सवाष्ण

स्पंदना's picture
स्पंदना in दिवाळी अंक
11 Nov 2012 - 11:33 am

"पाटलीणबाई?" पाटातल्या खळखळ वाहणार्‍या पाण्याकडे एकटक पाहत असलेली हरणा जणू दचकलीच. साधी, कुणी अवचित मारलेली हाकही तिला अशी दचकवून जावी? तिने वर पाहिलं. खाड्याची जना बांधावर उभी होती. एक क्षणभर तिच्या नजरेत ओळख चमकली. पण मग पुन्हा अनोळखीपणाचं धुकं पांघरून तिने नजर फिरवली. पण तिच्या नुसत्या नजर फिरवण्याने जना अशी हटणारी नव्हती. बांध उतरून खाली येत तिने तिचा हात धरला. नेहमीच्याच सवयीने तिने तो धरलेला हात हेलकावला. तो हेलकावा बघता बघता तिला हेलावून गेला.
"आता? आता?" तिला सांभाळत जना उद्गारली. पण बघता बघता दोघींची सारख्याच आवेगाने मिठी पडली, अन हरणाचा बांध फुटला. त्या गदगदलेल्या तिला उरी धरत जनाही उसासली. काय बोलावं हे जनालाही उमगत नव्हतं.
"हरणा?" त्या हाकेसरशी त्या दोघीही भानावर आल्या. कृष्णराव बाजूला केव्हा आले, ते दोघींनाही जाणवलं नव्हतं.
"मैतरणीला भेटायला आली जणू?" काही तरी बोलायचं, म्हणून कृष्णराव बोलून गेले. पण त्यांची नजर मात्र, हरणाच्या नजरेला भिडायला जणू आतुरली होती.

डोळे पुसत हरणा बाजूला झाली. आज कित्येक दिवसांनी ती त्यांना पाहत होती. खरं तर आज कित्येक दिवसांनी ती हे सारं शिवार, हा सूर्यप्रकाश, हे बांध अन हे खळखळतं पाणी पाहत होती. त्या खळखळत्या पाण्यानं हरणाच्या आठवणी जागल्या.

लग्न हरणाला आठवतही नव्हतं. घरातल्या तशा कोणालाच स्वतःचं लग्न आठवायचं कारण नव्हतं. कारण काळ होता १८५०चा. जुन्याजाणत्या म्हणत, "दुसर्‍याचं बघायचं अन आपलंपण असंच झालं असेल असं कल्पावं. आणि काय वेगळं असतं लग्न म्हणजे? पाच दिवस रोज हळदी, साखरपुडा, सीमांतपूजन, असा एक कार्यक्रम अन जेवणावळी, दुसरं काय?"

हरणालाही हे मान्य होतं. नाही म्हणायला ती वरातीत पेंगून कृष्णरावांच्या मांडीवर झोपली होती, असं कृष्णराव वारंवार चिडवीत. हरणाला फणकारा येत असे. "असं कुणी झोपू दिलं असतं का?" असं उलट विचारे ती, अन "तुझं एव्हढंसं मुट़कुळं कुणाच्या ध्यानात नाही आलं" असं सांगून ते खदखदून हसत असत.

वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी हरणाचं लग्न झालं होतं. नर्तवड्याच्या मोहितेंची ज्येष्ठ कन्या ती. हरणाच्या लग्नात तिची आईच होती अवघी १८ वर्षांची. तो काळच होता तसा. रोगराईच्या, मोगलांच्या, फिरंग्यांच्या, लढाई अन निसर्गाच्या तडाख्यातून सापडेल तेव्हढं आयुष्य जगत माणसं तेव्हा. त्यामुळे जमेल तेव्हढं जगणं असं आसुसून जगलं जाई. हरणाचं माहेर तोलामोलाचं होतं. घर शेतीभातीचं, भरल्या गोठ्याचं होतं. सारं लहाणपण तिथेच तर गेलं तिचं. सात-आठ वर्षाची असताना एकदा ती कुठल्याशा कार्याला म्हणून इथे आली होती. माहेरी, घरात परकर-पोलक्यात वावरणारी हरणा सासरी म्हणून चांगलं नऊवारी लुगडं नेसून चार दिवस राहिली होती. लुगड्याचा तो बोंगा आवरत, बालसुलभ औत्सुक्याने आईची नजर चुकवून शेतावर आल्याचं चांगलं आठवणीत होतं हरणाच्या. शेतावर काम करणार्‍या एकीनं, तिला अगदी दंडाला धरून बाजूलाच ऊस खाणार्‍या एका मुलाला, " मालक? काय म्हणावं? पाटलीण तुम्हाला शोधत आली जणू?" असं हाकारलं होतं. तेव्हाच तर पाहिलं होतं तिने बारा-तेरा वर्षाच्या कृष्णरावांना. दंड कसाबसा सोडवून घेत हरणाने धूम ठोकायचा प्रयत्न केला अन त्या लुगड्याच्या बोंग्यानं दगा दिला होता. मग वळून सरळ पाटाच्या पाण्यात बसकण मारली होती तिने. हरणाचं रडं थांबवून अन ते लुगडं सरळ बांधून देऊन तिला घरी पोहोचवेपर्यंत सारं काम मग त्या दंड धरणार्‍या बाईला करावं लागलं. ते पाटाच्या पाण्यात बसकण मारून रडणं आजतागायत विसरू देत नव्हते कृष्णराव तिला. जरा कुठे पाटाच्या पाण्याजवळ हरणा गेली की "अगं! अगं! आता कुणाला आणायचं लुगडं नेसवायला फिरून?" असं चिडवत ते तिला.

