भाग १, २, ३, ४, ५
(विनंती : या लेखात मी ‘दरी’ शब्दांचे जे उच्चार दिले आहेत, ते वाचकांनी कृपया ग्राह्य धरू नयेत.)
भारतासारख्या बहुभाषिक देशात जगण्याचा एक फायदा असा की, कुठल्याही नव्या भाषेत रूळायला आपल्याला फार अडचण वाटणार नाही असा (उगाच) वाटणारा आत्मविश्वास. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, बंगाल अशा अनेक राज्यांत अनेकदा प्रवास झाले. प्रत्येक वेळी निरक्षर माणसांना काय अडचणी येत असतील याचं भान आलं; आणि दुसरं म्हणजे शब्द ‘ऐकायची‘ सवय लागली. एखादा नवा शब्द ऐकला की हिंदी-इंग्रजी जाणणा-या सहका-याला त्याचा अर्थ विचारायचा आणि तो शब्द पुन्हा कानावर पडला की त्याच्या अनुषंगाने संवादाचा अर्थ लावत बसायचा – हा माझा छंदच म्हणा ना!
‘दरी’ आणि ‘पाश्तो’ या अफगाणिस्तानच्या दोन ‘अधिकृत’ भाषा. अर्थात इतरही अनेक भाषा आणि बोली या देशात आहेत. २००४ च्या राज्यघटनेच्या १६ व्या कलमानुसारज्या प्रांतात जी भाषा प्रामुख्याने बोलली जाते, त्या प्रांतात त्या भाषेला ‘अधिकृत’ भाषेचा दर्जा आहे; म्हणजे त्या प्रांतात तीन अधिकृत भाषा आहेत. दरी आणि पाश्तो या दोन्ही भाषा ‘इंडो-युरोपीयन’ गटातल्या आहेत. पाश्तो ही पश्तून लोकांची भाषा, त्यामुळे ही पाकिस्तानमधल्याही एका प्रांताची अधिकृत भाषा आहे.
‘दरी’ आणि ‘पाश्तो’ दोन्ही भाषा मला अर्थातच येत नाहीत; त्यामुळे मला मदतीसाठी कार्यालय एक अनुवादक देईल असं आधीच बोलणं झालं होतं. पण अनुवादक काही चोवीस तास माझ्या सोबत नव्हता. कार्यालयात, हॉटेलमध्ये भवताली इंग्लीश बोलणारे लोक होते; वाहनचालक मंडळी कामापुरतं इंग्रजी बोलू शकत. पहिल्याच दिवशी विमानतळावर हिंदी बोलणारे लोक भेटले होते. एक दिवस तर अनपेक्षितपणे ‘मराठी’ शब्ददेखील भेटले.
त्याचं असं झालं; आमच्या टीममधले सगळे लोक कुठे ना कुठे बाहेर गेले होते, मी एकटीच होते. मी आले तेव्हा आमच्या खालाजान साफसफाई करत होत्या. ‘सलाम आलेकुम, सुब्बो खैर’ (सुब्बो खैर म्हणजे सुप्रभात. मुस्लिमेतरांनी 'सलाम आलेकुम' म्हटलेलं चालतं की नाही हे मी विचारून घेतलं होतं) म्हणून मी संगणक उघडून कामाला लागले. अर्ध्या पाऊण तासाने मला जाणवलं, की खालाजानना मला काहीतरी विचारायचं आहे. आता आला का प्रश्न! पण आमच्या खालाजान हुषार होत्या. त्यांनी स्वत:कडे हात दाखवून, मग तो हात दाराकडे दाखवत ‘मी बाहेर जातेय’ असं मला खुणेनं सांगितलं. मी हसून मान डोलावली. पण त्यांना अजून काहीतरी विचारायचं होतं.
“किली?” त्यांनी विचारलं. क्षणभर मी गोंधळले. शब्द ओळखीचा वाटत होता खरा. मग माझ्या डोक्यात उजेड पडला. माझ्याकडे किल्ली आहे का असं त्या मला विचारत होत्या. मी माझ्याकडची किल्ली त्यांना दाखवली. त्यावर खालाजान म्हणाल्या, “दरवाजा.... मुश्किल...” – स्वर प्रश्नार्थक होता. कुलूप लावायला प्रयत्न करावा लागायचा, सहज लागत नव्हतं इथलं कुलूप – त्यामुळे ‘कुलूप लावायला तुला काही त्रास नाही ना होणार’ हा त्यांचा प्रश्न. ‘मुश्किल नेई (हा उच्चार ने आणि नेई यांच्या मधला काहीतरी) तशक्कुर’ (अवघड नाही, धन्यवाद) असं मी म्हणाल्यावर हसत बाहेर गेल्या; आणि ‘स्वीताजानला दरी बोलता येतं’ असं त्यांनी माझ्या इतर सहका-यांना सांगायला सुरुवात केली.
‘शुद्ध मराठी’चा अनाठायी आग्रह धरणा-या लोकांचा प्रतिवाद करायला ‘किली’, ‘दरवाजा’ यांसारखे बरेच शब्द मला माहिती होणार आता; म्हणून मी खूष झाले अगदी!
शुक्रवार म्हणजे सुट्टीचा दिवस. त्यामुळे थोडा निवांत नाश्ता. उशिरा नाश्ता. सुट्टीच्या दिवशी दुपारच्या जेवणाची गरज भासू नये असा भरपेट नाश्ता.
मी भोजनगृहात जाते. तिथे स्वैपाकीबुवा बसलेले आहेत निवांत.
"सुब्बो खैर, सलाम आलेकुम" वगैरे झाल्यावर आमच्यात असा काहीसा संवाद होतो.
"ऑम्लेट?" खानसामा
"बले," मी (हो).
