संयमी जगज्जेता!!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
31 Oct 2008 - 7:30 pm

२९ ऑक्टोबर २००८, जर्मनीमधल्या बॉन शहरातल्या 'आर्ट अँड एक्झिबिशन हॉल'ला जत्रेचं स्वरुप आलं होतं! सहाजिक आहे, दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी मधे पट मांडून एकमेकांसमोर बसलेले होते. बुद्धीबळाच्या जगज्जेतेपदाचा सामना सुरु होता. १२ डावांच्या ह्या मालिकेत जो कोणी ६.५ गुण मिळवेल त्याच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडणार हे नक्की होतं.
आनंद विश्वनाथन (भारत) २००७ चा जगज्जेता वि. व्लादिमीर क्रामनिक (रशिया) २००८ सालासाठी त्याला आव्हान देणारा असा हा सामना होता. आनंद ६ गुणांसह आघाडीवर होता, त्याच्या आणि विजेतेपदाच्या मधे फक्त अर्ध्या गुणाचं अंतर होतं. उत्सुकता शिगेला पोचली होती. पिछाडीवर असला तरी चिवट क्रामनिक जीव तोडून लढणार हे उघड होतं. आधीच्याच १० व्या डावात त्यानं निम्झो-इंडियन बचावातल्या रोमानिशीन व्हेरिएशनने अवघ्या २९ खेळ्यात आनंदला नमवलं होतं! त्या डावाचं दडपण आनंदवर असणं स्वाभाविक होतं. अशा घटकेला ११ व्या डावात एवढीही चूक आनंदला महागात पडू शकत होती.
आनंदकडे पांढरी मोहोरी असण्याचा फायदा असा झाला की डाव कोणत्या पद्धतीने सुरु करायचा हे त्याच्या हातात होतं. सिसीलियन बचावातलं नॅजडोर्फ व्हेरिएशन ह्या प्रसिद्ध प्रकारानं आनंदनं सुरुवात केली! गंमत बघा, हे व्हेरिएशन काळ्या मोहोर्‍यांसाठी प्रसिद्ध आहे, आणि आनंदची मोहोरी पांढरी आहेत. डावाच्या सुरुवातीलाच इथे एकप्रकारची मानसिक लढत आहे. "तुला फायदेशीर ठरु शकणारे वेरिएशन खेळतोय, पाहू काही करु शकतोस का?" अशी सुप्त आव्हानयुक्त चिथावणी आहे! अशा वेळी मानसिक संतुलन आणि संयम दोन्हीचा कस लागतो. क्रामनिक कसलेला खेळाडू आहे. पहिल्या सहा खेळ्या कॉपीबुक स्टाईल झाल्या. सातव्या खेळीत क्रामनिक पॉईझन्ड पॉन वेरिएशन खेळू शकतो पण त्यात धोका आहे आणि तो आधीच गुणात मागे पडला आहे! तो हा धोका पत्करणार की नाही?
दुसरी मानसिक लढाई सुरु. त्याने हा धोका पत्करला तर कसे लढायचे आणि नाही पत्करला तर कसे खेळायचे दोन्हीवर आनंदचा विचार सुरु आहे. सातव्या खेळीत क्रामनिक खेळतो ती गॅरी कास्पारोव आणि बोरिस गेल्फांड ह्यांनी खेळलेली वेरिएशन! ह्या मार्गाने त्या दोघांनी बरेच डाव जिंकलेले आहेत! आनंद तयार आहे, त्याचे लक्ष्य आहे अर्धा गुण आणि क्रामनिकचे १ गुण! त्यामुळे पुढच्या काही खेळ्यात झपाट्याने मारामारी करुन तो पटावरचा ताण हलका करतो आणि स्थिती सुटसुटीत करुन घेतो. क्रामनिक लढत निर्माण करु शकत नाही. २४ खेळ्यात बरोबरीचा प्रस्ताव होतो. आनंद जगज्जेता झालेला असतो!! जगभरातल्या सर्व भारतीयांच्या दिवाळी आनंदात अजून एका धमाकेदार आणि दैदीप्यमान अग्निबाणाची भर पडलेली असते!! :)

