पहिल्यांदाच मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो. तपकिरी रंगातलं कल्याणचं WCAM-2 इंजिन आज इंद्रायणीचं सारथ्य करत होतं. राखाडी-आकाशी रंगसंगती आणि त्यावर बसवलेल्या खिडक्यांच्या काळ्या फ्रेम्समुळं आमचा डबाही आकर्षक दिसत होता.
ठीक 18.35 ला इंद्रायणी पुण्याहून निघाली. त्याचवेळी शेजारच्या 3 नंबरवरून आझाद हिंदही हावड्याकडे निघाली आणि एकाचवेळी इंद्रायणी आणि ती विरुद्ध दिशेने जाऊ लागल्या. पहिल्यांदाच संध्याकाळी पुण्याहून मुंबईला जात असल्यामुळं बाहेरचं वातावरण वेगळंच वाटत होतं. संगम पुल ओलांडून शिवाजीनगर आल्यावर इंद्रायणी हळुहळू पुढं जात होती. शिवाजीनगरला लावलेला वेगमर्यादा समाप्तीचा फलक आल्यावर मग तिनं एकदम वेग घेतला. तोपर्यंत रेल्वेचा नाश्तावाला फेऱ्या मारायला लागला – साबुदाणा वडा, कटलेट, ऑमलेट हे नाश्त्यात पर्याय उपलब्ध होते.
खडकीच्या आधी इंद्रायणीचा वेग पुन्हा कमी झाला, म्हटलं खडकीत मालगाडी मेन लाईनवर असणार. ते खरंच झालं. खडकीत कर्जतच्या दिशेनं जाणाऱ्या BCN वाघिण्यांच्या मालगाडीला इंद्रायणीसाठी थांबवून ठेवलेलं होतं. दरम्यानच्या काळात लोणावळा चिक्की, कानातलं-गळ्यातलं वगैरेवगैरे विकणाऱ्या फेरीवाल्यांचाही कलकलाट सुरू झाला होता. खडकीनंतर मात्र इंद्रायणीनं चांगलाच वेग घेतला आणि ती मालगाड्यांना ओलांडत पुढंपुढं निघाली. त्याचवेळी पुण्याकडे जाणाऱ्या मालगाड्या, एक्सप्रेस, लोकल्सना इंद्रायणीला क्रॉस होत होत्या.
पुढच्या 6 मिनिटांतच शेजारच्या डाऊन लाईनवरून प्रगती धडाधडत पुण्याकडे निघून गेली. लोणावळ्याच्या TXR यार्डात तीन मालगाड्या कर्जतच्या दिशेनं जाण्यासाठी परवानगी मिळण्याची वाट पाहत उभ्या होत्या, तर दोन डिझेल आणि तीन इलेक्ट्रिक इंजिनं लावलेली एक मालगाडी कर्जतकडे जाण्यासाठी पुढं-पुढं सरकत होती. 19.31 ला लोणावळ्यात इंद्रायणी येत असताना शेजारून दख्खनची राणी बाहेर पडत होती. तिनं अगदी पटकन घेतलेल्या वेगाचा क्षण अनुभवण्यासारखाच होता.
लोणावळ्यातला थांबा आटोपून इंद्रायणी घाट उतरू लागली. राष्ट्रीय महामार्गाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या माझ्या खिडकीतून बाहेर आता काळोखच दिसत होता. अधूनमधून लोणावळा-खंडाळ्यामधल्या डोंगरांवर असलेल्या बंगल्यांमधले दिवे त्यात उठून दिसत होते. खंडाळ्यात मिनिटभराचा तांत्रिक थांबा आटोपून इंद्रायणी पुढच्या प्रवासाला निघाली. बोगद्यातून बाहेर येताच लांब खोपोलीमधल्या झगमगाटानं लक्ष वेधलं. नेहमी संध्याकाळी पुण्यात परत येताना डाऊन लाईनवरून फारसा खोपोलीमधला हा लखलखाट दिसू शकत नव्हता, तो आज दिसला. अमृतांजनच्या परिसरात एक्सप्रेसवे आणि जुन्या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या दिव्यांच्या माळाही मस्त दिसत होत्या. काही मिनिटांतच या दोन्ही महामार्गांच्या खालच्या बोगद्यातून इंद्रायणी मंकी हिलजवळ गेल्यावर तर खोपोलीमधले झगझगीत दिवे आणखी स्पष्ट दिसू लागले. खोपोली आणि त्याच्या आसपासच्या गावांमधला झगमगाट आणि महामार्गांवरची वाहतूक जांभरुंगपर्यंत दिसत राहिली.
