भारतीय घटना ही जगातील महत्त्वाच्या घटनांपैकी एक समजली जाते. त्याबद्द्ल अनेक समज/गैरसमज माझ्या मनात आहेत. तुमच्याहि असतील. म्हणून सध्या याविषयी वाचन चालु आहे. मात्र हे अर्थात इंग्रजीतून. मराठी मधील एखाद दोन पुस्तके चाळली. त्यातील भाषा मला तरी निरस वाटली. (ह्या विषयावर लिहिताना मख्खपणा बाळगलाच पाहिजे असं संविधानात लिहिलं आहे का ते बघत होतो )
तर मला जे थोडंफार समजलं ते मला समजणार्या भाषेत यावं म्हणून ही लेखमाला सुरु करत आहे. यानिमित्ताने तुमचे समज /गैरसमज दूर झाले/पुष्टी मिळाली तर उत्तमच. काहि नवीन नसलं तर निदान जालावर एक दस्तऐवज उपलब्ध राहिलच. आशा आहे हा उपक्रम तुम्हाला आवडेल.
--------------------------
संविधानाची - घटनेची गरजच काय? संविधान म्हणजे काय? समाजाचे आणि घटनेचे नक्की नाते काय? माझ्या रोजच्या कामाच्या धबडग्यात ही घटना डोकावते तरी का? या व अश्या प्रश्नांची उत्तरे वाटतात तितकी सोपी नसली तरी तितकी कठीणहि नाहित. व्यक्ती तितक्या प्रकृती हे आपल्याला माहितच आहे. विविध प्रकारच्या व्यक्ती एकत्र नांदताना मतभेद हे असणारच. मग समाज कसा चालवायचा? तर ठराविक समाजाने स्वतःला आखुन घेतलेली चौकट अशी घटनेची अत्यंत ढोबळ व्याख्या करता येईल.
घटनेची उद्दीष्टे:
१. समाजाच्या विविध घटकांमधे सुसंबद्धता येण्यासाठी एक सर्वमान्य / बहुमान्य पायाभुत नियमावली उपलब्ध करणे: विविध घटकांना एकत्र ठेवायचे तर घटनेमधे एक ठोस नियमावली असणे गरजेचे आहे. घटना असे मुलभूत नियम मांडते जे समाजातील प्रत्येक घटकाला - ज्यात नागरिक आणि राज्यकर्ते दोघेहि आले - पाळणे सक्तीचे असते. अशी मुलभुत तत्त्वे बनविताना फार काळजी घ्यावी लागते. कारण जर एखादा घटक एखादे तत्त्व मानेनासा झाला तर इतरहि मानायला तयार होत नाहित.
२. समाजातील अधिकाराची रचना करणे व अधिकार्याचे (सरकारचे) स्वरूप मांडणे: समाज चालवायचा तर कोणाला तरी काहितरी निर्णय घेणे क्रमप्राप्तच आहे. एखाद्याला "अ" कायदा असावासा वाटतो तर दुसर्याला "ब" कायदा. अश्यावेळी कोणाकडे कायदा करण्याचा अधिकार असणार हे घटना ठरवते. प्रत्येक देशात याचं उत्तर वेगवेगळं असु शकतं. जसं राजेशाहि देशांमधे राजाला / राष्ट्रप्रमुखाला कायदा करण्याची / शासन करण्याचा अधिकार असतो. तर जुन्या सोवियत राज्यांप्रमाणे एकाच पक्षाला तो अधिकार दिला जाऊ शकतो. मात्र लोकशाहि देशांमधे हा अधिकार "जनतेला" असतो असं ढोबळपणे म्हणता येईल.
३.अधिकार्याच्या (सरकारच्या) आधिकारावर नियंत्रण ठेवणे: एखाद्याला अधिकार दिला म्हणजे ती व्यक्ती / संस्था काय हवं ते करू शकते असं होणं धोकादायक असतं अश्यावेळी प्रत्येक अधिकारक्षेत्रावर अंकुश असणे गरजेचे ठरते.घटना सरकारच्या अधिकारावर नियंत्रणहि ठेवते. सरकार कोणते निर्णय घेऊ शकते आणि कोणते निर्णय / हक्क डावलु शकत नाहि हे देखील घटनाच ठरवते. हे करण्याची सगळ्यात प्रमुख पद्धत म्हणजे घटनेची मुलभूत तत्त्वे मांडणे. जसे भारतीय घटनेने जनतेला विविध प्रकारचे स्वातंत्र्य प्रदान केले आहे ज्यात असणारे बोलण्याचे स्वातंत्र्य, वैयक्तीक निर्णयस्वातंत्र्य, एकत्र येण्याचे स्वातंत्र्य, व्यापाराचे स्वातंत्र्य, धर्माचे स्वातंत्र्य वगैरे गोष्टी मुलभूत तत्त्वांमधे येतात.