भलते मिश्कील होते कृष्णराव! अन का असू नयेत? शेंडेफळ होतं ते थोरल्या पाटलांचं. त्यांच्याहून वयानं खूप मोठे दोन भाऊ होते. सगळ्यात मोठा भाऊ, त्यांना 'पोलीसबाबा' म्हणत; गावचा पोलीस पाटील होता. दोन नंबरचा, त्यांना 'थोरले आबाजी' म्हणत. सारी शेती सांभाळत होता. वडील वारले अन हे छोटंसं पोर दोन्ही भावांच्या तळहातावरचा फोड झाला जणू. एकाच्या मांडीवर बसावं अन दुसर्‍याच्या ताटातलं खावं, इतकं लाडकं! त्याला घेतल्याशिवाय दोघेही भाऊ कधी जेवले नाहीत. पैरणीच्या कपड्यात कधी यांची इटुकली पैरण चुकली नाही. जावईपण खायला जेव्हा हे दोघे स्वतःच्या सासरी जात, तेव्हा सोबतीला हे 'धाकले दीर' अगदी गरजेचे असत.
उगा नावाचे पाटील नव्हते ते. चांगलं जाधवांचं घराणं होतं. मागच्या अठरा पिढ्या तलवार गाजवणार्‍या होत्या. त्यांच्याच तर पुण्याईनं चांगला चौसोपी वाडा होता. इनाम जमिनी होत्या. मोगलांच्या जागी फिरंगी आले, अन कसं कुणास ठाऊक, पण तलवारीचं बळ गंजायला लागलं. जणू हा नवीन गनीम साध्या मराठमोळ्या मनाला उमगलाच नाही. उगा जमिनी कसाव्या अन गुपचूप राहावं, एव्हढच हाती उरलं. तोवर लढाईचे अन प्रतिकाराचे साचेही बदलले होते. गावात मोगलांच्या आक्रमणानं नावालासुद्धा एक देऊळ नव्हतं. नाही म्हणायला वेशीजवळ एक तुळशी वृंदावन होतं. अन त्याला रोज पाणी घालणं हा पोलीसबाबांचा परिपाठ होता.

हरणाची सोयरीकही पोलीस बाबांच्या मर्जीनंच झालेली. पुढे आणखी पाच वर्षांनी जेव्हा हरणा मोठी झाली अन् तिची आता खरोखरी नांदण्यासाठी सासरी रवानगी झाली, तेव्हा गदगदलेल्या तिच्या आजीनं तिला सरळ पोलीसबाबांच्या ओटीत घातलं. "तुमची भावजय नव्हे, तर तुमची पोटची पोर समजा" म्हणून कळवळून सांगितलं.

हरणा सासरी आली. ते एव्हढं मोठं घर, तिथे आधीच मोठ्या जावा होत्या. त्यांची मुलं होती. वाड्यातच वाटण्या होऊन बाजूला भाऊबंदाचं आणखी एक घर होतं. दोन्ही घरात मिळून जवळजवळ पंचवीसभर माणसं होती. तिच्या वयाच्या आणखी दोघीतिघी सासुरवाशिणी होत्या. नात्यानं त्या तिच्या सुना लागत होत्या. तिला नावानं न बोलावता ‘धाकल्या आत्यासाब’ असं बोलवायचं, असा घरातल्या मोठ्या स्त्रियांचा आग्रह होता.
ओटीभरणासाठी तिच्याबरोबर एक आत्या आलेली. त्या आत्याचा हात धरून हरणा त्या स्वतःच्या वाड्यात अगदी गप्प बसून होती. अन् तेव्हाच तिला तिच्या जिवाचा साथीदार भेटला.
ओटीभरणाच्या आधी तिच्या आत्याने तिला दटावल्या सुरात काही सांगायचा प्रयत्न केला होता. तसं तिच्या आईनेही 'बायकांचं आयुष्य' या विषयाला धरून बरंच काही समजावलं होतं. पण या सार्‍या प्रकाराने हरणा हबकून गेली होती.

तशी भाग्यवानच म्हणायची हरणा. इतक्या चांगल्या घरातून आलेली, इतक्या चांगल्या घरात पडलेली ् तिच्या वयाचा अनुरूप जोडीदार मिळालेली.

तर अशी घाबरून, जीव मुठीत धरून कृष्णरावांच्या खोलीत प्रवेशलेली हरणा जेव्हा पहिल्यांदा कृष्णरावांनी पहिली, तेव्हा त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना.