दिवसा नागनाथला गाडी थांबते, तेव्हा फक्त केबीनच्या मागच्या बाजूला असलेली काहीच घरं दिसतात, पण आज रात्रीच्या काळोखात त्या घरांबरोबरच आणखी काही वस्ती त्याच्या आसपास असल्याचं लक्षात आलं. त्यातच आता मुंबईतून उड्डाण करणारी, उतरणारी प्रवासी विमानंही आकाशात घिरट्या घालत असलेली दिसू लागली होती. नागनाथनंतर शेजारच्या डाऊन लाईनवरून एक मालगाडी 5 इंजिनांच्या मदतीनं सरसर घाट चढत वर गेली.
घाट उतरत असताना जांभरुंगच्या जवळ रेल्वेचा सामोसावाला आला, पण माझ्याबरोबरच्यांनी कर्जतमध्ये वडापाव खायचं ठरवलं असल्यामुळं गाडीत आम्ही काही घेतलं नव्हतं. लोणावळ्यातच एक संत्रेवाली इंद्रायणीत चढली होती, अगदी नवीकोरी जरीची साडी नेसलेली, गळ्यात-कानात सोन्याचे दागिने आणि अगदी टापटीप. “आरेंज घ्या आरेंज”, असा आवाज देत ती गाडीतून फिरू लागली होती.
आता घाट संपला होता आणि कर्जत आलं होतं. लोखंडाची भलीमोठी रिळं घेऊन जाणारी WDG-4 इंजिनं असलेली एक मालगाडी पुढच्या प्रवासासाठी परवानगी मिळण्याची वाट पाहत कर्जतच्या अप यार्डामध्ये उभी होती. त्याचवेळी डाऊन यार्डात एक मालगाडी घाट चढण्यासाठीची पूर्वतयारी करत होती. ठीक 20.22 ला इंद्रायणी कर्जतमध्ये पोहचली आणि आमची वडापावची प्रतीक्षाही संपली. बराच वेळ वाट पाहून मिळालेला गरमागरम वडापाव खूपच भन्नाट लागत होता. कर्जतला गाडीमधले बरेच प्रवासी उतरल्यावर शेजारी उभ्या असलेल्या सीएसएमटी लोकलमधली गर्दी वाढलेली दिसली. आमच्या समोरची आसनं तर पूर्ण मोकळी झाली. त्यामुळं इतका वेळ आमच्या मागच्या बाजूला कुठं तरी बसलेल्या एका काकूंनी कल्याणपर्यंतचा प्रवास त्या मोकळ्या सीट्सवर आरामात झोपून केला.
कर्जतमधून बाहेर पडत असताना 12163 लोकमान्य टिळक टर्मिनस-एमजीआर चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस कर्जतमध्ये शिरत होती. तिचे बँकर्सही तयारीत होतेच. कर्जतपासून इंद्रायणीचा वेग चांगलाच वाढला होता. या वेगाचा, डाऊन लाईनवरून क्रॉस होत असलेल्या गाड्यांचा अनुभव घेत वडापावनंतरचा आमचा चहाही झाला होता. त्यानंतर भिवपुरी रोड थोडं हळुहळूच ओलांडलं. नेरळ जंक्शन आणि वांगणीला दोन मालगाड्यांना बाजूला ठेवून इंद्रायणीला पुढं सोडण्यात आलं. नेरळनंतर इंद्रायणीचा वेग चांगलाच वाढला होता. त्याचवेळी दीड-दोन मिनिटांच्या अंतरानं शेजारच्या डाऊन लाईनवरून लोकल्स, मेल/एक्स्प्रेस, मालगाड्या अगदी वेगानं क्रॉस होत होत्या. पुढं बदलापूरला फलाटाच्या अलीकडच्या लूप लाईनवर वेगवेगळ्या प्रकारचे मोकळे प्रवासी डबे एकत्र उभे होते.
