शिलाहार राजवंश आणि गंडरादित्याचा कोल्हापूर ताम्रपट

प्रचेतस's picture
प्रचेतस in दिवाळी अंक
11 Nov 2012 - 10:08 am

महाराष्ट्रातील आद्य राजवट सातवाहनांनंतर इये देशी गुप्त, अभीर, कलचुरी, राष्ट्रकूट, चालुक्य, कदंब इत्यादींनी वेगवेगळ्या भूभागावर राज्य केले. साधारण इ. ८व्या शतकात इथे शिलाहारांची राजवट उभी राहिली ती मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकण प्रांतात. शिलाहार राजांनी जरी प्रामुख्याने राष्ट्रकूट आणि चालुक्यांचे मांडलिक म्हणून काम पाहिले तरी त्यांची राजवट अत्यंत प्रबळ असून त्यांचे मांडलिकत्व केवळ नामधारी होते. हे राजे स्वतःला महामंडलेश्वर, कोकणाधिप, कोकणचक्रवर्ती, राजाधिराज अशी बिरुदे लावत. संपूर्ण कोकणात आणि दक्षिण महाराष्ट्रात राज्य करणारे हे राजे स्वतःला विद्याधर राजपुत्र जीमूतवाहनाचा वंशज मानत. प्राचीन दंतकथेप्रमाणे जीमूतवाहनाने शंखचूड नावाच्या नागाला गरुडाच्या पंजातून सोडवण्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले होते. ह्या प्रसंगापासूनच त्यांच्या कुलाला शिलाहार (शिला-आहार) असे नाव पडले, असे मानले जाते. तर प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयातील शिलाहार राजा छद्वैदेवाच्या ताम्रपटात सिलार नावाच्या पराक्रमी वीराने परशुरामाच्या बाणापासून संत्रस्त झालेल्या समुद्राचे रक्षण केले, असा उल्लेख आहे. याच सिलाराच्या कुळाला पुढे सिलारा-सिलाहारा-शैलाहार-शिलाहार असे नाव मिळाले, असेही समजले जाते.

शिलाहारांच्या जवळपास दहा वेगवेगळ्या शाखांनी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात कारभार केला. पैकी महाराष्ट्रातील उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि कोल्हापूरचे शिलाहार ही तीन घराणी सर्वाधिक प्रबळ होत. उत्तर कोकणचे आणि कोल्हापूरचे शिलाहार स्वतःला तगरपुराधीश्वर असे गौरवाने म्हणवून घेत त्यामुळे उस्मानाबादजवळील तेर-तगर हे त्यांचे मूळ ठिकाण असावे, पण नंतर हे कोकणात स्थायिक झाले असावेत.

तत्कालिन राजांच्या शिलालेखांत, ताम्रशासनांत शिलाहारांच्या राजवटीविषयी, वंशावळीविषयी माहिती उपलब्ध आहे. प्रस्तुत लेखात मी जरी कोल्हापूर शिलाहार घराण्यातील गंडरादित्याच्या ताम्रपटाविषयी लिहिणार असलो, तरी तत्पूर्वी महाराष्ट्रातील शिलाहार घराण्यांतील तीन प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती करून घेणे उचित ठरावे.

उत्तर कोकणचे शिलाहार :
हे सुरुवातीला राष्ट्रकूटांचे मांडलिक होते. राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याने उत्तर कोकण काबीज केल्यावर (साधारण इस. ७५०च्या आसपास) अनिरुद्ध नावाचा सरदाराला उत्तर कोकणाचा प्रांताधिपती केले. त्यानंतर साधारण इस. ७९०च्या आसपास कपर्दिन (पहिला) हा उत्तर कोकणच्या सत्तेवर आला. याच्यापासून उत्तर कोकण शिलाहार घराण्याची सुरुवात झाली. हा राष्ट्रकूट राजा गोविंद (तिसरा) याच्या समकालीन होता. कपर्दिनाने उत्तर कोकणात राष्ट्रकूट साम्राज्य वाढवायला भरपूर मदत केली आणि याची परिणती म्हणून याला उत्तर कोकणचे स्वामित्व मिळाले.
उत्तर कोकणाच्या शिलाहारांची राजधानी स्थानक अर्थात सध्याचे ठाणे ही होती. त्यांच्या पहिल्या राजधानीचे नाव 'पुरी' हे होते असे काही ताम्रपटांवरून आणि शिलालेखांवरून दिसते. काही संशोधक मुंबईजवळील घारापुरी बेट किंवा जंजिर्‍या जवळील राजापुरी हिलाच हे राजधानीचे ठिकाण मानतात. पण ठाणे जिल्ह्यातच कुठेतरी हे ठिकाण वसलेले असावे, असेही मानले जाते. यांच्या राज्यात प्रामुख्याने हल्लीच्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या भूभागाचा समावेश होता. जवळपास १४०० गावे ह्यांच्या अमलाखाली होती.

या घराण्यात असंख्य राजे राज्य करून गेले. त्यापैकी कपर्दिन (पहिला व दुसरा), पुलशक्ती, झंझ, वज्जड, चित्तराजा, मुन्मुणी, अनंतदेव (पहिला व दुसरा), अपरादित्य (पहिला व दुसरा), केशीदेव (पहिला व दुसरा) व शेवटचा सोमेश्वर हे राजे प्रमुख होत.
ह्या शिलाहारांनी असंख्य मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर, ठाण्याचे कौपिनेश्वर मुन्मुणी राजाच्या कारकिर्दीत बांधले गेले, तर झंझ राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी बारा शिवालये बांधली.
राष्ट्रकूट घराणे कमजोर झाल्यावर शिलाहारांनी जवळजवळ एकछत्री अंमल केला. पण नंतर ह्यांना गोव्याच्या कदंबांचे आणि त्यानंतर बदामीच्या चालुक्यांचे मांडलिकत्व पत्करावे लागले.
उत्तर कोकणातला शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर. देवगिरीच्या यादवसत्तेचा प्रभाव वाढू लागल्यावर यादवसम्राट कृष्ण याने आपला मल्ल नावाचा सरदार उत्तर कोकणच्या मोहिमेवर पाठवला. मल्लाने जरी सोमेश्वरचा पराभव केला, तरी त्याला उत्तर कोकणाचा कुठलाही प्रदेश ताब्यात मिळाला नाही. पण कृष्णाचा भावाने आणि यादवांचा उत्तराधिकारी महादेव यादवाने ही मोहीम अशीच चालू ठेवली. हत्तींचे प्रचंड सैन्यदळ घेऊन त्याने सोमेश्वरावर स्वारी केली. जमिनीवरच्या या युद्धात सोमेश्वर पराजित झाल्यामुळे त्याने पळून जाऊन समुद्रात आश्रय घेतला (बहुधा घारापुरी येथे). महादेव यादवाने उत्तर किनार्‍यावरच्या अरब मांडलिकांची मदत घेऊन भर समुद्रातही सोमेश्वराचा पाठलाग करून आरमारी युद्धात त्याचा संपूर्ण पराभव केला आणि उत्तर कोकणच्या शिलाहारांचे राज्य खर्‍या अर्थाने समुद्रात बुडाले. (इ.स. १२६५).
बोरिवलीच्या एकसर गावात असणार्‍या एका वीरगळात जमिनीवरचे हत्तींच्या साहाय्याने केलेले युद्ध आणि समुद्रावरचे नावांच्या साहाय्याने केलेले युद्ध कोरण्यात आलेले आहे.

