'रोम' रंगी रंगले मन - 'तिवोली' आणि रोमचा 'किल्ला'

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
29 Jan 2024 - 2:46 pm

पुनर्जागरण काळातले थोर कलावंत- बर्निनी, मिशेलअँजेलो, राफाएल, लिओनार्दो, कारावाज्यो, आणि इतर अनेक चित्रकार, मूर्तिकार, स्थापत्यविद, लेखक, कवी, तत्वज्ञ, यांची प्रतिभा जिथे बहरली, ते चिरंतन शहर रोम.अशा या रोमच्या माझ्या अलिकडल्या भ्रमंतीत बघितलेल्या काही खास जागा आणि टिपलेले फोटो इथे देत आहे.

.
टायबर नदीवरील अनेक पुलांपकी एक. पलीकडे सेंट पीटर्स कॅथेड्रल दिसते आहे.

याआधीचा भाग: आम्ही जातो आमुच्या गावा (भाग १)
वरील लेखातील घटनाक्रमानंतर पॅरिसला आल्यावर आता पहिला प्रवास कुठला करावा याचा विचार करता पहिले नाव सुचले, ते म्हणजे रोम. यापूर्वी तिथे दोनदा जाऊन आलेलो असलो तरी समाधान झालेले नव्हते.
लहानपणी चांदोबात वाचलेल्या ग्रीक-रोमन कथा, पुढे इंदूरच्या कलाशाळेत आणि बडोदा, मुंबई वगैरेंच्या संग्रहालयांमध्ये असलेल्या ग्रीको-रोमन संगमवरी मूर्ती, त्याकाळी गाजलेले टेन कमांडमेंट्स (१९५६) बेनहर (१९५९) फॉल ऑफ रोमन द एम्पायर (१९६४) इत्यादि चित्रपट या सर्वातून रोमन साम्राज्यातील वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम सारख्या भव्य इमारती, चिलखते, वस्त्रप्रावरणे वगैरेंबद्दल कमालीचे आकर्षण निर्माण झालेले होते. पुढे यूट्यूबवर आणखी बरेच काही बघितल्यावर तर आपण केंव्हा एकदाचे रोमला जातो असे झाले होते.
...
ग्रीक पुराणकथेवरील चांदोबातील चित्र आणि सिनेमाचे पोस्टर.

मग २०१५ मध्ये पहिल्यांदा सहकुटुंब रोमवारी घडली. (यावर लिहिलेला लेख इथे आहे)

नंतर २०१८ मध्ये एकट्याने पाच दिवस आणि आता पुन्हा आक्टोबर २०२२ मध्ये एकट्याने दहा दिवस रोममध्ये भटकून आलो. रोमच्या पहिल्या २०१५ मधील प्रवासाच्या वेळी वय ६४ होते, तर आता बहात्तराव्या वर्षी दररोज सहा-सात तास पायी फिरणे कठीण जाऊ लागले. तरी आता फिरून घेतले नाही तर पुढे ते आणखी आणखी कठीण होत जाणार या विचाराने जायचे नक्की केले.
Airbnb द्वारे एक खोली दहा दिवसांसाठी आरक्षित केली (दहा दिवसांचे २५० युरो भाडे) आणि पॅरिसहून विमानाने रोम गाठले. खोलीजवळच असलेल्या बस- स्थानकावरून बसने किंवा पुढे मेट्रो गाठून कुठेही जाता यायचे. सकाळी खोलीवर चहा/ कॉफी करून घ्यायचो, आणि एक मोठा वाडगाभर फळे - दही खाऊन फिरायला निघायचो. दुपारी पिझाचा एक लहानसा तुकडा, आणि संध्याकाळी खोलीवर खिचडी बनवून खाणे पुरेसे व्हायचे. रोममध्ये कॉफी आणि ताजा संत्र्याचा रस चांगला मिळतो, तेही घ्यायचो.
.
सकाळचा नाश्ता.