"अंडा? याक? दुई?" खानसामा.
"दुई," मी (दोन).
"चीज?" तो मला स्लाईस दाखवत विचारतो.
"याक," मी (एक)
"चिली?" खानसामा
"काम," मी. (इथं 'का'चा उच्चार क आणि का याच्या मधला काहीतरी आहे - कम आणि काम यांच्यात कुठेतरी..) - म्हणजे कमी.
तो ऑम्लेट घेऊन येतो.
मग विचारतो - "ज्यूस?" - खरं तर मी ‘ज्यूस का घेतला नाहीये’ असं त्याला विचारायचं आहे बहुतेक - कारण ज्यूस सगळे खाण्याच्या आधी घेतात. पण मी खाऊन झाल्यावर ज्यूस किंवा कॉफी घेते.
मी हसून सांगते, "बले, ज्यूस बेते" – “हो, ज्यूस द्या”. पण भला मोठा ग्लास भरून ज्यूस नकोय मला. म्हणून मी लगेच स्पष्ट करते - "निम गिलास बेते" - म्हणजे “अर्धा ग्लास द्या”.
अशा रीतींने पोट भरण्याइतकी "दरी" मी शिकले.
माझ्या लहानपणी मी वारांची नावं कशी लक्षात ठेवायला शिकले हे आता आठवत नाही. ‘दत्ताला पेढे गुरुवारी, चणे-फुटाणे शुक्रवारी, ....शाळेला सुट्टी रविवारी’ असलं गाणं बालवर्गाकडून ऐकलं आहे पुढे कधीतरी. इथल्या लहान मुलांना ‘वारांची नावं’ शिकायला फार सोप्पं आहे. शुक्रवार म्हणजे जुम्मा (jumah). शनिवारला म्हणायचं ‘शाम्बे’ (shanbeh)! आणि एवढे दोन शब्द लक्षात ठेवले की बास! कारण मग रविवार म्हणजे “याक (yaik) शाम्बे”, सोमवार म्हणजे “दु (doo) शाम्बे”, मंगळवार म्हणजे “से (say) शाम्बे”, बुधवार म्हणजे “चार (chaar) शाम्बे” आणि गुरुवार म्हणजे “पेंज (painj) शाम्बे”. त्यामुळे ‘मीटिंग चार शाम्बेला आहे की से शाम्बेला’ असं काहीतरी विचारून मी भाषेचा सराव करत राहिले.
लक्ष देऊन ऐकायला सुरुवात केल्यावर बरेच ओळखीचे शब्द कानावर पडायला लागले. जग पूर्वीच्या काळी आपापसात संवाद राखून होतं – असा संवाद फार जुना आहे याचा प्रत्यय देणारा आणखी एक अनुभव होता तो.
म्हणजे पाऊस पडला की इथं(ही) ‘गरमी’ कमी होते आणि ‘सर्दी’ वाढते; पाऊस ‘खलास’ झाला की जेवायला जायचं असं कुणीतरी सुचवतं; आज गाडी वेगळ्या रस्त्याने जातेय कारण रोजचा रस्ता आज ‘याक तरफी’ आहे; थोडी अधिक ‘कोशिश’ केली पाहिजे यावर सर्वांचं एकमत होतं; मॉल ‘नजदीक’ असतो; कधीतरी कुणीतरी ‘अजीब’ वागतं; अमुक ‘खबर’ वाचायचा मला सल्ला मिळतो; ‘सलामत’ (स्वास्थ्य, तब्ब्येत) ठीक नसेल तर ‘आराम’ केला पाहिजे याबद्दल दुमत नाही; कुणालातरी ही ‘चौकी’ (खुर्ची) बदलून दुसरी हवी असते; कुठल्याही कार्यालयात गेलं की लोक ‘बिशी’ (बसा) म्हणतात; तालिबान काळातल्या ‘खतरनाक’ अनुभवांची आठवणही काढू नका; पुलाव ‘खूब’ असला की जास्त खाल्ला जातो; आज बॉसची ‘मयेरबानी’ दिसतेय; काल मला ‘ताब’ (ताप) होता आणि ‘सरदर्दी’ही; त्याचे वडील ‘दुकानदार’ आहेत; मी आले असते, ‘लाकिन’ (लेकिन)...; ‘कुर्तीश सफेद आस’ (शर्ट पांढरा आहे); काय ‘खरीददरी’ केली काल; ‘किताबखाना’ ‘दूर’ आहे; ‘शिर्पेरा’ (शीर म्हणजे क्षीर –दूध; शिर्पेरा म्हणजे मिठाई) आवडेल तुम्हाला; कपड्याचा ‘रंग’; माझे ‘काका’ पोलीस आहेत; ‘छत’; ‘दवाखाना’;....
या सगळया शब्दांमुळे आपण आपला देश सोडून फार ‘दूर’ आलोत असं कधी वाटलंच नाही. (तसंही दूर नाहीये ते. काबूल-दिल्ली आणि पुणे-दिल्ली विमानप्रवासाला लागतात सुमारे दोन तास!)
अर्थात मी आत्ता हे जितक्या सहजतेने लिहितेय, तितकं काही हे सोपं नव्हतं. नवी भाषा शिकताना ऐकता ऐकता काही वाचलं तर भाषा कळायला मदत होते हा आजवरचा अनुभव. गुजराथी आणि काही अंशी बांगला आणि तामिळ शिकताना याचा उपयोग झाला होता (सरावाअभावी आता तामिळ विसरले!). इथं मोठी अडचण होती ती लिपीची. ही आहेत ‘दरी’ची मुळाक्षरं आणि ही आहेत ‘पाश्तो’ची मला ही काय वाचता येणार? त्यामुळे वाचनाचे दरवाजे बंद. लिपी शिकण्याइतका वेळ हातात नव्हता. मग रोमन लिपीत शब्द आणि त्यांचे अर्थ लिहून घ्यायला सुरुवात केली.
