मराठी गझल

एक केवळ बाप तो

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
27 May 2015 - 10:30 pm

एक केवळ बाप तो

तापणारा तापतो अन मजवरी संतापतो
मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो

तापल्या मातीकुतीला या ढगांची ओढणी
ओढताना ओढणीला सूर्यही मग धापतो

अंतरात्म्याचा दुरावा वाढला जर फ़ार तर
अंतराला अंतराच्या अंतराने कापतो

वाचणारा वाचतो पण; का? कशाला? जाणतो?
वाढवाया आत्मगौरव छापणारा छापतो?

आसवांच्या आसवांना धीर द्याया धावतो
निर्भयाला अभय ज्याचे एक केवळ बाप तो

                            - गंगाधर मुटे 'अभय’
----------------------------------------------

अभय-गझलमराठी गझलकवितागझल

...देव आहे अंतरी

अजय जोशी's picture
अजय जोशी in जे न देखे रवी...
30 Apr 2015 - 7:17 pm

गझल...

तू मला टाळून कळले, लपविले जे अंतरी..
आणखी आणू नको तू आव कुठले अंतरी..!

दूर तू असतेस आता, काळजी कुठली नसे...
भेट की भेटू नको विश्वास आहे अंतरी..!

मन तुझे कळले मला शब्दांविना स्पर्शातुनी..
फारही सांगू नको तू ठेव थोडे अंतरी..!

मी तुला भेटायला इतके मुखवटे चढविले..
आणि ओळखलेस तेंव्हा भाव फुलले अंतरी..!

ती गुलाबाची कळी पाहून मी स्मरले तुला..
फुलत गेले आठवांचे रोम हर्षे अंतरी..!

आज तू पुसलेस अश्रू, पायही दमले तुझे..
केवढे छळलेस पूर्वी, काय पिकते अंतरी..?

मराठी गझलगझल

पाहून घे महात्म्या

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
21 Apr 2015 - 3:54 pm

पाहून घे महात्म्या
पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने

तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
तुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने

चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने

संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने

आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने

वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने

मराठी गझलवाङ्मयशेतीगझल

वाटले नव्हते कधी

नाहिद नालबंद's picture
नाहिद नालबंद in जे न देखे रवी...
13 Apr 2015 - 8:06 pm

हे असे घडणार काही वाटले नव्हते कधी
पोळले तुज चांदणेही वाटले नव्हते कधी

ठरविले वेडा जगाने ना तयाचे दु:ख पण
तू मला वेडा म्हणावे वाटले नव्हते कधी

बेत काही मी उद्याचे योजिले माझ्या मनी
पण उलट पडतील फासे वाटले नव्हते कधी

भेटण्यासाठी तुला मी आतुर जेवढी इथे
तेवढा आहेस तू ही वाटले नव्हते कधी

चंद्र बघतो नेहमी पण एकदा पाहिन धरा
मीच त्या चंद्रावरुनी वाटले नव्हते कधी

सोबती नुरले कुणीही शेवटी सोडेल ती
सावलीही साथ माझी वाटले नव्हते कधी

मराठी गझलगझल

नाटक वाटू नये

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
7 Apr 2015 - 7:27 pm

नाटक वाटू नये

थुंकली थुंकी पुन्हा पुन्हा, उगीच चाटू नये
नाटक सुद्धा असेच वठव की, नाटक वाटू नये

लाख उमटू दे देहावरती, आपुलकीची चरे
पण इवलेसे काळीज माझे, तितुके फाटू नये

नकोस दाखवू दिव्य धबधबे, अत्तरवर्णी झरे
मी मागत नाही फार परंतु; पाझर आटू नये

वरून सांत्वन, आतून चिमटा; नाद तुझा वेगळा
जाणीव इतकी तरी असू दे, मैतर बाटू नये

सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नये

पिकल्या फळांनी लदबदलेले, रान जरी मोकळे
हवे तेवढे भरपूर खावे, फुटवे छाटू नये

अभय-काव्यअभय-गझलमराठी गझलवाङ्मयकवितागझल

एक जिलबी पाडायचीच

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
27 Mar 2015 - 11:01 am

नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य साहित्यच का मिपा वर पोस्ट करावं म्हटलं...
आज वैताग आलाय, कंटाळा आलाय, अशात काही सुचतं का बघावं म्हटलं...
यमक जुळतं का बघावं म्हटलं...

तर ही घ्या एक ओढून ताणून जिलबी
a

सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच
आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच

कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात
आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच

आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं
कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच

अभय-गझलभावकविताभूछत्रीमराठी गझलवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसगझल

चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
25 Feb 2015 - 8:58 am

चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला
"चांगला असणे"च ह्याचा दोष "त्या"ला घावला ..

आज पटली त्या यमाला फार माझी थोरवी
श्वासही माझाच तो का पळवण्याला धावला ..

एक सदरा मी सुखाचा माणसाचा घातला
फाडण्याचा घाट त्यांचा का अती सोकावला ..

हाय ना मी फेडला पहिला नवस त्याचा कधी
क्षण सुखाचा मज मिळेना देवही रागावला

लेउनीया साज आली कामिनी थाटात ती
तेज बघुनी कामिनीचे साजही भारावला

मराठी गझलशांतरसकवितागझल

काळजावर मोगर्‍याचे वार झाले

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
31 Jan 2015 - 7:51 pm

आज डोळा आसवांचे भार झाले
वेदनांचे मोकळे कोठार झाले

दुश्मनांची राहिली ना जरब काही
ओळखीचे चोर येथे फार झाले

देवभोळा साव आता मी न उरलो
दैव माझे यारहो गद्दार झाले

भ्रष्ट का अंधारही होतो अताशा..?
चंद्र तारे कां निशेचे, 'जार' झाले?

आळ घ्यावा ज्यावरी, ना शस्त्र उरले
काळजावर मोगर्‍याचे वार झाले

वाचले जे झुंजले जगती 'विशाला'
पाठ दावुन धावले ते ठार झाले !
***********************************
(वृत्त:मंजुघोषा)

मराठी गझलगझल

'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे'

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
28 Jan 2015 - 8:24 am

***********************************

किती वाकुडे बोल बोलून झाले
स्वत:च्याच सत्वास गाळून झाले

धरा सांगताहे कथा पावसाची
किती थेंब पदरात झेलून झाले ?

जरी भोवती 'माणसे' फार झाली
तरी एकट्यानेच 'खेळून' झाले

नको रोकडा, दागिनेही नकोसे
बियाण्यासवे सत्व तोलून झाले

जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ?
चकोरापरी प्राण उधळून झाले

कसा रे मुरारी तुझा हा अबोला?
सुरांवर तुझ्या आज भाळून झाले

'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे'
पुन्हा आरशालाच टाळून झाले

किती राहिले श्वास देहात बाकी ?
'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ?

मराठी गझलगझल

वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे?

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
24 Jan 2015 - 2:49 pm

शब्दात गझल वेड्या गावेल का कधी रे?
मोजून फक्त मात्रा साधेल का कधी रे?

करतोस काय गप्पा नुसत्याच काफियांच्या?
वगळून आशयाला चालेल का कधी रे?

नाही मनात श्रद्धा, अन् हात जोडलेले
दगडात देव आहे वाटेल का कधी रे?

खुर्चीच माय झाली स्वार्थांध मानवाची
सत्तेशिवाय त्याचे भागेल का कधी रे?

टाळून याचकाला, अभिषेक सावळ्याचा
वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे?

व्हावे 'विशाल' आता, कोतेपणा गळावा
वृत्ती मनामधे ही बाणेल का कधी रे?

विशाल...

मराठी गझलगझल