४.समाजाच्या बदलत्या गरजा/जाणीवा/आकांक्षा पूर्ण करणे: समाज सतत बदलत असतो. त्याबरोबर त्याच्या गरजा , जाणीवा, आकांक्षा देखील बदलतात. घटनेमधे या बदलत्या गरजांची पुर्तता करण्याची लवचिकता असणे गरजेचे आहे.
५. समाजोपयोगी बंधने घालणे: याशिवाय घटना फक्त नियम बनवत नाहि तर काहि देशांत घटना शासनाला जनतेसाठी काहि गोष्टी करणे बंधनकारक करते. जसे साऊथ आफ्रिकेमधे रंगभेदाचे - वंशभेदाचे निर्मुलन करणे सरकारसाठी घटनेने बंधनकारक केले आहे. तर इंडोनिशिया मधे सरकारवर प्रत्येक नागरीकाला शिक्षण व आरोग्य सुविधा पुरविणे (केवळ उपलब्ध करणे नाहि तर पुरविणे) बंधनकारक आहे.
६. समाजाला ओळख मिळवून देणे: शेवटचं आणि बहुदा सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे समाजाला ओळख मिळवून देणे.
----------
समांतर अवांतरः टेक अ ब्रेक
घटना बनविणे ही एक अत्यंत कठीण गोष्ट आहे. कारण बनलेली घटना हा तसं पहायला गेलं तर केवळ एक दस्तऐवज असतो. मात्र त्याप्रमाणे आचरण करणे जनतेची जबाबदारी असते. उदाहरण द्यायचं झालं तर नेपाळची राज्यघटना घ्या. १९४८ पासून ते आतापर्यंत एकूण पाच वेळा घटना लिहिली गेली आणि ती दरवेळी कोसळली. १९९० पर्यंत देशाचा राजाच ती घटना लिहित होता. नंतर १९९० मधेअनेक पार्ट्यांना मान्यता मिळाली तरीही राजाच सर्वात वर होता. पुढे राजा कसा पदच्युत झाला हे सर्वज्ञात आहेच.
------------
भारतीय संविधानाचे गठन
भारतीय राज्यघटना समिती स्वातंत्र्यापूर्वीच बनली होती. हि समिती अखंड भारतासाठी घटना लिहिण्यासाठी बनविली होती. या समितीची पहिली सभा ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली तर भारताचे विभाजन झाल्यानंतर समितीची पुनर्रचना झाली आणि या समितीची पहिली बैठक १४ ऑगस्ट १९४७ रोजी झाली.
या समितीची रचना साधारणतः कॅबिनेट मिशनमधे सांगितलेल्या तत्त्वांनुसार झाली होती. ते नियम असे:
- प्रत्येक प्रांत, संस्थाने यांना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर या समितीमधे १:१०,००,००० या प्रमाणात जागा दिल्या होत्या. त्यामुळे ब्रिटीश अंमलाखाली सणार्या प्रांताचे २९२ प्रतिनीधी, तर स्वायत्त संस्थानांचे ९३ प्रतिनीधी या समितीवर होते.
- प्रत्येक प्रांतातील जागा लोकसंखेतील हिश्यानूसार हिंदु, मुसलमान, शीख आणि इतर या भागात विभागल्या गेल्या जेणेकरून सर्व प्रकारच्या जनतेला प्रतिनिधित्त्व मिळावे
पुढे फाळणीनंतर २९२ ऐवजी २८४ प्रतिनीधींनी पुन्हा एकदा स्वतंत्रपणे घटना समितीची शपथ घेण्याची तयारी दाखवली. या प्रतिनिंधीच्या सहिने पुढे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अनेक प्रकारच्या वाद-विवादांनंतर घटना संमत झाली.
