त्यांचाच जीव घे तू ..
त्यांचाच जीव घे तू .....
हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता
म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता
मातीत राबताना इतके कळून आले
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!
पर्जन्य, पीकपाणी, दुष्काळ, कर्ज, देणी
शांती महागडी अन केवळ तणाव सस्ता
मरतोय अन्नदाता पर्वा न शासकांना
करतात भाषणे ते आणून आव सस्ता
लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?
सत्याग्रहास आता रक्तात माखवावे
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता