नर्मदे हर , /;/ .

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in जनातलं, मनातलं
19 Feb 2023 - 6:37 pm

लेख वाचण्यागोदर पूर्वसूचना - हा लेख १० दिवसीय नर्मदा पदपरिक्रमेच्या (परिभ्रमणाच्या) अनुभव कथनावर आधारीत आहे.

पूर्वपीठिका - मला दुर्गभ्रमणाची आवड आहे , याच आवडीमुळे माझ्या अनेक ठिकाणी पदभ्रमण मोहीमा झाल्या आहेत.माझ्या भावाने जेव्हा नर्मदा परिक्रमेसाठी मला विचारले, त्या क्षणी माझी पाटी कोरी होती.सहसा भ्रमण मोहिमेसाठी कोणी विचारले असता , मला थोडी फार त्या ठिकाणाबद्दल कल्पना असते. पण या वेळी स्थिती वेगळी होती, त्यामुळे या परिक्रमेबद्दल सौं ना विचारले , त्यांनी " नर्मदे हर हर" हे पुस्तक वाचलेले असल्याने मला जाण्याचा सल्ला दिला. कार्यालयीन कामाचा भार त्यावेळी कोविडमुळे विशेष नव्हता आणि मोहिमेला अवधी होता.त्यामुळे भावाला होकार कळवून टाकला. परंतु , मोहिमेला जाण्याच्या ३ महिनेआधी मला कामानिमित्त लखनौला जावे लागले, प्रकल्प अभियंता असल्यामुळे लखनौला पोहचताच जाणीव झाली कि " इस बार लंबा कटेगा ". मोहिमेसाठी कायप्पा संघ स्थापित झाला, नवीन सदस्य सामील झाले. बरोबर न्यावयाचे साहित्य आणि मार्ग यावर जुजबी चर्चा झाली. मोहिमेतील अनेक सदस्य गण आप्तजन असल्यामुळे एक वेगळेच कुतुहल होते. लखनौला कामात व्यस्त असल्यामुळे परिक्रमेसाठी ची पूर्वतयारी ( चालण्याचा सराव नि सामानाची जुळवाजुळव ) माझी शून्य होती पण दुर्गभ्रमणाच्या आवडीमुळे आयत्यावेळी धावपळ करून निभावून नेईन यावर विश्वास होता.
"नर्मदा परिक्रमा " हि कार्तिकी पौर्णिमेनंतर सुरु करण्याची प्रथा आहे. काही लोक दसऱ्यानंतर परिक्रमेला प्रारंभ करतात , तर काहीजण गुढी पाडव्यानंतर करतात . परिक्रमा पूर्ण झाल्यावर ओंकारेश्वरास माँ नर्मदेचा जलाभिषेक करण्याचा प्रघात आहे , त्यामुळे अनेकजण वेळ वाचविण्याकरिता परिक्रमेस ओंकारेश्वर पासून सुरुवात करतात. २०२१ साली कार्तिकी पौर्णिमा हि १८-१९ नोव्हेंबरला होती. आमचा ६ जणांचा संघ होता. त्यामध्ये मी व माझा भाऊ सोडल्यास बाकी सर्व महिला सदस्य होत्या. आम्हा ६ जणात फक्त दोघीच पूर्ण परिक्रमा करणाऱ्या होत्या आणि बाकी सर्व थोडे दिवस सोबत करणार होतो. आम्ही परिक्रमा प्रारंभ करण्याचे ठिकाण नेमावर असे ठरवले होते.आम्ही १८ तारखेला नेमावारला पोहोचलो आणि १९ तारखेपासून परिक्रमा सुरु करण्याचा संकल्प सोडण्याचे ठरवले होते. ( संकल्प , परिक्रमा, परिभ्रमण या सर्व व्याख्या पुढे स्पष्ट होतील.) नेमावरला हिंदू व जैन धर्मीयांची अनेक मंदिरे आहेत.