पाणीबाणी

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
26 Dec 2020 - 4:10 pm

सावर्डे - नाशिक, पालघर अन् ठाणे जिल्ह्याच्या टोकावरलं आदिवासी गावं. . . पुर्णत: जंगलात. तीन डोंगरांच्या मध्ये दरीत वसलेलं. वस्ती १२५ कुटुंबांची. अजुनही बारमाही रस्ता नाही. म्हणजे आता पावसाळ्यात चार महीने गाडी घेवुन या गावात जाता येणार नाही. अशी परिस्थिती होती सन २०१८ पर्यंत. सावर्डे गाव गेल्याच वर्षी रस्त्यानं जोडलं गेलयं, ते स्वातंत्र्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी. मोखाडा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायती अंतर्गत असलेलं सावर्डे गावात पोहोचायला दरीतील घाट उतरुन जावं लागतं.
Doli
पक्का रस्ता नसल्याने रुग्ण, गरोदर दवाखान्यात नेण्यासाठी डोली करून न्यावे लागायचे (२०१८ मध्ये स्वत: काढलेला फोटो)

तीन वर्षापूर्वी पहिल्यांदा आम्ही गावात पोहोचल्यावर गावकर्यांोनी पहिली सुचना हीच दिली की दुपारी पाऊस सुरु झाला तर गाडी वर चढवता येणार नाही. शेजारचं गाव डोंगर चढुन पाच किलोमीटर अंतरावर. . . गावापासुन जवळच अजुन खाली (पायी चालत + डोंगर उतरुन १किलोमीटर) पाणी आहे. . हे पाणी म्हणजे खरं तर वैतरणा नदी. पण आता वरच्या बाजुला मध्य वैतरणा धरण आणि खाली मोडक सागर असा विकास झाल्याने , मोडक सागरमध्ये जेव्हा पाणि सोडायचं असेल तेव्हा या नदीला (पाटाला) पाणी येत. संपुर्ण पाषाणाचा तळ असलेल्या नदीच्या काठाला ग्रामपंचायतची विहीर आहे. पाटाला पाणी सोडल की झिरपुन विहीरीत येतं मग तेव्हाच ते मोटरनं ऊचलुन गावाजवळ उंचावर बांधलेल्या टाकीपर्यंत पोहोचविण्यासाठी पुर्वी कधी पाईपलाईनही केली होती. पण तेव्हाच्या योजनेत काही त्रुटी राहिल्यानं गावापर्यंत पाणी कधी आलचं नाही. यातला अजून एक कॅच म्हणंजे जेव्हा हे मिडल वैतरणा टु मोडक सागर असं ट्रान्झॅक्शन सुरु असतं तेव्हा बर्याणचदा वीजप्रवाह खंडीत असतो. नदीतलं पाणी डायरेक्ट उचलायची परवानगी नाही , कारण ते मुंबईसाठी राखिव आहे ना. . . . मग पर्याय काय , नदीवरुन हंड्याने पाणी भरणे. सरासरी एका कुटुंबाला दिवसाकाठी पिण्यासाठी आणि वापरासाठी मिळुन १० हंडे पाणि लागतं. लांबुन , दरीतुन एकावेळी दोन हंडे डोक्यावर घेवुन , चढुन पाणी भरायचं. . दिवासाचे चार तास घरटी दोन सदस्य केवळ पाणी भरायला जुंपलेले. मेहनतीचं काम म्हटलं की महिला अन् मुलीच अडकलेल्या. गावात असलेल्या चौथीपर्यंत च्या जि. प. शाळेतले शिक्षण पुर्ण झाले की मग मुली याच कामाला घरी राहत. थोडी ऐपत असलेल्या मंडळीनी बैलगाडीवर दोनशे लीटरचे ड्रम बसवुन घेतलेत. तीन किलोमीटर लांबचा फेरा करुन कच्या रस्त्याने बैलगाडी नदीपर्यंत उतरवता येते. डोळ्यासमोर अथांग जलसाठा असुनही हे रोजचे कष्ट. महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य वैग्रे कोसो वर कुठेतरी आहे अजुन. . .

"प्रोजेक्ट आशा" अंतर्गत तीन वर्षापुर्वी बायफच्या सर्वांगीण विकास कार्यक्रमाशी जोडलं गेलं. गावकर्यां ची पहिली मोठी अडचण म्हणुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हाती घेतला. रस्ता नसतानाही साहीत्य गावात पोहोचवुन विहीरीवर सर्वप्रथम १२ HP क्षमतेची जलपरी बसवली. आधीच्या योजनेतली मोटार पुर्णपणे गाळात रुतलेली होती. विहिरीतला गाळ साफ करण्याची जबाबदारी गावातल्या युवकांनी पार पाडली. दरीमधली ही विहिर ते गावाजवळची टाकी अशी १२०० मीटरची पाईपलाईन नव्यानं बसवली. पुन्हा गावानं श्रमदानाची तयारी दाखवत गावात नळाने पाणी आणण्याचे ठरवले. मग पुन्हा टाकी ते गाव अशी पाईपलाईन टाकत गावात पाच ठिकाणी स्टॅन्ड पोस्ट उभारले. इतकं सगळं झाल्यावर अडचण अशी आली की विहिरीजवळचा विद्युत पुरवठा नदिपलिकडच्या शहापुर तालुक्यातुन होतो. तेथे थ्री फेज कनेक्शन मिळवायला तालुका, जिल्हा बदल वगैरे असंख्य खेट्या घालाव्या लागल्या. पुन्हा लॉक डाऊनमुळे सगळंच जैसे थे राहील. सर्व समस्यांवर मात करत गेल्या आठवड्यात सावर्डे गावात पहिल्यांदा नळाद्वारे पाणी पोहोचलं. सामाजिक योजनांची यशस्विता तपासण्याचं मापक Social Returns On Investment वापरायचं ठरलं तर गावातल्या १२५ कुटुंबातील प्रत्येकी दोन महिला सदस्यांचे प्रति दिवस तीन-चार तासाचे शारिरिक कष्ट वाचवता आले. .©

DW

धोरणवावरसमाजजीवनमानदेशांतरराहती जागाप्रकटन

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2020 - 6:42 pm | टवाळ कार्टा

_/\_

आनन्दा's picture

26 Dec 2020 - 7:35 pm | आनन्दा

छान..

थोडे अवांतर होइल, पण आता या महिलांना काहीतरी रोजगाराचे बघा.. नाहीतर त्या बसतील टीव्ही बघत, आणि मग तसे म्हटले तर हे सगळे फुकट जाइल... हीच ती वेळ आहे जेव्हा बदल होऊ शकतो. एकदा सवय लागली की तुम्ही ती मोडू शकणार नाही.

फारएन्ड's picture

26 Dec 2020 - 9:31 pm | फारएन्ड

रिस्पेक्ट!

कुमार१'s picture

27 Dec 2020 - 5:14 am | कुमार१

छानच !

तुषार काळभोर's picture

27 Dec 2020 - 7:00 am | तुषार काळभोर

कौतुकास्पद, स्पृहणीय, प्रेरणादायी...

आंबट चिंच's picture

27 Dec 2020 - 10:05 am | आंबट चिंच

खूप छान