भ्रमणगाथा - ७ गरुडघरटं

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
23 Nov 2008 - 6:32 pm

याआधी: भ्रमणगाथा - ६

गुंफा उतरुन खाली येईपर्यंत एक वाजून गेला होता. आल्प्सच्या त्या डोंगरात मिळणारे पाणी परडवणारे नाही हे माहित होते त्यामुळे डबाबाटली सोबत होती. गाडीत बसल्याबसल्याच सँडविचांचा फन्ना उडाला. खाली उतरताना वाटेत लागतो अतिसुंदर 'होहन वेर्फन श्लॉस '!

होय तीच ही गढी जी "व्हेअर इगल्स डेअर" चित्रपटात दाखवली आहे. जिला 'श्लॉस ऍडलर ' नावाने चित्रसॄष्टीत ओळखतात. तेथे रेंगाळणे अपरिहार्यच होते पण थोडक्या वेळात सारे काही बसवायचे असल्याने नाइलाजाने तेथे जास्त वेळ न घालवता निघालो.

आता जायचे होते ओबेरसाल्झबुर्गला,इगल्सनेस्ट म्हणजेच ते सुप्रसिध्द टीहाउस,Kehlsteinhaus पहायला. हा सारा परिसर डोंगराळ भागात आहे.ओबेरसाल्झबुर्ग म्हणजे साल्झबुर्गचा वरचा भाग! आल्प्सचा तो सारा परिसरच इतका सुंदर आहे की शब्द आणि प्रतिभाही अपुरे पडतात.

हुकुमशहा हिटलरकडे कलाकाराचे मन होते त्यामुळेच बहुदा येथे सुंदर प्रासाद बांधवून घेतला असावा. तसेच हा सगळा डोंगराळ भाग,रस्ते वळणांचे, कठिण चढणीचे असल्याने शत्रू तेथे सहजपणे पोहोचू शकणार नाही , असाही विचार होता.ते पाहून थोरल्या महाराजांच्या राजकारणात गडकिल्ल्यांचे असलेले वेगळे महत्त्व ह्याने वाचले होते की काय? असा विचार उगाचच मनात आला.
गरुड नेहमी उंचावर ,सहज कोणाला दिसणार नाही आणि कोणाच्या हाती लागणार नाही अशा ठि़काणी आपले घरटे बांधतो. जर्मनीचा राष्ट्रीय पक्षी गरुड! साहजिकच ह्या गरुडाधिराजाचे हे घरटे म्हणजेच हिटलरच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मार्टिन बोहरमानने बांधवून घेतलेले हे केहलस्टाइन हाउस ! शाही पाहुण्यांच्या खास खातिरदारीसाठी ह्याचा उपयोग केला जाई.अतिशय सुंदर ठिकाणी ,उंच जागी बांधलेला हा प्रासाद आणि तेथे जाण्याचा डोंगरातून खोदलेला वळणावळणाचा रस्ता अवघ्या १३ महिन्यात बांधून काढला गेला.अतिशय कठिण चढण आणि टोकावर पार्किंगसाठी केलेली खास जागा हा स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना समजला जातो. ह्या सुंदर प्रासादात हिटलर स्वतः फक्त तीन वेळा राहिला. एक तर अतिशय उंचावर बांधलेला हा प्रासाद आकाशातून सहज लक्ष्य करता येईल अशी त्याला भीती वाटे. त्या काळातही तेथे वर जाण्यासाठी एक पितळी लिफ्ट बांधली होती जी ३० सेकंदात ३० मीटर अंतर जाते. ही लिफ्ट बंद पडली तर.. अशीही भीती त्याच्या मनात असे.त्यामुळे तो तेथे राहणे टाळत असे. इव्हा मात्र त्या सुंदरतेची भुरळ पडून तेथे अनेकदा जात असे व राहत असे.