आम्ही सिद्धेश्वर मंदिर आणि नर्मदा नाभीकुंडाचे दर्शन घेतले. सिद्धेश्वर मंदिर बद्दल एक आख्यायिका तिथल्या एक बाबाजींनीं आम्हाला सांगितली. सिद्धेश्वर मंदिर निर्माण कौरवांनी केला तेव्हा ह्या मंदिरचे द्वार पूर्व दिशेस होते ,परंतु भीमाने आपल्या ताकदीने हे मंदिर फिरवले आणि मंदिराचे द्वार पश्चिमेस फिरविले. कौरव पांडवात मंदिर निर्माणावरून वाद झाला , त्याप्रसंगी धर्मराज युधिष्ठिर यांस सत्यासत्य करण्यास सांगितले असता त्याने लोकांस सांगितले कि, "दुर्योधनाला विचारा कि त्याने निर्माण केलेल्या मंदिराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेस आहे ? " नि अशाप्रकारे "नरो व कुंजरोवा" पध्दतीचा निवाडा झाला. हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येते. मंदिरावरील कोरीवकाम प्रेक्षणीय आहे. या मंदिराच्या प्रांगणात एक घुमटवजा छत्री आहे. तेथे बाकड्यावर बसून नर्मदा मैय्याच्या घाटाचे मन तृप्त होईस्तो दर्शन घेता येते.
नर्मदा हि एकमेव नदी आहे , ज्या नदीची पूर्ण परिक्रमा केली जाते. नदी परिक्रमा असल्याने साहजिकच "उगम ते सागर" असे वर्तुळ दोन्ही कडचे तट पार केल्याशिवाय पूर्ण होत नाही .हि नदी पूर्व-पश्चिम अशी वाहत असल्याने या नदीचे दोन्ही काठ उत्तर तट व दक्षिण तट या नावाने ओळखले जातात. आम्ही परिक्रमा उत्तर तटावरून प्रारंभ करण्याचे ठरवले होते. या दोन्ही तटाबद्दल अशी आख्यायिका आहे कि उत्तर आणि दक्षिण तटावर अनुक्रमे देव आणि दानव लोकांचे वास्तव्य आहे.
नेमावर या ठिकाणी नर्मदा नदीचे नाभीस्थान आहे आणि ते प्रवाहाच्या मध्यभागी आहे. परिक्रमेत असतांना नर्मदा मैय्यास आपण ओलांडू शकत नाही , त्यामुळे आम्ही संकल्प उचलण्यागोदर नाभीस्थान दर्शन केले आणि याच कारणास्तव आम्ही नेमावारहून संकल्प उचलण्याचे ठरवले होते. "संकल्प ते सिध्दी " हि घोषणा आता सर्वोपरिचित आहे. परिक्रमा करणे वा उचलणे (कारण तेथे परिक्रमा उठाना असा वाक्प्रचार प्रचलित आहे.) अगोदर एक विधिवत मय्येची पूजा केली जाते आणि कन्यापूजन करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यानंतर आम्ही मार्गस्थ झालो. हा आमच्या परिक्रमेचा पहिलाच दिवस असल्यानं आम्ही सर्वच थोडे साशंक होतो.परिक्रमावासी झाल्यामुळे आमच्या अंगावर फक्त श्वेत वस्त्रे होती.श्वेत वस्त्रे,हातात काठी नि पाठीवर भार असा सर्व आमचा "अवतार" होता. परिक्रमावासीना स्थानिक जन साक्षात देवाचा अवतार मानतात व त्यांची सर्वतोपरी मदत करतात. याचा प्रत्यय आम्हास नेमावरलाच आला. ज्या चहावाल्याकडे आम्ही परिक्रमा उचलण्याअगोदर चहा प्यायला जायचो त्याच चहा वाल्याने आम्ही परिक्रमावासी झाल्यावर आमच्याकडून चहाचे पैसे घेतले नाहीत.