आनंदचे एक महत्त्वाचे वैशिष्ठ्य असे की तो अतिशय शांत असतो. जिंकल्यानंतरही अभिनिवेषपूर्ण हातवारे, हावभाव, प्रतिस्पर्ध्याला नजरेने आणि बॉडीलँग्वेजने कमी लेखणे हे प्रकार तो करत नाही! काय बोलायचे ते तो पटावरच बोलतो आणि मला हे फार महत्त्वाचे वाटते. त्याची नम्रता, त्याचा साधेपणा आणि संयम ह्याने त्याचे विजेतेपद अधिक झळाळून दिसते हे निश्चित!

पंधरा लाख यूरोज इतकी घसघशीत रक्कम आनंद आणि क्रामनिक दोघेही विभागून घेणार आहेत! बक्षीसाच्या रकमेकडे बघून का होईना पण भारतात बुद्धीबळाला आता क्रिकेटप्रमाणेच महत्त्व प्राप्त व्हायला हरकत नाही! ;)

आनंद हा एकमेव खेळाडू असा आहे की ज्याने बाद फेरी (नॉक ऑऊट), साखळी फेर्‍या (टूर्नामेंट) आणि थेट सामना (मॅच) ह्या तीनही प्रकारे खेळल्या गेलेल्या जागतिक स्पर्धात विजेतेपद मिळवून दाखवले आहे. हा पराक्रम गॅरी कास्पारोवलाही जमलेला नाही!
५ बुद्धीबळ ऑस्कर्स मिळवणार्‍या आनंदने तिसर्‍यांदा जागतिक विजेतेपदाचा मुकुट आपल्या डोक्यावर चढवला आहे!
त्याला सर्व भारतीयांतर्फे मानाचा मुजरा!!

फिडे अध्यक्षांकडून जागतिक अजिंक्यपद स्वीकारताना आनंद आणि बाजूला क्रामनिक.
चतुरंग

क्रीडाप्रकटनविचारलेखअभिनंदनआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

शितल's picture

1 Nov 2008 - 12:05 am | शितल

आनंदचे एक महत्त्वाचे वैशिष्ठ्य असे की तो अतिशय शांत असतो. जिंकल्यानंतरही अभिनिवेषपूर्ण हातवारे, हावभाव, प्रतिस्पर्ध्याला नजरेने आणि बॉडीलँग्वेजने कमी लेखणे हे प्रकार तो करत नाही! काय बोलायचे ते तो पटावरच बोलतो आणि मला हे फार महत्त्वाचे वाटते. त्याची नम्रता, त्याचा साधेपणा आणि संयम ह्याने त्याचे विजेतेपद अधिक झळाळून दिसते हे निश्चित!

:)

>>>>५ बुद्धीबळ ऑस्कर्स मिळवणार्‍या आनंदने तिसर्‍यांदा जागतिक विजेतेपदाचा मुकुट आपल्या डोक्यावर चढवला आहे!
त्याला सर्व भारतीयांतर्फे मानाचा मुजरा!!

आमचा ही मानाचा मुजरा :)

टारझन's picture

2 Nov 2008 - 3:05 pm | टारझन

कं लिवला रंगाकाका , कं लिवला .... जबरान एकदम .. आनंद भौंचा आपण बी पंखा ए ... बाकी मी जास्त बुद्धीबळ मॅचेस पाह्यल्या नाय .. पण बुद्धीबळात पण हातवारे,बॉडीलँग्वेज , हावभाव किंवा नजरेने कमी लेखण्याचे प्रकार असावेत हे आम्हाला जरा आश्चर्यकारक वाटलं .. माहिती बद्दल हाबिणंदण

एलियन्स के साथ बातां : पग टार्‍या पग .. अन तुला एफ-१,किरकीट न बॉडी बिल्डींग यांच्या खेळांशिवाय काय चाल्लय माहित आहे का ? नावावा हत्ती आहेस तु .

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा

बबलु's picture

1 Nov 2008 - 12:15 am | बबलु

परफेक्ट वर्णन.
(तुम्ही बुद्धीबळात पटाईत खेळाडू दिसताय).