Tivoli - तिवोली

मिपाकर चौकटराजा यांनी रोमपासून ३० किमी अंतरावरील Tivoli - तिवोली अवश्य बघायला सांगितले होते (खरेतर आम्ही दोघे तिथे कधीतरी एकत्र जाऊ, असा आमचा बेत ठरला होता, पण चौरांच्या आकस्मिक जाण्याने ते शक्य झाले नाही ). खूप वर्षांपूर्वी या जागेची सर्वप्रथम ओळख मला सतराव्या शतकातील एका चित्रावरून झालेली होती:

.
तिवोली चे दृश्य - चित्रकार: Claude Lorrain (इ.स. १६४४)

या चित्रात दिसणारी इमारत ( Tempio di Vesta) इ.पू. पहिल्या शतकातले मंदिर आहे. या मंदिरात तेवणारी अखंड ज्योती टिकवून ठेवण्याची जबाबदारी इथल्या सेविकांची (Vestal virgins) असे. या सेविकांना वय वर्षे ६ ते ३६ या अवधीत अखंड कौमार्य राखणे आवश्यक असायचे. ही ज्योत जोवर टिकून आहे, तोवरच रोमन साम्राज्य टिकून राहील, अशी श्रद्धा असल्याने ती कसोशीने अखंड टिकवून ठेवली जायची.

.
Vestal virgins संगमरवरी मूर्ती.
'तिवोली' या जागेचे प्राचीन नाव Tibur असे असून तिथे इ.पू. तेराव्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे सापडतात. इ.पू. ९० साली हा प्रांत रोमन साम्राज्याचा भाग झाल्यावर तिथे प्राख्यात कवी होरेशियस (अथवा ‘होरेस’ इ.स. पूर्व ६५-८), सम्राट ऑगस्टस, पालमिराची राणी झेनोबिया अशा अनेक धनिकांनी आपापले प्रासाद बनवले. त्यापैकी दोन बघितले. ( रोमच्या Ponte Mammolo या (Line A Metro) स्टेशनच्या बाहेर Catral कंपनीच्या निळ्या रंगाच्या सुंदर बसेस दिवसभर तिवोलीला जा-ये करत असतात. जाण्या-येण्याचे बसभाडे साडेचार युरो आहे. दोन्ही जागी भरपूर चालावे, चढावे-उतरावे लागते. बॅटरी-चालित रथ उपलब्ध नाहीत).

Villa Adriana (Hadrian's Villa) - तिवोलीतील सर्वात भव्य प्रासाद

सम्राट आद्रिआनो Adriano ( इंग्रजी उच्चार- ‘हॅड्रियन’ इ.स. 76 -138 ) याने इ. स. 117 ते 138 या काळात, अडीचशे एकराच्या जागेत विस्तृत उद्यान आणि अनेक इमारती उभारल्या होत्या. यापैकी थोड्याश्या जागेतच उत्खनन झालेले असूनही अचंबित करणाऱ्या सुमारे तीस भव्य वास्तू इथे बघायला मिळतात. हा परिसर एक आदर्श वसाहत म्हणून निर्मित केला गेला होता आणि त्यात प्राचीन ग्रीस, रोम आणि इजिप्तच्या स्थापत्य - परंपरांचा समावेश केला गेला होता. हा रोमन साम्राज्यातील सर्वात मोठा आणि सर्वात भव्य शाही व्हिला होता.. इथे राजवाडे, लायब्ररी, अतिथी निवासस्थान, सार्वजनिक स्नानगृहे आणि दोन थिएटर होते.
हे स्थान तिथल्या मुबलक पाण्यामुळे आणि रोमकडे जाणाऱ्या चार जलवाहिनींच्या (Aqueducts: Anio Vetus, Anio Nobus, Aqua Marcia, and Aqua Claudia) उपलब्धतेमुळे निवडले गेले होते.
हल्ली व्हिला' हा शब्द आपल्याकडे एकाद्या लहानशा बंगल्यासाठीही वापरला जात असला, तरी रोमन काळातील व्हिलाचा अर्थ म्हणजे शहराबाहेरील निसर्गरम्य, विस्तृत जागेत आलिशान प्रासाद, विस्तीर्ण उद्याने, कारंजे, मूर्ती, भित्तीचित्रे, स्नानगृहे, तलाव, तसेच ग्रंथालय, अतिथीनिवास वगैरे अनेक इमारती असलेली जागा.
‘आद्रिआनो’ हे सम्राटाचे (पुल्लिंगी) नाव असूनही व्हिला ‘आद्रिआना’ (स्त्रीलिंगी) असे का म्हटले जाते, याचे कारण ‘व्हिला’ शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून, असे समजले.