भारतीय संविधान आयोगाला अत्यंत घृणास्पद अश्या फाळाणीची पार्श्वभूमी होती. त्या दंगलीच्या नृशंतेमुळे सर्वधर्मसमभावाला आणि धर्माला नागरीकत्त्वाच्या आड येऊ देता कामा नये या विचाराने जाणार्यांची संख्या वाढली त्याचेच प्रतिबिंब घटनेत दिसून येते. भारतीय राज्यघटनेच्या यशाची मिमांसा करताना भारतातील विविध समाजगटांना, धर्मांना, विचारांना, जाती, जमातींना या संविधानसमितीत मिळालेल स्थान हे महत्त्वाचे कारण दिले जाते.
ह्या संविधान समितीमधे अनेक गोष्टींवर मतभेद व्यक्त झाले. भारताच्या विविध भागांतून आलेल्या प्रतिनिधींमधे अनेक विषयांवर दुमते होते. जसे, भारताचे शासन एककेंद्रानुचालित असावे का? राज्ये आणि केंद्राचे नाते/संबंध/नियम कसे असावे? न्यायसंस्थेच्या जबाबदार्या व हक्क किती व कोणते? घटनेने मालमत्तेचा हक्क (प्रॉपर्टी राईट) द्यावा की देऊ नये? वगैरे अनेक पायाभुत मुद्द्यांवर अत्यंत सविस्तर चर्चा झाल्या, वाद झाले. भारतीय घटनेतील जवळजवळ प्रत्येक कलम अत्यंत प्रामाणिकपणाने, निस्वार्थबुद्धीने आणि मुख्य म्हणजे अगदी तपशीलवार चर्चिले गेले. भारतीय घटनेमधे फक्त एक कलम असे आहे ज्यावर एका शब्दाचीहि चर्चा झाली नाहि अथवा मतभेद व्यक्त झाला नाहि. ते म्हणजे "ठराविक वयाच्या प्रत्येक भारतीय नागरीकाला, त्याचा/तिचा धर्म, जात, शिक्षण, लिंग, मिळकत इ. काहिहि न बघता दिलेल्या एका मताचा अधिकार". या कलमाव्यतिरिक्त प्रत्येक कलम अत्यंत तपशीलात चर्चिले गेले.
यातील अनेक विवाद इतके मुद्देसुद आहेत की ते वाचून सहज कल्पना यावी की भारतीय राज्यघटना लिहिण्याचा हा प्रवास अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांत्यांच्या तोलामोलाचा का समजला जातो. संविधान समितीचा कारभार अत्यंत पारदरर्शी होता. राजेंद्रप्रसाद, आंबेडकर, नेहरू, मौलाना आझाद आदी अनेक नेते मंडळी ह्या समितीमधे होती. त्याच्यातहि खुप मतभेद होते. आंबेडकरांचा मागासर्वर्गियांच्या उन्नटीसासाठी गांधी-नेहरु काय घटनेमधे करताहेत हा सवाल असो वा सरदारपटेल व नेहेरूंमधील अनेक प्रसिद्ध वाद असोत. प्रत्येक प्रश्न हा मुद्देसुदपणे लेखी स्वरूपात मांडला जात असे व त्यातील प्रत्येक मुद्द्यांला अत्यंत खोलात शिरून विस्तृत उत्तर लेखी स्वरूपात मिळत असे. हे लेखी दस्तऐवज आणि संविधान समितीच्या सभा सर्वसामान्य जनतेला आणि पत्रकारांना खुल्या होत्या.
कुठून काय घेतलं?
"भारतीय राज्यघटना ही फक्त ब्रिटीशांची कॉपी आहे. घटनाकारांनी कलमे जशीच्या तशी उचलली. आपलं असं वेगळं काहि नाहि." अश्या प्रकाची पोकळ टिका घटनेवर व घटना समितीवर होताना कधीकधी दिसते. यात फारसे तथ्य नाहि. आपल्या घटनाकारांनी अनेक देशांच्या घटनांचा सखोल अभ्यास केलेला होता. विविध देशांच्या घटनांतून अनेक कलमे आपल्या घटनेत आली. याशिवाय घटनेतील बरीच कलमे नवी असून ती खास भारतीय समाजासाठीच आहेत. काहि भाग लिहिताना जगातील विविध घटनांचा आधार घेण्यात आला आहे. तो असा:
ब्रिटीश घटना:
- ढोबळ बहुमताचा आदर करणारी मतदान पद्धती(विनर टेक्स ऑल / फर्स्ट पास्ट थ पोस्ट): बहुसंख्यांचा पाठिंबा असणार्याला विजेता म्हणणे. निर्णायक बहुमताचे (५०%च्या वरील मतांचे) बंधन नाहि.