वि. आनंद च्या या भरघोस यशाबद्दल त्याला मानाचा मुजरा.

....बबलु

विसोबा खेचर's picture

1 Nov 2008 - 12:24 am | विसोबा खेचर

आनंद जगज्जेता झालेला असतो!! जगभरातल्या सर्व भारतीयांच्या दिवाळी आनंदात अजून एका धमाकेदार आणि दैदीप्यमान अग्निबाणाची भर पडलेली असते!!

वा!

बक्षीसाच्या रकमेकडे बघून का होईना पण भारतात बुद्धीबळाला आता क्रिकेटप्रमाणेच महत्त्व प्राप्त व्हायला हरकत नाही!

माझ्या मते इथे महत्व प्राप्त होण्याचा सवाल नाही. बुधिबळ आणि क्रिकेट ह दोन्ही पूर्णत: वेगळे खेळ आहेत आणि दोन्हींमध्ये खूप मौज आहे. महत्व आहे ते ग्लॅमरला आणि त्या बाबतीत क्रिकेट बुद्धिबळाच्या काहीच्या काहीच पुढे आहे.. आज सचिनला किंवा लाराला जे ग्लॅमर आहे ते आणि तेवढं ग्लॅमर कुणाच बुद्धिबळपटूला नाही. सचिन, लारा, सर आयझॅक अलेक्झंडर व्हिव्ह्यन रिचर्डस, सर डॉन ब्रॅडमन ही मंडळी जशी आपली वाटतात तसे आनद, क्रॅमनिक आपले वाटत नाहीत. आज आमच्या परळ-लालबागचा एक आम मनुष्य लाराची किंवा ऍडम गिलक्रिस्ट फटकेबाजी जशी एन्जॉय करू शकतो तसा आनंदचा खेळ नाही एन्जॉय करू शकत! :)

तेव्हा क्रिकेटकी तो बातही अलग है..! शिवाय क्रिकेट हा असा एकमेव खेळ आहे ज्यात ऍट अ टाईम एक विरुद्ध अकरा किंवा फार फार तर दोन विरुद्ध अकरा असा सामना सुरू असतो! जगातल्या इतर कोणत्याच खेळात ही गंमत नाही. कबड्डीचं उदाहरण एक वेळ देता येईल! तरीदेखील क्रिकेट ते क्रिकेट बॉस! उसकी अपनी एक शान है..! :)

आपला,
(क्रिकेटवेडा भारतीय) तात्या.

हा पराक्रम गॅरी कास्पारोवलाही जमलेला नाही!

हम्म! परंत गॅरी आता जागतिक स्पर्धेत खेळतच नाही असं ऐकलं आहे! आणि खुद्द गॅरीने आनंदला अनेकदा धूळ चारली आहे असे ऐकून आहे! गॅरी जर या स्पर्धेत उतरला असता तर त्याने आनंदची पंचाईत करून ठेवली असती..!

आपला,
(गॅरी कास्पाराव प्रेमी) तात्या.

चतुरंग's picture

2 Nov 2008 - 12:21 am | चतुरंग

महत्व आहे ते ग्लॅमरला आणि त्या बाबतीत क्रिकेट बुद्धिबळाच्या काहीच्या काहीच पुढे आहे..

ह्याच ग्लॅमरच्या नादी लागल्याने इतर खेळात चमकू शकतील अशा किती खेळाडूंचं आयुष्याचं नुकसान होतं याची काही गणतीच नाहीये!पालक आपल्या मुलांना सचिन आणि लारा बनवायला जबरदस्तीने कँप्सला पाठवतात पण त्यांचं काय होतं? फ्रस्ट्रेट झालेली कितीतरी मुलं मी स्वतः बघितली आहेत!
क्रिकेट मलाही आवडतं. त्यातलं ग्लॅमर हे निर्विवाद प्रचंड आहे पण ग्लॅमर म्हणजेच सर्व काही आहे का? ग्लॅमर तुम्हाला कधी प्राप्त होतं? का प्राप्त होतं? त्यामुळे इतर खेळ हे झाकोळले जाण्याइतपत जेव्हा परिस्थिती येते तेव्हा नक्कीच कुठेतरी काहीतरी चुकते आहे!

