जवळपास आपल्या जन्मापासूनच जाणते-अजाणतेपणी आपला आयुर्वेदाशी संबंध आलेला असतो. मात्र ते आपल्या ध्यानात आलेलं नसतं. अगदी आजही अनेक घरांमध्ये, नुकत्याच जन्माला आलेल्या मुलांना सोनं उगाळलेलं तूप चाटवतात, एखाद्या वेळी जुने-जाणते प्रसूतितज्ज्ञच हे काम करतात. लहान बाळांना विशिष्ट तेलाचं मालिश करतात, त्यांना वेगवेगळ्या वनस्पतिज द्रव्यांची धुरी देतात, पोट दुखून बाळ रडत असेल तर बाळाच्या पोटाला हिंगाचं पाणी लावतात, तशातच ओव्याची पुरचुंडी गरम करून बाळाचं पोट शेकून घेतात. साधारण महिन्याभरानंतर त्यांना बाळगुटी चाटवणं सुरू होतं. पुढे सर्दी झाली, लाव सुण्ठीचा लेप, लाव वेखंडाचा लेप. जुलाब झाले, चाटवा मुरूडशेंग उगाळून, चाटवा सुण्ठ उगाळून. मलावरोध होतोय तर चाटवा हरडा. खोकला होतोय, तर उगाळा बेहडा नि चाटवा, तुळशीची पानं उकळून केलेलं पाणी पाजा. मूल कुठे पडलं नि त्याला जखम झाली तर दडप त्यावर हळदीची पूड. असं या ना त्या प्रकारे प्रत्येक भारतीयाला आयुर्वेदाचं बाळकडू तेव्हापासूनच मिळू लागतं, असं म्हणणं अयोग्य होणार नाही. कारण या सार्याच गोष्टी करण्याचा उपदेश आयुर्वेदामध्ये केलेला आहे. म्हणजेच, आयुर्वेद हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण आपल्याला मात्र याची जाणीव नसते, असंच म्हणावं लागतं. आजच्या काळाच्या अनुषंगाने असं होणं स्वाभाविकच म्हटलं पाहिजे.
आज आयुर्वेदाचं समाजामधलं स्थान झाडपाल्याचं औषध इतकंच मर्यादित झालेलं आढळतं. अर्थात आयुर्वेदामधली रसौषधी आजही आपलं स्वतंत्र स्थान टिकवून आहेत. पण सामान्यत: ‘घासफूसकी दवा’ म्हणजे आयुर्वेद, असं समीकरण झालेलं आहे. यामागे आज बहुतांशी समाजमान्यता मिळालेलं ‘आधुनिक वैद्यक’ असणं सहज शक्य आहे. आधुनिक वैद्यकाने औषधींच्या प्रयोगाच्या मार्गामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेला आहे. त्यांची रासायनिक औषधी शरीरात प्रयुक्त करण्याची विविध माध्यमं आज उपलब्ध असल्याने आणि त्यांच्या तीव्र कार्यकारित्वामुळे आयुर्वेदोक्त माध्यमं काही अंशी कालबाह्य मानली जाऊ लागली आहेत. यामुळे आयुर्वेदाला घरगुती औषधांचं स्वरूप मिळाल्याचं दिसून येत आहे. पण मुळात आज ज्याला आपण आयुर्वेद समजतोय, तोच खरा आयुर्वेद आहे का? किंबहुना आयुर्वेद नेमकं कशाला म्हणायचं? आधुनिक वैद्यकाप्रमाणे आयुर्वेद ही केवळ एक चिकित्सा पद्धती आहे, की तिचा आवाका त्या पलीकडेही पसरलेला आहे? या आणि यासारख्या इतर प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न म्हणून हा लेखन-प्रपंच!