हातात लुगड्याचा बोंगा धरून, पाटात बसून रडणार्‍या हरणाच्या जागी अंगभर दागिने ल्यायलेली, कपाळी ठसठशीत कुंकू चमकणारी एक उंच मुलगी उभी होती. तेराचौदाच्या हरणाकडून सतराअठराच्या कृष्णरावांच्या काहीही अपेक्षा नव्हत्या. आजवर इतक्या लाडात वाढल्याने अन् सदानकदा खेळात रमलेल्या त्यांचा स्वतःचा पोरपणा अजून पुरता हटायचा होता. समोर असलेल्या आपल्या पत्नीकडून द्यायघ्यायचा व्यवहार अजून पुरता उमगायचा होता. अन् इथेच त्या दोघांतला अनुबंध जुळला की काय कुणास ठाऊक. तिच्या पायातल्या त्या एव्हढाल्या जड पैंजणांकडे, त्याच्यावर असलेल्या तोरड्या, पायाच्या बोटातल्या मासोळ्या, घणघणीत जोडवी हे सारं पाहून त्यांना हसू फुटलं. डोक्यावरचा पदर घट्ट मुठीत धरून उभ्या असलेल्या हरणालाही मग अगदी हलकं हलकं होऊन गेलं. आता त्या पदराची तमा न बाळगता मग तीही अगदी हलकेच हसली. एकूण दमदाटीनं सांगितलेलं सारं खोटं ठरलं होतं. तिच्या पाटात पडण्याची आठवण काढून दोघेही पहिल्यांदाच एकत्र हसले. वरातीत ती त्यांच्याच मांडीवर झोपल्याची आठवण ऐकून तिला पहिल्यांदाच फणकारा आला. अन् ही आठवण सांगितल्यावर ती फणकारते, याची खूणगाठही कृष्णरावांनी पहिल्यांदाच बांधली. दुसर्‍या दिवशी ओटीभरणानंतरच्या एकत्र आंघोळीत जेव्हा बाकीच्या बायका त्यांना चिडवीत होत्या, त्यांच्या पाठीला रिठा शिकेकाईनं घास म्हणून तिला सांगत होत्या, तेव्हा खरंच तिला अजून कोणतीच जाणीव नव्हती झालेली. असेच आठ दिवस सरले अन् मग तिची आत्या तिला घेऊन परत माहेरी आली. बरोबर कृष्णरावांची आठवण घेऊन आलेल्या हरणाला मग कधी आठ दिवस सासर अन् महिनाभर माहेर असे सणवार धरून फेरे सुरू झाले. असंच वर्ष-दीड वर्ष सरलं अन् एका पंचमीला गाडी घेऊन स्वतः कृष्णराव तिला न्यायला आले. जावई एकटा आलेला पाहून, सासर्‍यांनी मग तिलाही एकटीलाच गाडीतून पाठवली. विशीच्या जवळपासच्या कृष्णरावांना आता मिसरूड फुटलं होतं. उंचीनं ते तसे फारसे नव्हते, पण खांदे भलते भरदार दिसत होते. डोईला फेटा अन् समोर ओढलेला त्याचा जरीकिनारी शेमला. पंधरा सरलेल्या हरणाचा नकळत ठोका चुकला. छातीत धडधड सुरू झाली. त्या छपरी गाडीत माग वळून, "जरा पुढं सरकून बसा. बैलांच्या गळ्याला फास लागतोय." म्हणून खोडकर हसणार्‍या कृष्णरावांकडे एखादं चुंबक ओढावं तशी ओढ जाणवू लागली तिला. सारी वाट सरेपर्यंत तिच्या जिवात जीव नव्ह्ता, अन् ते असं भलतं संकोचलेलं रूप पाहून कृष्णरावांना एक शब्द सुचत नव्हता तिला हाकारण्याचा. गाव जवळ आल्यावर मात्र कृष्णराव वळले अन् "आता बास झालं माहेर, नीट गाव धरून र्हावा आता." एव्हढंच बोलले. त्यांचा आवाज ऐकूनच मोहरलेल्या तिलाही मान हलवण्याखेरीज आणखी काऽही सुचलं नाही.
आता ती काही नवी नव्हती या घराला. दारात मुटका उतरून आत आल्यावर आता ते घर तिला पहिल्यांदाच दिसू लागलं जणू. पुढच्या देवडीला एक मोठी लाकडी चौकट होती. आत आल्यावर उजव्या बाजूला मोठी ऐसपैस पडवी अन् त्यावर माचा, गुडगुडी असा थाट होता. मध्ये प्रशस्त चौंगाण होत. मग सोपा. तिथे गणपतीची देवळी. देवघराचं उंचीला छोटं दार, सोप्यातून आत जायच्या दाराला नक्षीदार खिळे होते, कोरीव चौकटीला वर घोड्यांचे दोन अर्धपुतळे शोभत होते. सोप्याला छप्पर तोलायला असेच लाकडी खांब होते. घरात श्रावणाची गडबड सुरू होती. खरं तर पाऊसपाण्यात बैल जोडायला सार्‍यांचाच विरोध होता पण कृष्णराव कुणाचंही न ऐकता तिला आणायला गाडी घेऊन आले होते. तिच्या मोठ्या जावा तिला पुन्हा पुन्हा हे ऐकवीत राहिल्या. सणाला म्हणून पोलीस बाबांच्या दोन मुली माहेरी आलेल्या, हरणाच्याच वयाच्या. सारे त्यांच्या माहेरपणात अन् जावयाच्या उसाभरीत दंग होते. ओटीभरण होऊन जवळजवळ दीड वर्ष सरल्याने हरणाला अन् कृष्णरावांना एकांत मिळणं दुरापास्त होतं. सारी रात्र हरणानं जागून काढली.
सकाळी जातं पडल्याचा आवाज आल्याबरोबर उठून ती कामाला लागली. आता इथे राहायचं तर घरच्या इतर ज्येष्ठ स्त्रियांच्या हाताखाली काम करावं लागणार होतंच. रोज पायलीभराच्या भाकरी हे तर अगदी साधं सोपं गणित होतं. अन् त्या पायलीभराच्या भाकरी, पीठ जात्यावर दळून दिवस उजाडायला तयार असतं. पोतेरा केल्याशिवाय चुलीला विस्तव नसत घालत तेव्हा. चुलीवर आधण चढायच्या आधी, अंगणात सडा सारवण होत असे. त्यावर गोपद्म उमटत असत. गोठ्यात धारा निघत असत अन् ते गरमगरम धारोष्ण दूध पिऊन घरचे पुरुष वावराकडे निघत. दिस उगवला म्हणजे शिवारात कामाचा पहिला फेरा सुरू होत असे. दुपार चढायला लागली की कामं थांबत. कामावरची माणसं मग घरची, त्या दिवसाची धुणंभांडी अशी दिनचर्येची कामं उरकत असत. काही निवडणं, टिपणं, दुसर्‍या दिवशीची जोडणी याच वेळात व्हायची. उन्हं साधारण कलली की मग पुन्हा शिवारात कामाचा दट्ट्या सुरू, तो अगदी कडुसं पडेपर्यंत! तिथनं पुढं मग पुन्हा गावाघरात माणसांचा वावर जाणवे. दिवेलागणीला जेवणखाणं उरकून गावात भजनाचा, लेझमीचा आवाज घुमू लागे. पारावर, कट्टीवर बसून गप्पा रंगत. अन् गाव हळूहळू शांत होत असे.

तिच्या या घरात बराच गोंधळ होता. पोलीसबाबांना नुसत्या मुलीच झाल्याने त्यांनी दुसरं अन् मग तिसरं अशी लग्न केली होती. त्या दोघींनाही नुकतीच पुन्हा फिरून कन्यारत्ने झालेली. मधल्या ‘थोरल्या आबाजींची’ प्रथम पत्नी वारली होती. तिची तीन मुलं होती. त्यांचंही पुन्हा लग्न झालेलं. या बायकोची दोन मुलं. आता प्रथमच तिला जाणवला तो त्या सार्‍यांच्यातला एकमेकीतला दुस्वास! पोलीसबाबांच्या तिन्ही बायका एकमेकीवर कुरघोडी करण्यात दंग! पहिल्या बायकोची मुलं सांभाळावी लागतात म्हणून मधल्या बाई वैतागलेल्या. या सार्‍यात तिची अवस्था काय होणार होती, देव जाणे. पण एक होतं. सार्‍या जणी कामाला मात्र मागे हटणार्‍यांपैकी नव्हत्या. सकाळच्या न्याहारीचं बांधून तयार झालं अन् न्याहारी शेतावर घेऊन जायची जबाबदारी हरणावर येऊन पडली. शेतावरच्या एका माणसाच्या डोक्यावर ही भली मोठी बुट्टी देऊन, कडेवर पाण्याची घागर घेऊन हरणा शेतावर गेली. कोण कुठे काम करतंय, याची सोबतच्या माणसाला बरोबर माहिती होती. तिच्या हातावर चार भाकरी अन् त्यावर भाजी, दही घालत त्यानं तिला विहिरीकडे पिटाळलं. "धाकले मालक तिकडे मोटेवर आहेत." त्यानं माहिती पुरवली. त्या भाकरींवर पदर झाकत ती विहिरीकडे वळली. सारावर बैल नुकतेच सोडले होते. मोट बाजूला ओढून ठेवली होती. विहिरीतून पाण्याचा आवाज येत होता. ती तशीच आत डोकावली. कृष्णराव आत एका दगडावर उभे होते. तिची चाहूल लागताच त्यांनी वर पाहिलं. नजर बारीक करत ते म्हणाले, "आता? एकदम कामालाच लागल्या तुम्ही? आम्ही काय नुसते मुराळी का काय? आल्याबरोबर घरात कुठं गडपच झाल्या तुम्ही ते?"
तीही काही कमी नव्हती, "व्हय व्हय! त्या घरात काय पत्ता लागतोय कोण कुठं आहे ते? अन् आता लेकी जावयांचं बघाल की स्वतःचंच घोडं दामटाल म्हणते मी?"
"ऑ? आवाज हाय म्हणायचा घशात! न्हाय. काल वाटलं, सासर्‍यातनं मुकी पोर बांधली का काय गळ्यात म्हणून म्हंटलं."
"मुकी का म्हणून बांधतील? अशा फसवणार्‍यांच्यातले वाटले का काय मोहिते तुम्हाला?"
"काय अनुभव नाही आला अजून मोहितेंचा आम्हाला. कडू लागतेत का ग्वाड तेबी चाखायला न्हाय गावलं अजून."
आता मात्र ती लाजून लाल झाली. तिचा तजेलदार सावळा चेहरा त्या लालिम्याने अधिकच चमकू लागला, "या आता वर, न्याहारी आणलीय. भुका लागल्या असतील."
"भुका लागल्या म्हणून तर नर्तवड्यापर्यंत बैल ताबडली घरातल्यांच्या शिव्या ऐकत. खरं काय घास लाभला नाही भुकेला." कृष्णराव मुद्दा सोडायला तयार नव्हते.

लाजेनं खाली वळलेली नजर नेमकी त्यांच्यावरच पडत असल्याने ती हैराण झाली. विहिरीपासून दूर सरत ती सारावर टेकली. विहिरीतून वर येत कृष्णरावही तिच्या जवळ बसले. तिने भाकरी त्यांना देण्यासाठी पुढे केलेला हात त्यांनी तसाच भाकरीसकट पकडला अन् ते त्यावरच भाकरी मोडून खाऊ लागले. त्या पहिल्यावहिल्या स्पर्शाने ती अंतर्बाह्य थरारून उठली. त्या धडपडीत हातावरची भाकरी खाली पडली. तिच्याकडे रोखून पाहात कृष्णराव बोलले, "एकूण, तुम्ही उपाशी ठेवायचं ठरवूनच आल्या जणू आम्हाला?"
"नाही हो? असं काय बोलताय?" तिने खाली पडलेल्या भाकरी उचलून हातात घेतल्या.
"मी आणते जाऊन पुन्हा." ती अजीजीने बोलली.
"नको."
त्यांना राग आला की काय हे पाहण्यासाठी तिने विषय बदलला.
"कसला बाई गाव म्हणायचा हां? वरून इतका पाऊस पडतोय तरी मोट कशाला जुंपायची म्हणते मी!"
"खूळ लागलंय आम्हाला. वारं लागलंय नर्तवड्याचं." मग बैलांकडे वळत ते म्हणाले, "चला रे गड्यांनो, आपली इथं काय किंमत नाही. येव्हढं माझ्यासाठी काल तुम्हाला चिखल पावसात ताबडवलं, म्हणून जरा धुवून काढावं म्हंटलं तर इथे गावाची अक्कल निघाली."

तिला खुदकन हसू फुटलं. मग तीही हातातल्या भाकरी बैलांकडे घेऊन जात म्हणाली, "असं कसं होईल? हे घ्या, माझ्या हातान मी चारवते तुम्हाला. तशी, तुम्हाला चारवताना कुणी पाहील याची भीती नाही मला. हक्काचं असलं तरी कधी कुठं काय वागावं कळत मला."