दुसर्‍या महायुध्दाच्या हालचालींचे केंद्रस्थान ह्याच भागात बेरेष्टेसगार्टन रिजन येथे होते.फ्यूररचे वास्तव्य ह्या भागात जास्त असल्याने या भागाला 'ब्रांचऑफिस ऑफ बर्लिन' असे गमतीने संबोधले जात असे. येथेच माइनकान्फ च्या पैशातून १९३३ साली विकत घेतलेले वाखनफेल्ड हाउस ज्याचेच पुढे बर्गहोफ असे नामांतर झाले तो हिटलरचा प्रासाद आणि हेरमान गॉरिंग,मार्टिन बोरमान,अल्बर्ट स्पिअर आदि बर्‍याच अधिकार्‍यांचे बंगले होते परंतु महायुध्दातल्या बाँबवर्षेत तेथील घरे उध्द्वस्थ झालीच आणि बर्गहोफलाही त्याची झळ पोहोचली .तरी बर्गहोफ बर्‍याच प्रमाणात चांगल्या अवस्थेत होते. मात्र १९५२ मध्ये बव्हेरियन गवर्मेंटने ते निओनाझी मंडळींची पंढरी होऊ नये म्हणून उध्द्वस्थ करुन टाकले आणि तेथे झाडे लावली. त्या खुणा सांगणारी एकही गोष्ट आता तेथे नाही,त्यांची जागा फक्त वृक्षांनी घेतली आहे. युध्दसमाप्तीनंतर हा सगळाच भाग अमेरिकनांच्या ताब्यात अनेक वर्षं होता.
वर टीहाउस कडे जाणारा रस्ताही फार सुंदर आहे ,त्या रस्त्याने प्रवास करणे हाच एक अनुभव आहे असे म्हणतात.तेथे जाण्यासाठी त्यांच्या ठराविक बसनेच जावे लागते. खाजगी वाहनांना मज्जाव आहे.आम्ही हे गरुडघरटे पहायला अतिउत्सुक होतो पण.. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा पावसाचा जोर वाढला होताच पण वाईट बातमी म्हणजे वर जाणार्‍या बसेस पावसामुळे आणि खराब हवेमुळे बंद केल्या होत्या.आता इगल्सनेस्ट पाहणे शक्य नव्हते. थोडेसे निराश होऊन आणि परत इथे यायचेच असे मनाशी ठरवून आम्ही पायथ्याशी असलेल्या बंकर्सकडे वळलो. हे बंकर्सही असे बांधले गेले की सहजासहजी ते दृष्टीस पडणार नाहीत. आज तेथे दुसर्‍या महायुध्दाचे माहितीकेंद्र तथा म्युझिअम केले आहे .

आत पोहोचलो ते विस्फारल्या डोळ्यांनीच! एकूण जर्मनीतच हिटलर, दुसरे महायुध्द यावर बोलणे सारेच जर्मन टाळतात.त्या काळच्या खुणाही शक्य तिथे पुसून टाकल्या आहेत. त्यामुळे त्याबाबतची माहिती मिळणं तसं कठिणच,पण येथे मात्र दुसर्‍या महायुध्दाच्या काळातल्या अनेक खुणा जपल्या आहेत. जुनी वर्तमानपत्रे, फोटो,चित्रफिती ह्या सार्‍यातून इतिहास सामोरा येतो.
खुद्द बंकर्स पाहताना तर थक्क व्हायला होते. बंकर म्हणजे लपण्यासाठी,आसर्‍यासाठी केलेली सोय ,त्यामुळे मला उगाचच लहानसे जमिनीखाली केलेले बांधकाम असे काहीतरी चित्रं डोळ्यासमोर होते. पण येथे आपल्याला दिसते डोंगराच्या पोटात वसवलेले छोटेसे गावच जणू! जमिनीखाली जवळजवळ सहा मजले उतरुन गेले की एका वेगळ्याच विश्वात प्रवेश!काय नव्हतं तिथे?
हे तर मोठ्ठे बंकर्सकाँप्लेक्सच दिसते. यात वेगवेगळी आठ युनिट्स असून त्यातील पाच युनिट्स आतून जोडली आहेत.आतमध्ये सुसज्ज दिवाणखाने, शयनगृहे,भटारखाने,भोजनकक्ष, हमामखाने,कचेरीदालने,वैद्यकियसेवाकक्ष तर आहेतच पण एक कारागृह सुध्दा आहे. टेलिफोनचे जाळे असून ८०० एक्स्टेनशन्स आहेत.वीज,पाणी एवढेच नव्हे तर एअरकंडिशनिंगचीही व्यवस्था केलेली दिसून येते. हवा खेळती रहावी म्हणून मोठमोठ्या पाइप्समधून हवा खेळवली होती त्यातील काही पाइपलाइन्सचे अवशेष त्या इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत.बंकर्सच्या तोंडाशी मशिनगन्स बसवून संरक्षक तटबंदी तयार केलेली आढळते.