आद्रिआनोच्या मृत्यूनंतर (त्याच्या आयुष्याच्या शेवटल्या दहा वर्षात हा व्हिला बांधला गेला असल्याने त्यामुळे त्याला त्याचा उपभोग घेता आला नसावा, याचे मला वैषम्य वाटते) त्याचे विविध उत्तराधिकारी - अंतोनियस पायस, मार्कस ऑरेलियस, ल्युशियस वेरस, कॅराकेला तसेच पाल्मिरा (-सिरिया) ची राणी झेनोबिया वगैरेंनी इथे वास्तव्य केले. इ.स. चौथ्या शतकातील रोमन साम्राज्याच्या उतरत्या काळात ही जागा वापरात न राहिल्याने तिथल्या अनमोल मूर्ती आणि संगमरवरी दगड, स्तंभ इत्यादी लुटले जाऊन पुढे अनेक इमारती (उदाहरणार्थ: Villa D ’Este) बांधण्याच्या कामास घेतले गेले.

रोमपासून तासाभराचा बसप्रवास केल्यावर मुख्य रस्त्यापासून सुमारे २ किमी अंतर पायी जाऊन मी या व्हिलाच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता शिरलो. सर्वत्र प्राचीन भव्य इमारतींचे अवशेष बघता बघता संध्याकाळ झाली.
.
आद्रिआनोचा मुख्य प्रासाद

.

.
प्रसादाजवळील पुष्करिणी

.
झाडीत लपलेले एक सुंदर घर.

.

.
- अस्मादिक.

.

.
संध्याकाळी पाच पर्यंत अखंड पायी फिरून इथल्या जास्तीत जास्त इमारती बघण्याचा प्रयत्न केला. शेवटी आकाश भरून येऊन जोराचा पाऊस सुरु झाला आणि सगळीकडे पाणी साठले. थोड्या वेळापूर्वीच बघितलेली जागा पावसाच्या पाण्याने बघता बघता जलमय झालेली बघून मौज वाटली.

व्हिला बंद होण्याची वेळ होत आलेली होती, तरी शेवटले 'अपोलोचे मंदिर' बघायचेच असा निश्चय करून भर पावसात भिजत, धावत टेकडी चढून ती जागा गाठली खरी, पण तिथे मंदिराचा जेमतेम पायाच काय तो होता. मग धावत परत येऊन तिथल्या लहानश्या संग्रहालयात आश्रय घेतला.
संग्रहालयातले फोटो:

.

.

.
उत्खननातून सापडलेली एक मूर्ती.

व्हिला आंद्रियानाच्या अद्भुतरम्य वातावरणाचा जड अंतःकरणाने निरोप घेऊन खोलीवर येऊन दुसरे दिवशी दुसरा प्रसिद्ध व्हिला Villa d’Este गाठला. (या दोन्ही जागा UNESCO World Heritage Sites आहेत)

व्हिला आद्रिअना नवीन बनवला गेला होता तेंव्हा कसा दिसत असेल, याबद्दलचा एक रोचक विडिओ:
https://www.youtube.com/watch?v=zGdjf9wzHOI

Villa d’Este

सोळाव्या शतकात Cardinal Ippolito II d'Este (इ.स. १५०९-७२) याने 'व्हिला आद्रियाना'तील दगड- मूर्ती वापरून स्वतः:चा Villa d’Este हा विशाल प्रासाद आणि उद्यान बनवले. (मशारनिल्हे कार्डिनल हा ‘ल्युक्रेशिया बोर्जिया’ चा मुलगा असल्याचे समजल्यावर मला भारीच उत्सुकता निर्माण होण्याचे कारण म्हणजे The Borgias (2011) ही अप्रतिम टीव्ही सिरीज.