दक्षिण कोकणचे शिलाहार :
उत्तर कोकणच्या शिलाहारांप्रमाणेच हे शिलाहार घराणेसुद्दा राष्ट्रकूटांचे मांडलिक होते. उत्तर कोकण काबीज केल्यावर राष्ट्रकूट सम्राट दंतिदुर्गाचा काका आणि वारसदार कृष्ण (पहिला) याने दक्षिण कोकणावर ताबा मिळवला आणि त्या प्रदेशावर आपला प्रांताधिकारी म्हणून शनफल्ल याची नेमणूक केली. (इ.स. ७६५). हा शनफल्ल दक्षिण कोकण शिलाहार घराण्याचा मूळपुरुष. याच्या साम्राज्यात रत्नागिरीतील आणि गोव्यातील काही भागाचा समावेश होता.
सुरुवातीला गोव्यातील चंद्रपूर (हल्लीचे दक्षिण गोव्यातील चंदोर हे गाव) आणि नंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण ही यांची राजधानी होती, असे खारेपाटण येथे मिळालेल्या रट्टराजा शिलाहाराच्या ताम्रपटावरून समजते.
धम्मिराया, ऐयप्पाराजा, अवसर (पहिला, दुसरा आणि तिसरा), आदित्यवर्मन, भीम आणि शेवटचा रट्टराजा हे यातले काही प्रमुख राजे. यातल्या अवसर (तिसरा) याच्या कार्यकाळात एका दानपत्रात दोन व्यापार्‍यांना १०० दिनारांची वृत्ती दिली होती, असे लिहिले आहे (इ.स. ९८८). अरब दिनारांचा महाराष्ट्रातील इतका प्राचीन उल्लेख आश्चर्यजनक आहे.
या तिसर्‍या अवसराच्या कार्यकाळात राष्ट्रकूटांचे साम्राज्य कमजोर होऊन बदामीच्या चालुक्यांनी दक्षिण कोकणावर ताबा मिळविला आणि शिलाहार शाखेला स्वतःच्या अंकित करून घेतले. सत्याश्रय ह्या चालुक्य राजाच्या मृत्यूनंतर चोलांबरोबर सतत चालणार्‍या लढायांमुळे चालुक्यांची केंद्रीय सत्ता उतरणीला लागली आणि याचा फायदा घेत रट्टराजाने आपले स्वातंत्र्य घोषित केले. सत्याश्रयाचा उत्तराधिकारी विक्रमादित्य (पाचवा) हा कमजोर असल्याने रट्टराजास शासित करू शकला नाही. विक्रमादित्याच्या पाठीमागे ही उणीव भरून काढत विक्रमादित्याचा धाकटा भाऊ आणि चालुक्यांचा राजा जयसिंह याने दक्षिण कोकण काबीज करून रट्टराजाची सत्ता संपुष्टात आणली (इस. १०२४) व दक्षिण कोकण शिलाहार घराण्याचा शेवट झाला.

कोल्हापूरचे शिलाहार :
राजकीय पटलावर कोल्हापूरच्या शिलाहारांचा उदय तसा उशिराच झाला. यांच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राष्ट्रकूटांची सत्ता उतरणीला लागली होती आणि बदामीच्या चालुक्य-चोलांबरोबरच्या सततच्या युद्धांमुळे कमजोर झाली होते. १०व्या शतकाच्या मध्यावर तेव्हा कर्हाचड-कोल्हापूर प्रांतावर राष्ट्रकूटांचा महासामंत सेंद्रक (सिंद) राजा आदित्यवर्मन सत्तेवर होता. त्याच्या एका दानपत्रात इंद्रायणीच्या जवळील कान्हे गावाचा आणि तिथल्या लेण्यांचा उल्लेख आहे. बहुधा नजीकची भामचंद्र डोंगरावरची ही लेणी असावीत.
राष्ट्रकूटांची मध्यवर्ती सत्ता अतिशय कमजोर झाल्याने याच काळात शिलाहार घराण्याचा राजा जतिग (दुसरा) याने कर्हा डवर स्वारी करून आदित्यवर्मनच्या उत्तराधिकार्‍याला सत्तेवरून खाली खेचले व कोल्हापूर शिलाहार घराण्याची स्थापना केली (इ.स. १०००). कोल्हापूर प्रांतावर जरी यांची सत्ता उशिरा स्थापन झाली, तरी ह्या घराण्याच्या सुरुवातीच्या पिढ्या कर्नाटकात सामंतपदावर होत्या. जतिग (पहिला) हा ह्या शाखेचा मूळ पुरुष (इ.स. ९४०-९६०) हा स्वतःला गोमन्थ दुर्गाचा स्वामी म्हणवतो. हा गोमन्थ दुर्ग म्हणजे हल्लीचे गोवे नसून कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील चंद्रगुप्ती. याच्या नंतरच्या पिढ्यांतील नायिमांक, चंद्रराजा ह्या पिढ्यासुद्धा कर्नाटकातच नांदल्या. आदित्यवर्मनचा पराभव करून जतिग (दुसरा) याने आपली राजधानी कर्हायड येथे वसवली व तिथूनही लवकरच त्याने ती कोल्हापूरला हलवली. लगेचच त्याने पन्हाळा (पर्णालक) किल्ला जिंकला आणि कोल्हापूर प्रांताचा विस्तार केला. यांच्या साम्राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव येथपर्यंतच्या प्रांताचा समावेश झाला व यांनी बहुत काळ स्वतंत्रपणे राज्य केले. हे राजे जरी राष्ट्रकूट/चालुक्यांचे पूर्णपणे मांडलिक नसले, तरी त्यांच्या कलाने राज्यकारभार हाकत त्यांनी आपले राज्य संपन्न बनवले. चालुक्यांच्या असंख्य मोहिमांमध्ये कोल्हापूर शिलाहार घराण्याने त्यांना मदत केली.
जतिग (दुसरा) याचा नातू मारसिंह हा एका दानपत्रात जतिगाचा उल्लेख पन्हाळ्याचा सिंह असा करतो. तर आणखी एका दानपत्रात तो आपला पिता गोंकल याचा उल्लेख कुरहाट कुंडी (कर्हााड-बेळगाव), मिरिंज देश (मिरज) आणि दक्षिणचा कोक़णचा स्वामी असा करतो.