तेथल्याच एका दालनात ( पूर्वीच्या बंकरमध्ये ) हिटलरच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारा माहितीपट जर्मन आणि इंग्रजीत तेथे दाखवतात. तो पाहून संमिश्र भावना मनात घेऊन आम्ही साल्झबुर्गकडे निघालो.

साल्झबुर्ग आणि सांऊड ऑफ म्युझिक! हे दोन शब्द अगदी हातात हात घालून जातात ना? पण आज आम्हाला साउंड ऑफ म्युझिक मधले साल्झबुर्ग पाहण्याइतका वेळ नव्हता. त्यामुळे या सुंदर शहरात एक फेरफटका मारावा असं ठरवून मुख्य चौकात उतरलो.
दर शनिवारी येथे असतो आजूबाजूच्या डोंगरातल्या खेड्यातून आलेल्या शेतकर्‍यांचा आठवडी बाजार! आम्ही तेथे पोहोचेपर्यंत संध्याकाळ होत आली होती ,सारे शेतकरीही आपापली पालं आवरायच्या तयारीत होते.चौकात जिकडेतिकडे मोझार्टचे पुतळे आणि कटआउट्स आहेत. त्याचे हे जन्मगाव.

त्याचे जन्मस्थान पाहून मग गेलो ते तेथल्या प्राचीन चर्चमध्ये. चर्चसभोवतालचा परिसरही तितकाच सुंदर आहे. चर्चच्या प्रांगणात एक मोठ्ठा बुध्दिबळपट आहे.(असाच मोठ्ठा पट आमच्या फ्राफुच्या बोलांगरोपलास्ट मध्येही आहे.)तेथे दोन म्हातार्‍यांचा डाव अगदी रंगात आला होता आणि आजूबाजूला बघ्यांचीही भरपूर गर्दी होऊ लागली होती पण ते दोघे मात्र खेळात अगदी रंगून गेले होते,त्यांचे इतरांकडे लक्षच नव्हते.

तो खेळ थोडावेळ पाहून आम्ही आत गेलो. चर्चमधील कोरीव काम,काचकाम पाहण्यात वेळ तसा बराच गेला. साल्झबुर्गच्या फॅशनस्ट्रीटवर विंडो शॉपिंग करत असताना अचानक लक्षात आलं केसु कुठे दिसत नाहीत.. मग पुढे गेला असेल, तू जाऊन पहा रे.. असे करत करत तेथला सारा परिसर शोधले. एव्हाना पावसाचा जोर वाढला होता. ते थंडगार,बोचरे पाण्याचे थेंब चुकवत केसुंना शोधणे चालूच होते. शेवटी म्याकदादाकडे आसरा घेतला आणि केसुना फोन लावला तर हे महाशय आम्हीच सगळे रस्ता चुकल्याबद्दल आम्हालाच बोल लावत गाडी जिथे पार्क केली होती तेथे उभे होते.साल्झाक नदीच्या किनार्‍यावरुन दिसणारे दृश्य पाहण्यात जास्त वेळ न घालवता मग आम्ही गाडीकडे निघालो. गाडीपाशी पोहोचल्यावर 'प्रेमळ ' शब्दांची देवाणघेवाण झाली आणि योहानाच्या घरी जायला निघालो.