प्रथमतः व्यवहारी मनास ती गोष्ट खटकली परंतु नंतर ह्या गोष्टीची सवय होऊन गेली. परिक्रमेस सुरुवात केल्यानंतर आमचा पहिला मध्यान्ह-मुक्काम तूरनाल इथे होता.याठिकाणी एका बाबांची लहानशी कुटी होती ( ते मराठी होते, नदीचे मूळ नि ऋषीचे कूळ कधी शोधू नये असा प्रघात असल्याने या विषयी जास्त लिहू इच्छीत नाही) व तेथे एका सद्गृहस्थाने कन्याभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रथम दिनी आमच्या गटातील दोन महिला ( आत्या नि बहीण) अग्रेसर होत्या. या अग्रेसर महिलांनीच त्या दिवशी आम्हा सर्वांची भोजन व्यवस्था करण्यात अग्रक्रम लावला. प्रथम दिनीच आम्हाला चांगले जेवण लाभल्याने आम्ही मनोमन मय्येचे नि त्या गृहस्थाचे आभार मानत होतो . याउलट स्थानिक जन त्या सद्गृहस्थास नशीबवान समजत होते, कारण कन्याभोजन सोहोळ्याला परिक्रमावासी यजमान मिळणे हे अहोभाग्य समजले जाते. तूरनाल नंतर आम्ही रात्रौ मुक्कामास बीजलगाव गाठण्याचे ठरवले. तूरनाल मधील आश्रमातून मय्येचे थेट दर्शन आम्हास होत नव्हते. हे भाग्य आम्हास बीजलगाव येथे लाभले. बीजलगाव आश्रम हा थोडा उंचीवर आहे त्यामुळे येथून मय्येच्या आसपासच्या परिसराचे मोहक दर्शन होते.येथे नर्मदा मैय्येचे मंदिर आहे. नर्मदा परिक्रमा उचलल्यावर सायंप्रहरी मय्याचे पूजन केले जाते. नर्मदा मय्येचे रूपक म्हणून एका कुपीत नर्मदा मय्येचे जल परिक्रमा उचलताना सोबत घेतले जाते. परिक्रमा उचलल्यानंतर आमचे प्रथमच सायं-नर्मदा पूजनाची वेळ होती, यावेळेस माझ्या काकूने सुंदर भजन गाऊन वातावरण भक्तिमय केले अशी दाद आश्रमजनांकडून मिळाली. या आश्रमातील भोजनप्रसादी हि लग्नातील पंगत समान होती.प्रथम दिन असल्याने गाडीला वंगणाची गरज होती.त्याच प्रमाणे गरम पाण्याचा शेक मिळाल्याने वयस्कर मंडळी ना चांगला आराम मिळाला होता. दिनांक २० नोव्हेंबरला आम्ही सातगाव कडे प्रस्थान केले. आश्रमात पोहोचण्यापूर्वी एका मोटरसायकलस्वाराने थांबून आमची चौकशी केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या गावी येणाचे निमंत्रण दिले.सातगाव आश्रम हा आम्ही भेट दिलेल्या आश्रमांमधील सर्वात प्रशस्त असा आश्रम होता. आमच्यापैकी एका ताईंची आई आजारी पडल्यामुळें त्यांना घरून परतीसाठी अनेकदा कॉल येत होते. या आश्रमातील बाबांनी निकड पाहून तत्परतेने व्यवस्था केली परंतु त्यांनी आपली चिंता मय्यावर सोडून आमच्यासोबत मार्गक्रमण केले. दुसऱ्या दिवशीचा रात्रौ मुक्काम हा सीलकण्ठ गावी होता. ह्या आश्रमाचा परिसर विशाल होता. येथील बाबांनी आहेस फार प्रेमाने जेऊखाऊ घातले. ह्यांच्या हातच्या चहाला वेगळीच चव होती.