जतिग (पहिल व दुसरा) गोंकल, गूवल, चंदरादित्य, मारसिंह, भोज (पहिला व दुसरा) गंडरादित्य, विजयादित्य हे या घराण्यातील प्रमुख राजे.

हे घराणे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे भक्त होते. मूळच्या देवी स्थानाचा त्यांनी जीर्णोद्धार करत प्रशस्त अशा मंदिराची निर्मिती केली. त्यांच्या कित्येक ताम्रशासनांत महालक्ष्मीला वंदन केलेले आढळते.
भोजराजा शिलाहाराने किंवा ह्या शिलाहार घराण्याने सातारा-कोल्हापूर प्रांतात असंख्य किल्ले बांधले. विशाळगड, अजिंक्यतारा, चंदन-वंदन, रोहिडा, वैराटगड, पांडवगड, केंजळगड, कमळगड, परळी (सज्जनगड) असे बलदंड दुर्ग ही यांचीच निर्मिती. तर गंडरादित्याने खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर बांधायला सुरुवात केली. या मंदिराच्या कामात पुढच्या जवळजवळ दोन पिढ्या खर्ची पडल्या. कोपेश्वराबरोबरच गंडरादित्याने अनेक हिंदू मंदिरांबरोबरच जैन आणि बुद्ध मंदिरेसुद्धा बांधली. गंडरादित्याची पत्नी कर्णावती जैन धर्माचे आचरण करणारी होती.
साधारण १२व्या शतकाच्या मध्यावर देवगिरीचे यादव आणि द्वारसमुद्राच्या (हळेबीडू) होयसाळाबरोबर चाललेल्या युद्धामध्ये परास्त होऊन चालुक्य राजा सोमेश्वर (चौथा) याने गोव्याच्या कदंबांकडे आश्रय घेतला. कलचुरींनी गोव्यावर स्वारी केली, तेव्हा शिलाहार राजा विजयदित्याने गोव्याच्या मदतीसाठी धाव घेऊन कलचुरी अहवमल्लाचा सरदार चंडुगीदेव दंडनायकाचा पराभव केला व गोव्याचे राज्य पुन:स्थापित करण्यास मदत केली. या विजयादित्याचा पुत्र भोजराजा (दुसरा) हा ह्या शाखेचा शेवटचा उत्तराधिकारी. हा अत्यंत पराक्रमी असून स्वतःला महामंडलेश्वर, राजाधिराज, परमेश्वर, परमभट्टरक, पश्चिमचक्रवर्ती अशी बिरुदे लावत असे. ह्याने अनेक दाने दिली. महालक्ष्मीचा हा परमभक्त होता. तिची पूजा आणि नैवेद्य यासाठी याने दानपत्रे लिहून दिली. लवकरच याने स्वतःला स्वतंत्र राजा म्हणून घोषित केले. देवगिरीच्या यादवांना याची वाढती सत्ता सहन न झाल्यामुळे बलाढ्य सिंघण यादवाने कोल्हापूर शिलाहारांवर आक्रमण केले. कृष्णा आणि दूधगंगा ह्या दोन नद्यांच्या मधल्या प्रदेशात खिद्रापूरनजीक हे युद्ध झाले. यात भोजाचा सेनापती मारला गेला. कोपेश्वर मंदिराजवळ त्याच्या पराक्रमाचा वीरगळ आहे. हे युद्ध जिंकल्यावर त्याने पन्हाळ्यावर स्वारी करून राजा भोजाला बंदिवान बनवले आणि पन्हाळ्यावरच कैदेत टाकले. एका शिलालेखात सिंघणाचा पक्षिराज (सर्पांना चिरडणारा गरूड) असा उल्लेख येतो, जे शिलाहार सत्तेवरील विजयाचे प्रतिक आहे.
कोपेश्वर मंदिरात सिंघणाने एक शिलालेख कोरविला. आणि कोल्हापूरच्या वैभवशाली शिलाहारांचे राज्य खालसा झाले (इ.स १२१२).

ह्याच शिलाहार घराण्यातील एक प्रमुख राजा गंडरादित्य ह्याचा कोल्हापूर येथे सापडलेल्या ताम्रपट खूप महत्वाचा असून ह्या घराण्याच्या वंशावळीबद्दल, तसेच घराण्याचा एकूण कारकिर्दीबद्दल ह्या ताम्रपटात विस्ताराने लिहिले आहे. याबद्दल पुढे काही लिहिण्याआधी ताम्रपट म्हणजे नेमके काय ते समजून घेणे महत्वाचे ठरावे.

ताम्रपट किंवा ताम्रशासन:
ब्राह्मी लिपीची अक्षरे उभ्या, आडव्या, तिरप्या अशा रेषांची मिळून बनलेली असल्याने शिळांवर ती कोरणे तुलनेने सोपे जात असे. पण नंतर देवनागरीसकट इतर लिप्यांचा उगम होऊन अक्षरांना सौष्ठ्व प्राप्त झाले. त्यामुळे शिळांवर अक्षरे कोरणे वेळखाऊ आणि किचकट काम बनले. तसेच शिळांचे वजन जड असल्याने त्या इकडून तिकडून नेण्यावर मर्यादा पडू लागल्या. त्यामुळे राजांची दानपत्रे धातूच्या पत्र्यांवर कोरण्याची प्रथा निर्माण झाली. हे धातूचे पट शक्यतो तांब्याचे वापरले जात, तर क्वचित चांदीच्या किंवा सोन्याच्या पत्र्याचाही वापर केलेला आढळतो. पत्रावर लिहिणे तुलनेने सोपे जाऊ लागले. तसेच ते टिकाऊ, वजनाने हलके असल्याने इकडून तिकडे सहज नेता येऊ लागले.
सर्वसाधारणपणे ताम्रपटाचे तीन पत्रे असतात. पहिल्या पत्र्याची पहिली बाजू व शेवटच्या पत्र्याची मागची बाजू कोरीच असे. पहिल्या पत्राची मागची बाजू, दुसर्‍या व तिसर्‍यात पत्र्याच्या दोन्ही बाजू व तिसर्‍या पत्र्याची पहिली बाजू यावर लेख लिहिले जात. तिन्ही पत्र्याच्या उंचावलेल्या कडा व मधल्या खोलगट बाजूमुळे अक्षरांचे घर्षण न होता ती सुरक्षित राहत. तीनही पत्र्यांच्या कडेला छिद्र पाडून त्यात धातूची तार ओवली जाई व तिची टोके एकत्र करून त्यावर राजमुद्रा अंकित करून ते दानपत्र (अथवा ताम्रशासन) दात्याला दिले जाई. हा एक कायदेशीर दस्तऐवज असे.