बक्षीसाच्या रकमेकडे बघून का होईना पण भारतात बुद्धीबळाला आता क्रिकेटप्रमाणेच महत्त्व प्राप्त व्हायला हरकत नाही!

हे वाक्य लिहिण्यामागचा माझा उद्देश एवढाच होता की इतरही खेळ आता नावारुपाला येत आहेत. त्यातही पूर्णवेळ खेळाडू होण्याइतकं भवितव्य असू शकतं अशी परिस्थिती निर्माण होते आहे. नव्या पिढीने त्या संधीचा योग्य तो फायदा घ्यायला हवा!

चतुरंग

प्राजु's picture

1 Nov 2008 - 12:27 am | प्राजु

भारतात दिवाळी झोक्कात आणि दणक्यात साजरी झाली .. जोरदार आतिषबाजी झाली! सर्वांची दिवाळी द्विगुणित आनंदाने उअजळून निघाली.
आनंदने दिलेला आनंद हा दिवाळीच्या आनंदापेक्षा मोठा आहे..
विश्वविजेता विश्वनाथन आनंद... त्याच्या नावातच विश्व नाथ म्हणजे विश्वाचा नाथ आहे.
हॅट्स ओफ टू हिम..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

1 Nov 2008 - 8:00 am | मदनबाण

सुरेख लेख...
आनंदचे अभिनंदन....

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

प्रमोद देव's picture

1 Nov 2008 - 9:22 am | प्रमोद देव

आनंद जग्गजेता झाला म्हणण्याऐवजी त्याने ते आपल्याकडे राखले हे वाचून झालेला आनंद काही और आहे. कारण अजिंक्यपद मिळवणे जितके कठीण असते त्याहीपेक्षा ते राखणे अजून कठीण असते आणि आनंदने ते राखले म्हणूनही जास्त आनंद झाला.
रंगाशेठ अतिशय सहजसुंदर भाषेत तुम्ही लिहीलेल्या ह्या लेखातून आपले बुद्धिबळाच्या बाबतीतले तांत्रिक विश्लेषणाचे ज्ञान दिसून येते . त्यालाही सलाम!

विसुनाना's picture

1 Nov 2008 - 2:24 pm | विसुनाना

समयोचित जाणकार लेखन.
आनंदचे अभिनंदन!

स्वाती दिनेश's picture

1 Nov 2008 - 6:19 pm | स्वाती दिनेश

आनंदचे वर्णन आवडले. आता बॉनच्या त्या हालंच्या आजूबाजूने जरी गेले तरी इथे आनंद जिंकला हे आठवून फार वेगळेच छान फिलिंग येईल.
( म्हणजे आता लवकरच भ्रमणमंडळ बॉनला जायला हवं, फ्राफु ते बॉन काही फार अंतर नाही,:))
स्वाती

मृदुला's picture

1 Nov 2008 - 9:37 pm | मृदुला

लेख आवडला. वर्तमानपत्रातल्या बातमीच्या १० ओळींपेक्षा कितीतरी सरस.

ऋषिकेश's picture

2 Nov 2008 - 10:36 am | ऋषिकेश

लेख आवडला. वर्तमानपत्रातल्या बातमीच्या १० ओळींपेक्षा कितीतरी सरस

+१
-ऋषिकेश

अवलिया's picture

2 Nov 2008 - 6:40 pm | अवलिया

असेच म्हणतो.

नाना

यशोधरा's picture

1 Nov 2008 - 9:59 pm | यशोधरा

आवडला लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2008 - 10:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संयमी जगज्जेत्याबद्दल एका जाणकाराकडून एक चांगले विश्लेषन !!!

आनंदचा आनंद आहेच :)

-दिलीप बिरुटे

खुद के साथ बाता, चतुरंग आपल्याला बुद्धीबळ, डाव लिहायचे शिकवू शकतो का ? मिपावर त्यावर क्रमशः लेख ? वगैरे काही...

लिखाळ's picture

2 Nov 2008 - 12:06 am | लिखाळ

वा वा.. लगेच लेख आलेला पाहून आनंद झाला...आभार !
लेख छान.. त्यांच्या लढतीचे वर्णन छानच आहे.

