आठवण एका साथीदाराची...

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
27 Nov 2021 - 12:40 pm

27 नोव्हेंबर 2001 ला पहिल्यांदा Voice of Russia ची हिंदी सेवा ऐकण्यासाठी संध्याकाळी साडेसहाच्या काही मिनिटं आधीच कार्यक्रमपत्रिकेवर लिहिल्याप्रमाणे त्या लघुलहरींवर नभोवाणी संचाची (रेडिओ) सुई नेऊन ठेवली होती. ठीक साडेसहा वाजता या नभोवाणी केंद्राची signature tune वाजू लागली आणि पाठोपाठ उद्घोषणाही ऐकू आली - ‘ये रेडिओ रुस है, हम मॉस्को से बोल रहें हैं।’ हे ऐकून खूपच प्रफुल्लित झालो. मग तेव्हापासून मी या केंद्राचे कार्यक्रम नियमितपणे ऐकण्यास आणि त्याच्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा क्रमही सुरू झाला, अगदी 2014 मध्ये हे प्रसारण केंद्र बंद होईपर्यंत.

Voice of Russia या नभोवाणी केंद्राच्या माध्यमातून एक नवा साथीदार मला मिळाला होता. त्याचे माझ्या आयुष्यात अतिशय महत्वाचे स्थान राहिले. Voice of Russia हे रशियन सरकारचे आंतरराष्ट्रीय नभोवाणी केंद्र होते. Voice of Russia च्या हिंदी कार्यक्रमांचा दर्जाही उत्तम असायचा. भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री संबंधांची छाप त्याच्या प्रसारणातून, उद्घोषकांच्या भाषेतून दिसून येत असे. 1 एप्रिल 2014 ला हे केंद्र बंद होत असताना ते जगातील तिसऱे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय नभोवाणी केंद्र ठरले होते.

सोव्हिएट संघाच्या विघटनानंतर बिकट आर्थिक परिस्थितीमुळे हिंदी, उर्दू आणि बंगाली या व्यतिरिक्त अन्य भारतीय भाषांमधील प्रसारण बंद झाले. भारत आणि रशिया यांच्यातील विस्तृत संबंधांना सामान्य जनतेच्या स्तरापर्यंत विकसित करून त्यांना एक भावनिक पैलू पाडण्यात Radio Moscow चे मोलाचे योगदान राहिले आहे. जगातील सर्वात विशाल आणि पोलादी पडद्यामुळे तितक्याच गूढ बनून राहिलेल्या आणि भारताचे घनिष्ठ मित्रराष्ट्र राहिलेल्या रशियाची ओळख करून घेण्याचे Radio Moscow/ Voice of Russia हे एक उत्तम साधन होते.

Voice of Russia च्या प्रसारणाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य होते. त्याच्या हिंदी सेवेवरून प्रसारित होणाऱ्या बातम्या तसेच विश्लेषणांमध्ये रशियातील, दक्षिण आशिया आणि रशिया संबंधांमधील आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमधील महत्वाच्या घटना, रशियन संस्कृती, इतिहास इत्यादींनाच स्थान मिळत असे. BBC किंवा Voice of America यांच्या हिंदी सेवांच्या अगदी उलट परिस्थिती होती, यांच्या प्रसारणाचा भर भारतातील घडामोडींवरच असे. भारताचा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मॉस्कोतील भारतीय राजदूताची मुलाखत प्रसारित करण्याची परंपरा Voice of Russia ने जपली होती.

Voice of Russia भारतातील आपल्या श्रोत्यांचे नियमितपणे संमेलन आयोजित करत असे. नवी दिल्लीतील Russian Centre of Science and Culture इथे ते संमेलन आयोजित केले जात असे. त्याचे उद्घाटन भारतातील रशियन राजदूतांच्या हस्ते होत असे. यातील 2010 मध्ये झालेल्या संमेलनाला मी हजेरी लावली होती. तिथे मराठी येत असलेल्या श्रीमती लेबेदेवा यांच्याशी थोडा मराठीतून, थोडा रशियनमधून आणि बाकी हिंदीतून माझा संवाद झाला. त्या संमेलनाच्या उद्घाटनाला ‘भारतमित्र’ म्हणून ओळखले जाणारे भारतातील तत्कालीन रशियन राजदूत अलिक्सांदर एम. कदाकिन आले होते. उद्घाटनानंतर त्यांनी म्हटले होते, “Voice of Russia हा ‘मैत्रीचा आवाज’ असून आमच्या देशाच्या प्रदीर्घ काळापासून असलेल्या सहकाऱ्याच्या आणि सर्वोत्तम मित्राच्या, The Great India बरोबरच्या स्नेहाचाही तो आवाज आहे. तसेच भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांचे भविष्यही उज्वल आहे.”

https://avateebhavatee.blogspot.com/2021/11/blog-post_27.html

इतिहासमुक्तकप्रकटनलेखअनुभव

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

27 Nov 2021 - 1:33 pm | अनन्त अवधुत

व्हॉईस ऑफ रशिया बद्दल आजवर काहि माहिती नव्हते.
नविन माहिती बद्दल धन्यवाद.

जेम्स वांड's picture

27 Nov 2021 - 1:46 pm | जेम्स वांड

खरोखर नवीनच माहिती कळली मला पण

कंजूस's picture

27 Nov 2021 - 3:43 pm | कंजूस

शॉर्टवेव स्टेशन. पण आवड नसल्यामुळे ऐकायचो नाही. बहुतेक २१/३१ मिटरवर.

आता मात्र RT - रशिया टुडे चानेल थोडा पाहतो कारण चित्र पाहायला बरे वाटते.