गीतारहस्य चिंतन-१

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
4 Feb 2025 - 1:05 pm

मला साधारणतः खुप प्रश्न‌ पडतात.त्यात जर भारतीय अध्यात्मावर प्रश्न असतील तर किती तरी काळ ते अनुत्तरितच राहायचे.पण जानेवारी २०२५ पासून हा जो लोकमान्य टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ वाचनास सुरूवात केली आहे.त्यामुळे अनेक प्रश्नांची सहज उत्तरे मिळत आहेत.या ग्रंथातील आकलन वा लिहून काढावे असे वाटलेले ज्ञान इथे देत आहे.हे सर्व टिळकांचे मत ,विचार आहेत,जे तुम्हाला नक्कीच भरघोस ज्ञान देईल.
गीतारहस्य -कर्मयोगशास्त्र
प्रकरण १
१.विषयप्रवेश
अद्वैत मोक्ष द्वैत विशिष्टाद्वैत, पातंजलयोग हे निवृत्तिपर मार्ग गुलामी होती असे कोणी म्हटले तर ?

भगवद गीतेवर टीका | भाष्य लिहिण्याचा प्रत्येक सांप्रदायसाठी एक आवश्यक बाबच होती. पहिल्यांदा आदिशंकराचार्यानी मायावादात्मक अद्वैतवाद व

कर्मसंन्यास, श्रीरामानुजार्यानी मायासत्यत्त्वप्रतिपादक विशिष्टाद्वैत व वासुदेवभक्ती मध्वाचार्यानी है विष्णुभक्ती, श्री वल्लभाचार्याती शुद्धद्वैतावादद व शांकरद्वैत व भक्ति, ज्ञानदेवांचे पातंजलयोग व भक्ति किंवा नुसती भक्ती, नुसता योग अगर नुसते ब्रम्हज्ञान अनेक प्रकारचे केवळ निवृत्तीपर मोक्षधर्मच गीतेत प्रतिपादय आहेत, असा निरनिराळ्या सांप्रदायिक भाष्यकारांनी। टीकाकारांनी आपल्यापरी गीतार्थाचा निश्चय केला आहे.

भगवद्गीता कर्मयोग प्रधान । प्रवृत्तिपर आहे असे कोणीच का म्हणत नाही.

अशाप्रकारे १००० वर्ष गीता निवृतिपर (भक्ती । संन्याय मार्ग विविध सांप्रदायांनी दाखवून प्रवृत्तिपर गीतेला का पाहिलेनाही? हे परखड मत टिळकांना ठेवले आहे.

तसेच ग्रंथतात्पर्य 'उपक्रमोपसंहारो' म्हणजे ग्रंथाचा आरंभ व शेवट या दोन गोष्टी होत. परंतू अनेक टीकाकार सरळवाट सोडत अनेक वाटा घेत भक्ती ,योग ,निष्कामकर्म यांचाच उहापोह करीत आपआपल्या सांप्रदायाचे अर्थवाद करीत राहिले.

प्रकरण २
२.कर्मजिज्ञासा -भाग १

पुढील प्रकरणात टिळकांनी कर्म करतांना अनेक नीती शास्त्रानुसार कशा करायच्या,पाळायच्या यांचा संभ्रम पडत असतो‌ तेव्हा अपवाद कसा ओळखावा हे सांगितले आहे.तेव्हा काळानुसार धर्म बदलतो.नीतीस अनेक अपवाद असतात.अर्थात ते समजण्यासाठी सूक्ष्म अभ्यास असावा अथवा कृष्ण साथीला हवा.

"सूक्ष्मा गतिर्हि धर्मस्य " - धर्माची तत्त्वे सूक्ष्म आहेत इतकेच नव्हे तर पुढे "बहुशाखा हह्मनंतिका " त्यास अनेक फाटे फुटलेले असून त्यापासून निष्पन्न होणारी अनुमानेही निरनिराळी असतात असे महाभारतात म्हटले आहे (वनः २०८.२) महाभारतात अशाच थोर पुरुषांच्या अनेक प्रसंगाचा, त्यांच्या वागण्याचा उहापोह कथा स्वरुपात केला आहे. हेच मर्म सामान्यांना, सामान्य मर्म शास्त्रीय विवेचनानंतर) अर्जुनाचा कर्तव्यमोह घालविण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णांनी पूर्वी जो उपदेश केला त्या आधारे व्यासांनी भगवद्‌गीतेत प्रतिपादले आहे.