जिंकल्यावर रक्कम सुद्धा घसघशीत आहे :)
बुद्धीबळाचा खेळाडु होण्याचे टप्पे, सुरुवात कशी करावी, या बद्दल माहिती वाचण्यास उत्सुक आहे ;)
--लिखाळ.

सहज's picture

2 Nov 2008 - 7:41 am | सहज

रंगाशेठ लेख आवडला.

आनंदमुळे बुद्धीबळ, पेस-भुपती मुळे टेनिस या खेळांना भारतात नक्कीच विशेष प्रसिद्धी मिळाली आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Nov 2008 - 1:59 pm | बिपिन कार्यकर्ते

रंगाशेठ, प्रतिसाद टंकायला उशिर झाला, मापी द्या.

अतिशय योग्य आणि समर्पक शब्दात या लढतीतला थरार उभा केला तुम्ही. बुद्धिबळ हा असा खेळ आहे की शारिरीक हालचाल सर्व खेळांमधे सर्वात कमी असते पण मानसिक युद्ध हे चरमसीमेवर असतं. स्वतः बर्फासारखं थंड राहून प्रतिस्पर्ध्याला कसं विचलित करायचं हे या खेळाचं एक खूप मोठं अंग आहे.

तुम्ही ग्लॅमर आणि बक्षिसाच्या रकमेबद्दल लिहिलंय तेही पटलंच. दुर्दैवाने आज किती लोक खेळासाठी खेळ खेळतात हा एक संशोधनाचाच विषय ठरावा. बहुतेक लोक केवळ पैसा आणि ग्लॅमर मुळे एखाद्या खेळाकडे ओढले जातात. ही आजची वास्तवता आहे. त्या मुळे बुध्दिबळासारख्या खेळात एवढे पैसे मिळायला लागले तर भारतात पण नक्कीच लोक अजून ओढीने या खेळाकडे वळतिल. बाकी क्रिकेट विरुद्ध बाकी खेळ हा एक अनादि अनंत चर्चाविषय आहेच.

चतुरंग, तुमच्याकडून अजून १-२ अपेक्षा :)

०१. लिखाळने लिहिल्या प्रमाणे बुद्धिबळावर, एक खेळ म्हणून एखादी लेखमाला वगैरे लिहाल का? साला, या खेळाबद्दल नेहमीच आकर्षण वातत आले आहे पण कधी जास्त खेळलो नाही. अजूनही शिकता येईल.

०२. तात्याने कास्पारॉव्हचा उल्लेख केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आनंद कधी कास्पारॉव्हला भारी पडलेला नाहिये. अर्थात कास्पारॉव्ह आता खेळत नाही आणि कोणत्याही कारणास्तव आनंदच्या कामगिरीला कमीपणा येऊ शकत नाही. पण कास्पारॉव्ह असता तर आनंद कुठे असता? आनंद आणि कास्पारॉव्ह मधे तुलना केली तर कशी होईल?

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

2 Nov 2008 - 6:16 pm | चतुरंग

०१. लिखाळने लिहिल्या प्रमाणे बुद्धिबळावर, एक खेळ म्हणून एखादी लेखमाला वगैरे लिहाल का? साला, या खेळाबद्दल नेहमीच आकर्षण वातत आले आहे पण कधी जास्त खेळलो नाही. अजूनही शिकता येईल.

बुद्धीबळावर लिहायचे खूप दिवस मनात आहे. सलग न मिळणारा भरपूर मोकळा वेळ ही मुख्य समस्या आहे. तरिही पाहूया अधिक विचार करुन ठेवतो कसे काय जमते ते.

०२. तात्याने कास्पारॉव्हचा उल्लेख केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आनंद कधी कास्पारॉव्हला भारी पडलेला नाहिये. अर्थात कास्पारॉव्ह आता खेळत नाही आणि कोणत्याही कारणास्तव आनंदच्या कामगिरीला कमीपणा येऊ शकत नाही. पण कास्पारॉव्ह असता तर आनंद कुठे असता? आनंद आणि कास्पारॉव्ह मधे तुलना केली तर कशी होईल?