.
व्हिलाच्या गच्चीवरून दिसणारे तिवोली गावाचे दृश्य.

.

Villa d'Este हा पुनर्जागरण-काळातील (Renaissance period) उद्यान आणि वास्तुरचनेचा एक मानबिंदू असून या ठिकाणी नैसर्गिक उताराचा उपयोग करून घेत सुमारे शंभर कारंजे बनवलेले आहेत. याची निर्मिती १५५०-७० या काळात Pirro Logorio या वास्तुरचनाकाराने केली.
कारंज्यातून उसळणारे पाणी Aniō नदीचे असून ते ६०० मीटर लांबीच्या भुयारातून आणले गेलेले आहे. hydraulic engineering चे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. रोमला पाणीपुरवठा करणारे मुख्य तीन Aquaduct हे Aniō नदीचेच पाणी प्राचीन काळी आणत असत.

.
या परिसरात जिकडे तिकडे वाहते पाणी,धबधबे, कारंजी, तलाव, गच्च झाडीत लपलेले पुतळे, डोंगरउतारावरील रुंद पायऱ्यांचे मोठमोठे जिने, विविध वास्तु वगैरे बघत हिंडताना संध्याकाळ केंव्हा झाली, कळलेही नाही.

...

.

.

.

.

.

Villa D ’Este बद्दलचा व्हिडियो:

https://www.youtube.com/watch?v=a0f_BXwHzGQ

रोमचा 'किल्ला' : 'कास्तेल सांतान्जेलो Castel Sant'Angelo

हा किल्ला म्हणजे मुळात रोमन सम्राट आद्रियानोची समाधी होती. ही वास्तु इ.स. 135-139 या काळात वास्तुविशारद डेक्रिनसच्या मार्गदर्शनाखाली बांधली गेली आणि 5 व्या शतकात तिचे किल्ल्यामध्ये रूपांतर करून समाधीच्या प्राचीन अवशेषांवर एक भव्य वाडा बांधला गेला. हा वाडा सहा मजली असून त्यात ५८ दालने आहेत. काही काळ पोपचे निवासस्थान, नंतर तुरुंग, बॅरेक्स आणि युद्धसाहित्याचे गोदाम म्हणून कामात आल्यावर ६ वर्षांच्या जीर्णोद्धार मोहिमेनंतर, १९०१ साली संग्रहालय म्हणून लोकांसाठी खुले केला गेला.

.
कास्तेल सांतान्जेलो Castel Sant'Angelo : रोमचा किल्ला

.
किल्ल्यापर्यंत पोचण्यासाठी नदीवर बांधलेल्या या पुलावर असलेल्या दहा मूर्तींची रचना 1668 साली बर्निनी यांनी केली होती.

.
किल्ल्यावरून दिसणारी नदी, पूल, आणि बाजूच्या रस्त्यावरून जाणारा सायकलस्वार.

.
किल्ल्यातील वरपर्यंत जाणारा वळणदार रस्ता.

.
किल्ल्यातील जिना.

.
किल्ल्याची प्रदक्षिणा

.
किल्ल्यवरून दिसणारे रोम.

रोम मधे निवांत फिरताना टिपलेली काही दृश्ये:

.

.

...
आपुली आपण काढी शेलफी, तो येक मूर्ख.

.

.
मातीच्या विटांच्या भिंती बांधण्याची प्राचीन पद्धत.

.
रोममधील शेकडो गल्ल्यांपैकी एक

या तीन जागांखेरीज रोममधे आणखी बरेच काही बघितले, ते पुढे कधितरी.

वावरसंस्कृतीइतिहासआस्वादअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

29 Jan 2024 - 4:26 pm | अनन्त्_यात्री

प्रचि !