किं कर्म किमकर्मेति कवयोडप्यत्र मोहिता: । गीता ४.१६

अर्थ-कर्म कोणते आणि अकर्म कोणते याबददल पंडितांनाहि मोह पडत असतो;

अकर्म - कर्माचा अभाव आणि वाईट कर्म

अर्जुनाला कर्तव्यजिज्ञासा व मोह युद्‌धारंभी झाला. तसेच कर्त्या पुरुषांवर पुरुषांवर पुष्कळदा असे प्रसंग येतो , हे करू का लेकरू असे विवंचनेचे प्रसंग येतात.

पुढे कर्मजिज्ञासा प्रकरणात अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी) कायावाचामनाची शु‌द्धता आणि इंद्रियनिग्रह या पाच नीतीधर्माची विश्लेषण मनुचे श्लोक, महाभारत, गीता, उपनिषदातील कथांद्‌वारे त्यातील अनुमानानुसार केले आहे.

**अहिंसा- हिंसा करु नये, हिंसा म्हणजे केवळ नुसता जीव घेण्यास होणेच नव्हे तर दुसऱ्या प्राण्यांचे मन किंवा शरीर यांस इजा करणे याचाहि त्यांत समविश होतो.

पण आत्मसंरक्षणासाठी आतातायी, अधर्मीच्या हत्येचे पाप लागत नसते. परंतू हवेत, पाण्यांत, फळांत वगैरे सर्व ठिकाणी जे शेकडों अत्यल्प जीव भरलेले आहेत त्यांची हत्या कशी बंद होणार?

सूक्ष्मयोनिनि भूतानि तर्कगम्यानि कानिचित् ।
पक्ष्मणोऽपि निपातेन येषां स्यात् स्कन्थपर्ययः ॥ (मभाशां.१५.१६)

जगामध्ये कोण कोणाला खात नाही?जीवो जीवस्य जीवनम्|

प्राणस्य न्नमिदं सर्वम" अहिंसेच्या नियमांतहि कर्तव्याकर्तव्याचा तारतम्य विचार सुटत नाही.

अहिंसाधर्माला धरूनच क्षमा, शांती, दया है गुण येतात. न श्रेयः सततं तेजो न नित्यं श्रेयगी क्षमा ।

तम्मानित्यं क्षमा तात पण्डिलैरपवादिता ।।

'नेहमीच क्षमा किंवा नेहमीच तापटपणा श्रेयस्कर होत नाही, यासाठीच बाबा! ज्ञात्यांनी क्षमेस अपवाद सांगिलले आहेत, पण असे सूक्ष्म प्रसंग ओळखून तत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे.

**सत्य - नास्ति सत्यात्यरो धर्म (ममा.शां १६२-२४)

सत्यं हि परमं बलम् = (अनु. १६७.५०) परंतू यासही अपवाद‌ आहे .

नापृष्टः कस्यचिद्ब्रूयान्न बचान्यायेन पृच्छतः (, मभा शां)

"विचारल्या खेरीज कोणाशी बोलू नये आणि अन्यायाने जर कोणी प्रश्न करीत असल्यास विचारिल्यावरही उत्तर देऊ नये. माहित असले तरी वेड्‌यासारखे हू हू करून वेळ - मारुन न्यावी - 'जानन्नपि हि मेधावी जडवल्लोक आचरेत्।

पण वेळ बोलूनही टळणारी नसेल तर...

अकूजनेन चेन्मोक्षो नावकूजेत्कथंचन अवश्यं कूजितव्ये वा शंकरन्वायकूजनात् ।
श्रेयस्तमानृतं वक्तुं सत्यादिति विचारितम् ।

"न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये आणि बोलणे अवश्यच असेल तर, किंवा न बोलल्यामुळे (दुसऱ्यास) शंका येण्याचा संभव असेल तर, त्यावे‌ळी सत्यापेक्षा खाटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारांनी ठरलेले आहे! ' (शां. १७९,१५,१६).