गंडरादित्याचा कोल्हापूर ताम्रपट - शके, १०३७ :
शिलाहार राजा गंडरादित्य याने त्याचा सामंत निगुंब वंशातला नोळंब यास वंशपरंपरेने दिलेल्या गावाच्या दानाचा उल्लेख यात आलेला आहे. कोल्हापूरजवळील वळेवाड या गावातल्या शिबिरातून हे दान दिले गेले.
कोल्हापूर येथील श्री. र. न. आपटे यांजकडून पुणे येथील डेक्कन कॉलेजचे माजी प्राध्यापक डॉ. काशीनाथ बापूजी पाठक यांच्याकडे हा ताम्रपट वाचनार्थ आला. त्यांनी त्याचे प्रथम वाचन केले. नंतर श्री. ग. ह. खरे यांच्याकडून एकदा आणि म.म. वा. वि. मिराशी यांच्याकडून दोन वेळा असे एकंदरीत चार वेळा ह्या ताम्रपटाचे संपादन झाले आहे.

ताम्रपटवर्णन :
ताम्रपटाचे तीन पत्रे असून ते एका जाड कडीत ओवलेले आहेत. कडीवर शिलाहार राजवंशाची खूण म्हणून सर्पधर गरुडाची मूर्ती कोरलेली आहे. पहिल्या व शेवटच्या पत्र्याची सुरुवातीची आणि शेवटची बाजू अलिखित असून दुसरा पत्रा दोन्ही बाजूंनी लिहिलेला आहे. पत्र्यांच्या कडा चारही बाजूंनी उंचावलेल्या असल्याने अक्षरे शाबूत आहेत.
अक्षरे कन्नड लिपीमध्ये असून भाषा मात्र गद्यपद्य संस्कृतात आहे, तरीही काही कानडी शब्द त्यात आले आहेत. शके १०३७, मन्मथ संवत्सर कार्तिक शुक्ल पक्ष, अष्टमी, बुधवार असा दान केल्याचा काळ आहे.

ताम्रपटाची मूळ संस्कृत संहिता:

पत्रा पहिला, बाजू दुसरी
१) स्वास्ति | जयत्याविष्कृतं विष्णोव्वाराहं क्षोभितार्ण्ण्वं दक्षिणोन्नतदंष्ट्राग्रविश्रा
२) न्तभुवनं वपु: || [१] जयति जगति रूढो राजलक्ष्मीनिवासः प्रविजितरिपु
३) वर्ग्गः स्वीकृतोत्कृष्टदुर्ग्गस्सकळसुकृतवासो वीरलक्ष्मीविळासो जनितसुजन
४) रागः श्रीशिळाहारवंशः [२] श्रीमत्शिळाहारनरेंद्रवंशे श्रीकीर्त्तिकान्ता: कमनी
५) यरूपा: विख्यातशौर्या बहवो नृपेंद्रा: संपाळयामासुरिमां धरि
६) त्रीं [३] तद्दृंशे नृपातिर्ब्बभूव जतोगो गोमन्थदुर्ग्गाधिपो | भूमः (पः) श्रीवनितापतिस्सु
७) चरितो गंगस्त पेर्मानडेस्तस्याभूत्तनयप्प्रतापनिळया (यः) श्रीनायिमां
८) को नृपः कर्ण्णाटीकिचकुंकुमांकिततनुर्व्विद्याधराधीश्वरः [४] तस्यात्म
९) जरसुपरिवर्द्वितराज्यलक्ष्मी प्प्रादुर्ब्बभूव समुपाजिंतपुण्यपुंजः
१०) चंद्राहृदयो जगति विश्रुतकीर्तिकान्तरस्यागार्ण्णवो बुधनुतो नयनाभि
११) रामः [५] तस्स्यापि पुत्रो जतिगो नरेंन्द्रो जातः प्रवीरो गजयूथनाथः तस्स्या
१२) त्मजौ गोंकलगूवलाख्या जातावुभौ वैरिकुळाद्रिवजौ [६] तदगोंकलस्य तनुजो रिपुदन्ति
१३) सिंहः श्रीमारसिंहनपतिर्म्मरूवक्कशर्प्पः प्प्रादुर्ब्बभूव समरांगणसूत्र
१४) धारो विख्यातकीर्तिरिह पंडितपारिजातः [७] तस्स्याग्रसूनुर्ज्जगदेकवीरो वी
१५) राजनाबाहुलतावगूढः | कीर्तिप्रियो गूवलदेवनामा बभूव भूपाळ
१६) वरो नरेंद्रः [८] तस्स्यानुजस्सकळमंगळजन्मभूमिरासीन्नृपाळतिलको भुवि भोज
१७) देवः प्रोत्तुंगवीरवनिताश्रयबाहुदण्डश्वण्डारिमण्डळशिरो गिरिवज्रदण्डः [९]

पत्रा दुसरा, बाजू पहिली

१८) श्रीमत्कदंबांबरतिग्मरश्मेश्शिरस्सरोजं खळु शान्तरस्य पूजां प्रचक्रे स च चक्रवर्त्तिशीविक्र
१९) मादित्यनृपेन्द्रपादे [१०] किं वर्न्न्य (र्ण्य)ते जगति वीरतरः प्रसिद्धः कोपात्तु कोंगजनृपोपि
२०) पपात यस्य सूर्य्यान्वयांबररविस्स च बिज्जणोपि चक्रे गृहं सुरपतेर्ब्भुवि य
२१) स्य कोपात् [११] यत्प्रतापप्रदीपेस्मिन् कोक्क्लस्सलभयितः पलायिता न गण्यन्ते सोयं
२२) भोजनृपाळकः [१२] वेणुग्रामदवानळो विजयते वैरिभकंठिरवो गोविंदप्रळयान्त
२३) कः शिखरिणो वज्रः कुरंजस्य च भोजः स्वीकृतकोंकणो भुजबळात्तद्भिल्लमोद्बंध
२४) कृत्सोयं कर्न्नदिशापटो रिपुभृद्दोर्द्दण्डकण्डूहरः [१३] तस्यानुजातो गुणराशि
२५) रासितबल्लाळदेवो जितवैरिभूपः जीमूतवाहान्वयरत्नदीपो गंभीर
२६) मूर्त्तिर्भ्भुविशौर्यशाली [१५] अजनि तदनुजातास्तिग्मरश्मिप्रतापो दिविजपतिवि
२७) भूतिस्सर्व्व्लक्ष्मीनिवासः कृतरिपुमदभंगो राजविद्याप्रसंगो भुवनवि
२८) नुतमूर्त्तिर्ग्ग्ण्डरादित्यदेवः [१५] चक्रे चाळुक्यक्रेशो विक्रमादित्यवल्लभः निश्शं
१९) कमल्ल इत्याख्यां गण्डरादित्यभूपते: [१६] धन्यास्ते मानवास्सव्वें धन्याश्च्मृगजात
३०) यः देश्स्स्फला यत्र गण्डरादित्यभ्पते: [१७] यखंगाभ्दुततीव्रघा
३१) तचकितस्तत्कुण्डिदेशोधिपो दण्डब्रह्मन्रुपो जगाम सदनं संसेव्यमानं सुरै
३२) स्त्यक्त्वा राष्ट्रमतीवरम्यतुळां लक्ष्मी भुजोपार्जितां सोयं गण्डरदेवमं
३३) ण्डळपतिस्संशोभते भूतळे [१८] रत्नानि यत्नेन ददाति तस्मै रत्नाकं
३४) रो भंगभयाज्ज्डात्मा आपूर्य्य सम्यक्सततं बहित्रं सूक्ष्माणि
३५) वासांसि हयांश्व तस्मै [१९] किमिह बहुभिरूक्तैरल्पगर्ब्भैर्व्वचिभिर्भुवन

