सावधान: खालील मजकुरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.
आमिरखानचा 'तारे जमींन पर' नुकताच प्रदर्शित झालाय. मी चक्क हा चित्रपट नजीकच्या चित्रपटगृहात लागलीच जाऊन पाहिला! (एरवी चित्रपट प्रदर्शित होऊन, अनेक दिवस लोटून तो व्यवस्थित जुना झाल्यावर आणि तोपर्यंत चारी दिशांनी त्याच्याविषयीची मतं कानावर आदळल्यावर मग आरामात बघणार्यांपैकी मी एक!:)) पण 'तारे..' च्या आधीपासून झळकणार्या झलका हा चित्रपट लगेच पाहायचा निर्णय घ्यायला पुरेश्या ठरल्या! कारण मुख्यत्वे प्रेमाचे त्रिकोण, चौकोन, पंच किंवा षट्कोन, लंडन-न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर उबळणारे देशप्रेम, भांगडा आणि सरसों का साग, उबग आणणारे आलिशान प्रासादातले बेगडी कौटुंबिक जिव्हाळे या सर्वांचा सुखद अभाव त्यात प्रकर्षाने जाणवला!
एक आमिरखान सोडल्यास एकही सुस्थापित 'स्टार' चेहरा यात नाही. पण म्हणून या बाकीच्या अपरिचित तार्यांची प्रभा काही कमी नाही. सगळ्यात प्रभावी तारा तर 'ईशान' (दर्शिल सफारी) आहे. या मुलाची या भूमिकेसाठी निवड करून आमिरखानने 'पर्फेक्ट निवड' म्हणजे काय याचं एक उत्तम उदाहरणच समोर ठेवलंय. हाही चेहरा पूर्वी कुठे पाहिल्याचं स्मरणात नाही...त्याच्या ट्प्पोर्या डोळ्यांत अनेक भाव उमटतात...डोळ्यांनी हा मुलगा बोलतो! त्याच्या ओठातून पुढे झुकलेले आणि ठळकपणे दिसणारे सशासारखे दोन दात त्याचा तिसरीतल्या मुलाचा अबोध आणि निरागस चेहरा पूर्ण करतात. अभिनय तर त्याने लाजवाब केलाय. कित्येकदा त्याच्या टपोर्या डोळ्यांतलं पाणी आपल्याही डोळ्यांतनं कधी पाझरू लागतं आपल्यालाच कळत नाही!
त्याचे आईवडील किंवा त्याच्या मोठ्या भावापासून ते त्याचे शिक्षक, मित्र या सर्वांच्या निवडी त्या त्या भूमिकेसाठी इतक्या यथार्थ आहेत कुठेही आपण चित्रपटातले नट-नट्या पाहतोय असं जराही जाणवत नाही. सगळी पात्रं अगदी आपल्या अवतीभवतीची, सुपरिचित वाटतात. पात्रांच्या निवडीप्रमाणेच चित्रपटातलं एकंदर वातावरणही आपलंसंच वाटतं. चित्रपटाचा नायक हा आलिशान बंगल्यात न राहता तुमच्याआमच्यासारखा सोसायटीत राहतो. सगळी मुलं मिळून बिल्डिंगच्या आवारात किंवा गच्चीवर खेळतात. स्कूलबसने शाळेत जातात. बाबांचा 'कारोबार' नाहीये तर ते ऑफिसला जातात आणि आई जॉब, करियर सोडून गृहिणीपद चोख बजावतेय...सकाळी नवरा-मुलांचा डबा-नाश्ता तयार करण्यापासून ते मुलाला स्कूलबसपाशी सोडायला जाताना घाईघाईत गाऊनवरच ओढणी घेऊन जाणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा दिग्दर्शकाने अचूक दाखवल्यात :)
हा पोरगा इतर पोरांहून जरा 'वेगळा' आहे. जरा म्हणजे त्याला लिहावाचायला जमतच नाही...अक्षरं, आकडे फेर धरून नाचतात त्याच्या डोळ्यांपुढे. वैज्ञानिक भाषेत डिसलेक्सिया म्हणतात त्याला. पण त्याला ही 'अडचण' असू शकेल हे त्याच्या आईवडीलांना कळतच नाही...खरं तर मोठ्या भावाच्या रूपातला एक हुशार आणि गुणी मुलगा घरात असल्याने धाकट्याला असा काही प्रॉब्लेम असेल असा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवत नाही. आणि मग यातून सुरू होतो तो बालमन आणि पालकांच्या अपेक्षा यातला एक न संपणारा संघर्ष. अभ्यास न जमणे आणि शेवटी त्याचे परिणाम परीक्षेत दिसू लागल्यावर आईवडीलांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वांचा ओरडा खाणार्या ईशानचे मन दिवसेंदिवस कमकुवत होत जाऊन तो एक सतत मान खाली घालणारा अबोल आणि घुम्या स्वभावाचा मुलगा बनतो. त्याच्या मनातली वादळं त्याच्या मनातच राहतात...