सीलकण्ठ ला रात्रौ मुक्कामात ताईंनी आपल्या आईला भेटण्यासाठी घरी जाण्याचे ठरवले . २१ तारखेला सकाळी ताईंचा निरोप घेऊन आम्ही नीलकंठ गावी प्रस्थान केले. वाटेत उपनदीचा प्रवाह पार करावयाचा होता, त्यावेळेस तेथील वित्त भट्टी मजुरांनी आम्हास योग्य रस्ता दाखविला.परिक्रमेची हि खासियत आहे कि जेव्हा आपणास रस्ता सापडत नसेल तेव्हा फक्त मय्येचे नामस्मरण केल्यास मय्या कोणत्या ना कोणत्या रूपात आपणास रस्ता दाखविते. नीलकंठ गावी नर्मदा मय्येचे ओम स्वरूपात धारा वाहतांना पाहावयास मिळते. नीलकंठ गावी आश्रमात पुरोहितांनी आमचे आदरातिथ्य केले. चहापान उरकून आम्ही छिदंगावला प्रयाण केले. छिंदगाव ला आम्ही प्रथमच गृहस्थाश्रमींच्या घरी भोजनप्रसादी स्वीकारली.योगायोगाने काल सातगावला ज्या गृहस्थांनी आम्हाला आमंत्रण दिले होते , त्यांच्या घरीच आम्ही भोजनप्रसादी स्वीकारली.माहेरास आलेल्या लेकीचे जितके प्रेमाने नी अगत्याने स्वागत होते त्याच अगत्याने या घरी आमचे आदरातिथ्य झाले. त्यांचे घरी एक बाबा वास्तव्य करून होते, पण त्यांची आमच्याशी भेट झाली नाही. मुक्कामी राहण्याचा त्यांची विनंती अव्हेरून आम्ही डिमावर ला प्रस्थान केले. डिमावरला सुद्धा सायंप्रहरी भजनसंध्या चांगलीच रंगली. इथे आमची भेट सोमनाथ गिरी महाराजांशी झाली.ते स्वतः एक अभियंता होते परंतु त्यांनी सर्वसंगपरित्याग केला होता. त्यांच्याशी आम्ही थोडा वेळ चर्चा केली,चर्चा उद्बोधक होती. "शक्ती पुंज " आश्रम स्थापनेच्या कामात ते व्यस्त होते. हा आश्रम डिमावर च्या मुख्य रस्त्यास लागूनच आहे, नी उद्घटनाची लगबग त्यावेळेस होती. २२ तारखेस आम्ही सकाळी रेऊ गावी प्रयाण केले. रेऊ गाव आश्रमात आम्हाला दोन गुजरातहून आलेले बाबाजी भेटले. त्यांनी आम्हाला चालण्यामुळे होणारी स्नायुदुखी दूर करण्याचा काठी व पंचाच्या साहाय्याने दूर करण्याचा एक नामी उपाय सांगितला. रेऊ गावाहुन मार्गस्थ झालो असता अनेकांनी आवली घाट या ठिकाणी मुक्काम करण्याचे सुचविले कारण आवली घाट येथे असलेल्या संगमामुळे प्रसिद्ध आहे. या घाटाशी पांडवांशी निगडित एक दंतकथा प्रसिद्ध आहे. शिवपुत्री नर्मदा हि कन्याकुमारी आहे. भीमाने तिच्यापुढे लग्नासाठी प्रस्ताव मांडला तेव्हा तिने तिने एक आत घातली कि , माझा प्रवाह एका रात्रीत जर तू थांबवू शकशील तर मी तुझा प्रस्ताव मान्य करेन. भीमाने अट मान्य केली नि प्रवाह अडवण्यासाठी मोठ्या शिळा गोळा करून प्रवाह अडवण्यास सुरुवात केली. परंतु ऐनवेळेस भगवान शंकरांनी कुक्कुट रूप घेऊन बांग दिली नि नर्मदा मातेचे व्रत मोडू दिले नाही. आणली घाट हा खरोकरच विस्तीर्ण घाट आहे. या घाटाच्या पलीकडल्या तटावर ७१ फुटी शंकराची प्रतिमा आहे . या घाटावर आम्ही शिवालयात रात्रौ मुक्काम करण्याचे ठरवले.