- संसदीय कामकाज पद्धती
- "कायद्याचे राज्य" ही संकल्पना
- लोकसभाध्यक्ष हे पद व त्याची भुमिका
- कायदा बनविण्याच्या पद्धती
आयरीश घटना
डायरेक्टीव्ह प्रिंसिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी: यात भारतीय शासनव्यवस्थेला, (केंद्राला व राज्यांना) नियम, कायदे करण्याबाबत दिग्दर्शन केले आहे. (विकीपिडीया नुसार यावर आयरीश घटनेबरोबरच गांधीवादाचाहि प्रभाव दिसतो)
फ्रेंच घटना
स्वातंत्र्य, समानता व बंधुभाव या तत्त्वांचा वापर
अमेरिकन घटना:
मुलभुत हक्क (चार्टर ऑफ फंडामेंटल राईट्स)
न्यायालयाचे अधिकार, पुनरावलोकन आणि न्यायालयाची स्वायत्तता
कॅनेडीयन घटना:
शासनाची संघराज्यवत रचना (क्वासी फेडरल : प्रबळ असे एक केंद्र व त्याशिवाय घटकराज्यांची संघराज्ये)
पहिल्या भागाचा समारोप करताना सांगता येईल की आपल्या घटनाकारांच्या अथक परिश्रमांनी १६६ दिवसांच्या चर्चेनंतर तयार झालेली हि राज्यघटना आता केवळ दस्तऐवज न राहता आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग झाली आहे. लोकशाहिला अर्थ नाहि, भारतात हुकुमशाहिच हवी असे म्हणणार्यांच्या नाकावर टिच्चुन हे संविधान जवळजवळ गेली सहा दशके नुसटे टिकलेच नाहि तर रुजले आहे.
भारतीय राज्यघटना केवळ आपल्याच देशासाठी नाहि तर अनेक नवस्वतंत्र देशांसाठी एक वस्तुपाठ होता. दक्षिण आफ्रिकेसारख्या अनेक देशांच्या घटनेवर भारतीय मुल्यांची, घटनेची छप जाणवते. आपली घटना स्वातंत्र्यानंतरची एक तात्पुरती सोय न राहता जगातील मोजक्या शक्ती टिकवणार्या शासकीय दस्ताऐजांपैकी एक झाली आहे.
पुढील भागातः आपले घटनादत्त हक्क, अधिकार
-ऋषिकेश
प्रतिक्रिया
1 Jun 2009 - 8:41 pm | क्रान्ति
उपक्रम आवडला आणि अभ्यासपूर्ण लेखही आवडला.
क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा
2 Jun 2009 - 12:06 am | मस्त कलंदर
बर्याचदा नीरस वाटल्याने खूपशा महत्त्वाच्या गोष्टी वाचायच्या टाळल्या जातात.. त्यामुळे हा लेख मनापासून आवडला.. ही माहिती प्रत्येकाला असणं गरजेचं आहे!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
2 Jun 2009 - 6:18 pm | घाशीराम कोतवाल १.२
असा अभ्यास पुर्ण लेख आपण लिहिल्या बद्दल शुभेच्या आणि हि लेखमाला जोरदार होणार
घटना लिहिताना/ बनविताना काय चर्चा मतभेद झाले ते पण लिहा
बाकि पुलेशु
येउ द्या पटापट
**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
2 Jun 2009 - 12:24 am | नंदन
उपक्रम, ऋषिकेश. विशेषकरून भारतीय राज्यघटना ही जशीच्या तशी ब्रिटिश राज्यघटनेवर बेतली असल्याचा आरोप बर्याचदा ऐकायला मिळतो, त्याचे खंडन येथे वाचायला मिळाले हे विशेष. पुढील भागांची वाट पाहतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
2 Jun 2009 - 12:34 am | प्राजु
ऋषि,
लेख आवडला. उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
अभ्यासपूर्ण आहे लेख.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Jun 2009 - 2:15 am | घाटावरचे भट
छान लेख. पुढील लेखाची वाट पाहातो.
- भट
2 Jun 2009 - 6:23 am | सुनील
छान माहितीपूर्वक लेख. आयरिश आणि कॅनेडियन घटनांवरून घेतलेल्या गोष्टी नव्याने समजल्या. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
2 Jun 2009 - 6:59 am | इनोबा म्हणे
माहितीपुर्ण लेख. पुढील भाग लवकर येऊ द्यात.
