वी-चंद्र ही जोडगोळी एकमेवाद्वितीय नाही, गुरूभोवतीही चार उपग्रह आहेत हे गॅलिलेओ सांगत असे तेव्हा लोकांना ते आवडत नसे. पण त्यातून त्याच्यावर खटले, आरोप वगैरे होत नव्हतं. पण विश्व पृथ्वीकेंद्रीत आहे या ख्रिश्चन धर्मामधल्या कल्पनेला गॅलिलेओने धक्का लावला हा त्याचा मोठा गुन्हा होता.

आज, आपलं विश्व केंद्रहीन आहे असं म्हणण्यासाठी फार धैर्याची आवश्यकता नाही; पण नग्न चित्रं काढण्यासाठी अजूनतरी आहे (हे हुसेनकडे बघून समजलं). अजून चारशे वर्षांनी कदाचित नग्नतेसंदर्भातल्या कल्पना बदललेल्या असतील आणि मग तेव्हा नग्न चित्र काढण्यासाठी अजिबातच धैर्य गोळा करावं लागणार नाही. चारशे वर्ष का थांबा, अनेक आदिवासी जमातींमधे नग्नतेच्या कल्पना फार वेगळ्या आहेत. चारचौघांत, समाजात डोळे फिरवणं (ही पद्धत पाश्चात्यांची, आपल्याकडे लोकं डोळे फिरवताना दिसत नाहीत.) हा टॅबू मानला गेला तर असे डोळे फिरवण्याचे व्हीडीओज किंवा अ‍ॅनिमेशन्स बनवायला प्रचंड धैर्य गोळा करावं लागेल. कालानुक्रमे गॅलिलेओचं सूर्यकेंद्रीत विश्व हे डोळे फिरवण्याइतपत सर्वमान्य झालेलं आहे. नग्नता नाही. हा अंधारयुगाचा आणखी एक तोटा.

अर्धवटराव's picture

16 Nov 2012 - 8:44 am | अर्धवटराव

तुमचे प्रतिसाद आणि ते देण्याची शैली फार आवडते मला.

मूलभूत भावना जगण्याच्या - टिकुन राहाण्याच्या प्रेरणेतुन येतात हे मान्य. किंबहुना, भावना फार जास्त तीव्रतेने उद्दीपीत होतात व बुद्धीला-तर्काला निर्णायक रित्या झाकोळतात, व असं न होण्यावर मनुष्याचा फारसा कंट्रोल नसतो. आपण मनुष्याकडुन तर्काला-बुद्धीला-चिकित्सेला प्राथमीकता द्यायची कितीही अपेक्षा केली तरी माणसाचं हार्ड्वेअर भावनेचं उद्दीपन प्राधान्याने करते. थोडक्यात काय, तर बाय डिफॉल्ट ह्युनबीईंग इज बाऊण्ड टु टेक डिसिजन्स बेस्ड ऑन इमोशन्स. आणि म्हणुनच "तमसो मा ज्योतिर्गमय" चं शिक्षण स्पेसिफिकली घ्यायला लागतं.

हुसेन साहेब-
माझा देखील त्यांच्याविषयी वादग्रस्त संदर्भांचा अभ्यास फार तोडका आहे. अधिकारवाणीने मला त्यबद्दल फार काहि बोलता यायचं नाहि. पण ज्याप्रमाणे कलाकाराला कुठलाही विषय वर्ज नसतो त्याचप्रमाणे त्याच्या कलेच्या प्रदर्शनातुन कोणाच्या भावना कशा, केंव्हा व का दुखावल्या/सुखावल्या जाव्या यावरही काही कंट्रोल नाहि... हे कितीही अतर्कीक वाटलं तरी... हुसेन प्रकरण मुद्दाम उकरुन काढण्यात आले याची शक्यता खुपच जास्त आहे, पण त्यामुळे हुसेन साहेबांनी त्या विशिष्ट चित्रांतुन केवळ कलेची अभिव्यक्ती केली, आकसाची नाहि हे ठरत नाहि.

उद्योग समुह आपल्या नफ्याकरता वैज्ञानीक संशोधनांना फंडींग करतात यात काहिच वावगं नाहि, किंबहुना तसं करण्याशिवाय पर्याय नाहि. पण वि़ज्ञानाने सत्य शोधले आणि उद्योगाने त्याचा नफ्याकरता त्याचा वापर केला असं सरळ सरळ पांढरंशुभ्र गणीत नाहि आहे ते. इथे उद्योग आपल्या नफ्याकरता आवश्यक सत्य काय हे प्रथम ठरवते, व विज्ञानाला ते सत्य पटवुन घ्यायला भाग पाडते आहे. मध्ययुगात किंवा अगदी आज धर्मसंस्थेने विज्ञानाचं आणि पर्यायाने माणसाचं जेव्हढं नुकसान केलं त्याच्या कित्येकपट अधिक नुकसान या नफेखोरीतुन होण्याची शक्यता आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2012 - 12:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> "तमसो मा ज्योतिर्गमय" चं शिक्षण स्पेसिफिकली घ्यायला लागतं. <<
सहमत आहे. माहिती मिळवून, ती प्रोसेस करून तर्कशुद्ध निर्णय घेण्यासाठी शिस्त आत्मसात करावी लागतेच.