आज रात्रीचा बेत होता चटकदार भेळ! डॉन्या (आदेशाप्रमाणे) भारतातून चुरमुरे घेऊन आला होता. गोड,तिखट चटण्या, फरसाण ,कांदे ,टोमॅटो इ.कच्ची तयारी सगळी बरोबर घेतली होतीच.तरी कोथिंबिर आयत्यावेळी पिशवीत टाकायची म्हणून फ्रिजमध्ये ठेवली होती ती आठवणीने विसरले होते त्यामुळे प्रेमळ शब्दांची बरसात फारच वाढली. घरी पोहोचल्यावर किचनचा ताबा केसुंनी घेतला आणि फर्मास भेळ बनवली. भेळ व मोझार्ट बीअरचा आस्वाद घेत उद्याच्या सॉल्टमाईन्सचे बेत आखू लागलो.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Nov 2008 - 6:59 pm | बिपिन कार्यकर्ते

ढॅणटॅडॅण... शेवटी एकदाचं आलं गरूडघरटं... वाटच बघत होतो. श्लॉस ऍडलर आणि बंकर्स बघताना तर काटा आला अंगावर. बेरेष्टेसगार्टन चा बरोबर उच्चार समजला. एकदा प्रत्यक्ष हे सगळं बघ्याची इच्छा आहेच तो पर्यंत हे फोटो बघेन, धन्यवाद.

साल्झबुर्ग पण झकास. युरोपमधलं एक साधं छोटं शहर, पण किती कलात्मक दिसतंय. बुद्धिबळाचा फोटो बारकाईनं बघत होतो, आपले रंगाशेठ कुठे दिसत आहेत का बघत होतो. नाही दिसले. :(

मला सगळ्यात जास्त आवडलेला फोटो: सगळ्यात खालचा उजवीकडचा... मस्त............................................

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

23 Nov 2008 - 7:24 pm | टारझन

पहिलं चित्र .. आपण खल्लास ... बाकी वर कमेंट करायची इच्छाच नाही ...
ई.ए. गेम्स कमांडोज - बिहाइंड द एनिमी लाइन्स, ह्या गेम ने आम्हाला २००३ साली एवढं झपाटलं होतं की १८-१८ तास एका जागेवरून न उठता गेम खळत असू... स्वप्नात सुद्धा गेम मधे शत्रूला कसं मारावं याच्या क्लूप्त्या सुचत. पहिल्या फोटूत ती गढी पाहिली.. तीच्च ती .. 'होहन वेर्फन श्लॉस ' जशीच्या तशी. मिशन १३ मधली. सर्वांत अवघड मिशन.

स्वातीतैंनी आठवणी अंमळ ताज्या केल्या, धन्यवाद प्लस हाबिणंदण

- (ग्रीनबेरेट) टारझन

ऋषिकेश's picture

23 Nov 2008 - 7:30 pm | ऋषिकेश

भाई वाह (या बाबतीत बहन वाह! ;) )!.. दरवेळी लेखनाची स्तुती करायला शब्द कुठून आणायचे बरं.. रापचीक झालं आहे वर्णन (शब्दसौजन्य : अवधूत गुप्ते, सारेगम ;) )

बाकी बंकरमधे तेलाचे दिवे वगैरे आहेत की गळत होतं?.. कारण त्या "एन्ड" लिहिलेल्या बोगद्याच्या दिव्या भोवती कसलेसे ओघळ आहेत, गंज/तेलासारखे. बाकी बंकर्स "जैसे थे" ठेवलेले बघून कौतुक वाटलं.. भिंतीवरच्या रेघोट्या जशाच्या तशा ठेवताना स्वच्छता जपलेली वाटली.
बुद्धीबळपट, आणि ते खेळणारे आजोबा लै भारी.. बाजुचा विपीग विलोजचा सिमेट्रीकल फोटुही क्लासच! दोन विलोजच्यामधे कारंजं आहे का नुसते पुतळे?