परिक्रमेत प्रथमच आमच्या सोबत या घाटावर इतर परिक्रमावासी सोबतीला मुक्कामास होते. या शिवालयात जवळपास २०-२५ परिक्रमावासी मुक्कामास होते. यातील एक महिलेने आमच्या एक दोन दिवस आधी नेमावरहूनच परीक्रमा उचलली होती. साधूंच्या आसनावरून शिवालय व्यवस्थापकांत वाद सुरु झाला. या वादाचे पर्यावसान नंतर हाणामारीत झाले. गावच्या सरपंचांना येऊन मध्यस्थी करावयास लागली. या सर्व धुमश्चक्रीत परिक्रमावासींनी मिळून सदावर्त ( स्वतःचे जेवण स्वतः बनवून खाणे) केले. नि याचवेळेस प्रथमच आम्हास सोनी बाबांच्या हातची डाळ खावयास मिळाली. रात्रीच्या प्रसंगामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी ( २३ तारखेला) भल्या पहाटेच आवलीहून प्रयाण केले. यावेळी वाटेत आम्हाला रामनाम घेणारी प्रभातफेरी एका गावात पाहावयास मिळाली. नर्मदा मय्याच्या प्रवाहातून कृषीसाठी अनेक कालवे काढण्यात आले आहेत . अशाच एका कालव्याला समांतर आम्ही मार्गक्रमण करत होतो. यावेळेस सकाळी आम्हाला एका झाडावर बगळ्यांची सभा बघावयास मिळाली. जहाजपुरा गावाच्या फाट्यावर आम्ही ठरवले कि चहापानासाठी थोडा विश्राम करावा कारण रात्रीच्या प्रसांगामुळे झोप हि नीट झाली नव्हती. तेव्हा आम्ही रामजींच्या घरी चहापानासाठी गेलो. घराचे आंगण आणि परीस दोन्ही प्रशस्त होते. त्यांनी आम्हास मुक्काम करावयाचा आग्रह केला नि आम्ही त्यांचे आमंत्रण स्वीकारून परिक्रमेतील "एक उनाड दिवस " पुरेपूर उपभोगला.अंगणात अनेक दुभती गाई-गुरे होती. परिसरात अनेक फळझाडे नि भाज्या लावलेल्या होत्या. आम्ही प्रथमच बासमती तांदळाचे घरगुती कोठार पाहिले. सायंकाळी गावातील सर्व मंदिरांचे दर्शन घेतले नि एका पाळीव घोड्यासोबत थोडा वेळ व्यतीत केला. २४ तारखेला आम्ही सकाळी लवकर उठून हौलीपुरासाठी प्रस्थान केले. वाटेतच आम्हास सातधारेचे दर्शन झाले. पुढील रस्ता थोडा चकवणारा होता तेव्हा तेथील बाबाजींनी आम्हाला योग्य रस्ता दाखविला व या परिसरात कोल्ह्यांचा वावर आहे याची कल्पना सुद्धा दिली. हौलीपुरा पोहोचण्याआधी एक उपनदी ओलांडली. नदीचा प्रवाह बऱ्यापैकी खोल नि जलद होता. प्रवाह ओलांडतानाच मागून "नर्मदे हर " असा पुकारा ऐकू आला , बघतो तर काय ! सोनी बाबा व २ पुणेकर महिला ज्या आम्हास आवली घाटावर भेटल्या होत्या त्या पुन्हा आमच्या बरोबरीने आल्या होत्या. हौलीपुरास आमच्या गटाची चूकामूक झाली, त्यावेळेस माझी काकू व भाऊ वेगळ्या वाटेने गेले. सोनी बाबा व मंडळी नि आम्ही तिघे ( आत्या, बहीण नि मी स्वतः ) थेट हौलीपूरा आश्रमास पोहोचलो नि तेथे सदावर्त केला. सोनी बाबांनी झक्कास टिक्कड नि डाळ बनवली होती. सदावर्त आटोपून आम्ही बुधनी घाटाकडे प्रयाण केले बुधनी घाटाकडे जात असतांना एका वाटेवर मला कोल्हासुद्धा दिसला. बुधनी घाट हा शहरी भागात मोडतो.