खासगी उद्योगांना असणारा विरोध मला अजूनही समजलेला नाही. किंचित भावनिक पातळीवरचा विरोध वाटतो आहे. त्यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण आवडेल.

"सत्यमेव जयते" मध्ये फर्टीलझर्स आणि पेस्टीसाईड्स्च्या संदर्भात एक भाग होता. त्यात विषारी आणि चुकीच्या फवारणीमुळे एका गावात काहि पिढ्या विकलांगता आणि इतर रोगांनी ग्रस्त असलेल्या दाखवल्या होत्या. मध्यंतरी त्याच परिसरातला एक मित्र आमच्या प्रोजेक्ट्ला जॉईन झाला व त्याने कंपन्यांच्या हितसंबंधांविषयी बरेच काहि सांगितले.

अमेरीका प्रथम ग्लोबल वॉर्मींगचे दुष्परीणाम नाकारते व जे काहि थोडंफार मन्य करते त्याची जबाबदारी युनोमध्ये भारत-चीन वर ढकलते. त्यामागे व्यापारी हितसंबंध जपण्यापलिकडे आणखी काय उद्देश असेल ? आपले पचौरी साहेब पहिल्या अहवालात नद्यांचे आयुष्य २०५० पर्यंत अत्यंत धोकादायक स्थितीला येईल म्हणतात, मग त्यांना अहवाल परत सादर करायचा आदेश येतो.. द्सर्‍या अहवालात धोक्याची सुचना एकदम निवळते... हा फरक केवळ शास्त्रीय प्रयोगांतल्या निष्कर्शांमुळे आला असं कसं म्हणावं ? इजीप्तमध्ये आस्वान धरण बनताना त्याला एन्व्हायर्मेण्ट सायंटीस्ट्च्या एका फौजेने कसला विरोध केला होता व त्यामागे अमेरीकेची कापुस उत्पदकांची लॉबी अशी फंडींग करत होती याच्या कथा सुद्धा वाचनीय आहेत.

भारताकडे थोरीयमचे सफीशियंट साठे असताना आपण युरॅनियमच्या मागे लागतो हा ही त्यातलाच भाग.

असो. इथे पुराव्याने साबीत करतो म्हटलं तर सर्वसामान्य माणसाला फार दीर्घ संघर्षाची तयारी ठेवावी लागेल... अहो जिथे सरकारे विरोध करु शकत नाहि तिथे सर्वसामान्य माणसाचा काय पाड लागणार. पण एकुणच मानवजातीला धोकादायक परिमाणांवर जेंव्हा दोन तोलामोलाच्या वैज्ञानिकांकड्न अगदी परस्पर विरोधी दावे केले जातात तेंव्हा त्याला केवळ त्यांचा इगो, प्रयोगांची दिशा कारणीभुत आहे, किंवा हे सर्व कॉन्स्पिरसी थेअरीत मोडतात असं म्हणणं धाडसाचं होईल. संगठीत उद्योगविश्वाची ताकत जर सरकरी देशी-परदेशी धोरणांना प्रभावीत करते तर वैज्ञानीक विश्व त्यापासुन अलिप्त राहु शकत नाहि.

इन्दुसुता's picture

16 Nov 2012 - 8:05 am | इन्दुसुता

<<हुसेनने काय हेतूने अशी चित्रं काढली हे तपासणे हा या लेखनाचा (आणि बर्‍याच अंशी माझाही) आवाका नाही. >>
हे मान्य केल्याबद्दल अभिनंदन. येथे मुद्दा मानवी नग्नतेचा नाहीच ( ती कशी प्रगल्भ आहे किंवा नाही याबद्दल ही नाही). कुणा दुसर्‍याचे विचार आणि समज भिन्न असू शकतात आणि ते तसे असल्यास बाय डिफॉल्ट ते इन्फिरियर असतात असे नाही हे जाणवायला जी मानसिक प्रगल्भता लागते ती वरील वाक्यात दिसली. त्याखालच्या सर्व मुद्दयांशी परत असहमत.

एस's picture

16 Dec 2012 - 12:40 am | एस

समाजातील पॅराडॉक्सेस चे मस्त विश्लेषण केलंय. जग सुरळीत चालावं म्हणून ज्या धर्म, देव, अध्यात्म वगैरे गोष्टी निर्माण केल्या गेल्या त्याच गोष्टींमुळे जग बिघडलं हे मात्र नक्की.