वर पावसाची लक्षण पुन्हा दिसू लागली. श्रावणातली झिरमिर तिच्या चेहर्‍यावर शिंतोडली. तिच्याकडे पाहत त्यांनी विचारलं, "छप्पर बांधलंय शेतात. तिथे नाही ना कुणी पाहायचं? चालेल का तिथं यायला?" त्या शब्दात, त्या नजरेत जे आर्जव होतं, त्यानं ती पुरी भारावली. उठून कधी त्यांच्या मागोमाग तिथे गेली तिला कळलंही नाही. छप्पर कसलं ते, सरळ सरळ दोन खोल्यांचं छोटंस घरच होतं ते. वेळ पडली तर गड्यांना राहायला अन् कधीमधी शेतावर जेवण बनवायला म्हणून व्यवस्था होती ती. आत छोटीशी चूल होती. एक बाज होती उठाबसायला. त्या इवल्याशा घरात, छपरावर पावसाच्या अक्षता तडतडत असताना ती पहिल्यांदा त्यांच्या आधीन झाली. सवाष्णीचं लेणं त्यांच्या ओठांनी तिच्या अंगांगावर रेखलं ते इथंच. धपापत्या श्वासांनी जेव्हा ती उठून बसली तेव्हा ते बाहेर निघून गेले होते. बाहेर पुन्हा हालचाल जाणवली म्हणून तिने दाराकडे पाहिलं, तर दारात तिच्याच वयाची एक तरुणी उभी होती. आत येत मिश्कील हसत तिने विचारलं "आँ? पाटलीणबाई, काय सपान बिपान बघितलं का काय? न्हाय, येव्हढ्या धपापताय ते?" काय उत्तर द्यावं ते न समजून हरणा शरमून गेली. अन् मग तिच्या पाठीत अगदी मोकळेपणानं धपाटा घालत तिने आपली ओळख दिली. "मी खाड्याची जना. माझं मालक तुमच्या शिवारावर असत्यात. मी बी येते इथं कामाला." मग तिला आवरासावरायला मदत करून जनानेच तिचे केस सारखे करून दिले. वर पदर घेऊन सारं अंग कसं लपेटून घ्यायचं, हेही तिनेच तिला शिकवलं. अवखळ पायानं शेतावर गेलेली हरणा, एक स्त्री होऊन परतली होती.
मग हा परिपाठच झाला. घरातलं सारं आवरून न्याहारी नाहीतर संध्याकाळचं का असेना, पण ती शेतावर जाऊ लागली. एव्हाना त्यांची स्वतःची अशी एक खोली त्यांच्यासाठी मिळाली होती, पण हरणा रमली ती शेतावरच. त्या कौलारू घरात भर दुपारी कवडसे सांडायचे उन्हाचे, अन् त्या कवडश्यातच तिच्या शरीरावर चांदणं उमटायचं. ‘धाकल मालक’ शेतघराकडे झळकले की हिम्मत नव्हती कुणाची तिकडे फिरकण्याची! पण तो अधिकार घेतला होता जनानं. तीच एक होती, जी नेमकी कृष्णरावांची पाठ फिरली की हरणाला चिडवायला तिथे उगवायची. दोघी एका वयाच्या सासुरवाशिणी, बघता बघता जिवाभावाच्या मैतरणी होऊन गेल्या. पण आता जवळजवळ दोन वर्ष सरली, तरी हरणा तशीच सडी राहिली होती. सुरुवातीला सारे चेष्टा करीत.. मग हळूहळू सुरू झाला प्रश्नांचा भडीमार. तिच्या बरोबरच्या सार्‍या जणी कधीच्या डोहाळे लागून माहेरी गेलेल्या, पण हरणाचं काही लक्षण दिसेना. कुणी म्हणालं, होईल वर्षा-दोन वर्षानं. कुणी सांगितलं, हे खाऊ नका, ते खावा. कुठल्या देवाचं काही करायचं राहिलं का, ते कुणी विचारलं. कुणी भुताखेताचा हवाला सांगितला. घरात तर वेगळीच कहाणी सुरू झाली. वर्षाला कुणा ना कुणाचा पाळणा हलणार्‍या त्या घरात आता तिचा पाळणा केव्हा हलणार? हे ठासून विचारलं जाऊ लागल. त्यातच थोरले आबाजी, जे सारं शेत पाहायचे, त्यांना त्याच्या मोठ्या मुलाचं लग्न करायचं होतं. अन् मग सुना घरात येण्याआधी त्यांनी स्वतःचं शेत वाटणी करून मागितलं. घरा-शेताच्या तीन वाटण्या करून घेतल्या गेल्या. अन् मधल्या जाऊबाई स्वतःची चूल वेगळी मांडून मोकळ्या झाल्या. आता उरल्या पोलीसबाबांच्या तीन बायका अन् ही. एव्हाना बरीच वर्ष सरली. हरणा जवळजवळ पंचविशीची झाली. अगदी तिच्या बरोबरची जनासुद्धा, छोटा राऊ बरोबर घेऊन शेतावर येऊ लागली. आता मात्र हरणाचा विश्वास ढळला. त्या शेतघरात ती अगदी फुटून फूटून रडली. मातृत्वासाठी आसुसलेलं तिचं मन ती आणि कुणासमोर उघड करणार? मला कोण? हा स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न तिला छळू लागला. कृष्णरावांवर असलेलं तिचं निरातिशय प्रेम, जे तिचा आधार होतं, तेच ढासळतं की काय, असं होऊन गेलं.
"होईल आपल्यालाही." त्यांनी तिला समजावायचा प्रयत्न केला. पण तो काळच असा होता की बाईचं एकच काय, पण अर्धंमुर्धं उणेपणही समाजाला खपत नसे. वांझपणा म्हणजे तर पुरुषांना दुसरं लग्न करण्याची सुवर्णसंधीच! तसाही, पुरुषांनी किती लग्न करावीत याला कुठलाच बंध नव्हता. गावातच चारपाच सवती, रोज सकाळसंध्याकाळ एकमेकींना पाण्यात पाहत दिवस कंठीत होत्या. घरात पोलीसबाबांच्या तर तीन पत्नी होत्या. मग हरणा काय चीज होती? पण कृष्णराव मात्र खंबीर होते. त्यांनी तिला वचन दिलं, मी दुसरं लग्न करणार नाही. त्या एका वचनावर ती जीवन कंठू लागली. जना तिला धीर द्यायची. जनाची स्वतःची मुलं होऊनसुद्धा कधी जगली नाहीत. एव्हढ्या दहा वर्षात एकटा राऊच काय तो जगला होता. पण हरणाचं दु:ख वेगळं होतं. तिला एकदाही असली चाहूल नव्हती लागली. आतल्या आत खंतावणार्‍या हरणाला एक कृष्णराव सोडले तर कुठेच एका शब्दाचाही आसरा नव्हता उरला.