आयुर्वेदाला व्यवस्थित जाणून घ्यायचंय, आयुर्वेदाची नीट ओळख करून घ्यायचीय तर आपल्याला ‘आयुर्वेद’ या नावापासूनच सुरुवात करावी लागते. आयुर्वेद या नावामध्ये मुळातच आयु: आणि वेद या दोन संस्कृत शब्दांची सांगड घातलेली आहे. यापैकी आपण ‘वेद’ या शब्दाशी चांगलेच परिचित आहोत. वेद हे प्राचीन ग्रंथ म्हणून भारतीयांना माहीत आहेत. तरी सुरुवातीला त्या अर्थी न घेता आपण वेदाचा शाब्दिक अर्थ विचारात घेऊ.
व्युत्पत्तिशास्त्राप्रमाणे, ‘विद् ज्ञाने बोधे’ या मूळ धातूनुसार वेद या शब्दाचे ‘ज्ञान’ आणि ‘बोध’ असे अर्थ आपल्याला मिळतात. आता दुसरा शब्द ‘आयु’, याचा अर्थ सहज स्पष्ट आहे. आयु: म्हणजे आयुष्य; आपला किंवा म्हटलं तर कोणत्याही सजीवाचा जीवनकाळ. मग `आयु अर्थात आयुष्यासंबंधीचं ज्ञान’ असा आयुर्वेदाचा अर्थ आता निश्चित होतो. म्हणजेच, आयुविषयक ज्ञान देणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. मग पुढे ग्रंथ या अर्थाने आयुष्याविषयी ज्ञान देणारा ग्रंथ तो आयुर्वेद, असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजेच
“आयुरस्मिन् विद्यते, अनेन वाSSयुर्विन्दतीत्यायुर्वेदः।” (सुश्रुत संहिता सूत्रस्थान.)
ज्यात आयु असते किंवा ज्यातून आयुचं ज्ञान होतं तो आयुर्वेद, असं सुश्रुत संहिता सांगते.
आयुर्वेद अशा नावाचा ग्रंथ सध्या उपलब्ध नसला तरी या विषयाला वाहिलेल्या संहिता ग्रंथांमधून आयुर्वेदाचा अभ्यास केला जातो. आयुर्वेदाविषयीचं ज्ञान संग्रहित केलेल्या संहिता अनेक असल्या, तरी मूळ संहिता ग्रंथांमध्ये प्रामुख्याने चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि वाग्भट संहिता यांचा अंतर्भाव होतो.
आयुर्वेदाचा सामान्य अर्थ समजून घेतल्यानंतर त्यातल्या विशेष अर्थाकडे आता लक्ष देऊ. आयु म्हणजे जीवन. जीवन म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा काळ हे जरी सर्वमान्य असलं, तरी यामधून नव्या प्रश्नांची उत्पत्ती होते. जन्म म्हणजे काय? तो नेमका कसा होतो? कधी होतो? त्याचप्रमाणे मृत्यू म्हणजे काय? तो नेमका कसा होतो? कधी होतो? जन्म-मृत्यू होण्यापूर्वी आणि नंतर काय स्थिती असते? त्यांच्या दरम्यान जीवन सुरू असतं, म्हणजे नेमकं काय सुरू असतं? हे आणि यासारखे अनेक प्रश्न उत्पन्न होत असल्याने आपल्याला मूळातच ‘आयु’ म्हणजे काय ते समजून घ्यावं लागतं. आयुर्वेदामध्ये याचाही विचार केलेला आहे. आयुची आयुर्वेदात सांगितलेली व्याख्या अशी आहे –
“शरिरेंद्रियसत्त्वात्मसंयोगो ...... आयुरुच्यते।” (चरक संहिता सूत्रस्थान.)
अर्थात, शरीर, इंद्रिये, मन आणि आत्मा यांचा संयोग म्हणजे आयु, म्हणजेच जीवन. या व्याख्येमुळे आपल्याला आयुष्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी मिळते. आपला जन्म म्हणजे आपलं शरीर, आपली इंद्रिये, आपलं मन आणि आपला आत्मा यांचा संयोग; आपला मृत्यू म्हणजे त्यांचा वियोग, तर आयुष्य म्हणजे संयोग-वियोगादरम्यानचा काळ. तेव्हा आता आयुर्वेद म्हणजे शरीरादिकांचा संयोग टिकवून कसा ठेवता येईल, हे ज्ञान देणारं शास्त्र, असं आपल्याला समजतं.