पत्रा दुसरा, बाजू दुसरी

३६) विदितवीरः क्रूरसंग्रामधीरः अपरनृपतिकोशं देशमत्यंतशोभं यदिकुपितचित्तः
३७) कारयत्यात्मकीयं [२०] समधिगतपन्चमहाशब्दमहाण्डळेश्वरः तगरपुरा
३८) धीश्वरः शिळाहारनरेंद्रः | जीमूतवाहनान्वयप्रसूतः सुवर्ण्णगरुड
३९) ध्वजःमरूवक्क्शर्पः | अय्यनसिंहः रिपुमण्डळिकभैरव: विद्विष्टगजकंठी
४०) रवः | गणिकामनोजः | हयवच्छत्स राजः | शौचगांगेयः | सत्यराधेय
४१) इडुवरादित्यः | रूपनारायणः | कलियुगविक्रमादित्यः | शनिवार
४२) सिद्धो: | गिरिदुर्ग्ग्लंघनः | श्रीमन्महालक्ष्मीलब्धवरप्रसादादि समस्तराजाव-
४३) ळीविराजितः श्रीमन्महामण्डळेश्वरः श्रीगण्डरादित्यदेवः श्रीमद्वळय
४४) वाडशिबिरे सुखसंकथाविनोदेन राज्यं कुर्व्वाणः | सप्तत्रिंशदुत्तरसह
४५) स्त्रेषु श कवर्षेषु १०३७ अतीतेषु मन्मथसंवत्सरे कार्त्तिकमासे शुक्लपक्षे |
४६) अष्टम्यां बुधवारे मिरिंजे देशे | मिरिंजे गम्पणमध्ये | अंकु
४७) लगोब्याप्पेयवाडैतिग्रामद्वयं आदगोनाम ग्रामस्य प्रविष्टं कृत्वा तद्ग्रा
४८) मारूवणं त्यक्त्वा तत्रत्यनार्ग्ग्वुण्डो यदि नायकत्वं कुर्वन्ति तेषां शरी
४९) रजीवितार्त्थ सुवर्ण्ण न ददाति यदि नायकत्वं नेच्छन्ति स्वेच्छया तिष्ठन्ति त
५०) दा कोदेवणं नास्ति | एवमनेन क्रमेण | श्रीमत्पवित्रेत्र निगुंब

पत्रा तिसरा बाजू पहिली

५१) वंशे जातः पुमान् हारिमनामधेयः कीर्त्तिप्रियः पुण्यधनः प्रसिद्धः श्री
५२) जैनसंघांबुजतिग्मरश्मि: [२१] तस्यात्मजोभूदिह बीरणाख्य स्तस्यानुजोभू
५३) दरिकेसरीति तद्वीरणस्यापि तनुभवोयं बभूव कुंदातिरिति प्रसिद्धः || [२२]
५४) तस्यानुजस्सुपरिपाळितबन्धुवर्ग्गः श्रीनायिमा जिनमतांबुधिचं
५५) द्रयेषः | त्यागान्वित सुचरितस्सुजनो बभूव प्रख्यातकीर्तिरिह धर्म्मप
५६) रः प्रसिद्ध [२३] तस्यापि वीरः सुजनोपकारी नोळंबनामा तनयोबभूव
५७) श्रीग्ण्डरादित्यपदाब्जभृंगो धर्म्मान्वितो वैरिमतंगसिंहः [२४] तस्मै
५८) समस्तगुणगणाळंकृताय निगुंबकुळकमळमार्तण्डाय | सुवर्ण्ण
५९) मत्स्योरगेन्द्रध्वजविराजिताय सम्यक्तत्त्व रत्नाकराय म पद्मावती देवीलब्धवर
६०) प्रसादाय नोळंबसामन्ताय सर्व्वनमस्यं सर्व्वबाधापरिहारं पुत्र
६१) पौत्रकमाचन्द्रार्क्क दत्तवान्

मराठी भाषांतरः

पत्रा पहिला, बाजू दुसरी
स्वस्ति, ज्याने समुद्र क्षुब्ध केला आहे व ज्याच्या उजव्या दाढेवर जग विश्राम पावत आहे, त्या वराहरूपी विष्णूचा जय असो.

या जगात जो प्रसिद्ध आहे, जो राजलक्ष्मीचे निवासस्थान आहे, ज्याने शत्रुवर्गाला जिंकले आहे, ज्याने सर्वोत्कृष्ट किल्ले आपल्या ताब्यात आणिले आहेत, ज्याच्या ठिकाणी सदैव सर्व सुकृतांचा वास आहे, जो वीरलक्ष्मींचे ठायी विलास करितो, सुजनांच्या ठिकाणी ज्याने प्रेम उत्पन्न केले आहे अशा शिलाहार वंशाचा जय असो.

या शिलाहार राजांच्या वंशात जे लक्ष्मी आणि कीर्ती यांचे मालक बनले आहेत, जे रूपसुंदर आहेत, ज्यांचे शौर्य विख्यात आहे अशा पुष्कळ राजांनी या धरित्रीचे पालन केले आहे.