टर्मीनेटर's picture

29 Jan 2024 - 4:45 pm | टर्मीनेटर

मस्तच! माहिती आणि फोटोज छान 👍
(काय समस्या आहे माहित नाही पण काही फोटोज पुर्ण दिसत नाहियेत, ते नंतर पुन्हा बघतो.)

रोमन साम्राज्यातील वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम सारख्या भव्य इमारती, चिलखते, वस्त्रप्रावरणे वगैरेंबद्दल कमालीचे आकर्षण निर्माण झालेले होते.

+१०००
मला पण ग्रीक/रोमन वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम, अँफी थिएटर, अ‍ॅक्वाडक्ट अशा गोष्टींचे प्रचंड आकर्षण आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Jan 2024 - 6:00 pm | अमरेंद्र बाहुबली

फोटोस तर निव्वळ डोळ्यांचे पारणे फेडनारे. मस्त झालाय धागा एकदम.

प्रतिसादांबद्दल अनेक आभार. फोटो आवडत आहेत हे वाचून चांगले वाटले. रोमन 'अ‍ॅक्वाडक्ट' हा अद्भुत प्रकार आहे. त्यासाठी मुद्दाम जऊन बघायला हवे. पुन्हा कधी गेलो तर नक्की बघेन.
.

.

Bhakti's picture

29 Jan 2024 - 6:14 pm | Bhakti

सर्वच फोटो, वर्णन, माहिती सुंदर आहे.
धबधब्याच्या आणि बाजूला किल्ला तो फोटो जास्त आवडला.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2024 - 7:04 pm | मुक्त विहारि

सेल्फी पण आवडला...

जाणकाराच्या दृष्टीतून पाहाणे आवडले.

फोटोंतूनच कळले की तिथे एकेक जागा पाहायला किती तास लागतील.

शीर्षकही आवडले.

शेवटचा एका गल्लीचा फोटो विशेष आवडला.

अगदी रस्त्यापासून आकाशापर्यंत आपण डोळ्यांनी बघतो तसं चित्र आहे.

चित्रगुप्त's picture

29 Jan 2024 - 10:04 pm | चित्रगुप्त

लेख आणि फोटो आवडत आहेत हे वाचून आणखी लिहिण्याचा उत्साह वाढतो आहे. @कंजूस, 'अगदी रस्त्यापासून आकाशापर्यंत आपण डोळ्यांनी बघतो तसं चित्र आहे' हे वाचून मी पुन्हा तो फोटो बघितला, आणि मलाही तसेच वाटले आणि हे कसेकाय घडले असावे, हा प्रश्न पडला आहे. .

मनो's picture

30 Jan 2024 - 8:43 am | मनो

चित्रकाराची नजर ... :-)
Perspective आणि फोकल पॉइंट सुरेख असल्याने तसा भास होतोय?

एक सुचले ते असे, की कोणतेही दृश्य बघताना बहुतांशी आपण आपली नजर 'आडवी' फिरवत असतो. मोठा विस्तीर्ण देखावा बघताना तर विशेषच. त्या मानाने खालपासून वरपर्यंत दृष्टीक्षेप टाकण्याचे प्रसंग कमी असतात. या फोटोत 'आडवे' बघण्यासारखे काही नाही. बाजूच्या भिंतींमधील खिडक्या पण आपली नजत 'आत आत' नेत आहेत. त्या मानाने फोटोत 'उभे' घटक जास्त आहेत. 'आत' जाणारा रस्ता, पलिकडील इमारती आणि तीन ठिकाणी दिसत असलेले निळे आकाश. यामुळे असे वाटत असावे. (असे वाटते)
Sir Ernst Hans Josef Gombrich यांच्या Art and illusion : a study in the psychology of pictorial representation या चित्रकलाविषयक पुस्तकात या विषयी विस्तृत उहापोह वाचल्याचे आठवते, पण नेमके काय ते विसरलो.
या पुस्तकाची पीडीएफ उपलब्ध आहे:
https://archive.org/details/artillusionstud00gomb

कंजूस's picture

31 Jan 2024 - 10:07 am | कंजूस

Vertical shift किंवा perspective corrected पद्धतीचे wide angle lens चा एक प्रकार मिळतो. अतिशय महाग लेन्स असतं. (20/24mm prime with f/2) .तर ते वापरून फोटो घेतला असणार.