ईशानच्या शैक्षणिक प्रगतिविषयी काळजी वाटून आणि तो 'वठणीवर' येईल या विचाराने मन घट्ट करून त्याचे आईवडील त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल करतात. तिथे जायची अजिबात इच्छा नसलेला ईशान मनातून खूप दुखावला जातो. पण त्या बोर्डिंग स्कूलमध्ये त्याची मानसिक अवस्था आणि घालमेल तिथला चित्रकला शिक्षक (आमिरखान) बरोबर ओळखतो. लहानपणी हाच प्रॉब्लेम असलेला तो शिक्षक ईशानला योग्य पण वेगळ्या तर्हेने शिकवून त्याची लिहावाचायची अडचण तर सोडवतोच पण त्याच्या मनात एक अनामिक आनंद आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास जागृत करतो.
तसं म्हटलं तर लिहिण्या-वाचण्याचा प्रॉब्लेम असलेल्या एका मुलाला त्याच्या शिक्षकाने मदत केली आणि त्यातून त्याला सहीसलामत बाहेर काढले अश्या एका वाक्यात या चित्रपटाची गोष्ट सांगता येईल पण प्रत्यक्षात या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत आणि ते न दाखवून चालणारच नाही. त्याची ही अडचण अधोरेखित करणारे अनेक प्रसंग किंवा छोट्या छोट्या गोष्टी सबंध चित्रपटात इतक्या सहजतेने दाखवल्यात की त्या अजिबात ओढूनताणून दाखवलेल्या किंवा जराही असंबद्ध वाटत नाहीत. साथीला त्याचं मानसिक द्वंद्व प्रतिबिंबित करणारे प्रसून जोशींचे शब्द आणि त्यांना लावलेली शंकर-एहसान-लॉय यांची चाल तर अप्रतिम!
आमिरखानचं दिग्दर्शन आणि अभिनय दोन्ही यावर्षीचे पुरस्कार घेऊन जातील यात शंका नाही. चित्रकार समीर मॉंडल यांच्या सुरेख पोर्ट्रेट्स-चित्रांचा चित्रपटात केलेला सहज वापर मुद्दाम लक्षात राहण्यासारखा. अक्षरं आणि आकड्यांशी वाकडं असणार्या ईशानला अक्षरं-आकडेरूपी किडे सर्वत्र सरपटताना दिसण्याचा प्रसंग तर लाजवाब. या आणि अशा कैक पैलूंनी हा चित्रपट एक नितांतसुंदर अनुभव बनलाय. असे विषय बॉलीवूडमध्ये हाताळले जातायत याचाच आनंद आहे आणि याचं श्रेय आमिरखान आणि अमोल गुप्ते आणि त्यांची टीम यांना द्यायलाच हवं!
'तारे जमीनपर' चे संकेतस्थळ:
तारे जमीनपर
सर्वांनी जरुर पाहावा असाच हा चित्रपट आहे.