आता गाडीमधली हालचाल जरा वाढली होती. कल्याणजवळ येत असल्यामुळं तिथं उतरणारे दरवाज्याजवळ जाऊन उभे राहू लागले होते. हे मुंबईचं वैशिष्ट्य आहे, स्टेशन यायच्या बराच वेळ आधीपासूनच प्रवासी दरवाज्याजवळ नंबर लावल्यासारखे उभे राहतात. रात्री 9.02 ला कल्याणमध्ये इंद्रायणी उभी राहिली. तिथं आणखी गर्दी कमी झाली. कल्याणपासून आता आजपर्यंत पुणे-मुंबई-पुणे प्रवासाच्यावेळी कधीही न दिसलेल्या गाड्या – जशा की विदर्भ, ऐतिहासिक पंजाब मेल आणि हावडा मेल (व्हाया नागपूर), पुष्पक, अमरावती – मला दिसू लागल्या होत्या. कल्याणमध्ये पुष्पक इंद्रायणीच्या आधी आली होती, पण तिच्या आधी इंद्रायणीला पुढं सोडण्यात आलं होतं. कल्याणनंतर तिकडून विदर्भ कल्याणकडे जात होती, तर इकडून अत्याधुनिक WAG-12B हा कार्यअश्व जिंदाल स्टीलची गाडी घेऊन कल्याणकडे निघाला होता. ठाण्याचा थांबा आटोपून इंद्रायणी दादरला आली आणि अगदीच मोकळी झाली. आमच्या डब्यात आम्ही चार जणच राहिलो होतो, तर पुढचा डबा तर पूर्ण मोकळा झाला होता. आता आमचा प्रवास शेवटच्या टप्पात आला होता. इंद्रायणी रात्री 10.12 ला 12 मिनिटं उशिरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 12 नंबरच्या फलाटावर जाऊन विसावली, तेव्हा 14 नंबरवर आणखी एक ऐतिहासिक हावडा मेल निघायची तयारी करत होती.
https://avateebhavatee.blogspot.com/2024/01/blog-post_13.html
प्रतिक्रिया
13 Jan 2024 - 10:32 pm | कंजूस
छान वर्णन.
बरेच लोक {मुंबईतले} पश्चिम रेल्वेचं फार कौतुक सांगत असतात पण मध्य रेल्वेवर बऱ्याच नव्या कोऱ्या गाड्या ( फोटोतील एक) आहेत तशा पश्चिम रेल्वेवर नाहीत. सगळ्या वीस वर्षांपासूनच्या आहेत. पत्रे गंजले आहेत. इंद्रायणी ने आजच कल्याण ते पुणे प्रवास करण्याचा योग आला. वेटिंग लिस्टवर तिकिटे असूनही गेलो कारण परतीचे इंटरसिटीचे तिकिट मिळाले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे बसलेले प्रवासी उभ्या राहिलेल्यांना थोडा वेळ उठून जागा देत होते. योगायोगाने दहा जणांचा एक गट लोणावळ्याला पिकनिकसाठी उतरला आणि मग सर्वांनाच बसायला मिळाले. या गाड्या नवीन आहेत, अमोरासमोरच्या बाकड्यांमध्ये भरपूर जागा सोडली आहे, सामान,बॅगा ठेवायची अडचण होत नाही. बाकड्यावरही बरेच सामान राहू शकते. तसे बससीट्सच्या बाकडी आसनव्यवस्था असलेल्या डब्यांत होत नाही.
14 Jan 2024 - 9:49 am | पराग१२२६३
नवीन डब्यांमध्ये समोरासमोरच्या सीटमध्ये जास्त जागा असली तरी विंडोवाल्यांना सीट जरा अडचणीची होत आहे.
14 Jan 2024 - 12:56 am | नठ्यारा
नागनाथ गेल्यावर जांबरुख व टाटाला थांबलेली का इंद्रायणी? काही गाड्या थांबतात.
-नाठाळ नठ्या
14 Jan 2024 - 9:47 am | पराग१२२६३
घाटात खंडाळा आणि नागनाथ शिवाय कुठंही थांबली नाही इंद्रायणी.