2 Jun 2009 - 7:08 am | सहज
अतिशय छान सुरवात. मिपावरील उत्तम लेखमाला संग्रहातील हाही एक ऐवज ठरो.
पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
2 Jun 2009 - 9:00 am | अवलिया
अगदी असेच म्हणतो :)
सुरेख :)
--अवलिया
2 Jun 2009 - 1:00 pm | स्वाती दिनेश
अतिशय छान सुरवात. मिपावरील उत्तम लेखमाला संग्रहातील हाही एक ऐवज ठरो.
पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
सहजरावांसारखेच म्हणते,
स्वाती
2 Jun 2009 - 9:16 am | यशोधरा
सुरेख माहितीपूर्ण लेख. आवडला. पुढचा लेख लवकर येऊदेत.
2 Jun 2009 - 11:24 am | नितिन थत्ते
चांगला उपक्रम.
पूर्ण कराल अशा सुभेच्छा देतो.
भारतीय घटनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती अनेक देशांच्या घटनांवर आधारली असली तरी त्यातून काही उघड विसंगती निर्माण झालेली नाही.
खराटा
(रंग माझा वेगळा)
2 Jun 2009 - 11:26 am | परिकथेतील राजकुमार
हि लेखमाला उत्तम होणार यात शंकाच नाही.
पुलेशु
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
2 Jun 2009 - 4:25 pm | सूहास (not verified)
लेखमाला एकदम ऊत्तम...
घटना समीतीवर कोण-कोण होते व त्या॑चा अल्पशा परिचय दिल्यास अतिऊत्तम...
सुहास...
2 Jun 2009 - 6:54 pm | विकास
चांगला उपक्रम आणि लेखमाला वाचण्यासाठी उत्सुक....
आपण कुणाकडून कुठला भाग घेतला ही माहीती वाचनीय आहे. मात्र एक गोष्ट आपल्याकडे वेगळी झाली असे कुठेतरी वाटते की घटना दुरूस्ती हा प्रकार आपल्याकडे नको इतका सोपा आणि कशालाही करायला ठेवून दिला आहे. उ.दा. अमेरिकेने २३३ वर्षात फक्त २७ वेळा घटना दुरूस्ती केली तर भारताने ६० वर्षात ९४ वेळा. यावर अधिक नंतर वेळ मिळाल्यास...
2 Jun 2009 - 7:14 pm | नितिन थत्ते
अमेरिकेने २३३ वर्षात फक्त २७ वेळा घटना दुरूस्ती केली तर भारताने ६० वर्षात ९४ वेळा
ते घटना दुरुस्ती कशाला म्हणायचे यावर अवलंबून आहे.
भारतात राष्ट्रपती राजवट वाढविणे यासाठी सुद्धा घटनादुरुस्ती करावी लागते. भारतातील ९४ पैकी किती दुरुस्त्या अशा प्रकारच्या आहेत हे पहायला हवे. (एक दृष्टीने हे चांगले आहे. म्हणजे 'सरकारला योग्य वाटेपर्यंत राष्ट्रपती राजवट वाढवली आहे' अशी एकवेळची घटनादुरुस्ती करता येत नाही. दर सहा महिन्यांनी २/३ बहुमताने हे करावे लागते.)
खराटा
(रंग माझा वेगळा)
2 Jun 2009 - 7:59 pm | विकास
भारतात आत्तापर्यंत झालेल्या घटना दुरुस्तींची यादी येथे पहाता येईल.
सहा महीन्यांपेक्षा अधिक राष्ट्रपती राजवट ही केवळ पंजाबमधेच झाली असावी असे या यादीवरून वाटते. अर्थात हा विकीसंदर्भ असल्याने तृटी सहज शक्य आहेत :)
2 Jun 2009 - 10:11 pm | नितिन थत्ते
धन्यवाद विकास, अधिकृत यादी पुढील दुव्यावर पाहता येईल.
http://indiacode.nic.in/coiweb/coifiles/amendment.htm
सुरुवातीच्या अनेक दुरुस्त्या या सरकारच्या पुरोगामी धोरणांना हितसंबंधियांकडून 'मूलभूत हक्कां'च्या नावाने आव्हान दिले जात होते आणि न्यायालये असे खटले दाखल करून घेत होती. त्यावर उपाय म्हणून केल्या गेल्या आहेत.