शरीरादिकांचा संयोग टिकून राहण्यासाठी त्यांचं व्यवस्थित पोषण होणं आवश्यक असतं. त्यातही लौकिक अर्थाने शरीरामध्येच इतर तीन तत्त्वं उपस्थित असल्याने शरीराचं योग्य पोषण झाल्यास हा संयोग अधिक काळ टिकून राहण्याची शक्यता असते, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. मग आता या शरीराच्या पोषणासाठी सर्वाधिक महत्त्वाचे ठरतात आहार आणि विहार. तेव्हा आता आयुर्वेद म्हणजे शरीरादिकांच्या पोषणासाठी त्यांच्या आहार-विहारासंदर्भातलं ज्ञान देणारं शास्त्र, असं आपल्याला समजतं.
आता या आहार-विहारांशी संबंधित कोणकोणत्या शक्यता उपस्थित होतात, याचा विचार करू. शरीराशी निगडित सहजभाव हा सुखदुःखाशी संबंधित असतो. शरीरासाठी कोणतेही श्रम न होणं, भुकेची संवेदना जाणवल्यावर भोजन मिळणं, ते आपल्या आवडीच्या चवीचं, भरपूर नि रुचकर असणं हे सुखकर असतं; तर शरीराला श्रम करायला लागणं, भुकेच्या वेळी भोजन न मिळणं, मिळाल्यास आवडत्या चवीचं न मिळणं, न पुरणारं, न रुचणारं मिळणं हे दुःखकर असतं. याशिवाय काही वेळेला आहार भरपूर उपलब्ध असूनही तो प्रमाणात खाणं हे शरीरासाठी योग्य अर्थात हितकर असतं. तोच आहार प्रमाणाबाहेर खाणं अयोग्य अर्थात अहितकर असतं. तसंच, शरीरासाठी अन्नपचनादी क्रियांच्या दृष्टीने शरीराचं आवश्यक तेवढं चलनवलन होणं योग्य अर्थात हितकर असतं आणि ते तसं न होणं अयोग्य अर्थात अहितकर असतं. म्हणजेच, आपल्यासमोर आहार-विहारांच्या संबंधात सुखकर, दुःखकर, हितकर आणि अहितकर अशा चार शक्यता निर्माण होतात. आता शरीरादिकांसाठी सुखकर आणि दुःखकर काय आहे, हे शरीरादिक स्वतःच ठरवू शकतात आणि त्यातही सुखकरत्वाकडे त्यांचा साहजिक ओढा असणार, हे गृहीत आहे. पण ही गोष्ट त्यांच्यासाठी योग्यच असेल असं मात्र त्यांना निश्चितपणे ठरवता येणार नाही. म्हणजेच त्यांच्यासाठी हितकर काय आणि अहितकर काय, हे कळणं आवश्यक ठरतं. आता हे जर व्यवस्थित लक्षात आलं असेल तर आता शरीरादिकांचं व्यवस्थित पोषण होण्यासाठी हितकर काय व अहितकर काय, हे सांगून त्यांचा संयोग अधिक काळपर्यंत टिकवून ठेवण्याचं ज्ञान देणारं शास्त्र ते आयुर्वेद, असं आपण नक्की म्हणू शकतो.