सगळे फोटो स्वस्तातल्या शामसंग (-खेले होरी) मोबल्यातून, तेही फक्त आटो मोडमधे काढलेत. फक्त क्रॉप केलेत हवे तसे. बाकी काय नाय. 'दृष्टी' हवी, ती निसर्गचित्रणातून मिळाली असावी, आणि थोर चित्रकारांची चित्रे बघण्यातून. बाकी फोटोग्राफीतले ओ की ठो कळत नाही.

कंजूस's picture

31 Jan 2024 - 1:21 pm | कंजूस

तरीही फारच सुंदर.
दृष्टी हवी हे बरोबर.

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Jan 2024 - 7:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

हा लेख आणि फोटो तर आवडलेच पण त्यात दिलेल्या ईतर लिंकाही उघडुन वाचल्या. केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते. फक्त खिसा काय म्हणतो ते पहावे लागेल. :) आपण ईतकी डिटेल माहीती काढुन ठिकाणे बघताय हे विशेष. नाहीतर ईथेतिथे सगळे सारखेच, तेच राजवाडे,त्याच मुर्त्या आणि काय काय. फोटोही सुंदर आलेत.

रच्याकने- फार वर्षांपुर्वी ऑफिसच्या कामानिमित्ताने ब्रसेल्स आणि अ‍ॅमस्टरडॅम बघणे झाले होते, पण मॅनिकेन पिस, तुसाँ म्युझियम, व्हॅन गॉग म्युझियम अशा २-४ गोष्टी सोडल्या तर फारशी नावेही आठवणार नाहीत.

पुभाप्र

चित्रगुप्त's picture

29 Jan 2024 - 10:12 pm | चित्रगुप्त

केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते.

-- अगदी खरे. माझ्या ओळखीतले जे कुणी तसे फिरुन आलेले आहेत, त्यांच्याकडून ऐकलेले माझ्या आवडीत कुठेच बसणार नाही. कुठेही जाण्यापूर्वी तिथला सांगोपांग अभ्यास करून जाणे बरे, अर्थात नेहमी ते जमत नाही आणि काही ना काही बघणे राहूनच जाते.

कंजूस's picture

31 Jan 2024 - 1:24 pm | कंजूस

सहमत. ग्रूपवाले वेळ फार घालवतात. नाश्ता, जेवण, शॉपिंग यातून वेळ उरल्यास लीडरने सांगितलेलं पाहाणं. आणि हो ग्रूप फोटो.

तुषार काळभोर's picture

29 Jan 2024 - 10:15 pm | तुषार काळभोर

तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला!

रोमची पहिली ओळख Dan Brown च्या एंजल्स अँड डेमन्स पुस्तकातून झाली. पुस्तक वाचता वाचता एकेका स्थळविषयी इंटरनेटवर जास्त माहिती वाचत होतो. त्यातून रोममधील वास्तुकला, शिल्पकला यांची ओळख झाली.
St Peter's Basilica, Castle Sant' Angelo, Pantheon या प्राचीन वास्तू, Fontana dei Quattro Fiumi (Fountain of the Four Rivers) सारखी स्थापत्य कला, Bernini सारख्या कलाकाराच्या स्वर्गीय कलाकृती - Ecstasy of St Teresa.
इतक्या सुरेख, भव्य, बारकावे दाखवणाऱ्या कलाकृती!

अशीच पॅरिस, लुव्र, लिओनार्दो दा विंची यांची ओळख दा विंची कोड मधून झाली, तर फ्लॉरेन्सचं सौंदर्य इन्फर्नो मधून दिसलं! ओरिजिन या पुस्तकातून Casa Milà आणि Sagrada Família अशा अनोख्या वास्तू समजल्या...

चित्रगुप्त's picture

30 Jan 2024 - 1:47 pm | चित्रगुप्त

तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला!