बाकी "साऊंड ऑफ म्युझिक"च्या घराची वाट पाहतोय :). तिथे गेला होतात की नाहि?

-(म्युझिकल पर्यटक) ऋषिकेश

रामदास's picture

23 Nov 2008 - 9:44 pm | रामदास

दरवेळी लेखनाची स्तुती करायला शब्द कुठून आणायचे बरं..
नेहेमीप्रमाणे छान लेख.
एक पर्यटनाचे गाईड तयार झाले.

प्राजु's picture

23 Nov 2008 - 10:17 pm | प्राजु

काय अफाट आहेस गं हे बंकर्स!! मस्तच. तुमच्या या भ्रमणमंडळाच्या निमित्ताने आमचीही युरोप टूर होते आहे.
खूपच छान चित्र. 'श्लॉस ऍडलर ' एक्दम खास.. अतिशय भव्य आहे आणि खूपच सुंदर.
वर्णन खासच. हा लेख वाचनखुणा मध्ये टाकावा असा आहे.
अभिनंदन!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शाल्मली's picture

23 Nov 2008 - 10:53 pm | शाल्मली

स्वातीताई,
आपल्या प्रवासाच्या तू केलेल्या मस्त वर्णनाने परत एकदा फिरून आल्यासारखं वाटलं..
परत सगळं आठवून मजा वाटली :)
हो.. आणि कोथिंबीर न आणल्यामुळे झालेल्या प्रेमळ शब्दांची बरसात सुद्धा आठवली. ;)

मस्त झालं आहे प्रवासवर्णन.

-- (भ्रमणमंडळाची सदस्या) शाल्मली.

लिखाळ's picture

23 Nov 2008 - 11:23 pm | लिखाळ

अरे वा !
खूपच छान लेख... पुन्हा एकदा प्रवास झाल्यासारखे वाटले ...
पहिला फोटो छान आहे...

आता पुढचा भाग लौक्कर टाक...
-- लिखाळ.

शितल's picture

24 Nov 2008 - 1:42 am | शितल

स्वाती ताई,
सुंदर प्रवास घडवुन आणतेस हो आम्हाला तु. :)
फोटो आणी प्रवास /माहित सुंदर देतेस तु दरवेळी. :)

मदनबाण's picture

24 Nov 2008 - 4:43 am | मदनबाण

झकास माहिती आणि फोटो...
'श्लॉस ऍडलर ' तर जबरदस्तच आहे !! :)

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

नंदन's picture

24 Nov 2008 - 8:20 am | नंदन

श्लॉस ऍडलर सहीच. वर्णन आवडले. मोझार्टचा कटआउट ऍमॅडियस पिक्चरमधला दिसतोय.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

रेवती's picture

24 Nov 2008 - 9:08 am | रेवती

मस्तच आहे.
बंकर बद्दलचा गैरसमज दूर झाला वर्णन वाचून.
मला उगीचच वाटायचं की लोक तिथं कसे रहात असतील.
वर्णन नेहमीप्रमाणेच झकास!

रेवती

मनस्वी's picture

24 Nov 2008 - 9:50 am | मनस्वी

'श्लॉस ऍडलर' सॉल्लिड आहे.
स्वातीताई, फोटोंबरोबर माहितीही छान पुरवतेस तू.

यशोधरा's picture

24 Nov 2008 - 10:04 am | यशोधरा

>>दरवेळी लेखनाची स्तुती करायला शब्द कुठून आणायचे बरं

अगदी!! :)
मस्तच लिहितेस गं स्वातीताई :)

जैनाचं कार्ट's picture

24 Nov 2008 - 10:04 am | जैनाचं कार्ट (not verified)

मस्तच !
वर्णन व फोटो दोन्ही आवडले !