पण ‘दरी’चे उच्चार रोमनमध्ये (खरं तर कोणत्याही भाषेचे दुस-या लिपीत) लिहिणं हा एक खटाटोप असतो. (सध्या ‘पोर्तुगीज’चाही तोच अनुभव घेतेय.) म्हणजे स्पेलिंग yaik, पण उच्चार मात्र येक आणि याक यांच्या मध्ये कुठतरी. नेई आणि कम या शब्दांचा उल्लेख आधी आला आहेच. ख (खबर), ज (दरवाजा), फ (सफेद) असे बरेच उच्चार माझ्या सवयीपेक्षा वेगळे. ‘ट’ चा उच्चार अनेकदा ‘त’ – motor म्हणायचं मोतार. फोन वाजला की पहिला शब्द म्हणायचा ‘बले’ (balay:yes); पण त्या अफगाण ‘ब’ची नजाकत माझ्या आवाक्याबाहेर राहिली.. या लेखात मी दरी शब्दांचे जे उच्चार दिले आहेत ते वाचकांनी कृपया ग्राह्य धरू नयेत. मी रोमन अक्षरांनुसार उच्चारलेला शब्द माझ्या मते दरी असायचा; पण समोरच्याला तो कळायचा नाही (!) असं अनेकदा व्हायचं.
आपल्यासारखेच दरी भाषेने अनेक इंग्लिश शब्द स्वीकारले आहेत - गिलास म्हणजे ग्लास; dokhtar (daughter); nayktaayee; nars (nurse); injinyar (engineer); daaktaar (doctor); madar (mother); padar (father);
काही शब्द मात्र माझ्यासाठी गंमतीदार ठरले. एकदा एका खात्याच्या डायरेक्टरला भेटायला गेले. त्यांच्या सेक्रेटरीने मला बसायला सांगितलं; गोळी आणि चहा दिला आणि म्हणाली, “बसा थोडा वेळ; खानम (madam) ‘जलसा’मध्ये आहेत.’ कामाच्या वेळी कसले ‘जलसा’ला जातात हे अधिकारी – असा विचार माझ्या मनात आलाच. डायरेक्टर खानम आल्यावर खुलासा झाला की ‘जलसा’ म्हणजे मीटिंग. अफगाणिस्तानमध्ये मी अनेक ‘जलसा’त सहभागी झाले, हे वेगळं सांगायला नको! एका ‘जलसा’मध्ये एक ‘उस्ताद’ भेटले. ‘आमच्या देशात उस्तादांना खूप मान असतो’ असं मला एकजण सांगत होता. ‘जलसा’मुळे मी शहाणी झाले होते. अधिक माहिती घेताना कळलं की ‘उस्ताद’ महाविद्यालयात अथवा विश्वविद्यालयात शिकवतात. मग ‘शागीर्द’ म्हणजे विद्यार्थी हे ओघाने आलं. आपल्याकडे हे तीनही शब्द संगीतक्षेत्राशीच का जोडले गेले असावेत याचं कुतूहल आहे.
पोटदुखीला ‘दिलदर्दी’ (deildardee) हा शब्द काहीतरीच आहे. तसंच एकदा गारांचा पाऊस पडला तेव्हा सगळे त्याला ‘ज्वाला’ म्हणत होते (म्हणजे तसं मला ऐकू आलं!) हे शब्द मात्र ‘अजीब’ वाटले. बॉसला ‘रईस/सा’ हा अगदी योग्य शब्द आहे ना!
फरहाद माझा “दरी” भाषेचा शिक्षक. फरहाद का कोण जाणे, मला “सावित्री” म्हणायचा, मी काही ‘दुरुस्त’ करायच्या फंदात पडले नाही. नावात काय आहे अखेर? पण तो अतिशय शांतपणे शिकवायचा. पहिल्या तासातला हा आमचा एक छोटा संवाद:
Chitor astyn? (how are you?) चितोर अस्तेन?
Maam khub astum, tashakur (I am fine, thank you) मा खूब अस्तुम, तशक्कुर.
Name shumaa chees? (What is your name?) नामे शुमा ची आस?
Name maa Savita as. नामे मा सविता आस.
Shumaa az kujaastayn?( Where are you from?) शुमा आझ कुजा अस्तेन?
Ma az kaabul astum (I am from Kabul) मा आझ काबूल अस्तुम
Bisyaar khoob (very good) बिस्यार खूब.
वगैरे वगैरे
डेप्युटी मिनिस्टरच्या (मंत्री म्हणजे ‘वजीर’) पहिल्या तीन भेटीत अनुवादक सोबत होता; त्या ‘दरी’मध्ये बोलल्या; मी इंग्रजीत; अनुवादकाने दुभाषाचे काम केले. एकदा अशीच अचानक कॉरिडॉरमध्ये डेप्युटी मिनिस्टरशी गाठ पडली आणि पाच-सात मिनिटं आम्ही आंग्ल भाषेत बोललो. माझ्या चेह-यावर प्रश्न दिसत असणार स्पष्ट त्यांना. हसून म्हणाल्या, “आम्ही नेहमी इंग्लीश बोलत राहिलो, तर दरी आणि पाश्तो लयाला जातील ना! त्यामुळे वेळ ठरवून भेटायला येशील तेव्हा दुभाषा हवाच!’
भाषेसोबत त्या समूहाच्या संस्कृती आणि मूल्यांची ओळख होत जाते ती ही अशी!
क्रमशः
प्रतिक्रिया
22 Mar 2015 - 5:13 am | हाडक्या
मस्तच हो आतिवास तै.. :)
शेवटाची ही वाक्ये तर खासच..