या पुस्तकांपैकी फक्त 'दा विंची कोड' चे मराठी भाषांतर वाचले आहे. ते आवडले पण सिनेमा फारसा रुचला नाही. 'इन्फर्नो' वरील 'गुस्ताव्ह दोरे' (Gustave Dore) च्या चित्रांचे एक पुस्तक माझ्याकडे आहे. विलक्षण चित्रे असतात दोरेची. आत्ताच अ‍ॅमेझोनवर डॅन ब्राऊनची अन्य पुस्तके (मराठी) शोधून ठेवली आहेत.
येत्या मार्चमधे दहा दिवस लंडनमधील संग्रहालये बघणार आहे. त्यासंबंधी काही विशेष पुस्तके, सिनेमे वगैरे असल्यास जरूर कळवावे. अनेक आभार.

तुमच्या कलासक्त नजरेतून रोम बघणे विलक्षण आनंददायी होत आहे.
जबरदस्त एकदम.

नचिकेत जवखेडकर's picture

30 Jan 2024 - 10:25 am | नचिकेत जवखेडकर

वर्णन आणि प्रचि अत्यंत सुंदर!

अथांग आकाश's picture

30 Jan 2024 - 11:35 am | अथांग आकाश

सर्वांग सुंदर लेख!
like

चित्रगुप्त's picture

31 Jan 2024 - 11:11 am | चित्रगुप्त

प्रतिसादातून लेख आणि फोटो आवडल्याचे कळवलेत, छान वाटले. अनेक आभार

धर्मराजमुटके's picture

30 Jan 2024 - 8:12 pm | धर्मराजमुटके

सुंदर लेख !
दोन प्रश्न
१. Tempio di Vesta मधील एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? असा उल्लेख कोठे आहे काय ?
२. नदी / कालवे / समुद्राच्या अवतीभवती वसलेल्या शहरांत / गावांत त्या पाण्याचा काही विशीष्ट गंध वगैरे येतो काय ?
अवांतर : बनेल काढून रोमन सम्राटाच्या आविर्भावात दिलेली पोज आवडली.

धर्मराजमुटके's picture

30 Jan 2024 - 8:13 pm | धर्मराजमुटके

अवांतर : शर्ट काढून रोमन सम्राटाच्या आविर्भावात दिलेली पोज आवडली.

एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? हा प्रश्न समजला नाही. 'जाणल्यामुळे' म्हणजे काय ? कौमार्यभंग वगैरे प्रकार रोमन साम्राज्याच्या दीर्घ इतिहासात घडलेही असतील, काही ठाऊक नाही. पाण्याला विशिष्ट गंध वगैरेही माहित नाही.
त्या दिवशी कडक ऊन्ह असल्याने घामाघूम होत फिरावे लागले होते, म्हणून सदरा काढलेला होता. कुठे रोमन सम्राट आणि कुठे म्या पामर.
या लेखात एवढी रुची घेत असल्याबद्दल अनेक आभार.

धर्मराजमुटके's picture

31 Jan 2024 - 12:16 pm | धर्मराजमुटके

जुन्या मराठी ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांमधे जोसेफ ने मेरीला जाणल्यामुळे (संयोग झाल्यामुळे) येशूबाळाचा जन्म झाला अशा प्रकारचे उल्लेख असतात त्या अनुषंगाने हा शब्दप्रयोग केला.

याचा काथ्या( किंवा घातपात)कूट वेगळ्या धाग्यात व्हावा.

'जाणण्या' चा नवीनच अर्थ जाणकाराकडून जाणून घेतला. आता कळले लहान मुलांना 'अजाण' 'निष्पाप' वगैरे का म्हणतात.
जुन्या ख्रिस्ती धार्मिक पुस्तकातले आणखीही असे शब्दप्रयोग 'जाणून' घ्यायला आवडेल. आपली 'जाणीव' वाढीला लागली पाहिजे राव. अनेक धन्यवाद.