अजून फिरा व अजून लिहा ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

विसोबा खेचर's picture

24 Nov 2008 - 10:09 am | विसोबा खेचर

प्रवासवर्णन लै भारी..! :)

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Nov 2008 - 10:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वातीताई,

एटले चोक्कस फोटो आहेत आणि वर्णनही झकास!
इतिहासाची पुस्तकं लिहायला सुरुवात कर ना, माझ्यासारख्या चुकार मुलांना वाचताना गोष्टी वाचल्याची मजाही वाटेल आणि चार गोष्टी शिकून लक्षातही रहातील.

अदिती

छोटा डॉन's picture

26 Nov 2008 - 3:35 pm | छोटा डॉन

लेखाचा हा भाग सुद्धा बेश्ट आहे.
मिपावर वाचनामात्र असनार्‍या एका मित्राने हे वाचुन खास कळवले की "तुम्ही लै मज्जा" करता म्हणुन ...
असो, आता पुढच्या भागाची वाट पहातो आहे ...

जाता जाता :
ते 'होहन वेर्फन श्लॉस ' मात्र आतुन पहायचे राहुनच गेले, काय करणार वेळ नव्हता तेवढा ...
च्यायला मात्र ती गढी जबरा आहे, नुसते पाहुनच समाधान होते की आपण काहितरी अद्वितीय पाहिले ....

ते बंकर्स म्हणजे "दुसर्‍या महायुद्धाचा पुन्हा : जिवंत केलेला इतिहास " आहेत ...
अति प्रचंड व अक्षरशः रेखीव, पण फार पडझड झाली आहे, मुश्कीलीने एकदा व्यवस्थीत जागा पहायला मिळते, तिथे एक "डॉक्युमेंट्री" दाखवली आम्हाला, जर्मन भाषेतच होती पण पाहुन अंदाज आला की तेथे काय काय भयंकर प्रकार चालत ह्याचा ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सुनील's picture

26 Nov 2008 - 3:42 pm | सुनील

सुंदर वर्णन आणि फोटो.

स्वगत - बीयर आणि भेळ काँबिनेशन? एकदा ट्राय करायला हवे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

डॉ.प्रसाद दाढे's picture

26 Nov 2008 - 9:05 pm | डॉ.प्रसाद दाढे

फोटू व माहीतीबद्दल धन्यवाद. खूप आवडले.

स्वाती दिनेश's picture

8 Dec 2008 - 3:09 am | स्वाती दिनेश

ॠषिकेश,दोन विलोजच्या मध्ये पुतळा आहे आणि पुढे लहानशी पुष्करणी आणि कारंजे आहे.
बंकरमध्ये वीज होती त्यामुळे तेलाचे ओघळ नसावेत. बाँबहल्ल्यात उध्द्वस्थ झाल्याच्या त्या खुणा असावा,जो भाग नंतर डागडुजी केला आहे तो भाग स्वच्छ आहे.
सर्व मिपाकरांना भ्रमणमंडळातर्फे धन्यवाद,
लाइष्टष्टाइनचा धबधबा येथे पहा.
स्वाती

भडकमकर मास्तर's picture

8 Dec 2008 - 3:19 am | भडकमकर मास्तर

भारी फोटो आणि मस्त वर्णन...
:)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वाती राजेश's picture

8 Dec 2008 - 5:20 pm | स्वाती राजेश

स्वाती,
प्रवासवर्णन फारच छान केले आहेस, अगदी आम्हीच ट्रीप करून आलो असे वाटले,
फक्त ती भेळ तेवढी खायला मिळाली नाही.:)

स्वाती राजेश's picture

8 Dec 2008 - 5:20 pm | स्वाती राजेश

स्वाती,
प्रवासवर्णन फारच छान केले आहेस, अगदी आम्हीच ट्रीप करून आलो असे वाटले,
फक्त ती भेळ तेवढी खायला मिळाली नाही.:)