बरंच काही सांगणारी.
22 Mar 2015 - 2:46 pm | इनिगोय
+१
छान लेखमाला.
22 Mar 2015 - 5:48 pm | अभिजित - १
सही !!
हि अक्कल इथल्या अतिशाहान्या लोकांना नाही .. इथले लोक यावर काय उत्तर दिले असते याचा एक नमुना ..
सही ( मस्त , सुंदर , छान हे शब्द माहित नाही न . म्हणून हे पंजाबी / हिंदी सही )
उपरोध आहे .. हलके घ्यावे ..
30 Mar 2015 - 6:19 pm | सूड
+१
22 Mar 2015 - 7:10 am | श्रीरंग_जोशी
हा लेख वाचून रम्य ही स्वर्गाहून लंका या गीतातील ही ओळ आठवून ती वरीलप्रमाणे बदलावीशी वाटली. भाषा हा आवडीचा विषय असल्याने ही सर्व निरिक्षणे खूपच भावली.
अमेरिकेत राहताना इंग्लिश अन स्पॅनिशखेरीज टॅक्सी ड्रायव्हर्स वगैरे कडून रशियन किंवा आफ्रिकन भाषांचा प्रभाव असणारे इंग्लिश ऐकायला मिळते. त्यामध्ये कधी कधी आपल्या भाषांतील शब्दांशी साधर्म्य असणारे शब्द किंवा शब्दांचे उच्चार ऐकून सुखद धक्के मिळतात.
माझ्या इथल्या कार्यालयातला एक सफाई कर्मचारी कॅरेबियन बेटांवरून आलेला आहे. भारतीय मूळ असले तरी दिसण्यावरून तो फारसा भारतीय वाटत नाही. पण त्याच्या बोलण्यावरून त्याला त्याच्या भारतीय मूळाबद्दलची आत्मियता जाणवली. विशेषकरून त्याच्या म्हातार्या आईवडीलांना हिंदी चांगले बोलता येत नसले तरी जुनी हिंदी गाणी ऐकणे त्यांचा आवडता छंद आहे.
यावरून आठवले - माझ्या बारावीच्या वेळी म.रा.पा.पु.मं. च्या इंग्रजी युवकभारती मधला एक पाठ. त्यामध्ये भाषांच्या उगमाबद्दल भाष्य होते. जगातील बहुतांश भाषांत आईसाठी 'म' वरून सुरू होणारे शब्द का आहेत या माझ्या प्रश्नाचे उत्तर त्यात मिळाले होते.
23 Mar 2015 - 2:06 pm | आतिवास
जगातील बहुतांश भाषांत आईसाठी 'म' वरून सुरू होणारे शब्द का आहेत या माझ्या प्रश्नाचे उत्तर त्यात मिळाले होते.
काय आहे ते उत्तर?
23 Mar 2015 - 10:57 pm | श्रीरंग_जोशी
नेमकेपणाने आठवत नाही. जसे आठवत आहे तसे लिहितो.
मानवजातीच्या उत्क्रांतीच्या काळात संवाद साधण्याला सुरुवात झाल्यावर एका भूप्रदेशात असलेली लोकसंख्या दूरदूरपर्यंत विखरू लागली. अन सर्वाधिक मूलभूत शब्द जे आईला संबोधण्यास वापरले जायचे ते देखील सगळीकडे पसरले.
वेगवेगळ्या भौगोलिक स्थानांत विविध भाषा बनत गेल्या तरी आईसाठीचे शब्द त्यांच्या मूळ रुपावरून फार लांब गेले नाहीत.
27 Mar 2015 - 11:47 am | पिशी अबोली
मी या संदर्भात असं ऐकलं होतं की 'म' हा बर्याचदा बाळांच्या तोंडून येणारा पहिला उच्चार असतो. 'म' उच्चारायला विशेष कष्ट लागत नाहीत. म्हणून आईसाठी 'म'. 'म' सारखाच बायलेबिअल 'प'. म्हणून वडिलांसाठी 'प' अक्षराने सुरु होणारे शब्द.
जॉर्जिअन भाषेत मात्र नेमकं उलटं आहे. वडिलांसाठी 'मामा' आणि आईसाठी 'देदा/डेडा' काही ऑस्ट्रेलियन भाषांमधेपण असेच दिसून येते. :)
27 Mar 2015 - 1:30 pm | आतिवास
रोचक आहे.
22 Mar 2015 - 7:26 am | अंतरा आनंद
वेगळ्या अनुभवाच्या मालिकेतील अजून एक छान लेख.
22 Mar 2015 - 7:50 am | बहुगुणी
लेखमाला वाचतो आहेच. घटनांबरोबरच तिथल्या भाषांचंही जुजबी का होईना ज्ञान मिळतंय ही दुधात साखर!
22 Mar 2015 - 8:22 am | जुइ
मजा आली वाचताना :-)
22 Mar 2015 - 8:39 am | अजया
आपल्या वापरातले कितीतरी शब्द दरीमध्ये आहेत की!
असंच मला बाहरिन विमानतळाच्या घोषणा ऐकताना मजा येते.मुसाफिरान,सफर असे मधले मधले ओळखीचे शब्द कानावर येतात.आपल्या भाषेत एवढे इतर भाषांमधले शब्द कधी कसे रुळुन गेले असतील?
22 Mar 2015 - 8:47 am | यशोधरा
सुरेख लिहिलं आहे, नेहमीप्रमाणेच. तुमच्या लेखांची आवर्जून वाट बघत असते.