आमचं रोम दर्शन 'रोमन हॉलिडे' सिनेमा पर्यंतच धावलं होतं. नंतर थोडे हिस्ट्री चानेलवाले विडिओ.

गोरगावलेकर's picture

31 Jan 2024 - 1:40 pm | गोरगावलेकर

फोटो एकाहुन एक सुंदर. जोडीला साजेसे लेखन.

कर्नलतपस्वी's picture

31 Jan 2024 - 1:57 pm | कर्नलतपस्वी

कवीवर्य बोरकर आठवले.

स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्‍ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा

सुंदर.

चौथा कोनाडा's picture

31 Jan 2024 - 2:48 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

31 Jan 2024 - 2:51 pm | चौथा कोनाडा

क्या बात ... एक नंबर मस्त ! माहिती आणि प्रचि लै छान !

रोम ची सुंदर सफर घडवलीत चित्रगुप्त जी !

या सेविकांना वय वर्षे ६ ते ३६ या अवधीत अखंड कौमार्य राखणे आवश्यक असायचे.

बाबो .. किती आवगड असं ह्ये म्हनायचं !

व्हिला ‘आद्रिआना जबरदस्त दिसतोय !

कल्पना करून तयार केलेला व्हिला ‘आद्रिआना चा व्हिडीओ भारी आहे !

Villa d'Este किती रम्य आहे ! वाहते पाणी,धबधबे, शंभर कारंजे, तलाव सुंदर !

रोमचा राजवाडा, गल्ल्या वास्तू भयन्कर सुंदर आहेत !

- अस्मादिक.

ह्यो फोटो लै पेशल !

आपुली आपण काढी शेलफी, तो येक मूर्ख.

हा हा हा

श्वेता व्यास's picture

31 Jan 2024 - 3:01 pm | श्वेता व्यास

खूप सुंदर भटकंती आणि अप्रतिम फोटो!
सोबतीला इतिहास उलगडून सांगितलात ते फार आवडलं.
येणारी अनेक वर्षे तुम्हाला अशी छान भटकंती करायला मिळो या शुभेच्छा :)

निनाद's picture

31 Jan 2024 - 4:56 pm | निनाद

भटकंती खूप छान.

नंदन's picture

3 Feb 2024 - 5:02 pm | नंदन

लेख आणि फोटो - दोन्ही खासच!

(काही वर्षांपूर्वी ट्रेवी कारंज्यात एक बारकंसं नाणं टाकून पुनर्भेटीचा मनसुबा व्यक्त केला होता - तो योग केव्हा येतो ते पहायचं!)

प्रसाद गोडबोले's picture

7 Feb 2024 - 3:00 pm | प्रसाद गोडबोले

परत एकदा वाचला धागा. काय सुंदर आहेत सगळे फोटो.
मन खूष झालं.

असेच लिहित रहा चित्रगुप्तकाका
_/\_

श्वेता२४'s picture

8 Feb 2024 - 12:53 pm | श्वेता२४

अतिशय विस्तृत ओळख करून दिलीत. फोटो देखील अतिशय सुंदर. भविष्यात ही जागा बकेट लिस्ट मध्ये आहे. त्यामुळे तुमच्या या माहितीचा खूप उपयोग होईल. धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

19 Feb 2024 - 10:07 pm | चौथा कोनाडा

श्री चित्रगुप्त यांच्या कलाकृतीचे उद्यापासुन एक आठवडा चित्रप्रदर्शन होत आहे:
माहिती खालील ठिकाणी:

सेव्हन_आर्टिस्ट_फ्रॉम_इंदोर

चित्रगुप्तजी,
हार्दिक अभिनंदन आणि प्रदर्शनासाठी समस्त मिपाकरांतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !

जुइ's picture

27 Feb 2024 - 6:33 am | जुइ

विहंगम आणि भव्य महाल! रोमचे असे सुंदर दर्शन तुमच्या मुळे झाले! फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले! रोम बद्द्ल अजून वाचायला आवडेल.

जयंत कुलकर्णी's picture

27 Feb 2024 - 11:56 am | जयंत कुलकर्णी

मस्तच!