त्या वंशात 'पेर्मानडी गंगाचा' गोमंथ नामक किल्ला धारण करणारा, ऐश्वर्यस्त्रीचा पती, उत्तम आचरणाचा असा 'जतिग' नावाचा राजा झाला. त्याला प्रतापाचे आश्रयस्थान, कर्नाटकी स्त्रीच्या स्तनाच्या कुंकवाने ज्याचे शरीर चिन्हित झाले आहे व जो विद्याधरांचा स्वामी आहे, असा 'नायिमांक' नावाचा मुलगा होता.

त्याचा मुलगा 'चंद्र' ज्याने राज्यलक्ष्मीची उत्तम वाढ केली, ज्याने पुण्यसंचय केला आहे, जो पृथ्वीवर प्रख्यातकीर्ती होता, जो त्यागाचा समुद्र, शहाण्यांनी स्तुती केलेला व डोळ्यांना आवडता असा होता.

त्याचा (चंद्राचा) मोठा, वीरहत्तींचे सैन्य बाळगणारा असा 'जतिग' या नावाचा मुलगा होता. त्याला शत्रुकुलरूपी पर्वतांना वज्रासमान असे 'गोकल' व 'गूवल' नांवाचे दोन मुलगे झाले.

त्या गोकलला शत्रुरूप हत्तींना सिंहाप्रमाणे समरांगणसूत्रचालक, विख्यातकीर्ती व पंडितांना प्रिय असा 'मारसिंह' नावाचा मुलगा झाला.

त्याचा थोरला मुलगा जगदेकवीर, राजसस्त्रियांच्या बाहूरूपी वेलींच्या विळख्यात असलेला, कीर्तिप्रिय, राजश्रेष्ठ असा 'गूवल' नावाचा राजा होता.

त्याचा धाकटा भाऊ 'भोज' हा सर्व मंगलांचे जन्मस्थान, नृपतिलक, सुंदर वीरपत्नींनी आलिंगलेला, भयंकर शत्रूंचे शिरोरूपी पर्वत असलेल्यांना वज्रासमान असा होता.

पत्रा दुसरा, बाजू पहिली

याने (भोज) कदंब वंशरूपी आकाशातील सूर्य असा जो 'शांतर', त्याच्या शिरकमलाने चालुक्य चक्रवर्ती 'विक्रमादित्य' याच्या पायांची पूजा केली.

या जगप्रसिद्ध योद्ध्याचे वर्णन काय करावे? याच्या कोपामुळे 'कोंगज' राजा पडला आणि सूर्यवंशरूपी आकाशाचा सूर्य असा जो 'बिज्जण', हा देवाघरी गेला.

याच्या प्रतापदीपावर 'कोक्कल' पतंग बनला (नाश पावला) व पळून गेलेल्यांची गणतीच नाही.
तोच हा 'भोजराजा', ज्याने वेणूग्राम (बेळगांव) जाळले, जो शत्रुरूपी हत्तींना सिंहासारखा होता, ज्याने 'गोविंदाचा' नाश केला, 'कुरंज'रूपी पर्वताला जो वज्रासमान झाला, ज्याने कोकण ताब्यात आणिले व बाहुबलाने 'भिल्लम' याची मुक्तता केली. हा (राजा भोज) शत्रुराजांची बाहूंची कंडू शमन करणारा असा होता.

त्याचा धाकटा भाऊ 'बल्लाळदेव' हा ज्याने शत्रुराजांना जिंकले, जो जीमूतवाहन वंशांतील रत्नदीप, जो गंभीर स्वरूपाचा व भूवरी शौर्यशाली असा होता.

त्याच्या (बल्लाळदेवाच्या) पाठीमागून सूर्यासारखा प्रतापी, इंद्रासारखा ऐश्वर्यवान, सर्व लक्ष्मींचे निवासस्थान, शत्रूंच्या मदाचा भंग केलेला, राजविद्येची गोडी असलेला, जगाने ज्याची स्तुती केली आहे, असा 'गंडरादित्य' झाला.

याच्या साहाय्याने चालुक्य 'विक्रमादित्य' याने 'नि:शंकमल्ल' ही पदवी धारण केली.

ज्या ठिकाणी 'गंडरादित्य' राजा होता तेथील मानव, पशू व तो देश हे सर्व धन्य होत.

ज्याच्या तलवारीच्या तीव्र आघाताने भ्यालेला 'कुंडी'देशाचा राजा 'दंडब्रह्म' अतिशय रम्य राष्ट्र व स्वहस्ते मिळवलेले ऐश्वर्य टाकून देवाघरी गेला. तो हा गंडरादित्य' भूतलावर शोभायमान होत आहे. जड असा जो समुद्र तो स्वत:च्या भंगाच्या भयाने यास नेहमी रत्ने, तलम वस्त्रे आणि अश्च देतो.

पत्रा दुसरा, बाजू दुसरी

याची अल्प स्तुती करून काय उपयोग ! जो जगप्रसिद्ध वीर भयंकर संग्रामातही धैर्यशाली असा हा रागावला तर दुसर्‍या राजांचे खजिने आणि सुंदर प्रदेश आत्मसात करितो.

ज्याने पाच महाशब्द मिळविले आहेत, असा महान मंडळांचा स्वामी (महामंडळेश्वर- महान मांडलिकांचा ईश्वर), तगरपुराचा स्वामी, शिलाहार राजा जीमूतवाहनाच्या वंशात उत्पन्न झालेला, सुवर्ण गरुडाचा ध्वज असलेला, मरूवक्कसर्प, आयाळ असलेला सिंह, रिपुमंडळाला भयंकर, शत्रुरूपी हत्तींना सिंह, गणिकांना मदनासारखा, घोड्याला वत्स राजासमान, शुद्धतेंत जणू भीष्मच, खरेपणात कर्ण, अंधाराला आदित्य, रूपाने विष्णू, कलियुगातला विक्रमादित्य, शनिवार सिद्धी, गिरिदुर्गांचे ओलांडून जाणारा, 'महालक्ष्मी'चा प्रसाद व सर्व राजांमध्ये शोभायमान असा गंडरादित्यदेव श्री 'वळयवाड' शिबिरात सुखसंभाषण व विनोद यांनी युक्त होऊन राज्य करीत असता, याने शक १०३७, मन्मथ संवत्सर, कार्तिक शुक्ल अष्टमी, बुधवार या दिंवशी 'मिरज' देशातील 'मिरज' विभागातील 'अंकुलगे' '(अक्कलखोप) आणि 'बोप्पयवाड' (आंबेवाडी) ही गावे 'अदगो' नावाच्या गावाचा त्यातच समावेश करून व त्यातील अंकुलगे व बोप्पयवाड या गावांचा कर (आरूवण) माफ करून त्या नगरांतील प्रमुख व्यापारी (नार्ग्गावुंड) सावकारी करतील त्यांना सुवर्णनाण्याचा कर लागेल व जे सावकारी करणार नाहीत त्यांना कोदेवण (राजक्षत्रावरील कर) लागणार नाही, अशी ही गावे (अधोलेखित 'नोळंब' सामंताला) देता झाला. 'निगुंब' वंशात कीर्तिप्रिय, पुण्यधन, जैनसंघरूपी कमळाला सूर्याप्रमाणे व प्रख्यात असा 'हारिम' नांवाचा मनुष्य झाला.