22 Mar 2015 - 10:34 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्त हा भागही आवडला.
पुभाप्र,
पैजारबुवा,
22 Mar 2015 - 10:49 am | मित्रहो
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख
दरी आणि हिंदी मराठीतले साम्य वाचून मजा वाटली. आता हे शब्द दरीतून हिंदीत आले की हिंदीतून दरीत गेले हे सांगणे कठीण आहे. माणसे संवाद सांधतात आणि दोन्ही भाषेतले शब्द मिसळत जातात इतके की त्या भाषेतलेच शब्द बनतात. याचे आणखी एक उदाहरण.
लेख आवडला.
22 Mar 2015 - 10:59 am | सुधीर
खूप वाट पहावी लागली या भागाची...
22 Mar 2015 - 11:17 am | आदूबाळ
या बात!
मीटिंगला जलसा हा शब्द टोटल, सम्पूर्ण, समग्र पटून आतपर्यन्त गेला.
बादवे - गालीचा किंवा सतरंजीलाही दरी म्हणतात ना?
23 Mar 2015 - 10:52 pm | आतिवास
गालिचा (कार्पेट) म्हणजे क़ालीन.
मीटिंगला जलसा हा शब्द टोटल, सम्पूर्ण, समग्र पटून आतपर्यन्त गेला.
तुम्हाला एकाच व्यक्तीचं बोलणं ऐकावं लागतं अशा मीटिंगचा तगडा अनुभव दिसतोय. ;-)
22 Mar 2015 - 12:34 pm | बिपिन कार्यकर्ते
_/\_
***
ज्वाला : गारांना ओला म्हणतात हिंदीत. ज्वाला आणि ओला... ज चा य / अ / ह होतो बर्याच भाषांमध्ये. तसा ज्वालाचा ओला झाला असावा.
23 Mar 2015 - 2:09 pm | आतिवास
मला माहिती आहे त्यानुसार (पहाटे पडणा-या) दवाला 'ओले' म्हणतात. तपासून पाहते परत.
22 Mar 2015 - 1:20 pm | एस
बिस्यार खूब. तशक्कुर!... माशाल्लाह्...
22 Mar 2015 - 1:36 pm | तिमा
हे वाचल्यावर 'वसुधैव कुटुंबकम', का कायसं म्हणतात ते पटलं. अफगाणी लोकांविषयी मला नेहमीच सहानुभूति वाटते.
मूळचे हे दिलदार लोक! आणि त्यांच्या वाट्याला काय काय भोग यावेत?
तुमच्या लेखाची वाट बघणे हा आता एक छंद झाला आहे.
25 Mar 2015 - 7:30 am | चुकलामाकला
+१११११
27 Mar 2015 - 1:34 pm | आतिवास
प्रोत्साहनासाठी आभार.
22 Mar 2015 - 1:50 pm | अनुप ढेरे
मस्तं!
22 Mar 2015 - 4:13 pm | मधुरा देशपांडे
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख. कुठल्याही नवीन भाषेतील आपल्या मातृभाषेशी साधर्म्य असणारे शब्द ती भाषा शिकताना वेगळा आनंद देतात आणि उगाचच त्या शब्दांबद्दल खास प्रेम वाटु लागतं हा अनुभव घेतला आहे. तुर्किश दुकानांमध्ये हलवा, पनीर याच्या जवळ जाणारे आणि तसेच नाव असणारे पदार्थ बघितले आहेत.
22 Mar 2015 - 4:43 pm | कैलासवासी सोन्याबापु
दु शांबे
ह्याचे अन ताजीकिस्तान ची राजधानी असलेल्या "दुशांबे" चा काही संबंध असावा काय??
22 Mar 2015 - 5:23 pm | आतिवास
हे लगेच सापडलं!
22 Mar 2015 - 6:12 pm | कैलासवासी सोन्याबापु
सहिच!!!! एक्सक्टली तेच निघाले!!!!
23 Mar 2015 - 10:14 pm | अर्धवटराव
Stalinabad =))
या कम्युनेस्टांचही आबादीकरण झालं तर :)
22 Mar 2015 - 6:01 pm | स्पा
शाॅल्लेट लेखमाला
22 Mar 2015 - 6:27 pm | नगरीनिरंजन
आवडला.
22 Mar 2015 - 9:29 pm | आतिवास
आणि ही आजची घटना :-(
23 Mar 2015 - 10:25 am | बोका-ए-आझम
या जगातली प्रत्येक भाषा हा चमत्कारच आहे आणि संस्कृती समजायला भाषा समजायला पाहिजे याच्याशी बाडिस. रच्याकने, स्पॅनिशमध्ये तुम्ही याला उस्तेद (Usted) हा शब्द आहे. हाही उस्तादवरुन आला असावा का?
23 Mar 2015 - 12:06 pm | सुनील
शक्य आहे. स्पेनवर अनेक शतके अरबी भाषक मूरांची सत्ता होती. तेव्हा अनेक अरबी शब्दांनी स्पॅनिशात घुसखोरी केलेली आहे.
23 Mar 2015 - 12:26 pm | बॅटमॅन
उस्ताद म्हणजे शिक्षक हा अरबी/फारसी शब्द आहे. 'तुम्ही' या अर्थाने उस्तेद असेल तर अरबीफारसी कनेक्शन नसावे. विकी पाहता खालील माहिती मिळाली:
usted. The formal second-person pronoun usted is derived from a shortening of the old form of address Vuestra merced, as seen in dialectal Spanish vosted, Catalan vostè, etc. Usted is the remaining form from a number of variants used in Renaissance Spanish, such as Usté, Uced, Vuesa Merced, Vuesarced, Vusted, Su Merced, Vuesasted or Voaced.[12] The possibility of a link with the Arabic word ustādh ('mister'/'professor'/'doctor') seems very remote.