खराटा
(रंग माझा वेगळा)
2 Jun 2009 - 9:02 pm | चित्रा
माहितीपूर्ण लेख आहे. काही गैरसमज दूर करणारा ठरला. खूपच आवडला.
2 Jun 2009 - 10:15 pm | मेघना भुस्कुटे
फार सुरेख उपक्रम. आमच्यासारख्या बेशिस्त उंडग्या वाचणार्या लोकांकरता तर ही पर्वणीच आहे. सगळं काही आयतं. उत्सुकता चाळवली तर प्रश्न विचारा, मग हवे तर संदर्भ मिळवून वाचा, शंकानिरसन करून घ्या...
पुढच्याही भागांची वाट पाहते.
2 Jun 2009 - 10:19 pm | छोटा डॉन
:) असेच म्हणतो रे ॠषी.
पुढच्या भागाची वाट पहात आहे ...
लहानपणी निरस नागरिकशास्त्राने बालपण नासवले होते.
तुझी लेखमाला आता इंटरेस्टिंग वाटते आहे, वाचतो आहे, वाट पहातो आहे पुढच्या भागाची ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
2 Jun 2009 - 10:27 pm | चतुरंग
हा विषय निवडण्याबद्दल तुझे मनःपूर्वक कौतुक!
इतक्या पारदर्शी पद्धतीने आणि लोकांचे हित खर्या अर्थाने डोळ्यांसमोर ठेवून आपल्या घटनेची निर्मिती झाली आहे हे माहीत नव्हते!
कॅनेडिअयन आणि आयरिश घटनांचा संदर्भही विस्मयकारक आहे!
घटनादत्त हक्क आणि अधिकार ह्याचबरोबर 'राष्ट्राप्रति नागरिकांची मूलभूत कर्तव्ये' असा काही मुद्दा घटनेने चर्चेत घेतला आहे का? ह्याची मला उत्सुकता आहे. तुझ्या पुढच्या लेखात ह्याचा धांडोळा घेतलास तर छान होईल!
चतुरंग
2 Jun 2009 - 10:37 pm | नितिन थत्ते
आणीबाणीच्या काळात ४२ वी घटना दुरुस्ती झाली त्यात मुलभूत कर्तव्ये म्हणून कलम ५१ अ मध्ये घालण्यात आली होती.
http://indiacode.nic.in/coiweb/amend/amend42.htm येथे पहा.
याच घटना दुरुस्तीतील इतर अनेक दुरुस्त्या वादग्रस्त ठरल्या होत्या.
तसेच या घटना दुरुस्तीने भारत देश हा सेक्युलर आणि सोशालिस्ट प्रजासत्ताक असल्याचे कलम घालण्यात आले.
खराटा
(रंग माझा वेगळा)
2 Jun 2009 - 10:44 pm | धनंजय
पुढील लेखमालेची वाट बघत आहे.
2 Jun 2009 - 11:54 pm | ऋषिकेश
सर्व प्रतिसादकांचे प्रोत्साहनाबद्दल अनेक आभार.
विकास व खराटा यांचे उत्तमोत्तम पुरवण्यांबद्दल विषेश आभार.
प्रतिक्रिंयांमधे सुचवले गेलेले विषय पुढिल काहि भागांत समाविष्ट करणार आहे. (अदाचित लगेच पुढच्या भागात नसतील तर त्यापुढील भागात घ्यायचा प्रयत्न असेल)
पुन्हा एकदा नमुद करू इच्छितो की मी काहि या विषयातील तज्ञ नाहि. निव्वळ विषयाच्या आवडीपोटी सध्या जे वाचन चालु आहे त्यावर आधारीत लेखमाला लिहिण्याचा प्रयत्न आहे. तृटी/चुका आढळल्यास त्वरीत कळवावे. मागितल्यास मी शक्य तितक्या विधानांचा संदर्भ देण्याचा प्रयत्न करेन. संदर्भ उपलब्ध नसल्यास बहुतेक वेळी लेखात तसे नमुद करण्याचे ठरवले आहे.
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
3 Jun 2009 - 10:16 am | नितिन थत्ते
पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
(तुमची बुद्धी आधीच तेज आहे त्यामुळे लोहाच्या गोळ्या घेवू नका म्हणजे डोके गंजण्याचा प्रश्न येणार नाही) :)
खराटा
(रंग माझा वेगळा)
3 Jun 2009 - 8:27 am | मुक्तसुनीत
लेख आवडला. या निमित्ताने आलेले प्रतिसादही वाचनीय. लेखमालेतील पुढील भागाची वाट पहातो आहे.