तिच्या स्वतःच्या माहेरी तिच्या आईलाच दर दोन वर्षाआड पाळणा हलायचं भाग्य लाभत होतं. थोडी जगत होती थोडी मरत होती, सारा देवाचा खेळ! पण जगणं कुणाचं थांबलं नव्हतं. थांबलं होतं ते फक्त हरणा अन् कृष्णरावांचं आयुष्य !
त्यातच मग सुरू झाले घरच्या तिन्ही मोठ्या जावांचे टोमणे. आधिच स्वतःला मुलगा होत नाही म्हणून नशिबावर रागावलेल्या त्यांना हरणाचं वांझपण एक कारणंच झालं नेहमी टाकून बोलायला. एखादं काम होत नाही...मग काय पोर होतं का? काही खावंस वाटलं काय डोहाळे लागले का? माहेरी जायचंय ..जा ना कायमचीच. त्यात त्यांना दिसत अन् जाचत होत, ते कृष्णरावांचं तिच्यावरचं प्रेम. त्यांच्या "हरणाऽ ऽ " या हाकेमध्ये जाणवणारा त्यांचा स्नेह! अंगापिंडानं हरणा सडपातळ होती. या तिघीजणींच्या नशिबी जो सवतीमत्सर होता, तो हरणाच्या नशिबी कसा काय नाही याचा विस्मय त्यांना वाटत होता. आपल्याला फक्त मुलगा नाही म्हणून पोलीसपाटलांनी पुन्हा लग्न केलं, पण हरणाला एकदाही दिवस न जाता आपला दीर असा कसा "हरणा" "हरणा" करतो, याचा प्रश्न त्यांना सुटता सुटत नव्हता.

आपल्या नशिबी मुलगा नाही, याची पोलिसबाबांना एव्हाना खात्री झाली होती. वेगळं राहिल्यापासून थोरले आबाजीही तुला मुलगा नाही अन् कृष्णाला पोरबाळ नाही म्हणून आताच सारी जमीन माझ्या मुलांच्या नावावर कर म्हणून मागे लागलेले. या गोष्टीचा पोलीसबाबांना राग आलेला. त्यांनी कृष्णरावांसाठी नवीन स्थळं पाहायला सुरुवात केली. अडचण एकच होती. स्थळ बघायला येणार वा जायचं म्हटलं की कृष्णराव गायब व्हायचे. परतून आले की, गप खाली मान घालून शिव्याशाप ऐकायचे अन् शेतावर निघून जायचे. बिचारी हरणा त्यांच्या या ओढाताणीत दिवसदिवस उपाशी राहायची. ज्या दिवशी ते परतून येतील, त्या दिवशी शेतावर भाकर बांधून घेऊन जायची अन् दिवस दिवस त्यांच्या कुशीत टिपं गाळत राहायची. "ऐका हो ऐका! पैशाला पासरी बायका" अशा म्हणीच्या काळात हे जोडपं एकमेकाच्या निष्ठेवर दिवस कंठत होतं. शेवटी पोलीसबाबांनीही स्थळ बघायचा अन् बोलवायचा नाद सोडून दिला.

हरणा पंचेचाळिशीला आलेली. कृष्णराव पन्नाशीचे. अन् अशातच पोलीसबाबांच्या नातवाचं लग्न निघालं. बघावं तेव्हा त्यांच्या चारपाच लेकी माहेरी असत. माझ्या बापाचं बक्कळ राज्य आहे, मी खाणार! असा त्यांचा खाक्या होता. लग्नाची धावपळ सुरू होती. जवळच्या नातेवाइकात हरणाचे माहेरचेही होते. तिच्या आईला पाचच वर्षांपूर्वी शेवटची एक मुलगी झालेली. अडगुलं मडगुलं अशी ती बायजा हरणाला स्वतःच्या लेकीसारखीच वाटली. लाडाची मेहुणी म्हणून कृष्णरावही तिला हसत हसत खांद्यावर घेऊन शेतावर फिरून आलेले. स्वयंपाकघरात हरणा काहीतरी करण्यात गुंतलेली, सारं घरं पाहुण्यारावण्यांनी भरून गेलेलं. दारात मांडवामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला अन् अशातच एकदम तिला धरून अंधारखोलीत ढकललं गेलं. या खोलीत खरं तर हरणाला कधीच प्रवेश नव्हता. ही खोली बाळंतिणीची होती. "असं का?" "कोण आहे?" या प्रश्नांना उत्तर म्हणून खोलीला बाहेरून कडी घातली गेली. हरणाच्या हाका बाहेरच्या गलबल्यात कुणाच्या कानावर गेल्या, नाही गेल्या कुणास ठाऊक, पण बाहेरच्या गलबल्यातलंही काही तिच्या कानावर नसावं गेलं. तासाभरानं जेव्हा कडी निघाली अन् हरणा बाहेर आली, तेव्हा घरात नवीन लग्नाची द्वाही फिरत होती. हळदीच्या मांडवात मांडलेल्या कळसात कृष्णरावांना जबरीनं बसवून त्यांना हळद लावली होती. बाजूच्या पाटावर, रडून आकांत करणारी, परकर पोलकं ल्यायलेली पाच वर्षाची बायजा होती. तिच्या आईला काही कळायच्या आत, मांडवाच्या खांबाला धरून गरगर फिरण्याचा खेळ करण्यात गुंगलेली ती पोर हिसकावून घेऊन तिला हळद फासली गेली. स्वतःच्या ज्येष्ठ लेकीसाठी जीव टाकणार्‍या त्या पन्नास वर्षाच्या जावयाच्या बाजूला बसलेली आपली पाच वर्षाची लेक बघून तिची आई दातखीळ बसून बेशुद्ध पडलेली. बाप "असं का? सरळ मागायची होती..." असा अर्थहीन प्रश्न विचारत होता. अन् हरणा? कृष्णरावांनी आपल्याला फसवलं अन् आपल्या बहिणीचं आयुष्य नासवलं, एव्हढा एकच विचार तिच्या मनात घुमला. तशीच वळून नदीच्या वाटेला पळणार्‍या तिला पकडून पोलीसबाबांसमोर आणलं गेलं. बाजूला धायधाय रडणारे कृष्णराव बसले होते. उसळ्या मारून स्वतःला सोडवू पाहणारी हरणा पोलीसबाबांच्या एका जरबी नजरेत गप्प झाली. "काय पोरखेळ लावलाय?" पोलीसबाबा गरजले. "अन् तू कृष्णा? काय बायकांसारखं रडतोस? मी जमेल तेव्हढा प्रयत्न केला तुझं आयुष्य सरळी लावायचा. पोटच्या पोरासारखा सांभाळला मी तुला जन्मभर. कधी आईआबा आठवले का रे तुला? सरळ स्थळ बघून वेळच्या वेळी टाका घालत होतो. हिला काय सोड म्हणत होतो? तेव्हा दोघांनीही ऐकलं असतं, तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. हे बघ, ही सारी इस्टेट तुला सांभाळायची आहे. विचार कर. माझ्या लेकी काय? आता त्यांच्या सुना आल्या. जातील त्यांच्या घरी नांदायला. मधल्यानं कधीच वाटून घेतलंय आपापलं. त्याच्या हपापल्या भावनेला मला पायबंद घालायचा आहे. मला तुझा मुलगा हवाय हे सारं चालवायला. अगदी माझ्या वाटणीचंही!" हळदी झाल्याच्या दुसर्‍या दिवशी, बायजाचा कृष्णरावांबरोबर विवाह झाला. हरणानं त्यानंतर जे अंथरुण धरलं, ते दोनतीन महिने ती उठलीच नाही. रोज शेतावर तिची वाट पाहून कृष्णराव थकून गेले. त्यातच हरणाची आई हरणाला भेटायला येऊन गेली. लेकीच्या उशाला बसून आसवं ढाळत तिने हरणाकडून बायजाच्या सुखाचं वचन घेतलं अन् म्हणूनच आज हरणा शेतावर आली होती. पाटाच्या पाण्याच्या गतीने सारं आयुष्य तिच्या नजरेसमोरून झरझर फिरलं.