त्यामुळे बुधनी घाटाकडे जाणारी वाट हि हमरस्त्याने जोडलेली आहे.२५ तारखेस आम्ही सर्वांनी बांद्रभान घाटाकडे प्रयाण केले. बांद्रभान घाट हा मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केलेल्या कामामुळे प्रसिद्ध आहे या घाटावर सुद्धा ताव नि नर्मदा नदीचा संगम आहे. घाट प्रेक्षणीय जरी असला तरी येथे राहण्याची व्यवस्था नाही. या घाटावर त्यावेळी एका कुटुंबाने भंडारा ठेवला होता. माझ्या आत्येने चातुर्याने आम्हा सर्वांची तेथे भोजनप्रसादी ची सोय केली. भोजनप्रसाद आटोपून आम्ही शाहगंज कडे प्रयाण केले. शाहगंज घाट चा रस्ता हा मुख्यतः हमरस्ता होता त्यामुळे पदभ्रमंती थोडी रटाळ वाटत होती, वाटेत आम्हाला एका दुकानदाराने पूजा साहित्याची पिशवी भेट म्हणून दिली. शाहगंज आश्रमात प्रथमच आचारी म्हणून एक महिला कामास होती.त्यांनी दिलेली भोजनप्रसादी खाऊन आम्ही सर्व झोपी गेलो. २६ तारखेस आम्ही सरदार नगर व नारायणपूर गाठायचे ठरवले होते. २६ तारखेला सकाळी आम्ही माध्यान्ह मुक्कामासाठी सरदार नगर गाठायचे ठरवले होते. पण त्यादिवशी सूर्यनारायणाची कृपा चांगलीच बरसात होती त्यामुळे विश्रांती मध्ये जास्त वेळ जात होता. आम्ही एका गव्हाच्या शेतात चहापानासाठी थांबलो . आम्हाला चहा देण्यासाठी त्याने जवळपास ५-६ किमी मोटरसायकल दौडवली, असे प्रसंग आपल्या शहरी जीवनात अपवादात्मकच ! वाटेत आम्हाला हाथनोरा गाव लागले, येथे नर्मदा आश्रमाचा फलक दिसला.आश्रम लहान होता , पण व्यवस्था चांगली वाटली. सावलीसाठी मोठी झाडे, फुलझाडे लहानश्या जागेत व्यवस्थितरीत्या लावलेली होती. आम्ही ५ मिनिटे बसून पुढे जाण्याचा विचारात होतो , तोपर्यंत २ महाराष्ट्रातील वयस्कर परिक्रमावासी आश्रमात आले. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून पुढे निघणार तोपर्यंत अमरावतीचा एक युवक आम्हाला भेटला . तो तिथे सेवादार होता, वय वर्षे अवघे २६.शिक्षकाची सरकारी नोकरी सोडून ह्या व्यक्तीने परिक्रमावासींच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले होते. हा एक आश्रम स्वतः पदरमोड करून चालवत होता आणि याशिवाय येथे भोजनप्रसादीची व्यवस्था सांभाळत होता. अशा व्यक्तींना भेटल्यावरच माणूस म्हणून आपण किती खुजे आहोत याची जाणीव होते. त्याच्या या पुण्यकार्यात खारीचा वाट उचलून आम्ही मार्गस्थ झालो.रात्रीचा मुक्काम आमचा सरदार नगर या गावी होता. येथील आश्रमात २४ तास रामायण पठण चालू होते. याशिवाय सांज आरतीला तबला नि पेटीची जोड होती.