कुठल्याही खेळातले वेगवेगळ्या कालखंडातले जगज्जेते हे जगज्जेतेच असतात. सर्व बाबतीत तुलना होणे अवघड पण काही विक्रमांच्या बाबतीत करता येईल.अतिशय चमत्कृतीपूर्ण तुलना ठरावी.
वेगळा लेख होईल. लिहीन मी.

चतुरंग

एकलव्य's picture

6 Nov 2008 - 9:23 am | एकलव्य

लेख आवडला! अगदी मस्तच!! धन्यवाद!!!

(चतुरंग आणि इतरही मिपाकर - चुभूद्याघ्या ... १० व्या डावात मात स्वीकारल्यानंतर "चला... हरलो बाबा एकदाचा!" असे काहीसे उद्गार आनंदाने काढल्याचे वाचले होते. नेमका तपशील कोणाला मिळाल्यास कृपया पोहचवावा!)

- चतुरंग एकलव्य

चतुरंग's picture

6 Nov 2008 - 10:15 am | चतुरंग

गुगलून बघितले काही हाती लागले नाही!
असे उद्गार आनंदने काढणे त्याच्या स्वभावाविरुध्द आहे त्यामुळे ही बातमी गैर वाटते.
(तुम्ही कुठे वाचल्याचे स्मरते काही धागादोरा आठवेल का?)

चतुरंग

एकलव्य's picture

6 Nov 2008 - 10:20 am | एकलव्य

... म्हणजे पुरविण्याचा प्रयत्न करतो. मी वाचलेले नाही. पण मला बुद्धिबळ आवडते हे माहिती असलेल्या एका मित्राने अरे आनंद असे काहीसे म्हणाला असे सांगितले होते. अर्थात पराभव झाला हेही चांगलेच लक्षण आहे या अर्थाने आनंद म्हणाला होता असा भावार्थ होता.
पाहू या!

एकलव्य's picture

7 Nov 2008 - 8:30 am | एकलव्य

... लागले!

ही जागतिक बुद्धिबळ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दिलेल्या अनमोल मुलाखतीत पराभवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आनंदने मांडला आहे. हा संयमी जगज्जेता म्हणतो - Sometimes it is almost liberating when you finally lose. अफाट ताकद हवी हे म्हणायला.

क्रॅमनिककडून मात स्वीकारल्यानंतर या वाक्याचा संदर्भ दिल्याचे माझ्या मित्राने कळविले. आनंदने या पराभवानंतर पुन्हा हे किंवा असे वाक्य उच्चारले की नाही यांस माझ्या मते फारसे महत्त्व नाही. पण त्याच्या मनात काय येऊन गेले असेल याची चुणूक आनंदच्या आयुष्याकडे आणि http://www.chessbase.com/newsdetail.asp?newsid=4933 येथे प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीत मिळते.

(Liberated) एकलव्य

चतुरंग's picture

7 Nov 2008 - 9:05 am | चतुरंग

स्वतःची खरी ओळख असलेल्या आणि जय-पराजय सारख्याच तोलाने पचवू शकणार्‍या संयमी खेळाडूकडूनच असे विधान होऊ शकते. आधी मला ते आनंदच्या स्वभावाविरुद्ध वाटले पण त्यामागचा संदर्भ समजल्यावर तो असे का म्हणाला असेल हे कळते!
मुलाखत चाळली, सविस्तर वाचेनच उद्या. उत्तम दुव्याबद्दल धन्यवाद! :)

चतुरंग

मनस्वी's picture

7 Nov 2008 - 8:16 pm | मनस्वी

त्याची नम्रता, त्याचा साधेपणा आणि संयम ह्याने त्याचे विजेतेपद अधिक झळाळून दिसते हे निश्चित

नक्कीच!

आनंद जगज्जेता झाला ही बातमी न्यूज चॅनेलवर पाहिलीच होती. पण तुम्ही या खेळीचे एकदम सुंदर तंत्रशुद्ध वर्णन करून सांगितलेत.
त्याच्या या भरघोस यशाबद्दल त्याला मानाचा मुजरा.