-वर्षा
प्रतिक्रिया
26 Dec 2007 - 4:58 am | मुक्तसुनीत
व्हीजे आणि स्वाती राजेश यांचे आभार. आता हा डीव्हीडीवर केव्हा येतो पाहू .... :-)
26 Dec 2007 - 8:40 am | विसोबा खेचर
म्हणतो..
27 Dec 2007 - 12:15 am | सर्किट (not verified)
मी कालच पाहिला. आजवर आमिरखानचा सर्वात सुंदर चित्रपट मला वाटला. या वर्षी ऑस्करसाठी भारताने हा चित्रपट पाठवला नाही, तर माझे (टोपण)नाव बदलेन !
मास्टर कार्ड च्या जाहिरातींसारखे लिहायचे तरः
तिकिटांची किंमतः ४० डॉ.
पॉपकॉर्न आणि कोकः १५ डॉ
जाणे-येणे: ६ डॉ.
चित्रपटाच्या शेवटी मुलांच्या डोळ्यातले आनंदाश्रू: अमूल्य !
- सर्किट
28 Dec 2007 - 10:17 am | आनंदयात्री
या वर्षी ऑस्करसाठी भारताने हा चित्रपट पाठवला नाही, तर माझे (टोपण)नाव बदलेन !
चित्रपट पाहिल्या पाहिल्या असेच वाटले, लगानच्या वेळेस फार काही आशा नव्हत्या, या वेळेस मात्र वाटतेय.
26 Dec 2007 - 11:45 pm | छोटा डॉन
(एरवी चित्रपट प्रदर्शित होऊन, अनेक दिवस लोटून तो व्यवस्थित जुना झाल्यावर आणि तोपर्यंत चारी दिशांनी त्याच्याविषयीची मतं कानावर आदळल्यावर मग आरामात बघणार्यांपैकी मी एक!:))
आम्ही मात्र चित्रपटसॄष्टीचे देणे लागत असल्यासारखे चित्रपट प्रदर्शित झाल्याझाल्या थेटरावर हजर, मग तो "तारे जमिन पे" असो अथवा "सावरियाँ". जे भोग असतात ते ईथेच भोगून संपवावे लागतात, हा त्यातलाच एक प्रकार.....
पण दररोज प्रयत्न करून सुध्धा अजूनही "तारे जमिन पे" ची काही तिकिटे मिळाली नाहीत. पण ठरवले आहे, चित्रपट बघायचा तो थेटरातच..... आपल्या लेखामुळे मनाला थोडे धैर्य मिळाले कारण आमच्याकडे एक चित्रपटाचा खर्च एकट्या माणसासाठी ३०० रूपये येतो.....
काही लोक डीव्हीडीवर बघायचा म्हणतात त्यांना माझी हा चित्रपट थेटरात बघण्याची विनंती......
चांगल्या लोकांच्या कष्टाचे कौतुक आपण नाही तर कोण करणार ?????
28 Dec 2007 - 12:04 am | वर्षा
<<<काही लोक डीव्हीडीवर बघायचा म्हणतात त्यांना माझी हा चित्रपट थेटरात बघण्याची विनंती......
माझीपण!
<<<चांगल्या लोकांच्या कष्टाचे कौतुक आपण नाही तर कोण करणार ?????
अगदी खरंय.
-वर्षा
27 Dec 2007 - 11:59 pm | वर्षा
आभारी आहे.
सर्कीट,
<<<<चित्रपटाच्या शेवटी मुलांच्या डोळ्यातले आनंदाश्रू: अमूल्य !
खरोखर!!!
-वर्षा
28 Dec 2007 - 10:36 am | डॉ.प्रसाद दाढे
एवढे सगळे कौतूक करताहेत तर मग पाहिलाच पाहिजे..
30 Dec 2007 - 10:03 am | ऋषिकेश
कालच पाहिला. सगळ्याच आघाड्यांवर नितांतसुंदर चित्रपट. प्रत्येकाने पहावाच, शाळाशाळांत दाखवावा असा चित्रपट
(प्रचंड प्रभवित आणि खात्रीचा रिपिट ऑडियन्स) ऋषिकेश
एक कुसळ: गाणी तितकीशी आवडली नाहित. या आशयगर्भ चित्रपटाला सुंदर गाण्यांनी वेगळचं परिमाण लाभलं असतं असं मात्र वाटून गेलं
30 Dec 2007 - 1:43 pm | संजय अभ्यंकर
ऋषिकेशजी,
ह्या चित्रपटात गाणी केवळ पार्श्वसंगीत म्हणुन आहेत. परंतु ती सुश्राव्य आहेत.