वरती आपण म्हटलं आहे की शरीर, इंद्रिये, मन आणि आत्मा यांचा वियोग होणं म्हणजे मृत्यू. मृत्यू म्हणजे आयुष्याची अखेर. तेव्हा आयुर्वेदाची व्याप्ती तिथवरच. पण आयुर्वेद मानतो की शरीरादिकांचा संयोग ही जशी सहज क्रिया आहे, तसाच त्यांचा वियोग हीदेखील एक सहज प्रक्रिया असावी. मात्र त्यासाठी जी वेळ ठरली आहे, त्या वेळेपर्यंत तो संयोग टिकवण्यासाठी आवश्यक ते ज्ञान आयुर्वेद आपल्याला त्यातल्या तत्त्वांच्या साहाय्याने मिळवून देतो. पिकलेलं फळ ज्याप्रमाणे स्वप्रेरणेने झाडापासून विलग होतं, त्याचप्रमाणे मृत्यूची प्रक्रिया व्हावी, असं आयुर्वेद मानतो. अशा प्रकारे नियत काळात घडलेल्या मृत्यूला आयुर्वेद काल-मृत्यू मानतो. व्याधी आदि इतर कारणांनी आलेला मृत्यू आयुर्वेद अकाल-मृत्यू मानतो. तेव्हा एका अर्थाने आयुर्वेद आपल्याला आयुष्याच्या प्रमाणाचं ज्ञान देतो, असंच म्हणावं लागतं.
या सर्व गोष्टींना अनुसरून चरक संहिता आयुर्वेदाची व्याख्या सांगते –
“हिताहितं सुखंदु:खं आयुस्तस्य हिताहितम्।
मानं च तच्च यत्रोक्तमायुर्वेदः स उच्यते॥” (चरक संहिता सूत्रस्थान)
अर्थात, ज्या शास्त्रामध्ये हिताहित, सुखदुःख या चारांपैकी हित-अहित तत्त्वांचं (आहार-विहारादींच्या संबंधाने) ज्ञान दिलेलं आहे, आयुच्या प्रमाणाचं ज्ञान दिलेलं आहे, त्याला आयुर्वेद असं म्हणतात.
चरक संहितेमध्ये दिलेलं आयुर्वेदाचं प्रयोजन हा या संदर्भामधला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणता येईल.
“प्रयोजनं चास्य (आयुर्वेदस्य) स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणमातुरस्य विकारप्रशमनं च।” चरक संहिता सूत्रस्थान.
अर्थात, स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण हे आयुर्वेदाचं प्रमुख प्रयोजन आहे. त्यासाठी म्हणजेच स्वस्थ व्यक्तींमध्ये कोणत्याही रोगांची उत्पत्ती होऊ नये यासाठी योग्य आहार-विहारादींचं ज्ञान आयुर्वेद प्राधान्याने देतो. या ज्ञानाचा योग्य वापर करूनही इतर कारणांमुळे व्यक्तीमध्ये रोगनिर्मिती झालीच, तर त्या रोगाचं निर्दालन व्हावं आणि व्यक्तीला स्वास्थ्याची, आरोग्याची पुन:प्राप्ती व्हावी यासाठी उपयुक्त अशा चिकित्सेचं ज्ञानही आयुर्वेद आपल्याला देतो. एकंदरीत आरोग्याचं रक्षण करणं आणि रोगांना दूर ठेवणं हे आयुर्वेदाचे दोन हेतू आहेत असं म्हणता येतं.
आयुर्वेदाचं प्रयोजन व्यवस्थित समजून घेतलं तर असं म्हणता येतं की रोगनिर्मिती होऊच नये असा आयुर्वेदाचा मूळ उद्देश आहे. त्या हेतूने खाण्या-पिण्यात योग्य काय, अयोग्य काय? आपली दिनचर्या कशी असावी? ऋतूनुसार निरनिराळ्या वातावरणात आपल्या आहार-विहारात काय बदल करावा? कसा बदल करावा? कशाचा अंतर्भाव अन्नात होतो? त्यांचे गुणधर्म कोणते? विविध अन्नपदार्थ कसे बनवले जातात? शिजवलेल्या अन्नाचे गुणधर्म कोणते? अन्नाची चव म्हणजे नेमकं काय? अन्नाची शक्ती कशात असते? अन्न-ग्रहणाचे नियम कोणते? अन्नाचं प्रमाण कालपरत्वे कसं असावं? व्यायाम म्हणजे काय? तो कधी करावा? कसा करावा? किती करावा? आयुष्याचं तत्त्वं समजून घेण्यासाठी कोणत्या मूलभूत ज्ञानाची आवश्यकता असते? आपलं शरीर द्रव्यात्मकतः कसं उत्पन्न होतं? शरीराचं कार्य कसं चालतं? इंद्रियांची उत्पत्ती कशी होते? त्यांचं शरीरातलं स्थान काय? मन म्हणजे नेमकं काय? ते कुठे असतं? काम कसं करतं? आत्म्याचं शरीरातलं अस्तित्त्व कसं जाणावं? शरीरादिकांचं पोषण कसं होतं? आपलं आरोग्य कसं टिकवून ठेवावं? हे समजून घेण्यासाठी या आणि यासारख्या प्रश्नांच्या उत्तरांचा खूपच उपयोग होतो; आणि आयुर्वेद या संबंधी प्रामुख्याने ऊहापोह करतो.
