1

पुस्तक परिचय - फुले आणि मुले

Primary tabs

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
2 May 2021 - 8:02 pm

लॉकडाऊनसारख्या नीरस काळात घरात बसून काय करावे हा प्रश्न दर दोन दिवसांनी वळवाच्या पावसासारखा गडगडत धावत येतो. घरातली कामे, पाककृतींचे प्रयोग, मुलांसोबत खेळ-मनोरंजन, चित्रपट या सगळ्यांचाही काही काळानंतर तिटकारा येतो. घरातली पुस्तकेही परत परत वाचून झालेली असल्यामुळे ती हातातही धरवत नाहीत. काय नवीन करायचं हा प्रश्न सतत छळत असतो. माझंही आजच्या रविवारी असंच झालं. अशातच एक पुस्तक हाती आले. आचार्य अत्रे यांचे "फुले आणि मुले." नावावरूनच लक्षात येतं की हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे.

आधी कित्येक वेळा वाचलं असलं तरी आता मुलांना वाचून दाखवायच ह्या हेतूने वाचायला घेतलं तर शेवटचं पान वाचूनच खाली ठेवलं. अर्थात, पुस्तक काही मोठं नाही. अगदी लहान-लहान, फाफटपसारा न करता लिहिलेल्या अठरा कथांचा यात समावेश आहे. आचार्य अत्रे यांच्या समर्थ लेखणीचा हा वेगळा पैलू आपल्याला थक्क करून सोडतो.

अतिशय बोलक्या, नेमक्या आणि साध्यासोप्या शब्दांत, मुलांचे भावविश्व उलगडून आपल्या काळजाला हात घालणाऱ्या या सगळ्या कथा आहेत. काही काही कथा वाचताना टचकन डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. वैयक्तिक माझ्याबाबत बोलायचं झालं तर, 'ए, बाबा रडतोय बघ!' अशा बोलण्यांनी मी भानावर येऊन पुन्हा वाचायला सुरूवात करीत होतो. असं बऱ्याच वेळेस झालं.

नंतर माझ्या लहान मुलींना ह्यातल्या काही कथा वाचून दाखवल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी वगैरे आलं नाही पण वाचून झाल्यावर, मधमाशांचं पोळं सुटून माशा सैरभैर व्हाव्यात तसे प्रश्न माझ्यावर कोसळले. त्यांना सांगितलेल्या प्रत्येक कथेतली पात्रं त्यांना खूप आवडली, पुन्हापुन्हा आठवत राहिली. अजून काही दिवस अजून खूप प्रश्न येणार आहेतच.

प्रस्तावनेत पुस्तकातल्या कथांचं, त्यांच्या विषयांचं समर्पक शब्दांत जणू निरूपण केलेलं आहे. आचार्य अत्रेंनी थोडक्यात आपली हे पुस्तक लिहितेवेळीची मनोभूमिका स्पष्ट केली आहे. मुलांविषयी त्यांचा असलेला जिव्हाळा, आपल्या शिक्षकी पेशामुळे मुलांसोबत आलेले अनुभव त्यांनी खुबीने या पुस्तकात वापरले आहेत. सर्व वाचून झाल्यावर नेहमीप्रमाणे आचार्य अत्रेंना मी मनोमन वंदन केले. असे मुलांसाठीचे निर्भेळ लेखन मराठीत पुन्हा आले नाही अशी बोचरी जाणीवही लगेचच झाली.

हे पुस्तक बाळगोपाळांसाठी असले तरी मोठ्यांनी मुलांचा निरागसपणा पुन्हा अनुभवताना आनंद मिळेल यात शंका नाही. मुलांचे निरागस भावविश्व तितक्याच निरागसतेने दाखावणारं हे एक दुर्मिळ पुस्तक आहे. अवश्य मिळवून वाचा. इतके वाचल्याबद्दल धन्यवाद.

1

- संदीप चांदणे (रविवार, २/५/२०२१)

वाङ्मयकथाबालकथासाहित्यिकप्रकटनआस्वादलेखशिफारसविरंगुळा

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

2 May 2021 - 8:08 pm | कुमार१

छान परिचय

मुक्त विहारि's picture

2 May 2021 - 8:47 pm | मुक्त विहारि

तुमची मुले जर बाल वयांत किंवा कुमार वयांत असतील तर,

मी एका धाग्यांत काही पुस्तकांचा उल्लेख केला होता ...

तो धागा देतो ....

https://misalpav.com/node/22123

चौथा कोनाडा's picture

2 May 2021 - 8:56 pm | चौथा कोनाडा

पुस्तकाची सुंदर ओळख ! धन्यवाद संदीपजी !
खुप लहानपणी वाचले होते, आता परत वाचायला हवे !
श्यामची आई सारखा नितांत सुंदर चित्रपट दिग्दर्शित करणारे आचार्य अत्रे मुलांच्या प्रति संवेदनाशील होते !
त्यांच्या सारख्या सिध्दहस्त लेखणीतून "फुले आणि मुले." सारखी कलाकृती न घडते तर नवलच.

Bhakti's picture

3 May 2021 - 10:11 am | Bhakti

श्यामची आई नंतर लहान मुलांसाठी हे पुस्तक छानच असावे.

प्रचेतस's picture

3 May 2021 - 10:45 am | प्रचेतस

सुरेख परिचय.
हे पुस्तक लहानपणी वाचले होते पण आता त्यातले काहीही आठवत नाहीये.

लेखावर नजर फिरवता फिरवता...