मुलाची व मातेची तटातुट होते तेव्हाचे गाणे भावनावश करणारे आहे.
शं.ए.लॉ., हे आजच्या काळातले शास्त्रीय संगीतावर आधारित सुन्दर गाणी देणारे संगीतकार आहेत.
त्यांचे जॉनी गद्दार मधील "डुब जा मेरे प्यार मे" ऐका.
संजय अभ्यंकर
30 Dec 2007 - 8:28 pm | ऋषिकेश
मान्य की हे एक ताटातूटवालं गाणं चित्रपटाच्या फ्लो मधे इतर गाण्यांप्रमाणे बसलं तर आहेच, पण परिणामकारकही ठरलं आहे. पण इतरही गाणी केवळ सुश्राव्य यापेक्षा अतिशय सुंदर संगित व आशयगर्भ असती तर चित्रपटाची मजा आहे त्यापेक्षाही कैक पटीने वाढली असती (हे सुद्धा कारण ही गाणी चित्रपटात आहेत, ती नसती तरी चित्रपटाला फार धक्का लागला असता असे नाही)
अर्थात हा चित्रपट ज्या ताकदीने उतरला आहे त्यात हे एक अंग "किंचित" कमी पडलं असेल तर बाऊ करण्यात अर्थ नाहि असे समजतो.
अवांतरः
हे मत शं.ए.लॉय यांच्या एकुण संगीतावर नसुन, केवळ या चित्रपटातील गाण्यांवर आहे, इतर पार्श्वसंगीत भन्नाटच आहे
चित्रपट संपल्या नंतरचे टायटल साँगही अतिशय सुरेख आहे.
(चिकित्सक) ऋषिकेश
30 Dec 2007 - 2:40 pm | स्वाती दिनेश
आता हा चित्रपट पाहिलाच पाहिजे,पण आमच्याकडे कुठे थिएटर मध्ये लागणार? तेव्हा डीवीडी उपलब्ध झाल्या की दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणते.(नाहीतर जर्मनमध्ये डब होईपर्यंत वाट पहावी लागेल)
स्वाती
31 Dec 2007 - 1:12 am | देवदत्त
कथानक उघडले असेल म्हणून मी लेख वाचला नाही. पण येथील प्रतिक्रिया व इतर ठिकाणीही (वृतपत्रे, संकेतस्थळे, मित्रांचे म्हणणे) चांगले सांगितल्याने हा सिनेमा पाहण्याचा मोह वाढत चालला आहे.
2 Jan 2008 - 7:34 pm | इनोबा म्हणे
अलिकडे बॉलीवूडमधील तारे 'जामिन'पर च्या नाट्यप्रसंगांमुळे बॉलीवूडचा उबग आला होता.पण आमिर सारख्या गुणी कलावंतांमुळे बॉलीवूडमधील कलात्मकता अजून जिवंत असल्यासारखे वाटते.
त्याच्या इतर 'पंख्या'प्रमाणे मीही त्याच्या सिनेमाची वाट पाहत असतो,मंगल पांडे मधील 'कलात्मक दंगल' पाहिल्यामुळे जरा निराशा झाली,पण यावेळी मात्र 'आमिर'ने बाजी मारली.
जय आमिर बाबा की...
(तुमच्यात 'मिसळ'लेला) विनोबा
16 Jan 2008 - 2:06 am | भडकमकर मास्तर
पाहिला...फार आवडला.... गम्मत म्हणजे कुठेही प्रेक्शकान्ना रडवण्याचा अट्टाहास दिसत नाही, तरी प्रेक्शागारात लोकान्चे डोळे डबडबलेले, असतातच....