कृष्णरावांनी हलकेच पुढे होऊन तिचा हात धरला. आज त्या स्पर्शाने दोघांनाही कोणताच धुमारा फुटला नाही. पण त्यांच्याबरोबर हरणा शेतघरात गेली. डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या होत्या दोघांच्याही. एकमेकाचे अश्रू पुसत ते दोन जीव थरथरत एकमेकांच्या कुशीत विसावले. आपल्यालासुद्धा कसा काही थांगपत्ता नव्हता, ते तिला सांगायचा परोपरीनं प्रयत्न करत होते. पण हरणाला आता त्यात स्वारस्य नव्हतं. "काय ठेवलंय आता त्या आठवणीत?" तिने त्यांना थांबवत विचारलं.
” मला एकाच गोष्टीचं वचन हवं धनी तुमच्याकडून."
"काय देऊ तुला? माग, काय पाहिजे ते माग." कृष्णराव आवेगाने म्हणाले.
"बायजाला तुम्ही सुख द्याल! एक बाई म्हणून आता तिच्या कपाळी जे कुंकू आहे, त्याला न्याय द्याल."
कृष्णराव सुन्न होऊन बसून राहिले.
"द्या मला. एव्हढं एक वचन द्या! माझ्या माघारी असो वा मी असताना, पण मला हे एव्हढं वचन द्या."
गडबडीनं तिच्या तोंडावर हात ठेवत कृष्णराव म्हणाले, "असं बोलू नको. मी स्विकारून न स्विकारून आता काय फरक पडतो हरणा? त्या अश्राप पोरीचं लगीन लागलंय माझ्याशी.”
"नाही, मी जाणते तुम्हाला. आजवर दुज्या कुणा नारीचा स्पर्श नाही तुम्हाला. आता मात्र त्याचा हक्क असणार आहे बायजाला."
“ तिचं मायेनं करायला तू असणारच ना हरणा?"
"धनी माझ हृदय फुटलंय. मी नाही टिकायची फार दिवस." हरणा जणू निर्णयाचं बोलून गेली.

आणि मग हृदय फुटलेली ही हरणा दोन वर्षातच अखेरच्या घटका मोजू लागली. एव्हाना पुरे पिकलेले कृष्णराव रात्रंदिवस तिच्या उशाला बसून राहिले. "बायजाला सुख द्या, बायजाला सुख द्या" असा एकच धोषा लावत हरणान शेवटचा श्वास घेतला. तिला दिलेलं वचन पाळण्यासाठी म्हणून की काय, कृष्णराव श्वास घेत राहिले. दिवस दिवस शेतघराच्या बाजल्यावर बसून राहू लागले. जना रोज तिच्या घरून भाकरी आणून त्यांना आणाशपथा घालत घासभर खायला घालत राहिली.

वर्षं कशी सरली देव जाणे! पण एक दिवस नर्तवड्याहुन सांगावा आला. बायजाला ओटीभरणासाठी घेऊन येत असल्याचा. अजूनही अंगान बोदगी, रंगान केतकी असणारी बायजा मग, कुणा नातेवाइकाचा हात धरून सासरी आली. तिच्याही नजरेत वाड्याच्या भिंती उमटल्या. पण ते कौतुक ऐकायला आता कृष्णरावांना रस नव्हता. पदर मुठीत धरून सामोरी आलेली ती बारा वर्षांची कन्या कृष्णरावांनी स्वीकारली. पुन्हा आंघोळीचे सोहळे झाले. पण आता त्यात कुणालाच स्वारस्य नव्हतं उरलं. बहिणीची आठवणही नसणार्‍या बायजाला काही कळणं शक्यच नव्हतं. आठवडाभर कृष्णराव देतील ते घेऊन बायजा माहेरी गेली अन् महिनाभरातच माणूस तिच्या डोहाळ्यांचा सांगावा घेऊन आला. पोलीसबाबांच्या चेहर्‍यावर समाधान मावेनासं झाल. पण कृष्णरावांनी नि:श्वास टाकला. बायजा सहा महिन्यांची गरोदर असताना जणू, "मी तुला दिलेल वचन पूर्ण केल", हे सांगायला कृष्णरावही हरणाकडे निघून गेले.