पत्रा तिसरा, बाजू पहिली

त्याचा (हारिम) मुलगा 'बीरण', त्याचा धाकता बंधू ' अरिकेसरी'. त्या बीरणांचा मुलगा प्रसिद्ध कुंदाति.

त्याचा (कुंदातिचा) धाकटा भाऊ 'नायिम'. याने बंधुवर्गांचे उत्तम पालन केले. हा जिनमतरूपी समुद्राला चंद्राप्रमाणे झाला. तसेच हा त्यागयुक्त, सुचरित, सुजन, प्रख्यात व धर्मपर असा होता.

त्याचा (नायिमाचा) सज्जनांना उपकारक, वीर, गंडरादित्याच्या पदकमलांच्या ठिकाणी भुंग्यासारखा, धर्मयुक्त व वैरीरूप हत्तींना सिंहासारखा असा 'नोळंब' नांवाचा मुलगा होता.

सर्व गुणसमुदायांनी अलंकृत, 'निगुंब' कुलकमलाला सूर्यासारखा, सुवर्ण मत्स व सर्प यांच्या ध्वजेने विराजमान, समुद्र व पद्मावती देवीचा वरप्रसाद मिळालेला, अशा त्या 'नोळंब' सामंतास सर्वमान्य व कुठलाही त्रास नसलेले असे वरील ग्रामद्वय पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने जोवर सूर्य चंद्र आहेत, तोवर दिले आहे.

थोडेसे स्पष्टीकरण :

वरील ताम्रपटात शिलाहार आणि गंडरादित्याचा सामंत नोळंब याच्या निगुंबवंशाची वंशावळ आली आहे.
कोल्हापूर शिलाहार वंशावळ (गंडरादित्यापर्यंत):
१) जतिग(प्रथम)
२) नायिम
३) चंद्र
२) जतिग (द्वितीय) - गूवल (प्रथम) आणि गोकल ही दोन मुले
३) गोकल - मारसिंह
४) मारसिंह - गूवल (द्वितीय), भोज (प्रथम), बलाळ आणि गंडरादित्य ही चार मुले
५) गंडरादित्य

निगुंब वंशः

१) हारिम - बीरण आणि अरिकेसरी ही दोन मुले
२) बीरण - कुंदाति आणि नायिम ही दोन मुले
३) नायिम - नोळंब
४) नोळंब

या ताम्रपटाच्या प्रारंभीच विष्णूच्या वराहावताराचा 'जयत्याविष्कृतं विष्णोव्वाराहं ...' हा श्लोक येतो. चालुक्य राजवटीचे राजचिन्ह 'वराह' हे असल्याने शिलाहार हे चालुक्यांचे नाममात्र का होईना, पण मांडलिक होते हे स्पष्ट होते.
यानंतर शिलाहार राजा भोज (पहिला) याच्या पराक्रमाचे बरेच वर्णन आले आहे.

भोजाने कदंब नृपती शांतर, कोंगजनृपती, सूर्यवंशी बिज्जण, कोक्कल, गोविंद, कुरुंज यांचा पराभव केला, वेणुग्राम जाळले तर भिल्लमाची मुक्तता केली. हा शांतर म्हणजे कदंबराजा शांतिवर्मन असावा. तर कोंगज, कोक्कल, कुरूंज यांचा पत्ता लागत नाही, गोविंद मौर्यवंशातील असावा. भिल्लम बहुधा यादवकुळातला असावा. सेऊणचंद्र यादवाने गोविंदाच्या मदतीने भिल्लमाला कैदेत टाकून गादीवर आला असावा. वेणुग्रामात (बेळगावात) सौंदत्तीच्या रट्टांचे राज्य होते. ही सर्व युद्धे भोजाने चालुक्य विक्रमादित्यासाठी केली असावीत. भोजाचे विक्रमादित्याची नातेसंबंधसुद्धा होते. विक्रमादित्य (सहावा) याची पत्नी चंद्रलेखा अथवा चंदलादेवी ही भोजाचा पिता मारसिंह याची कन्या होती.

यानंतर गंडरादित्याच्या पराक्रमाचे वर्णन ताम्रपटात आले आहे.

गंडरादित्याच्या साहाय्यानेच विक्रमादित्याने नि:शंकमल्ल ही पदवी धारण केली आणि त्याने कुंडी देशाचा राजा दंडब्रह्म याचा उच्छेद केला. यावरून गंडरदित्यानेसुद्धा अनेक मोहिमांमध्ये विक्रमादित्याला मदत केली असावी असे दिसते. गंडरादित्याला मरुवक्कसर्पाचीही उपमा दिलेली आहे. मरूवक्क हे सुगंधी वनस्पती मरवा याचे कन्नड रूप. मरव्याजवळ साप येत नाहीत, अशी समजूत आहे. मरूवक्कसर्प म्हणजे ज्या प्रमाणे मरव्याजवळ साप येत नाहीत, त्याचप्रमाणे गंडरादित्यासमोर सापांसारखे दुष्ट मनुष्य येत नाहीत.

ज्या शिबिरात बसून गंडरादित्याने हे दान दिले, ते वळयवाड कोल्हापूरच्या पूर्वेस २/३ मैलांवर असलेले वळेवाड असावे. तर निगुंबवंशी सामंत हे जैन धर्माचे अनुयायी दिसतात.

असा हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा कोल्हापूर ताम्रपट, शिलाहारवंशावर बराच प्रकाश तर टाकतोच शिवाय त्यांच्या पराक्रमाचीही माहिती पुरवतो.

footer

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Nov 2012 - 2:32 pm | निनाद मुक्काम प...

इतिहासाबद्दल अक्षम्य दुर्लक्ष व अनास्था झालेल्या आपल्या देशात अशी सखोल व परिपूर्ण माहिती देणाऱ्या लेखांची नितांत गरज आहे.

सुहास झेले's picture

12 Nov 2012 - 3:00 pm | सुहास झेले

मला बाकी काही लिहायला सुचतच नाही आहे... लेख अतिशय माहितीपूर्ण झालेला आहे.
निनाद +१

गवि's picture

12 Nov 2012 - 4:23 pm | गवि

एवढे तपशीलवार लिहीले आहेस की तुझं आत्तापर्यंतचं लेखन एकत्र करुन नीट बांधीव रुपात सबमिट केलं तर तुला मानद पीएचडी मिळून जाईल असं वाटतं.