'सत्यस्य वचनं श्रेया संत्यादपि हितं वदेतू ।
यद्‌भूतहितमायन्तं एतत्सत्यं मतं मम । (शां ३२९, १३)

"सत्य बोलणे हे प्रशस्त होय, पण सत्यापेक्षांहि सर्व लोकांचे ज्यांत हित असेल ते बोलावे, कारण सर्व जनांचे ज्यांत अत्यंत हित हेच माझ्या मते खरे सत्य होय'.

अपवाद? 'राजकीय गुपित लपवण्यास, चोरांसमोर, अन्यायाने प्रश्न करणाऱ्यास, वकिलांना धंद‌यात खोटे बोलणे गैर नाही? (सिन्विक)

पण फायद्यासाठी व्यापाऱ्यांनी खोटे बोलणे कसे चालेल ? सत्य हे वाचिक सत्य वा वास्तव (सर्वभूतहितकारक) सत्य असू शकते.

परंतू

'आताहेतोः परार्थ वा नर्महास्याश्रयात्तथा 988 ये मृषा न वदन्तीह ले जराः स्वर्गगामिनः । मभा अनु)

"स्वार्थाकरितां परहितार्थ किंवा थट्‌टेनेहि जे पुरुष था जगी कधी देखील खोटे बोलत नाहींत त्यांसच स्वर्गप्राप्त होते."

हा देखील शास्त्रांकारकांचा अखेरचा तात्विक सि‌द्धांत आहे.

सत्य बोलण्यात वचन, प्रतिज्ञा पाळणे याचा समावेश होतो. पण याचे सूक्ष्म मर्म जाणून कृती अपेक्षित आहे यासाठी अनुभव - संपन्न व्हावे वा अशांचा सल्ला जरुर घ्यावा.

(टीप- यातील संस्कृत श्लोक अशुद्ध लिहिले असू शकतात,मुळ श्लोकांचा शोध घेत आहे.पण भावार्थ जरूर जाणावा)

मांडणीविचारआस्वादअनुभवमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

"न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये आणि बोलणे अवश्यच असेल तर, किंवा न बोलल्यामुळे (दुसऱ्यास) शंका येण्याचा संभव असेल तर, त्यावे‌ळी सत्यापेक्षा खाटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारांनी ठरलेले आहे!

"विचारल्या खेरीज कोणाशी बोलू नये आणि अन्यायाने जर कोणी प्रश्न करीत असल्यास विचारिल्यावरही उत्तर देऊ नये. माहित असले तरी वेड्‌यासारखे हू हू करून वेळ - मारुन न्यावी "

हा संदेश कृष्णा ने युद्ध चालू असताना का दिला असाव हा प्रश्न पडतो.

हे दोन्ही श्लोक गीतेतले नाही.टिळकांनी मनुस्मृती,महाभारत, उपनिषदे इ.मधील श्लोकांचे दाखले देत अनेक गोष्टी कशा आधीच अधोरेखित आहेत हे सांगितले आहे.

प्रसाद गोडबोले's picture

4 Feb 2025 - 9:08 pm | प्रसाद गोडबोले

वाह , उत्तम लेख भक्ती !

मला हा ग्रंथ इतका लोकोत्तर वाटतो की ह्यावर काहीही लिहिण्याचे मला धाडसच होत नाही.

ह्या ग्रंथाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे - आमच्या सारखे लोक जे डोक्यामागुन घास खातात , अर्थात आधी पाश्चिमात्य तत्त्वज्ञान , मार्कस ऑरेलियास, शोपन्हावर, निश्चा वगैरे पासून सुरुवात करतात त्यांच्यासाठी गीतारहस्य हा ग्रंथ प्रत्येक पातळीवर उपयोगी ठरतो.
सुरुवातीला निहीलिझम , सिनीसिझम, नंतर स्टॉईसिस्म, नंतर निष्चा असे करत करत लोकमान्यांनी एकेक विचार कुठे कसा कमी आहे हे दाखवले आहे अन् सरतेशेवटी कर्मयोगाचे रहस्य सांगितले आहे !

This is just mind blowing.

बाकी टिळकांनी काढलेला निष्कर्ष की जीवनमुक्ताने आमरणांत लोकांच्या हिताकरिता कर्मारत राहिले पाहिजे.... हे एक विचार म्हणून ठीक आहे , गीतेतही कृष्णाने सन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे स्पष्ट म्हणाले आहे हेही मान्य !
पण तरीही , वर्णाश्रम व्यवस्थेने आखून दिलेली कर्मे योग्य रीतीने पार पाडल्यावर कर्म करत राहणे हे मला तरी एरंडाचे गुऱ्हाळ वाटते.
आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही.