आरोग्य टिकून राहण्याच्या दृष्टीने सांगितलेल्या नियमांचं पालन करूनही जेव्हा इतर कारणांनी शरीरात रोगनिर्मिती होते, तेव्हा तो रोग दूर करून पुन्हा आरोग्यप्राप्ती करणं हादेखील आयुर्वेदाचा हेतू असतो. या अनुषंगाने आयुर्वेदात शरीरामध्ये निर्माण होणारया रोगांची अधिक माहिती दिलेली आहे. संहिता ग्रंथांमध्ये व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने ही माहिती देण्यात आलेली आहे. शरीरात उत्पन्न होणारया रोगांची कारणं, रोग निर्माण होण्यापूर्वी दिसणारी पूर्वरूपं, रोगांची लक्षणं, शरीरामध्ये रोगनिर्मिती होण्याची प्रक्रिया यांची माहिती देतानाच आयुर्वेद त्यावर करता येणारी चिकित्सा आधी सूत्ररूपात देतो आणि बरोबरच औषधी द्रव्यांच्या स्वरूपात देतो. त्या औषधी द्रव्यांच्या चिकित्सेसाठी वापरायच्या वेगवेगळ्या पद्धतींचीही तो माहिती देतो. रोगांचं शमन होताना किंवा झाल्यावर शरीर कोणती लक्षणं दाखवतं, ज्याद्वारे आपण समजू शकतो की शरीरातून रोगनिवृत्ती झाली आहे, याची माहितीही आयुर्वेद आपल्या संहिता ग्रंथांमधून विषद करतो. शरीरामध्ये रोग निर्माण झालेला असताना कशा प्रकारचं पथ्यापथ्य पाळायचं? याचाही ऊहापोह आयुर्वेदात केलेला आहे. पुढे केवळ आरोग्याची पुन:प्राप्ती इथेच न थांबता शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आणि पुन्हा अशीच रोगनिर्मिती न होण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपायही आयुर्वेद स्पष्ट करतो.
आयुर्वेद शास्त्राची निर्मिती आपल्या देशातली आहे, त्यातले विषय आपल्या जीवनाशी निगडित असे आहेत, त्यात सांगितलेली आहारीय तथा औषधी द्रव्ये नैसर्गिक आणि आपल्या मातीतली आहेत, त्यात वर्णन केलेली चिकित्सा-सूत्रे आपल्या अनुभवांना आणि परंपरेला साजेशी आहेत, त्याचप्रमाणे त्यात विशद केलेले नियम बहुतांशी आपल्या सवयीचे आहेत.