नर्मदाष्टक नि भजन ऐकून त्या दिवसाची सांगता झाली. २७ नोव्हेंबर हा आमच्या परिक्रमेचा शेवटचा दिवस होता. या दिवसाची सुरुवात आम्ही जैत या गावापासून केली. जैत हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचे मुळगाव आहे. या गावात तशी समृद्धी होती. या गावाचे आदरातिथ्य स्वीकारून आम्ही नान्दनेर ला मध्यान्ह मुक्कामासाठी पोहचलो. नान्दनेर ला आम्ही एका शिव मंदिरास भेट दिली. या मंदिरात मय्येच्या प्रवाहात सापडलेले एक प्रचंड शिवलिंग आहे तसेच या मंदिरात एकाला लागून एक असे दोन शिवलिंग ठेवलेली आहेत. मंदिराचे सध्या नूतनीकरण चालू आहे. येथे पूर्ण प्रवासात मला पहिल्यांदाच मनसोक्त ताक प्यावयास मिळाले. मय्याने माझी हि इच्छा सुद्धा पूर्ण केली. नान्दनेरहून आम्ही कुसुमखेडाला प्रयाण केले. कुसुमखेडाला आम्ही मय्याचे दर्शन घेऊन आम्ही यात्रा समाप्त केली. कुसुमखेडला आम्हाला एक सद्गृहस्थ भेटले त्यांनी आमची विचारपूस केली. जेव्हा त्यांना कळले कि मय्याच्या परिक्रमेसाठी आम्ही एवढ्या दूरहून आलो आहोत तेव्हा त्यांना भरून आले नि त्यांनी आम्हाला प्रेमाने आलू वडा खाऊ घातला. २७ तारखेस आमची परतीचे तिकीट होते,तेव्हा आम्ही मय्येला पार करून पिपरीया हून ट्रेन पकडून २८ ला दुपारी मुंबईला पोहोचलो.
माझी काकू आजमितीस परिक्रमेत आहे. आम्ही बाकी सर्वांनी संकल्प न उचलता तिला थोडा काळ सोबत केली त्यामुळे आमची हि यात्रा परिक्रमेत न मोडता , परिभ्रमण केले असे म्हणता येईल. परिक्रमा हि स्थानिक लोक अरिष्ट टाळण्यासाठी व नवस पूर्ण करण्यासाठी सुद्धा करतात. तर अनेक काही जण वार्धक्यामुळे वैराग्य प्राप्तीसाठी करतात. या यात्रेने मला काय दिले , असे मला कोणी विचारले तर मी स्पष्ट सांगेन -दानत, सेवा भाव आणि नात्यातील ओलावा दिला. या युगातील श्रावण बाळ कसा असावा याचा दाखला दिला. प्रकृतीच्या जवळ राहून भारतीय संस्कृती काय आहे ते दाखविले.
परिक्रम किती किमी ची आहे व आम्ही दररोज किती अंतर कापले ह्याचे तपशील लिहिणे मी जाणीवपूर्वक टाळले. कारण परिक्रमा हि नर्मदा मय्येला अंतरी वसण्यासाठी करावी, अंतर कापण्यासाठी नव्हे ! सोनी बाबांनी एकदा आम्हाला सहजच सांगितले कि मय्या तिच्या वर्षनिशीत ज्यांची नावे लिहिते, त्यांचाच परिक्रमेसाठी नंबर लागतो.लेखाचे शीर्षक "नर्मदे हर " च्या पुढे स्वल्पविराम /अर्धविराम /पूर्णविराम जाणीवपूर्वक मांडलेत कारण मय्ये सोबतचा प्रवास हि फक्त सुरुवात आहे का पिक्चर अभी बाकी है हे मय्याच ठरवील.
जय मा नर्मदा , दर्शन तुझे मोक्षदा
नाम तुझे सुखदा , मुखी रहो सर्वदा
- विअर्ड विक्स

