प्रथम नागरिकाचा दिमाखदार शपथविधी

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
23 Jul 2022 - 2:25 pm

Presidential Buggy

नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपल्यावर 25 जुलैला सकाळी अकरा वाजता नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडेल. देशातील सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या व्यक्तीचा हा शपथविधी समारंभ अतिशय गांभीर्यपूर्ण, शिस्तबद्ध, दिमाखदार आणि पाहण्यासारखा असतो. राष्ट्रपती भवनात पार पडत असलेल्या विविध परंपरागत, दिमाखदार समारंभांपैकी हा एक समारंभ असतो.

राष्ट्रपती भवन या विशेष समारंभासाठी सज्ज झालेले असते. जुलै असल्यामुळे त्या अंगरक्षकांनी त्यांचा खास समारंभासाठीचा उन्हाळी गणवेश – पांढरा झगा – परिधान केलेला असतो. असेच घोडेस्वार अंगरक्षक राष्ट्रपती भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारीही उभे असतात. प्रवेशद्वाराच्या पुढे संसद भवनापर्यंत जाणाऱ्या मार्गाच्या दोन्ही बाजूंना तिन्ही दलांमधील जवान समारंभासाठीच्या खास पोशाखात उभे असतात. हा विशेष महत्वाचा समारंभ असल्यामुळे या सगळ्या बाबी अचूक असतील याकडे लक्ष पुरवले जात असते.

नवनिर्वाचित राष्ट्रपतींचे विद्यमान राष्ट्रपतींकडून त्यांच्या कक्षात स्वागत केले जाते. त्यानंतर ते दोघेही दरबार हॉलच्या दिशेने जातात. तिथून पुढे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात येतात. त्यावेळी त्यांच्याभोवतीने असणाऱ्या 4 ADC चे स्थान त्यांच्या लष्करी हुद्द्यांच्या क्रमवारीनुसार ठरत असते. प्रांगणातील सलामी मंचावर आल्यावर राष्ट्रपती अंगरक्षकांकडून दोघांनाही चंदेरी तुतारी वाजवून सलामी दिली जाते. मात्र यावेळी विद्यमान राष्ट्रपती पुढे आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती त्यांच्यापासून थोडे मागे उभे राहतात. सलामीनंतर दोघेही राष्ट्रपतींच्या खास मोटारीतून राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांसह संसद भवनाच्या दिशेने निघतात. प्रांगणाच्या मध्यभागी असलेल्या जयपूर स्तंभाजवळ भूदलातील राष्ट्रपती गार्डची तुकडी त्यांना सलामी देते. अशीच सलामी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर आल्यावर संसद भवनापर्यंतच्या मार्गाच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या तिन्ही दलांच्या तुकड्यांकडूनही दिली जाते.

विजय चौकातून संसद भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोक सभेचे अध्यक्ष आणि इतरांकडून या दोघांचे स्वागत केले जाते. तिथे पुन्हा चंदेरी तुतारी वाजवून राष्ट्रपती अंगरक्षकांकडून राष्ट्रपतींना सलामी दिली जाते. त्यानंतर हे सर्व जण विशिष्ट पद्धतीने संसद भवनातील मध्यवर्ती सभागृहाकडे जाऊ लागतात.

मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रगीतानंतर भारताचे सरन्यायाधीश नवनिर्वाचित राष्ट्रपतींना पदाची शपथ देतात. शपथ घेतल्यानंतर निर्वाचित राष्ट्रपती विद्यमान राष्ट्रपतींच्या आसनावर जाऊन बसतात. म्हणजेच ते आपापल्या आसनांचे आदानप्रदान करतात. त्यानंतर नव्या राष्ट्रपतींना सैन्याकडून 21 तोफांची सलामी दिली जाते. या तोफांचे आवाज मध्यवर्ती कक्षापर्यंत पोहचत असतात. शपथविधी पार पडल्यावर राष्ट्रगीत होते आणि दोघेही अन्य मान्यवरांसह संसद भवनाबाहेर आले की, तिथे नव्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती अंगरक्षक तुतारी वाजवून मानवंदना देतात. मात्र यावेळी नवे राष्ट्रपती पुढे आणि माजी राष्ट्रपती मागे उभे राहतात आणि पुन्हा समारंभपूर्वक दोघेही राष्ट्रपती भवनात येतात. तिथे प्रशासकीय औपचारिकता पूर्ण केल्यावर दोघे राष्ट्रपतींच्या खास बग्गीत बसून प्रांगणात येतात.

प्रांगणात केलेल्या विशेष आसनव्यवस्थेवर सर्व मान्यवर आधीच स्थानापन्न झालेले असतात. या ठिकाणी राष्ट्रगीताबरोबरच माजी राष्ट्रपतींना तिन्ही सैन्यदलांच्या तुकड्यांकडून Guard of Honour दिला जातो. त्यानंतर माजी राष्ट्रपती सर्वांचा निरोप घेत असतानाच Guard of Honour देणारे जवान सारे जहाँ से अच्छा धूनवर तिघून प्रस्थान करतात. समारंभाच्या शेवटी नवे राष्ट्रपती माजी राष्ट्रपतींना त्यांच्या निवासस्थानापर्यंत सोडायला जात असताना घोडेस्वार राष्ट्रपती अंगरक्षक फक्त प्रवेशद्वारापर्यंत राष्ट्रपतींच्या वाहनासोबत जातात. त्यावेळी राष्ट्रपती गार्डच्या तुकडीकडून जयपूर स्तंभाजवळ त्यांना पुन्हा सलामी दिली जाते. त्यानंतर हा औपचारिक पण तितकाच दिमाखदार समारंभ संपन्न होतो.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/07/blog-post_23.html

धोरणसंस्कृतीराजकारणप्रकटनलेख

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

24 Jul 2022 - 11:07 am | धर्मराजमुटके

छान माहिती ! असे वैविध्यपुर्ण लिखाण मिपावर येत राहो.