वुस्तेद, वुस्ते, इ. रूपांमधील व्ही गळून मग नुसता उस्तेद उरलाय असे विकी सांगतो अन ते सयुक्तिकही वाटते. असे अजूनेक उदा. म्हणजे होमेरिक ग्रीकमध्ये सम्राटासाठी wanax असा शब्द आहे. पुढे होमरोत्तरकालीन क्लासिकल ग्रीकमध्ये तोच शब्द anax असा झाला- सुरुवातीचे 'डब्ल्यू' गाळल्या गेले. (त्याचे ग्रीक नाव डायगॅमा होते.)
अजून अवांतरः स्पॅनिश ही लॅटिनोद्भव भाषा आहे त्यामुळे लॅटिनमधील vos (तुम्ही) चीच निरनिराळी रूपे इटालियन, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज़, इ. भाषांमध्ये दिसतात. लॅटिनमधील vos चे कनेक्शन संस्कृतातही सापडते- युष्मद् (तुम्ही) या सर्वनामाचे षष्ठी बहुवचनाचे वैकल्पिक रूप वः असे आहे. शेवटी एकाच फ्यामिलीतल्या भाषा असल्याची साक्ष पटते ती अशी- भले मग वरकरणी कितीही वेगळेपणा असो.
23 Mar 2015 - 2:17 pm | आतिवास
माहितीसाठी आभार.
23 Mar 2015 - 10:52 am | बॅटमॅन
दरी ही फारसीचीच एक बोली वाटावी इतपत साम्य दिसतंय तुम्ही दिलेल्या नमुन्यांवरून.
बाकी वारांची नावे ग्रीकमध्येही अशाच प्रकारची आहेत (रविवार ते शनिवार): किरियाकी, देव्तेरा, त्रीति, तेतार्ति, पारास्केव्ही आणि साव्व्हातो.
बाकी हसतखेळत दरीची ओळख करून दिल्यामुळे एक दरी सांधल्यागत वाटतंय एकदम.
23 Mar 2015 - 12:02 pm | सुनील
काय आळशी लोकं आहेत! नवे शब्द बनवायला, पाठ करायला नकोत!! ;)
ते जर्मनही तसेच. बुधवारला चक्क आठवड्याचा मधला वार (Mittwoch) म्हणून मोकळे!
23 Mar 2015 - 12:12 pm | बॅटमॅन
वा! ही रोचक माहिती आहे. धन्यवाद!
23 Mar 2015 - 2:40 pm | आतिवास
दरी ही फारसीची अफगाण आवृत्ती आहे. काही फरक आहेत, अर्थात.
23 Mar 2015 - 3:08 pm | बॅटमॅन
धन्यवाद. दिलेल्या शब्दांवरून सध्याच्या 'स्टँडर्ड' फारसीशी दरीचे अतिशय निकट साधर्म्य जाणवते म्हणून म्हणालो इतकेच.
23 Mar 2015 - 11:27 am | अत्रुप्त आत्मा
भाषिक मेजवानी मिळालि आज! दिल खुश हो गया! :HAPPY:
समांतर:-
@अशा रीतींने पोट भरण्याइतकी "दरी" मी शिकले.> एव्हढ्यापुरतं तिला , उदरी का म्हणु नये? ;-)
23 Mar 2015 - 2:41 pm | आतिवास
:-)
23 Mar 2015 - 11:37 am | सुनील
'दरी'ची ओळख आवडली.
23 Mar 2015 - 1:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
एका नविन भाषेची ओळख आवडली. अफगाणिस्तान तर तसा भारताचा शेजारी आणि इंडो-युरोपियन व विषेशतः इंडो-पर्शियन(इरानियन) भाषिक-राजकीय-सामाजीक देवाणघेवाणीतला घट्ट साथीदार. त्यामुळे सामायिक शब्द भांडार सहाजिक आहे.
भारत आणि अफगाणिस्तानच्यामध्ये असलेल्या बलुच भाषेशी थोडासा संबंध आला होता. दरी आणि बलुचीमध्ये बरीच साम्ये दिसतात.
अरबी ही वेगळ्या (सेमेटीक, सायरो-अरेबियन) भाषा कुटुंबातील भाषा असली तरी प्राचिन काळापासूनच्या व्यापारी संबंधामुळे अरबास्थानच्या व्दीपकल्पाच्या पुर्व व दक्षिण किनारपट्टीवर असलेल्या ओमान आणि संयुक्त अमिरातीमधल्या अरबीमध्ये मराठीशी उच्चार आणि अर्थाचे साम्य असणारे शब्द लक्षणिय प्रमाणात आहेत. या किनार्यापासून दूर उत्तर आणि पश्चिमेकडे जाऊ लागले की (उदा, सौदी अरेबिया) ते प्रमाण खूप कमी कमी होत जाते. पण तेथेही बाबा (पिता या अर्थाने), उम्मी (अम्मी), बस, खलास, मालूम, इ शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जातात.
24 Mar 2015 - 11:01 am | आतिवास
माहितीसाठी धन्यवाद.
23 Mar 2015 - 10:15 pm | अर्धवटराव
तुम्ही फार खुल्या मनाने जगता मॅडम. एकदम फस्क्लास.
यानंतर पोर्तुगीज सेरीजची वाट बघण्यात येईल :)
23 Mar 2015 - 10:32 pm | मयुरा गुप्ते
आतिवास ताई,
दरी भाषेची ओळख आवडली. दुसर्या भाषेचे साधर्म्य नेहमीच सुखावुन जाते. तामिळ्मध्ये, तेलुगु मध्ये पाटाला (बसण्याचा पाट) 'पिट' किंवा 'पिट्म' म्हणतात हे ऐकल्यावर तर गंमतच वाटली होती.