आत्तापर्यंत झालेल्या विवेचनामधून आपण आयुर्वेदाबद्दल मूलभूत माहिती घेतली. या माहितीवरून आपल्या सहज ध्यानात येईल की आयुर्वेद हे केवळ रोग दूर करण्यासाठीचं शास्त्र नसून, कोणत्याही प्रकारचे रोग होऊ न देता आपलं नियत आयुष्य पुरेपूर मात्रेत व्यतीत करण्यासाठी सर्वांनी आचरावी अशी एक जीवनपद्धती आहे. या जीवनपद्धतीच्या आचरणातूनच शारीर-मानस आरोग्यप्राप्ती घडून आपण जीवनातील, धर्म, अर्थ आणि काम या अत्यंत आवश्यक अशा तीन पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी प्रवृत्त होऊ शकतो. म्हणूनच वाग्भटाचार्य म्हणतात –
“आयुः कामयमानेन धर्मार्थसुखसाधनम् ।
आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः ॥” वाग्भट संहिता (अष्टांग हृदय) सूत्रस्थान
अर्थात, आयुर्वेदामधल्या उपदेशांच्या पालनाने (दीर्घ आणि स्वस्थ) अयुष्याची प्राप्ती होते आणि या (अशा) आयुच्या प्राप्तीमधून धर्म, अर्थ आणि सुख (काम) यांची प्राप्ती शक्य होते. तेव्हा या आपल्या, सध्या काहीशा दुर्लक्षित झालेल्या, पारंपरिक, आदर्श जीवनपद्धतीची पुन्हा एकदा व्यवस्थित माहिती करून घेऊ आणि आरोग्यप्राप्तीच्या पथावर पुन्हा एकदा मार्गस्थ होऊ.
प्रतिक्रिया
12 Nov 2012 - 8:52 am | संजय क्षीरसागर
यावर आयुर्वेदात काय सांगीतलय?
हा आयुर्वेदाचा विषय नाही, तरी देखिल आयुर्वेदात यावर काही विचार केला असेल तर कुतूहल आहे
12 Nov 2012 - 2:57 pm | सविता००१
एक झकास विषय निवड्लास म्हणून अभिनंदन. यावर सविस्तर वाचायला खूप आवडेल.
12 Nov 2012 - 4:10 pm | गवि
प्रासभाऊ.. उत्तम लेख.. आयुर्वेदाविषयीचे लोकांत असलेले गैरसमज दूर व्हायला खूप उपयोग होईल..
15 Nov 2012 - 7:33 am | ५० फक्त
फारेनच्या गाण्यांवर ते आयुर्वेदावर लिहिणारा हा आयडी, लई भारी लिहिलंय, ब-याच गोष्टी मला माहित देखील नव्हत्या. बहुतेक आयुर्वेदाचा जीवनपद्धती म्हणुन स्विकार केला जात नाही त्यामुळं देखील आयुर्वेदिक ट्रिटामेंटला फार लांब आहे, फार कंटाळवांणी आहे असं म्हणलं जातं.
15 Nov 2012 - 6:18 pm | यशोधरा
सुरेख जमला आहे लेख.
15 Nov 2012 - 7:57 pm | इन्दुसुता
उत्तम लेख. या विषयाचा ( आणि इतर वाचलेल्या लेखांवरून ) व भाषा व्युत्पत्ती वरचा आपला व्यासंग येथे जाणवतो. आयुर्वेदी जीवनपद्धती बद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.
15 Nov 2012 - 11:54 pm | सोत्रि
चांगलाच परिचय, अजुनही ह्या विषयावर वाचायला आवडेल. तसेही आयुर्वेदाबद्दल माहितीपेक्षा गैसमजच जास्त आहेत.
- ( आयुर्वेदिक ) सोकाजी
16 Nov 2012 - 2:30 pm | निनाद मुक्काम प...
लेखाच्या शीर्षकात त्याचे सार आहे.
आयुर्वेदाबद्दल गैरसमज खूप आहेत.
व आजकाल सर्वकाही झटपट मिळवायची वृत्ती आपल्या जीवनशैलीत बळावली आहे.
ह्यामुळे आयुर्वेदाच्या महिमा आपल्याला कळून वळत नाही.
जर्मनीत फक्त आयुर्वेदाची अनेक दुकाने आहेत.
म्युनिक सारख्या शहरात ती प्रचंड प्रमाणात आहेत. त्याबद्दल जर्मन भाषेत विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
आपल्याकडे आयुर्वेदिक दुकाने म्हणजे जी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते तिला छेद
देण्याचे काम येथील चकचकीत दुकाने करतात.