म्हणूनच मला कालिदासाने रघुवंश मध्ये रघुकुलातील राजांच्या बाबतीत जे म्हणाले आहे तो आदर्श जीवनक्रम वाटतो -

शैशवेsभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्।
वार्धक्ये मुनिवृत्तिनां योगेनान्ते तनुत्यजाम्।।

मी जमेल तितका प्रयत्न करतो. बाकी कर्ता करविता श्रीराम समर्थ.

इत्यलम्

त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही.

बरोबर, तरीही टाटा, मंगेशकर यांसारखे कर्मयोगी समाजाला पाहिजेच.

आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही.
पण आपल्यासारख्या पेन्शन नसणार्‍या सर्व कर्मचारी हमालाना पोट भरण्यासाठी कर्म करावेच लागणार आहे. त्यातून सुटका नाही.

मुक्त विहारि's picture

5 Feb 2025 - 1:47 am | मुक्त विहारि

वाखूसा

अर्धवटराव's picture

5 Feb 2025 - 4:37 am | अर्धवटराव

पहिल्यांदा गीतारहस्य वाचलं तेंव्हा ओव्हरव्हेल्मींग का काय म्हणतात तसं झालं होतं :)

भगवद्गीता कर्मयोग प्रधान । प्रवृत्तिपर आहे असे कोणीच का म्हणत नाही.

याचं कारण बहुदा वर्णाश्रम पद्धतीत असावं. एखादा शिवाजी सोडला तर अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ध्येयवेडाने जगणं सामान्य माणसाला जमत नाहि. फळ पिकल्यावर ते भूक मिटवायच्या कामि यावं, त्यातल्या बीयांनी स्वतःला जमीनीत रोवुन घेउन नवीन झाड जन्माला घालावं. त्याकरता सर्वप्रथम फळाने झाडापासुन आपली नाळ तोडायला हवी. ट्रांझीशनला स्वतः सामोरे जायया हवं. म्हणुन मोक्षसाधनांची सुरुवात निवृत्तीपर निरुपणाने होते, सो डीड मेनी भाष्यकार्स ऑफ भगवत्गीता (काय धेडगुजरी ई-मराठी आहे ;) )
वर्णाश्रम पद्धतीत, त्यातल्या आश्रम व्यवस्थेत, आयुष्याची सेकंड इनींग सुरु करताना सर्व प्रकारच्या कडु-गोड-खारट-तुरट भोगांपासुन फारकत घ्यायला सुरुवात करण्याचं प्रिस्क्रीप्शन आहे. भारताला काहि शतकं तरी आपला धर्म/संस्कृती समूळ उखडुन काढण्याचा धोका जाणवला नाहि. त्यामुळे एखादा बाहुबली क्षात्रधर्म सोडुन वैराग्यशील गोमटेश्वर झाल्यास त्याचं कोणाला वावगं वाटलं नाहि, किंवा त्यामुळे फार काहि नुकसान देखील झालं नाहि (बाहुबली भावाच्या वागण्याने दुखावला जाऊन अरण्यसेवन करता झाला, वर्णाश्रम धर्मामुळे नाहि हे माहित आहे... भावनाओ को समझो)
हजार वर्षापूर्वी उत्तर-पश्चीम सीमेवरुन यावनी आक्रमणं धडकु लागली आणि निवृत्तीपर तत्वज्ञान त्याला तोंड देऊ शकणार नाहि याची समज यायला भारताला बरच काहि गमवावं लागलं.

धर्मशास्त्रात वर्णीलेला पाप-पूण्य, सत्यासत्य, कर्तव्य-अकर्तव्य इत्यादींचा विचार आज किती रिलेव्हंट आहे हा कदाचीत वादाचा विषय होऊ शकेल.. पण शेकडो वर्ष माणसाने याविषयी चिंतन केलं, प्रयोग केले, सिद्धांत मांडले, सिद्धता आणि खंडन करण्याच्या पद्धती डेव्हलप केल्या-आचरल्या.. हे सगळं बघुन फार कौतुक वाटतं :)

असो... मूळ विषय काय होता ??? हां.. ते कर्मपर का निवृत्तीपर वगैरे वगैरे...
याला उत्तर एकच.. माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.