तसचं भोजपुरी मध्ये आजी ला आजीच म्हणतात हे ही असचं कळलं होतं जेव्हा आमचा घरातल्यांचा संवाद एका बिगर मराठी कुटुंबापुढे चालला होता.
मध्ये एकदा एक पाकिस्तानी सिरियल बघितली होती, त्या मध्ये तर अनेक ओळखीचे शब्द ऐकले. आपण चपला 'बाहेर' काढुन ठेव.. तर ते ही(पाकिस्तानी उर्दु) 'अब्बा बाहेर गये है' असचं म्हणतात.
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत...
--मयुरा.
24 Mar 2015 - 11:04 am | आतिवास
हे माहिती नव्हतं.
गढवालीत 'महतारी' शब्द आहे.
24 Mar 2015 - 12:37 pm | बॅटमॅन
महतारी हा शब्द तर अजूनच रोचक आहे. अजून कुठल्या भाषेत हा शब्द आहे ते पाहिलं पाहिजे. मराठीशी इतके साम्य? नौ दॅट्स समथिंग.
24 Mar 2015 - 1:10 pm | सुनील
उत्तराखंडातील बरेच लोक हे महाराष्ट्रातून स्थलांतरीत झालेले आहेत. बहुधा १८५७ नंतर नानासाहेबांबरोबर. गोविंद बल्लभ पंत, हे त्यापैकीच.
अर्थात, भाषिक साधर्म्याचे हेच कारण असेल असे नाही.
24 Mar 2015 - 1:45 pm | बॅटमॅन
इंडीड. पगडींच्या आत्मचरित्रात हा पंतवाला उल्लेख वाचला होता.
23 Mar 2015 - 10:58 pm | नंदन
सुरेख लेख, अतिशय आवडला. आवडीच्या विषयावरचा असल्याने काकणभर अधिकच!
'दरी' ही फारसीचीच बोली असल्याने बरेच शब्द अर्थातच सामाईक आहेत, पण रोजच्या बोलण्यातली उदाहरणं ऐकून गंमत वाटली. खालील वाक्यच पहा:
मराठी - समोसा गरम आहे.
सिंधी - समोसा गरम आहे.
फारशी - सम्बूसा गरम अस्त.
बाकी, इंग्रजीतून फारशीत आले आहेत असे वाटणारे अनेक शब्द खरं तर फ्रेंचमधून आयात झाले आहेत. (त्याव्यतिरिक्त, आभार मानण्यासाठी प्रचलित असलेला 'मेर्सी'ही फ्रेंचच.) मात्र जवळच्या नात्यासाठीचे शब्द हे इंग्रजीतून आले नसून, प्रोटो-इंडो-युरोपियनच्या समान वारशातून आलेले दिसतात.
26 Mar 2015 - 1:17 am | आतिवास
मात्र जवळच्या नात्यासाठीचे शब्द हे इंग्रजीतून आले नसून, प्रोटो-इंडो-युरोपियनच्या समान वारशातून आलेले दिसतात.
या दुरुस्तीसाठी आभार. "इंग्रजी'' हा शब्द मोघम वापरला गेला आहे माझ्याकडून.
24 Mar 2015 - 2:13 am | खटपट्या
खूपच मस्त, रोचक माहीती....
लेख नेहमीप्रमाणे उत्तम...
24 Mar 2015 - 2:31 am | रुपी
नेहमीप्रमाणेच मस्त!
24 Mar 2015 - 9:18 am | प्रचेतस
अतिशय उत्तम लेखमाला.
24 Mar 2015 - 11:18 am | सस्नेह
दरी भाषेची मजेदार तोंडओळख.
24 Mar 2015 - 7:03 pm | धमाल मुलगा
फारच छान लिहिता तुम्ही. 'दरी'ची ओळखही सुंदरच.
बाकी, अफगाणी जनतेबद्दल का कोणजाणे एक अनामिक आपुलकी(खरं तर त्या भावनेला आपुलकी म्हणण्याइतकी तिव्रता नाही, बहुतेक जवळीक म्हणता येईल) वाटते. पण त्या प्रांताची अन लोकांची आम्हाला ओळख म्हणजे काबुलीवाला ते तालीबान इतकीच. निळू दामलेंच्या 'अवघड अफगाणिस्तान' नंतर बहुतेक तुमचंच लेखन वाचायला मिळतंय. :)
और भी लिख्खो!
24 Mar 2015 - 9:19 pm | खेडूत
नेहमीप्रमाणेच हाही भाग आवडला.
विदेशी भाषा ऐकणे आणि साम्य शोधणे हे बुद्धीला खाद्य असते!
Emirates च्या विमानात ते इमारात असा उच्चार करतात तेव्हा त्यांच्या देशाचं नावही इमारत या अर्थानं असल्याचं जाणवतं .आपण त्याला अमिरात का म्हणतो?
तसेच अननस ला जर्मन्स पण अननस म्हणतात हे कळल्यावर खूप आश्चर्य वाटले होते.
24 Mar 2015 - 9:43 pm | खटपट्या
जबराट
24 Mar 2015 - 10:20 pm | आतिवास
मी सध्या मोझाम्बिकमध्ये 'अननस'च खाते- तोच पोर्तुगीज शब्द आहे, :-)
ananás -ऑननाश म्हणतात. इथं अ आणि ऑ च्या मधला उच्चार आहे.
24 Mar 2015 - 10:22 pm | मधुरा देशपांडे
फक्त उच्चार 'अनानास' (Ananas) असा करतात आणि 'ती' अनानास असे संबोधतात. :)
26 Mar 2015 - 2:51 am | टीपीके
स्विडीश , डेनिश आणि नॉर्वेजियन पण अननसच म्हणतात
27 Mar 2015 - 11:38 am | पिशी अबोली
अननसाला इंग्रजी सोडून इतर अनेक भाषांमधे अननसच म्हणतात असं ऐकलं होत. इथल्या उदाहरणांवरून खरं वाटतंय.