योग किंवा आयुर्वेद असो ह्याबाबतीत एक मराठी म्हणीत थोडा बदल करून लिहिता येईल.
जर आडात असेल तर ते जागतिकीकरणाच्या पोहऱ्यात येते.
20 Nov 2012 - 10:25 pm | पैसा
या विषयावर एक लेखमाला होऊ दे वैद्यबुवा!
22 Nov 2012 - 3:33 pm | प्रचेतस
लेखमाला लवकर येऊ द्यात.
22 Nov 2012 - 7:32 pm | राघव
ह्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद.
राघव
26 Nov 2012 - 10:16 am | सुधीर कांदळकर
उपयोग आयुर्वेद करून घेत नाही हे दुर्दैव. अजूनही कफ, पित्त, वात हे त्रिदोष म्हणजे काय हे वैज्ञानिकदृष्टीला पटेल याचे स्पष्टीकरण आयुर्वेद देत नाही. एखादा दोष वाढला म्हणजे शरीरात कोणती विषद्रव्ये तयार होतात, ती कशी ओळखावी, त्यांचे मापन कसे करावे याचे स्पष्टीकरण आयुर्वेद देत नाही. विषयाचा गाभा तपशीलवार न पकडता धूसर ज्ञानाचे शब्दबंबाळ वर्णन करून सर्वसामान्य माणसाला अज्ञानात ठेवण्याकडेच कल आहे.
उदा. अडुळशात व्हॅसिसीन आणि व्हॅसिसिनोन ही दोन क्रियाशील द्रव्ये आहेत. आयुर्वेदातल्या मी पाहिलेल्या कोणत्याही ग्रंथात या दोन द्रव्यांची प्रमाण मात्रा - स्टँडर्ड डोस - दिलेला नाही. मात्रेत पानांचे वजन दिलेले असते. पण झाडावरून पाने उतरवल्यानंतर किती काळ झाला आहे, भोवतालचे तापमान, हवेतील आर्द्रता यानुसार पानांचे वजन ती वाळल्यामुळे कमीजास्त होते. साहजिकच क्रियाशील द्रव्यांचे दर किलोग्रॅम पानातील प्रमाण याबद्दल आयुर्वेद मूकच आहे.
शेकडॉ वर्षांपूर्वीच्या ज्ञानाचे डिंडीमच अजून पिटावे लागतात. सुश्रुताने शस्त्रक्रियेचा पाया घातला म्हणून ढोल पिटले जातात. पण त्यानंतर आम्ही काय केले? काही नाही. केवळ पारतंत्र्याच्या लंगड्या सबबी दिल्या जातात.
भौतिकी आणि रसायन यांसारख्या आधुनिक विज्ञानातील इतर शाखांच्या प्रगतीचा उपयोग आयुर्वेद केव्हा करून घेणार कोण जाणे.
3 Dec 2012 - 12:17 am | प्रास
सुधीरराव, तुमच्या काही टिप्पण्यांवर स्पष्टीकरण देण्याचा अल्पसा प्रयत्न.
ज्याला तुम्ही वैज्ञानिक दृष्टी म्हणता त्याला आम्ही प्रत्यक्ष प्रमाण म्हणतो. पण अगदी विज्ञानातही दर वेळी "बाप दाखव नाही तर श्राद्ध कर" असं म्हणता येत नाही. किंबहुना त्या दृष्टीनेच अनुमान, उपमान, शब्द इ. प्रमाणंही मानली गेलेली आहेत. शरीरातल्या प्रत्येक गोष्टींची वाढ अथवा घट नेहमी मात्रा अथवा प्रमाण (amount किंवा वस्तुमान) यामध्येच होईल असं निश्चितपणे म्हणता येत नाही. आयुर्वेद गुणात्मक वृद्धी-घटही मानतो. असा बदल दर वेळी प्रयोगशाळेत मोजता येईल असं म्हंणणं योग्य होणार नाही. त्यासाठीच उपरोल्लेखित प्रमाणांचा उपयोग होतो. तेव्हा तुम्ही म्हणताय त्या वैज्ञानिक दृष्टीपेक्षा व्यापक दृष्टी आयुर्वेद बाळगून आहे.