माघारी उरले ते पोलीसबाबा. दोन जीव दुखावून आपण नक्की काय साधलं? असा प्रश्न त्यांना नक्कीच पडला असावा. रोज सकाळ संध्याकाळ वेशीवरच्या वृंदावनाला पाणी घालणं, हा एक परिपाठ सोडला तर तेही फारसे घराबाहेर पडेनासे झाले. अन् तीनच महिन्यात नर्तवड्याहून सांगावा घेऊन माणूस आला. बायजाला मुलगा झाला. वर्ष होतं १९०१. महिना ऑगस्ट. तीन माणसांच्या आयुष्याचं खत होऊन एक कोंब फुटला घराण्याला शेवटी! कृष्णरावांचं नाव उरलं, पोलीसबाबांच्या श्राद्धाची व्यवस्था लागली. बायजाही नाही म्हटलं तरी शेवटी या सार्‍याची मालकीण झालीच. फार कर्तबगार निघाली बायजा! सारा गाव तिला ‘धाकल्या बाईं’चा मान द्यायचं. शेवटी एका पुत्राची माता होती ती! नामनिशाण उरलं नाही ते हरणाचं. परंतु तिचं नावही न घेता आजही उरली आहे पितृपक्षातल्या पानावर एक सवाष्ण !

footer

प्रतिक्रिया

जबरदस्त लेखन, खुप खुप भावलं, धन्यवाद.

दिवाळीत पणतीवर फुलबाजी पेटवताना फुलबाजी पेटते पण कधी कधी खालची पण्तीची वात शांत होते त्याची आठवण झाली.

सस्नेह's picture

12 Nov 2012 - 2:19 pm | सस्नेह

मनाचा ठाव घेऊन गेलं !

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Nov 2012 - 2:44 pm | निनाद मुक्काम प...

दिवाळी अंक हातात आल्यापासून सर्व लेख वाचण्याचा झपाटा मी लावला होता,
अगदी माझा लेख सुद्धा वाचून झाला.
मात्र ही कथा वाचतांना मी जुन्या काळात कधी निघून गेलो व कथेतील शब्दांनी कधी चित्रमय सृष्टी डोळ्यांसमोर उभी केली ह्याचा पत्ता सुद्धा लागला नाही.
कथेतील शेवटची ओळ कथेतील भावार्थ ,आशय स्पष्ट करते.
खूप दिवसांनी सकस मराठी साहित्य वाचायला मिळाले.

विसुनाना's picture

12 Nov 2012 - 3:03 pm | विसुनाना

कहाणीला खेड्यातल्या मातीचा वास आहे. अगदी चारुता सागरांच्या कथांची आठवण झाली. आवडली हे वेगळे सांगणे नकोच.

अभ्या..'s picture

13 Nov 2012 - 6:33 pm | अभ्या..

किती दर्जेदार लिखाण आहे. वा वा.
दिवाळी अंकात एक एक हिरे आहेत जणू.
अपर्णातै धन्यवाद या सुरेख साहित्याबद्दल.

श्रावण मोडक's picture

13 Nov 2012 - 10:18 pm | श्रावण मोडक

वा! गावाकडची कथा!

पैसा's picture

13 Nov 2012 - 11:13 pm | पैसा

अगदी त्या काळात घेऊन जाणारी कथा.

शैलेन्द्र's picture

13 Nov 2012 - 11:43 pm | शैलेन्द्र

सुंदर लेखन, अप्रतीम.. खुप आवडले..

कथा वाचायला सुरुवात केली आणि थांबता आले नाही. अगदी गुंतवून ठेवणारी लेखनशैली.
मधेच श्वेत श्यामल मराठी सिनेमांसारखं चित्र डोळ्यापुढे यायचं.

कवितानागेश's picture

17 Nov 2012 - 3:30 pm | कवितानागेश

खरोखर सिनेमा पाहत असल्यासारखे वाटले.
अप्रतिम लिहिलय..

बहुगुणी's picture

14 Nov 2012 - 4:57 am | बहुगुणी

अपर्णा: तुम्ही काळजाला हात घालणारं लिहिता, वाचवत नाही पण सोडवतही नाही! केवळ ऐकिवातलाच असा जुना काळ डोळ्यासमोर उभा केलात. शेवटची ओळ तर आपल्या समाजातल्या भयाण चालीरीतींच्या झापडीत मारणारी!

डोळ्यांपुढे चित्र उभं करायची तुमची हातोटी विलक्षण आहे.

स्मिता.'s picture

16 Nov 2012 - 8:46 pm | स्मिता.

अप्रतिम लेखनशैलीतली काळजाला हात घालणारी कथा आहे. वाचतांना त्यात एवढी गुंतले की एखादा जुना मराठी चित्रपटच बघतेय असं वाटलं. या अश्या अनेक आयुष्यं नासवणार्‍या प्रथा, चालीरीती पाहिल्या की मनाला खिन्नता येते.
खूप छान लिहिलंय.

वातावरण निर्मिती अफलातून जमली आहे. कथनशैली फर आवडली.
मात्र शेवट भर्कन गुंडाळल्यासारखा वाटला, अजून फुलवता आला असत का?

नगरीनिरंजन's picture

19 Nov 2012 - 9:40 am | नगरीनिरंजन

गावाकडचं वातावरण निर्माण करण्यात तुमचा हातखंडा आहे. कथा आवडली.

इनिगोय's picture

8 Feb 2013 - 5:14 pm | इनिगोय

कथा वाचता वाचता कधी त्या भल्यामोठ्या वाड्यातनं, शेतघरातनं आणि त्या हरणाचा आक्रोश ऐकणार्‍या बाळंतखोलीतून फिरून आले, कळलंही नाही!

ही कथा एका परीने बायजाच्याही आयुष्याचा पट मांडून गेलीय!