3 Jun 2009 - 12:53 pm | Nile
सुरे़ख उपक्रम! येउद्या अजुन.
जाता जाता: drafting comittee मध्ये सहा जण होते पण मला शोधुनही सहजपणे त उरलेल्या पाच जणांची नावं सापडली नाहीत. आपण नावं दिलीत तर तेवढेच आमच्याकडे २ पैसे वाढतील. :)
3 Jun 2009 - 5:55 pm | नितिन थत्ते
Q. 18. Who were the members of the Drafting Committee of the Constitution?
Ans. Dr. B.R. Ambedkar was the Chairman. The other members were M/s N. Gopalaswami Ayyanagar, Alladi Krishnaswami Ayyar, K.M. Munshi, Sayed Mohd. Saadulla, N, Madhava Rau and D.P. Khaitan.
http://www.indiastudychannel.com/resources/47068-Constitution-India.aspx येथे मिळाले.
खराटा
(रंग माझा वेगळा)
6 Jun 2009 - 1:33 am | Nile
(आमचा) धन्यावाद!(गेला परत टाकतो!) :) (फाँटचे रंग का काम करीत नाहीत कुणास ठावुक?)
7 Jun 2009 - 10:49 am | वेताळ
प्रथम लेख पाहिला..मनात आला असले निरस कशाला वाचा म्हणुन वाचला नाही. आज परत वेळ मिळाला म्हणुन वाचुन काढला. मस्तच लेखमाला होणार ह्यात शंका नाही.
भारतीय राजघटना विविध देशातील राज्यघटनांचा अभ्यास करुन तयार करण्यात आली आहे. अजुन एक ह्या घटनांचे वैशिष्टे मागे वाचनात आले होते. ते म्हणजे. अमेरिकन घटना लिहताना घटक राज्यांचा खुप मोठा पगडा होता. प्रत्येक घटक राज्याला स्वःताचे अधिकार व कायदे निर्माण करण्याचा हक्क हवा होता. त्याप्रमाणे तो त्याना तिथे दिला गेला. घटनाकाराना वाटत होते कि अश्या अधिकारामुळे घटक राज्ये मजबुत होणार व केंद्रशाशन निष्क्रिय राहणार. त्यामुळे फुटिरतेचा संघराज्याला धोका निर्माण होणार. पण अमेरिकेत झाले उलटेच आता तिथे केंद्रियसत्ता जगातील सर्वात बलवान सत्ता केंद्र म्हणुन उदयास आले आहे.
आपण मात्र कॅनडाप्रमाणे संघराज्य पध्दत स्विकारली. ह्यात केंद्रसरकार मजबुत राहुन ,राज्यसरकारांना मर्यादीत अधिकार दिले गेले आहेत. पण गेल्या ६० वर्षात आपल्या इथे अगदी उलटच झाले आहे. इथे घटकराज्ये मुजोर झाली आहेत व केंद्रसरकार त्याच्या समोर हतलब झाले आहे.त्यामुळे घटनेच्या मुळ हेतुलाच धोका निर्माण झाला आहे.बाकी जाणकार मंडळी ह्यावर अधिक प्रकाश टाकतील.
अमेरिकेत प्रत्येक राज्यात काही काही कायदे खुपच वेगळे असतात असे वाचनात आले आहे. त्यावर देखिल तिथल्या मंडळीनी लिहावे. क्लिंटन साहेब जर इथे हजर असते तर अजुन खुप माहिती मिळाली असती. लेखमालेस सुभेच्छा.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
7 Jun 2009 - 1:55 pm | बिपिन कार्यकर्ते
ऋषि, काय मस्त लेख रे!!! आणि एकदम नाविन्यपूर्ण विषय. लहानपणी शाळेत ना.शा. आवडायचं. पण पुढे फार संबंध नाही राहिला. आता वाचतोय. पटापट टाक लेख. जास्त वेळ नको काढू.
अवांतर समांतरची कल्पना मस्तच. भारतिय राज्यघटनेचा जगात कुठे कुठे कसा प्रभाव पडला आहे हे शेवटी पण विस्ताराने लिही.
बिपिन कार्यकर्ते