27 Mar 2015 - 2:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
अननस ही वनस्पती मूळची मध्य आणि दक्षिण अमेरिकेतली. तिला पोर्तुगिजांनी ब्राझीलमधून प्रथम युरोपात आणले आणि नंतर तिचा जगभर प्रसार झाला. त्याअगोदर ही वनस्पती जगाच्या इतर भागात आस्तित्वात नसल्याने त्याचे अननस / अनानास हे Guarani या मेझोअमेरिकन भाषेतले मूळ नाव तिच्याबरोबर आले आणि जगभरच्या भाषांमध्ये स्थिरावले. अरबीमध्येही तिला अनानास असेच म्हणतात.
27 Mar 2015 - 3:46 pm | खेडूत
म्हणजे बाहेरून आलेल्या चहाचं सुद्धा चा/ चाई असं नाव बऱ्याच देशांत असणार !
27 Mar 2015 - 4:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
चा मूळचा चीनचा. चीनी भाषेत तो जरा ठसक्यात उच्चारला जातो आणि त्याचा उच्चार च्हा या शब्दाच्या जवळ जातो. रेशिममार्गाचे (सिल्करूटचे) नाव चिनी रेशमाच्या व्यवसायावरून पडले असले तरी त्या मार्गांवरून चिनी चहाचाही महत्वाचा व्यापार होत होता. नंतर वसाहतवादाच्या सुरुवातीस चहाच्या व्यापारावर चोरीमारी-जबरदस्ती-युद्धाच्या मार्गाने इंग्रजांनी कबजा केला. चीनमधून पहिल्याप्रथम चोरून आणलेल्या चहाच्या झाडांची लागवड ब्रिटिशांनी दार्जिलिंग येथे केली. युरोप व अमेरिकेतल्या चहाच्या व्यापारावर नियंत्रण ठेवून इस्ट इंडिया कंपनी गब्बर झाली. चहासंबंधीच्या जुलूमी कायद्यांमुळे बोस्टन टी पार्टीच्या रुपाने अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाची पहिली ठिणगी पडली ! यासंबद्धीचा अधिक तपशील या ठिकाणी १. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी (The British East India Company) या विभागात सापडेल.
जगात बर्याच देशांत (विशेषतः अशियात) चहाला चा, चाय, शाय, शायी असे संबोधले जाते.
30 Mar 2015 - 8:26 pm | आदूबाळ
इस्ट इंडिया कं गब्बर होण्यामध्ये चीनमध्ये विकलेल्या (आणि भारतात पिकलेल्या) अफूचाही मोठा वाटा होता.
25 Mar 2015 - 4:09 am | अभिजीत अवलिया
हा ही भाग एकदम मस्त लिहिलाय तुम्ही. 'आम्ही नेहमी इंग्लीश बोलत राहिलो, तर दरी आणि पाश्तो लयाला जातील ना'. आपल्या मातृभाषेवरचे त्यांचे प्रेम आवडले.
येऊ द्या अजुन.
25 Mar 2015 - 11:47 pm | मयुरा गुप्ते
आजी ह्या भोजपुरी शब्दासाठी छोटीशी सुधारणा आहे.
फक्त वडिलांच्या आई ला (Paternal Grandmother) आजी किंवा दादी म्हणतात(विकिवरचा संदर्भ).
(इतर हिंदी भाषेप्रमाणे) आईच्या आई ला नानीच म्ह्णतात.
थोडसं अवांतर-पश्चिम बंगाल आणि विशेषतः नेपाळ मध्ये अनेक प्रधान्,धर्माधिकारी, अधिकारी अशी आडनावाची कुटुंब बघितली होती.
--मयुरा.
26 Mar 2015 - 3:19 pm | बॅटमॅन
नेपाळमध्ये पशुपतिनाथाच्या पूजेकरिता 'दक्षिणी' ब्राह्मणच नेमावयाचे अशी पुरातन चाल असल्याचे वाचले होते. यात अर्थातच मराठीही आले. (दख्खन इ.इ.) त्यांपैकीच असावेत हे.
26 Mar 2015 - 3:37 pm | विशाल कुलकर्णी
सुंदर आणि माहितीपूर्ण लेख ताई !
27 Mar 2015 - 11:13 am | पलाश
सुंदर लेखमाला. अगदी वेगळया जगाच्या सफरीवर घेऊन जाता तुम्ही आम्हां वाचकवर्गाला!!! :)
27 Mar 2015 - 11:39 am | पिशी अबोली
खूपच मजा आली हा लेख वाचताना. :)
27 Mar 2015 - 1:32 pm | आतिवास
सर्व वाचकांचे आणि उत्साही प्रतिसादकांचे आभार.
30 Mar 2015 - 5:56 pm | चिगो
भाषा आणि शब्दसाधर्म्याची रोचक माहिती.. खुर्चीकरीता "सोकी" हा चौकीशी जवळ जाणारा शब्द अहोमियात वापरतात. ('च' चा उच्चार 'स' होत असल्याने 'चौकी'ची 'सोकी' होते.) आम्हाला मात्र चौकी म्हणजे पोलिसचौकी इतकंच माहीत आहे..
30 Mar 2015 - 6:53 pm | सूड
मस्त!!
27 Oct 2015 - 9:10 am | सुमीत भातखंडे
“आम्ही नेहमी इंग्लीश बोलत राहिलो, तर दरी आणि पाश्तो लयाला जातील ना! त्यामुळे वेळ ठरवून भेटायला येशील तेव्हा दुभाषा हवाच!"
हे आवडलं!
छान चाललेय लेखमाला.