संस्कृतीधर्ममुक्तकप्रवासप्रकटन

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2023 - 7:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परिभ्रमण कथा आवडली. छान.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

19 Feb 2023 - 7:46 pm | कंजूस

नर्मदा उजवीकडे ठेवूनच परिक्रमा करावी लागते का?
नेमावरच्या जवळचे रेल्वे स्टेशन कोणते? कोणती रेल्वे?

विअर्ड विक्स's picture

19 Feb 2023 - 8:05 pm | विअर्ड विक्स

अनुभव हा थोडक्यात घेतलाय हे खरे आहे. कारण जी सुखानुभूती यात्रेत होते त्याचे शब्दांकन करणे कठीण आहे नि ते प्रत्यक्ष अनुभवातूनच कळते. अनेक पुस्तके आहेत. अनेक लोक युट्युबवर विडिओ टाकतात , मी स्वतः यातील काहीसुद्धा पहिले व वाचले नव्हते त्यामुळे मला जरा जास्त कुतूहल वाटले असेल कदाचित.

हो परिक्रमेला मय्या उजव्या हाताला ठेवावी. मी मुंबईहून गेलो होतो. हरदा स्टेशनला उतरलो होतो. अनेक ट्रेन आहेत . पण मी कार्यालयातून जावयाचे असल्याने संध्याकाळची १२१३७ पकडली. रात्रौ झोपून सकाळी वेळेत हरदाला. तेथून नेमावारला जावयास आम्ही विक्रम केली कारण आमचा ग्रुप होता . अंदाजे २५-३० किमी. लक्षात असुद्या हरदा हे दक्षिण तटावर आहे व नेमावर उत्तर तटावर . त्यामुळे मय्या चे दर्शन नेमावर घाटाला पोहोचण्याआधीच होते.

अनेक जण ओंकारेश्वराहून संकल्प उचलतात . चैत्र महिन्यात अल्प परीक्रमा असते कोणास करायची असेल तर

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Feb 2023 - 11:28 am | राजेंद्र मेहेंदळे

अधिक माहितीसाठी व्यनि करतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Feb 2023 - 11:28 am | राजेंद्र मेहेंदळे

अधिक माहितीसाठी व्यनि करतो.

चौथा कोनाडा's picture

20 Feb 2023 - 11:47 am | चौथा कोनाडा

छान परिक्रमा ! वर्णन वाचताना रमायला झालं.
झकास लिहिले आहे.
पुढील वेळीस फोटो नक्की टाका.
दोन परिच्छेदामध्ये जागा द्या. सुवाच्य होईल.

टर्मीनेटर's picture

20 Feb 2023 - 4:03 pm | टर्मीनेटर

लेख आवडला 👍

पर्णिका's picture

25 Feb 2023 - 1:58 am | पर्णिका

अनुभवकथन आवडले.
काही दिवस नर्मदामैय्याच्या किनारी राहायची कल्पना मस्तच... !

त्यांनी आम्हाला चालण्यामुळे होणारी स्नायुदुखी दूर करण्याचा काठी व पंचाच्या साहाय्याने दूर करण्याचा एक नामी उपाय सांगितला.

हे प्लिज सविस्तर सांगणार का ? गेल्या आठवड्यात लॉन्ग वीकेंड असल्याने नवऱ्यासोबत ५-मैलांची ट्रेल/ट्रेक (जी याआधीही अनेकदा केली होती) केली, तर पाय बऱ्यापैकी दुखत होते.

पायास मेहेंदी काढताना ज्या पोझिशन मध्ये बसतो त्याप्रमाणे बसावे. पंचा घेऊन तो दोन्ही पोटऱ्यांभोवती गुंडाळून गाठ गुढग्याच्या मध्ये पुढील बाजूस ठेवावी . एखादी काठी वा सोटा घेऊन तो पंचाच्या वेटोळ्यात अडकवून काठी पुढच्या बाजूस खेचली असता पोटऱ्यांवर उत्तम ताण येतो.

धर्मराजमुटके's picture

5 Mar 2023 - 10:02 pm | धर्मराजमुटके

लेख फारच घाईत लिहिल्यासारखा वाटला. इतर नर्मदा परिक्रमेच्या लेखांवर येणार्‍या प्रतिक्रियेत "खाण्यापिण्याची वर्णने जास्त येतात" याच्याशी सहमत व्हावे लागते. पुढील वेळेस असा एखादा अनुभव लिहिताना शांततेने लिहिला तर त्यातील अनुभव अधिक प्रखरपणे दुसर्‍यांपर्यंत पोहोचविता येईल. आगावूपणाबद्द्ल क्षमस्व !

विवेकपटाईत's picture

7 Mar 2023 - 10:02 am | विवेकपटाईत

सुंदर वर्णन. वाचताना मजा आली.