खरं तर हा एक मोठा विषय आहे आणि वर म्हंटल्याप्रमाणे आयुर्वेदावरच्या लेखमालेसाठी योग्य असा. पुढे यावर नक्कीच लिहिलं जाईल तरी वरच्या मुद्याचा जरा विचार करू.
सुधीरराव, तुम्ही म्हणताय ती अडुळश्यातली द्रव्य शास्त्रज्ञांना कोणत्या काळी कळली हो? गेल्या शतकात लागलेल्या शोधांना आयुर्वेदाच्या पुस्तकात स्थान मिळावं हा विचार काळाच्या दृष्टीने विसंगत नाही दिसत?
असो. मुद्दा असा आहे की तुम्ही वर सांगितलेली केमिकल्स अडुळश्यात असतीलही पण ती तेव्हढीच द्रव्य विकारांवर कार्यकारी होतात का? वानस्पत्य औषधींमध्ये आधुनिक वैज्ञानिकांकडून शोधण्यात आलेल्या कार्यकारी द्रव्यांखेरीज त्या वनस्पतीमधल्या इतर कोणत्याही द्रव्यांचा या कार्यात उपयोग नाही असं गृहित धरावं का? त्या तथाकथित कार्यकारी द्रव्याचा ज्याला तुम्ही क्रियाशील द्रव्य म्हण्टलेलं आहे, उपयोग त्या मुख्य वानस्पत्य औषधाबाबतीत सांगण्यात आलेल्या यच्चयावत रोगघ्नतेमध्ये सारखाच होतो का? हे नि असे शेकडो प्रश्न यासंबंधी विचारता येतात, ज्याची वैज्ञानिकांनाही उत्तरं देणं कठीण आहे.
आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये सांगण्यात आलेले प्रमाण हे नेहमीच चूर्ण, स्वरस, काढा इ. स्वरूपात सांगितलेलं असतं. पानांचं वजन वगैरे कधीच सांगत नाहीत. चूर्ण आणि अख्खं किंवा काढाकूटाचं प्रमाण हे त्या औषधाच्या प्रयोज्यांगांच्या छायाशुष्क अवस्थेमधलं असतं.
या उपर सदर मुद्द्यावर कोणतीही टिपणी सध्यातरी गरजेची वाटत नाही.
शेकडो वर्षांपूर्वीच्या ज्ञानाचे डिंडीम पिटावे लागतात कारण ते ज्ञान तेव्हा होते म्हणून. आज ते ज्ञान कधी नव्हतेच असं छातीठोकपणे सांगण्याची फ्याशन दिसतेय, हा दु:खाचा भाग आहे.सुश्रुताने शस्त्रक्रियेचा पाया घातला हे सत्य कधीही नाकारण्याची गरज नाही, म्हणूनच त्याचे ढोल पिटणंही वाईट नाही. आता त्यानंतरही आयुर्वेदात अनेक नवे शोध लागले. आपल्याकडून ते दुर्लक्षित राहिले आणि त्यांचे परिणाम आपल्याला लक्षात आले नाहीत तर तो काही त्यांचा आणि बरोबरच आयुर्वेदाचा दोष नव्हे.
काही वेळा आयुर्वेदातल्या सिद्धांतांचा आधुनिक विज्ञान आपल्या प्रगतीसाठी केव्हा करून घेईल असाच प्रश्न पडतो.
शक्य झाल्यास आयुर्वेदावरील लेखमालेत अशा मुद्द्यांचा उहापोह करण्याचा मानस आहे.
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार!
भौतिकी आणि रसायन यांसारख्या आधुनिक विज्ञानातील इतर शाखांच्या प्रगतीचा उपयोग आयुर्वेद केव्हा करून घेणार कोण जाणे.