शैलेन्द्र's picture

12 Nov 2012 - 11:20 pm | शैलेन्द्र

ग्रेट वल्ली.. नुकताच कल्याणच्या एका भंगारच्या दुकाणात उत्तर शिलाहारांवर प्रकाशझोत टाकणारा नवा ताम्रपट सापडलाय.. दावुद दलवींनी लेख लिहीलाय बघ लोकसत्तेत..

चौकटराजा's picture

13 Nov 2012 - 5:12 pm | चौकटराजा

आम्ही ३० च्या शतकातील दुसरर्या दशकात गेले काही काळ संशीधन करीत आहोत. आम्हाला जुन्या सर्वर वरील काही हार्ड डिस्क सापडल्या त्या आताच्या संगणकावर वाचणे अवघडच होते. संगणकात सुदैवाने गेल्या ५००० वर्षातील सर्व भाषांच्या लिपी बद्ध केल्या असल्याने व शब्दकोषही असल्याने अडचणीचे निवारण झाले. आमचे माहिती प्रमाणे गो नी दा ( हे गोपाळ निलकंठ दांडेकर या नावानेही प्रसिद्ध होते तसेच श्री निनाद बेडेकर, ब मो पुरंदरे ई पट्टीचे इतिहास शोधक त्या कालात होऊन गेले ., राजा राजीव गांधी.राजा व्ही पी सिग राजा मनमोहन सिंग हे राजे होते. पण या हार्ड डिस्क मधे श्री वल्ली नामे कोणा इतिहास शोधकाचे ( की साधकाचे यावर सांप्रत वाद चालू आहे)नाव वारंवार आलेले दिसते. दुसरे एक इतिहासाचे पिसे लागलेले मन १ नावाचे शोधकाचे नाव ही या डिस्क मधे आले आहे. आम्ही त्या कालच्या आधार कार्डाच्या पुरत्या डेटा बेसचे उत्खनन ( म्हणजे आजच्या भाषेत डेटा रिकव्हरी) केले असता वल्ली वा मन१ अशी आधारकार्डे सापडली नाहीत.सबब टोपणनावाने इतिहास शोधन करण्याची त्याकाळी पद्धत होती असे वाटते. बाकी वल्ली व मन १ या टोपण नावांच्या नावे अनेक ठिकाणी गौरवपूर्ण उदगार त्याकालचे पौर काढीत असत. आमच्या संशीधक टीममधील एकाचे म्हणणे असे आहे की टोपण नावे घेतल्याच्या फायदा असा असावा की बदललेल्या इतिहासांमुळे काही शालजोडीतले मिळाले तर ते खर्‍या नावाना न मिळता टोपण नावाना मिळावे असा उद्देश असावा.

पैसा's picture

13 Nov 2012 - 6:21 pm | पैसा

किती अभ्यास करून लिहिलंय ते शब्दाशब्दात कळतंय. फार छान!

अरे बापरे, एखाद्या विषयाचा एवढा अभ्यास केला जाउ शकतो, विशेषतः त्याबद्दल मार्क मिळणार नसले, सर्टिफिकिट मिळणार नसलं तरी. उत्तम लेख आहे, धन्यवाद.

अभ्या..'s picture

14 Nov 2012 - 5:57 pm | अभ्या..

वल्लीदादा अत्यंत अभ्यासपूर्ण असा ले़ख लिहिलायस.
खिद्रापूर च्या दुर्लक्षित मंदिरातले सुरेख अलंकरण जाणवतेय ओळीमध्ये.
त्या मंदिरात आत जाई पर्यंत पत्ता लागत नाही काय दैवी सोंदर्य आहे तिथे याचा.
तसेच झाले बघ.
खूप खूप धन्यवाद.

किसन शिंदे's picture

16 Nov 2012 - 12:32 am | किसन शिंदे

क..ड..क!!

शिलाहारकालीन राजवटीशी तुझे पुर्वजन्मीचे काहितरी संबंध नक्कीच असले पाहिजेत. ;)

हॅट्स ऑफ टू यु मित्रा!

शिलाहारांपेक्षा सातवाहन :) तिथे तर वल्लीची पूर्वजन्मीची सासुरवाडी असावी असा एक संशय व्यक्त केल्या गेला आहे ;)

स्पा's picture

16 Nov 2012 - 1:58 pm | स्पा

मस्तच , माहितीपूर्ण , अभ्यासपूर्ण , सविस्तर लेख.
वर गविंशी सहमत :)

मालोजीराव's picture

16 Nov 2012 - 5:47 pm | मालोजीराव

शिवपूर्वकाळातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे सर्वोत्तम जाणकार वल्लीभाऊ यांना यादव,सातवाहन,शिलाहारांच्या दरबारातून मानाचा मुजरा !
बॅटमॅन आणि किसनरावांशी सहमत ;)

चित्रा's picture

16 Nov 2012 - 8:06 pm | चित्रा

लेख आवडला, पण छायाचित्रेही हवी होती. अर्थात लेखाचा विषय तो नाही.

शिलाहारांवरूनच शेलार आडनाव आले आहे असे कधीतरी वाचले होते असे आठवते. शिवाजीराजांच्या आधीचा महाराष्ट्राचा इतिहास तसा माहितीचा नाही, पण त्या काळावर ह्या ताम्रपटांनी बराच प्रकाश पाडला आहे असे दिसते आहे.

तत्कालिन राजेसरदारांचे वर्णन हे अतिरंजित आहे ह्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पण सामंतांना दान दिले हे ताम्रपटांचे मुख्य कारण. पण दान आणि गावांना करमाफी का चालली होती ते विशेष कळले नाही.

वल्ली साहेब, लेख अत्युत्तम झाला आहे.
एकदम मस्त लेख व माहितीयुक्त झाला आहे.

चेतन's picture

25 Nov 2012 - 12:23 pm | चेतन

लेख उत्तम झाला आहे.

>> बोरिवलीच्या एकसर गावात असणार्‍या एका वीरगळात जमिनीवरचे हत्तींच्या साहाय्याने केलेले युद्ध आणि समुद्रावरचे नावांच्या साहाय्याने केलेले युद्ध कोरण्यात आलेले आहे.

याचा फोटो तुमच्याकडे आहे का? बघायला नक्कीच आवडेल

चेतन

प्रचेतस's picture

26 Nov 2012 - 9:47 am | प्रचेतस

धन्यवाद चेतन.
मी अजून तेथे गेलो नसल्याने माझ्याकडे नाहीत पण आंतरजालावर शोध घेतला असता पंकज समेळ यांच्या संग्रहातील हे फोटो दिसले.
https://picasaweb.google.com/115166016866777009781/EksarBorivaliVeergalH...