Bhakti's picture

5 Feb 2025 - 10:47 am | Bhakti

सुंदर प्रतिसाद!

माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.

हो पण मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ ..
मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी राही । बुद्धीहूनी श्रेष्ठ जीवात्मा पाही । जीवात्मापेक्षाही श्रेष्ठ राही । हे अनंत ब्रह्मांड ॥४४॥
-चित्रापुरगुरूपरंपरा.

इथे श्रेष्ठ-कनिष्ठ म्हणजे क्लार्क-हेडक्लार्क अशी अधिकाराची उतरंड अपेक्षीत नाहि.

आपले जीवन म्हणजे कर्मांची अभेद्य साखळी आहे. या कर्म प्रोसेसचे कॉम्पोनंट्स म्हणजे शरीर, मन, बुद्धी, चेतना. आयडीअली शरीराने मनाचं ऐकावं, मनाने बुद्धीला रेफर करावं, बुद्धीने चेतना ओळखावी, आणि चेतनेने या सर्वांचा जो स्त्रोत आहे त्या सगुण-निर्गुण एक गोविंदु रे ला शरण जावं.. अशा पद्धतीने सर्व घटकांचा समन्वय म्हणजे पर्फेक्ट कर्म. हे सिंक्रोनायझेशन करताना मधेच थांबु नये, अभि जर्नी बाकी है, या अर्थाने हा श्रेष्ठ-कनिष्ठ फरक करण्यात येतो.

शरीर आणि मन संलग्न झाले तर कला जन्माला येते. पुढे बुद्धी जोडली कि माणुस वैज्ञानीक होतो. चेतनेशी नाळ जोडली गेली माणुस योगी होतो. चेतना आपल्या मुळाशी परतली कि भक्ती ची अवस्था येते... पुढे पण काहि असेल का ?? माहित नाहि :) पण भक्ती अवस्था आल्याशिवाय आपण अपूर्ण असतो. पूर्णात्वाचा पुढील टप्पा मागच्या टप्प्यापेक्षा श्रेष्ठ, कारण तेच मागच्या टप्प्याचं गंतव्य असतं.

Bhakti's picture

6 Feb 2025 - 10:52 am | Bhakti

सुंदर!
उतरंड करू नये पण वरच्या श्लोकात किंवा जवळपास सर्वच तत्वज्ञानात हेच सांगितले आहे.मनापासून माहिती तपासून बुद्धी पर्यंत आली नाही तर? म्हणून हे श्रेष्ठ, कनिष्ठ सांगितले असावे.आता एखादा बुद्धीवान असेल पण त्याची बुद्धी शुद्ध वा हितकारक असेल तर अनर्थ होईल,तर बुद्धी शुद्ध पाहिजे, आत्मनिष्ठ.पुढे चेतनेऐवजी अतिचेतन म्हणजे शरीर, मन, बुद्धी प्राण यांचा अतिउच्च समुच्चय आत्मा(जीवात्मा) असे सांगितले आहे.आता परत आत्मा आहे नाही हे ज्याने त्याने ठरवा त्यासाठी चेतना शब्द रूढ झालाय.पण पुढे ज्ञानयोग घ्या भक्तीयोग घ्या.हे सगळं स्थिर करत ब्रम्हांड म्हणजेच oneness पर्यंत जो पोहचतो तो योगी..सांख्ययोगी/कर्मयोगी/भक्तीयोगी.

कर्नलतपस्वी's picture

5 Feb 2025 - 6:28 am | कर्नलतपस्वी

मिपावर अतिशय कठीण व गुढ विषयाबद्दलचे सोप्या भाषेतील लेख वाचून मनोरंजन व ज्ञान वृद्धी होत आहे.
बरेच विचार, गोष्टी डोक्यावरून जातात. असो पुस्तक अमेझोन कार्ट मधे टाकले आहे लवकरच वाचायला घेतो.

ई -साहित्यप्रकाशनाने पीडीएफ स्वरुपात गीतारहस्याचे दोन खंड प्रकाशित केले आहेत.तेही पहावे.
https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_1.pdf

https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_2.pdf